तो खुला बाजार होता!

Submitted by सत्यजित... on 23 March, 2017 - 06:03

चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता
वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता!

चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकताना
सांधुनी काही कवडसे..फाकला अंधार होता!

मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती
पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता!

देह विझलेले जगाची वासना जाळीत होते
चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता!

हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती...
हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users