रंगीबेरंगी दुनिया माझ्या छोटया दोस्तांची

Submitted by सेन्साय on 22 March, 2017 - 07:39

मानवी जीवन अनेक कर्तव्य, जबाबदाऱ्या ह्यांनीच भरलेले असते आणि ह्यातून विरंगुळा म्हणून कोणी न कोणी आपापल्या आवडीनुसार काही न काही छंद लावून घेतो... खरे तर उपजत आवडीनुसार ते छंद आपल्याला जडतात. अगदी काहीही छंद नसलेला माणूस विरळाच. हॉबी म्हटले की त्यात अनेक प्रकार आले आणि हौसेला मोल नसते त्याप्रमाणे प्रत्येक जण आपला छंद आपापल्यापरीने जपत असतो अन काही न काही त्यात नवनवीन शोध घेतच असतो. म्हणून एकाच टाईपचा छंद असलेली मंडळी एका छत्राखाली भेटली तर एकमेकांच्या अनुभवाबद्दल आणि नवनवीन प्रयोगांबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडेल. ह्यासाठीच हा प्रयास ... जो तुमच्या सहकार्याने पूर्णत्वास जाईल.

बऱ्याच जणांना शाळेत असल्यापासून बागेतील कारंजे किंवा मोठाले तलाव ह्यातून खेळणाऱ्या विविध माशांचे नक्कीच आकर्षण वाटले असेल आणि हेच आकर्षण मग आपल्याला ओढत नेते माश्यांच्या रंगीत दुनियेत म्हणजेच शोभिवंत मासे मिळणाऱ्या ऍक्वेरियम कडे ! हा प्रवास कोणाचा काचेच्या बाटलीत गप्पी मासे पाळून, प्रसंगी आई बाबांचा धपाटा खात हळूहळू मग त्यांना मस्का मारत घरातल्या फिशटँक पर्यंत सुखरूप पोहोचतो तर कोणाचा पहिल्याच उडीत एकूणच प्रकरण न झेपल्याने व सतत मासे मेल्याने घरातली फिशटँक माळ्यावर उपडी ठेवून संपतो.

ह्याचा समनव्यय साधायचा तर ऍक्वेरियम छंदाविषयी बेसिक माहिती असणे गरजेचे वाटते. म्हणजेच इकडे मिळालेले अनेक प्रतिसाद नवीन लोकांना ऍक्वेरियमच्या छंदाकडे आकर्षित तर करतील पण त्यांना पुरेसे आणि योग्य ते नॉलेज देऊन .... म्हणून येथे फिश टॅंक असलेले आणि नसलेले असे सर्वांचे मनपूर्वक स्वागत .

माझ्याबाबत बोलायचे झाले तर माझा प्रवास सुद्धा काचेच्या बरणीमध्ये गप्पी मासे ठेवून त्यांचे निरीक्षण करताकरता स्वतःच्या फिशटँक पर्यंत झाला आणि पुढेही सुरूच राहिला. ह्यासंबंधितच कॉलेजला शैक्षणिक क्षेत्र असल्याने अनेक नवीन पैलू आणि आधुनिक प्रकार प्रत्यक्ष पाहायला आणि अनुभवायला मिळाले. आणि कळली ती ह्या क्षेत्राची खरी व्याप्ती आणि प्रचंड आर्थिक उलाढाल ...

जे विकलं जातं तेच पिकवायचं म्हटलं कि मग ह्यांचे प्रजोत्पादन आणि संवर्धन अगदी व्यावसायिक पातळीवरही सुरु झाले. ह्या अनुषंगाने सर्वांनांच इंटरेस्ट असेल असे नाही, कारण प्रत्येकाचे छंद आणि प्रत्यक्ष व्यवसाय, नोकरी हे बरेचदा वेगवेगळे असतात पण तरीही ह्या माश्याना आपल्या स्वतःच्या फिशटँक मध्ये पिल्लं घालताना अनुभवणं आणि मग त्या इवल्या इवल्या जीवांना हळूहळू मोठे होत असता त्यांच्यातील अनेक बदल जवळून पाहणं म्हणजे खरेच एक छान आनंददायी अनुभव असतो.

ह्यासाठी खरे तर जिवंत झाडे असलेला फिश टॅंक खूपच उपयोगी पडतो कारण त्यात हि नवजात पिल्लं व्यवस्थित रित्या लपून राहू शकतात आणि त्या झाडांवरचे शेवाळ आणि प्लान्टेट टॅंक मध्ये वाढणारे अनेक सूक्ष्म जीव खाऊन सहज जगतात आणि छान वाढतात. ह्या प्लान्टेड टॅंकचीही मजा काही औरच असते .... सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षच पहा ना !

1.jpg

हि टॅंक म्हणजे कॉलेज जीवनानातला पहिलाच प्रयोग होता आणि हे दिसतेय ते ह्या टॅंकची झाडे लावल्याच्या प्रथम दिवसाची स्थिती.
नंतर एक आठवड्यात ह्या झाडांचा एकूणच संसार मार्गी लागलेला दिसू लागतोय. जसे एखादं बिऱ्हाड नवीन ठिकाणी वास्तव्यास आलं की मग आपल्या नवीन जागेत हळूहळू स्थिरावू लागतात , शेजारी पाजारी मस्त मिसळून जातात तसे हे दुसऱ्या आठवड्यात दिसू लागतेय.

2.jpg

तिसऱ्या आठवड्यात अजून थोडी वाढ होतेय .... आणि माझ्या इवल्याश्या दोस्तांना त्यांचे ड्रीमहाऊसचे पझेशन मिळालं आणि सर्व मासे आता ह्या टॅंक मध्ये राहायला आलेत.

3.jpg

चौथा आठवडा म्हणजे एकदम कायापालट झालाय एकूणच दिसण्यात आणि सुंदरतेत ... दुडू दुडू चालणारं मूल एकदम मोठं होऊन राजबिंडा तरुण पुढयात दिसावा तसा टोटल ट्रानफॉर्मेशन एकदम !!

5.jpg

गुण्यागोविंदाने ह्या फिशटँकमध्ये १५० जणं राहायला लागले आणि जशी झाडांची दाटी वाढली तसे ह्यांचे गुणोत्तर सुद्धा एवढे वाढलं की मग जास्तीची पिल्लावळ बार्टर एक्स्चेंज मध्ये मित्र परिवारात फिरू लागली. Happy

आपल्यापैकी जी मंडळी फिशटँक बाळगून आहेत त्यांनी आपले अनुभव आणि जमल्यास टँकचे फोटो इथे शेअर केले तर ते पाहायला सर्वांनाच खूप आवडेल.
धन्यवाद .

Group content visibility: 
Use group defaults

मस्त !!!

छान, इथेच मायबोलीवर या छंदाबद्दल, माश्यांच्या प्रजातीबद्दल सविस्तर लेखन उपलब्ध आहे.

धन्यवाद दिनेश Happy

मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. काही जुने बाफ नक्कीच असणार ईथे कारण जेव्हापासून मी इकडे ह्या परिवारात सामिल झालो तेव्हा अनुभवले की मायबोलीने जीवनातील प्रत्येक छटेला ईथे शब्दरूप दिलय त्याबद्दल मायबोली विषयी खुपच कौतुक आणि आदर आहे.

पण आता ह्या इतक्या वर्षात सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगती झालीय तसेच इथेही काचेच्या नेहमीच्या साचेबंद टाक्या जावून इंपोर्टेड इनबिल्ट टैंक आल्यात तसेच बेंड ग्लास वगैरे बरेच प्रकार आहेत. तीच गोष्ट माश्यांच्या जाती आणि बदलणाऱ्या ऐक्वा स्केपिंग प्रकाराबबत.... हां सर्व प्रवास येणाऱ्या विविध फोटो मधून अनुभवता यावा ह्यासाठी सदर धागा काढण्यामागची कल्पना होती.

खूप सुंदर लेख आहे. इथे मायबोलीवर एक बागुलबुवा आयडी आहे. तो पण हाच छंद बाळगून आहे. कधीतरी त्याच्याशी संपर्क करा.

छान आहेत फोटो.
मला मुळातच पशूपक्षी पाळायला आवडत नाहीत. पण जे पाळतात त्यांच्याकडचे जलचर बघायला आवडतात.

धन्यवाद ऋन्मेश

पेट्स केटेगरीमध्ये मासे पाळणे सर्वात सोप्पा पर्याय असावा Wink