सिनेमाच्या गंमती

Submitted by विद्या भुतकर on 21 March, 2017 - 22:35

लग्न व्हायच्या आधी आणि मुले होईपर्यंत आयुष्यात बऱ्याच मारामाऱ्या केल्या. एखादी ट्रिप किंवा ट्रेक किंवा मुव्ही पाहायला जाताना, पुढे काय होईल किंवा उद्या ऑफिस आहे तर मग आज नको असे फालतू विचार मनात कणभरही आले नाहीत. हे असले प्रकार सुरु झाले ही मुलं झाल्यावर. आता अचानक कुठेही बाहेर पडायला, रात्री उठून कुठेतरी लॉँग ट्रिपला, ड्राईव्हला वगैरे जाता येत नाही. एक दिवस जरी कुठे जायचं म्हटलं तरी लढाईला चालल्यासारखे सर्व सामान घेऊन जावे लागते आणि कितीही घेतले तरी जे नाहीये तेच बरोबर हवे असते.

सर्वात जास्त फरक पडला तो म्हणजे आमच्या टीव्ही बघण्याला आणि उठून लगेच एखादा सिनेमा बघायला जाण्याला. गेल्या ७-८ वर्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहिले. त्यातले हिंदी तर अजून कमी. मुलांसोबत हिंदी चित्रपट पाहणे म्हणजे अतिशय त्रासाचं काम आहे. एकतर त्यांना बरोबर शु-शी लागते, कंटाळा येतो, भीती वाटते, रडू येते. मागे 'प्रेम रतन धन पायो' बघायला जाऊन आलो तर मुलगा डोक्याला हात लावून बसला होता पुढचा अर्धा तास. तेव्हा तर ४ च वर्षाचा होता. Happy असो. तर मुद्दा असा की एकूण बाहेर मुव्ही बघायला जाणे बंदच झाले आहे.

पण मला 'बद्रीनाथ की दुल्हनिया' बघायला जायची खूप इच्छा होत होती. पहिला आठवडा 'राहू दे' म्हणून सोडून दिला पण मागच्या शुक्रवारी मात्र राहवले नाही अजून एक आठवडा थांबले तर इथे थिएटर मधून तो सिनेमा गेलेला असतो. शुक्रवारी संध्याकाळी ७.१० झाले होते. म्हटले काहीही करून जायचेच. ८.१५ चा शो होता आणि पोचायला ४५ मिनिटे लागणार होती. तिथेही सीट्सना नंबर देत नाहीत. हाजीर तो वजीर. त्यामुळे लवकर पोहोचणं आवश्यक होतं. अजून जेवणही झालं नव्हतं. एकदा जायचं म्हटल्यावर, पटकन ऑनलाईन तिकीट बुक केले. सकाळचा पास्ता गरम करून दोन डब्यांत भरला, एकेक संत्रं आणि पाणी घेतलं. कपडे बदलून १० मिनिटांत निघालो. मुलांना गाडीतच पास्ता आणि संत्रे खायला दिले. थिएटरला पोचलो ८.१० पर्यंत. आम्ही जेवण केलेलं नव्हतंच. पॉपकॉर्न आणि कोल्ड्रींक घेऊन आत गेलो आणि ५-१० मिनिटांत पिक्चर सुरु झाला. गर्दी कमी होती त्यामुळे सीटही चांगले मिळाले. पिक्चरही आवडला त्यामुळे एकूणच सर्व नीट झाले म्हणायचे.

आता यात काही खूप महान कार्य केले नाहीये पण मला वाटतं की या अशा अनेक छोट्या का होईना प्रत्येकाचा वेगवेगळ्या सिनेमाच्या आठवणी असतात. एकदा भारतात असताना मुलं लवकर झोपली म्हणून अचानक कुठला तरी सिनेमा पाहायला गेलो. दोन लागले होते, त्यातला 'खूबसूरत' पाहून परतलो. असे क्षण कमीच पण अविस्मरणीय असतात. म्हणजे कुणी पैसे नसताना उधार घेऊन पाहायला गेल्याची गोष्ट, कुणी एका गाण्यासाठी १० वेळा पाहायला गेल्याची तर हं आपके सारख्या सिनेमाला आख्खी फॅमिली घेऊन गेल्याची असो. तिकीट मिळालं नाही तर ब्लॅकने पाचपट दार देऊन पाहिल्याची आठवण. अगदी लास्ट मिनिट दोन टोकांनी धावत-पळत येऊन पिक्चर पहिल्याच्या आठवणी तर कुणाची आत जाऊन झोपल्याची आठवण. फर्स्ट दे फर्स्ट शो पाहायचाच म्हणून हट्ट करून अगदी पहिल्या रांगेतून पाहिल्याचंही ऐकलंय. अशा अनेक.

सिनेमा असा पाहणं यात खास काय असतं माहित नाही, पण ते लक्षात मात्र राहतं. तुमच्याही अशा काही गमती असतील तर जरूर सांगा. Happy

विद्या भुतकर.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच किस्से भारी आहेत.
लहानपणी सीनेमे जास्त दाखवले नाहीत वडिलांनी. पण जजो दाखवला तो अगदी लक्षात राहीला.
मराठी सीनेमा - चल रे लक्षा मुंबईला.....
मी -वडिल-आई आणि बहीण, बहीणीचे वय ७-८ च्या आस-पास असेल. ती तशी खोड्कर आणी हट्टी. सिनेमा सुरु झाला आणी बहीणिने वडिलांकडे एक-एक गोष्ट मागायला सुरुवात केली. त्या वेळी पॉपकॉर्न एवढ फेमस न्हवत. वडापाव, वेफर्स असे पदार्थ जास्त खाल्ले जायचे.
वडिलांची परिस्थिती बेताची होती, त्या मुळे ज्यादा खर्च ते कधीच करत नसत. आई घरुन चिवडा करुन बरोबर घेत असे, पण बहीणीला मात्र बाहेरचे पदार्थ खायचे असायचे. सिनेमा सुरु होताच तिने हे पाहीजे ते पाहीजे सुरु केल, मध्यतंरापर्यन्त वडिलांनी तिला कस बस थांबवल, पण नंतर ती काही ऐकेना. वडिलांना सिनेमा नीट पाहता येईना. बहिणिने तिथे भोकाड पसरले, तस वडिलांचा पारा चढला, आणि सिनेमा अर्धवट सोडुन ते आम्हाला घरी घेउन आले. त्या नंतर कधिच परत सिनेमा दाखवायला नेले नाही.
बहीणिच्या वागण्यच्या असा फटका मिळाला.

Pages