सिनेमाच्या गंमती

Submitted by विद्या भुतकर on 21 March, 2017 - 22:35

लग्न व्हायच्या आधी आणि मुले होईपर्यंत आयुष्यात बऱ्याच मारामाऱ्या केल्या. एखादी ट्रिप किंवा ट्रेक किंवा मुव्ही पाहायला जाताना, पुढे काय होईल किंवा उद्या ऑफिस आहे तर मग आज नको असे फालतू विचार मनात कणभरही आले नाहीत. हे असले प्रकार सुरु झाले ही मुलं झाल्यावर. आता अचानक कुठेही बाहेर पडायला, रात्री उठून कुठेतरी लॉँग ट्रिपला, ड्राईव्हला वगैरे जाता येत नाही. एक दिवस जरी कुठे जायचं म्हटलं तरी लढाईला चालल्यासारखे सर्व सामान घेऊन जावे लागते आणि कितीही घेतले तरी जे नाहीये तेच बरोबर हवे असते.

सर्वात जास्त फरक पडला तो म्हणजे आमच्या टीव्ही बघण्याला आणि उठून लगेच एखादा सिनेमा बघायला जाण्याला. गेल्या ७-८ वर्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहिले. त्यातले हिंदी तर अजून कमी. मुलांसोबत हिंदी चित्रपट पाहणे म्हणजे अतिशय त्रासाचं काम आहे. एकतर त्यांना बरोबर शु-शी लागते, कंटाळा येतो, भीती वाटते, रडू येते. मागे 'प्रेम रतन धन पायो' बघायला जाऊन आलो तर मुलगा डोक्याला हात लावून बसला होता पुढचा अर्धा तास. तेव्हा तर ४ च वर्षाचा होता. Happy असो. तर मुद्दा असा की एकूण बाहेर मुव्ही बघायला जाणे बंदच झाले आहे.

पण मला 'बद्रीनाथ की दुल्हनिया' बघायला जायची खूप इच्छा होत होती. पहिला आठवडा 'राहू दे' म्हणून सोडून दिला पण मागच्या शुक्रवारी मात्र राहवले नाही अजून एक आठवडा थांबले तर इथे थिएटर मधून तो सिनेमा गेलेला असतो. शुक्रवारी संध्याकाळी ७.१० झाले होते. म्हटले काहीही करून जायचेच. ८.१५ चा शो होता आणि पोचायला ४५ मिनिटे लागणार होती. तिथेही सीट्सना नंबर देत नाहीत. हाजीर तो वजीर. त्यामुळे लवकर पोहोचणं आवश्यक होतं. अजून जेवणही झालं नव्हतं. एकदा जायचं म्हटल्यावर, पटकन ऑनलाईन तिकीट बुक केले. सकाळचा पास्ता गरम करून दोन डब्यांत भरला, एकेक संत्रं आणि पाणी घेतलं. कपडे बदलून १० मिनिटांत निघालो. मुलांना गाडीतच पास्ता आणि संत्रे खायला दिले. थिएटरला पोचलो ८.१० पर्यंत. आम्ही जेवण केलेलं नव्हतंच. पॉपकॉर्न आणि कोल्ड्रींक घेऊन आत गेलो आणि ५-१० मिनिटांत पिक्चर सुरु झाला. गर्दी कमी होती त्यामुळे सीटही चांगले मिळाले. पिक्चरही आवडला त्यामुळे एकूणच सर्व नीट झाले म्हणायचे.

आता यात काही खूप महान कार्य केले नाहीये पण मला वाटतं की या अशा अनेक छोट्या का होईना प्रत्येकाचा वेगवेगळ्या सिनेमाच्या आठवणी असतात. एकदा भारतात असताना मुलं लवकर झोपली म्हणून अचानक कुठला तरी सिनेमा पाहायला गेलो. दोन लागले होते, त्यातला 'खूबसूरत' पाहून परतलो. असे क्षण कमीच पण अविस्मरणीय असतात. म्हणजे कुणी पैसे नसताना उधार घेऊन पाहायला गेल्याची गोष्ट, कुणी एका गाण्यासाठी १० वेळा पाहायला गेल्याची तर हं आपके सारख्या सिनेमाला आख्खी फॅमिली घेऊन गेल्याची असो. तिकीट मिळालं नाही तर ब्लॅकने पाचपट दार देऊन पाहिल्याची आठवण. अगदी लास्ट मिनिट दोन टोकांनी धावत-पळत येऊन पिक्चर पहिल्याच्या आठवणी तर कुणाची आत जाऊन झोपल्याची आठवण. फर्स्ट दे फर्स्ट शो पाहायचाच म्हणून हट्ट करून अगदी पहिल्या रांगेतून पाहिल्याचंही ऐकलंय. अशा अनेक.

सिनेमा असा पाहणं यात खास काय असतं माहित नाही, पण ते लक्षात मात्र राहतं. तुमच्याही अशा काही गमती असतील तर जरूर सांगा. Happy

विद्या भुतकर.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वीच्या १st डे , १st शो ची मजा गेली आता. उरल्या त्या फक्त आठवणी. कॉलेज मध्ये असताना एकाच दिवशी ३ चित्रपट (ते सुद्धा इंग्लिश) पहिले आणि संध्याकाळी घरी आल्यावर कोणत्या चित्रपटात काय होते तेच आठवेना. रम्य होते ते दिवस.

Talash चा फर्स्ट डे सेकंड शो पाहायला गेलो होतो आणि मित्राने फर्स्ट शो पाहून टेक्स्ट केला मी थेतर मध्ये जाताना.. "करीना भूत आहे" ... अजून आठवतो तो किस्सा...

खूप मस्त धागा ....
कॉलेज ला असतानाच्या खूप आठवणी आहेत ...
तिकिटासाठी पैसे नसतील तर मित्रांकडून वर्गणी गोळा करून मुव्हीला जाणे..
प्रत्येक मूव्हीला ५ - १० मिनिटे उशिरा पोहोचणे ...पाऊस असो ऊन असो बस मिळो न मिळो मग ह्याला त्याला हात दाखवत लिफ्ट घेत मुव्हीला पोहोचणे...
मज्जा होती राव....
ह्या शनिवारी मात्र 4D मध्ये kong पहिला तेही पुण्यावरून मुंबईला बाईक वरून जाऊन..

अजून एक ...
माझ्या दिड वर्षाच्या मुलाला घेऊन ती सध्या ला गेलो होतो ... मुलाला गाणी खूप आवडायची त्या मूव्हीची म्हणून ... २ गाणी होईपर्यंत बसला कसाबसा...पण मग मांडीवरून उतरून पूर्ण थिएटर भर फिरायला लागला...मग बाकीच्यांना त्रास नको म्हणून त्याला घेऊन मी बाहेर गेम झोन मध्ये खेळत बसलो आणि बाकीची मूव्ही बायकोने एन्जॉय केला ...

कॉलेज ला अचानक सुट्टी मिळाली (म्हणजे लेक्चरला गेल्यावर नाहीये अस कळल) की बाय डिफॉल्ट पिक्चरचा प्रोग्राम असायचा.

कॉलेजला असतांना शेवटच्या पेपर नंतर पिक्चरला जायची टूम निघाली. घरी विचारले नव्हते. असे फक्त मैत्रिणींबरोबर (मित्र तर फाररररर लांबब्ब्ब्ब्ब्ब्ब) जायची परवानगी पण नसायची.
मी नाहीच म्हणाले, पण मैत्रिणीने शेजारच्या फोनवर फोन करुन कशीबशी परवानगी मिळवली. हजार प्रश्नांची उत्तरे दिली, कोण कोण आहे? कुठला पिक्चर??? कुठले थिएटर??? सर्वात महत्वाचे ......मुले नाहीत ना बरोबर Proud

तरी टेन्शनमुळे तो पिक्चर काही एन्जॉय करता आला नाहीच. पिक्चर होता, तेजस्विनी!!

BE ची फायनल परीक्षा संपल्यावर माझ्या तेव्हाच्या GF च्या गृप बरोबर पिक्चर पाहायला गेलो होती. मोहब्बते
आम्ही कितीही लपवले तरी त्या टवाळ गृप ला वास लागलाच होता.
गृप मधल्या कोणीतरी पुढे जाऊन तिकिटे काढली,
दोन तिकिटे पुढच्या लाईन मधली, आणि बरोबर मागच्या लाईन मध्ये 10-11 जण
अक्खा पिक्चर भर आम्ही लाइव्ह CC TV व्हा निगराणी खाली होतो Lol

कॉलेज चे दिवस आठवले.. लेक्चर बंक करून मूव्ही ला जायचो आम्ही.. बरेच फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिले आहेत.
आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.. अनेकानेक महिने झाले थेटर मधे जाऊन.. शेवट्चे पाहिलेले जंगल बुक आणि वेंटिलेटर ..

मि आमिर चा "रन्गिला" बघितला होता फर्स्ट दे फर्स्ट शो अगदी पहिल्या रांगेतून ....... "करीब" हा सिनेमा सलग दोन शो पन बघितले.....

मी केनयात असताना डर सिनेमाचे लागोपाठ ३ शो, म्हणजे ३ ते ६, ६ ते ९ आणि दुसर्‍या दिवशी ३ ते ६ असे बघितले होते.
म्हणजे पहिला शो बघून बाहेर आलो, तर बाहेर १ मित्र ऊभा होता, तो म्हणाला चल परत आणि दुसर्‍या दिवशी दुसर्‍या एका मित्रासोबत गेलो होतो.

गोव्याला फिल्म फेस्टीव्हल मधे सकुरा आणि ब्रोकबॅक माऊंटन एकाच थिएटर मधे लागोपाठ बघितले होते. मला आधी वाटलं होतं, आतच बसून राहू, पण बाहेर येऊन परत आत जावे लागले होते Happy

लहानपणी किंवा शाळा कॉलेजात सिनेमाबद्दल फारशी आस्था नव्हती.
माझ्या चुलत भावाला 'अबिताबच्चन' खूप आवडायचा, पण माझ्या बाबाना तो आवडत नसल्याने आम्ही लहानपणी त्याला शिव्या घालायचो. पण ११वीत असताना एकदा जागून त्याचा मुकद्दर का सिकंदर पाहिला आणि फॅन झाले. पण तरिही त्या काळी आला सिनेमा की बघ असे व्हायचे नाही. 'चाँदनी, मैने प्यार किया, असे निवडक सिनेमे पाहिले फक्त. कयामत से कयामत तक पाहिला (किती वेळा पाहिला ते आठवत नाही) पण रिपिट पहायचा असेल तर थेटरातच जावे लागे. त्या वेळी एक पडद्याची थिएटर्स असल्याने एकच चित्रपट कित्येक आठवडे एकाच ठिकाणी टिकून असे.
मी पडोसन हा सिनेमा ७ रुपयात बाल्कनीत बसून पाहिला होता. (कोल्हापूरात)
एकदा मी माझी बहिण, तिची मैत्रिण आणि माझा काका सचिन चा 'गंमत जंमत' पहायला थिएटर मध्ये गेलो होतो
तिकिट असंच ३ का ५ रुपये. काकाला तिथे १० रु ची नोट सापडली. मध्यंतरात त्याने प्रत्येकी अडिच रु चे खारे शेंगदाणे आणले ते आम्ही सिनेमा संपेपर्यंत खातच होतो.

कॉलेजात असताना सिनेमाला बाबांच्या कडून पैसे घ्यावे लागायचे, रिपिट पहायला परवानगी नसे, मग कुठल्यातरी भल्त्याच सिनेमाचे नाव सांगितले होते (मला आठवते राजकुमारचा 'पुलिस पब्लिक' नावाचा सिनेमा लागला होता तेव्हा) त्याचेच नाव ठोकून दिले होते, पाहिला होता तोच जो आवडला होता. आता सिनेमाचे नाव आठवत नाही.

पुण्यात दादा कोंडकेंच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे ९ सिनेमे रोज लिनाचिमं ला दाखवत होते, त्याचे विशिष्ट तिकिट होते.
पांडू हवालदार तिथे मी आणि माझी मैत्रिण जाऊन पाहून आलो, आंधळा मारतो डोळा पाहिला, बोट लाविन तिथे ही पाहिला. पण पब्लिक्च्या उत्साहाचे उधाण पाहून बर्‍याचदा बिचकलो होतो. बाकिचे ६ काही पाहिले नाहीत.

ही सिनेमाची गंमत नाही, आमचाच मामु झाला त्याची गंमत आहे. आम्ही मित्र मैत्रिणी पिकनिकला जाताना, शिवाजी नगर राहुलला कोणता तरी चांगला मुव्ही लागला होता, आता नाव आठवत नाही, १.५ दिवसांनी पुण्यात पोचता पोचता रात्री ९ च्या शो साठी वेळेत पोचु अशी खात्री झाल्यावर सगळ्यांनी त्या मुव्हिला जावु अशी टुम काढली आणि तसाही तीन दिवसांच्या एकत्र आउटिंग नंतर अजुन थोडा वेळ एकत्र रहावं असं सगळ्यांनाच वाटत होतं. एका मुलाला गाडीतुन उतरवुन धावत टिकेट्स काढायला पाठवलं आणि आम्ही सगळे कार्स पार्किंग आणि खाण्यासाठी काही अशा शोधात निघालो.
त्या वेड्याने झोपेत आणि वॉशरुमच्या घाईत, फक्त ९ टिकेट्स द्या असं सांगितल आणि लगेच वॉशरुमला पळाला. टिकेटस पाहिलेच नव्हते. आम्ही आत पोचल्यावर त्याची वाट पहाताना वर पोस्टर्स पाहिले तर ' मेरा पती सिर्फ मेरा है'. अशक्य, अचाट आणि अतर्क्यचा इसेन्स असलेला सिनेमा केवळ पैसे वाया जातील म्हणुन पाहिला.

कॉलेजमध्ये असताना, लग्नाआधी, मुल व्हायच्या आधी खूप चित्रपट पाहिले आणि खूप आठवणी आहेत

जॉब करत असताना आमच्या टीमने एका शुक्रवारी धूम बघायचे ठरवले. आधी मी हो म्हटले पण नंतर लक्षात आले की टीममध्ये मी एकटीच मुलगी आणि ७-८ मुले आहे. टीम लीड बाई होती पण आम्ही तिला निश्चितच नेणार नव्हतो. मग मी येत नाही म्हणून सांगितले. त्यानंतर पूर्ण टीमने "चल चल. एवढं काय अगदी. भाव खाऊ नकोस" वगैरे म्हटल्याने मी त्यांच्याबरोबर धूमला गेले होते. पण मग चित्रपटगृहात कोणी ओळखीचे भेटू नये अशी मनोमन प्रार्थना चालू होती.

लग्न ठरले तेव्हा नवर्‍याबरोबर सिनेमाला जायचे ठरले. ई-स्क्वेयरला गेले तर बरेच चित्रपट हाऊसफुल होते. ओमकाराची तिकीटे मिळाली. रिव्ह्यू, स्टोरी वगैरे काही माहित नव्हतं, ट्रेलरपण पाहिलं नव्हत. आणि चित्रपट सुरु झाल्यावर वाटले "अर्रर्रर्रर्रर्र"!!!!! मग थोडे दिवस त्याला माझ्याबद्दल काय वाटत असेल वगैरे विचार करत होते. त्यानंतर खूप वर्षे दोघेच दोघे चित्रपट पहायला कधीच गेलो नाही. काही वर्षांनी मटरु की बिजली का मंडोला पहिला. "अरे देवा!!!!" विशाल भारद्वाज का निवडावा आम्ही असे वाटून गेले Rofl

मी तर बाबा ऋन्मेषचे चार पाचशे किस्से सांगून झाल्याशिवाय लिहीणारच नाही. मला खात्री आहे त्याचे किमान शंभर तरी भन्नाट अनुभव असतील. नसतील तर तो विचार करून लिहील पण लिहील हे नक्की Proud

आमच्या लहानपणी आम्हाला सिनेमा बघण्याची परवानगी होती ती फक्त मोठ्यांबरोबर आणि ते पण देवीदेवतांचें. अपवाद फक्त माझ्या आजीआजोबांबरोबर बघितलेले सिनेमे. माझ्या आईचे काका-काकू नामांकित डॉक्टर्स होते. आई त्यांची खूप लाडकी होती. त्यामुळे साहजिकच आम्हीही लाडकी नातवंड होतो. आजोबांना कधी वेळ असला कि ते त्यांची कार घेऊन यायचे आणि आम्हाला सिनेमा बघायला न्यायचे. आम्हाला कार मधून जाणे, बाल्कनीत बसून सिनेमा बघणे परत सिनेमानंतर icecream मिळायचे त्याचेच कौतुक जास्त. दुसऱ्या दिवशी शाळेत मिरवायचं. बाकीच्या मैत्रिणी लेडीज मध्ये सिनेमा बघायच्या त्यामुळे त्यांच्यासमोर जास्तच मिरवून घ्यायचे. बाकी सिनेमा काही आठवत नाही.
मोठं झाल्यावरच्या आठवणी आणि शाखाचे सिनेमे हा एक स्वतंत्र विषय आहे. असा प्रतिसादात बसणार नाही.

कॉलेजला असतांना शेवटच्या पेपर नंतर पिक्चरला जायची टूम निघाली.>> आमच्याकडे ही होतीच. दर परिक्षेनंतर. Happy
लहानपणी मात्र मोजून ४-५ चित्रपट पाहिले असतील थिएटर मधे. Sad
तुमचे सर्वांचे प्रतिसाद पाहून मस्त वाटले. Happy धन्यवाद.

कॉलेजात असताना जवळच कांजूरमार्गला अतिशय बंडल सी ग्रेड चित्रपट लागायचे ज्याबद्दल कधीही कुणिही काहि ऐकलं नसायचं. एकदा मुद्दाम मी आणि एका मित्राने एक चित्रपट बघायचे ठरवले. आम्हाला अशी भिती होती की या चित्रपटाची माहिती किंवा काहीतरी कळाले तर पिक्चर पहावासा वाटणार नाही.तेंव्हा चित्रपट शुक्रवारी सकाळी बदलायचे. मग खूप प्लॅनिंग करून एक चित्रपट पाहिला.

- सुट्टी संपल्यावर नवीन सेमिस्टर सुरु झाले तेंव्हा आलेल्या पहिल्या गुरुवारी सिनेमा पाहिला. कारण शक्यतो सिनेमाबद्दल काही पोस्टर दिसू नये किंवा कुठे हॉस्टेलवर झालेले संभाषण कानावर पडून नये.
- गुरुवारी रात्रीचा शेवटचा शो पाहिला. कारण तो पर्यंत शुक्रवारच्या शोची नवीन पोस्टर लावायला सुरुवात झाली असते.
- कुठेही बसमधे, रिक्षात किंवा टॅक्सीवर काहितरी सिनेमाशी निगडीत पहायला लागले असते म्हणून सायकलवर पवईहून कांजूरमार्गला गेलो.
- शो ९ चा , आधीच्या जाहिराती आणि मुख्य म्हणजे आम्हाला टायटल्स चुकवायची होती कारण कोण कलाकार वगैरे काहीच माहीती नको होते. त्यामुळे मुद्दाम १०-३० ला तिथे पोहोचलो.
- मल्टीप्लेक्स यायच्या अगोदर ची गोष्ट त्यामुळे सिनेमा कुठला बघायचा हे तिकिट काढताना सांगायची आवश्यकता नव्हती.
- सगळ्यात स्वस्तातले तिकिट काढले. आत फारसे कुणि नव्हते आणि आम्ही सहज मागच्या चांगल्या रांगेत बसू शकलो असतो. तरीही मुद्दाम पहिल्या रांगेत मधे बसून सिनेमा पाहिला.
- आम्ही गेल्यावर काही मिनिटातच मध्यंतर झाले, मध्यंतरात बाहेर पडलो नाही. तसेच ठरवले होते.
- चित्रपटात मध्यंतरापूर्वी १ खून आणि मध्यंतरानंतर ६ खून आणि २ बलात्कार झाले. आम्ही यायच्या अगोदर काय झाले माहिती नाही. खूप वेळ हिरो कोण आणि व्हिलन कोण हे लक्षात येत नव्हते. कुठले खून वाईट माणसाने, आणि कुठले त्याचा बदला म्हणून घेतले गेले हे कळाले नाही म्हणून आम्ही खूप खूष होतो. एकही अभिनेता/अभिनेती या अगोदर कुठेही पाहिले नव्हते. चित्रपट हिंदी होता. शेवटी क्ल्यायमॅक्स असा काही झाला नाही. हिरो आणि विलनची फाईट अगदी टोकाला जाते असेही काही झाले नाही. हिरो आणि विलन अचानक समोरासमोर येतात. हिरो विलनला ओळखतो पण व्हिलनला तो कोण ते माहीती नसते त्यामुळे तो बेसावध असतो. आणि हिरो अचानक गोळी घालून विलनला ठार मारतो असा २-३ सेंकंदात क्ल्यायमॅक्स झाला आणि पिक्चर संपला. काले कमीने कुत्ते नाही, बदला लुंगा नाही, ढिषूम ढीशूम फाईट नाही. काही नाही.
-पिक्चर संपल्यावर कुठेही इकडेतिकडे न पाहता सायकली मारत होस्टेलवर पोहोचलो.
आजही तो सिनेमा कुठला ते माहीती नाही. इतक्या कष्टांचं सार्थक झालं.

जाता जाता: नुकतीच रोकूवर एक जुन्या चित्रपटांची फुकट चॅनेल सुरु केली आहे. त्यात अनेक कुणीही न ऐकलेले इंग्रजी सिनेमे आहेत. त्यातच एक बॉलीवूड नावाचा विभाग आहेत. त्यातले हिंदी चित्रपट असे आहेत जे आपण कधी ऐकलेच नसतील. अशा सगळ्या बी आणि सी ग्रेड सिनेमांची एक वेगळीच दुनिया आहे. आता नाव आठवत नाही पण त्यात एक हिंदी चित्रपट एका मराठी चित्रपटाची भ्र्ष्ट नक्कल वाटत होता. सगळे कलाकार दाक्षिणात्य वाटत होते आणि तो चित्रपट फक्त हिंदीत डब केला होता हे नंतर लक्षात आले.

आशूचॅम्प, धन्यवाद. आयुष्यच सुरस आणि चमत्कारीक गोष्टींनी भरलेय. चारपाचशे नसले तरी चाळीसपन्नास झोपेतून उठवल्यावरही आठवतील असे आहेत. पण सारेच लिहिलेत तर काही लोकं धागा हायजॅक केल्याचा आरोप लावतात आणि वेगळा धागा काढला तर त्याच धाग्यात लिहायला काय होते याला असे टोमणे मारतात.

असो, पण थिएटरात पिक्चर म्हटले की मला गर्लफ्रेंडच्या आधीही आमचा डिप्लोमाचा ग्रूप आठवतो. डिग्रीचाही थोड्याफार फरकाने तोच म्हणजे अर्धीअधिक पोरं तीच होती हे विशेष.

जसे एखादे कपल पिक्चर काय कोणता आहे हे न बघता अंधार्‍या जागी एकांत कसा मिळेल हे बघतात तसेच आम्ही थिएटरला एक दंगा घालायची जागा म्हणून बघायचो. ज्या पिक्चरला शिट्ट्या टाळ्या वाजवता येतील किंवा एखाद्या आयटम सॉंगवर नाचता येईल असा पिक्चर शोधून जायचो. बजेटमध्ये म्हणून नेहमी स्टॉलचेच तिकीट काढायचो, पण बाल्कनीच्या लोकांना आमच्यात उतरून नाचावेसे वाटावे ईतका दंगा घालायचो. कॉलेज बंक करून गेलो तर दुपारचा शो, संध्याकाळचा अचानक प्लान बनला तर तेव्हा मिळेल तो शो, किंवा रात्री शेवटचा शो बघून कॉलेजमध्ये येऊन नाईट मारायची, पत्ते खेळायचे, गप्पा रंगवायच्या, त्या आणि एक वेगळ्याच आठवणी...

आमचा सेमीस्टर पॅटर्न होता. दर सोमवारी सकाळी ३०-३० मार्कांचे पेपर असायचे. ७० मार्क फायनल. टोटल १००. म्हणजे त्या युनिट टेस्टही महत्वाच्या असायच्या. त्यांचा अभ्यास करायला शनिवार रविवार कॉलेजला पडीक. त्यातली शनिवारची रात्र पिक्चर ठरलेला. रविवार दुपार क्रिकेट. आणि आदल्या रात्री पुर्ण जागून एका नाईटीत हसतखेळत अभ्यास. यात शनिवारचा चित्रपट महत्वाची भुमिका बजावायचा कारण ती रात्र त्या पिक्चरला काय काय धमाल केली याच्या गप्पा चालायच्या. पिक्चरबद्दल काही बोलण्यासारखे असेल तरच बोलले जायचे. कारण पिक्चर फक्त एक निमित्त असायचे. जसे पावसाळा सुरू झाला की आम्ही पोरं न सांगता दर रविवारी पहाटे सहासातला दादर स्टेशनला जमायचो आणि तिथून एखाद्या वॉटरफॉलला पिकनिकला जायचो तसेच हे, शनिवारी लेट संध्याकाळी कॉलेजमागच्या कटींगसिगारच्या कट्ट्यावर जमायचे आणि तिथून पिक्चरला जायचे. सगळ्यात मजा तर हॉरर पिक्चरला यायची. उगाचच भयाण आवाज काढून पब्लिकला घाबरवत राहायचे. नुसती चढाओढ लागायची. कधीकधी तर आमच्यातल्याच पोरांच्या आवाजाची आम्हालाच भिती वाटायची. थिएटर्सच्या डोअरकीपरशीच आमचे आजवर कित्येक वाद झाले असतील.

तिकीटाच्या वर खर्च करायला एक पैसा नसायचा. कधी एखादे पॉपकॉर्न खाल्ले गेले नाही. पण तरी पिक्चर बघण्याची ती मजा आज ईतर कोणत्या ग्रूपबरोबर नाही येऊ शकत. म्हणून कॉलेज संपल्यावरही अधूनमधून एखादा दुनियादारी वा सैराट सारखा सिनेमा आला की कुठून कुठून जमतो, पुन्हा तीच तशीच भट्टी जमवतो, म्हणून टिकून आहे सारे Happy

अनेSSSSक वर्षांपूर्वी, म्हणजे १९७५ मधे इथे बॉबी नावाचा सिनेमा आला होता. खूप लांब होता आमच्या घरापासून, पण गॅस तेंव्हा २९ सेंट गॅलन होता, त्यामुळे तो प्रश्न नव्हता. पण अमेरिकेत येऊन हिंदी सिनेमा! व्वा, क्या बात है! म्हणून आमच्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन गेलो. मुलगा जाहिराती वगैरे होइस्तवर मजेत राहिला. पण सिनेमा सुरू झाल्यावर जोरात रडायला लागला. बाहेर नेल्यावर एका मिनिटात शांत, मस्त खेळत होता. आत गेल्यावर पुनः रडायला लागला. अंधार हे कारण असेल असे वाटले पण एरवीहि तो बरेचदा अंधारात (अमेरिकन थेटरात) मजेत रहायचा. मग आजच का?
मला वाटले सिनेमा बेकार आहे असे त्याला वाटले असेल, पण काही लोकांनी सांगितले भारतात काही मित्रांनी १०, १० वेळा पाहिला म्हणे!
पुढे मुले मोठी झाल्यावर हिंदी सिनेमा बघावा असे वाटले तर कळले की आजकाल साधना, हेमा मालिनी, राजकपूर वगैरे नसतात - कुणि बच्चन वगैरे किंवा खान हिरो असतात. नि हिरॉईन मधे कुणि मराठी नटी आहे म्हणे!

मला काही अजूनपर्यंत बॉबी सिनेमा पहाण्याचा योग आला नाही - त्या वयात आवडला असता, आता, काय बावळटपणा चाललाहे, लोक पहातात काय यात, असे वाटेल.

पुण्यात डेक्कन जिमखान्यावर एक मोठे चांगले टॉकीज होते (बहुतेक त्याचे नाव नटराज असावे). तिथे २३ फेब्रूवारी १९८७ ला एक सिनेमा पाहिला होता. कॉलेजातला खूप मोठा ग्रूप होता (५०-६० जणांचा). तिकिट पाहिल्यावर असे लक्षात आले की तिकीटाच्या तारखेचा शिक्का २३ फेब्रूवारी १९९७ असा पडला आहे. घोळक्याने आत गेलो आणि डोअरकिपरला फाडण्यासाठी तिकीट न देता आत घूसलो. इतका मोठा ग्रूप असल्यामुळे जमले.
ते तिकीट नंतर दहा वर्षे अगदी जपून ठेवले. फेब्रूवारी १९९७ ला भारतवारी जुळवून आणली. २३ फेब्रूवारीला पुण्यात असेन असा प्लॅन केला होता. इतकेच नाही तर त्यादिवशी मुद्दाम एका शोला जायचे आणि ते तिकिट दाखवून आत सोडतात का ते पहायचे असा विचार होता.
तिथे गेल्यावर लक्षात आले की ते थियेटर पाडून तिथे मॉल झाला आहे. Sad

भारी अजय Happy
तुम्हाला तिकिट चेकरने सीट नंबरच्या कॉन्फ्लिक्ट वरून पकडले असते तरी, दहा वर्षे तिकिट जपून ठेवल्याबद्दल मॅनेजरच्या ऑफिसमधली रिक्लायनर खुर्ची बसायला आणून दिली दिसती. Wink

सिटिलाईटला शेवटचा शो बघून धावत पळत जावून दादर वरून ठाण्याला जाणारी शेवटची लोकल पकडायची असा माझ्या मित्राच्या भावाचा (सोलापूरचा आहे तो आणि प्रचंड सिनेमा दर्दी -जो आता मराठी फिल्म लाईनमध्येच आहे) दर शुक्रवारचा कार्यक्रम चार वर्षे चालू होता, अगदी प्रत्येक शुक्रवार न चुकता बघणार म्हणजे बघणारच. लोकल चुकू नये म्हणून तो आधीच एग्झिट जवळ जाऊन ऊभा रहात असे, फार झाल्यास शेवटची पाच दहा मिनिटे सोडूनही देत असे.
आठवड्या भरापूर्वीच नवीन लग्न करून जेव्हा पहिल्याने बायकोला सिनेमा बघायला घेवून गेला तेव्हा नेहमीच्या सवयीने सिनेमा संपायच्या आधी हा पट्ठ्या जे पळत सुटला ते लोकल मध्येच बसल्यावर त्याच्या लक्षात आले की बायको थेट्रातच राहिली.

कॉलेजात दाखल झाल्यावर तेव्हा असेच लेक्चर बंक करून सिनेमा बघण्यातली मज्जा मज्जा नव्याने कळालेल्या आमच्या टोळीतल्या ईंग्रजी हॉरर सिनेमा बघण्याची सवय नसलेल्या आणि नुकत्याच गावाकडून आलेल्या बहाद्दराने घाबरून पँट ओली केली तो किस्सा आठवला.

विडिओ हॉलवरच्या रेड मध्ये आमचे ईंजि चे एक खडूस मास्तर पकडले गेले तो ही किस्सा फेमस झाला होता.

सिनेमा बघायला आलेल्या दोन सैनिकांचे आमच्या आधीच्या शो दरम्यान थेटरातल्या कुणाशी तरी जागेवरून वाद झाला होता म्हणून आमच्या शो दरम्यान १०० एक लोकांसमोर १५-२० आर्मी च्या सैनिकांनी खुर्च्या पडद्यासहित सगळे थेटर फोडले.

ईथल्या मुवी हॉपिंग बद्दल बोलायचे आहे का? बॅचलर असतांना फार केले... आता बायको बरोबर असतांना ऊगाच पॅकेज निघायच्या भितीने नाही करवत. Wink

पट्ठ्या जे पळत सुटला ते लोकल मध्येच बसल्यावर त्याच्या लक्षात आले की बायको थेट्रातच राहिली.>> Lol haha खूप हसले. अवघड आहे त्याच्या बायकोचे. Happy

आठवड्या भरापूर्वीच नवीन लग्न करून जेव्हा पहिल्याने बायकोला सिनेमा बघायला घेवून गेला तेव्हा नेहमीच्या सवयीने सिनेमा संपायच्या आधी हा पट्ठ्या जे पळत सुटला ते लोकल मध्येच बसल्यावर त्याच्या लक्षात आले की बायको थेट्रातच राहिली.
>>>

हाहाहा. हे लै भारी.

विडिओ हॉलवरच्या रेड, त्यात पकडले जाणारे, त्यांची नावं येणार टुकार वर्तमानपत्रात. हॉस्टेलवाल्यांना काय भय नसे आणि लोकल पोरांना शिणुमे बघताना 'भय इथले संपत नाही' असे होत असे

सिनेमा म्हणले कि आमचा एक कहर आठवतो...
दहावीच्या परीक्षेनंतर आम्ही तीन मैत्रिणींनी मिळुन बहुतेक कहो ना प्यार है ला जाणार होतो. तिकीटे आधीच काढून आणली होती. ऐनवेळी अजुन एका मैत्रिणीने सांगितले, मला हि यायचे आहे. मग तिचे तिकिट ऐन वेळी घेऊ असे ठरले
बहुतेक व्हिनस टॉकीज असावे.. 3 ते 6 चा शो होता. आम्ही चौघी टॉकीज वर पोचलो, एक तिकीट घेतले आणि आत निघालो. आम्हाला आतच जाऊ देईनात.

आमच्या तिघांचे तिकिट काढून आणणार्‍याने घोळ घातला होता... 12 ते 3 शो ची 3 तिकीटे आणली होती... जो आताच संपला होता..
मग आम्ही एक व्हॅलिड तिकिट एका सद्ग्रृहस्थास विकले, दहा रुपये जास्त किमतीने..
आणि घरी परत येताना सगळ्या मिळुन त्याचा उसाचा रस पिऊन आलो..
बरेच दिवस एकमेकांना चिडवत होतो.. कहो ना प्यार है...

बायकोला थिएटरात विसरायचा किस्सा भारी Happy

कहो ना प्यार है वरून आठवले, त्याच सोबत एक ऐतिहासिक चित्रपट रीलीज झालेला. फिर भी दिल है हिंदुस्तानी. ऐतिहासिक यासाठी की आयुष्यातील पहिला वहिला चित्रपट जो मी शाळा बुडवून पाहिलेला. इनफॅक्ट आम्ही तीन मित्रांनी एकत्रच हा पराक्रम केलेला. आणि यासाठी महिनाभर या त्या मार्गाने पैसे जमवलेले. शाळेतून मध्येच कलटी मारता येत नाही म्हणून पुर्ण दिवस दांडी मारलेली. सकाळचे कुठेतरी भटकायचे, आणि दुपारी बाराचा शो बघायचा असा प्लॅन होता. पण ऐनवेळी त्या दोघांनी कुठूनतरी टीप आणली की फिर भी दिल है हिंदुस्तानीपेक्षा कहो ना प्यार है चांगला आहे. मग मी माझे सारे शाहरूखप्रेम पणाला लावत त्यांचे मन वळवले. एखादा नवीन बचकांडा लौंडा शाहरूखपेक्षा भारी चित्रपट देऊच कसा शकतो हे त्यांना कसेबसे पटवले आणि फायनली फिर भी दिल है हिंदुस्तानीच बघायला गेलो. पुढे सर्वांना या दोन चित्रपटांचा ईतिहास माहीतच आहे. आमच्या मैत्रीत नक्कीच ताकद असावी जे ते आजही माझे मित्र आहेत. पण आजही व्हॉटसपग्रूपवर त्या पिक्चरच्या नावाने मला आणि शाहरूखला सामाईक शिव्या घालत असतात Happy

बायको थेट्रातच राहिली.>>>> Rofl
अजय १० वर्ष तिकिट संभाळत , भारीच की.
सगळेच किस्से भारी आहेत.
आम्ही मित्र रात्रभर बच्चन आणि दादा कोंडकेंचे सिनेमे एका पाठोपाठ एक व्हिसीआर वर बघुन, पहाटे फक्त अर्धा तास झोप काढुन , शाळेत गेलो होतो .

Pages