या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी

Submitted by आनन्दिनी on 20 March, 2017 - 23:04

नेहेमीप्रमाणे आज कट्टयावर सगळे जमले होते खरे पण आज रोजच्या सारखं बिलकुल वाटत नव्हतं. खामकरांची उणीव सर्वांनाच जाणवत होती. शेवटी रेगे म्हणाले, "खामकर नाही तर एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय" "हो ना, बिचाऱ्यांची मुलाशी शेवटची भेट झाली असती तर बरं झालं असतं." एक निश्वास सोडून कर्वे म्हणाले. "हे  तुम्हाला वाटतंय हो. त्यांच्या मुलाला काही आहे का त्याचं! म्हातार्या आईवडलांना सोडून खुशाल अमेरिकेला जाऊन बसायचं. इकडे म्हातारा म्हातारी असले काय आणि नसले काय, यांचे राजाराणीचे संसार चालू!" देशपांडे संतापून म्हणाले.

"पण तसे खामकर मुलाबद्दल नेहेमी चांगलंच बोलायचे हो! सुनेबद्दलही कधी काही वाकडं ऐकलं नाही. मुलगा नेहेमी फोन करायचा, पैसे पाठवायचा" सौम्य स्वभावाच्या मिरीकरांनी म्हटलं.

देशपांड्यांना ते जराही पटलं नाही. उपरोधाने ते म्हणाले, "पैसे पाठवून दिले की झालं नाही का! संपलं आपलं कर्तव्य असंच या पिढीला वाटतं. हे लहान असताना आम्हीपण यांची काळजी घेण्याऐवजी नुसते हातात पैसे टेकवले असते आणि म्हटलं असतं जा करा हवं ते तर हे आज एवढे शिकले सवरले असते का!"

"तर काय! नुसत्या पैशाने काय होतंय. पैसा काय हो... थोडा कमीसुद्धा चालतो. पण वेळेला आपली माणसं जवळ नकोत का" प्रधानांनी देशपांडेंच्या सुरात सूर मिळवला.

"अहो पण खामकर अचानक सिव्हिअर हार्ट अटॅकने गेले. त्यांच्या मुलाला आधी कसं कळेल असं होणार आहे ते." मिरीकरांनी पुन्हा एकदा बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

"का हो मिरीकर तुम्ही खामकरांच्या मुलाचं वकीलपत्र घेतलंय का कट्टयाच्या विरुद्ध?" देशपांड्यांनी वैतागून म्हटलं. "तसं नाही..... आपल्यापैकी एक दोघे सोडले तर बहुतेकांची मुलं जगभरात कुठे कुठे आहेत... कधी ना कधी आपली सुद्धा हीच वेळ येणार आहे. म्हणून खरं तर आपल्याच मुलांची बाजू घेतोय मी." मिरीकर हसून म्हणाले. "चला नऊ वाजले. घरी वाट बघत असतील"असं म्हणून त्यांनी पेपरची घडी घालून घेतली आणि ते निघाले.

"अहो मिरीकर , कसली घाई आहे! तुम्हाला त्या इन्शुरन्स एजंटचा नंबर हवा होता ना? चला घरी, चहा घेऊ आणि नंबरसुद्धा देतो." देशपांड्यांनी मिरीकरांना अडवलं. "असं म्हणता.... बरं चला" कट्टयाचा निरोप घेऊन मिरीकर आणि देशपांडे, दोघे देशपांड्यांच्या घराच्या दिशेने निघाले.

"अहो..... मिरीकर आले आहेत. चहा ठेवा बरं" देशपांडेंनी कुटुंबाला फर्मान सोडलं. देशपांडे वहिनी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. पाठोपाठ त्यांच्याकडे काम करणारी बाई, हातात चहा पोह्यांचा ट्रे घेऊन आली. वहिनींनी आग्रहाने मिरीकरांना चहा पोहे दिले. "कशाला उगाच" मिरीकरांना अवघडल्यासारखं झालं. "घ्या हो" देशपांडेसुद्धा मनापासून आग्रह करत म्हणाले.

"उगीच तसदी घेतलीत. तुम्हाला उशीर नको व्हायला" देशपांडे वहिनी एका शाळेच्या मुक्ख्याध्यापिका होत्या. त्यांना रिटायर व्हायला अजून दोन वर्ष होती.

"उशीर कसला! दुपारची शाळा असते माझी." देशपान्डे वहिनी म्हणाल्या. "काय म्हणतोय कट्टा?" त्यांनी सहज चौकशी केली. "खामकरांबद्दलच चाललं होतं. त्यांच्या मुलाला जमलं नाही...." मिरीकरांचं बोलणं ऐकून देशपांडे वहिनी चटकन म्हणाल्या, "हो ना , किती वाईट वाटलं असेल त्याला! तिथून एवढा तो आला लगेच पण शेवटची भेट नाहीच झाली. पण ते असताना मात्र तिथून शक्य तेवढं सगळं करायचा. सुलभा वहिनी म्हणतात ना की मुलगा आणि सून खूप आग्रह करतात त्यांना अमेरिकेला येण्यासाठी ," देशपांडे वहिनी पुढे बोलत राहिल्या , "पण हेच जात नव्हते. तेही बरोबर आहे म्हणा. तिकडे कोणाशी ओळख नाही. कंटाळा येत असेल ना. वाढलेलं झाड कापून दुसरीकडे नेऊन लावलं तर ते तिथे रुजत नाही." "बरोबर आहे, फक्त शेवटची भेट राहिली" मिरीकर म्हणाले.

"शेवटच्या भेटीचं काय हो! आम्ही एवढे भारतातच असूनसुद्धा आमची आमच्या आईवडलांशी कुठे शेवटची भेट झाली!" देशपांडे वहिनी सांगू लागल्या "यांचे वडील कोकणात, तब्बेत जास्तच खराब झालीये म्हणून आम्हाला तार आली पण आम्ही पोहोचण्याआधीच गेले होते ते. माझ्या आईच्या वेळीही तसंच. आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत या. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा!" मिरीकरांनी डोळ्याच्या कोपर्यातून देशपांड्यांकडे पाहिलं.

"पण मी म्हणतो, या आजकालच्या मुलांना एवढं इंग्लंड अमेरिकेला जाऊनच का राहायचं असतं ? भारतात काही मिळत नाही का?" देशपांडे चिडक्या सुरात म्हणाले.

"मामंजीसुद्धा अगदी अस्संच म्हणायचे, विसरलात की काय?" वहिनी हसून देशपांड्यांना म्हणाल्या, "भातशेती, काजू, आंबे, चिकू.... कित्ती लालूच दाखवली होती पण आपल्याला दोघांनाही मुंबईच प्यारी होती"

"पण आपल्या नवीन संसाराला त्यावेळी पैशांची गरज होती. आपण मुंबईला आलो, दोघांनी नोकरी केली म्हणून तर विनायक आणि वृंदाला चांगलं शिक्षण देता आलं, थाटामाटाने लग्न करून देता आलं. माईलासुद्धा काशीपासून सगळीकडे यात्रा करवून आणल्या की! कोकणात शेती करत बसलो असतो तर हे सगळं झालं असतं का?" देशपांडे मुद्दा सोडत नव्हते.

"अहो पण मग तशीच कारणं खामकरांच्या मुलाचीही असतील की! आपलं ते 'कारण', दुसर्याची ती 'सबब' हे बरं आहे" वहिनी जराही हार मानणार्यातल्या नव्हत्या. वातावरण तापतं आहे हे पाहून मिरीकर आता कसं काय निघावं असा विचार करू लागले आणि तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यांनी काढता पाय घेतला. देशपांडे पतिपत्नींचा वाद पुढे चालूच राहिला.

"पण मग तुला काय म्हणायचंय? आपण गावातून आलो. एवढ्या खास्ता खाल्ल्या, मुलांना वाढवलं, शिकवलं, स्वतःच्या पायांवर उभं केलं .... आता उतारवयात त्यांनी आपली काळजी घ्यावी अशी अपेक्षा रास्तच नाही का?" देशपांडे शेवटी हतबल होऊन म्हणाले.

वहिनी सोफ्यावरून उठून त्यांच्या बाजूला येऊन बसल्या. त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन त्या म्हणाल्या, "अपेक्षा ठेवणं चूक आहे की बरोबर ते मला नाही ठाऊक. पण पाखरंसुद्धा पिल्लांना दाणे भरवतात, उडायला शिकवतात. नुकतंच वाचलं ना चित्तेसुद्धा पिल्लाना शिकार करायला शिकवतात. त्याबदल्यात काहीच परतफेडीची अपेक्षा नसते त्यांच्यात. मग आपण तर मनुष्य आहोत. आपण जुनी घरटी मागे सोडून आलो. आता आपली पिल्लंसुद्धा आपल्या घरट्यातून उडून गेली. जगरहाटी आहे ही"

देशपांडे गप्प राहिले. आपले वडील जसे कोकणात एकटेच गेले तसंच आपल्याला हा प्रवास संपवताना आपली मुलं कदाचित डोळ्यासमोर दिसणार नाहीत या विचाराने ते सुन्न झाले. अशाच उद्विग्न अवस्थेत ते बसले होते एवढ्यात बेल वाजली. खालच्या मजल्यावरचे कामत आले होते. त्यांचा चेहरा आनंदाने फुलला होता. त्यांच्या मुलाला अमेरिकेतल्या नावाजलेल्या युनिव्हर्सिटीमधे एडमिशन मिळाली होती म्हणून कामत पेढे घेऊन आले होते .

आनन्दिनी

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतय, देशपांडेच बोलणं एकदम बरोबर आहे. मुलांना लहानाचं मोठ करायच, त्यांच्या आवडी निवडी जपायच, एवढे करुन म्हातारपणी ही आपल्याला सोडुन जाणार, वर्षभरातुन एकदा घरी येणार, पाव्हण्यासारखे, दर महीना पैसे पाठवणार, महीन्यातुन ३-४ वेळा फोन करणार...., फक्त येवढेच केल्याने आपल्या आई-बापानी लहानपणापासुन आपल्या वर केलेल्या उपकाराची परतफेड होत नाही.... लहानपणापासुन ते आपली काठी, आपला आधार बनतात, मग त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांची काठी, त्यांचा आधार बनायला नको का....????

आवडली गोष्ट.
दोन्ही बाजू मस्त मांड्ल्या +१

छान

देशपांडे वहीनी आवडल्या!

पोरांसाठी खस्ता खाल्ल्या, आईबापांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड वगैरे भंकस जितकी लवकर संपेल तेवढं बरंच आहे. आशा आहे की सध्या ४०- वयातले आईबाप आपल्या मुलाबाळांकडून असल्या अपेक्षा ठेवणार नाहीत.

देशपांडे वहीनी आवडल्या!
पोरांसाठी खस्ता खाल्ल्या, आईबापांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड वगैरे भंकस जितकी लवकर संपेल तेवढं बरंच आहे. आशा आहे की सध्या ४०- वयातले आईबाप आपल्या मुलाबाळांकडून असल्या अपेक्षा ठेवणार नाहीत. >>> +1

छान लिहिलय.
मला असं वाटतं की आधीच्या पिढ्या सगळं म्हणजे सगळच मुलांसाठी करीत असत. प्रॉव्हिडंत फंडातून पैसे काढून घेऊन मुलीचं लग्नं, मुलासाठी ब्लॉक.. चालूच. खूप कमी उदाहरणं माझ्या बघण्यात आहेत की.. आपली आपण सहलीला, पर्यटणाला गेलीत. वगैरे. बहुतेकांना शेवटी चरितार्थासाठी मुलांवर विसंबून रहावं लागलं.
नंतर जरा स्वतःसाठी पैसे बाजूला काढून ठेवऊ लागले आई-बाप. म्हणजे पैशानेतरी स्वावलंबी.. मुलांवर अवलंबून रहावं लागणार नाही अशी. पण मानसिक अवलंबित्वं पुढारायला वेळ लागेल असं वाटतय.

आम्ही स्थलांतरित. .. आपली मुलं आपल्याकडेच रहातिल असं आपण तरी म्हणू शकत नाही असं मोठ्याने म्हणत रहातो. पण कुठेतरी आतमधे.. राहिली आपल्याजवळच तर बरच नै.. हे असतच की. अपेक्षा असतेच .. ती किती तीव्र त्यावर अपेक्षाभंगाचं दु:ख अवलंबून.
असो.. जास्तच लिहिलं.

लेख छान जमलाय.

छान लिहिलंय, आवडलं.

Abdul Hamid, लोक आईबाप बनतात ते कुणावर उपकार करण्यासाठी नव्हे. त्यांची नैसर्गिक गरज असते अपत्यप्राप्ती ही. ही एकदा पूर्ण झाली की त्या मुलाचे जे लाडकोड केले जातात ती सामाजिक गरज. तुम्ही जशा गरजा पुरवत जाणार तशा त्या वाढत जाणार. मुले जन्मतः स्वतंत्र असतात. पुढे जाऊन त्यांनी त्यांना जशी जमेल तशी तुम्हाला मदत केली तर तुमचे संस्कार वाया गेले नाहीत समजा. आणि नाही केली तर तुम्हीच त्यांच्यात दुसर्याबद्दल संवेदना, कणव ह्या भावना रुजवल्या नाहीत असे समजा.

बाकी मुलाच्या जन्मापासून तो खूपच मोट्ठा होऊन खूपच मोटठ्या पगाराची नोकरी करणार हे स्वप्न पाहायचे, परदेशी नोकरी ही तर चेरी ऑन केक. लहानपणापासून हेच मुलाच्या मनावर बिंबवायचे, मुलाच्या पाठी लागलागून हे सगळे करून घ्यायचे आणि शेवटी मुलाच्या हाती तो चेरिसकट केक लागला की मग आता ते सगळे सोड आणि इथे येऊन माझे पाय चेपत बस म्हणायचे. यात नेमके चुकते कोणाचे?

Barobar ahe sadhana hyanche... Aapan aaple kartavya karayche...bass paratfedichi Apeksha theu naye,hech thik..