मुंबईतील किल्ले -- भाग १

Submitted by मध्यलोक on 15 March, 2017 - 06:11

डिसेंबर आणि जानेवरी महिन्यात काही कामानिमित्त मुंबई आणि आसपासच्या परिसराचे दर्शन झाले होते. ह्या भटकंती दरम्यान आम्ही त्या प्रदेशातील छोटेखानी अश्या किल्ल्यांना भेटी दिल्या होत्या. जमिनीवर अथवा समुद्र किनारी असलेल्या ह्या किल्ल्यांनी आमच्या मनाला भुरळ घातली.

मुंबई शहरात सुद्धा असे छोटेखाणी किल्ले आहेत ह्याची प्रचिती जानेवारी मधील सेंट जॉर्ज किल्ल्याला दिलेल्या भेटीवरून कळून आले आणि मग ध्यास लागला ह्यांच्या माहितीची जुळवा जुळव करण्याचा, ह्यांची एक भ्रमंती करण्याचा.

शहरीकरणा मुळे गजबजलेल्या ह्या किल्ल्यांच्या श्वास कोंडत चालला आहे. दाट वस्ती - झोपडपट्टी, आजूबाजूला असलेला प्रचंड कचरा आणि भटक्यांची अनास्था, हि व अशीच अनेक कारणे ह्यामुळे हे किल्ले शेवटचा श्वास घेत आहेत. न ह्या किल्ल्यावरून दिसते सह्याद्रीचे रौद्र रूप न दिसतो दरी खोऱ्यासारखा अप्रतिम नजरा, दिसतात त्या टोलेजंग इमारती तर कधी दिसते विद्रुप झालेले शहर.

ह्याही किल्ल्याना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे, ह्याही किल्लयांनी आपली भूमिका चोख बजावली आहे पण भटक्यांच्या यादीत यांचा क्रम कदाचित शेवटी येतो किंवा ह्यांना काही स्थानही नाही. घरापासून लांब असणाऱ्या किल्ल्यावर आपण संवर्धन करतोय पण आपल्या अंगणात असलेली हि वारसास्थळे मात्र उपेक्षित आहेत. बऱ्याच मंडळींना तर हे किल्ले अस्तित्वात आहेत हे ठाऊक सुद्धा नाही. आम्हीही असे भटके होतो ज्यांनी पूर्वी ह्या किल्ल्याना कधी भेट दिली नव्हती.

ठरलं मग, करायची एक भटकंती. ट्रेकक्षितीज (http://trekshitiz.com) आणि बिजूर (http://bijoor.me) ह्यांच्या संकेतस्थळावर थोडीफार माहिती मिळाली, सोबतीला गुगल बाबा होतेच, त्यांनीही मदतीचा हात पुढे केला.

गेल्या भटकंती प्रमाणेच यंदाही सोबत होती ती आमच्या सौ ची तसेच सोबत होते मित्र - परिवार. आमचा पहिला थांबा होता सेंट जॉर्ज इस्पितळाच्या आवारातील ह्याच नावाच्या किल्ल्याचा. गेल्या वेळा पेक्षा आमचे नशीब यंदा थोडे वरचढ होते. ह्यावेळी आम्हाला आत मध्ये प्रवेश मिळाला होता. आम्हाला हे पूर्वकाळीचे दारुकोठार यंदा निरखून बघता येणार होते. आत प्रवेश करताच आम्हाला दिसल्या त्या इंग्रजी धाटणीच्या कमानी आणि खोल्या तसेच आम्हाला बघता आले किल्ल्यातील “तळघर”. किल्ल्यापासून समुद्रतट जवळच असल्याने भरती दरम्यान ह्या तळघरात समुद्राचे पाणी शिरते. ह्या पाण्याचा वापर आग विझविण्या करत असतील, कदाचित दारुकोठार असणाऱ्या ह्या इमारतीची हि आगी पासून रक्षण करण्याची सुरक्षा पद्धत असावी.

स्थळ दर्शक माहिती : 18.941247, 72.838511 (18°56'28.5"N 72°50'18.6"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : छत्रपती शिवाजी टर्मिनस

किल्ल्यावरील जंग्या
St George_1.jpegतळघर
St Geroge - 2.jpeg

येथून आम्ही मोर्चा वळविला तो शिवडीच्या किल्ल्याकडे. मुंबईच्या पुर्व तटावर लक्ष ठेवण्याचे काम हा किल्ला अजूनही दक्षतेने पार पाडत आहे. किल्ल्या शेजारीच जलाल शाह मुराद शाह बाबांचा दर्गाह आहे. किल्ला आणि दर्ग्याच्या परिसरातील डेरेदार वृक्ष पांथस्थाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातात. बऱ्यापैकी सुस्थित असलेल्या ह्या किल्ल्यात आपल्याला दिसतात त्या मोठ्या खोल्या, काही जिणे, कोठार, तटबंदी, बुरुज आणि इतर काही अवशेष. संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा तास पुरेसा आहे.

स्थळ दर्शक माहिती : 18.999475, 72.859996 (18°59'58.1"N 72°51'36.0"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : शिवडी (हार्बर मार्गिका)

शिवडी किल्ल्याचे प्रवेशद्वार
Shivadi - 3.jpegशिवडी किल्ल्यातील अवशेष
Shivadi -1.jpegशिवडी किल्ल्यातील अवशेष
Shivadi - 2.jpeg

सूर्यदेव आता माथ्यावर तळपू लागला होता आणि आम्ही निघालो होतो “सायन उर्फ शिवच्या” किल्ल्याकडे. पण वाटेतचं आम्हाला दिसला तो सायन मधीलच आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बागेतील “रिवा किल्ला”. येथील एकुलता एक बुरुज आता भग्न इतिहासाची साक्ष देत उभा आहे. बुरुजा पर्यंत पोहोचण्यास औषधी वनस्पतीच्या बागेतून एकमेव मार्ग आहे. दसरा-दिवाळी वगळता येथे कोणी येत नाही ह्याची चिन्हे येथे असलेल्या गचपणावरून आम्हाला आली. झाडोऱ्यातून मार्ग शोधत आम्ही पोहोचलो होतो ह्या एकाकी बुरुजपाशी. एकमेकांची विचारपूस करून झाल्यावर आम्ही आता निघालो होतो सायनच्या किल्ल्याकडे.

स्थळ दर्शक माहिती : 19.047287, 72.864729 (19°02'50.2"N 72°51'53.0"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : सायन उर्फ शिव (सेंट्रल मार्गिका )

रिवा किल्ल्याचा एकुलता एक बुरुज
Riwa.jpeg

मुंबईतील कदाचित सर्वात उंच असलेला हा किल्ला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाच्या प्रवेश द्वारातून आत गेल्यावर थोडी उंची गाठली असता किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसू लागते. प्रेमी युगल, प्रोफाईल फोटोग्राफर ह्यांची मांदियाळी येथे दिसून येते आणि किल्ल्याची झालेली वाताहत सुद्धा.
तसे किल्ल्यावर अवशेषही आहेत, पण त्याचे सोयरेसुतक ह्या इकडे नेहमी येणाऱ्या मंडळींना नाही. त्यांना हवा असतो तो एखादा कोपरा काही क्षणासाठी किंवा हवी असते एखादी भिंत कुठल्याश्या फोटो साठी. आम्ही तर ह्या वातावरणात परग्रहवासी आहोत असे भासत होते आणि हेच आमच्याकडे बघण्याऱ्या नजरा आम्हाला खुणावून सांगत होत्या. त्यांच्या कडे कानाडोळा करत आम्ही इतिहासाचा मागोवा घेत होतो आणि आम्हाला इकडे दिसली एक धुळ खात पहुडलेली तोफ, एक दगड मातीने भरलेले टाके आणि टवके उडालेल्या भिंती.

स्थळ दर्शक माहिती : 19.046838, 72.867615 (19°02'48.6"N 72°52'03.4"E)
जवळील उपनगरीय रेल्वे स्थानक : सायन उर्फ शिव (सेंट्रल मार्गिका)

सायन किल्ला
Sion - 2.jpegसायन किल्ला
Sion - 1.jpeg

उन्हे आता कलायला लागली होती आणि गगनचुंबी इमारती जमिनीशी ऊनसावलीचा खेळ खेळत होत्या. आम्हालाही अजूनही बरेच किल्ले बघायचे होते, आम्ही पुन्हा एकदा आमचा मोर्चा पुढील किल्ल्याकडे हलविला. उर्वरित किल्यांच्या वृत्तांत पुढील भागात बघूयाच

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती, पण यांना किल्ले म्हणण्यापेक्षा गढी / नाके म्हणणे जास्त योग्य ठरेल असे वाटते.
अशी चेकपोस्ट टाईप बांधकामे डोंगरातुनही भरपुर आहेत, उदा. मुंबईकडे जाताना खंडाळा घाट रेल्वेने खाली उतरल्यावर शेवटच्या पळसदरी स्टेशन अलिकडिल उजवीकडील "किल्ला"/चेकपोस्ट (नाव आठवत नाही पण मी गेलो होतो तिथे)
इतकेच काय, जुन्या मुंबई पुणे हायवेवरील डावीकडील इरसाळ हा देखिल चेकपोस्ट म्हणुनच बघणे उचित ठरेल. व अशी अनेक उदाहरणे दिसतिल जी "किल्ला" या संज्ञे पेक्षा अन्य नामाने ओळखणे योग्य ठरेल असे वाटते.
तज्ञ /जाणकार त्यांचे मत देतिलच.
वरील लेख फोटोसहित इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

मस्तच.
बऱ्याच मंडळींना तर हे किल्ले अस्तित्वात आहेत हे ठाऊक सुद्धा नाही.>>>>+१
शिवडी आणि सायन किल्ला ऐकुन माहित आहे. सेंट जॉर्ज आजच ऐकतेय.
पुढच्या भाग येउद्या लवकरच.

अरे आपण फोर्ट फोर्ट म्हणतो, तेथिल किल्ला ? तो म्हणे आता अस्तित्वात नाही, पुर्वी कोट (तटबंदी) होता आता नाहीये अस काहीतरि वाचल्याचे आठवते.
माहिमच्या किल्याचे बूरुज अजुनी दिसतात. लहानपणि तिथे गेल्याचे स्मरते, पण बाकी आता काही शिल्लक असेल की नाही काय की.
मागे लोकसत्तामध्ये लेख आलेला माहिमच्या किल्ल्याबाबत.

छान माहिती, अजून सविस्तर लिहायला हवं होते. मी १९७४ पासून चेंबूर ला राहतोय. या काळात सायनच्या किल्ल्याचे अतोनात नुकसान झालेले बघितले. त्या वेळी तिथे छप्पर असलेली एक वास्तू होती, पण ती ढासळत गेली. सभोवतालचे उद्यानही नीट जोपसले गेले नाही. गेल्या काही वर्षात झाडी मात्र वाढली.

त्या समोरची गढी त्या मानाने अजून बर्‍या स्थितीत आहे. तिथपर्यंत पोहोचायला काही मार्ग आहे, हेच माहित नव्हते मला.

फारच छान!
लिम्बु जी, हे ही किल्लेच.

नवीन माहिती कळाली. किल्ले असो नाहीतर गढी/नाके, यांचे संवर्धन झाले पाहिले. किती अनास्था आहे या सगळ्याबाबत. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

ऐकीव माहितीनुसार जगात फक्त महाराष्ट्रात एतद्देशीय तसेच परकीयानी बांधलेले किल्ले आहेत. नुसते तेच नाही तर सर्व प्रकारचे किल्ले बांधले आहेत. किल्ल्यांच्या वर्गीकरणाचा एक श्लोक यादवकाळातल्या लाला लक्श्मीधराच्या श्लोकात आहे. त्यात ८ प्रकारचे किल्ले वर्णिले आहेत.

सुलु, बरोबर आहे तुमचे.
फक्त त्यास मग भुईकोट/दुर्ग/गढी वगैरे म्हणतात सरसकट "किल्ला" नाही.
(यामुळे मी फक्त भाषेच्या अचूकता माहित व्हावी या दृष्टीने तो मुद्दा मांडलाय - मलाही फारशी माहिती नाही, बाकी काही नाही, किमान या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांना पूर्वि नेमके काय म्हणायचे ते तरी कळेल.
नैतर आहेच की आपण दिवाळीत करतो ते किल्ले...... अगदी पुण्याच्या पर्वतीलाही कोट सदृष बांधकाम व भूयार वगैरे असल्याने भविष्यात किल्ला म्हणले जाईल Proud , अन शनिवारवाड्याला तर कोट/बुरुजही असल्याने त्यासही भविष्यात किल्ला म्हणले जाइल, ते टळावे म्हणुन हा विषय. बाकी चालुद्यात)

सुनीता, लिंबूतिंबु, सस्मित, दिनेश, योगेश, सुलु, जाई, राया, हेम, पद्मावती, जिप्सी, प्र-साद

आपल्या सगळ्यांचे आभार

पण यांना किल्ले म्हणण्यापेक्षा गढी / नाके म्हणणे जास्त योग्य ठरेल असे वाटते >> तसा अलंग-मदन-कुलंग त्रयी मधील मदन सुद्धा चौकी किंवा नाके आहे आणि अशीच अजून उदाहरणे देता येतील.
तुम्ही सुद्धा चेकपोस्ट म्हणून इरसाळ चा दाखला दिला आहे, हे योग्यच आहे

आकारमाना, उपयोग, ठिकाण, बांधणी इत्यादी नुसार त्यांची वर्गवारी येते

अरे आपण फोर्ट फोर्ट म्हणतो, तेथिल किल्ला ? तो म्हणे आता अस्तित्वात नाही, पुर्वी कोट (तटबंदी) होता आता नाहीये अस काहीतरि वाचल्याचे आठवते >>>>फोर्ट, डोंगरी हे किल्ले नामशेष झाले.

फक्त त्यास मग भुईकोट/दुर्ग/गढी वगैरे म्हणतात सरसकट "किल्ला" नाही >> अगदी बरोबर

गिरिदुर्ग
वनदुर्ग
जलदुर्ग
भुईकोट
मिश्रदुर्ग

असे प्रकार आहेत

भारत इतिहास संशोधन मंडळातील एका व्याख्यानात एका ऐतिहासिक पत्राचे वाचन झाले, त्यातील एका वाक्यात "गडावर किल्ला वसविणे" अश्या आशयाच्या उल्लेख होता. त्यामुळे किल्ला आणि गड हि सज्ञा वेगळी असावी अशी शक्यता वाटते.

पुढच्या भाग येउद्या लवकरच >> इंग्रजी लिखाण झाले आहे, मराठीतील लेख येईल लवकरच

मागे लोकसत्तामध्ये लेख आलेला माहिमच्या किल्ल्याबाबत >> आमच्या ह्या भटकंती मधे माहीम आणि बांद्रा किल्ल्याच्या समावेश होता, वेळेअभावी आम्ही तिकडे नाही जाऊ शकलो, पुढील भटकंती नंतर त्याचा वृत्तांत लिहितो Happy

छान माहिती, अजून सविस्तर लिहायला हवं होते >> नक्कीच प्रयत्न करतो

यांचे संवर्धन झाले पाहिले >> शंभर टक्के सहमत, ह्याच विचाराने हे किल्ले बघितले आणि त्यांची माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला, हि माहिती इतरांना सुद्धा पोहोचावी म्हणून हा खटाटोप

किल्ल्यांच्या वर्गीकरणाचा एक श्लोक यादवकाळातल्या लाला लक्श्मीधराच्या श्लोकात आहे. त्यात ८ प्रकारचे किल्ले वर्णिले आहेत > ८ कि ६, वरील कंमेंट प्रमाणे ५ आणि दलदल (मराठी शब्द माहिती नाही त्याबद्दल क्षमस्व) असलेला किंवा त्याचा शेजारी असलेला असा ६वा प्रकार

ते कुलकर्णींचं मुंबई फिरंगाण्यातील किल्ले पुस्तक चाळलंस कां? >> हो, पुस्तकाची मदत झाली.

आणि त्यांचे कार्यालय सुद्धा बघितले, ते सध्या सेंट जॉर्ज किल्ल्यातील कार्यालयात असतात

>>> "गडावर किल्ला वसविणे" <<<<< ओह, हे लक्षात आलेच नव्हते.
पण तुम्ही उल्लेख केलात म्हणून आठवतय.... वणीच्या सप्तश्रुंगी देवीच्या ठाण्याला "सप्तशृंगगड" असेच म्हणतात. अन तिथे तर कोट/बुरुज /तटबंदी/खंदक वगैरे काहीकाही नाही, इतकेच काय, पाचपंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत देवीचे मंदिरही फक्त गाभारा इतकेच होते.

तेव्हा "गड" हा शब्द, "अवघड व उंच डोंगराची " जागा अशा काही अर्थाने वापरीत असावेत. व किल्ला वसविणे म्हणजे तिथे मग तटबंदी/बुरुज/दरवाजे/चौक्या पहारे /वस्ती करणे असा असावा.