अंजलीची गोष्ट - सेकंड चान्स

Submitted by आनन्दिनी on 14 March, 2017 - 22:45

ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. अनास्थेटिस्ट बरोबर तिचं केसबद्दल बोलून झालं होतं. आता दोन तास निवांत वेळ होता. पण सकाळपासून उभं राहून ती थकली होती. दुपारचे तीन वाजले होते आणि आत्ता कुठे तिला बसायला फुरसत मिळाली होती. जेवायला जावं की चहाच मागवावा असा विचार करत ती हॉस्पिटल मधल्या तिच्या छोट्याश्या रूम मधे शांत बसली होती. इतक्यात नर्स आत डोकावली. "डॉक्टर एक पेशंट सकाळपासून थांबून आहे. तुम्हालाच भेटायचंय म्हणतोय" "काय मनीषा! आत्ता कुठे मी फ्री झाले आणि लगेच.... कोण आहे?" अंजलीने तक्रारीच्या सुरात विचारलं. "शिर्के, त्याची बायको नाही का गेल्या वर्षी आपल्या वॉर्डला एडमिट होती." नर्सने माहिती पुरवली.
"शिर्के" म्हटल्याबरोबर अंजलीच्या डोळ्यासमोर तो दिवस उभा राहिला. सात आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट... शिर्के पतीपत्नी अंजलीच्या ओपीडी मधे आले होते.(ओपीडी म्हणजे हॉस्पिटलमध्ये जिथे पहिल्याप्रथम पेशंटला तपासलं जातं). सावित्री शिर्के. वय ४९. हिरडीवर पांढर्या रंगाची पुळी. सतत थोडी थोडी दुख. मामुली उपचारांनी फरक पडेना म्हणून पतीपत्नी हॉस्पिटलला आले होते. सावित्री लोकांकडे धुणीभांडी करत असे. शिर्के पन्नाशीच्या थोडे पुढे . एका घरी ड्रायव्हर म्हणून कामाला होते. अंजलीने सावित्रीची प्राथमिक तपासणी केली. तंबाखूची सवय आणि हल्ली वजन कमी झालंय का ला तिचं हो असं उत्तर! अंजलीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

काही तपासण्या करून घ्यायला सांगून तिने त्यांना एका आठवड्याने रिपोर्ट्स घेऊन बोलावलं. त्यांचे पेपर्स अंजलीने सावित्रीच्या हातात परत दिले . ते नेमके सावित्रीच्या हातातून पडले आणि जमिनीवर पसरले. "नीट धरनबी जमंना. एक गोष्टं हिच्याच्याने नीट हुईल तर!" शिर्के रागावून फटकन बायकोला बोलले. खालच्या वर्गातल्या लोकांचं चारचौघांत बायकोचा अपमान करणं अंजलीला नवीन नव्हतं तरी तिने शिर्केंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. ते वरमले आणि नवरा बायको रूम मधून बाहेर पडले.

एका आठवड्याने रिपोर्ट्स घेऊन दोघे पुन्हा आले. अंजलीची शंका खरी ठरली होती. सावित्रीला हिरडीचा कॅन्सर झाला होता. सुरुवातीची स्टेज होती पण कॅन्सर नक्की होता. अंजलीच्या घशाशी आवंढा आला. असले डायग्नोसिस पेशंट्सना आणि नातेवाईकांना सांगणं तिला नको वाटत असे. तिने नर्सला मिस्टर शिर्केना आत पाठवायला आणि सावित्रीला बाहेर थांबवून घ्यायला सांगितलं. शिर्के आत आले. समोरच्या खुर्चीत अंग चोरून बसले. त्यांच्या मनावरचं दडपण त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. "काय झालं डाक्टर? रिपोर्टमदी काय लिवलंय?" त्यांनी अधीर होऊन विचारलं. "रिपोर्ट्स फारसे चांगले नाहीयेत, शिर्के. तुमच्या मिसेसना हिरडीचा कॅन्सर झालाय. सुरुवातीची स्टेज आहे. बरं झालं लवकर कळलं. ताबडतोब ट्रीटमेंट सुरु करूया. हे सरकारी हॉस्पिटल आहे त्यामुळे खर्च असा काही फार होणार नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर टाटा हॉस्पिटलला नेऊ शकता. मी चिट्ठी लिहून देईन...." अंजली पुढे अजून बोलणार होती. पण तिने बघितलं शिर्केंचे डोळे भरून यायला लागले होते. ती टाटा बद्दल सांगेपर्यंत स्वतःच्या हातांच्या तळव्यांमध्ये चेहरा झाकून शिर्के हमसून हमसून रडत होते. अंजलीचं मन सुन्न झालं. पतीच्या वियोगाचं दुःख तिला ठाऊक होतं. त्यामुळे शिर्केना कसं वाटत असेल याची तिला कल्पना होती. त्यांच्या खांद्यावर हलकंसं थोपटून ती म्हणाली, "तुम्हाला वाटतंय तेवढं वाईट नाही आहे. सुरुवातीची स्टेज आहे. कुठे पुढे पसरल्याचं आत्ता तरी दिसत नाहीये. त्या बर्या होतील" जोरजोरात मान हलवत शिर्के उद्गारले "समदी माझीच चुकी हाए डाक्टर ! माज्याच चुकीमुळे समदं झालंया " धक्कादायक किंवा वाईट डायग्नोसिस ऐकल्यावर लोक इतरांना असंबद्ध वाटेल असं बोलतात हे अंजलीने याआधीसुद्धा पाहिलं होतं. त्यांच्या डोक्यातून असले भलते सलते विचार काढण्यासाठी ती म्हणाली, "हा हिरडीचा कॅन्सर आहे. दुसर्या कोणामुळे होणारा रोग नाही" "मग माझ्याच बायकोला कसा झाला" शिर्केंचा प्रश्न ऐकून अन्जलीच्या मनात विचार आला की दुःखात प्रत्येक माणसाला पडणारा "मलाच हे का?" हा प्रश्न सुखात मात्र कोणालाच पडत नाही.... यांना काय सांगावं ...,"त्या तंबाखू घेतात. तंबाखू हे हिरडीच्या कॅन्सरचं सगळ्यात कॉमन कारण आहे." आता शिर्केंचे हुंदके थांबले होते. "तंबाखू तर मी पन घेतुया. शिवाय बिडी, झालाच तर अधीमधी दारूसुद्धा घेतु म्या. तरी मला न्हाई झालं . तिला झालं. मी सांगतु तिला का झालं. गेल्या साली मला गावाला जायाचं हुतं. पन सुट्टी भेटंना मग म्या सायबाला सांगितलं बायकू बिमार हाये. त्यांनी इचारलं काय झालंया, माज्या तोंडून निघालं क्यान्सर. मालक पार गपगार. लागल तेव्हा सुट्टी घेत जा, नीट दवापानी कर म्हनला. मग काय कधी मधी मी सुट्ट्या मारायचो, जादा पैसे मागायचो. तिच्या क्यान्सरच्या नावानं पैसं घेऊन म्या दारू पिली , तीनपत्ती खेळलू.... काय न्हाई केलं इचारा... !" शिर्केंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. "माजी म्हातारी सांगायची वंगाळ बोलू नगस. 'तो' वरून बघत असतुया. आणि मी तिलाच वरडायचो , गप बस्स म्हातारे म्हनून. न म्हातारी व्हती तेव्हा तिच्याशी, ना ही आहे तर हिच्याशी, कंदी सरळ तोंडाने बातच न्हाई केली. सदा हाडतूड केलं. हिच्या बापानं लग्नात फार पैसं न्हाई दिलं . आता माजी पोरं लग्नाची झाली तरी हिच्या मायबापाशी कधी धड न्हाई बोललो मी. कुठचंच सुख न्हाई दिलं हिला आनि आता तर असं वंगाळ बोलून हिचा जीवच घेतला म्या!"
अंजली स्तब्ध झाली. हा निव्वळ योगायोगच होता हे तिला ठाऊक होतं. पण तिची आईसुद्धा तिला सांगत असे, नेहेमी चांगलं बोलावं , 'वास्तू करी तथास्तु!'. तिने तो विचार थांबवला. शांत , स्थिर आवाजात ती शिर्केना म्हणाली, "शिर्के , तुम्हाला तुमची चूक कळली ही चांगली गोष्ट आहे. असं समजा की देवाने तुम्हाला एक संधी दिली आहे सुधरायची. सावित्रीचा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या स्टेजचा आहे. कॅन्सर स्पेशालिस्ट तुम्हाला सगळं समजावून सांगतीलच. रेडिओथेरपी घ्यावी लागेल. कदाचित ऑपरेशन. बोलणं थोडं अफेक्ट होऊ शकतं पण जीव नक्की वाचेल. या गेल्या पाच मिनिटांत ज्या ज्या गोष्टींचा पश्चात्ताप झाला ना तुम्हाला तसा तो परत करावा लागणार नाही एवढीच काळजी घ्या. त्या बर्या होतील." "नक्की ना डाक्टर?" शिर्केनी डोळे पुसून विचारलं. "हो नक्की. १०८ टक्के. अंजलीने म्हटलं. शिर्केनी हात जोडून ते कपाळापर्यंत वर नेऊन देवाला करावा तसा तिला नमस्कार केला. पुढे अंजलीकडून चिठ्ठी घेऊन ते टाटा हॉस्पिटलला गेले. तिथून त्यांनी सावित्रीची ट्रीटमेंट पूर्ण करून घेतली.
आज बर्याच महिन्यांनी शिर्के पतीपत्नी पुन्हा आले होते. दोघांचेही चेहरे आनंदी होते. सावित्रीचा कॅन्सर पूर्ण बरा झाला होता. ते खोलीत आल्यावर शिर्केनी सावित्रीला खुर्चीत बसू दिलं. ते स्वतः उभे राहिले. टाटा मधून मिळालेले डिस्चार्ज पेपर्स त्यांनी अंजलीला दाखवले. अंजलीला मनापासून आनंद झाला. "काय मग सावित्री, बरं वाटतंय ना आता? त्रास गेला ना पूर्ण?" "व्हय डाक्टर तुम्ही ह्यास्नी ग्यारंटी दिलेली !! हे नेहेमी मला सांगायचे, डाक्टरणीने सांगितलंय तू बरी व्हशील. १०८ टक्क्याची ग्यारंटी दिलेली हाये. तसंच झालं बगा . तुम्ही ह्यास्नीपन काई दवा दिली कांय? अक्षी बदलून गेले जनू...." सावित्रीने हसून विचारलं. अंजलीने फक्त हसून त्या दोघांकडे पाहिलं . त्या दोघांसाठी तिला मनोमन आनंद झाला. तिचा निरोप घेऊ शिर्के पतीपत्नी हॉस्पिटल मधून निघाले. आजार एकाचा होता आणि ट्रीटमेंट दोघांची झाली होती.

आनन्दिनी
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय!!! खूप चांगल्या गोष्टी असतात तुमच्या!!
लिहीत रहा.

खुपच छान....!!! 'ओपीडी' हा शब्द खुपदा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये बघितलय...!!! पण 'ओपीडी' चा 'लॉन्ग फॉर्म' काय आहे...???

मस्त आहे ही कथा!! ही सीरीज मस्त जमतेय.

दुःखात प्रत्येक माणसाला पडणारा "मलाच हे का?" हा प्रश्न सुखात मात्र कोणालाच पडत नाही. >>> +१

व्हय डाक्टर तुम्ही ह्यास्नी ग्यारंटी दिलेली !! हे नेहेमी मला सांगायचे, डाक्टरणीने सांगितलंय तू बरी व्हशील. १०८ टक्क्याची ग्यारंटी दिलेली हाये.>>>>>> अंजलीचा पॉझिटीव्ह बोलण्याचा परिणाम. हे वाकय फारच आवडल. १०८ टक्के Happy

Pages