सुरंगी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 March, 2017 - 03:59

होळीचा हंगाम आला की वेध लागतात ते सुरंगीच्या हळदी, सुगंधी वळेसरांचे/गजर्‍यांचे. मार्च- एप्रिल महिन्यांचा कालावधीत सुरंगीचे झाड दोन भरगच्च बहरात बहरते.

१)

२)

सुरंगीचे शास्त्रीय नाव mammea suriga. सुरंगीच्या बहराची चाहूल लागली की माझे पाय वळतात ते सुरंगीच्या ऐटदार झाडाकडे. हे फुललेले झाड प्रत्यक्ष पाहणे म्हणजे कोवळ्या किरणांतील जणू फुलांची दिवेलागण अनुभवणे.

३)

४)

ह्याच्या खोड-फांद्यांतून विशिष्टपणे लागणार्‍या कळ्या म्हणजे जणू देठाला लागलेले मोतीच.
५)

६)

खोडाला लागलेली फुले पाहताना भानच हरखून जावे अशी अजब रचना.
७)

८)

सुरंगीच्या फुललेल्या फुलांचे पिवळे धमक केशर सुगंधी रोषणाई करून पाकळ्यांच्या ओंजळीतून मंत्रमुग्ध सुगंधाची उधळण करत असतात. झाडाजवळचा कोवळ्या किरणांतील परिसर जणू अत्तरात चिंब झालेला असतो . खाली पडलेल्या सुक्या फुलांचा सडाही धरणी मातेला सुवासिक अभिषेक घालत असतो.

९)

फुलांमधील मधूरस टिपण्यासाठी ह्या झाडावर माशांचीही सुरात भुणभूण चालू असते.

१०)

११)

सुरंगीच्या कळ्या सूर्यप्रकाशात साधारण १०-११ ला पूर्ण उमलतात.
१२)

१३)

गजरे वळण्यासाठी कळ्याच काढाव्या लागतात म्हणून अगदी पहाटेच ह्या झाडावर चढून फांद्यांना लागलेली एक एक कळी काढावी लागते.

१४)

झाड चिवट असल्याने हलक्या पायांनीच कोवळ्या कळ्यांना सांभाळत फुलायला आलेल्या कळ्या काढाव्या लागतात. वर्षातून एकाच हंगामात फुलणारी व एवढ्या मेहनतीने झाडावरून काढून गजरा करूनही ह्या गजर्‍याला मात्र बाजारभाव कमी असतो. बर डिमांड काही कमी नसत. चार दिवस आधीच बुक करून ठेवावे लागतात गजरे.

१५)

सुरंगीमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक कमी वासाची सुरंगी आणि एक वासाची सुरंगी. दोन्हीची झाडे सारखीच असतात फक्त कमी वासाच्या सुरंगीच्या फुलांमध्ये परागकण जास्त असतात तर वासाच्या सुरंगीला कमी असतात. स्त्रियांसाठी गजरा हा ऋदयात घर करणारा असतो. पूर्वापार ह्या गजर्‍यांची प्रेमपूर्वक देवाण घेवाण करून स्त्रिया एकमेकींच्या ऋदयात मैत्रीची सुगंधी गुंफण करीत आहेत. केसाच्या वेणीवर लांबसडक सोडलेल्या किंवा आंबाड्यावर गोलाकार माळलेल्या पिवळ्या धमक गजर्‍याने स्त्रियांच्या सोज्वळ लावण्य अधिक फुलून येते.

१६)

होळीची धमाल म्हणून की काय सुरंगीचा गजरा आपल्या पिवळ्या रंगाची उधळण आपल्या परागकणांनी करत असतो. केसात दरवळणार्‍या सुरंगीच्या मनमोहक सुगंधात क्षण अन क्षण प्रसन्न होतो . गजरा काढला तरी दोन तीन दिवस हा सुगंध केसात तसाच टिकून राहतो व त्या सुगंधी क्षणांच्या स्मृती ताज्या करतो.

सुरंगीच्या गजर्‍याला कोंकणांत प्रचलित असणारे वळेसर हे नाव त्या गजर्‍याच्या कलाकृतीला अगदी समर्पक वाटत.
१७)

सुरंगीच्या फुलांचे पूर्वी अत्तरही मिळायचे. आता ही वनस्पतीच दुर्मिळ झाली आहे. ह्या वनस्पतीचे जतन होणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या वृक्षारोपण कार्यक्रमात अशा प्रकारच्या दुर्मिळ झाडांचेही वृक्षारोपण झाले तर ह्या झाडांचे महत्त्व, अस्तित्व पुढच्या पिढीला कळू शकेल. सुरंगीचा हा सुगंधी आनंद आताच्या व पुढच्या पिढीलाही मिळण्यासाठी ह्या झाडाची लागवड होवो ही सदिच्छा.

१८)

१९)

टीप :
कृपया लेख किंवा फोटो काहीही शेयर करताना नावासकट शेयर करा.
मागील वर्षी मी सुरंगीवर लिहीलेले लिखाण व फोटो असेच वॉट्स अ‍ॅपवर शेयर होत होते व फेसबुकवरही इतरांच्या नावाने शेयर होत होते. त्यामुळे मी मागिल वर्षी काढलेले हे फोटो तेव्हा जरा जास्तच मोठ्या वॉटरमार्कमधे टाकले आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, मस्त फोटो .
मी अजूनही फुले प्रत्यक्ष पाहिली नाहीत. झाड पाहिले, तेव्हा फुले नव्हती.
गोव्यात आलेली संधी माझ्यामुळेच गेली Sad
पण लहानपणापासून आईच्या तोंडून याचे नाव अनेकदा ऐकलेय. (माझे वडील पहाटे लवकर उठून, आईसाठी ही फुले घेऊन यायचे. Happy )
मला बघायची आहेत ही फुले.
"कोणी सुरंगी देईल का सुरंगी?" Proud

माझ्या सुरंगीच्या धाग्यावरही लिहील होत अस वाटतय. >>>>>>> हो ग जागू,लिहिताना वाटत होते की मी हे लिहिले आहे,बहुदा ताडगोळ्यांच्या बाफवर.नक्की आठवत नाही.

शोभा, माधवा धन्यवाद.
देवकी मला अजून ताडगोळ्यांवरही लिहायचय. Happy

जिप्सी अरे फोटो टाक ना सुरंगीचे माबोवर.

Pages