सुरंगी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 March, 2017 - 03:59

होळीचा हंगाम आला की वेध लागतात ते सुरंगीच्या हळदी, सुगंधी वळेसरांचे/गजर्‍यांचे. मार्च- एप्रिल महिन्यांचा कालावधीत सुरंगीचे झाड दोन भरगच्च बहरात बहरते.

१)

२)

सुरंगीचे शास्त्रीय नाव mammea suriga. सुरंगीच्या बहराची चाहूल लागली की माझे पाय वळतात ते सुरंगीच्या ऐटदार झाडाकडे. हे फुललेले झाड प्रत्यक्ष पाहणे म्हणजे कोवळ्या किरणांतील जणू फुलांची दिवेलागण अनुभवणे.

३)

४)

ह्याच्या खोड-फांद्यांतून विशिष्टपणे लागणार्‍या कळ्या म्हणजे जणू देठाला लागलेले मोतीच.
५)

६)

खोडाला लागलेली फुले पाहताना भानच हरखून जावे अशी अजब रचना.
७)

८)

सुरंगीच्या फुललेल्या फुलांचे पिवळे धमक केशर सुगंधी रोषणाई करून पाकळ्यांच्या ओंजळीतून मंत्रमुग्ध सुगंधाची उधळण करत असतात. झाडाजवळचा कोवळ्या किरणांतील परिसर जणू अत्तरात चिंब झालेला असतो . खाली पडलेल्या सुक्या फुलांचा सडाही धरणी मातेला सुवासिक अभिषेक घालत असतो.

९)

फुलांमधील मधूरस टिपण्यासाठी ह्या झाडावर माशांचीही सुरात भुणभूण चालू असते.

१०)

११)

सुरंगीच्या कळ्या सूर्यप्रकाशात साधारण १०-११ ला पूर्ण उमलतात.
१२)

१३)

गजरे वळण्यासाठी कळ्याच काढाव्या लागतात म्हणून अगदी पहाटेच ह्या झाडावर चढून फांद्यांना लागलेली एक एक कळी काढावी लागते.

१४)

झाड चिवट असल्याने हलक्या पायांनीच कोवळ्या कळ्यांना सांभाळत फुलायला आलेल्या कळ्या काढाव्या लागतात. वर्षातून एकाच हंगामात फुलणारी व एवढ्या मेहनतीने झाडावरून काढून गजरा करूनही ह्या गजर्‍याला मात्र बाजारभाव कमी असतो. बर डिमांड काही कमी नसत. चार दिवस आधीच बुक करून ठेवावे लागतात गजरे.

१५)

सुरंगीमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक कमी वासाची सुरंगी आणि एक वासाची सुरंगी. दोन्हीची झाडे सारखीच असतात फक्त कमी वासाच्या सुरंगीच्या फुलांमध्ये परागकण जास्त असतात तर वासाच्या सुरंगीला कमी असतात. स्त्रियांसाठी गजरा हा ऋदयात घर करणारा असतो. पूर्वापार ह्या गजर्‍यांची प्रेमपूर्वक देवाण घेवाण करून स्त्रिया एकमेकींच्या ऋदयात मैत्रीची सुगंधी गुंफण करीत आहेत. केसाच्या वेणीवर लांबसडक सोडलेल्या किंवा आंबाड्यावर गोलाकार माळलेल्या पिवळ्या धमक गजर्‍याने स्त्रियांच्या सोज्वळ लावण्य अधिक फुलून येते.

१६)

होळीची धमाल म्हणून की काय सुरंगीचा गजरा आपल्या पिवळ्या रंगाची उधळण आपल्या परागकणांनी करत असतो. केसात दरवळणार्‍या सुरंगीच्या मनमोहक सुगंधात क्षण अन क्षण प्रसन्न होतो . गजरा काढला तरी दोन तीन दिवस हा सुगंध केसात तसाच टिकून राहतो व त्या सुगंधी क्षणांच्या स्मृती ताज्या करतो.

सुरंगीच्या गजर्‍याला कोंकणांत प्रचलित असणारे वळेसर हे नाव त्या गजर्‍याच्या कलाकृतीला अगदी समर्पक वाटत.
१७)

सुरंगीच्या फुलांचे पूर्वी अत्तरही मिळायचे. आता ही वनस्पतीच दुर्मिळ झाली आहे. ह्या वनस्पतीचे जतन होणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या वृक्षारोपण कार्यक्रमात अशा प्रकारच्या दुर्मिळ झाडांचेही वृक्षारोपण झाले तर ह्या झाडांचे महत्त्व, अस्तित्व पुढच्या पिढीला कळू शकेल. सुरंगीचा हा सुगंधी आनंद आताच्या व पुढच्या पिढीलाही मिळण्यासाठी ह्या झाडाची लागवड होवो ही सदिच्छा.

१८)

१९)

टीप :
कृपया लेख किंवा फोटो काहीही शेयर करताना नावासकट शेयर करा.
मागील वर्षी मी सुरंगीवर लिहीलेले लिखाण व फोटो असेच वॉट्स अ‍ॅपवर शेयर होत होते व फेसबुकवरही इतरांच्या नावाने शेयर होत होते. त्यामुळे मी मागिल वर्षी काढलेले हे फोटो तेव्हा जरा जास्तच मोठ्या वॉटरमार्कमधे टाकले आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख!
दादर पश्चिमेला स्टेशनच्या बाहेरच सुरंगीचे गजरे मिळतात. इतक्या गर्दीत सुद्धा मधमाश्या सुरंगीच्या वासाचा माग काढत त्या गजर्‍यांवर घोंघावत असतात.

क्या बात है!!!
मनमोहक, सुगंधी धागा.

दादर पश्चिमेला स्टेशनच्या बाहेरच सुरंगीचे गजरे मिळतात. >>>>हो, गेल्याच आठवड्यात पाहिल ६०रूपयाला गजरा होता. Happy

जागू, रविवारी येतोय सुरंगी पहायला. Wink

मस्तच गं जागू...
मी काढलेले फोटो एवढे स्पष्ट नाह गं नाहीतर झब्बु दिला असता तुला..
एक तर जे एकुलत एक झाड आहे पुण्यात तेपन इतक्या गर्दिच्या ठिकाणी आहे आणि उंच आहे कि फोटो काढणे सुद्धा अवघड होतं.. असो..
ऐक ना..या लेखाबरोबर त्या झाडाचा मुळ रहिवास, नविन झाडं कसं लावावं वगैरेची माहितीसुद्धा दिली असतीस तर फार बरं झालं असतं..
जर जमलं तर प्लीज नविन माहिती संपादित करशील Happy

मागील वर्षी मी सुरंगीवर लिहीलेले लिखाण व फोटो असेच वॉट्स अ‍ॅपवर शेयर होत होते व फेसबुकवरही इतरांच्या नावाने शेयर होत होते. त्यामुळे मी मागिल वर्षी काढलेले हे फोटो तेव्हा जरा जास्तच मोठ्या वॉटरमार्कमधे टाकले आहेत.>> नुसत व्हॉट्सअप काय, सिंधुदुर्ग पर्यटनच्या नावाने खपताहेत बरं..

मस्त फोटो आणि माहितीही सुरेख , टीना , पुण्यात हे झाड कुठे आहे सांगशील का ? शक्य झाले तर पाहता येईल. याचा वास बकुळीच्या फुलांसारखा असतो का ?

वा! सुगंधीत लेख!!! जागु तुझे लेख आवर्जुन वाचते... खुप आवडतात..
हे फुललेले झाड प्रत्यक्ष पाहणे म्हणजे कोवळ्या किरणांतील जणू फुलांची दिवेलागण अनुभवणे.+++ हे फार म्हणजे फारच आवडले..:)

खुप छान माहिती मिळाली, तुझ्या मुळे बर्‍याच पुलांचे वेड लागले.. त्यातलेच हे एक..:) कधी योग येतोय हे फुल बघण्याचा ते बघुया!
पण खुप उत्सुकता आहे सुरंगी बघण्याची..

फोटो नेहमी सारखेच अप्रतिम!!! Happy

टीना पुण्यात नेमके कुठे आहे हे झाड.
याचा सुवास बकुळीच्या फुलांसारखा असतो का ? +१

पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर गुडलक कॅफेच्या अलिकडे एक काळ्या दगडात बांधलेला वाडा आहे..तेथे आहे सुरंगीच झाड.. त्या झाडाखाली त्याची पाटीपन आहे..आणि ते झाड फुलांनी बहरलेलं आहे...

जागू , मस्तच!
पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर गुडलक कॅफेच्या अलिकडे एक काळ्या दगडात बांधलेला वाडा आहे..तेथे आहे सुरंगीच झाड.. त्या झाडाखाली त्याची पाटीपन आहे..आणि ते झाड फुलांनी बहरलेलं आहे...> अरे वा! चक्कर मारायला पाहिजे तिकडे आता.

जागू मस्तच फोटो अन् माहिती. आज सकाळीच सुरंगीच्या वळेसरांची आठवण आलेली आणि आता मायबोलीवर हा धागा दिसला. एकदम सगळीकडे सुरंगीचा सुगंध पसरलाय असं वाटायला लागलंय.

अन केसात माळला गजरा तर आठवडाभर जात नाहि वास केसातुन.. आपल्यालाच छान फिल येतो Happy

सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद.

फुलांचा सुगंध बकुळीसारखा नसतो. वेगळाच असतो अगदी मनमोहक.

टीना माहीती काढून नक्की नंतर लिहेन.

फोटो पहाण्यासाठी गुगल क्रोम ब्राउसर वापरा.

जागू, सुंदर लिहिलंय.सुरंगी माझ्या आवडीची.
माझ्या लहानपणी,वसईवरून एक म्हातारे आजोबा हे गजरे विकायला आणत.मस्त २-२.३० च्या उन्हात पसरलेली आमची गल्ली.नाक्यावरून थरथरती साद यायची'सुरंगीयो,वास्सवाली सुरंगीयो'(ऐकायला तरी तसेच यायचे) .ती हाक ऐकली की मी खिडकीतून त्यांच्या जवळ येण्याची वाट पहात असे.मग त्यांना वर बोलावले की मग टोपलीत ओल्या फडक्यात गुंडाळलेला केळीच्या पानाचा पुडा,ते हळुवार उलगडायचे .त्यावर पिवळेजर्द सुरंगीचे गुबगुबीत वळेसार पहुडलेले असायचे.वासापेक्षा दर्शनसुखच इतके मनोहारी असायचे की मन तृप्त व्हायचे.कधी कधी आईला ते महाग वाटायचे,पण त्या माणसाकडे पाहून ती ते वळेसार घ्यायची.
सुरंगी आणि ताडगोळे म्हटल्यावर आजही इतक्या वर्षांनी हेच चित्र डोळयांसमोर उभे रहाते.

' रंगरंगीला वसंत आला
साद सुरंगी दरवळतें .
मोहरले मन आमराईचे
पंचमस्पर्शी झोके घेते ' ... थेट अशीच सुरुवात आहे माझ्या एका ऋतुकवितेची... सुरंगीवर मी इतकी लुब्ध आहे.
तुमचा लेख नेहमीप्रमाणेच खास आणि फोटो अप्रतिम आहेत .

देवकी तुम्ही हे आधीच्या माझ्या सुरंगीच्या धाग्यावरही लिहील होत अस वाटतय. छान आठवण आहे. धन्यवाद.

वा भुईकमळ ऋतूकविता खुपच सुंदर.

Pages