अंजलीची गोष्ट - थेरपी

Submitted by आनन्दिनी on 7 March, 2017 - 02:29

दादरसारख्या बिझी ठिकाणी त्या क्लीनिकचा पत्ता शोधणं थोडं अवघडच होतं पण शेवटी ती तिथे पोहोचली.
"पण ते सायकियाट्रिस्ट आहेत की सायकॉलॉजिस्ट ?" अंजली नाना सबबी शोधत होती. "तुझ्या बाबांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हीच त्यांची डिग्री समज" बाबांच्या या बोलण्यावर आता काही उत्तरच नव्हतं. "प्लासिबो इफेक्ट (मनाच्या समाधानासाठी केल्या जाणार्या, खरंतर औषध नसलेल्या, अश्या गोष्टी) मेडिसिनसुद्धा मान्य करतंच ना!" अशी अंजलीने स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि हो ना करत ती डॉक्टर दीक्षितांना भेटायला तयार झाली.

आशिषला जाऊन वर्ष झालं होतं. अंजली आता तशी सावरली होती. खरं तर रिया असल्यामुळे तिला सावरण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ती थकून जाईपर्यंत स्वतःला कामात बुडवून घेत असे पण कितीही थकली तरीही रात्री आडवं पडल्यावर तिला झोप येत नसे. खूपदा पहाटेच जाग येई. भूक लागत नसे. एक विचित्र एकटेपण, रिकामपण तिला खायला उठत असे. आपल्यात डिप्रेशनची लक्षणं दिसताहेत हे तिला कळत होतं आणि तिच्या आईवडलांच्या नजरेतूनही ते सुटलं नव्हतं. त्यामुळेच शेवटी त्यांच्या हट्टामुळे तिने डॉक्टर दीक्षितांना भेटायला हो म्हटलं. "पण मी एकटीच जाईन. एकटी असेन तर मला जास्त मोकळं वाटेल" असं तिने अगदी निग्रहाने सांगितलं. शेवटी हो ना करत आज अंजली त्या क्लिनिकपर्यंत आली.

नेहेमीप्रमाणे ती वेळेआधी दहा मिनिटं पोहोचली होती. रिसेप्शनिस्टकडे नाव देऊन ती वेटिंग रूममधे सोफ्यावर जाऊन बसली. नेहेमी वेटिंग रूमच्या 'त्या' बाजूला बसणार्या तिला आज 'या पेशंट्सच्या' बाजूला बसताना थोडं विचित्रच वाटत होतं. "माझ्या परिस्थितीतल्या कोणत्याही बाईला असंच वाटेल. त्यासाठी काउन्सेलिंगची काय गरज! बाबा म्हणजे.." तिच्या विचारांची तंद्री अचानक भंगली. तिने कान देऊन परत ऐकलं तर खरंच धीम्या आवाजात 'रामरक्षा' ऐकू येत होती.

'रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीम सर्व कामदाम्
शिरो मे राघवः पातु भालम् दशरथात्मजः '

तिच्या नकळत रेकॉर्डबरोबर तीसुद्धा मनात ते श्लोक म्हणू लागली.... ही पूर्ण होईपर्यंत आपल्याला आत बोलावू नये असा विचार तिच्या मनात एकदा आला. "आत न जायला काहीही कारणं !!" तिचं दुसरं मन तिलाच हसलं. खरंच किती वर्ष झाली ना रामरक्षा ऐकल्याला, म्हटल्याला. लहानपणी बाबा म्हणत असत, माझ्याकडून सुद्धा पाठ करून घेतली होती. जुने फोटो बघताना जसा आनंद होतो तसा अनामिक आनंद अंजलीला झाला. रामरक्षा संपली आणि तेवढ्यातच तिला आतून बोलावणं आलं.

थोडी नर्वस होऊन ती आत गेली. "हे डॉक्टर तर फार वयस्कर दिसतायत! यांच्याशी मी कशी बरं मोकळेपणाने बोलणार? माझ्या मनाचे प्रॉब्लेम यांना कसे समजणार! अश्या विचारांत ती डॉक्टर दीक्षितांसमोर खुर्चीत बसली. सुरुवातीच्या औपचारिक बोलण्यानंतर अंजलीनेच मुद्द्याला हात घातला. "मला स्वतःला दिसतंय की मला डिप्रेशन आलय आणि त्यात काही विचित्र नाहीये ना! यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागणारच ना ?" अंजलीने होकारच्या अपेक्षेने डॉक्टर दीक्षितांकडे पाहिलं. ते लक्षपूर्वक सगळं ऐकत होते. क्षणभर विचार करून ते म्हणाले, "तुला डिप्रेशन येतंय हे तुलाही माहितीये आणि मलाही. आणि तुला अँटिडिप्रेसंट्स् मी लगेच प्रिस्क्राईब करू शकतो. पण तुझ्या बाबतीत तसं करू नये असं मला वाटतं. तुला पुढचा एखाद तास वेळ असेल तर तू इथे थांब. तू काही केसेस बघाव्यास असं मला वाटतं. but I can understand if you have other commitments."

"ठीक आहे. थांबते मी." अंजलीने आपल्या सेक्रेटरीला फोन केला. दिवसाच्या वेळापत्रकात फेरफार केला आणि ती परत क्लिनिकमधे आली. डॉक्टर दीक्षितांच्या सेक्रेटरीने अंजलीकडून कॉन्फिडेन्शिअॅलीटी क्लॉजवर सही, पेशंट्सना डॉक्टरांबरोबर अजून एक ओब्जर्वर असणार आहे याची कल्पना देणां वगैरे सोपस्कार पूर्ण केले. दीक्षितांनी सांगितल्याप्रमाणे अंजलीला शांतपि्, काहीही न बोलता रूममधे राहून फक्त ओब्जर्व करायचं होतं. दीक्षितांनी तिला केसची पार्श्वभूमी सांगितली. अतिशय गरिबीत वाढलेला मनोहर, कसंबसं शिक्षण, साधीशी नोकरी, झोपडपट्टी ते चाळीची खोली या आयुष्याच्या प्रवासात कधीतरी मनोहर एका मित्राच्या घरी गेला. त्याचा एक करोडचा फ्लॅट बघून मनोहरच्या मनावर काय परिणाम झाला ते त्यालाच ठाऊक पण आपण अस्साच फ्लॅट घ्यायचा असा त्याने निश्चय केला. नोकरी करणारी बायको मिळाली तेव्हा आपल्या गाडीला डबल इंजिन आल्यासारखं त्याला वाटलं. पण त्याची मिळकत, खर्च आणि एक करोड ह्यांचं गणित काही मिळत नव्हतं. ह्याला पै न पै वाचवायची होती. बायकोला हौसमौज करायची होती. पाळणा हलला आणि गणित पारच बिनसलं. पैसे पुरेनात, शिल्लक दूरच राहिली. गावची जमीन विकू, तुझे दागिने विकू, लोन काढू आणि तो फ्लॅट घेऊ..... बायकोसकट सगळ्यांना मनोहर वेडा वाटायला लागला होता. आणि आपलं स्वप्न कोणालाच समजत नाही म्हणून मनोहर अधिकाधिक फ्रस्ट्रेट होऊन अजूनच विचित्र वागू लागला होता. कुटुंब दुभंगलं होतं.

मनोहर आत आला. चाळीशीचा असेल पण खांदे पडलेले, चेहरा उतरलेला त्यामुळे वयापेक्षा मोठा वाटत होता. डॉक्टर दीक्षितांसमोर त्याने तीच कहाणी उगाळली.

"मनोहर, वेगवेगळ्या स्टेजमधे कुटुंबाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. तुमचं तुमच्या रहात्या घरात भागतंय. मुलगी वयाने लहान आहे. तिच्या शिक्षणासाठी वगैरे पैसे हवेत ना? शिवाय तुमच्या मिसेसना तुम्हाला पटवून देता येत नाहीये की हा फ्लॅट घेणं का आवश्यक आहे मग त्या तुम्हाला कॉऑपरेट कशा करणार "दीक्षितांनी मनोहरला प्रश्न केला.

"सगळं पटत असेल तर कोणीही कॉऑपरेट करेल. त्यासाठी बायकोच कशाला हवी! नवरा बायकोनी एकमेकांचं नाही पटलं तरीही कॉऑपरेट करायला हवं ना?"
"पण असा विचार तुम्ही तुमच्या मिसेस साठी करता का?"
"मीसुद्धा करेन ना. पण तिच्याकडे निश्चित असा काही प्लॅन नाहीये. आज हे हवं , उद्या ते हवं. माझं कसं, गेली आठ वर्षं नक्की आहे. तिथे फ्लॅट घ्यायचा मग मी पूर्ण आयुष्य आनंदात काढणार आहे."
मनोहरचं बोलणं ऐकून अंजली हतबुद्ध झाली. मनोहर गेल्यावर डॉक्टर दीक्षितांनी तिच्याकडे वळून विचारलं , "सो डॉक्टर, तो फ्लॅट जर कधी याने घेतलाच तर त्यानंतर हा आनंदी होईल असं वाटत का तुला?" "ऑफकोर्स नॉट !" अंजलीने क्षणभरही वेळ ना लावता उत्तर दिलं.
"बरोबर बोललीस. या फ्लॅटच्या वेडापायी त्याने आधीच कुटुंब गमावलंय . अमूक एका गोष्टीवर आपलं सुख अवलंबून आहे असा माणसांचा ठाम विश्वास असतो. असलं लॉलीपॉप दाखवून आपलं मन आपल्याला पळवत असतं. असा फ्लॅट घेतला की, अशी नोकरी मिळाली की, अशी छोकरी मिळाली की, फॉरेन ट्रिप केली की, मुलाला मुलगा झाला की.... न संपणारी लिस्ट आहे ही. डेस्टिनेशनचा हेका धरून प्रवासाचा सगळा आनंद नासवून टाकतो आपण. आणि हेच अंजली उलट, दुःखाच्या बाबतीतही लागू आहे. नोकरी नाही म्हणून दुःख आहे, आजार आहे म्हणून दुःख आहे, आशिष गेला म्हणून दुःख आहे.... नाही.... तू धरून ठेवलंयस म्हणून दुःख आहे! हे दुःखाचं गाठोडं तू तुझ्या इच्छेने तुझ्या डोक्यावर ठेवलंयस"

"मी माझ्या इच्छेने?" अंजलीने आश्चर्याने विचारलं. तिचे डोळे भरून आले.

"हो..." तितक्याच स्थिर आवाजात डॉक्टर दीक्षितांनी म्हटलं, "जाणारा गेला. तिथे तुझ्या इच्छेचा प्रश्नच नव्हता. पण आता ते दुःख धरून बसायचं की उठून पुढे चालू लागायचं हे तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे."

"पण मी परत जगायला लागलेच आहे. हॉस्पिटलला जाते. क्लिनिक करते" अंजलीचा आवाज रडवेला झाला होता.

"जगते आहेस की ढकलते आहेस? त्याला जाऊन एक वर्ष झालं. आता तू थोडी सावरलीस. दहा वर्षांनी पूर्ण सावरशील. पण मग ही दहा वर्ष अशीच वाया का घालवायची? तुझी, तुझ्या मुलीची, आईवडलांची प्रत्येकाची दहा वर्ष! जे दुःख दहा वर्षांनी हळूहळू फिकं होणारच आहे ते आताच टाकून दे. आठवणी टाकायला नाही म्हणत मी. त्या ठेव पण त्यांना दुःखाचं निमित्त नको करुस. तुझ्या मनाचा रथ तुझ्या विचारांच्या ताब्यात घे अंजली. त्याला भरकटू नको देऊस . स्वतःच्या मनाला शक्ती दे मग त्या शक्तीला राम म्हण , सद्गुरू म्हण किंवा काही निर्गुण निराकार शक्ती म्हण . मेडिटेट करतेस का? That will help you . तुला कशात आनंद मिळतो ते स्वतःच्या आत शोध. मुलीबरोबर, आईवडलांबरोबर वेळ घालव. गाणी ऐक, पुस्तकं वाच. लोकांना भेट. ज्या ज्या गोष्टीनी तुला बरं वाटतं ते कर. क्लिनिक नि पेशंट्सचं कारण अजिबात देऊ नकोस. आता भरपूर काम करूनसुद्धा खुश नाहीयेस ना तू? मग स्वतःसाठी वेळ देताना थोडं कमी काम केलंस तरी काही आभाळ कोसळणार नाही. आणि लक्षात ठेव जगात डॉक्टर खूप आहेत पण तुझ्या मुलीला एकच आई आहे.... त्या आईला आनंदात ठेवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. अंजली, तुला गोळ्याबिळ्या प्रिस्क्राइब करत नाहीये मी. एकच बिहेविअरल थेरपी सांगतो, दिवसभरात अधून मधून डाव्या हाताची चाफेकळी उजव्या हाताच्या बोटांमधे पकडायची , लहान मुलं आईचं बोट पकडतात तशी , आणि मनात म्हणायचं - आजचा दिवस किती छान आहे !" अंजलीने होकारार्थी मान डोलावली .

रिसेप्शनिस्टला थँक्यू म्हणून अंजली बाहेर पडत होती. तिने पुन्हा ऐकलं . आताही बारीक आवाजात रेकॉर्ड चालू होती.
'आनंदाचे कोटी । साठविल्या आम्हा पोटी ।
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग, आनंदाचे ।।
आधी रामरक्षा आणि आता तुकोबांचे अभंग ! हे क्लिनिक आहे की मंदिर या विचाराने तिच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू उमटलं आणि सहजच तिच्या मनात विचार आला "आजचा दिवस खरंच छान आहे'.

आनन्दिनी
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/2017/03/blog-post.html?m=1

Group content visibility: 
Use group defaults

तू धरून ठेवलंयस म्हणून दुःख आहे! हे दुःखाचं गाठोडं तू तुझ्या इच्छेने तुझ्या डोक्यावर ठेवलंयस

आणि लक्षात ठेव जगात डॉक्टर खूप आहेत पण तुझ्या मुलीला एकच आई आहे.... त्या आईला आनंदात ठेवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे.

>> किती सुंदर लिहिले आहे. अधूनमधून हा लेख वाचायला हवा.

Pages