जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १८): वलसाड- गुजरातमधली खादाडी

Submitted by आशुचँप on 4 March, 2017 - 03:32

http://www.maayboli.com/node/61860 - (भाग १७): अंकलेश्वर - नवे साथीदार, नवा उत्साह
===========================================================================================

काल सगळ्यांनाच गुजराथच्या उन्हाने तडाखा दिल्यामुळे आज गपगुमान सूर्योदयाच्या आधी निघायचे ठरले. आणि त्याला कुणाचीच काहीही हरकत नव्हती. कारण उन्हे चढायच्या आधी जितके अंतर कापता येईल तितके कापले तर पुढचे मार्गक्रमण कमी त्रासाचे होते याचा पूरेपूर अनुभव आम्ही घेतला होता.

त्याप्रमाणे मस्त पांढुरक्या चांदण्या पहाटे उठून तयार झालो आणि हेम गुरुजींची व्यायाम शाळा आटपून सायकल मांड टाकली. इतक्या दिवसांनतर आमचे पार्श्वभाग आणि सायकलची सीट यांची चांगली गट्टी जमली होती. आता इतके सिजन्ड झालो होतो की कशाचेच फार काही वाटत नव्हते. आणि कन्याकुमारीच्या मानाने काहीच त्रास होत नव्हता..

पण तुलना करायची झालीच तर कन्याकुमारी राईड ही जास्त मजेमजेची होती. तिथेही आम्ही चुकीच्या वेळी गेलो होतो आणि घामाची अंघोळ रोजच अनुभवत होतो. इतकी की कपडे काय मोजेही थबथबलेले असत. पण सगळा रस्ता दाट लोकवस्तीतून जात होता आणि अक्षरश पावला-पावलावर फळांची दुकाने, कलिंगडांचे ढीग, शहाळी, उसाचा रस, इडली-वड्याची दुकाने आणि कॉफी स्टॉल होते. त्यामुळे काय हा रखरखाट असे कधीच वाटले नाही. मस्त धमाल करत जात होतो.

यावेळी चित्र अगदी उलट होते. राजस्थानच्या आगीतून बाहेर आलो आणि गुजरातच्या फुफाट्यात सापडलो. नॅशनल हायवेला भरपूर हॉटेल्स असत पण ती अशी रस्त्यापासून आत आणि तिथे गेलो की अॉर्डर देऊन खायला येईपर्यंत अर्ध्या तासाची बेगमी. पटकन उभ्या उभ्या खाऊन (काकांच्या भाषेत स्टँडीग मंचिंग) करून पुढे सटकायला काही स्कोपच नव्हता.

आणि नुसता जिभल्या चाटत पसरलेला, काळ्या अजगरासारखा लांबवर पसरलेला रस्ता. दुपारनंतर तर तो इतका तापायचा की बुटदेखील तळव्यातून धगीची जाणीव करून द्यायचे. गॉगल लाऊनदेखील डोळे दुखायचे आणि घाम तर काय जिथून जिथून शक्य असेल तिथून गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळत त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा.

केवळ सगळ्यांचे सायकलींगवर प्रेम होते आणि एक मिशन हातात घेतले होते म्हणून आणि केवळ म्हणूनच त्या रगाड्यातून १२-१४ किलो वजन ओढून आणू शकलो. Quitting was always easy आणि तसे विचार अनेकदा डोक्यात येऊन गेलेही पण प्रत्यक्षात आले नाहीत.

असो, दरम्यान, काल भास्कररावांची एन्ट्री चुकली होती आमच्याकडून, आज मात्र तसे झाले नाही. पण आजचा रंगंमंच वेगळा होता. गावातल्या झाडा-डोंगरांमागून उगवणाऱ्या
सूर्याची एक शानच वेगळी होती. आणि इथे गुजरातच्या खरोद गावातून इमारती, मशिदीच्या मिनारांमागून उगवणाऱ्या सूर्याचही वेगळी.

चित्रपट कसलाही असला तरी थलैवाची एन्ट्री कशी झोकात होते, तसेच इथेही. त्यामुळे मी सायकल बाजूला लावली आणि तेजोमय गोळ्याला कॅप्चर करू लागलो. एकच वैताग झाला तो म्हणजे आकाश व्यापून राहीलेल्या इलेक्ट्रीसीटीच्या तारा. त्याने पार फ्रेमची वाट लावली. अन्यथा एक उत्तम फोटो होऊ शकला असता..पण ते चुकवून चांगला फोटो घेण्याच्या नादात बराच वेळ गेला आणि बाकीचे केव्हाच पुढे निघून गेले होते. त्यांना गाठण्यासाठी मी झपाझप पॅडल मारत वेग पकडला.

अजून एका गोष्टीने चिडचिड झाली म्हणजे एका ब्रिजवरून जाताना खाली मस्त धुके पसरल्यासारखे दिसले म्हणून फोटो काढले आणि नंतर लक्षात आले ते धुके नसून आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रामुळे तयार झालेले प्रदुषण आणि धुराचे लोट आहेत. विकासाच्या नावाखाली निसर्गावर अत्याचारच तो, दुसरे काय बोलणार. असो

पुढे दहा एक किमीवर जर्सी दिसायला लागल्या.. जाऊन पाहिले तर घाटपांडे काका, युडी आणि शिरीष. ते बाजूबाजूने काहीतरी शोधत चालले होते, विचारले काय झाले तर म्हणे शिरिषच्या सायकलचा स्पोक तुटला होता. तो बसवायला सायकलचे दुकान शोधत होते. विचारत विचारत आम्ही अजून काही अंतर पुढे गेलो आणि एका बारक्या गावात माहीती मिळाली की आतल्या बाजूला आहे एक दुकान.

खरेतर शिरिषच्या सोबतीला काका आणि युडी होते, त्यामुळे मी टाईमप्लीज करून पुढे सटकू शकत होतो. तसा विचारही आला मनात पण म्हणलं, सारखे त्यांच्याच गळ्यात कशाला म्हणून मग मीही त्यांना सोबत गेलो.

तीन चार दुकानांत विचारल्यावर सायकल दुरुस्तीचे दुकान सापडले आणि मालक नव्हताच. पण एक माणूस सगळ्या वस्तू लाऊन ठेवत होता. इतक्या सकाळी गिऱ्हाईक आल्याच्या आनंदाऐवजी त्याच्या कपाळाला आठ्याच पडल्या. त्याने सायकल पाहिली आणि तत्परतेने अशा मापाचा स्पोक नाहीये म्हणून कटवायचा प्रयत्न केला.

दुर्दैवाने तिथे टेक्निकल एक्पर्ट काका होते, ते म्हणले ज्या मापाचा असेल तो आणि, तो कसा बसवाचया ते मी सांगतो. त्याने बरीच कुरबुर करून पाहीली पण काका त्याचे बारसे जेवले होते, ते ढिम्म हलले नाहीत. मी निवांत बाजूच्या दुकानातून चहा मागवला तर युडींनी बार भरला.

चरफडत का होईना तो माणूस घेऊन आला स्पोक आणि मग काकांनी पकडीने तो कसा वाकवायचा आणि नीट कसा बसवायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि सायकल त्याच्या हवाली केली. तोवर अजून एक जण आला आणि दोघांनी बरीच खटपट करून ते कसेतरी प्रकरण आटपले.

...

या फोटोत अॅरोबार अगदी स्पष्ट दिसत आहेत पहा

या प्रकरणात नाही म्हणले तरी बराच वेळ गेला आणि पुढच्यांना सांगितले असे झाले तेव्हा ते एक चहाच्या दुकानापाशी आमची वाट बघत ताटकळत थांबले.

पुढे ४० एक किमीवर तापी नदी पार झाली. खरेतर तापी फारच थोडा वेळ महाराष्ट्रातून जाते पण आपल्या मातीशी नाळ जोडणारे काहीही मिळाले तरी जीव सुखावतो असे ते नाव वाचून झाले. आता सारखे उजवीकडे वळणारे सूरतचे बोर्ड दिसू लागले. पण आमच्या रस्त्यापासून सूरत बरेच लांब होते त्यामुळे नुसत्या बोर्डकडे बघूनच समाधान मानावे लागले.

आता उन्हे मस्त तापली होती आणि तोच हायवेचा रखरखाट. पण अॅरोबारचा पुरेपूर वापर करत मी निभावून नेले. आणि गँग पुढे सापडली तेव्हा मग फार वेळ न घालवता पुढे निघून गेलो. नंतरचा पॅच एकदम सपाट होता आणि मी डोके खाली झुकवून पॅडलला गती दिली आणि झामझूम करत बराच वेळ सायकल पळवत राहीलो. माझ्या मागून हेम येत होता आणि चक्क सुसाट ग्रुप चे मेंबर्स मध्ये थांबले होते त्यामुळे मागे राहीले होते, अर्थात नंतर ब्रेक तुटलेल्या इंजिनसारखे ते रोरावत आलेच पण खूप दिवसानी लीडवर असल्याचा आनंद वेगळाच होता.

नकाशात पाहिले तर नवसारीवरून चिखलीला जाताना असा एक भलामोठा सी च्या शेपमध्ये रस्ता वळत जातो. त्याऐवजी सरळ घणदेवी, बिलमोरावरून जाणारा रस्ता घ्यावा का असा विचार केला. पण आमचा टूर गाईड सुह्द बरोबर नव्हता आणि नॅशनल हायवे सोडून स्टेट आणि गावातल्या रस्त्याने जायला कुणी तयार झाले नसते. त्यामुळे आहे त्याच रस्त्यावरून मार्गक्रमण करत राहीलो.

आम्हाला सांगितले होते की नवसारी नंतर उबाडीयो विक्रेते दिसायला सुरुवात होईल, त्याची प्रचिती आलीच. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चक्क खोपटी लाऊन लोकं उबाडियो विकत होते. त्यातल्या त्यात एक बरे पाहून थांबलो आणि तिथल्या भाभींना ऑर्डर दिली आणि समोर आला एक अतिशय खमंग खाद्यप्रकार...

उबाडियो म्हणजे आपल्याकडे कोकणात पोपटी म्हणून मिळते त्याचेच गुजराती भावंड. कांदे, बटाटे, रताळी, कंद, पापडीच्या शेंगा असे काय काय मडक्यात घालून खाली निखाऱ्यांची धुरी देतात. त्या वाफेत हे पदार्थ मस्त उकडले जातात आणि लागतातही अतिशय रुचकर. सोबत हिरवी चटणी आणि मडक्यात भरून ठेवलेले थंडगार ताक. अहाहा, काय सुख होते.

...

...

भाभींना गुजराती सोडून काही येत नव्हते पण इथे भाषेची गरज नव्हती, मडक्याकडे बोट दाखवायचे आणि हाताने किती प्लेट ते दाखवायचे. असेही मला एक, बे, त्रण इतपत गुजराती येत होतेच. आणि मनसोक्त त्या उबाडीयोवर ताव मारला आणि ताकाचे ग्लासामागून ग्लास रिचवले.

आमच्या नशिबात उबाडियो होते इतकेच त्या भाभींच्या नशीबात आम्ही होतो कारण आम्ही जे काही दुष्काळातून आल्यासारखे खाल्ले की त्या्मुळे त्यांचा दिवसभराचा धंदा अर्ध्या तासातच झाला आणि बाईंकडचे सगळे सामान संपले. पार अगदी खडखडाट. बाई खुश होउन तोंडभर हसल्या, पैसे कडोसरीला लाऊन घरी गेल्यासुद्धा. असेही त्या खोपटाला काय बंद करण्यासारखे नव्हतेच.

इतके आकंठ खाणे आणि वर दोन तीन ग्लास ताक रिचवल्यावर जी काही सुस्ती आली त्याला तोड नव्हती. मला तर पापण्यांवर हत्ती बसल्यासारखे वाटत होते. त्यामुळे तिथेच एक थोडी सावली बघून बसल्या बसल्याच एक छानशी डुलकी काढली.

दरम्यान, शिरिष आणि ओबी मागून सावकाश येत असताना एक भन्नाट किस्सा झाला. एक गाडीवाला येऊन शिरिषला विचारू लागला. नेहमीप्रमाणेच किधरसे आये, कहा जानेवाले वगैरे

आधी शिरिष म्हणला, वडोदरासे आये हम

त्यावर त्याला भयंकरच कौतुक आणि आश्चर्य वाटले

क्या बात है, इतने दूरसे आप सायकल चलाते आ रहे हो
वगैरे

दरम्यान शिरिषला वाटले आपण अर्धवटच माहीती दिली, आणि म्हणाला हमारी अॅक्चुअल राईड जम्मुसे है. वहां से सायकल चलाते हुए आये है सब

तर त्या माणसाने क्लीनबोल्डच केला. म्हणे, अच्छा जम्मूसे... तो फिर ठिक है,

असे म्हणून भुरदिशी निघून पण गेला

शिरिष बराच वेळ आ वासून होता म्हणे त्याच्या रिएक्शनवर.

त्यानंतर बराच काळ आमचा अच्छा तो फिर ठिक है हा एक हास्याचे फवारे उडवणारा वाक्यप्रचार झाला होता.

अजून ५० एक किमी जाणे बाकी होते त्यामुळे नाईलाजाने उठलो आणि पुन्हा एकदा पॅडल फिरवायला लागलो. वाटेत पूर्णा, अंबिका, कावेरी, खरेरा अशा तापीच्या उपनद्या पार करत करत आणि एडल, चिखली, मज्जगम अशी गावे पार करत वलसाडच्या दिशेने कूच केले.

या गावाच्या नावाची व्युपत्ती काय लागली नाही मला Happy

साधारण २० एक किमीनंतर छोटी विश्रांती आणि डोळ्यावर पाण्याचे सबके मारून पुढे असे रुटीन आता सेट झाले होते. मी तर कंटाळा आला की दहाव्या किमीला देखील थांबायचो. दिवसभर सतत एकाच रोटेशनमध्ये पाय फिरवत असल्याने थांबलो तरी पाय फिरतायत असेच वाटायचे.

असेही सगळ्यांचा स्पीड वेगवेगळा असल्याने मैलाच्या अंतरात सगळेजण विखुरले होते पण वलसाडच्या आधी सगळे एकत्र आलो आणि हॉटेलमध्ये प्रवेशते झालो.

ते हॉटेलही होते मस्त निवांत आणि राष्ट्रीय खाद्य पनीर होतेच स्वागताला. पण बाहेरच आईस्क्रीमचा काऊंटर होता त्यामुळे सगळ्यांनी त्यावर ताव मारलाच. दरम्यान, शिरिष अजून एक अजब अनुभवाला सामोरा गेला. त्याचे बिघडलेले पोट अजून पूर्णपणे ताळ्यावर आले नव्हते त्यामुळे तो एकटाच मेडिकलचे दुकान शोधत गेला.

रात्रीची वेळ होती आणि त्याला काही केल्या कुठेही मेडिकल सापडेना. मग त्याने एका दोघांना विचारले. त्यांनी पहिल्यांदा पता नही म्हणून उडवून लावले. पण तो अगदीच निकराने शोधतोय म्हणल्यावर त्यातला एकजण म्हणे आवो मेरे साथ, आपको मिलेगा नाही.

आज्ञाधारक मुलासारखा शिरिष त्याच्यासोबत गेला, दोन गल्ल्या पार करून त्याने अजून एका बारक्या गल्लीत नेले आणि तिथे आलेल्या भपकाऱ्याने त्याला भलताच संशय आला. ते होते दारूचे दुकान गुप्तपणे चाललेले. त्याने त्या माणसाला विचारले, ये क्या है, तर म्हणे दवाईकी दुकान चाहीये ना..

हा म्हणजे हतबुद्धच झाला, म्हणे, अरे ये वाली दवाई नहीं, मुझे मेडिकल वाली दवाई चाहीये...तर तो पता नही म्हणून गायबच झाला.

आज म्हणजे शिरिषने पोट दुखेस्तोवर हसवले. खरे तर हा किस्सा त्याच्याच शैलीत ऐकण्यासारखा आहे.

झालं, आता प्रवास अखेरच्या टप्प्यात आला होता. उद्या आम्ही महाराष्ट्राची सरहद्द पार करून आपल्या मातीत प्रवेश करणार होतो. उद्या वसई, परवा खोपोली की नेक्स्ट पुणे. प्रवास संपण्याची ओढ वाटत होतीच पण संपू नयेच असेही वाटत होते.

========================================================
http://www.maayboli.com/node/61889 - (भाग १९): वसई - उन्हाच्या तलखीत महाराष्ट्रात प्रवेश

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उबाडीओ एकदम एक्झॉटिक डिश दिसतेय . तोंपासू .
हा ही भाग मस्त. आता थांबू नकात . पूर्ण करूनच सोडा .
पुभाप्र .

खल्लास!!, त्या धुक्याचे वाचून विशेष नवल वाटले नाही, उधना (सुरत जीआयडीसी, इथे सुरत लुटीच्या वेळी थोरल्या राजांचा तळ सुद्धा होता बहुतेक) - वापी-दमण-वलसाड पट्टा भारतातला एक अतिशय जास्त प्रदूषित भाग आहे, टेक्सटाईल युनिट अन केमिकल प्लांट मुळे वाट लागली आहे

गावाच्या नावाची व्युपत्ती काय लागली नाही मला

गायपगला

गाय = गुजरातीत पण गाय
पगला = गुजरातीत पाऊल

अर्थात, गायीचे पाऊल = गायपगला

धन्यवाद सर्वांना...

गायीचे पाऊल = गायपगला

अच्छा हे असंय होय, मी इंग्रजीतला गाय आणि हिंदीतला पगला अशी सोयिस्कर समजूत करून घेतली होती..


वापी-दमण-वलसाड पट्टा भारतातला एक अतिशय जास्त प्रदूषित भाग आहे
>>>

हो ते जाणवत होतंच, सायकलींग करताना डीप ब्रिदींग करतो त्यावेळी त्रास होत होता, जास्त दम लागत होता

उबाडियो खरंच खूप टेस्टी प्रकार आहे, केवळ ते आणि उंधीयू साठी गुजरातला जायची माझी तयारी आहे. अर्थात दमल्यामुळे आणि कडाडून भूक लागल्यामुळेही जास्त चविष्ट वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गाडीतून जाऊन कितपत आवडेल माहीती नाही.

मस्त लिहिलंय.. परत.
अच्छा जम्मूसे... तो फिर ठिक है,
मुझे मेडिकल वाली दवाई चाहीये... >>> कहर किस्से Biggrin

गुजरातेत काही महिने राहणे झाले होते एका कामानिमित्त, तेव्हा सुद्धा असेच किस्से झाले होते, सिव्हिल ड्रायव्हरला दवाई म्हणल्यावर त्याने माझ्याकडे अट्टल बेवड्याकडे बघतात तसे बघितले अन निरागसपणे म्हणाला

"सर, कॅन्टीन मे मिलती है न दवाई?"

इकडे दारू मुबलक आहे, कुठल्याही ऑटो मध्ये बसा अन दारू सांगा खंबा मिळेल, पावशेर मटनाला मात्र पंधरा पंधरा किमी गाडी हाकत जावे लागते आणायला..

"इकडे दारू मुबलक आहे, कुठल्याही ऑटो मध्ये बसा अन दारू सांगा खंबा मिळेल" so much for the dry state. जबरदस्तीच्या बंदी चा परिणाम बहूतांशी counter productive होतो.

फेरफटका - हेच लिहीणार होतो. ड्राय स्टेटचा इतका गाजावाजा केलाय, त्यात बहुदा विक्रेत्यांचेच उखळ पांढरे होत असणार कारण चोरून विक्रीची किंमत जास्त लावत असणार. डुप्लिकेट पण मिळत असेल, कुणी सांगांव....

मस्तं अनुभव. इथे मस्तं म्हणायला काय जातंय..
कसा असेल हा प्रवास याची थोडीशीच कल्पना वाचून येतेय. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !

वलसाडचा आंबा प्रसिद्ध आहे. एका हॉटेलमधे आमरस मिळतो . तिथेच जेवलाय ना ?

वलसाडचा आंबा प्रसिद्ध आहे. एका हॉटेलमधे आमरस मिळतो . तिथेच जेवलाय ना ? >>>

नाही ना....आधी माहीती असते तर शोधले असते.

मस्तच वर्णन..
गायपगला मीपन शब्दशः अर्थ घेतला..

मला तर पापण्यांवर हत्ती बसल्यासारखे वाटत होते. >>>हहपुवा , लगेच फोटो बघून एकटाच हसत होतो