लांतूरी - An eye for an eye

Submitted by सन्तु ग्यानु on 19 February, 2017 - 13:40

फिल्म फेस्टिवलमध्ये दिसणारे चित्रपट जर महिने असतील तर इराणी चित्रपट मे महिना आहे. सगळ्यात गोड आठवणी ज्याच्या राहतात तो. त्यात ‘द सेल्समन’ हा इराणी चित्रपट इतर कामांमुळे नक्की बुडणार होता. त्यामुळे लांतुरी बघायलाच लागणार होता आणि तो चांगलाच निघायला लागणार होता Proud

लांतुरीची गोष्ट पाशा नावाच्या एका अजब रसायनाविषयी आहे. ती गोष्ट आणि ते रसायन चित्रपटाच्या विशेष कथन शैलीतून हळू हळू उलगडू लागतं. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच अनेक पात्र आपल्याशी (कॅमेऱ्याशी) बोलतात. ती पात्र कोण आहेत? वकील, मानवाधिकारांसाठी लढणारी कार्यकर्ती, दुकानदार, कवी, कैदी, पूर्वाश्रमीची वेश्या, म्हणजे पार क्रॉस सेक्शन. तंत्र डॉक्युमेंटरीचं, पण कंटेन्ट असा की चटकन लक्षात यावं की सगळं ‘between the lines’ सुरु आहे. जिगसॉ पझल चा एक एक तुकडा दाखवावा तसा दिग्दर्शक (रझा दोरमिशा) आपल्यासमोर गोष्टीचा एक एक तुकडा फेकत राहतो. पण ते करत असतानाच तो आपल्या नकळत त्या पात्रांच्या माध्यमातून एक संपूर्ण सामाजिक पटच उभा करू पाहत आहे.

बरं ते जिगसॉ पझल काही जुळताना दिसत नाहीये. पात्रांच्या बोलण्यात खूपच विरोधाभास आहे. त्यामुळे पाशा नक्की कसा आहे आणि त्यांने नक्की केलंय काय ह्याबाबत कुतूहल अधिकच वाढतंय .

मग अचानक चित्रपट ‘नॉर्मल’ होतो. पात्र-नाती-प्रसंग-नाट्य वगैरे नेहमीच्या वळणांनी गोष्ट पुढे सरकते. पाशाचं अनाथ असणं, त्याची आणि बारूनची ओळख आणि तिचं एकतरफी प्रेम, अजून २ साथीदारांबरोबर तयार झालेली त्यांची लांतुरी गँग, त्या गँगचे रॉबिन हूड स्टाईल कारनामे आपल्याला दिसतात. पाशातला हळवा गुंड आपल्याला निश्चितच आवडू लागतो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग मुख्य गोष्ट सुरु होते. गोष्टीची नायिका आहे मरियम. एक उच्चभ्रु सामाजिक कार्यकर्ती. मराठीत तिला सोशिअलाईट असे देखील म्हणता येईल.
मरियम फाशीची शिक्षा मिळालेल्या अपराध्यांसाठी , विशेषतः मुलांसाठी माफी मिळवण्याचा प्रयत्न करत असते. अपराधाचा बळींच्या घरच्यांना जाऊन भेटणे, त्यांना मानवतावादी विचार करायला प्रवृत्त करणे वगैरे प्रकार ती धोरणीपणाने करत असते. पण अर्थातच फारसं यश तिला मिळत नाही. हातातोंडाशी आलेला ‘न्याय’ कोण त्याग करेल?

अशाच एका केस संदर्भात पाशा पहिल्यांदा मरियम ला भेटतो आणि तिच्या प्रेमातच पडतो. तिला पाशा आवडतो पण तिचं प्रेम-बीम काही नसतं. पण पाशाला एकदम वाईट वाटू नये म्हणून ती त्याला झिडकारूनही टाकत नाही. पाशाचा गैरसमज होऊ लागतो की मरियम देखील आपल्याला ‘लाईन’ देतेय. त्यामुळे गडी एकदम उमेदीत असतो. तेव्हा त्याला मरियमचे एका पुरुषाबरोबरचे काही फोटो दिसतात. प्रेमवीर पाशा आपली गॅंग घेऊन त्या पुरुषाला किडनॅप करतो, बेदम मारतो आणि धमकावतो. हे जेव्हा मरियमला कळतं तेव्हा तिचे पेशन्स संपतात आणि ती थेटच त्याला खरं सांगून टाकते. पाशा बिचारा काही हा नकार पचवू शकत नाही. तो वेडा-पिसा होतो आणि मरियमला एकदा शेवटचं भेटण्यासाठी गळ घालतो. त्या भेटीत अपेक्षेप्रमाणेच मरियम पुन्हा एकदा नकार देते. हळवा झालेला पाशा तिकडे जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतो की काय असं वाटत असतानाच कथा एक अगदीच अनपेक्षित वळण घेते. पाशाची हळव्या गुंडांची डायकोटॉमी परत एकदा उफाळून वर येते. तो जे कृत्य करतो त्याने मरियमचे आयुष्यच बदलून जाते.

आणि मग चित्रपट आपल्या मुख्य विषयाकडे येतो. एखाद्या गिर्यारोहकाचे पायच कोणी कापले तर त्याला काय वाटेल? अपराध्याला तोलामोलाची शिक्षा व्हावी असं त्याला सहाजिकच वाटेल. पण मरियमला - आयुष्यभर अपराध्यांसाठी माफी मिळवण्याचा प्रयत्न करणारीला देखील तसंच वाटतं तेव्हा त्या ‘बदल्याच्या’ भावनेची नैसर्गिकता जाणवते. आणि बदला म्हटलं की आपण भोगलेलं सगळंच त्याने देखील भोगलं पाहिजे! मरियम चक्क ‘लेक्स टॅलिओनीस’ चा आग्रह धरते. ह्या लॅटिन शब्दाचा मतितार्थ आहे ‘an eye for an eye’. शिया कायद्यामध्ये असलेल्या ह्या तरतुदीनुसार पाशाला शिक्षा होते.

ह्या पुढचा भाग म्हणजे ह्या सिनेमाचा उच्चबिंदू आहे. आपल्या डोळ्यादेखत एखाद्या जिवंत माणसाच्या जिवंत अवयवाला जाणूनबुजून जबर इजा पोचवली जाताना पाहणं सोप्पं नाही. पण दिग्दर्शक जाणीवपूर्वक प्रेक्षकाला त्या दिव्यातून जायला लावतो. अपराधी आणि बळी हे नातं इथे उलटं होऊन बसतं आणि आपण नक्की कोणाची बाजू घ्यायची हे कळेनासं होतं. ह्या दृश्यातलं टेन्शन इतकं परिणामकारक रित्या उभं केलंय की मस्त AC थिएटर मध्ये बसलेल्या माझ्यासारख्या (लौकिकाने इंसेन्सिटिव्ह) प्रेक्षकाने देखील बचावात्मक पवित्र्यात अंग चोरून घ्यावं. दृश्य पाहणं अशक्यप्राय वाटू लागतं. ह्याला म्हणतात सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ! ह्याला म्हणतात सिनेमा!

आणि मग आपल्यावरच ही जीवघेणी वेळ आल्यामुळे प्रेक्षक आपोआपच योग्यायोग्यतेचा विचार करू लागतो. न्याय म्हणजे नक्की काय? मराठीत न्याय, निवाडा, दंड, शिक्षा असे अनेक शब्द आहेत. आजचा आपला सो-कॉल्ड मॉडर्न समाज नक्की न्याय ह्या संकल्पनेकडे कसा पाहतो? आपल्याकडे कारागृहांना सुधारगृह म्हणण्याची पद्धत आहे. गुन्ह्याबद्दल कारावासात पाठवणे म्हणजे जणू गुन्हेगाराला सुधारण्याची एक संधी देणे होय - असा त्या मागचा विचार त्यामागे. ही कल्पना सुंदर आहे. पण आपण समाज म्हणून खरंच इतके उदार झालो आहोत का? आपल्यावर येऊन ठेपलं की आपल्याला देखील खरंतर बदलाच अपेक्षित असतो का?

एकीकडे आधुनिकता आणि दुसरीकडे स्वाभाविक/सांस्कृतिक मूल्य, अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभी ठाकलेली दिसतात. आणि त्यात आपली पुरती गोची होऊन बघते. अशाच एका गोचीची मार्मिक, थरारक आणि नॉन-लिनिअर गोष्ट म्हणजे लांतुरी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय संतु. मीही कदाचित ह्या सिनेमावर लिहीन, त्यामुळे आत्ता इथे जास्त लिहीत नाही. नाही लिहीलं, तर इथे देतो प्रतिसाद.

AC थिएटर मध्ये बसलेल्या माझ्यासारख्या (लौकिकाने इंसेन्सिटिव्ह) प्रेक्षकाने देखील बचावात्मक पवित्र्यात अंग चोरून घ्यावं. >>> मी वाचता वाचता अंग चोरून घेतलं. खूप परीणामकारक लिहिलय. खूप आवडले.

plz link dya