पद्मा आजींच्या गोष्टी १४ : वेळ आली होती पण...

Submitted by पद्मा आजी on 18 February, 2017 - 18:42

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

मी तुम्हाला आज माझ्या वडिलांची गोष्ट सांगणार आहे. फार जुनी गोष्ट आहे.

एकदा काय झाले, माझ्या वडिलांचे मित्र आले आमच्याकडे व त्यांनी वडिलांना विचारले, "चलता का बरॊबर अकोल्याला? माझ्या मुलीला एका स्थळा विषयी दाखवायचे आहे."
वडील म्हणे, "चलतो, केव्हा जायचे?"
"उद्या सकाळी."
"ठीक आहे. येतो."

म्हणून दुसऱ्या दिवशी वडील, त्यांचे मित्र व मित्राची मुलगी असे तिघे अकोल्याला जायला निघाले. मुलीला दाखवायचा कार्यक्रम आटोपून संध्याकाळी पर्यंत परत येणार असे सांगून गेले. Passenger ट्रेन ने परत येऊ म्हणाले.
अकोला जवळच होते अमरावातीपासून. साधारणतहा: दोन अडीच तास लागायचे ट्रेनने. मध्ये बडनेरा स्टेशन हि लागायचे.

जशी संध्याकाळ झाली तसे आम्ही विचार करत होतो की निघाले असतील, येतील थोड्या वेळाने. पण बराच वेळ झाला तरी आले नाहीत. मग अचानक रेडिओ वर बातमी आली की अकोला - अमरावती Passenger ट्रेन ला अपघात झाला बोरगाव पाशी. मोठा अपघात झाला होता. अनेक डब्बे रुळावरून घसरले होते.

झाले, आमची आई आणि आम्ही सगळे घाबरलो. कारण याच गाडीने वडील येणार होते.
काय करायचे? कसे जायचे अपघात जागी? तेव्हा काही अशी खासगी वाहने नव्हती. आणि जिथे अपघात झाला ती जागा मधेच कुठेतरी होते. तिथे पोहोचणार कसे?

आणि अपघात झाल्यामुळे बाकीच्या ट्रेन पण बंद होत्या. आता काय करावे? आमच्या डोळ्यात तर पाणी.

अकोल्याला माझी आत्या आवडाबाई राहायची. पण तिच्याकडे ते जाणार नव्हते. आणि तिला विचारायला तिच्या जवळपास, शेजारी-पाजारी फोन ही नव्हता.

तेवढ्यात वडिलांच्या मित्राचा मुलगा आला. त्यानेही बातमी ऐकली होती. तोही फार चिंता ग्रस्त. मग माझा मोठा भाऊ आणि तो गेले. बघू म्हणे कुठं पर्यंत पोहोचतो.

आम्ही आपले रेडिओ जवळ बसून. आईने देव पाण्यात पण ठेवले. हळूहळू बातम्या डिटेलमध्ये यायला लागल्या. दहा डब्बे रुळावरून घसरले होते. मृतांची आणि जखमींची संख्या हि फार होती. वाड्यातले काही लोकही येऊन बसले आमच्या घरी रेडिओशेजारी.

केव्हा तरी मला झोप लागली पण मी जागी झाली काही आवाजामुळे. बघते तर काय वडील दिसले. मी लगेच उठून त्यांना मिठी मारली. ते सांगत होते काय झाले ते.

मुलीला दाखवायचा कार्यक्रम नंतर त्यांना अचानक आवडी कडे जायची इच्छा झाली. म्हणून ते त्यांच्या मित्राला घेऊन आवडी आत्या कडे गेले. म्हणाले चहा पिऊन निघू. आवडी ने चहा बनविला पण ती वडिलांना म्हणाली जेवायला थांब. ते म्हणाले अग, गाडी चुकेल. जेवण आता घरी जाऊन करेन.

पण आवडी ने काही ऐकले नाही. ती म्हणाली जेवण केल्याशिवाय तुला सोडणार नाही. म्हणाली मला आज काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत आहे. मी काय आहे ते सांगू शकत नाही, पण तुम्ही इथेच थांबा आज आणि सकाळी जा. आवडी चे फार असायचे देव, पूजा, मंत्र वगैरे. (ज्यांनी माझ्या आधीच्या गोष्टी वाचल्या असतील त्यांना आवडाबाई च्या सिद्धिंची ची ओळख असेल.)

तिने वडिलांच्या मित्रालाहि फार आग्रह केला पण ते फक्त चहा पिऊन गेले. जेवण झाल्यावर ही आवडी आत्याने वडिलांना जाऊ दिले नाही. म्हणून ते झोपले आणि सकाळची बस पकडून निघाले. बस स्टेशन आल्यावर त्यांना समजले की Passenger गाडीला काल अपघात झाला. आणि मग त्यांना उलगडा झाला की आवडी आत्याच्या आग्रहाने त्यांना वाचविले. पण लगेच मित्राची आणि त्याच्या मुलीची काळजी पडली.

काही वेळाने भाऊ परत आला. बातमी चांगली नव्हती. वडिलांच्या मित्राला आणि त्यांच्या मुलीला फार लागले होते आणि ते बोरगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. वडील लगेच गेले बोरगावला. पण नंतर काही दिवसांनी वडिलांचे मित्र वारले. वडिलांनी त्यांच्या मुलांना मदतहि केली नंतर.

पण जेव्हा जेव्हा त्या अपघाताची आठवण आली तेव्हा म्हणायचे -- कि वेळ आली होती पण आवडी ने टाळवली.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्माआज्जींच्या गोष्टी म्हणजे छानच असणार यात प्रश्न नाही...
आज्जी तुमचा फोटोसुद्धा मस्त..
वडिलांच्या मित्राबद्दल वाईट वाटलं..त्यांच्या घरावर काय बितली असेल.. Sad

पद्मा आजीच्या गोष्टी आवडीने वाचतो...

१९८० मधे बोरगाव जवळ असा अपघात झाल्याचे अस्पष्ट लक्षात आहे... (हा तोच अपघात असेल का नाही हे माहित नाही). आपघाताची बातमी सायन्काळी (रात्री उशीरा) आली होती, आणि वर्णन एकुन खुप सुन्न झाले होते.

पद्मा आज्जी तुम्ही कोणताही किस्सा छान फुलवून त्याची गोष्ट बनवून सांगता.
ऐकत्/वाचत बसावेसे वाटते.
तुम्ही प्लिज अखंडित लिहित रहा...
एक पुस्तक काढा जमलं तर्, मी नक्की विकत घेईन Happy