तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा...

Submitted by सत्यजित... on 18 February, 2017 - 15:58

जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा!

तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी...
तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा!

चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती...
तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!

कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा...
तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!

मृगा लाविते केसरीचा लळा,कट्यारी नजर..पाहणे सापळा...
अरे काय रंभा फिकी उर्वशी,फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा!

तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा...
—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाव ! सुंंदर !!
प्रेमात पडल्याशिवाय अशी कविता होत नाही.

अप्रतिम !!
काय सुंदर वर्णन केले आहे !!
तुमच्या शब्दांमधे जादु आहे जणु !!
गझल आवडली !!

>>तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!
वाह वा!
बहुत दिनो बाद.. मिंया.