फुललेला गुलाब

Submitted by विलभ on 13 February, 2017 - 12:02

"चिन्मय, चल आटप लवकर. निघायला उशीर होतोय.. "
"नको आजोबा, आज माझा जरापण मूड लागत नाहीए. मी नाही येत." चिन्मय करवादला.
"अरे बाबा , आता हे काय निघतानाच नवीन काढलंयस, असा घरकोंबडा बसून किती दिवस राहणार?"
"नवीन सोसायटीत आलोय,आत्ता कुठे महिना झालाय. समीर आणि आलोक सोडले तर दुसरे कोणीच ओळखीचे नाहीत हो. तुमचे काय, नाना आजोबांसारखा तुमचा बेस्ट फ्रेंड आधीपासूनच इथे आहे. मला त्यांच्याकडे जाम कंटाळा येईल. त्यापेक्षा मी घरातच बरा".
"आणि काय, अख्खा दिवस टीव्ही आणि कॉम्प्युटरवर घालवणार? राजे, जरा दरवाजा उघडून बाहेर बघा. तुझ्या वयाची इतकी मुले-मुली आहेत, बाहेर पडल्याशिवाय मित्र कसे भेटतील? आणि आज दुपारी नानाकडेच जेवायचे आहे, लक्षात आहे ना? नाहीतर संध्याकाळपर्यंत उपाशी राहशील. चल, चल, उठ लवकर. आणि तिसऱ्या विंगमध्येच नाना राहतो, कुठे इतक्या दूर जायचंय?"
"हो, येतो. पण जेवल्यावर मी परत येणार."
"बरं बाबा, नाही आवडलं तर परत ये, मग तर झालं?"

चिन्मय पडत्या चेहऱ्यानेच आजोबांबरोबर निघाला.

भर दुपारी अनोळख्या ठिकाणी जायची चिन्मयची मुळीच इच्छा नव्हती. कुठून बाबाला घर बदलायची बुद्धी झाली आणि चांगल्या ख्रिसमसच्या सुट्टीत फिरायला न जाता नेमके इथे एकट्याने शिक्षा मिळाल्यासारखे अडकून पडलोय, असे त्याला राहून राहून वाटे. येऊन जेमतेम महिना झाला, त्यात समीर आणि आलोक हे दोघेच ओळखीचे मित्र. नेमके तेसुद्धा याच आठवड्यात गोव्यात फिरायला गेले. गेल्या वेळी आपली फॅमिली आणि काका मिळून गोव्याला गेलेलो, काय धम्माल केलेली.......नुसत्या आठवणीनेच चिन्मय मनोमन सुखावला. पण ही सुट्टी एकदम बोअर जाणार, या विचारासरशी त्याचा मनात पुन्हा निराशा दाटून आली. एव्हाना दोघे नानांच्या दारासमोर येऊन ठेपले.

###################################################################

कसल्याशा आवाजाने चिन्मयला जाग आली. चमकून आजूबाजूला पहिले, अन त्याला जाणवले की अजून आपण नानांच्या घरातच आहोत. दुपारच्या भरपेट जेवणाने चांगलीच सुस्ती आली अन आपण सोफ्यावरच ताणून दिली की काय?. हट यार, आपण इतके कसे वेंधळे, परक्या ठिकाणी खुशाल आडवे झालो... चिन्मय ओशाळला.

पण आतल्या खोलीतून येणाऱ्या ओळखीच्या आवाजाने त्याची उत्सुकता चाळवली. सहज म्हणून डोकावला, तर समोरच मोठ्या स्क्रीनवर त्याचा आवडता गेम "Call of Duty" pause मोडवर झळकत होता. त्याबरोबरच दोन मोठ्ठाले डोळे चष्म्याआडून चिन्मयला न्याहाळत होते.

"ए हाय, मी मानसी. तू वेद आजोबांचा नातू ना? " चष्म्याआडून प्रश्न आला.
"अं..हो. मी चिन्मय" चिन्मय उत्तरला.
"आजोबांनी सांगितलेले तू आणि वेदआजोबा आज जेवायला येणार म्हणून. मघाशी आले तेव्हा सोफ्यावर झोपलेलास. "
"हो.. म्हणजे ते जरा..." चिन्मय ओशाळला. "पण ते जाऊ दे, हा कुठला version चालू आहे, मॉडर्न वॉरफेअर का?"
"ए बरोबर ओळखलंस. तुलापण खेळायला आवडतो का ?"
"भरपूर." चिन्मयची कळी खुलली. "हा तर माझा फेव्हरेट गेम आहे. पण हा थोडा जुना व्हर्जन आहे, माझा केव्हाच खेळून झालाय. माझ्याकडे आहे लेटेस्ट, आणू ?"
"आयला खरंच?..." मानसी आनंदाने जवळजवळ ओरडलीच. पण आपण काय बोलून गेलो, आठवून मानसीने लगेचच जीभ चावली.
"ए आत्ता घेऊन ये ना तो, प्लीज. मी पण हा खेळून बोअर झालीये."
"हो आलोच. तू सेटअप ची तयारी कर, मी हा गेलो आणि आलो."

अख्खा दिवस दोघांनी फक्त नवीन गेम खेळण्यात घालवला. चिन्मयसारखीच मानसी तासनतास कॉम्पुटरसमोरून हलत नसे. सुट्टीत जवळपास सारेच कुठे ना कुठे सहलीसाठी गेलेले, त्यामुळे गेमिंग शिवाय दोघांनाही चैन पडत नव्हती. आता तर काय, खेळण्यास बरोबरीचा सोबती मिळाला आणि पाहता पाहता वेळ कापरासारखा उडून जाऊ लागला.

###################################################################

एकदाच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळा सुरु झाली . चिन्मय एव्हाना बराच खुलला होता. हळूहळू इतरांशीही ओळख झाली, अन मनावरली एकटेपणाची काजळी मिटून गेली. मानसी, समीर, आलोक अन वर शाळेतले-सोसायटीतले अगणित मित्र ; रोजच्या खोड्या अन गप्पांना अक्षरश: ऊत यायचा.
त्यातच शाळेच्या स्नेहसंमेलनाची घोषणा झाली अन सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले. सगळ्या वर्गांना कामाची वाटणी झाली आणि चिन्मय, मानसी दोघांना रंगमंचाच्या सजावटीचे काम मिळाले.
.
.
"चिन्मय, मानसी, इथे या जरा." मधल्या सुट्टीत बाईंनी दोघांनी बोलावले. "ही देविका, तुमच्याबरोबरच ८वीत आहे. ब वर्गात शिकते."
देविका नावाप्रमाणे एका देवीसारखी रूपवान होती. नितळ वर्ण, गोल चेहेरा आणि गालावर हसताना पडणारी मनमोहक खळी. चिन्मय क्षणभर भान हरपून तिच्याकडे पाहतच राहिला.

"देविका चित्रे फार सुरेख काढते, बरंका. आणखी ३-४ मुले आहेत ब तुकडीतली. शाळा सुटल्यावर येथेच या, सोबत बसा ,अन पाटील बाई सांगतील तशी सजावट करा, चालेल?" बाईंच्या बोलण्याला दोघांनी होकार दिला.

शाळा सुटली अन सगळे सजावटीच्या तयारीसाठी वर्गात जमले. कामाची वाटणी झाली आणि सगळ्यांचे कुंचले रंगात बुडून गेले. चिन्मयचे मात्र रंगसंगतीत लक्ष लागत नव्हते. त्याची चोरटी नजर देविकाचा चेहेरा न्याहाळण्यात गुंतली होती.

"ए चम्या, लक्ष कुठे आहे तुझं?" मानसीने मध्येच टोकले.
"मने, तुला किती वेळा सांगितलं त्या नावाने हाक मारत जाऊ नको म्हणून?" चिन्मय करवादला. "पुन्हा म्हणून तर बघ, आईशप्पथ मार खाशील."
"ह्या, आला मोठा. परत ये मग गेम मागायला, दाखवते बरोबर. समोर दिलंय ते कर आधी. तू ना खरोखर एक नंबरचा चम्याच आहेस." मानसी तोंड वेंगाडत म्हणाली.

इतक्यात देविका चिन्मयच्या दिशेने येताना त्याला दिसली.
"कलर पेन्सिल्स आहेत का तुझ्याकडे?" तिने विचारले.
"अं... हो, हो. आहेत ना. हा घे पूर्ण बॉक्स." चिन्मय लगेच उत्तरला. त्याची नजर तिने अर्धवट पूर्ण केलेल्या चित्राकडे गेली. दोन सुबक आकाराचे मोठे हंस अन मागे निळाशार समुद्र. चित्र खरोखरच देखणे बनले होते.
"काय मस्त चित्र आहे! एकदम कडक." चिन्मयची उस्फुर्त प्रतिक्रिया आली.
"खरंच का? थँक्स, बरीच मेहेनत लागलीय हे पक्षी काढायला." देविका हसतमुखाने म्हणाली. "तुझी अजून सुरवात सुद्धा झालेली दिसत नाही. असूदे, मला निघायचंय, उद्या भेटू. बाय."
"बाय...." चिन्मय एकटक देविकाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला .

"देविका चक्क आपल्याशी हसून बोलली",नुसत्या विचारानेच चिन्मयच्या मनाला गुदगुल्या होत होत्या. देविकाची छबी त्याच्या मनात घर करून बसली होती. 'बस्स, तिच्या नजरेतआपण काहीही करून वर यायचेच'; चिन्मयने मनोमन ठरवले.
चिन्मय झुलत झुलत घरी आला, अन थेट चित्र पूर्ण करायच्या कामाला लागला. चांगली मध्यरात्रीपर्यंत जागून त्याने . शेवटी मनासारखं काम झालं आणि चिन्मयने पलंगावर मस्तपैकी ताणून दिली. मऊशार दुलई पांघरून स्वारी नकळत गुलाबी स्वप्नांच्या दुनियेत रमून गेली.

###################################################################

दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर सारेजण तयारीसाठी नव्या उमेदीने जमले. प्रत्येकजण तयारीसाठी जीव ओतून काम करत होता.एकेकाच्या कल्पनाशक्तीला काय बहार आली होती ! एकाहून एक सरस कलाकृती इथे आकाराला येत होत्या. चिन्मयचे चित्रसुद्धा सुरेख जमून आले होते.

"वा, ही झाडे तू स्वतः काढलीस? अगदी खऱ्या झाडांसारखी वाटतात." पाटीलबाई चिन्मयकडे वळून म्हणाल्या.
"होय. मी काल कार्डपेपर घरी घेऊन गेलो, बरंचसं पूर्ण झालंय."
"शाबास, छान काम झालंय. हातात कला आहे तुझ्या. " बाईंनी सर्वांसमोर कौतुक केले तसा चिन्मय लाजून चूर झाला. पहिल्यांदाच त्याची एका चांगल्या कामासाठी कोणीतरी सर्वांसमोर स्तुती केली होती. चिन्मय आनंदाने फुलून गेला.

पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पुन्हा वळून जागेवर जाताना देविकाकडे त्याने ओझरती नजर टाकली. तिच्या नजरेतली असूया त्याला लगेच जाणवली.बसल्या जागी तिने फणकारून तोंड फिरवले. 'जिच्या जवळ जाण्यासाठी चित्राचा इतका आटापिटा केला, तीच आता दूर जाते की काय?', चिन्मय कासावीस झाला. स्वतः काढलेल्या चित्राचा पहिल्यांदा इतका राग आला.
चित्र पूर्ण रंगवायला घेतलं खरं , पण त्याचं लक्ष त्यातून केव्हाच उडालं होतं. कसाबसा तासभर बसून काढला आणि चिन्मय तडक उठून घरी निघाला.

जाताना देविकाचा दुर्मुखलेला चेहरा चिन्मयच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. एकवार स्वतःच्या चित्रावर त्याने नजर फिरवली. स्वतःच्या चित्राचे कौतुक आता मनातून केव्हाच लोपले होते, आता उरला होता तो फक्त दुःस्वास. चित्राचा आणि पर्यायाने स्वतःचाही. दुसऱ्याच क्षणी त्याने चित्र टराटरा फाडले, अन त्याचे तुकडे वाटेवर भिरकावले.

###################################################################

चिन्मय जड पावलांनी सोसायटीत आला. मैदानात बरीच मुले जमली होती. एरवी त्याने दप्तर भिरकावून मैदानात धूम ठोकली असती. पण आज त्याची पावले सरळ जिन्याकडे वळली.

"अरे चिन्मय.... ","ए चिनम्या, थांब"
चमकून चिन्मय मागे वळला. समीर आणि आलोक धावत त्याच्या दिशेने येत होते.
"काय रे, आज खेळायला नाही येणार ?"
"नाही बाबा, आज मूड नाहीये माझा."
"ए चिन्मय, आज नाटकं नकोत हां. अजितने नवीन फुटबॉल आणलाय, टीममध्ये एकजण कमी पडतोय. चल लवकर."
दोघांनी चिन्मयला जवळजवळ ओढतच मैदानात नेले.
.
.
.

"सी विंगवाल्यांना कसला धुतलाय आपण. आजची मॅच एकदम सॉलिड होती". समीर कट्ट्यावर बसत म्हणाला.
"हा ना यार. चिन्मय आणि तुझे ४-४ गोल झाले एकदम. सी विंग तर आख्खी झोपवली आपण. साले,शेवटी शेवटी असले रडत होते एकेक कॉर्नर किक साठी. काय चिनम्या, मजा आली ना?" .
चिन्मय हसला. "हा भाई. आज जाम एन्जॉय केली मॅच".

चिन्मयची कळी खुललेली पाहून दोघांना हायसे वाटले. एकाएकी समीर कपडे झटकत सावरून उभा राहिला. आलोक आणि चिन्मय 'याला कसला झटका आलाय एकदम?' या अविर्भावात त्याच्याकडे पाहू लागले.
तिघांनी मागे वळून पहिले. समोरून अक्षता येत होती.
अक्षता ! घाऱ्या डोळ्याची, लांबसडक वेण्यांची, तोऱ्यात चालणारी परीच जणू. समीर एकटक तिच्याकडे पाहत राहिला. जवळून जाताना अक्षता अन समीरची नजरानजर झाली, क्षणभरच. अक्षताच्या ओठावर अलगद हसू उमटले. बस्स,इतक्यानेच समीर जागच्या जागी थिजून राहिला. झटक्यात तिने मान वळवली, अन झपाट्याने घराकडे चालती झाली. समीर मंतरल्यासारखा तिच्या दिशेने डोळे लावून पाहत होता . चिन्मय आणि आलोक दोघेही आ वासून समोर काय घडतंय ते पाहत राहिले.

"ओ साहेब, शो संपला. आता तरी इकडे बघा". चिन्मय समीरला चिडवत म्हणाला.
"ए हा बघ. टमाट्यासारखा लाल लाल झालाय." आलोक चिडवण्यात सहभागी झाला.
"काहीतरी काय.पण काय स्माईल देते मला, बघितलं ना?" समीरने औत्सुक्याने विचारले.
"आता तू माकडासारखी पोझ दिल्यावर दुसरं काय होणार?" आलोक आणि चिन्मय समीरची खेचण्याची एकही संधी सोडत नव्हते.
"जळा तुम्ही साल्यांनो." समीर लटके रागावत म्हणाला. "उद्या व्हॅलेन्टाईन्स डे आहे. तेव्हा बघा दाखवतो तुम्हाला."
"आईशप्पथ, म्हणजे तुमचं आधीच जुळलं काय?" आलोक चमकला.
"नाही रे, अजून नाही. उद्या व्हॅलेन्टाईन्सला गुलाब द्यायचा प्लॅन आहे. पण हे बाहेर कुठे बोंबलू नका, पाया पडतो तुमच्या." समीर अजीजीने म्हणाला.
"जशी तुझी इच्छा, बालका." आलोक आशीर्वाद देण्याचा अविर्भाव आणत म्हणाला. चिन्मय अन समीर ते ध्यान पाहून पोट धरून हसत सुटले. न राहवून आलोकसुध्दा त्यांना सामील झाला.
"बरं बाबा, आपण नाही बोलणार. पण आता बघूच साहेब काय दिवे लावतात पुढच्या आठवड्यात. ए चला, अंधार खूप झालाय. मी निघतो." आलोक काढता पाय घेतला.
"चला, मी पण निघतो." मागोमाग चिन्मय घराकडे निघाला.

'आपण पण देविकाला गुलाब दिला तर?' चिन्मयच्या डोक्यात पुन्हा देविकाचा विचार घोळू लागला. आजचा चित्राचा प्लॅन काय तितका जमला नाही. व्हॅलेंटाईन डे ची संधी चांगलीय. शाळेच्या बाहेर ५ मिनिटावर मोठी बाग आहे जिथून देविका जाते. सहसा तिथे ओळखीचं कुणी नसेल, तिला मनासारखं भेटता येईल. चिन्मयचा देविकाला भेटण्याचा विचार पक्का झाला.

###################################################################

आज चिन्मय शाळा सुटायची आतुरतेने वाट पाहत होता. शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे सजावटीच्या तयारीसाठी थांबायचा, पण आज थेट बागेकडे धाव घेतली. बागेत पोहोचल्यासरशी त्याच्या लक्षात आले की आपण गुलाब घ्यायचा विसरलोय. घाईघाईत नजर फिरवताना एक फुलांचे दुकान त्याला दिसले.

"मावशी, गुलाब आहेत का?"
"हे काय इथे आहेत, बघ कुठला पाहिजे तो. "

जेमतेम ४-५ न उमललेली गुलाबाची फुलं समोरच्या परडीत होती. फुलं कसली, कळ्याच त्या. पाकळ्या आपल्या सभोवती लपेटून अलगद परडीत पहुडल्या होत्या. चिन्मयला एकसुद्धा आवडली नाही.

"मावशी, ह्यांच्या पाकळ्या तर मिटलेल्या आहेत. दुसरे गुलाब नाहीत?"
"लेकरा, आज सगळे गुलाब पटापट संपले बघ. हे एवढेच उरलेत. अन हे बी जवळजवळ फुललेत की. घरी ने आणि थोडा वेळ पाण्यात ठेव, सगळ्या पाकळ्या फुलतील बघ."

चिन्मयने जवळपास नजर टाकली. दुसरे कुठलेच दुकान नजरेस पडत नव्हते. 'मिटलेला तर मिटलेला, गुलाब हवाच' म्हणून चिन्मयने त्यातल्या त्यात एक छानसा गुलाब निवडला. मावशींच्या हातावर पैसे टेकवले, आणि धावत बागेच्या समोर गेला. हातातला गुलाब त्याने मागच्या खिशात सहज दिसू नये असा ठेवला.

"ए चम्या", मानसीची हाक चिन्मयच्या कानावर पडली.
'ही इथे काय करतेय?' म्हणून चमकून त्याने मागे पहिले, पण रस्ता जवळपास रिकामा होता. आजूबाजूला नजर फिरवली , पण मानसी दिसली नाही. मनाचा भास असावा, त्याने स्वतःची समजूत काढली. तो देविकाची वाट पाहण्यात गुंतला.

फार वेळ वाट पाहावी लागली नाही. मिनिटभरातच देविका बाजूच्या रस्त्याने येताना दिसली.

"हाय देविका." चिन्मय आवाजात शक्य तितकी सहजता आणत म्हणाला.
"हाय. " देविकाने कोरडेपणाने उत्तरली. "आज इथे कसाकाय?" तिने विचारले. चिन्मय थोडा बावचळला.
" हा ते..मित्राला भेटायला आलो होतो." चिन्मयने कशीबशी वेळ मारून नेली. मिनिटभर कोणीच बोलेना.
"ए, तुझं ते चित्र रंगवून झालं?" शेवटी चिन्मयनेच तोंड उघडलं.
"नाही, अजून थोडं उरलंय." देविका काहीशा थंडपणे म्हणाली.
भेट हळूहळू कंटाळवाणी होत होती. दोघे न बोलता फक्त चालत राहिले. एक एक क्षण जणू तासासारखा जात होता. दोघांमधला अबोला चिन्मयला शेवटी असह्य झाला.
उसनं अवसान आणून तो म्हणाला, "देविका, मला .... " चिन्मयचे शब्द त्याच्या तोंडातच अडकले.

चिन्मयकडे पाठ फिरवून देविका धावत तिच्या मैत्रिणीकडे जात होती.
"बाय...." चिन्मय स्वतःशीच म्हणाला.

चिन्मयचं हृदय पिळवटून निघालं. मनातला प्रेमाचा बहर केव्हाच ओसरला होता. देविका नजरेआड झाली अन क्षणभर त्याची नजर बागेवर स्थिरावली. हिरवाईने नटलेली झाडे, तऱ्हेतऱ्हेची फुले....आता यातलं काहीही त्याला सुखावत नव्हत. उलट तेच त्याला मनात खोलवर बोचू लागलं. विस्कटलेलं मन घेऊन चिन्मय घराकडे वळला.

###################################################################

"चम्या, ए थांब ना रे."

चिन्मयने मागे वळला, मानसी धावत धावत त्याच्याकडे येत होती.

"किती हाका मारायच्या तुला? आणि आज शाळा सुटल्यावर थांबला का नाहीस?" मानसी प्रश्नांच्या फैरी झाडायला सुरवात केली.
"आज मूड नव्हता माझा. " चिन्मय तुसडेपणाने म्हणाला.
"इतकं रागवायला काय झालं तुला ?" मानसी फणकाऱ्यानं बोलली. तेवढ्यात तिची नजर चिन्मयने मागच्या खिशात ठेवलेल्या गुलाबाकडे गेली.
"आयला गुलाब! ए तू घेतलास का रे?"

चिन्मय नखशिखांत हादरला. 'आईशप्पथ, गुलाबाचं पार विसरूनच गेलो होतो, हिला कळलं तर?? बोंबला.',चिन्मय पुरता घाबरला.

"अं.... , ते घरी आजोबांसाठी आणलाय." चिन्मयने सुचेल ते बोलून वेळ मारून नेली.
"बघू बघू, मला दाखव ना एकदा. "
"ए मने, फालतुगिरी बस हा. तुला दाखवायला नाही आणलाय तो."

चिन्मयला न जुमानता मानसीने गुलाब त्याच्या हातातून खस्सकन हिसकावून घेतला.
झटापटीत गुलाबाचा काटा चिन्मयच्या बोटात रुतला, अन बोटातून रक्ताची धार लागली.
"आई गं..." चिन्मय कळवळला. "मने, मेलीस तू आता ..."

मानसीच्या चेहेऱ्यावरचे मिश्किल भाव झरझर काळजीत बदलले.
"सॉरी चम्या, सॉरी..चुकून झालं. मला तुला दुखवायचं नव्हतं.. " मानसी अजीजीने म्हणाली. "एक काम करू, माझ्या घरी चल. माझ्याकडे अँटिसेप्टिक आणि बँडेजेस आहेत. तोपर्यंत जखम दाबून ठेव"
लगबगीने मानसी चिन्मयसोबत घरी आली. धावत आतल्या खोलीत गेली,अन कपाटात अँटिसेप्टिक धुंडाळू लागली.

चिन्मय तिच्या मागोमाग खोलीत आला अन समोर भान हरपून पाहतच राहिला. खोलीतल्या निळ्याशार भिंतीवर मधोमध फ्रेम लटकत होती. फ्रेममधून डोकावत होतं एक सुरेख चित्र, पूर्ण रंगवलेलं.अगदी त्याच्या मनात होतं तस्सच. दोन तुकड्यात असली तरी स्वतः चितारलेली झाडे तो सहजासहजी विसरणं शक्यच नव्हतं. चिन्मय क्षणभर हाताच्या वेदना विसरला.

"वॉव !" चिन्मयची उस्फुर्त प्रतिक्रिया आली. "मानसी, तू केलंस हे? कुठे मिळालं तुला ?"
"हो, तुझंच आहे ना! किती छान काढलेलंस! पाटील बाईंनीपण तुझं किती कौतुक केलेलं. पण मला हे रस्त्यात मिळालं, कोणीतरी फाडून फेकलं होतं. पण ते तुझ्याकडून हरवलं कसं ?"
" माहित नाही." चिन्मय गालातल्या गालात हसला.

चिन्मयने पुन्हा चित्रावर नजर फिरवली. जणू डोळे भरून तो ते मनात साठवत होता. मनात इतक्या वेळ चाललेली खळबळ आता शांत होत होती. वेदनेचा त्याला आता पूर्ण विसर पडला. एकवार पुन्हा त्याने मानसीकडे वळून पहिले. 'कधी नव्हे ते आज मानसी बिनचष्म्याची दिसतेय', चिन्मय स्वतःशी म्हणाला.
"हे बघ अँटिसेप्टिक मिळालं. चल बाहेर, बेसिनमध्ये जखम धुवून घेऊ." मानसी पुन्हा त्याला ओढत बेसिनकडे घेऊन आली.

मानसीने त्याचा हात हातात घेतला, अन चिन्मयच्या अंगातून एक गोड शिरशिरी निघून गेली. चिन्मय जागच्या जागी थबकला. गडबडीत त्यानं हात मागे घेतला.

"तुला काय झटका आला आता?" मानसीने चिन्मयकडे मान वळवली.
तिचे मोठाले डोळे चिन्मयकडे एकटक पाहत होते. चिन्मयने पुन्हा तिच्याकडे पहिले, गालांवर केसांची एक बट हलके झोके घेत होती. बस्स, तो एकच क्षण ! काळ जणू चिन्मयसाठीच एका जागी थबकला. छातीतली धडधड त्याला स्पष्टपणे जाणवत होती. जणू डोळ्यासमोरच्या चंद्रामुळे त्याच्या मनात भरती उचंबळून आली होती.

"असा काय पाहतो, खूळ लागल्यासारखा? हात दे इकडे." मानसीने स्वतःच त्याचा हात हातात घेतला, अन जखम धुतली.
"तू पण ना, एक नंबरचा चम्याच आहेस." त्याचा हाताला बँडेज बांधत मानसी म्हणाली. "दिला असता एकदा बघायला गुलाब, काय नुकसान झालं असतं तुझं?"
उत्तरादाखल चिन्मय फक्त गोडंस हसला. मलमपट्टी पूर्ण झाली. मानसीला तितक्यात काहीतरी आठवले.

"ए चम्या, आत ये. नवीन गेम आलाय माझ्याकडे. सरप्राईज आहे, ओळख बघू कुठला असेलं?"
"battlefield - ४?"
"नाही रे "
"crysis -३?"
"अंहं. तो पण नाही."मानसी भिवई उडवत म्हणाली. "जाऊदे, इथे बसून काय मजा गेम ओळखण्यात? मी आधीच install केलाय तो. चल दोघे मिळून खेळूया." मानसी लगबगीने आत गेली.

चिन्मय बाहेर बसून राहिला. मानसीचा फुललेला चेहेरा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. सहज चिन्मयची नजर समोरच्या गुलाबाकडे गेली. त्यानेच निवडलेला टपोरा गुलाब होता तो. 'मानसी आत आली तेव्हा तिने या फ्लॉवरपॉटमध्ये ठेवला असणार', तो मनाशी म्हणाला.

"ए चम्या, येतोयस ना खेळायला?" आतून मानसीचा आवाज आला.
"हो, आलो ".

जाता जाता गुलाबाकडे त्याने पुन्हा एकवार पहिले...... मिटलेला गुलाब आता पूर्ण फुलला होता ! अगदी त्याला हवा तसा.....

- विलभ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. एवढ्यात अनपेक्षित, धक्कादायक शेवट असणार्या कथाच वाचल्या माबोवर त्यामुळे ही वाचतानाही तसेच वाटत होते. पण हा शेवट गोड आणि सहज.

सुरेख Happy

दिनेशदा,ऋन्मेऽऽष, स्नेहनिल,अदिति, सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सुरवातीला जाणवले नाही, पण "ती सध्या काय करते" बरोबरची तुलना खरोखर चपलख बसतेय. Happy

मस्त !!

छानय... Happy

मयुरी, पियू, आपला अभिप्राय कळवल्याबद्दल मंडळ आभारी आहे. Wink
ती सध्या काय करते मधला प्रसंग वाटतोय >> हा प्रसंग तूनळीवर असेल तर त्याची लिंक मिळेल का? पुन्हा एकवार पाहण्याची जबरी इच्छा होतेय.

स्वप्नाली, rmd, अक्षयदुधाळ, आपल्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
कथा लोकांना बऱ्यापैकी आवडेल असं खरंच वाटलं नव्हतं, पण इथल्या प्रतिक्रियांनी हुरूप वाढला. Happy

गोड आहे गोष्ट.
फक्त गालांवर केसांची एक बट हलके झरोके घेत होती. >> झरोके हा शब्द इथे चुकीचा आहे, झोके म्हणायचं आहे का तुम्हाला?