आघात

Submitted by रेणु on 11 February, 2017 - 22:57

सकाळी सकाळी रसिकाला लगबगीने तयारी करतांना पाहून आजीने विचारलेच "आज काय विशेष ? लवकरच उठलीस ते!" "अगं , आज मम्माचा वाढदिवस नाही कां ? आज मी तिला ट्रीट द्यायचं ठरवलंय . सकाळीच सगळी तयारी करून ठेवेन आणि संध्याकाळी बँकेतून आले की बनवूया सगळं ." रसिका उत्तरली . "काय की बाई फॅड ती !" रसिकाने आजीचा टोमणा कानाआड केला आणि आवरायला घेतलं.

तिचं लग्न दोन महिन्यांवर आलं होतं , सगळेच कामात व्यस्त होते . बाबांची मांडव , कार्यालय , पत्रिका अशी धांदल होती तर आई पंगतीचा मेनू पाहुण्यारावण्याची यादी, आहेराचे सामान ह्यात गुंतलेली. आजी साग्रसंगीत विधी करण्याच्या आग्रहाची , त्यामुळे मानपानापासून भटजी- रुखवत ह्यावर तिची देखरेख! ह्या जबाबदाऱ्यांमधून थोडा निवांतपणा सगळ्यांना मिळावा, म्हणून रसिकाने वाढदिवसाचा घाट घातला होता. मोडता घालायचा प्रयन्त झाला तर तिचं "मी कुठे असणारेय पुढल्या वेळेस घरी" हे पालुपद तयार होतंच.

आजच आमंत्रण करायला तिने पहिला फोन मावशीला लावला पण ते अष्टविनायक यात्रेला गेल्याची आठवण आईने करून दिली. जवळच्याच गावात असल्याने पटकन येऊ शकणारे तेच होते. पण आता इलाज च नव्हता. शेवटी गावातल्याच आईच्या २-३ मैत्रिणींना आणि काका-काकूंना तिने आग्रहाचे आमंत्रण केले संध्याकाळी येण्याचे आणि डाळ तांदूळ मिक्सीवर वाटण्याचे काम पूर्ण करू लागली. सांबारच्या भाज्या चिरून ठेवल्या . संध्याकाळी इडली सांबर , गुलाबजामुन आणि केक असा साधासा च बेत ठरला होता.

दिवस सगळा धामधुमीतच गेला. ती एक खेडेगावातली ४-५ कर्मचाऱ्यांची छोटीशी ब्रांच होती, अजून कॉम्पुटरायझेशन होणे बाकी होते, सगळा लिखापढीचा कारभार.! लेजर्स, रजिस्टर्स अजून रेकॉर्ड रुम चे अडगळीच्या सामानात गेले नव्हते. रसिकाला बँकेत लागून ६महिनेच झाले होते, खेड्यात यायला नवे कर्मचारी फारसे उत्सुक नसत, त्यामुळे हिने मागताच तिला ह्या ब्रँच ला पोस्टींग मिळाले होते. खातेधारक ही गावातलेच , सगळाच कौटुंबिक मामला असायचा. आज रसिका लवकरच बाहेर पडली , घरी येताच तिने पुढच्या तयारीला सुरुवात केली. गोडाचे पदार्थ आटोपताच चटणी करण्याची तयारी केली, पण तिचे मन आज थाऱ्यावरच नव्हते . कशातच लक्ष लागेना, संध्याकाळच्या वातावरणाचे मळभ असेल, असे समजून दुर्लक्ष केले, पण आईच्या लक्षात यायचे ते आलेच. आईने हटकल्यावर "काही नाही गं , उगाचंच आपलं काहीतरी"असे म्हणून तिने वेळ मारून नेली. ७.३०-८ पर्यंत सगळी मंडळी आली, आणि मग मात्र मळभ दूर सारून रसिकाही त्यांना सामील झाली आईला शुभेच्छा दिल्यावर पदार्थांवर तुटून पडली सगळी तिच्या पाककलेचे कौतुक आणि तिची थट्टा ह्या खेळीमेळीच्या वातावरणात दिवस संपला.

दुसऱ्या दिवशी ब्रॅन्चमध्ये यथावकाश काम सुरु झाले , संथ गतीने दिवस सरकू लागला, आणि रसिकाला लँडलाईन वर कॉल आला. कानावर पडलेल्या बातमीने हादरलेल्या रसिकाला पाहून मॅनेजर सरांनी रिसीव्हर हातात घेतला. काल रात्री ९. ३० च्या सुमारास तिच्या मावशीच्या गाडीला अपघात झाला होता. ऐकून सगळेच सुन्न झाले. पोलीस स्टेशनमधून च फोन होता. दोन्ही भावांची कुटुंबं देवदर्शनाला गेलेली, शुद्धीवर असलेल्या धाकट्या भावाने बँकेतल्या भाचीबद्दल सांगितले म्हणून तिला पोलिसांनी फोन केला होता. "इथे ताबडतोब निघून या" एवढाच निरोप मिळाल्याने नक्की काय आणि कसे घडले काहीच कळू शकले नाही.

रसिकाला यावेळी घरी आलेलं पाहून आई बाबा घाबरले, बरोबरच्या सहकाऱ्याने हकीकत सांगितली, बातमी कळताच आई ला रडू कोसळले. बाबा सुन्नपणे बसून राहिले, रसिकाला तिच्या काल च्या अस्वस्थ मनःस्थितीचा संदर्भ आज लागत होता. अघटिताची चाहूल होती ती !!

दुसऱ्या दिवशी आईबाबा अपघाताच्या ठिकाणी पोहोचले, मावशीच्या गाडीचा ऍक्सल तुटल्याने अपघात झाला होता, गाडीने २-३ कोलांट्या खाल्या आणि रस्त्याच्या खाली उतरली. ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसलेला प्रथमेश जागीच गेला होता, आणि मागल्या सीटवर बसलेले काकाही . मावशी ला खूप लागले होते आणि प्राचीला ही . दोघींची शुद्ध हरपली होती. मावशीच्या हेवी डायबिटीस बद्दल कळण्यापूर्वीच तिच्यावर उपचार सुरु झाले, आणि ती कोमात गेली. प्राची शुद्धीवर आली. आणि तिने मावशीकडे धाव घेतली. पण जणू काही एवढ्यासाठीच मावशीचा जीव घुटमळत होता. काही काळातच मावशीने ही खरंच श्वास घेतला. एका क्षणांत होत्याचे नव्हते झाले. पोलीस, हॉस्पिटलचे कर्मचारी सगळ्यांनी आपल्या परीने प्रयन्तांची पराकाष्ठा केली, पण दैवगती ती, कशी टळावी ? १४-१५ वर्षाच्या प्राचीला घेऊन आईबाबा घरी आले. एका क्षणात लाडाकोडाची लेक पोरकी झाली होती. का झालं असं ?ह्या तिच्या प्रश्नाचे कोणाजवळ उत्तर होते. ४ जणांचं सुखी कुटुंब क्षणात उध्वस्थ झालं होतं.

लग्नघरावर औदासिन्याची अवकळा पसरली होती, रसिकाच्या सासरच्या मंडळींना हकीकत कळताच "लग्नाची तारीख पुढे ढकलावी कां ?" म्हणून त्यांनी विचारणा केली. ह्या अश्या परिस्थितीत लग्नसोहळा करणे त्यांनाही प्रशस्त वाटत नव्हते.

आजी ने पुढे होऊन निर्णय घेतला. लग्नाला अजून २ महिने अवकाश होता, तोपर्यंत सगळे सावरतील असा तिचा अंदाज होता. रूढ अर्थाने मावशीच्या कुटुंबाचे सुतक ही तर नव्हतेच नं ?पण तिच्यासारखा रोखठोक विचार करण्यासारखी मनःस्थिती कोणाची होती? आईची अवस्था बघवत नव्हती, मावशी तिची फक्त धाकटी बहीणच नव्हती, तर सखी, आधारस्तंभ, नातलग सगळंच होती. खूप उत्साही आणि हरहुन्नरी! लग्नकार्याच्या बऱ्याच गोष्टी तिच्यावरच सोपवलेल्या होत्या, काकांनीही हलवाई- पंगत ची जबाबदारी घेतली होती. कोण बघणार होते हे सगळे? कोणी कोणाला सावरायचे होते आणि कसे? त्या जीवघेण्या अपघातातून मावशीच्या कुटुंबातली एकटी प्राचीच वाचली होती, तिच्या काकाचे कुटुंब सुखरूप होते, हा ही दिलासा होता, अपघात झाल्यापासून प्राची मावशीकडेच होती, दिवस कार्यासाठी तिला गावी नेले कि ती तिकडेच राहणार हे निश्चित होते. सुन्न बसलेल्या तिला पाहिले की अगदी भडभडून यायचे. हसरी खेळकर प्राची कधीचीच हरवली होती. तिच्यावरचा आघात तिचे सर्वस्व घेऊन गेला होता.

तेराव्याला आईबाबा प्राचीला गावी घेऊन गेले, आणि विधी आटोपून परत निघाले, तोच प्राचीच्या आजोबांनी बाबांना थांबवले . आपल्या कर्त्या मुलाचे दुःख भोगणाऱ्या या जर्जर व्यक्तीची व्यथा पाहवत नव्हती. ते बाबांना म्हणाले , "बाबासाहेब, तुमचे डोंगराएवढे उपकार आहेत की तुम्ही अश्या वेळेस धावून आलात. घरातले कार्य बाजूला ठेऊन माझ्या नातीला सांभाळले. खूप खूप आभारी आहे मी तुमचा, पण माझी एक विनंती ऐकाल का? माझ्या नातीला कायमची सांभाळाल? " त्यांचा तो थरथरत्या आवाजातला प्रश्न ऐकून काय बोलावे हे न कळून बाबांनी आईकडे पाहिले . प्राचीचे सख्खे २ काका, सुखवस्तू मोठं घराणं, आजोबा स्वतः असे सगळे असताना अशी विनंती ते करत होते. बाबांना पडलेला प्रश्न जणूकाही कळल्यासारखे आजोबा म्हणाले, "कसं आहे बाबासाहेब, माझं वय आता ८० च्या पुढे, मी आज आहे उद्या नाही . तिचे काका आहेत पण कायमचे संभाळण्या एवढी माया तिला इथे मिळणार नाही. तिचे मायेने जे मावशी करेल, ते प्रेम, वात्सल्य ह्यांना ती इथे पारखी होईल. तिची जखम अजून ओली आहे, ह्या काळातच तुमच्या कुटुंबात रुळली तर ती लवकर भरून निघेल. तुमची लेक आता सासरी जाणार, देवाने तिची पोकळी भरून काढायला ही दुसरी लेकच पाठवली असे समजा अधिक काही बोललो, तर माझी गृहछिद्रे उघडी होतील" त्यांना पुढे बोलवेना. जराश्याने सावरून त्यांनी पुन्हा तीच विनंती बाबाना केली.

बाबानी एक कटाक्ष आईकडे टाकला. आईविना मुलीची तिला किती काळजी वाटत होती, हे तिच्याकडे पाहूनच कळत होते. पण आपल्या कर्मठ जुन्या विचारांच्या सासूला हे आवडणार नाही हे जाणून ती माउली गप्प होती. ह्या १०-१२ दिवसातच तिला आगंतुक सल्ले मिळू लागले होते. "तिला काकां कडे पोहोचावा", "होस्टेलवर राहील ती", "तुम्ही नका ही जबाबदारी घेऊ" एक ना दोन..

व्यवहारी जगाला "तरुण मुलगी" ही जबाबदारी कळत होती, पण तिच्यावरच्या प्रसंगातून माणुसकीचा बोध घ्यायची इच्छा नव्हती, सहानुभूतीचे कढ ओसरल्यावर हे लचांड वाटत होते. दुटप्पी जगाचे अनुभव मिळत होते. अश्या जगात तिला एकटे सोडणे आईला कसे शक्य होते?

प्राचीला सोबत घेऊन आईबाबा घरी परतले. तिघांना दारात पाहून आजी काय समजायचे ते समजली. स्वतः ती देखील लहानपणापासून नातेवाईकांच्या आधाराने वाढली होती, पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने तिला त्याचा विसर पडला होता. आताच्या काळातली आव्हानं , प्रलोभनं आणि आतापर्यंतचे झालेले लाडाकोडाचे संगोपन ह्यामुळे तिला प्राची ला सांभाळणे कठीण वाटत होते. पण आई ने ठामपणे सासूला सांगितले "आता ही माझीच लेक." आजीचा उरलासुरला विरोध ही लेकाचा बायकोला असलेला पाठिंबा पाहून मावळला आणि प्राची एका नव्या कुटुंबाची सदस्य झाली. एका जाणत्या नांदत्या घराने तिला आपले मानले होते. मात्र ती आता कसे जुळवून घेते ह्याचीच चिंता होती.

बघता बघता महिना उलटला, इतक्या लहान वयात नियतीने केलेला हा आघात प्राचीने फार हिमतीने झेलला. रुळली हळू हळू. लग्नाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. प्राचीने त्यात हिरीरीने भाग घ्यायला सुरुवात केली आणि सगळ्या घराने सुटकेचा निश्वास टाकला.
गावातल्या हायस्कुलमध्ये प्राचीची १०विची ऍडमिशन झाली, मार्चमध्ये परीक्षा होती ना तिची !

Group content visibility: 
Use group defaults

खुपच छान आहे कथा...
पन ताइ मी पण याआधी हि कथा एथेच माबोवर वाचलिये अस वाटतय....

धन्यवाद, आदिती, मानव जी, सपना, कावेरी आणि मयुर.
कथा ह्या आधी "मैत्रीण" वर टंकली आहे, क्रमशः होऊ शकते.
पुढचा भाग अजुन कागदावर उतरवला नाहीये.

कथा आवडली.
क्रमशः वाटली नाही, शेवट वाचकांवर सोडल्यासारखं वाटलं !

कथासूत्र चांगले सुचले आहे आणि लिखाण शैली पण चांगली आहे. पण मांडणी थोडी गडबडली आहे असे वाटले. सुरवातीला रसिकाभोवती फिरणारी कथा शेवटी प्राची भोवती घुटमळत थांबते. म्हणजे सुरवातीला हिरॉईन कतरिना आणि शेवटी हिरॉईन करीना?

तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे , इनामदार जी. पण माझा हा पहिलाच प्रयत्न असल्याने तेव्हा लक्षात नाही आले. पण म्हणूनच क्रमशः कथा लिहीत रहावे असे वाटतेय. मग दोघींना न्याय मिळेल .