आस

Submitted by अमोल परब on 10 February, 2017 - 12:36

पावसाळ्या रात्री, अंधारात त्या घरात कधीपासून त्या दोघांत नुसती झटापट सुरु होती. अचानक विजेच्या लखलखाटात त्याच्या हातातली त्याने उगारलेली लोखंडाची सळई चमकली आणि पुढच्याच क्षणाला त्या बंगल्यात एक आर्त किंचाळी घुमली.

आता सगळं शांत झालं होतं. त्याच्या हातातली सळई जमिनीवर गळुन पडली. तो बधीरपणे तिच्या निश्चल कलेवराकडे पहात होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरु होती. तो मटकन गुडघ्यावर बसला आणि तिच्याकडे पहात रडायला लागला.

******************************************************************************

डिलाईड रोडच्या चाळीत चिराग आणि निलाक्षी लगबगीने जीना चढत होते. आज त्यांना ज़रा जास्तच उशीर झाला होता. आजची संध्याकाळ सार्थकी लागली ह्याच समाधानात चिराग होता तर आता घरी पोहचल्यावर उशीर झाल्यामुळे माई-अप्पा काय बोलतील ह्याचा विचार निलाक्षी करत होती. आपापल्या विचारात गुंग असताना ते दोघे घराच्या दारात कधी येउन उभे राहिले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. चिराग आणि निलाक्षी नुकतेच घराच्या आत येतच होते की,

"ही काय वेळ झाली घरी यायची? हे बघा आमच्या घरात ही असली नाटक चालणार नाहीत. चिराग तुला आत्ताच सांगुन ठेवतोय आणि हे तुझ्या बायकोलाही समजावून ठेव. काय माहीती कुठुन ही ब्याद घरी घेउन आलाय. जेव्हा पासून या घरात आलीय तेव्हापासून अवकळा आलीय" बाबांनी असं बोलताच चिरागला परिस्थितीच गांभिर्य जाणवलं.

चिराग शिंदे एक साधा सरळ माणुस. कल्याणला एका कंपनीत अंकाउटंट म्हणून कामाला होता. गरजेपुरतं शिकून लगेच मिळालेल्या पहिल्याच नोकरीला चिकटला होता. आपल्या मोठ्या मुलासारखा अजिबात कर्तुत्व नसलेल्या ह्या आपल्या लहान मुलाबद्दल अप्पा कधीच समाधानी नव्हते. भरीसभर म्हणुन ह्या छोटया शिंद्यांनी निलाक्षी नावाच्या गुजराती मुलीशी प्रेमविवाह करून अप्पांसह आता माईचाही रोष ओढवुन घेतला होता. घरातल्या घरात दोन गट झाले होते चिराग-निलाक्षी आणि बाकीचे सगळे.

घरच्यांचा विरोध पत्करून आपण हे लग्न केलेल असलं तरी थोड्या दिवसांनी होइल सगळं ठीक होईल. एक ना एक दिवस ही सगळी परिस्थीती बदलेल व घरचे आपल्याला स्विकारतील ह्या निलाक्षीच्या आशेवर घरातल्या कटकटींना वैतागलेला चिराग दिवस काढत होता. पण दिवसे न दिवस परिस्थिती बिघडत चालली होती आणि आज तर हद्दच झाली होती. अप्पांनी निलाक्षीचा उल्लेख ब्याद म्हणुन केला होता आणि हिच गोष्ट चिरागला फार लागली होती. तो आतल्या आत खुप धुमसत होता. आजच्या प्रकारानंतर इतक्या दिवसापासून त्याच्या डोक्यात घोळत असलेला वेगळं रहायचा निर्णय आता पक्का झाला होता.

रात्री त्याने निलाक्षीला जवळ घेउन तिची समजूत काढली. ह्या घरात आल्यापासून फार बावरली होती बिच्चारी. नव्या नवरीचं कौतुक तर जाउद्या पण एकाच घरात राहून तिच्याशी कुणी बोलतही नव्हतं. त्याने आपला वेगळीकडे रहायचा मनसुबा तिला सांगितला.

पण निलाक्षी ह्या गोष्टीला तयार नव्हती. तिने पुन्हा चिरागला समजावून पाहिलं. थोड्या दिवसाची अनबन आहे. आपण धीर सोडता कामा नये, माई-अप्पांना काय वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला परवडणार आहे का?

चिरागला तिचं म्हणणं पटत होतं पण त्याचा निर्णय आता पक्का झाला होता. त्याने उदयाच्या उदयाच एका इस्टेट एजंटला गाठायचं ठरवलं.

******************************************************************************

चिरागने मुद्दामुनच आपल्या ऑफिस जवळच्या एका इस्टेट एजंटला पकडला. चिराग त्याच्या ऑफिसमधे जाताच त्या इस्टेट एजंटने त्याचं तोंडभरुन स्वागत केले. थोडी जुजबी चौकशी उरकल्या नंतर त्या इस्टेट एजंटला चिरागने आपली घराबाबतची अपेक्षा सांगितली. पण चिरागने आपलं बजेट सांगताच तो एजंट फार जोरात हसु लागला. त्याच्या त्या हसण्यासरशी चिरागला आपल्या आर्थिक दुर्बलतेची फार प्रखरतेने जाणीव झाली. पण त्याच्याकडे आता काही दूसरा पर्याय नव्हता. तो खजील होउन गुपचुप उठून चालायला लागला.

"रुकिए साहब, कहा चले????"
पाठीमागून त्या इस्टेट एजंटने त्याला हाक मारली.

"आपके बजट के अनुसार एक जगह है हमरे पास..लेकीन वह बदलापुर में है. और स्टेसन से थोडा दूर भी.......चलेगा????"

एजंटच्या ह्या बोलण्यावर चिराग विचार करू लागला.

"अभी बंबई में सबकुछ तो अपने हिसाबसे नही मिलता" चिरागला विचार करताना पाहून तो एजंट लगेचच म्हणाला.

तस त्या एजंटच म्हणणं देखिल बरोबरच होतं म्हणा. नाहीतरी आपल्या तुटपुंज्या बजेटमधे सगळंच काही आपल्या मनासारखं मिळणार नाही ह्याची जाणीव चिरागलाही होती.

"कब जायेंगे वो घर देखने?" थोडावेळ स्वत:शी विचार करून चिरागने  विचारलं.

"आप कहे तो ते आनेवाले इतवार को चले?" एजंटने असं विचारताच चिरागने मान डोलावली.

चिराग मनोमन सुखावला. निदान  सुरुवात तरी चांगली झाली होती. आता पुढचंही व्यवस्थित मार्गी लागेल असा चिरागला विश्वास वाटु लागला.

चिरागने त्याच रात्री निलाक्षीच्या कानावर आजची घडलेली गोष्ट घातली आणि जर का सगळं काही ठीक असेल तर आपण ते घर नक्की घेउ हा मनसुबाही सांगुन टाकला. खरतर निलाक्षीला चिरागचा हा आततायीपणा मनातून पटला नव्हता. पण चिरागच्या चेहरयावरचा आनंद पाहून ती त्याला काही बोलली नाही.

******************************************************************************

रविवारचा दिवस उजाडला. चिराग आणि  निलाक्षी दोघेही बदलापुर स्टेशनच्या बाहेर त्या एजंटची वाट पहात उभे होते. दहा पंधरा मिनिटातच तो एजंटही त्याची गाडी घेउन तिथे पोहचला. तिघेही आता त्या घराच्या दिशेने जाऊ लागले.

चिराग एजंट सोबत गाडीत पुढे बसला होता आणि निलाक्षी मागे बसली होती. चिरागला वाटला होता त्यापेक्षा तो एजंट ज़रा जास्तच बडबड्या होता. गाडीत बसल्यापासुन त्याच्या तोंडाची टकळी सुरु होती.

एजंटने अगोदर जरी कल्पना दिली होती तरी ते घर स्टेशनपासून खरच बऱ्यापैकी लांब होत हे चिरागला आता जाणवलं होतं. गाडीत बसून आता वीस मिनिट होत आली होती. तरी अजुन त्या घराचा पत्ता नव्हता.

थोडयाच वेळात आजूबाजूची जाग संपली आणि रस्त्याचा एकटेपणा चिरागला जाणवू लागला. तो बावरुन बाहेर बघू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखुन तो एजंट लगेच म्हणला
"आप चिंता न किजिए. जल्द ही यहाँ बाकी बिल्डिंग का बी काम शुरू होनेवाला है."

गाडी आता मुख्य रस्त्याला सोडुन एका कच्च्या रस्त्याला लागली. पाच दहा मिनिटानंतर उजव्या हाताला झाडीच्या मागे चिरागला एक घर दिसू लागलं. आजुबाजुच्या गर्द झाडीत ते कौलारू घर उठून दिसत होतं.

पुढच्याच क्षणाला घराच्या लोखंडी गेटसमोर ते तिघे उभे होते. तो एजंट त्या घराची चावी त्याच्या खिश्यात शोधत होता. तोवर चिराग आजूबाजुचा परिसर न्याहाळत होता.

चिरागने अंदाज बांधला होता त्यापेक्षा ते घर बऱ्यापैकी मोठ होतं. घर कसलं एक चांगला बंगली होती ती.

एकमजली....
आणि तीही अंगणासकट.

आपल्याला हे एव्हढं मोठं घर परवडणार आहे काय? साल्याने आपली चेष्टा केलेली दिसते हां विचार चिरागच्या मनात आला.

इतक्यात त्या लोखंडी गेटच्या कुरकुरीने चिराग भानावर आला. बरीच शोधाशोध केल्यावर अखेर घराची चावी त्या एजंटला सापडली होती.

ते सगळे घराकडे चालु लागले. अंगणात थोडे तण माजले होते. पण साफसफाई केली तर अंगण बऱ्यापैकी मोठं झालं असतं. त्या अंगणात एक मोठं गुलमोहराचं झाड होतं. त्याच्या भवती एक मोठा पार बांधला होता. पण अंगणात हे एक झाड सोडता दुसरं कुठलचं झाड नव्हतं. असो आपणं लावू बाकीची झाडं मग ह्या अंगणाचा रुबाब अजुन वाढेल. ह्या विचारासरशी चिराग मनोमन खुश झाला. चिरागसारखी निलाक्षीलाही झाडांची आवड होती. आपल्याप्रमाणे तिलाही हे अंगण नक्कीच आवडलं असणार, तिची प्रतिक्रिया काय आहे हे जाणुन घेण्यासाठी त्याने तिच्याकडे पाहिलं. तर ती भारावून त्या घराकडे आणि आजुबाजुला पहात होती.

"यह देखिए आपका राजमहल" तो एजंट घराचे दार उघडत म्हणाला. चिराग आणि निलाक्षी ओसरीवरच उभे होते.

एजंटच्या मागोमाग ते दोघे आत गेले. घरात अंधार होता. पण थोड्याच वेळात त्यांची नजर त्या काळोखाला सरावली. त्या एजंटने आत जाऊन फ़टाफ़ट सगळे दरवाजे आणि खिडक्या उघडल्या. आता त्या घरात चांगला उजेड पसरला.

तो एजंट चिराग आणि निलाक्षीला सगळ्या खोल्या एक एक करून दाखवत होता. दार उघताच मोठा हॉल त्याला लागुन असलेलं स्वयंपाक घर. मग घराचे मागचे दार. खाली स्वयंपाकघर आणि हॉलला लागुन असलेली टॉयलेटची सोय. घरातले स्वयंपाक घर बघून तर निलाक्षी जाम खुश झाली. त्यांच्या डिलाईड रोडच्या घराच्या हॉल इतकं तर ह्या घराचे स्वयंपाकघर होतं.

त्या हॉलमधुन एक जीना वर जात होता. वरती दोन बेडरूम होत्या. एक घराच्या मागच्या बाजुला आणि एक घराच्या समोरच्या बाजुला. मागच्या बाजूची बेडरुम प्रशस्त होती. समोरच्या बाजूची ही अगदी तशीच पण अटेच टॉयलेटवाली.....मास्टर बेडरूम. ह्या बेडरुमच्या खिडकीतुन समोरचे अंगण आणि त्या अंगणातला गुलमोहर दिसत होता.

घरात काही सामान पुर्वीपासुनच होतं. जसे कपाटं, मोठे बेड, खाली हॉलमधला सोफा आणि खुर्च्या. त्यामुळे नवीन सामानाचाही बराचसा खर्च चिरागचा वाचणार होता.

चिरागला घर आवडलं होतं. तो घरात पुन्हा एकदा फिरुन आला. थोड रंगकाम केलं तर ह्या घराचा मुळचा देखणेपणा अजुन खुलुन येईल ह्याची खात्री चिरागला झाली. त्याने एक नजर निलाक्षीकडे पाहिलं तर तिलाही हे घर आवडलेलं आहे हे त्याला जाणवलं.

इथे वीज, पाणि वगैरेची सोईची खातरजमा करून ते तिघेही परतीच्या प्रवासाला लागले. चिरागचा ते घर घ्यायचा विचार जवळपास पक्का झाला होता. एक स्टेशनपासूनच अंतर सोडता बाक़ी काही कमी नव्हतं त्या घरात. त्याने निलाक्षीकडे पाहिलं तीही खुप खुश दिसत होती.

******************************************************************************

पुढच्याच आठवड्यात व्यवहार पक्का झाला. समोरच्या पार्टीनेही चिरागने सांगितलेल्या किमतीला फारशी घासाघीस न करता लगेच होकार दिला. त्यांना US ला जायच असल्याने ते घाईत होते आणि हीच घाई नेमकी चिरागच्या पथ्यावर पडली होती.

कुणा अनंत करमरकर नावाच्या माणसाचं घर होतं ते. चिरागने त्याच्या भावाला, विष्णु करमरकरला टोकन दिलं.अनंत करमरकर US ला स्थाईक असल्याने त्यांच्या वतीने सगळे व्यवहार कायादेशीररित्या तोच पहात होता. चिरागला तो फारच शिष्ट वाटला. चिरागशी तो फ़क्त गरजेपुरतचं काय ते बोलला. बेंकेचा व्यवहारही त्या एजंटच्या ओळखीमुळे लगेचच मार्गी लागला आणि घर बघून आल्यापासून, मोजुन पंधराव्या दिवसाला चिराग आणि निलाक्षी त्या घरात राहिला आलेदेखिल.

नवीन घरानिमित्त चिरागने छोटेखानी पार्टी ठेवली होती. मोजकेच लोकं त्या पार्टीला आले होते. निलाक्षीचे मामा मामी आणि काही जवळची मित्रमंडळी. माईअप्पा आणि दादा नाही आले. 

******************************************************************************

ती रात्र अगदी पहिल्या रात्रीसारखी चिरागने साजरी केली. सुखाच्या ग्लानीत दोघे असताना अचानक रात्री कश्यानेतरी त्याची झोप चाळवली. तो हळूच उठला. त्याने पाहिलं तर समोरच्या खिडकीची तावदानं वाजत होती. त्या खिडकीतुन त्याला अंगणातला गुलमोहर दिसत होता. रात्रीच्या वेळेस तो अजुनच गुढ वाटत होता. त्याची सळसळ फार वाढली होती. त्याच्या त्या सळसळीने चिरागच्या अंगावर काटा आला. इतक्यात त्याला बाहेरुन कंपाउड्च्या गेटची कुरकुर ऐकू आली. तो उठून ती तावदानं बंद करायला खिडकीत आला. त्याने पाहिलं, बाहेर तसा बऱ्यापैकी वारा सुटला होता. आजुबाजुचा परिसर कमालीचा शांत होता. त्या गडद शांततेच्या पार्श्वभूमीवर त्या गुलमोहराची होणारी ती सळसळ फार विचित्र वाटत होती. चिराग ह्या सगळ्याचा विचार करत असतानाच, एकदम अचानक सगळं शांत झाल. तसा चिराग गोंधळला.

एकाएकी वारा पडला. समोरचा गुलमोहरही अगदी स्तब्ध उभा होता. चिरागला हे सगळं काय चाललं आहे हे कळतंच नव्हतं. तेव्हढ्यात एका विशिष्ट आवाजाने त्याचं लक्ष वेधून घेतलं.

काहीतरी घासल्याचा आवाज येत होता. जणु कुणितरी भिंतीवर ओरखडे काढत आहे असं वाटतं होतं. त्या आवाजाचा अंदाज घेता तो आवाज 
खालच्या बाजूने येत होता. त्याने आवाजाच्या दिशेने वाकून पाहिलं.

आणि तो सटपटला.

खाली एक बाई भिंतिवर पालीसारखी चढायचा प्रयत्न करत होती. तिला पाहून चिराग किंचाळणारच होता, पण भितीने त्याच्या तोडुंन शब्दच बाहेर पडत नव्हते. चिरागला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याने चेहरयावरून दोनदा हात फिरवला.

अचानक ती बाई थांबली. बहुतेक तिला चिरागची चाहुल लागली होती. तिला असं थांबलेल पाहून चिराग मनातून चरकला. तिने मान वर केली तिच्या चेहरयावर तिचे केस पसरलेले होते. त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. तिने चिरागकडे एकदा इकडे आणि एकदा तिकडे अशी तिरकी मान वळवुन पाहिलं. ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. जणुकाही ती त्याला आजमावत होती. तिला असं आपल्याकडे एकटक पहात असलेलं पाहून चिराग खुप घाबरला होता. एक दोन क्षण गेले असतील की त्या बाईने चिरागच्या दिशेने भिंतीवर चढण्यासाठी झडप घेतली.

आणि.............

चिराग झटक्यात उठला. त्याचं पूर्ण अंग घामाने भिजलं होतं. त्याने घाबरून आजुबाजुला पाहिलं तर बाजुला निलाक्षी काळजीने त्याच्याकडे पाहत होती.

"काय झालं काही स्वप्न वगैरे पडलं का?" निलाक्षीने त्याच्या कपाळावरचा घाम पुसत त्याला विचारलं.

एव्हाना चिराग सावरला होता. मगाशी आपण जे पाहिलं ते एक स्वप्न होतं हे जाणवुन त्याला हायसं वाटलं होतं. त्याने खिडकीकडे पाहिलं तर खिडकीची तावदानं शांत होती. तिच्यातून बाहेरचा गुलमोहर दिसत होता.

 

शांत.....

दुसऱ्या दिवशी सकाळीदेखिल चिराग त्याला काल रात्री पडलेल्या त्या स्वप्नाचाच विचार करत होता. ती बाई अजुनही त्याला त्याच्या नजरेसमोर दिसत होती. त्या बाईची आठवण होताच चिराग नखशिखांत शहारला. त्याने लगेच तो विचार मनातून काढुन टाकत अंथुरणातुन बाहर पडला.

निलाक्षीचा निरोप घेउन चिराग घराबाहेर पडला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मुख्य रस्त्यावरून त्याला स्टेशनला जाणारी एक शेअर रिक्षा मिळाली. बदलापुरवरुन त्याच कामाच ठिकाण त्याच्या जुन्या घरापेक्षा जवळ होत. ट्रेनचा उलटा प्रवास असल्याने गर्दी नव्हती आणि ह्याचाच त्याला फार आनंद झाला होता. आज चार दिवसाच्या सुट्टीनंतर तो कामावर रुजू होत होता. डोंगरा एव्हढं काम पडलं होतं पण तरीही आज त्याच कामात लक्ष नव्हतं. राहून राहून त्याला सारखा निलाक्षीचा विचार येत होता. नाही म्हटलं तरी ते घर फारच आडबाजुला होतं. आजुबाजुला नवीन डेव्हलपमेंट होणार आहे असं तो एजंट सांगत तर होता पण सध्यातरी अजुन तिथे तस काही होईल अस वाटतं नव्हतं. आपण एक फोन घ्यायला पहिजे. त्या आडभागात आपल्याला गरज आहे. कसाबसा दिवस काढुन चिराग लगेच घरी जायला निघाला.

परत येताना त्याला जाणवलं की सकाळी घरून स्टेशनला येणं एकवेळ सोप्प आहे पण संध्याकाळी स्टेशनवरुन घरापर्यंत जाणं महाकठीण. तो रस्त्याच्या कडेला हातात पिशव्या धरून घरी जायला काही साधन मिळतय का ते पहात होता. सरतेशेवटी तर कुणी लिफ़्ट देतय का ह्या आशेवर होता. बराच वेळ पिशव्या पकडून चिराग उभा असल्यामुळे त्याचे हात आणि पाय दोन्ही वळले होते. जसजसा अंधार वाढु लागला तसतशी त्याला निलाक्षीची काळजी वाटु लागली. तो आपल्या विचारात गुंग असताना त्याच्या समोर कुठलीतरी गाडी येउन थांबली.

त्याने नजर वर करून पाहिलं तर त्याच्या समोर एक रिक्षावाला येउन थांबला होता. चिरागने त्याच्याकडे पाहिलं तर तो त्याला थोडा विचित्र वाटला. त्या रिक्षावाल्याची नजर तांबारलेली होती आणि तोंडाला विचित्र वासही येत होता.

"हाय-वे ला चाललोय तुम्हाला कुठं सोडायचं आहे का?" त्या रिक्षावाल्याने चिरागला विचारलं.

खरतरं चिरागला त्याच्यासोबत जायचं नव्हतं पण सध्या त्याच्याकडे दूसरा काही पर्याय नव्हता. चिराग मान डोलावुन निमुट त्या रिक्षात बसला.

तो रिक्षावाला स्वत:च्या धुनकीत होता. त्याची असंबध्द बडबड चालु होती. मधेमधे तो चिरागला प्रश्न विचारून हैराण करत होता. त्याच्या बोलण्यातुन त्या रिक्षावाल्याचे नाव सदु म्हात्रे होते हे चिरागला समजले.

चिरागची अवस्था 'अडला हरी, गाढवाचे पाय धरी' अशी झाली होती. कधी एकदा घर येतय अस त्याला झालं होतं. अखेर चिरागला हवा असलेला फाटा आला. त्याने रिक्षा थांबवायला सांगितली.

"किती झाले?" त्याने त्या रिक्षावाल्याला विचारलं.

"राहु दे रे दादा...." रिक्षावाल्याच्या ह्या अनपेक्षीत उत्तराचे चिरागला नवल वाटले.

चिरागने पुन्हा त्याला भाड्याच्या पैश्याबद्दल विचारले. पण तो नाहीच म्हणत होता. अखेर चिराग तिथून निघाला. तेव्हढ्यात पाठीमागुन त्या रिक्षावाल्याचा आवाज आला.

"तू इथे रहातो काय?"

"हो" चिराग उत्तरला

"एकटाच???" त्याने पुन्हा प्रश्न केला.

चिरागने काही उत्तर दिलं नाही. तो तडक त्याच्या घराच्या दिशेने चालू लागला. पाठीमागून रिक्षा सुरु झाल्याचा आवाज आला नाही म्हणुन त्याने मागे वळुन पाहिलं तर तो रिक्षावाला अजुन तिथेच उभा होता. चिराग त्याच्याकडे एकवार पाहून लगेचच आपल्या वाटेला लागला.

******************************************************************************

चिराग घरी पोहचला तेव्हा संध्याकाळ उतरणीला लागली होती. घराच्या छताच्या वरती चुकुन रेंगाळलेला संधीप्रकाश त्याला घरी यायला बराच उशीर झालाय ह्याची जाणीव करून देत होता. अश्या कातरवेळी ते घर त्या एकांत परिसरात फारच एकाकी वाटत होतं. त्याने हलकेच कंपाउंडच्या लोखंडी गेटला धक्का दिला. उघडताना होणारी त्या गेटची करकर चिरागच्या अंगावर एक करकरीत शहारा उठवुन गेली.

त्याने पुन्हा एकदा घराकडे पाहिलं, तेव्हा चिरागला काहीतरी खटकले. बाक़ी सगळं ठीक होतं पण त्याला एक गोष्ट समजत नव्हती की, बाहेर बऱ्यापैकी अंधारुन आलेलं असतानाही घरातले दिवे मात्र अजुन का लागले नव्हते?

तो ओसरी ओलांडून दारापाशी आला. तो दार ठोकणार इतक्यात, त्याला त्याच्या पाठीमागे गुलमोहराची झालेली सळसळ स्पष्ट ऐकू आली. त्याने मागे वळुन पाहिलं तर तो गुलमोहर त्याच्याकडेच बघतोय असा त्याला भास् झाला. त्या गुलमोहराकडे पहाताना, त्याची ती सळसळ ऐकताना, चिरागला त्याचं कालच ते स्वप्न आठवलं. त्या स्वप्नातली ती बाई आठवताच भितीची एक थंड लहर त्याच्या अंगातुन शिरशिरत गेली. तो घाबरून पुन्हा दाराकडे वळला. त्याने पटकन दार ठोठावलं. त्याच्या ठोठावण्याच्या वेगासोबत पाठीमागे त्या गुलमोहराची सळसळ वाढली होती. त्याने पुन्हा दार ठोठावलं आणि ह्यावेळेस ज़रा जोरात........

आतून बांगड्याची किणकिण त्याच्या कानावर पडली. पुढच्याच क्षणाला दार उघडलं. तो लगबगीने आत आला. आता त्याला सुरक्षित वाटत होतं. आत हॉलमधे बराच काळोख होता. दार उघडल्यामुळे बाहेरचा संधीप्रकाश आतल्या काळोखाच्या मुजोरपणाला क्षीण प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करत होता. चिरागने त्या तुटपुंज्या उजेडात आजुबाजुला पाहिलं आणि पुढच्याच क्षणाला त्याला चक्कर आल्यासारखी वाटली.

कारण त्याने पाहिलं की निलाक्षी समोरून किचनमधून बाहेर येत होती. तो जागच्या जागी थिजला. कारण निलाक्षी जर का किचनमधे होती तर मग मगाशी दार कुणी उघडलं? आणि दार उघडण्या अगोदर दाराच्या अलिकडुन आलेला बांगड्याचा आवाज तर चिरागने स्पष्ट ऐकला होता. त्याने झटक्यात निलाक्षीच्या हाताकडे पाहिलं तर तो सर्दच झाला कारण तिचे दोन्ही हात मोकळे होते.

चिरागला दारात उभं पाहून निलाक्षी दचकली मग सावरल्यावर लगबगीने त्याच्याजवळ आली. चिराग निलाक्षीकडे सरबरून पहात होता.

"तुम्ही कधी आलात?" निलाक्षीने चिरागला जवळ येत विचारले.

उत्तरादाखल चिराग नुसता निलाक्षीकडे पहातच होता.

"अहो असं काय पहाताय माझ्याकडे?" चिरागला असं सुंभासारखं उभ राहिलेल पाहून तिने त्याच्या दंडाला धरून हलवत त्याला विचारलं.

अजुनही मघासच्या धक्क्यातून न सावरलेला चिराग दाराकडे बोटं दाखवतं तोंडाने फ़क्त "दरवाजा" इतकचं म्हणाला

"अरे हो...ती लाईट गेली आहे ना म्हणुन उघडा ठेवला होता." निलाक्षीने चिरागच्या त्या प्रश्नाला उत्तर दिलं इतक्यात दिवे लागले.

"बघा सत्य आहे" अस बोलून निलाक्षी दरवाजा लावायला गेली. चिराग अविश्वासाने एकदा तिच्याकडे तर एकदा दरवाजाकडे पहात होता.

चिरागला आता काही सुचत नव्हतं. तो विचार करीत होता. निलाक्षी म्हणाली की "दरवाजा उघडा होता?" पण आपण जेव्हा घरी आलो तेव्हा तर तो आतून बंद होता. आपण इतक्या जोरात ठोठावत असताना आपल्याला तो उघडा असलेला कसा जाणवला नाही. मग तो आतून आलेला बांगड्यांचा आवाज आणि मुख्य म्हणजे तो दरवाजा कुणी उघडला????"

हे सगळं खरच घडतय की मला भास् होताहेत. चिराग आपल्याच विचारात असताना निलाक्षी त्याच्या बाजुला येउन कधी उभी राहिली हे त्याला कळलंच नाही.

रात्री निलाक्षीने जेवणाची ताटं वाढायला घेतली. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर चिरागने तिला विचारलं.

"काय मग, कसा गेला आजचा दिवस?"

"ठीक" तिने मोघम उत्तर दिलं.

"कंटाळली असशील ना?" चिरागच्या ह्या प्रश्नावर उत्तरादाखल निलाक्षी फ़क्त हसली.

"नाही, इतकं पण नाही. बराच वेळ तर घर आवरण्यातच गेला. मग एक पुस्तक वाचलं. दुपारी थोडावेळ झोपले......मग संध्याकाळी तुम्ही आलात. 
एक सांगु......मला आवडलं आहे इथे. फार सुंदर शांतता आहे आणि आपल्या खिडकीतला तो गुलमोहर???"

"त्याच काय?" चिरागने चमकून विचारलं

"काही नाही, फार सुंदर आहे तो" निलाक्षी म्हणाली.

तिच्या हरवलेल्या डोळ्यात पहाताना चिरागला पुन्हा संध्याकाळचा प्रसंग आठवला. त्याने विषय बदलत

"तुला मी एक टिव्ही आणुन देऊ का?"

"नको त्यापेक्षा तुम्ही मला एक टेपरेकोर्डर आणुन दया. जेणेकरुन कामं करत असतानाही माझा वेळ चांगला जाईल."

"Ok, जशी सरकारांची आज्ञा" म्हणत चिरागने जेवण संपवलं.

******************************************************************************

रात्र पुन्हा सजली. चिरागने सवयीने हात बाजूला टाकला. पण हाताला मोकळेपणा जाणवताच तो झटकन उठला. त्याने बाजुला पाहिलं तर निलाक्षी जागेवर नव्हती. त्याने घाबरून आजुबाजुला पाहिलं तर.....निलाक्षी त्याला समोर खिडकीत उभी असलेली दिसली.

एकटक त्या गुलमोहराच्या झाडाकडे पहात...........

चिरागला हा प्रकार विचित्र वाटला. तो उठून तिच्याजवळ गेला. तिच्याजवळ गेल्यावर त्याला जाणवलं. ती अगदी शांत उभी होती. तिचे डोळे त्या गुलमोहरावर लागले होते आणि ती काहीतरी पुटपुटत होती.

चिरागने तिच्या खांद्यावर हलकेच आपला हात ठेवला. तशी ती एकदम दचकली. तिने एक नजर चिरागच्या डोळ्यात पाहिलं आणि पुढच्याच क्षणाला लगबगीने बेडवर जाऊन झोपली.

चिराग निलाक्षीच्या अश्या वागण्याने गोंधळला होता. तिचं असं अवेळी खिडकीत उभं रहाणं त्याला जेव्हढं खटकलं नव्हतं तेव्हढी तिच्या डोळ्यातली त्याच्यासाठीची तिची अनोळखी नजर त्याला खटकली होती.

त्याने खिडकीतुन बाहेर पहिलं. तर समोर अंगणातला गुलमोहर सळसळला.

त्याने घाबरून खिडकी लावून घेतली.

******************************************************************************

सकाळी चिराग उठला. तयारी करून खाली आला. निलाक्षी त्याच्या डब्याच्या तयारीत गुंतली होती. चिरागने तिच्याकडे निरखून पाहिलं तर निलाक्षी अगदी नॉर्मल वाटत होती.

चिरागला तिला काल रात्रीबद्दल विचारायचे होते. पण सुरुवात कुठुन करावी हे समजत नव्हते. ह्याच तंद्रित चिराग असताना निलाक्षीने त्याच्यासमोर नाश्ता कधी आणुन ठेवला हे त्याला समजलेच नाही.

"अहो ऐका ना....मी काय म्हणते"

निलाक्षीच्या आवाजाने चिराग त्याच्या विचारातून बाहेर आला.

"आज लवकर या. आपण दोघे एकत्र बाजारात जाऊ...." बोलुन निलाक्षी गप्प झाली.

तिच हे अस नॉर्मल वागणं पाहून चिरागची चलबिचलता वाढली होती.

"काल रात्री खिडकीत का उभी होतीस?"  शेवटी न रहावुन त्याने कालच्या प्रकाराबद्दल निलाक्षीला विचारलचं.

चिरागच्या ह्या प्रश्नासरशी निलाक्षीने चिरागकडे चमकून पहिलं. ती आता काय उत्तर देते म्हणुन चिरागही आता लक्ष देऊन ऐकू लागला. थोड़ा विचार करून निलाक्षी म्हणाली

"रात्री......नाही हो....मी कुठे???? मी तर झोपले होते....एकदा पाणी प्यायला उठले तेव्हढेच"

निलाक्षीच्या ह्या उत्तरासरशी चिराग गडबडला...

"अग नाही ग....काल मी स्वत: पाहिलं, रात्री तू उठलेलीस. खिडकीत उभी राहून समोरच्या गुलमोहराकडे एकटक पहात होतीस. मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला तर मला घाबरून तू पुन्हा बेडवर जाऊन झोपलीस..."

चिरागने निलाक्षीला असं सांगताच तिने त्याच्या डोक्याला हात लावून त्याला ताप तर आला नाहीए ना ह्याची खात्री करून घेतली आणि त्याच्याकडे एकवार पाहून गालातल्या गालात हसली.

"संध्याकाळी लवकर या...." एव्हढ बोलुन ती पुन्हा किचनमधे निघून गेली.

चिराग अजुनही अविश्वासाने निलाक्षीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात होता.

******************************************************************************

संध्याकाळी बरेच प्रयत्न करून देखिल ऐनवेळेला महत्त्वाचं काम आल्याने चिरागला ऑफ़िसवरुन निघायला उशीर झाला. घरी पोहचेपर्यत चांगलच अंधारुन आलं होतं. फाटकापाशी पोहचल्यावर इकडे तिकडे न पहाता तो तडक आत शिरला. तो घराच्या दाराकडे एकटक पहात चालत होता. कधी एकदा घरात पोहचतो अस त्याला झालं होतं. वाटेतल्या गुलमोहराच्या त्या सळसळीकडे त्याने जाणिवपुर्वक दुर्लक्ष केलं.

ओसरीवर अंधारात अंदाजाने पाउल ठेवतानाच "आज पुन्हा लाईट गेले वाटत" असा मनात विचार करून त्याने दार ठोठावण्यासाठी दारावर थाप मारली तर दार उघडलं. दार हलकेच लोटून चिराग आत आला. घरात मिट्ट काळोख होता.

त्याने निलाक्षीला हाक मारली पण काही प्रत्युत्तर आलं नाही. तो काळजीत पडला. त्याने अंदाजाने लाईट्च बटण शोधून त्याने दाबले असता लाईट लागले. 
"अरेच्या!!! लाईट तर गेले नाही आहेत मग निलाक्षी असं दार उघड ठेवून आणि अंधार करून का बसलीय?"

त्याने तिला खाली घरभर शोधलं. ती कदाचीत बेडरुममधे असेल असा विचार करून तो वर गेला. बेडरुममधे पाउल ठेवताच तो थबकला.

निलाक्षी बेडरुमच्या खिडकीत शांत उभी होती. तिचे केस मोकळे सुटले होते. ती एकटक समोरच्या गुलमोहराकडे पहात होती. चिरागने हळूच तिला हाक मारली. पण ती जशीच्या तशीच उभी होती. चिराग तिला हलकेच पुकारत तिच्याजवळ गेला.

आता चिराग अगदी तिच्या बाजुला उभा होता. पण तिने त्याच्या अस्तित्वाची अजिबात दखल घेतली नव्हती. ती अजुनही त्या गुलमोहराकडेच पहात होती...

अगदी डोळ्यांची पापणीही न लवता.....

जणुकाही ती त्या गुलमोहराच्या झाडाशी एकरूप होउन गेली होती. ह्या वेळेसही ती काहीतरी अगम्य भाषेत पुट्पुटत होती.

हुबेहूब.....
काल रात्रीसारखी...

चिरागने तिच्या खांद्याला धरून तिला आपल्याकडे वळवलं.

"निलाक्षी" चिरागने निलाक्षीला पुकारलं.

पण निलाक्षी त्याच्याकडे नुसती एकटक पहात काहीतरी पुटपुटत होती. तिच्या डोळ्यातली तिची निर्जीव बुब्बुळ चिरागला असहय्य होत होती. तिच्या चेहरयावर आपल्याविषयी दाटलेला अनोळखीपणा पाहून हि खरच आपली निलाक्षी आहे की दूसरीच कुणी...

हा विचार चिरागच्या मनात आला. त्याने पुन्हा एकदा समोर उभ्या असलेल्या निलाक्षीच्या खांद्याला ताकदीने हलवून तिला जोरात हाक मारली.

त्यासरशी निलाक्षी भानावर आली. क्षणात तिच्या नजरेत जीव आला. अचानक असं चिरागला समोर पाहून ती भांबावली. ती चिरागशी काहीतरी बोलणार इतक्यात तिची शुध्द हरपली.

चिरागला काही सुचत नव्हते. पहिल्यांदाच त्याला त्याने इतक्या लांब सगळ्यांपासुन दूर घर घेतल्याचा पश्चताप झाला होता. त्याने निलाक्षीला अलगद उचलून बेडवर ठेवली आणि तो धावत खाली पाणी आणायला पळाला.

तो ग्लासात पाणी घेउन वरती आलाच होता की समोरच दृश्य पाहून त्याच्या हातातला ग्लास गळुन पडला.

समोर निलाक्षी आरश्यात पाहून तोंडाने कूठलस गाणं गुणगुणत आपले केस विंचरत होती. जणु काही झालच नाही.  आरश्यातून तिने चिरागला आलेल पहाताच ती लगबगीने उठून त्याच्याकडे आली

"अरे तुम्ही कधी आलात आणि दार कुणी उघडलं." तिने आश्चर्याने चिरागला विचारलं.

"अरे बापरे!!! म्हणजे मी पुन्हा बावळटासारख दार उघड ठेवलं वाटतं. आणि हे काय? पाण्याचा ग्लास घेउन वरती आलात मला शोधत, हाक तरी मारायचीत मला. या आता खाली तुमच्यासाठी चहा टाकते." असं बोलुन निलाक्षी खाली उतरली देखिल. चिरागला हे काय चाललय काहीच कळत नव्हतं. आतातर त्याचा स्वत:च्या डोळ्यांवरचाही विश्वास उडाला होता.

रात्री चिराग निलाक्षीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होता. पण निलाक्षी अगदी नॉर्मल होती. तिची नेहमीप्रमाणे कामं चालु होती. सोबत एखादं गाणं गुणगुणणं अगदी सराईतपणे चालु होतं.

तिच्याकडे पाहुन चिरागला सारखं मगाशी घरी आल्याआल्या आपण जे पाहिलं ते खर होतं की आता आपण जे पहातोय ते खरं आहे असा विचार पडला होता. संध्याकाळपासुन एकाच गोष्टीचा विचार करून करून चिरागच आता डोकं फ़ुटायची पाळी आली होती.

अचानक त्याला त्याच्या कपाळाला थंडगार स्पर्श जाणवला. तो दचकला. त्याने मान वर करून पाहिलं तर निलाक्षी समोर काळजीत उभी असलेली त्याला दिसली.

"काय झालं बरं नाही वाटत आहे का?" तिने काळजीने चिरागला विचारलं.

"अहं, नाही..... काही नाही" कसनुस हसत त्याने निलाक्षीला उत्तर दिलं.

"दोन घास जेवून घ्या आणि आज ज़रा लवकर झोपा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला" एव्हढ बोलून निलाक्षीने चिरागला जेवायला वाढलं.

निलाक्षीने सांगितल्याप्रमाणे चिराग आज लवकर जेवून झोपायला गेला. त्याला स्वत:लाच विश्रांतीची सक्त गरज वाटत होती.

******************************************************************************

रात्री अचानक कसल्यातरी आवाजाने त्याची झोप चाळवली. त्याने डोळे उघडले आणि बेडवर झोपुनच तो त्या आवाजाचा अंदाज घेउ लागला. तो आवाज आता क्षणाक्षणाला स्पष्ट येत होता. विचित्र आवाज होता तो.

अखेर न रहावुन चिराग उठला. आवाजाचा अंदाज घेता त्याला जाणवलं की, तो आवाज समोरच्या खिडकीतुन येत होता. त्याने पाहिलं की समोरची खिडकी उघडी होती. त्या खिडकीतुन अंगणातला गुलमोहर दिसत होता.

अगदी...शांत....स्तब्ध....गुढ

तो भारवल्यासाराखा खिडकीतुन दिसणार्या त्या गुलमोहराकडे पहात होता. इतक्यात....

अचानक बाहेरुन त्याला कंपाउड्चा लोखंडी गेट उघडल्याचा आवाज आला आणि तसाच मागोमाग गेट लावल्याचाही. त्या आवाजासरशी चिराग उठून बसला. त्याने बाजुला पाहिलं तर निलाक्षी शांत झोपली होती. अजुनही बाहेरच्या गेट्ची कुरकुर ऐकू येत होती. चिराग उठून खिडकीत आला. आज अंगणातला गुलमोहर फार शांत वाटत होता. गेल्या वेळच्या त्या स्वप्नांची आठवण अजुनही चिरागच्या मनात कायम होती म्हणुन की काय. दबकत दबकत खिडकीत आल्यावर कंपाउड गेटकडे पहाण्याअगोदर चिरागने सर्वप्रथम खाली पाहिलं.

पण ह्यावेळेस खाली कोणीही नव्हतं

त्याने पूर्ण वाकून पाहिलं. एव्हाना त्याची खात्री झाली होती की, त्याला वाटणारी भीती निरर्थक होती. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. दूर रस्त्यावर कुत्र्यांच बेसुर भुंकणं आणि रातकिड्यांच्या किराकिरीशिवाय आता त्या परिसरात दूसरा कुठलाच आवाज नव्हता.

मग अचानक त्याला आठवलं की मगाशी त्याला गेटचा आवाज ऐकू आला होता. त्याने पटकन गेटकडे पाहिलं तर तो चक्रावला. कारण संध्याकाळी त्याने गेटला लावलेल टाळं जसच्या तसं होतं. त्यामुळे गेट डायरेक्ट उघडणं अशक्य होत. तर मग तो मगाशी गेट उघडल्याचा आणि मागोमाग लावल्याचा आवाज कसा ऐकू आला होता.

खरच आपण तो आवाज ऐकला होता की आपल्याला भास् झाला होता? चिराग स्वत:लाच प्रश्न विचारू लागला.

"सध्या आपल्यासोबत जे चाललय ते विचार करण्याच्या पलिकडलं आहे. अश्याने वेड लागेल आपल्याला" स्वत:ची समजूत काढुन त्याने खिडकी बंद करण्यासाठी हात बाहेर काढला आणि थबकला.

त्याला पुन्हा तोच आवाज ऐकू आला, खरतर ज्यामुळे तो उठला होता.

तोच तो विशिष्ट आवाज.... भिंतीवर काहीतरी घासल्यासारखा.........

त्याने त्या आवाजाच्या दिशेने खाली वाकून पाहिलं. आणि तो सटपटलाच.

त्याने पाहिलं की खाली पुन्हा ती बाई भिंतीजवळ उभी होती. तिने आपले दोन्ही पंजे भिंतीला लावले होते. ती भिंतीला पकडून वर चढण्याचा प्रयत्न करत होती. त्याच प्रयत्नात तिची नखं भिंतीवर घासली जात होती आणि त्याचाच आवाज येत होता.

चिरागला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो पुन्हा पुन्हा डोळे चोळुन तिच्याकडे पहात होता.

अचानक ती बाई थांबली. तिला चिरागची चाहुल लागली होती. तिला असं थांबलेल पाहून चिराग मनातून चरकला.

चिरागला ओरडावसं वाटत होत पण भितीने त्याचा घसा कोरडा पडला होता.  एकदोनदा त्याने ओरडायचा प्रयत्न केलादेखिल. पण त्याने फोडलेली किंचाळी त्याच्या घश्यातच भीतीने गुदमरुन गेली.

एक दोन क्षण थांबुन तिने मान वर करून चिरागकडे पाहिलं. तिचा तो चेहरा पाहून चिराग खाली पडायचाच फ़क्त बाकी राहिला होता.

कारण खालची ती बाई दूसरी कुणी नसून 
निलाक्षी होती......

तिचे लांबसडक केस तिच्या खांद्यावर पसरले होते. तिच्या डोळ्यातल्या बाहुल्या नाहीश्या झाल्या होत्या. ती चिरागकडे पाहून विखारी हसत होती. एखाद्या जंगली श्वापदासारखी.

तिला पाहून चिरागची बोबडीच वळली. तो झटकन मागे झाला आणि त्याने घाबरून निलाक्षी झोपलेल्या बेडकडे पाहिलं. तर निलाक्षी बेडवर नव्हती. त्याने घाबरून पुन्हा खाली पाहिलं तर आता ती खाली पण नव्हती.

इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागे काहीतरी हालचाल जाणवली. तो गरकन मागे वळला

आणि......

त्याने पाहिलं की, निलाक्षी त्यांच्या अटेच टॉयलेट मधून बाहेर येत होती. चिराग तिच्याकडे पहातच राहिला. निलाक्षी बाहेर आली आणि सरळ बेडवर झोपून गेली. तिने तिच्यासमोर खिडकीत उभ्या असलेल्या चिरागकडे ढुंकुनही पाहिलं नाही. जणुकाही तो तिच्यासाठी तेव्हा तिथे अस्तित्वातच नव्हता.

हां सगळा प्रकार पाहून चिराग डोक पकडून मटकन खालीच बसला.

******************************************************************************

सकाळी चिराग नेहमीपेक्षा थोडा उशीरा उठला. त्याच डोक प्रचंड ठणकत होतं. तो उठून बसला. त्याने आजुबाजुला पाहिलं. निलाक्षी जागेवर नव्हती. त्याने निलाक्षीला आवाज दिला. पण उत्तरादाखल त्याला निलाक्षीची ओ आली नाही. तो लगबगीने खाली हॉलमधे आला. पण निलाक्षी खालीदेखिल नव्हती. त्याने तिला पुन्हा आवाज दिला. पण आताही त्याने तिला मारलेली हाक घरातून रिकामीच परत आली. चिराग घाबरला. त्याने निलाक्षीला पुन्हा एकदा पुर्ण घरभर शोधलं. पण ती कुठेच नव्हती.

चिराग घाबरून निलाक्षीला हाका मारत घराबाहेर आला. तो ओसरीवरुन खाली उतरतच होता की त्याला समोर अंगणात निलाक्षी त्या गुलमोहराच्या झाडाकडे एकटक बघत उभी असलेली दिसली.

चिराग धावत तिच्याकडे गेला. ती अजुनही त्या झाडाकडेच पहात होती. चिराग बाजुला येउन उभा राहिल्याचे तिच्या खिजगणीतही नव्हतं.

तिच्याजवळ पोहचताच चिरागने निलाक्षीला हळुच हाक मारली. पण तिला पाहून असं वाटत होतं की तिला ती बहुतेक ऐकुच गेली नव्हती. चिरागने अलगद तिला आपल्याकडे वळवली. निलाक्षीला पाहून चिरागच्या जीवात जीव आला. पण तिची नजर त्याला बदललेली वाटली.

तिचे ते डोळे पाहून चिराग शहारला. त्याला तिच्या डोळ्यातली त्याची ओळख पुर्णपणे पुसल्या गेल्यासारखी वाटत होती. त्याला त्याची निलाक्षी हरवल्यासारखी वाटत होती. ती चिरागकडे पाहून हळु आवाजात तोंडाने काहीतरी पुटपुटत होती. तो तिची अशी हालत पाहून अक्षरश: रडकुंडीला आला होता.

चिरागने निलाक्षीच्या दंडाला धरून तिला गदागदा हलवत तिला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. पण निलाक्षीकडून काही रिस्पॉन्सच येत नव्हता. चिराग तिचे हात पकडुन मटकन खाली गुडघ्यावर बसला आणि रडायला लागला.

******************************************************************************

"तुम्ही असे रडताय का? आणि आपण इथे असं बाहेर काय करतोय?" निलाक्षीचा आवाज ऐकून चिरागने झटकन वर पाहिलं.

निलाक्षीच्या चेहरयावर चिरागला पूर्वीच्या ओळखीच्या खुणा दिसत होत्या. तो उठून उभा राहिला. आपण इथे सकाळी बाहेर का उभे आहोत आणि आपला नवरा आपल्या समोर बसून का रडतोय ह्या सगळ्याचा गोंधळ निलाक्षीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

निलाक्षीने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे चिरागला समजत नव्हतं. जे चाललय ते त्याच्या आकलनाच्या पलिकड्लं होतं. तो तिला घरात घेउन आला. ती त्याला सारखा तोच प्रश्न विचारत होती. अखेर चिरागने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला. ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली.

चिरागने तिला हॉलमधे सोफ्यावर बसवलं आणि तो पाणि आणायला गेला. त्याने बाहेर येउन पाहिलं तर निलाक्षी डोळे मिटुन सोफ्यावर शांत पहुडली होती.

त्याने तिला उठवुन तिला पाणी दिलं आता ती नॉर्मल वाटत होती. तिने पुन्हा डोळे मिटुन सोफ्याच्या हेडरेस्टवर मान टेकली. तिचा चेहरा प्रचंड थकल्यासारखा वाटत होता. तिला खरच विश्रांतीची गरज होती.

चिरागने घड्याळयात पाहिलं तर 8.30 वाजून गेले होते. तो गोंधळला. कारण आज त्याची ऑफिसमधे एक अत्यंत महत्त्वाची मिटिंग होती. जी तो कुठल्याही परिस्थीत टाळु शकत नव्हता आणि निलाक्षीला असं ह्या अवस्थेत एकटं सोडुन जाताना त्याला जीवावर आलं होतं. त्याचा चलबिचलपणा वाढत चालला होता. इतक्यात निलाक्षी उठली.

"काय झालं??????" तिने चिरागला काळजीत पाहून विचारलं

"अहं....काही नाही" चिराग उत्तरला

"नाही काहीतरी आहे नक्की. तुम्ही सांगा बघू. नाहीतर मला चैन नाही पडणार." निलाक्षी चिरागचा हात हातात घेउन म्हणाली.

चिरागने तिला आजच्या मिटिंगबद्दल सांगितलं. पण तिला असं एकटीला सोडुन जाणं त्याला योग्य वाटत नाही हे ही सांगितलं.

"काय करू???"

"अहो त्यात काय एव्हढं, तुम्ही जा मी राहीन." निलाक्षी हलकेच हसत चिरागला म्हणाली. त्याने एकवार निलाक्षीच्या  डोळ्यात पाहिलं.

"मी लगेच येतो" असं म्हणुन चिराग तयारीला लागला.

खरतर मनाविरुध्द चिराग आज ऑफिसला निघाला होता. जाताना त्याने पाठीमागे वळुन पाहिलं. निलाक्षी दारात शांतपणे उभी होती. त्याने तिचा निरोप घेतला आणि निघाला. वाटेत त्याची नजर अंगणातल्या गुलमोहरावर पडली.

तो त्याला खिजवत असल्याचा त्याला भास् झाला.

******************************************************************************

आजची मिटिंग फार वाईट झाली होती. कंपनी मेनेजर चिरागवर वैतागुन तडतडत निघून गेला होता. आज सकाळपासुन चिराग फार disturbed आहे हे प्रसादला जाणवलं. सगळे निघून गेले तरी चिराग तसाच बोर्डरुममधे डोक्याला हात लावून बसला होता. त्याला तसा बसलेला पाहून प्रसाद त्याच्याजवळ गेला.

"काय झालयं? आज फार टेन्स वाटतोयस." प्रसादने चिरागच्या खांद्यावर हात ठेवत त्याला विचारलं.

प्रसाद त्याचा सिनिअर होता. पण त्याही अगोदर, तो त्याचा कॉलेजपासुनचा मित्र होता. त्यामुळेच प्रसादने त्याला असं आपुलकीने विचारताच चिरागला गहिवरुन आलं. कितीतरी वेळेपासुन कोंडलेल्या वाफेचा निचरा व्हावा तसच काहिसं चिरागच झालं. त्याचा बांध सुटला.

आपण ऑफिसमधे असल्याच विसरून चिराग त्या बोर्डरुममधे रडायला लागला. प्रसाद त्याला हलकेच थोपटत त्याच सांत्वन करीत होता. थोड सावरल्यावर चिरागने सगळी गोष्ट प्रसाद्ला सांगितली. त्याला होणारे भास, झटक्यात निलाक्षीचे बदलणारे स्वभाव, आणि त्याबद्दलची तिची असणारी अनभिज्ञता.......सगळं सगळं

चिरागच्या तोंडुन सगळी हकीकत ऐकल्यावर प्रसाद विचारात पडला. थोडं विचित्र होतं सगळं पण जगात प्रत्येक समस्येला समाधान असतं ह्या आपल्या विचारांवर तो आजवर कायम होता. काहीतरी आठवुन त्याने टेबलावरचा फोन जवळ ओढला आणि एक नंबर डायल केला.

"हेलो ......डॉक्टर किरण....मी प्रसाद बोलतोय....."

******************************************************************************

चिराग आणि प्रसाद दोघेही डॉक्टर किरणच्या कन्सल्टिंग रूममधे बसले होते. डॉक्टर किरण काटकर एक नावाजलेले मानसोपचार तज्ञ होते.

एका सायक्याट्रिक्सकडे जायची चिरागची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे तो ज़रा अवघडला होता.

"हम्म....तर मग काय प्रॉब्लेम आहे?" डॉक्टरांनी चिरागला विचारलं.

चिरागने एकवार प्रसादकडे पाहून डॉक्टरांना सगळं सांगायला सुरुवात केली. त्याने आज सकाळपर्यंतच्या साऱ्या गोष्टी डॉक्टरांना सांगितल्या. डॉक्टरांनी चिरागची केस लक्षपूर्वक ऐकून घेतली. हळुहळु ते डोळे मिटुन मागे त्याच्या खुर्चीवर रेलले. अचानक त्यानी डोळे उघडले आणि बसल्या जागेवरून पुढे होत त्यांनी चिरागला विचारलं.

"तुम्ही तुमच्या बायकोला इथे घेउन येउ शकता का?"डॉक्टरांच्या अश्या अचानक विचारलेल्या प्रश्नाने चिराग गोंधळला.

"हो....." थोड अस्वस्थ होत चिरागने डॉक्टरला सांगितलं

त्याला हे मानसोपचार प्रकरण अजुन झेपलं नव्हतं. तो जाम टेन्शनमधे आला होता आणि त्यात पुन्हा निलाक्षीला इथे घेउन यायचं म्हणजे...मोठं दिव्य होतं त्याच्यासाठी.

"कधी आणायचय?" त्याने साशंक होउन डॉक्टरांना विचारलं.

डॉक्टरांना चिरागचा अस्वस्थपणा जाणवला. त्यांनीच मग थोडा विचार करून त्याला विचारलं.

"जर का मीच तुमच्या घरी आलो तर चालेल का?"
"जेणेकरुन मला पेशंटला त्याच्या टेरीटरीमधे observed करता येईल"

डॉक्टरांच्या अश्या विचारण्याने चिरागला थोड हायसं वाटलं. डॉक्टरांचा हा पर्याय त्याच्या दृष्टीने बराच सोयीस्कर होता.

"कधी येताय?" त्याने लगेचच डॉक्टरांना विचारलं.

"तुमची परवानगी असेल तर आत्ताच" डॉक्टर हसत हसत उत्तरले.

******************************************************************************

ते तिघेजण चिरागच्या घरी आले. उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. चिरागने दार ठोठवलं.

"कोण आहे??" आतून निलाक्षीचा आवाज आला.

"अग मी आहे...दार उघड..."

चिरागचा आवाज ओळखुन निलाक्षीने दार उघडलं. आज चिरागला लवकर आलेलं पाहून ती खुष झाली होती, पण त्याच्यासोबतच्या दोन अनोळखी व्यक्तींना पाहून ती गांगरली.

"अग हे माझ्या ऑफिस मधले कलिग्जस आहेत. हे माझे सिनिअर प्रसाद राणे आणि हे डॉ...." चिराग ओळख करून देत होता.

"मी किरण काटकर, तुमच्या मिस्टरांच्या कंपनीचा 'डायरेक्टर'" डॉक्टरांनी स्वत:ची ओळख डायरेक्टर म्हणुन करून देताच चिरागला त्याची चुक समजली.

नीलाक्षीने त्या तिघांच हसून स्वागत केलं. ते सगळे घरात आले. नीलाक्षी लगबगीने आत गेली आणि सगळ्यांसाठी पाणी घेउन आली. 'चहा घेणार की काही सरबत' असं विचारत असतानाच डॉक्टर तिला म्हणाले.

"नका काही त्रास करून घेउ तुम्ही मिसेस शिंदे. खरतर आम्ही तुम्हालाच भेटायला आलो होतो. तुमचे मिस्टर आमच्या कंपनीचे फार चांगले employee आहेत. काही कारणास्तव् आम्हाला तुमच्या लग्नाला हजर रहाता आलं नाही. नंतर कामाची गड़बड़ होती. म्हटलं आज ज़रा निवांत आहोत आणि तसही तुम्ही हे नवीन घर घेतलं म्हणुन आज तुम्हा दोघांना भेटायला आलो."

कंपनीचा एव्हढा मोठा माणुस आपल्या नवरयाची एव्हढी स्तुती करतोय हे पाहून निलाक्षीला फार आनंद झाला. ती कौतुकाने चिरागकडे पाहू लागली. चिराग मात्र ह्या सगळ्या गोष्टीने अवघडला होता. डॉक्टर बरेच गप्पिष्ट होते. सुरुवातीच्या थोड्या बुजरेपणानंतर निलाक्षी देखिल बर्यापैकी त्या सगळ्यांमधे सामील झाली. 

बोलता बोलता दोन तास कसे गेले हे त्यांना कळलंच नाही. अचानक डॉक्टर घड्याळाकडे पाहून चिरागला म्हणाले.

"चला मिस्टर शिंदे, बराच उशीर झाला. आता येतो आम्ही"

"अहो असं काय करताय. थांबा आता जेवुनच जा" नीलाक्षी डॉक्टर आणि प्रसादला आग्रह करत म्हणाली.

"आज नको वहिनी नंतर येतो. आज ज़रा घाईत आहे." प्रसाद सोफ़्यावरुन उठत म्हणाला.

"बाक़ी घर तुम्ही छान सजवलय. मी पण असचं एखाद घर शोधतोय. शांत, निवांत कुठे माहितीत असेल तर सांगा किंवा पुढे मागे कधी हेच काढायचं झालं तर आवर्जुन सांगा" घरावरून एक नजर फिरवीत प्रसाद म्हणाला.

"चला उशीर होतोय. मला पुन्हा ठाण्याला जायचय" डॉक्टरांनी प्रसाद्ला निघायची खुण केली.

चिराग त्यांना सोडायला गेटवर आला होता. गाडीत बसता बसता डॉक्टर चिरागला म्हणाले.

"मला तर काही वेगळं वाटलं नाही. She is absolutely normal. तुम्ही काळजी करू नका. थोडे दिवस तुम्ही त्यांचा एकटेपणा दूर करायचा प्रयत्न करा. एक काम करा तुम्ही सुट्टी घेउन घरी रहा. सगळं ठीक होईल आणि तरीही त्रास कायम राहिला तर बघू......चला येतो आम्ही"

"तू दोन दिवस कामावर नाही आलास तरी चालेल. घरी वहिनींची काळजी घे. अन स्वत:चीही. काही लागलं तर कळवं." असं म्हणुन प्रसादही डॉक्टरांच्या मागोमाग गाडीत जाउन बसला.

डॉक्टरांनी पुन्हा एकदा चिरागशी शेकहेंड करीत गाडी सुरु केली. गाड़ी दिसेनासी होईसतोवर चिराग गेटवरच उभा होता. त्याला हाच प्रश्न सतावत होता की जर का निलाक्षीमधे काही प्रॉब्लेम नाही आहे तर मग आपल्यालाच वेड नाही ना लागलं.

इतक्यात एक टिटवी त्याच्या डोक्यावरून ओरडत गेली. तिच्या आवाजाने तो केव्हढ्यानं तरी दचकला. त्याने आजुबाजुला पाहिलं तर संध्याकाळच्या सावल्या फार दुरवर पोहचल्या होत्या. तो गेट लावून आत घराकडे जाऊ लागला.

 

 

दार लोटून तो आत आल्यावर त्याला हॉल रिकामी दिसला. निलाक्षी कपडे बदलण्यासाठी वर गेली असेल असा अंदाज बांधुन तोही वर जायला निघाला. तो जिन्यापाशी पोहचालाच असेल की समोरच दृष्य पाहून तो जागच्या जागीच सटपटला.

त्याने पाहिलं की निलाक्षी त्या अंधाऱ्या जिन्यावर बसली होती. तिचे कपडे अस्त्यावस्त झाले होते. तिचे केस डोक्यावरून पुढे तिच्या चेहर्यावर पसरले होते. तिचा उर धपापत होता. ती जागच्या जागी घुमत होती.

तिचा असा अवतार पाहून चिराग जागीच थिजला. त्याने निलाक्षीला हळूच हाक मारली. पण तिला काही फरक पडला नाही. तो दबकत दबकत तिच्याजवळ जाऊ लागला.

चिराग तिच्याजवळ पोहचला. नीलाक्षी अजुनही तशीच मान खाली घालून जिन्यावर बसली होती. त्याने हलकेच तिला हात लावला. त्यासरशी तिने त्याचा हात झिडकारुन टाकला.

तिच्या त्या झिडकारण्यात प्रचंड ताकद होती. तिच्या त्या एका फ़टकाऱ्याने चिराग पाठीमागे जमीनीवर जाउन पडला. चिराग खाली पडताच निलाक्षीने झटक्यात मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिने मानेला दिलेल्या त्या झटक्याने तिच्या चेहर्यावरचे केस मागे गेले. चिराग अविश्वासाने तिच्याकडे पहात होता.

तिचा चेहरा पांढरा फ़ट्टक पडला होता. तिचे डोळे लाल झाले होते. रागाने तिच्या नाकपुड्या फुलल्या होत्या. ती चिराग कडे पाहून फिसकारली.

"निलाक्षी" चिराग घाबरून तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

"चुप......" निलाक्षी चिरागवर जोरात ओरडली. तिचा आवाज बदललाय हे चिरागला जाणवलं.

"ह्यापुढे माझ्या परवानगी शिवाय इथे कुणालाच आणायच नाय समजलास.

नाहीतर......." निलाक्षी चिरागवर गुरगुरली आणि पचकन बाजुला थुंकली.

तिची ही धमकी ऐकून चिराग गर्भगळीत झाला. 

निलाक्षी आता उठून उभी राहिली. पाठीमागच्या खिडकीच्या तावदानातुन झिरपणाऱ्या निळ्या प्रकाशात तिची काळी सावली फार बेसुर वाटत होती.

ती आता एक एक पाउल टाकत चिरागकडे येत होती. तिला असं आपल्या दिशेने येताना पाहून चिरागचा उरला सुरला धीर पण सुटला. अचानक त्याच्या डोळ्यासमोर अंधार साचु लागला.

एक दोन क्षण गेले असतील की, त्याला कुणीतरी गदागदा हलवून उठवत होतं

"अहो असे काय जमिनीवर पडलाय? काय झालय तुम्हाला? डोळे उघडा बघू..."

चिरागने हळुहळु डोळ उघडले. त्याने बाजुला पहिलं तर निलाक्षी त्याची विचारपूस करत होती. तो घाबरून तिच्यापासून दूर झाला. त्याला आपल्याला असं घाबरलेलं पाहून निलाक्षी गोंधळली.

"अहो असं काय करताय? मला खुप भिती वाटतेय" असं बोलून निलाक्षी घाबरून रडायला लागली. चिराग थोडा सावरला होता. तिला असं रडताना पाहून चिरागला कसं तरी झालं. तो तिच्या जवळ गेला. ती हलकेच त्याच्या कुशीत शिरली.

चिरागला हे सगळं त्याच्याबाबतीत काय चाललय काहीच समजत नव्हतं. आताची नीलाक्षी खरी मानायची की मगासची?

विचार करून करून चिरागला आता वेड लागायची पाळी आली होती.

संध्याकाळच्या त्या प्रसंगानंतर चिराग निलाक्षीपासून थोडा अंतर ठेवूनच रहात होता. पण तिचा घरातला वावर अगदी सहज होता. तिच्यासाठी जणुकाही घडलचं नव्हतं. तिने जेवणाची ताट वाढायला घेतली.

"काय हो? तुमचे ऑफ़िसचे मित्र असेच कसे गेले? जेवायलाही थांबले नाहीत" निलाक्षीने चिरागला जेवण वाढता वाढता विचारलं.

"अगं त्यांना लांब जायच होतं ना? म्हणुन नाही जेवले ते" चिरागने निलाक्षीच्या नजरेला नजर न मिळवता कसबसं उत्तर दिलं.

चिराग शांतपणे जेवत होता. खरं सांगायच तर तो जेवण गळ्याखाली ढकलत होता. त्याने जेमतेम दोन चपात्या खाल्ल्या असतील की तो
"मला बस झालं" एव्हढ बोलून आपल्या ताटावरुन उठला आणि वर आपल्या खोलीत निघून गेला.

चिरागला अश्या भरल्या ताटावरुन उठून जाताना पाहून निलाक्षीला नवल वाटलं होतं. कारण असं आजवर कधीच झालं नव्हतं. तिचही आता जेवणात लक्ष लागेना.

खालच सगळं भराभर आवरून निलाक्षी लगबगीने वर आली. तिने पाहिलं की, चिराग डोक्यावर हात ठेवून झोपला होता. ती त्याच्या जवळ जाऊन बसली. चिराग अजुन झोपला नसल्याचं तिला जाणवलं होतं. तिने हलकेच त्याचा डोक्यावरचा हात बाजुला केला आणि आपल्या हातांनी त्याच डोकं चेपू लागली.

"काही होतय का?" तिने काळजीने त्याला विचारलं.

"नाह़ी काही नाही" चिराग म्हणाला.

निलाक्षीला आपल्या जवळ बसून आपली काळजी घेताना पाहून

आपल्याला खरच भास् होताहेत का? 
पण मग नेमके आपल्यालाच का होताहेत? आणि
नेमके निलाक्षीबाबतीतच का?
ही कुठल्या अशुभाची चाहुल तर नाही ना?

असले एक ना दोन बरेचसे विचार चिरागच्या डोक्यात काहुर उठवत होते. विचार करून करून त्याचा मेंदु क्षिणला होता. त्याला आता विश्रांतीची सक्त गरज होती आणि त्यात निलाक्षीच्या हाताच्या नाजुक स्पर्शाने तो सुखावला होता. हळुहळु चिराग निद्रेच्या अधीन झाला.

******************************************************************************

त्याही रात्री चिराग अचानक कश्यानेतरी जागा झाला. त्याने पाहिलं तर निलाक्षी जागेवर नव्हती. त्याने पुढच्याच क्षणी खिडकीत पाहिलं तर ती खिडकीतही नव्हती. तो पटकन अंथुरुणातुन बाहेर आला. टॉयलेटचा दरवाजाही उघडाच होता. निलाक्षी तिथेही नव्हती.

तो खाली आला. खाली हॉलमधे भयाण शांतता पसरली होती. जिन्यावरच्या खिडकीतुन बाहेरच्या चंद्राचा निळा अंधार आतमधे साचून राहिला होता. त्याने हॉलवर एक नजर फिरवली आणि तो जागीच थिजला.........

त्याने पाहिलं की, निलाक्षी खाली घरात एकटीच फिरत होती आणि फिरताना घरातल्या भितींवरुन हात फिरवत होती.  घरातली प्रत्येक गोष्ट हाताने चाचपुन बघत होती. जणु काही आज बऱ्याच दिवसानी ती ह्या घरात आली होती.

चिराग तिच्या मागुनच फिरत होता. ती नक्की काय करतेय हे पहात. त्याने तिला एकदोनदा हाकही मारली, पण तिला त्याचा हासभासच नव्हता. निलाक्षी पुर्ण घरभर फिरून वर बेडरुमच्या दिशेने गेली.

चिराग निलाक्षीच्या अश्या विचित्र वागण्याने सरबरला होता. तोही पुढच्या क्षणाला लगेचच तिच्या मागुन वर गेला.

तो वर बेडरुममधे पोहचला आणि त्याने पाहिलं की, निलाक्षी आता तिच्या जागेवर झोपली होती. 
अगदी शांत.....
त्याने तिला हलकेच हलवून पहिलं पण ती गाढ झोपली होती. चिराग गोंधळला. कारण आत्ताच काही वेळापुर्वी त्याने तिला खाली घरभर फिरताना पाहिलं होतं आणि आता ती इथे अशी गाढ झोपली होती. त्याला काही कळतचं नव्हतं. चिरागही आता गुपचुप निलाक्षीकडे पाठ करून झोपायच्या तयारीला लागला.

चिराग मगासच्या गोष्टीचा विचार करीत झोपेच्या अधीन होतच होता की, इतक्यात त्याला पाठीमागुन खुदकन हसल्याचा आवाज आला. तो झटक्यात मागे वळला. त्याने पटकन उठून निलाक्षीकडे पाहिलं, पण ती तर गाढ झोपली होती.

तो आता निलाक्षीकडे तोंड करून झोपला. मधेच एक दोनदा उठून त्याने निलाक्षी खरच झोपली असल्याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली. हळुहळु त्याचे डोळे जडावु लागले आणि चिराग झोपी गेला. तसे निलाक्षीने डोळे उघडले आणि ती चिरागकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर आता कुत्सित हास्य पसरले होते आणि बाहेरच्या गुलमोहराची सळसळ प्रचंड वाढली होती.

******************************************************************************

सकाळी चिराग तयार होउन खाली आला. निलाक्षी किचनमधे नेहमीप्रमाणे त्याच्या नाश्त्याच्या तयारीत गुंतली होती. तो तिच्याकडे गेला. तिच्याशी काल रात्रीबद्दल कसं बोलावं ह्या विचारात चिराग असतानाच

"आता कशी आहे तब्येत? रात्री झोप झाली ना व्यवस्थीत?" निलाक्षीने त्याला विचारलं

काल रात्रीचा विषय निघताच चिरागच्या घश्याला कोरड पडली. एक आवंढा गिळत तो निलाक्षीला म्हणाला.

"निलाक्षी मला ना तुला काहीतरी सांगायचय"

"सांगा ना, परवानगी कसली घेताय" निलाक्षी हसून त्याला म्हणाली.

"आपण इथून जाउया का? मला ना इथे ह्या घरात बरोबर नाही वाटत." चिराग हे बोलून निलाक्षीकडे पाहू लागला.

असं अचानक आपला नवरा घर सोडायच्या का गोष्टी करतोय हे निलाक्षीला समजतच नव्हतं. ती काही विचारणार इतक्यात, चिरागने तिला त्याला ह्या घरात येणारे अनुभव सांगायला सुरुवात केली. सांगता सांगता त्याला त्याच्या भावना अनावर होउ लागल्या. तो मान खाली घालून रडायला लागला.

"एकदा सांगितल ना.. ह्या घरातून मी कुठेही जाणार नाही म्हणुन"

चिरागने चमकून निलाक्षीकडे पाहिलं, तर ती एकटक त्याच्याकडेच पहात होती. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यात जणु रक्त उतरलं होतं. तिच्या त्या नजरेनेच चिराग सर्द झाला.

तो तिच्यापासून लगेचच दूर झाला. त्याने आपले डोळे पुसले आणि त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं.

"अहो सांगतायना?" निलाक्षीने त्याला विचारलं. तिचा आवाज आता नॉर्मल झाला होता.

"अहं….काय?" चिरागने घाबरून तिलाच विचारलं.

"अहो काहीतरी बोलयचय असं म्हणत होतात ना?" निलाक्षीने चिरागला असं गडबडलेलं पाहून त्याला विचारलं.

"नाही काही नाही नंतर सांगतो" असं म्हणुन चिरागने आपली बेग उचलली आणि तो घराबाहेर पडला.

"हल्ली ह्या माणसाला काय झालय काय कळतच नाही?" चिरागच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात निलाक्षी स्वत:शीच म्हणाली.

******************************************************************************

इकडे चिराग घराबाहेर पडला खरा पण त्याच त्याला हे सगळं विचित्र वाटत होतं. हे सगळं काहीतरी वेगळं आहे, निलाक्षी बदललीय हे त्याला जाणवलं होतं. आणि हे सगळं ह्या घरात आल्यापासूनच घडत होतं.

बरोबर....ह्या घराचाच काहीतरी ह्या साऱ्या गोष्टींशी काहीतरी संबध असला पाहिजे. मनाशी काहीतरी ठरवून चिराग तडक निघाला.

तो आज ऑफिसला न जाता पुन्हा त्या एजंटकडे गेला. चिरागने त्याला आडून आडून त्या घराबद्दल विचारले. पण त्याला त्या घराबद्दल जास्त काही माहिती नव्हती. तिथून त्याने त्या करमरकरांचा पत्ता मिळवला. पत्ता भांडुपचा होता.

चिराग शोधत शोधत त्या एजंटने दिलेल्या पत्यावर पोहचला पण दाराला कुलुप होतं. कुलुप पाहून चिराग वैतागला. त्याने बाजुला पाहिलं.

"सौ. अरुंधती सरनाईक "

त्याने हातातल्या घड्याळात पाहिलं तर दुपारचे अडीच वाजले होते. आता अश्या अवेळी ह्या घराची कडी वाजवायची की नाही ह्या द्विधा मनस्थितीत चिराग होता. पण तो असाच रिकाम्या हाती परत जाऊ शकत नव्हता. अखेर त्याने कडी वाजवलीच. दोन मिनिटानंतर एका पन्नाशीच्या स्त्रीने दरवाजा उघडला.

"कोण पाहिजे?" त्या बाईने चिरागकडे त्रासीक चेहऱ्याने विचारलं.

"ते हे......मला तुमच्या शेजारी रहातात त्या करमरकरांना भेटायचं होतं. कुठे बाहेर गेले आहेत का ते?" चिराग अवघडत बोलत होता.

"ते आता इथे नाही रहात??? ते आता अमेरिकेला असतात." त्या बाईने संशयाने चिरागकडे पाहिलं आणि सांगितलं.

हे ऐकुन चिराग हताश झाला. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट वाचता येत होती.

"तुमचं काही कामं होतं का?" चिरागचा पडलेला चेहरा पाहून त्या बाईने त्याला विचारलं.

"हो, मला अनंत करमरकरांना भेटायचं होतं. मला त्यांना भेटणं फार गरजेचं आहे तुमच्याकडे त्यांचा काही contact आहे का?" चिरागने अस्वस्थपणे त्या बाईला विचारलं.

अनंत करमरकरांच नाव ऐकताच ती बाई दचकली.

"अनंत करमरकर.....पण ते तर वेड्यांच्या इस्पितळात असतात. त्याची बायको वारल्यापासुन त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. पण तसंही तुम्ही त्यांना भेटु शकत नाही, कारण त्यांच्यावर त्यांच्या बायकोच्या खुनाचा आरोप आहे."

"खुनाचा आरोप???" चिरागला हे ऐकून धक्काच बसला.

"हो ना ...आम्हालाही सुरुवातीला खरच वाटलं नव्हतं. चांगली होती दोघं नवरा बायको. ते बदलापुरला की कुठे रहायला गेले होते. तिथे काय बिनसलं दोघांच काही माहीती नाही. त्यांना तिथे जाउन महिनाही उलटला नसेल जेव्हा हि खबर आली की अनंताने अनुजाचा खून केला म्हणुन. पोलिसांना तो जागेवरच सापडला होता हत्यारासकट.

चिराग हे ऐकून गोंधळला. त्याला काही सुचतच नव्हतं. त्याने त्या शिरतवले बाईकडुन त्या इस्पितळाचा पत्ता घेतला आणि तडक तिथे निघाला. त्याला आता अनंत करमरकरांना भेटणं अत्यावश्यक झालं होतं.

 

इस्पितळात चिरागला अनंत करमरकरांना भेटायला सक्त मनाई करण्यात आली होती. पण सुदैवाने तिथला एक डॉक्टर चिरागच्या ओळखीचा निघाला. त्याने चिरागला अनंत करमरकरांना फ़क्त दोनच मिनिटं तेही त्याच्या उपस्थितीत भेटण्याची परवानगी दिली.

चिराग त्या डॉक्टरसकट अनंत करमरकरांना जिथे ठेवलेलं त्या खोलीत आला. एका सर्वसाधारण इस्पितळाच्या खोलीसारखी ती खोली होती. सगळीकडे पांढरा शुभ्र रंग. खोलीत एक टेबल आणि खाट होती. त्या खाटेवर एका टोकाला एक चाळीशीचा माणुस उकडीव बसला होता. तो एकटक खिडकीकडे पहात तोडांने काहीतरी बडबडत होता.

मी नाही सोडणार......
नाही सोडणार......तिला
हरामखोर.......
............
अनु.........

चिरागने डॉक्टरकडे पाहिलं. त्याने नजरेनेच हे अनंत करमरकर असल्याचं सांगितलं.

"करमरकर साहेब.....हे चिराग शिंदे आपल्याला भेटायला आले आहेत" डॉक्टरांनी करमरकरांना हाक मारली.

पण करमरकरांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. चिराग हळुच दोन पावलं पुढे गेला. करमरकर अजुनही खिडकीबाहेर पाहून काहीतरी पुटपुटत होते.

चिराग थोडा अजुन जवळ गेला आणि म्हणाला.

"मी बदलापुरहुन आलोय. जिथे तुम्ही आणि तुमच्या पत्नी रहायच्या ..."

चिरागने असं सांगताच करमरकरांनी आपली खिडकीतली नजर फिरवून चिरागच्या चेहऱ्यावर आणली. ते एकटक काही क्षण चिरागकडे पहात होते. मग अचानक त्यांचा चेहरा बदलला. त्यांच्या डोक्याला आट्या पडल्या. ते उसळुन चिरागच्या अंगावर आले.

"हरामखोर.....
मी नाय सोडणार..........तुला........

अनू......................"

ते जोरात ओरडले आणि पुढच्याच क्षणाला त्यांनी डोळे फिरवले आणि जमीनीवर पडले. त्यांना स्ट्रोक आला होता. डॉक्टर धावत करमरकरांकडे गेले आणि तपासू लागले. चिराग बधीर होउन करमरकरांकडे पहात होता.

******************************************************************************

चिराग आता त्या डॉक्टरांच्या केबीनमधे बसला होता.

"डॉक्टर मला ज़रा प्लीज थोडं सविस्तर सांगाल का? की करमरकरांना नक्की काय झालय?"

"खरतर आम्हाला अशी माहीती सांगता येत नाही. पण मी तुम्ही इथे आल्यापासून पहातोय तुम्ही फार अस्वस्थ वाटताय." डॉक्टरांनी चिरागला विचारलं.

"हो थोडा टेन्शन मधे मी आहे खरा. कारण सध्या मी त्याच घरात रहातोय जिथे पूर्वी करमरकर कुंटुब रहात होतं. त्यामुळे प्लीज मला सांगता का?" चिराग डॉक्टरांना विनवणी करीत म्हणाला.

डॉक्टरांनी एकवार चिरागकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातली आर्जव पाहून त्यांना कसतरी झाली. एकदोन क्षण विचार करून त्यांनी करमरकरांची फाईल बाहेर काढली.
"हि घ्या करमरकरांची फाईल. हयात तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळी माहीती मिळेल."

त्या फ़ाईलमधे बरेच पेपर्स, केस हिस्ट्री, कात्रणं वगैरे  होते. चिराग ते पेपर चाळत होता. त्यात पोलिसांच्या पंचनाम्याचीही एक कॉपी होती. एक पेपरच कात्रणं होतं.

******************************************************************************

दिनांक 24 सप्टेंबर 2000

बदलापुर, 
अनुजा करमरकर (२४) ह्या विवाहितेचा तिच्या रहात्या घरात मृत्यु. तिच्या पतीने केली निर्घुण हत्या.

******************************************************************************

हे वाचुन चिराग सटपटला. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार अनुजाचा खून डोक्यात लोखंडी सळईचा जोरदार प्रहार करून झाला होता. घटनास्थळी अनंत करमरकर त्या लोखंडी सळईसोबत सापडला होता. त्या सळईवर त्याच्या बोटांचे ठसे सापडले होते. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले, तेव्हा तो अनुजाच्या डेडबॉडीकडे पाहून तिची माफी मागत होता. पोलिस स्टेशनमधे अनंत करमरकर जो घुम्यासारखा गप्प होता तो कोर्टात शिक्षा सुनवेपर्यंत शांतच होता. तुरुंगात त्याला वेडाचे झटके यायचे. पत्नीच्या खुनाचा त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता.

डॉक्टरच्या मते अनंत करमरकरला ह्या सगळ्या गोष्टीचा फार धक्का बसला होता. पण चिरागला मात्र ह्या सगळ्या गोष्टीत वेगळाच संशय येत होता.

घरी आल्यापासून चिराग फार अस्वस्थ होता. तो निलाक्षीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. पण निलाक्षी आज कमालीची शांत होती. त्याने तिच्याशी एक दोनदा बोलायचा प्रयत्न केला, पण तिने हुंकारा व्यतिरिक्त काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिने चिरागला जेवायला वाढलं. त्याची खरं तर जेवायची इच्छा नव्हती. पण तो निलाक्षीचा विचार करून जेवायला बसला.

तो मान खाली घालून निमुटपणे जेवत होता. मधेच त्याने नजर वर केली तर त्याला जाणवलं की, निलाक्षी त्याच्या अगदी जवळ उभी राहून त्याच्याकडे टक लावून पहात होती.

निलाक्षीला आपल्या इतक्या जवळ उभं असलेल पाहून चिराग केव्हढ्यानी तरी दचकला. इतका की तो जवळ जवळ ओरडलाच.

त्यासरशी घाबरून निलाक्षीच्या हातातून ग्लास खाली पडला. 
"अहो असं काय करताय? पाणी आणलं होत तुमच्यासाठी"

खाली जमीनीवर पडलेला पाण्याचा ग्लास बघुनही चिरागला विश्वास बसत नव्हता. तो घाबरून एकदा त्या ग्लासाकडे तर एकदा निलाक्षीकडे पहात होता. अचानक तो ताटावरुन उठला आणि आपल्या बेडरुमच्या दिशेने निघून गेला.

चिरागला असं ताटावरुन उठून गेलेलं पाहून निलाक्षीला कसंतरी झालं. तिने ठरवलं की चिरागशी आता ह्याबाबतीत  बोलायलाच हवं. तिही मग चिरागच्या मागोमाग वर बेडरुमच्या दिशेने निघाली.

******************************************************************************

चिराग बेडरुममधे अस्वस्थपणे येराझाऱ्या घालत होता. त्याला राहून राहून हॉस्पिटलमधे पाहिलेल्या करमरकरांच्या त्या क्लिप्स आठवत होत्या. ते अगदी तेच सांगत होते जे सध्या चिराग ह्या घरात अनुभवत होता.

ह्या घराचं दडपण.
अंगणातला गुलमोहर 
आणि त्यांना होणारे भास्.

तेव्हढ्यात त्याला त्याच्या पाठीमागे काही हालचाल जाणवली. त्याने पाहिलं तर निलाक्षी दारात उभी होती. निलाक्षीला खोलीत आलेलं पहाता तो खाली जाऊ लागला. तसा तिने दरवाजा अडवला.

"तुमच काही झाले का?"

"अहं..... नाही काही नाही" चिराग अडखळत म्हणाला.

"मग तुम्हालाही मी आता नकोशी झालीय का?"

"असं काहीच नाहिए" चिराग अजुनही मान खाली घालुनच बोलत होता.

"मग मी गेल्या काही दिवसांपासून पहातेय. तुम्ही असे का वागताय माझ्याशी?" निलाक्षीचा आवाज आता कातर झाला होता.

चिरागला रहवलं नाही. त्याने मान वर करून निलाक्षीकडे पाहिलं. तिच्या पाणिदार डोळ्यातले अश्रु त्याला खोलवर कुठेतरी टोचले.

"माझ काही चुकत असेल तर मला सांगा तसं. मी सुधारेन स्वत:ला पण प्लीज माझ्याशी असं वागू नका. मला तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे. मी नाही जगु शकत तुमच्याशिवाय." निलाक्षी चिरागचे हात हातात घेउन रडू लागली.

तिला असं रडताना पाहून चिरागला कससंच झालं. त्याने पटकन तिला कुशीत घेतली आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिच सांत्वन करू लागला. निलाक्षी अजुनही त्याच्या कुशीत मुसमुसत होती. त्याचक्षणी चिरागने ठरवलं की हे घर आता आपल्याला सोडायलाच हवं.

******************************************************************************

मध्यरात्र उलटून गेली होती. सगळा आसमंत निद्रेच्या अधीन गेला होता.  सगळीकडे आलबेल आहे अस वाटतं असतानाच, अचानक चिराग झटक्यात उठला. तो फार घाबरला होता. त्याला घाम फ़ुटला होता. त्याला विचित्र स्वप्न पडलं होतं की, निलाक्षी त्याच्यापासून दूर जात होती किंबहुना कुणीतरी तिला दूर नेत होतं. तो तिला अडवायचा फार प्रयत्न करत होता. तो तिच्या मागे पळत होता पण तो तिच्यापर्यंत पोहचुच शकत नव्हता. आणि निलाक्षी आता चिरागच्या नजरेसमोरून धूसर होत होती. त्याच धक्क्याने तो झोपेतून खाडकन जागा झाला होता.

त्याने घाबरून शेजारी पाहिलं तर निलाक्षी पाठमोरी झोपली होती. त्याला हायसं वाटलं. तो बेडलगतच्या टेबलावर ठेवलेल्या तांब्यातलं पाणी प्यायला. आज आजुबाजुला कमालीची शांतता होती. इतकी की पाणि पिताना त्यांच्या आवंढ्यांचा केव्हढ्यानी तरी आवाज होत होता. पाणि पिउन चिराग थोडा शांत झाला पण तरीही त्याचा अस्वस्थपणा काही कमी झाला नव्हता. एकप्रकारची विचित्र हुरहुर त्याच्या जिवाला जाणवत होती.

का आज हे स्वप्न आपल्याला पडलं असेल? बहुतेक हल्ली जे काही चाललय त्याच्याच विचारांमुळे हां प्रकार घडला असणार. असा विचार करून तो पुन्हा झोपायच्या तयारीला लागला.

तो डोळे मिटुन झोपेची वाट पहात होता की अचानक एका आवाजाने त्याच लक्ष वेधलं. वेगळाच आवाज होता तो, जणु वाटत होतं की कुणीतरी जोरजोरात श्वास घेतय. त्याने हळूच त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि त्याची बोबडीच वळाली. भितीने त्याचं हृदय बंद पडायचच फ़क्त बाक़ी राहिली होतं.

त्याने पाहिलं की निलाक्षी वर छताला चिकटलेली होती आणि तिथून ती चिरागकडे एकटक पहात होती. तिचा उर धपापत होता. तिच्याच श्वासांचा जोरजोरात आवाज येत होता ज्यामुळे चिरागने वर पाहिलं होतं.

त्याने घाबरून लगेच त्याच्या शेजारी बेडवर पाहिलं तर निलाक्षी तिच्या जागेवर नव्हती. चिरागने पुन्हा वर पहिलं. निलाक्षी अजुनही त्याच्यावरच नजर रोखून होती. तिच्या चेहरयावर आता विखारी हास्य पसरलं होतं.

तो घाबरून खाली पळाला. खाली हॉलमधे आला. खाली हॉलमधे अंधार होता. किचनमधे जळत असलेल्या दिव्याचाच काय तो उजेड होता. चिराग पळत पळत हॉलच्या दरवाज्यापाशी गेला. त्याने कडी काढली आणि त्याने दार उघडण्यासाठी हेंडल खेचलं पण.....

हाय राम.....दरवाजा उघडेच ना.

त्याने पुन्हा जोर लावला पण उपयोग शून्य. असं वाटत होतं की कुणीतरी दार बाहेरून गच्च पकडून ठेवलय.

इतक्यात त्याला जाणवलं की जिन्यावरुन कुणीतरी खाली येत होतं. त्याने मागे वळुन पाहिलं असता, पाठीमागे निलाक्षी जीना उतरत होती. ती मान खाली घालून पाय घासत चालत होती. रात्रीच्या शांततेत तो तिच्या पावलांचा आवाज अंगावर शहारे उठवत होता.

ती आता शेवटच्या पायरीवर येउन थांबली. तिने मान वर करून चिरागकडे पाहिलं. तिचा तो अवतार पाहून चिराग हादरलाच होता. तिचे कपडे अस्त्यावस्त झाले होते. तिच्या चेहरयावर तिचे केस पसरले होते. पण तिच्या केसाआडुन तिची नजर आपल्यावरच रोखलेली आहे हे चिरागाला जाणवलेलं. दोन क्षणांसाठी त्याला असं वाटलं की हे त्याच स्वप्न असावं पण पुढल्याच क्षणाला निलाक्षीने फ़ोडलेल्या किंचाळीने त्याचा हा भ्रम दूर केला. तिच्या त्या कर्कश किंचाळीने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. तिने मानेला झटका देऊन आपले केस मागे घेतले. तिचा तो पांढरा फ़ट्टक चेहरा फार बेसुर दिसत होता. तिचे लाल डोळे त्याचा आरपार वेध घेत होते. तिच्या चेहरयावर एक खुनशी हास्य पसरलं होतं.

ती आता एक एक पाऊल ओढत चिरागच्या जवळ येउ लागली. तिला आपल्या जवळ येताना पाहून चिराग घाबरून ओरडु लागला. दार उघडण्यासाठी दारावर लाथा मारू लागला. पण त्याचा काही उपयोग नव्हता. ती अगदी त्याच्यापासून हाताच्या अंतरावर उभी होती. चिराग दाराला अगदी टेकून उभा होता.

चिराग खुप घाबरला होता. अचानक त्याला त्याच्या आईने सांगितलेली गोष्ट आठवली. जेव्हा त्याला वाटेल की तो संकटात आहे त्यावेळेस मारुती स्तोत्राचे पठण करावे. त्याने संकटाला सामोरे जायची ताकद येते. लहानपणी दररोज न चुकता माई दोन्ही मुलांकडुन मारुती स्त्रोत्र म्हणवुन घ्यायची. मोठा झाल्यावर चिरागचा देव ह्या संज्ञेवरचा विश्वास डळमळला होता, पण आता समोर दिसत असलेलं सत्य पहाता. जर जगात नकारात्मक शक्ती असतील तर सकारात्मक शक्तीही अस्तित्वात असायलाच पाहिजेत हे त्याला आता पटलं होतं. त्याने माईने सांगितलेला पर्याय अवलंबवायचा ठरवला. तसाही ह्या परिस्थितीत त्याच्याकडे दूसरा काही मार्गही नव्हता.

निलाक्षी आता त्याच्या अजुन जवळ आली होती. इतकी की, तिचे उच्छवास त्याच्या मानेवर जाणवतं होते. चिरागने तिच्याकडे पाहून हात जोडले. ती छद्मीपणे त्याच्याकडे पाहून हसू लागली. ती आता त्याच्या अजुन जवळ येणार इतक्यात चिरागने मोठ्या आवाजात

भीमरूपी महारुद्रा।वज्र हनुमान मारुती।
वनारी अंजनीसुता। रामदूता प्रभंजना।

म्हणायला सुरुवात केली.

पुढच्याच क्षणाला निलाक्षी ओरडत लांब पळाली. चिरागला हे पाहून आश्चर्य वाटलं.

ती आता त्याच्या आजुबाजुला  फेर्या घालत होती. चिराग स्त्रोत्र पुन्हा पुन्हा म्हणत होता. तिच्या चेहर्यावरचे भाव आता हिस्त्र बनत चालले होते. तिला चिरागचा हां पर्याय अजिबात आवडला नव्हता. तिला चिरागचे स्तोत्र पठन अजिबात सहन होत नव्हते. ती धावत वर निघून गेली. बराच वेळ वरतून निलाक्षीचा सारखा ओरडण्याचा आणि गुरगुरण्याचा आवाज येत होता. तिचा आवाज चिरागच्या छातीत धडकी भरवत होता. चिराग पुर्ण रात्र हनुमान स्तोत्र म्हणत होता.

सकाळ होताच वरतून निलाक्षीच गुरकावणं बंद झालं होतं. चिराग पुर्ण रात्र हनुमान स्त्रोत्र म्हणत होता.त्यामुळे तो दमला होता. पण निलाक्षीचा अवतार आठवुन त्याची झोपच उडाली होती. काल रात्री घडलेल्या प्रकारावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण आपल्या हातावरल्या खुणा पहाताच त्याला विश्वास ठेवणं भाग होतं.

वरतून निलाक्षीचा काही आवाज येत नाही हे पाहून चिराग घरातून बाहेर पडला. निघताना तो सारखा मागे वळुन पहात होता. तो दरवाजा बाहर पडतच होता की, इतक्यात मागुन कुणीतरी त्याला बखोटीला धरलं. त्याने घाबरून मागे पाहिलं असता, त्याने पाहिलं की पाठीमागून निलाक्षीने त्याला गच्च पकडलं होत. तिच्या डोळ्यात खुनशी भाव होते. ती गुरगुरत होती. ती चिरागच्या अजुन जवळ येणार की चिराग पुन्हा मारुती स्त्रोत्र म्हणु लागला. निलाक्षी जोराने ओरडत त्याच्यापासून दूर झाली. आणि ह्याच संधीचा फायदा घेउन तो घराबाहेर आला. त्याच्या मागोमाग निलाक्षीही धावत बाहेर ओसरीपर्यंत आली. पण बाहेरचा उजेड तिला सहन झाला नाही. ती ओरडत पुन्हा घरात पळली. आतून तिचा आरडाओरडा ऐकू येत होता. चिरागने पाहिलं की दाराच्या आतून ती धुसफुसत होती. तिला घरातून आपल्याकडे बघताना पाहून, चिराग घाबरून पाठच्यापाठी धावत गेट्कडे पळाला.

******************************************************************************

चिराग धावत धावत मेनरोडवर आला. तो वाट फुटेल तिथे पळत होता. त्याला आता फ़क्त तिथून पळुन जायचं होतं. तेव्हढ्यात त्याला पाठीमागे कसलीतरी चाहुल लागली. त्याने मागे वळुन पाहिलं तर त्याला एक गाडी त्याच्या दिशेने येताना दिसली. चिरागने त्या गाडीला हात दाखवला. तशी ती गाडी त्याच्या जवळ येउन थांबली.

"साहेब तुम्ही इथे" त्या गाडीतल्या माणसाने चिरागला विचारलं.

ह्या प्रश्नासरशी चिरागने दचकून समोर पाहिलं. तर एक माणुस रिक्षा घेउन त्याच्यासमोर उभा होता.

चिरागला आठवलं की हा तोच बेवडा रिक्षावाला होता....सदु म्हात्रे. ज्याने त्याला मागे एकदा घरापर्यंत सोडलं होतं आणि पैसेही घेतले नव्हते.

"थांबा मी तुम्हाला घरी सोडतो" सदु चिरागची अवस्था पाहून चिरागला म्हणाला.

घराच नाव काढताच चिराग जोरात नाही असं ओरडला. चिरागची अशी प्रतिक्रया पाहून सदु गोंधळला. त्याने चिरागला बळेबळेच रिक्षात बसवले आणि थोडं पाणि प्यायला दिलं. थोड शांत झाल्यावर चिरागला बरं वाटलं. तो भानावर आला.

"काय झालं साहेब?" सदुने काळजीने चिरागला विचारलं.

सदुच्या अश्या विचारण्याने चिरागचा बांध सुटला. तो त्याच्या समोर हमसाहमशी रडू लागला. चिरागने रडता रडता सदुला काल रात्रीपासुनची सगळी हकीकत सांगितली.

"काळजी नका करू. आपण पहिलं तुमच्या घरी जाऊ" सदु चिरागला समजावत म्हणाला.

घराचं नाव काढताच चिराग घाबरला पण लगेच त्याला निलाक्षीची आठवण आली. आपण तिला तिथे एकटं सोडुन आलोय ही सल त्याला बोचली. तसाही आता हा सदु सोबत होता. त्यामुळे तो पुन्हा घराकडे परत जायला तयार झाला.

सदुने रिक्षा सुरु केली आणि चिराग सांगेल त्या रस्त्याने ते दोघे चिरागच्या घराकडे निघाले. चिरागच्या घराजवळ रिक्षा थांबवुन दोघेही उतरले. चिरागने दाखवलेलं घर पाहून सदु तीनताड उडाला.

"तुम्ही तिथे रहाता? अहो हे घर चांगल नाहिए. अहो निदान चौकशी तरी करयचीत? तिथे एक खून झालाय. त्या घराबद्दल कुणी चांगलं बोलत नाही. तुम्ही तिथे परत अजिबात जाऊ नका"

सदुच्या अश्या निवार्णीच्या बोलण्यावर चिराग काही बोलला नाही. म्हणजे आपल्याला आजवर दिसत असलेला तो भास् नव्हता ते सत्य होतं हे सदुच्या बोलण्यातुन चिरागला जाणवलं होतं.

तो फ़क्त डोळे विस्फारून सदुकडे पहात राहिला. त्याला असं आपल्याकडे पहाताना पाहून सदु गडबडला. त्याने चिरागला गदागदा हलवून जोरात विचारलं.

"काय झालं साहेब?"

"पण माझी बायको अजुन तिथेच आहे. त्याच घरात." चिराग हळूच सदुला म्हणाला. हे ऐकून सदु सरबरला.

तेव्हढ्यात घरातून कुठल्यातरी बाईचा खदखदून हसण्याचा आवाज आला. तसे दोघेहीजण आल्यापावाली मागे पळाले.

******************************************************************************

"साहेब माझं एक ऐकाल?" सदु चाचरत चिरागाला म्हणाला.

उत्तरादाखल चिराग फ़क्त हुंकारला. त्याची नजर अजुनही कुठेतरी हरवलेलीच होती.

"ह्या प्रकाराला आता फक्त एकच माणुस आळा घालू शकतो"

सदुच्या ह्या सांगण्यावर चिरागने चमकून सदुकडे पाहिलं. सदुने नजरेने चिरागला आश्वस्त केलं आणि चालण्याची खून केली. चिराग निमुट्पणे सदुच्या मागोमाग चालायला लागला.

सदुने रिक्षा एका जुन्या देवळापाशी थांबवली. तो खाली उतरला. मागोमाग चिरागनेही त्याच अनुकरण केलं. ते देऊळ फार जुनं होतं. आजुबाजुचा परिसर एकदम शांत होता. जुन्या धाटणीचं दगडी बांधकाम त्या देवस्थानाच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देत होते.

सदु त्या देवळाच्या दिशेने चालु लागला. चिराग त्याच्या मागोमाग चालत होता. पण सदु देवळात न जाता, त्या देवळाला वळसा घालून त्याच्या पाठीमगच्या झाडीत घुसला. आतमधे ती झाडी फार गर्द होती. बराच वेळ सदु चालत होता. वाटेत कुणी कुणाशी बोलत नव्हतं.

बराच वेळ चालल्यावर त्या जंगलातली ती पायवाट एका मोठ्या झाडाखाली येउन थांबली.

चिरागने समोर पहाताच त्याला त्या मोठ्या झाडाखाली एक माणुस ध्यान लावून बसलेला दिसला. अगदी शांत आणि निश्चल. बघणार्याला तिथे कुठला तरी पुतळा असावा एव्हढी शंका यावी इतका स्तब्ध.

सदुने पुढे होत, त्यां योगी तपस्वी व्यक्तीला नमस्कार केला आणि सदु काही बोलणार इतक्यात त्यांनी डोळे उघडले.

एकनजर त्यांनी चिराग आणि सदुला पाहिलं. त्यांची नजर चिरागवर स्थिरावली आणि हळुहळु त्यांचा शांत चेहरा उग्र झाला. ते वसकन ओरडले.

"दूर हो माझ्यापासून ........जा तिकडे लांब उभा रहा. तुझी सावलीही नको माझ्या अंगावर.
जा म्हणतो ना.............."

चिराग घाबरून दोन पावलं मागे झाला.

बाबांचा चेहरा लालबुंद झाला होता. त्यांनी सदुला खुणेने जवळ बोलावलं आणि आपल्या मडक्यात पाणी चिरागच्या डोक्यावरून ओतायला सांगितलं.

आपल्या शरीरावरुन पाणी खाली उतरताना सगळ्या अंगाला लाल इंगळ्या डसाव्यात असाच काहीसा अनुभव चिरागला येत होता. त्याच्या अंगाची लाही लाही होत होती.

तो नाही नाही म्हणत असतानासुध्दा सदुने सगळं मडकं चिरागच्या डोक्यावर रिकामी केलं. तिकडे ते बाबा आपले डोळे बंद करून मंत्र पठण करत होते. हळुहळु चिरागचा दाह कमी झाला. तो आता शांत उभा होता.

बाबांनी डोळे उघडले आणि त्यांनी चिरागकडे पाहिलं. आता त्यांचा चेहरा शांत वाटतं होता. त्यांनी चिरागला आपल्या जवळ बोलावलं

"फार मोठी चुक केलीयस तू........तुझ्या बायकोला तिने पछाडलय" बाबांनी असं सांगताच चिराग हादरला.

"तिच्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला लवकर काहीतरी केल पाहिजे. दोन दिवसाने अमावस्या आहे. तोवर जर का आपण काही केल नाही तर ती पुर्णपणे तिच्या कह्यात जाईल, मग मात्र आपण काहीच करू शकणार नाही." बाबा चिरागला सांगत होते.

हे ऐकून चिरागच्या पायाखालची जमीनच सरकली. काल रात्रीचा प्रकार आठवताच चिरागच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला.

"मग बाबा आपण उपाय कधी करणार" सदुने बाबांना विचारलं

"आज रात्रीच...." बाबांनी आपली धारदार नजर सदुवर रोखली.

"तिन्हीसांजेला मी तिथे येईन. तोवर हा धागा तुझ्या हातात बांध आणि हा खिळा तुझ्या घराच्या उंबऱ्यावर नेउन ठोक.
आणि.....
बाहेरुनच ठोकायचा. घराच्या आत अजिबात जायच नाही." शेवटचं वाक्य बाबा जोर देऊन बोलले तसे दोघेही शहारले.

आणि हो....." चिराग जसा वळला तसे ते बाबा पुन्हा गरजले.

"ती तुझी बायको नाही हे पदोपदी लक्ष्यात ठेव"

"जा निघ....."

आणि बाबा पुन्हा ध्यानस्थ झाले.

******************************************************************************

दोघेही घराजवळ पोहचले. सदुने आपली रिक्षा घरापासून थोड्या अलिकडेच उभी केली. सदुने रिक्षा मुद्दामून रस्त्याच्या दिशेने फिरवून लावली. चिरागला त्याही परिस्थितीत सदुच्या समयसुचकतेच कौतुक वाटलं. दोघेही चालत आता घराच्या गेटजवळ पोहचले होते. चालता चालता चिराग विचार करत होता की,

कोण कुठला हा सदु आणि 
आपण उगाच का त्याला ह्या सगळ्यात ओढतोय?
आपल्यासाठी त्याला का संकटात टाकतोय?

चिरागने एकवार पुढे चालणाऱ्या पाठमोऱ्या सदुकडे पाहिलं आणि काहीतरी ठरवून त्याने सदुला हाक मारली.....
"सदु..."

चिरागच्या आवाजासरशी सदु थांबला आणि त्याने चिरागकडे पाहिलं. चिराग त्याला म्हणाला.

"सदु, तू थांब इकडेच. मी एकटा आत जातो. पंधरा मिनिटात जर का मी परत आलो नाही तर ताबडतोब परत निघून जा. तू उगाच ह्या सगळ्यात नको अडकुस. आमचं आम्हालाच निस्तरु दे. आता जे होइल ते होइल.
आणि हो...फ़क्त माझं एक काम कर. हा माझा पत्ता घे.. बाकी काही नाही ह्या पत्त्यावर जाऊन फ़क्त एव्हढ्च सांग की हयात आमची काहीच चुक नव्हती. आमच्या नशीबाचे भोग होते हे सगळे. निलाक्षी निर्दोष आहे."

आपलं कार्ड सदुच्या हातात टेकवत चिराग म्हणाला. त्याने प्रयत्नाने आपले अश्रु सदुपासून लपवले. चिराग गेट ढकलून आत जाणार इतक्यात सदुने चिरागचा हात पकडला

"बास काय साहेब!!!!!! एव्हढीच किंमत का माझी? मी नाही तुम्हाला एकटं सोडुन कुठे जाणार. मी तुम्हाला का मदत करतोय हे माझं मलाही नाही माहीती. पण तुमचा चेहरा सेम माझ्या दादा सारखा दिसतो. तुम्ही बोलता पण अगदी त्याच्या सारखेच. तुम्हाला पाहिलं की त्यालाच पाहिल्याचा भास् होतो मला. फार जीव होता त्याचा माझ्यावर. नेहमी एकत्र असायचो आम्ही.
पण एकदिवस तो मला सोडुन गेला. ...कायमचा
तो गेल्यापासून आता मी अगदी एकटा असतो. आता त्याच्यावर अशी वेळ आली असती तर त्याला मी असा एकटा सोडला असता का?"

आपल्या मोठ्या भावाची आठवण आल्यामुळे सदुचे डोळे पाणावले. त्याने ते शर्टाच्या बाहीने पुसत लगेच म्हणाला.

"तसही हे फार जोखमीच काम आहे. कुणीतरी लक्ष ठेवणार हवं तिथे."

चिरागने सदुच्या खांद्यावर हात ठेवला. त्यावर सदु हलकेच हसला. दोघांनी एकसाथ तो लोखंडी गेट आत ढकलला.

******************************************************************************

चिराग गेटच्या आत आल्यावर त्याने एकदा सभोवताली नजर फिरवली. अंगणातला गुलमोहर अगदी स्तब्ध उभा होता. चिरागने त्याच्याकडे पाहिलं असता त्याला दडपण आलं. त्याने लगेच आपली नजर त्या गुलमोहरावरून काढुन घेतली आणि घराकडे झपझप चालु लागला.

ते दोघे ओसरीजवळ पोहचले. बाहेरून घर अगदी शांत वाटतं होतं, जणुकाही तिथे कुणी रहातच नाहिए. चिरागला प्रचंड दडपण आलं होतं. त्याने एकवार सदुकडे पाहिलं. त्याने नजरेने चिरागला तो त्याच्या सोबत असल्याचं सांगितलं. चिरागने दंडाला बांधलेला तो धागा पुन्हा एकदा चाचपुन बघितला.

चिराग हळुच ओसरीवर चढला. सदु खालीच थांबला होता. घराचं दार बंद होतं. चिरागने खिश्यातुन बाबांनी दिलेला तो खिळा काढला. त्या खिळयाला उंबऱ्याच्या बरोबर मधे ठेवून त्याने हातोडीने पहिला घाव घातला. त्या शांत आसमंतात तो आवाज केव्हढ्याने तरी घुमला.

चिरागने खिळ्यावर पहिला घाव घातला त्याक्षणीच वरच्या खोलीतून निलाक्षीची जोरदार किंचाळी ऐकू आली. अंगणातला गुलमोहर केव्हढ्याने तरी सळसळला. चिराग आणि सदुला हा इशारा समजला. चिरागने पुन्हा एक जोरदार घाव घातला. 
चिराग एका मागोमाग घाव घालत होता. तेव्हढ्यात त्याला आतमधे हालचाल जाणवली. बहुतेक वरच्या खोलीतून कुणीतरी दणदणत ओरडत खाली येत होतं. तो आवाज सदुनेही ऐकला म्हणुन तोही चिरागला त्याचं काम लवकर उरकायला सांगत होता.

अंगणातल्या गुलमोहराची सळसळ आता कमालीची वाढली होती. चिराग आता भराभर घाव घालत होता अजुन तिन चार फ़टक्यानंतर त्याची खिळा ठोकायची प्रक्रिया पुर्ण होणार होती की इतक्यात..

दार उघडलं.....आणि निलाक्षी दारातचं उभी होती.

निलाक्षीचा अवतार पाहून दोघेही घाबरले. तिचा चेहरा पांढरा फ़ट्टक पडला होता. जणुकाही अंगात रक्तच नाहिए.......अगदीच निर्जीव. तिचे डोळे सुजले होते. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. तिच्या डोळ्याच्या बाजुला एक व्रण उमटला होता...चांगला ठसठशीत. 

ती फुत्कारत होती. समोर चिरागला उभं  पाहून तिने सरळ त्याची गंचाडीच धरली. पण पुढच्याच क्षणाला ती त्याच्यापासून दूर उडाली आणि आत जाउन पडली. जणुकाही कुणितरी तिला जोरात ढकलून दिलं.

चिराग आश्चर्याने आत उडावलेल्या निलाक्षीकडे पहात होता. त्याला नक्की हां काय प्रकार घडला ते कळत नव्हतं.तो घाबरून तसाच उभा राहिला होता.

सदुने चिरागला थांबलेल पाहून हाक मारली.
"दादा खिळा ठोकुन झाला का?"

चिरागने मानेनेच होकार दिला तसा सदुने त्याला परत फ़िरायची खुण केली.

चिराग ओसरीवरुन खाली उतरतच होता की, त्याने पुन्हा एकदा मागे वळुन पाहिलं. निलाक्षी अजुनही तशीच आत जमिनीवर पडलेली होती. तिची काही हालचाल होतं नाही हे पाहून चिरागने तिला हलकेच हाक मारली. चिरागचा आवाज ऐकून निलाक्षी हळुहळु उठु लागली. मगाशी बहुतेक ती जोरदार आपटली असावी, कारण तिला उठताना होताना त्रास स्पष्ट दिसत होता.

तिने मागे वळुन चिरागकडे पाहिलं आणि रडायला लागली.

"चिराग....मला घेउन चला इकडून. मला खुप भिती वाटते इथे. तुम्हाला काय झालय? तुम्ही असे का वागताय माझ्याशी? मी तुमची निलाक्षी आहे. मला सोडुन जाऊ नका हो...मला खुप भिती वाटतेय इथे. मला एकटं सोडुन नका जाऊ प्लीज."

निलाक्षी गयावया करू लागली. निलाक्षीला असं रडताना पाहून चिरागला कससंच झालं. त्याचं काळिज हेलावलं. त्याला जाणवलं की निलाक्षीला खरच त्याच्या आधाराची गरज आहे. काहीही झालं तरी ती त्याची बायको होती आणि आपण तिला ह्या अवस्थेत असं सोडुन जाणं त्याला योग्य वाटतं नव्हतं.

त्याने तिच्याकडे पाहिलं. ती अजुनही रडतच होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. अखेर चिरागला रहावलं नाही तो तिच्याकडे जाऊ लागला. ती फार आशेने चिरागकडे पहात होती. तेव्हढ्यात त्याच लक्ष तिच्या उजव्या डोळ्याच्या बाजुला आलेल्या डागावर पडली. हा व्रण कसला? पहिली तर निलाक्षीच्या चेहऱ्यावर असली काही खुण नव्हती.

तो ह्या विचारात उंबरा ओलांडुन आत जातच होता की, तेव्हढ्यात त्याला पाठीमागुन कुणीतरी खेचलं.

"अहो साहेब काय करताय? विसरलात का तुम्ही?" पाठीमागुन सदु त्याला बाहेर ओढत असताना जोरात ओरडला. तसा चिराग भानावर आला. त्याने बावरुन एकदा सदुकडे आणि एकदा निलाक्षीकडे पाहिलं.

हातात आलेली संधी अशी चुकलेली पहाताच निलाक्षी चवताळली. निलाक्षी एका जंगली श्वापदा सारखी त्याच्याकडे पहात होती. तिच्या चेहर्यावर हिस्र भाव होते.

"हरामखोर...त्या भडव्याच्या नादाला लागुन नको ती आगळीक करू नकोस. भारी पडेल तुला. सोडणार नाय मी तुला."

निलाक्षी त्या दोघांना शिव्या घालायला लागली. ती धावत त्यांच्या अंगावर आली तसे ते दोघे मागे झाले. पण ती दाराच्या चौकटीपाशीच अडली. बाबांनी दिलेल्या खिळ्याने आपले कर्तव्य बजावायला सुरुवात केली होती.

चिराग आणि सदु दोघेही धावत गेटच्या बाहर येउन उभे राहिले. निलाक्षी घराबाहेर पडायचा प्रयत्न करत होती. पण कितीही प्रयत्न केला तरी तिला ते जमत नव्हतं. ती दाराच्या चौकटीच्या जवळ येताच ती विव्हळत होती. तिने खिडकीतुन बाहेर यायचा प्रयत्न केला असता, खिडकीच्या गजांना हात लावताच तिला चटके बसत होते. तिची चिडचिड आता प्रचंड वाढली होती. त्या घरातून येनारया तिच्या आरोळ्या ऐकून त्या दोघांच काळिज शहारत होतं. ते दोघे जीव मुठीत घेउन गेटवर घरावर लक्ष ठेवत बाबांची वाट पहात होते.

प्रत्येक सरणारा क्षण त्यांच्या जिवावरच दडपण वाढवत होता. बघता बघता संध्याकाळ झाली. घराची सावली लांब लांब वाढून त्यांच्या पायापाशी पोहचली होती. घरातून येणारे आवाज आता अजुन वाढले होते. मगासचा गुरकावण्याचा आवाज आता खदखदून हसण्यात बदलला होता. निलाक्षीच्या प्रत्येक किंचाळी पाठोपाठ त्या दोघांचा धीर सुटत चालला होता.

इतक्यात.......

"अलख निरंजन.........."

पाठीमागून आलेल्या आवाजाने दोघेही दचकले.

******************************************************************************

त्या दोघांनी आवाजाच्या दिशेने पाठीमागे वळुन पाहिले तर तिथे बाबा उभे होते. त्यांच्या एका हातात कमंडलु तर दुसऱ्या खांदयावर एक झोळी होती. बाबांना आलेलं पाहून त्या दोघांच्या जीवात जीव आला. ते दोघे धावतच बाबांकडे पोहचले. बाबा फार सावधपणे आजुबाजुला पहात चालत येत होते. त्यांची गंभीर नजर आजुबाजुच्या सगळ्या चराचरांवर फिरत होती.

चिराग आणि सदु बाबांसमोर हात जोडून उभे होते. बाबांनी एकवार त्या दोघांना खालून वर न्याहाळलं आणि पुन्हा आपली वेधक नजर आजुबाजूच्या सगळ्या गोष्टीवरुन फिरवली आणि घराच्या दिशेने चालु लागले.

ते तिघेहीजण गेटवर पोहचले. एव्हाना आता बऱ्या पैकी अंधारुन आलं होतं. सदुने पुढे होउन तो गेट उघडला. त्या शांत वातावरणात त्या गेटची करकर अंगावर काटा उठवत गेली. चिराग आणि सदु आत गेले. त्यांनी पाहिलं की बाबा अजुन गेटवरच उभे होते. त्यांची नजर अंगणातल्या गुलमोहरावर खिळली होती. बाबांनी जसे आपले पाउल गेटच्या आत ठेवले तसा तो गुलमोहर जोराचा सळसळला. बाबांच्या कपाळाला पडलेल्या आट्या स्पष्ट दिसत होत्या. ते त्या गुलमोहराकडे एकटक पहात आत आले तसे अचानक वातावरण बदलू लागले. आजुबाजुचा अंधार अजुन गडद झाला, जोराचा वारा वाहू लागला. 
थोड्याच वेळात सगळं शांत झालं. जोरात वहाणारा वारा अचानक मंदावला. आसमंतात साचलेलं जडत्व थोड निवळलं.अचानक घडलेल्या ह्या प्रकाराने गोंधळलेल्या चिराग आणि सदु घाबरून बाबांकडे पाहिलं. बाबा शांतपणे त्यांच्या जागेवर उभे होते.

"घाबरू नका. हा फ़क्त तिने मला दिलेला इशारा होता" एव्हढं बोलून बाबा घराच्या दिशेने चालु लागले.

तेव्हढ्यात आसमंतात एक आरोळी घुमली.

"चालता हो रे ...........
फ़ुकटचा मरशील............."

बाबांसकट सगळ्यांनी चमकून आवाजाच्या दिशेने पाहिलं. तर वर खिडकीत निलाक्षी उभी होती. तिच्या डोळ्यात विखार साठला होता. चिरागला तर तिला असं त्यांचाकडे बघताना पाहून धडकीच भरली.

बाबांनी एकनजर तिच्याकडे पाहिलं. आणि ते मग तिच्याकडे पहातच घराकडे चालु लागले. आपण दिलेला इशारा हा माणुस ऐकत नाही, हे पाहून निलाक्षी अजुनच चवताळली. तिने खिडकीतुन खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा बाबांनी मंतरुन दिलेल्या त्या खिळ्याच्या प्रभावामुळे तिला बाहेर पडता येईना. ती रागाने बेभान झाली. ती आता  स्वत:च्याच थोबाडीत मारून घेउ लागली. स्वत:चे केस ओढु लागली. ती जोरजोरात ओरडत आत गेली. चिराग हे सगळं पाहून गांगरला.

"निलाक्षी.." म्हणत तो पुढे सरसावला.
इतक्यात बाबांनी त्याच्या हाताला धरला आणि थांबवलं.

"ती तुझी बायको नाही. हे तू तुझ्या मेंदुत पक्कं गोंदवुन घे. ती सध्या कुणाच्यातरी प्रभावाखाली आहे. तिला वाचवायच असेल तर तुला खंबीर व्हावं लागेल." बाबांनी असं सांगताच चिरागला त्याची चुक समजली.

बाबांनी ओसरीवर पाउल ठेवताच, समोरच्या बंद दरवाज्यावर आतून कोण तरी येउन धडकलं. जसजसे बाबा दाराजवळ जात होते तस आतून दरवाज्यावर नखाने ओरबाडल्याचा आवाज येत होता.

एक दीर्घ श्वास घेउन बाबांनी दरवाजा लोटला. पण दरवाजा उघडल्यावर पाहिलं तर दारामागे कुणीच नव्हते. बाबांनी उंबर्यावर उभं राहून आपल्या हातातल्या कमडंलुमधले पाणी तुळशीपत्राने घराच्या आत उडवलं. तापलेल्या तव्यावर पाणि पड्लं की कसं चर्र्र्रर आवाज येतो तसा आवाज आला.

सगळेजण आता घरात आले. आतमधे आल्यावर बाबा आपल्या कमंडलुमधील पाणी उडवत चालत होते. सगळीकडुन चर्र्र्रर....चर्र्र्रर्र्र....असा आवाज येत होता. आतमधे भयाण शांतता होती. निलाक्षीचा कुठेही मागमुस दिसत नव्हता. चिराग आणि सदु घाबरून इकडे तिकडे पहात होते.

बाबांनी हॉलच्या मध्यभागी आपल्यासोबत आणलेल्या सामानाची मांडणी केली. आपल्या गुरुला नमन करून बाबा त्यांच्या कार्याच्या तयारीला लागले. सदु त्यांना मदत करत होता. चिरागला बाबांनी एका कोपरयात उभं रहायला सांगितलं होतं.

बाबांनी एक होम पेटवला. त्याच्या समोरच्या भागात त्यांनी एक रिंगण काढलं. मंत्राची आवर्तन सुरु झाली. बाबांनी मंत्र म्हणायला सुरुवात करताच लगोलग वरच्या रुममधुन त्यांना एकामागुन एक किंचाळ्या ऐकू येउ लागल्या.

बाबांनी त्यांचा मंत्रघोष सुरु ठेवला. आता कुणीतरी दणदणत खाली येत होतं. चिराग आणि सदु घाबरून जिन्याकडे पाहू लागले. त्यांना दिसलं की समोर जिन्यावर निलाक्षी उभी होती. तिचे केस अस्त्यावस्त पसरून तिच्या चेहरयावर आले होते. रागाने तिचा उर धपापत होता. ती गुरगुरत होती. घरात सुरु असलेला हा मंत्रघोष तिला अजिबात सहन होत नव्हता. येताना ती आपला राग बाजुच्या भिंतीवर नखं घासून व्यक्त करत होती.

तिने शेवटच्या पायरीवरून खाली पाय ठेवणार इतक्यात ती थांबली. ती हवेत काहीतरी हुंगल्यासारखे केले.

"हरामखोर......" असं बोलून ती आल्यापावली परत जायला निघाली. पण बाबांनी हवेतच काहीतरी पकडल्यासारखं केलं. त्यासरशी जिन्यावर उभ्या असलेल्या निलाक्षीचे केस हवेत उचलले गेले अणि ती मागे मागे येउ लागली.

बाबा पुर्ण ताकदीनिशी तिला खेचत होते. निलाक्षी खाली हॉलमधे आली. बघताना असं वाटत होतं कुणीतरी अदृश्य शक्ती निलाक्षीचे केस धरून तिला फ़रफ़टत आणत आहे. खाली जमिनीवर पाय पडताच निलाक्षी विव्हळत होती.

बाबांनी आता निलाक्षीला रिंगणात आणुन बसवले होते. त्यांनी एकवार तिच्याकडे आणि सगळ्या घराकडे पाहिलं. त्यांनी चिरागला उंबऱ्यावरचा खिळा काढण्यास सांगितला. चिरागने एकदा निलाक्षीकडे आणि एकदा बाबांकडे पाहिले. बाबांनी त्याला नजरेनेच आश्वस्त केलं.

चिरागने हातातल्या हातोडीने तो खिळा काढण्यास सुरुवात केली. त्याला फार जोर लावावा लागत होता. अखेर तो खिळा निघाला. चिरागने तो खिळा बाजुला ठेवायला तो उचलला असता त्याला जाणवलं की, तो खिळा प्रचंड गरम झाला होता.

तेव्हढ्यात पाठीमागुन निलाक्षीचा आवाज आला. चिरागने घाबरून झटक्यात मागे पाहिले. तर ती बसल्या जागेवरुनच त्याच्याकडे पहात गुरगुरत होती. तिच्या नजरेतल्या त्या विखाराने चिराग जागीच थिजला. तो तसाच उठून धडपडत परत सदुच्या शेजारी येउन उभा राहिला. तिची नजर त्याच्यावरच खिळलेली होती. जणुकाही ती त्याला इशारा देत होती की, हे सगळं तू करून किती मोठी चुक केली आहेस.

आता बाबांनी मंत्र जपत समोरच्या होंमात आहुती सोडायला सुरुवात केली. तर तिकडे निलाक्षी बसल्या जागेवर घुमायला लागली. जसजसे मंत्रांची आवर्तने वाढू लागली तसतशी निलाक्षीही जोरजोरात घुमु लागली. मध्येच ती ओरडायची.

बाबांनी आता मंत्र थांबवले आणि धीरगंभीरपणे समोर बसलेल्या निलाक्षीकडे पाहू लागले. रात्रीच्या त्या निरव शांततेत समोर पेटलेल्या हवन कुंडाचा आणि निलाक्षीच्या हुंकाराचाच काय तो आवाज येत होता.

ह्या सगळ्या प्रकाराच चिरागला फार दडपण येत होतं. महिन्याभरापुर्वी त्याच्या आयुष्यात असलं काहीतरी घडेल ह्याची सुतरामही शक्यता नव्हती, पण आता समोर घडणार्या गोष्टी तो बधीरपणे पहात होता.

"कोण आहेस तू???????" बाबांनी  निलाक्षीला प्रश्न केला.

उत्तरादाखल निलाक्षी मान खाली घालून फ़क्त घुमत राहिली.

"बोल......" बाबांनी आवाज चढवत तिला विचारले.

निलाक्षी उत्तर देत नाही हे पाहून बाबांनी त्यांच्या हातातली काठी जोरात जमीनीवर आपटली आणि तिच्यावर जोरात गरजले.
"सांग, आता तुला शेवटचं विचारतोय.....नाव काय आहे तुझ?"

"शेवंता........" समोर बसलेली नीलाक्षी बोलली. तिचा आवाज ऐकून चिराग हादरलाच.

"का आली आहेस इथे?"

"मी हिथच हाय. हेच उपरे हत. हे माझ घर हाय." निलाक्षीच्या अंगातली शेवंता गुरगुरत बोलली.

इथ दुसारा कोण बी राहणार नाय।
आणि ह्या हिला तर मी अजिबात सोडणार नाय।

"अगं कुठलं घर? हे तुझ घर नाही"

"नाय........" बाबांनी तिला असं म्हणताच ती केव्हढ्याने तरी चवताळली.

"हे माज घर हाय. फकस्त माज.माज्या बानं बांधलं हूत माज्यासाठी. पण त्या हराम्यान माज्याकडुन हिसकावून घितलं."

"कुणी?????" बाबांनी विचारलं.

"माज्या नवर्यानं.कुत्रा साला....." असं बोलून निलाक्षीच्या अंगातली शेवंता पचकन जमिनीवर थुंकली.

"माजा बा जित्ता होता, तोवर लई चांगला राहिला माज्यासंग. माझा बा गेला त्या संग माझा नवरा बी संपला. उरला तो लांडगा. माज्या बाचा संम्दा पैका त्याने बाई आणि बाटलीवर उडवला. लई मारायचा मला. माज्या उरावर बाहेरच्या बायका घरात घेउन यायचा आणि मला घराबाहेर काढायचा. मी लाख इनवण्या केल्या त्याच्या, पण नाय बधला. मी हिथच ओसरीवर नायतर समोरच्या गुलमोराच्या झाडाखाली बसून असायची. माझ्या नवऱ्याच्या आणि त्या सटव्यांचे चाळे बघत. माज सवताच घर असून बी पाउसवाऱ्यात मी बेवारश्यासारखी इथ पडलेली असायची.माज्यावर जराबी तरस नाय आला तवा त्याला." निलाक्षी च्या अंगातली शेवंता आता जास्त जोरात घुमायला लागली.

"पुढे बोल...." तिला शांत झालेलं पाहून बाबांनी आपल्या हातातली आहुती होमात टाकत तिला विचारलं.

त्या होमाचा जाळ वाढताच निलाक्षिच्या अंगातली शेवंता जोरात फ़िस्कारली.

"एक दिस तो आला. लै प्यायला व्हता. त्याच्या हातात एक कागुद व्हता. मला म्हणला. चल हीथ अंगठा लाव. मी न्हाय म्हणली तशी त्यानं खाडकन माज्या कानाखाली वाजवली. तो मला गुरावानी बडवत व्हता पण म्या नायच म्हणत राहिली. मला कळलं हुत की, तो माज घर माज्याकडुन हिसकावून घेत व्हता. कारण माज्या आणि माज्या घराशिवाय बाकी काय उरलंच नव्हतं त्या भाड्याकडं इकायला......

मी पण मग दिली त्याच्या एक थोबाडीत ठेवून.

तसा तो बिथरला. त्याने मला फ़रफ़टत बाहीर आणली आणि दिली लटकवुन त्या गुलामोराच्या झाडाला आणि माझा अंगठा त्या कागदावर लावून घेतला. मला मारून गावभर बोंबलत फिरला की मी वांझपणामुळे आत्महत्या केली म्हणुन. भडव्या ने मेल्यानंतर बी मला माज्या घरात नाही आणली. संमद कार्य बाहिर ओसरीवरच उरकलं.

म्या सम्हदं त्या गुलमोराच्या झाडावरुन पहात होते..........." निलाक्षीच्या अंगातल्या शेवंताचा आवाज आता रडवेला झाला होता.

सगळे शांत झालेले. निलाक्षीच्या अंगातली शेवंता जोरजोरात रडत होती. थोड्यावेळाने तिचा आवेग ओसरला व् ती पुढे सांगु लागली.

"मी मेल्यावर लई माज आला होता त्याला. नुसता हैदोस घातला होता मेल्याने. एक दिस लई पिऊन आलता. सोबत एक नवीन बाई होती. तिच्या कमरेत हात घालून झोकांड्या देत माझ्या घराकडे चालला होता. मधेच काय झालं काय नाय. हिथंच झाडाखाली येउन मला आणी माज्या बा ला शिव्य दयाया लागला.

मला बी तो आयताच सापडला. मी तशीच झाडावरुन खाली उतरले. मला बघून त्याची बोबडीच वळाली आन ती नटमोगरी ढुंगणाला पाय लावून कधीच पशार झाली." हे सांगताना निलाक्षीच्या अंगातली शेवंता खदखदून हसायला लागली.

"बराच काय करायचा होतं मला त्याच्याबरुबर. सगळा हिशोब चुकता करायचा होता. पण म्या काय करायच्या अगुदरच छातीत कळ येउन गेला.

भाडखाउ"

निलाक्षीच्या अंगातली शेवंता फुत्कारु लागली. तिचे डोळ्यात आता अंगार फुलला होता. तिच्या डोळ्याच्या बाजुचा तो व्र्ण अजुन गडद झाला होता. ती पुन्हा घुमायाला लागली.

"तुझा नवरा तर मेला मग हिला का धरलीस?" बाबांनी शेवंताला विचारलं.

"हे माज घर हाय. हित माझ्याशिवाय दुसरया कुणाचीच सत्ता चालु देणार नाय." शेवंता बाबांवर डोळे वटारुन बोलली. तशी चिरागच्या मणक्यातुन भितीची एक लहर सरसरत गेली.

"चुप......मला डोळे दाखवतेस. बघतोच कशी नाही जात ती"

बाबांनी तिच्याकडे पाहून पुन्हा मंत्रपठण करायला सुरुवात केली. आता त्याच्या आर्वतनानां वेगळाच जोर आला होता. जसजशी मंत्रघोषांचा आवाज घरभर घुमु लागला तसे निलाक्षीच्या चेहर्यावरचे भाव बदलू लागले. ती संतापु लागली. ती आता फारच घाण शिव्या देत होती, पण बाबांवर तिचा काहीएक परिणाम होतं नव्हता. ते समोरच्या होमात आपल्याकडच्या समिधा ट़ाकत होते. हळुहळु तीच शरीर ताठ होउ लागल. तिचा चेहरा लाललाल झाला होता. तिच्या चेहऱ्यावरचे क्रोधाचे भाव आता वेदनेत बदलत होते. ती जमिनीवर लोळु लागली.

निलाक्षीला असं विव्हळताना पाहून चिरागचा जीव कासावीस होत होता. त्याला वाटतं होतं की उठून हे सगळं बंद करावं. पण त्याचा हा विचार क्षणिकच ठरला. कारणं पुन्हा त्याच्या कानावर निलाक्षीची गुरगुर पडली. ती आता जमिनीवर उताणी झोपली होती. ती जोरजोरात श्वास घेत होती.  तिचे हातपाय वाकडे होउ लागले. तिला आकडी येउ लागली. आता ती तोडांने विचित्र आवाज काढु लागली. हळुहळु तीच शरीर वर उठु लागलं. फ़क्त हाताची आणि पायाची बोटं जमीनीला लागली होती. बाक़ी सगळं शरीर हवेत उचललं गेलं होतं. तिच्या शरीराची कमान झाली होती. तिने एक जोराची आरोळी ठोकली. तिच्या सर्व शरीरातून आता पांढऱ्या वाफा बाहेर येत होत्या.

चिराग हे सगळं पाहून कमालीचा घाबरला होता. निलाक्षीच्या शरीरातून बाहेर पडणार्या त्या वाफेला हळुहळु एक आकार येउ लागला. सुरुवातीला चिरागला वाटलं की त्याला भास् झालाय की काय, पण शेजारी उभ्या असलेल्या सदुने त्याचा दंड घट्ट पकडला आणि तोही घाबरून समोर त्या वाफेने तयार होणार्या आकृतीकडे पहात होता.

एव्हाना निलाक्षीच्या शरीरातून बाहेर पडलेल्या वाफेची प्रतिमा पुर्ण तयार झाली. ती एका बाई सारखी दिसत होती. 
ती नक्कीच शेवंता होती. तिचा उग्र चेहरा, तिच्या डोळ्याखालची खुणेमुळे अजुनच बेसुर दिसत होता. त्या आकाराला फारच दुर्गंधी सुटली होती. श्वास घेणं ही मुश्कील होत होतं."ती अजुनही मी नाही जाणार. हे माझं घर आहे." असचं म्हणत होती.

बाबांनी तिच्याकडे एक नजर पाहिलं. आपले डोळे बंद करून त्यांनी एक मंत्र म्हटला आणि हातातली शेवटची आहुती समोरच्या हवन कुंडात टाकली.ह्यावेळेस नेहमीपेक्षा मोठा जाळ झाला. होमातल्या ज्वाला जवळजवळ छतापर्यंत पोहचल्या त्यासरशी शेवंताची ती आकृती एक मोठी किचांळी फोडून घराबाहेर निघून गेली आणि लगोलग बाहेरून एक मोठा आवाज ऐकू आला. चिराग आणि सदुने बाहेर येउन पहाताच त्यांना समोरचा गुलमोहर आगीने भगभगताना दिसला. चिरागला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. सदुदेखिल कावराबावरा झाला होता.

तेव्हढ्यात चिरागला निलाक्षीची आठवण आली. तो पुन्हा धावत घरात आला. त्याच्यामागोमाग सदुही आत आला. चिरागने आत आल्यावर पाहिलं की निलाक्षी शांत झोपली होती. तिचा श्वास मंद चालत होता.

बाबा तिच्याजवळ बसलेले होते. त्यांनी त्या होमातली राख समोर झोपलेल्या निलाक्षीच्या कपाळाला लावली. चिराग निलाक्षीच्या जवळ येउन बसला. बाबांनी आता त्यांच्याकडचा मंतरलेला तावीज निलाक्षीच्या दंडावर बांधला आणि म्हणाले
"घाबरू नकोस उद्या सकाळपर्यंत शुध्दिवर येईल ती."

बाबांनी असं सांगताच पहिल्यादांच चिरागच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. पण ते जास्त काळ टिकलं नाही. कारण बाबांचा चेहरा आता धीरगंभीर झाला होता.

"ती गेली असली तरी धोका अजुन पुर्ण टळलेला नाही. तिचे कार्य करावे लागेल, त्याशिवाय तिला मुक्ती मिळणार नाही."

"मग कधी करायचे कार्य?" चिरागने अधीरपणे विचारलं.

"उद्या लगेचच.....ताबडतोब" बाबा उत्तरले.

"पण ती परत आली तर?" सदुने घाबरून चिरागच्या मनातली शंका विचारली.

"ती आता परत नाही येणार आणि आली तरी घरात नाही येणार. फ़क्त हिला जपा. मी तिला हा तावीज बांधलाय, जेणेकरुन तिला काही त्रास होणार नाही.पण तरीही जोवर कार्य पुर्ण सिध्दीस जात नाही तोवर हिला उंबर्याबाहेर जाऊ देऊ नका."

बाबांच्या सूचना ऐकताच चिराग आणि सदु एकामेकांच्या तोंदाकडे पाहू लागले. चिरागच्या चेहर्यावर टेंशन स्पष्ट दिसत होतं. घरात एक शांतता पसरली होती. एव्हाना सकाळचे चार वाजत आले होते.

"मला आता निघावं लागेल. त्या प्रेतात्म्याच्या मोक्षासाठी आणि ह्या घराच्या शुध्दिसाठी तयारी करायची आहे. मी लवकरच परत येईन पण मी सांगितलेलं लक्ष्यात ठेवा, नाहीतर सगळं मुसळं केरात जाईल" एव्हढं बोलून बाबा निघायची तयारी करू लागले.

चिराग सरळ बाबांच्या पायावर जाउन पडला. बाबांनी त्याला उठवले आणि नजरेनेच त्याला " तू घाबरू नकोस होईल सगळं व्यवस्थित" असा दिलासा दिला.

बाबा निघून गेल्यावर सदुने दरवाजा लावला. आता त्या घरात तिघे उरले होते.

 

निलाक्षी अजुनही त्या रिंगणात झोपलेलीच होती. सदु जवळच्याच एक कोपरयात कधी त्या दोघांकडे पहात तर कधी त्या घराकडे पहात बसला होता. चिराग निलाक्षीच्या बाजुला बसून तिच्याकडे पहात होता. ह्या सगळ्या प्रकरणात ती फार दमली होती. तिचा चेहरा फारच मलूल दिसत होता. तिच्या डोळ्याखालचा व्रण अजुनही पुसटसा थोडा थोड़ा दिसत होता.

वेळ फार हळुहळु सरत होती. सगळीकडे शांत होतं. निलाक्षीचा श्वास फार खोल चालत होता. पण मधेच ती झोपेत दचकत होती. तिच्या बंद पापण्याआड तिची बुब्बुळ वेगाने फिरायची. तिचा श्वास वाढायचा. मग अचानक सगळं शांत व्हायच.

उजाडेपर्यंत दर थोड्या वेळाने हां प्रकार घडत होता.

सकाळी बाबा आले. जळलेल्या गुलमोहराची राख घेउन स्मशानात गेले. साधारण तासाभराने परत येउन त्यांनी शेवंताचे उरलेले विधी त्यांनी घरात केले.
बाबा ध्यान लावून एकासलग काही विशिष्ट मंत्रांचा जाप करत होते. हे विधी पुर्णत्वास जात असताना चिरागला वातावरणातला ताण हळुहळु निवळत असल्याचं जाणवतं होतं.

सगळे विधि संपल्यावर त्यांनी त्यांच्या मडक्यातल्या पाण्याचे काही थेंब निलाक्षीच्या तोंडात सोडले आणि निलाक्षी हळुहळु डोळे उघडू लागली.

समोर चिरागला पाहून तिने त्याला गच्च मिठी मारली आणि एकदम रडायलाच लागली. चिराग तिचं सांत्वन करू लागला. तिने पुन्हा एकदा चिरागला डोळे भरुन पाहिलं. तिला रडताना पाहून चिरागही रडवेला झाला होता.

"मला ना वाईट स्वप्न पडलेलं की मी एका अंधार्या जंगलात हरवले आहे.आणि तुला शोधतेय." निलाक्षी रडता रडता चिरागला सांगु लागली.

हे ऐकून चिराग कावराबावरा झाला. त्याने बाजुला उभे असलेल्या सदु आणि बाबांकडे पाहिलं. चिराग कुणाकडे बघतोय हे पाहण्यासाठी निलाक्षीने मान वळवली असता ती दचकली. आपल्या आजुबाजुला काही अनोळखी व्यक्ती दिसताच निलाक्षी सावरून बसली.

"हे कोण आहेत?" तिने हळुच चिरागच्या कानात विचारलं.

"काही नाही, नंतर सांगतो" चिरागने निलाक्षीच्या ह्या प्रश्नाला बगल दिली. तिला ह्या अवस्थेत सगळं सांगणं त्याला सोयीस्कर वाटलं नाही. योग्य वेळ आली की तिला सगळं सांगावे असं त्याच मत होतं.

सगळं कार्य व्यवस्थित पार पडलय हे पाहून आता बाबांनीही समाधानाचा सुस्कारा सोडला.

"चला येतो आम्ही" एव्हढं बोलून बाबांनी आपल्या पिशवीतून एक तुळशीच रोप काढुन निलाक्षीच्या हातात दिलं.

"हे घ्या.....ह्याने तुमच्या वास्तुत शांती राहील." एव्हढं बोलून बाबा तिथून जाऊ लागले.

सदुला निलाक्षीकड़े लक्ष ठेवायला सांगुन चिराग धावत बाबांपाशी पोहचला.

"बाबा आपली दक्षिणा?" असे म्हणतं चिरागने पटकन आपल्या पाकिटाला हात घातला.

उत्तरादाखल बाबांनी हसून नकार दिला. आणि आपल्या हाताने चिरागचे पाकिट पुन्हा त्याच्या खिश्यात ठेवले आणि तसेच निघून गेले.

चिराग आश्चर्यचकित होउन बाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात होता आणि नकळत त्याचे हात कधी जोडले गेले त्याच त्यालाच कळलं नाही.

"दादा मी पण येतो आता" पाठीमागे सदु हात जोडून उभा होता.

सदुला पहातच चिरागला गलबलुन आलं त्याने त्याला घट्ट मिठी मारली आणि तो हमसाहमशी रडू लागला.

निलाक्षी गोंधळुन ह्या सगळ्या प्रकाराकडे पहात होती. तिला काय चाललय काही समजत नव्हतं.

******************************************************************************

 

चिराग ओसरीवर चहा पित पेपर वाचत बसला होता. अचानक पेपरातल्या एका बातमीने चिरागचं लक्ष वेधून घेतलं.

'अनंत करमरकरांनी वेडाच्या भरात हॉस्पिटलच्या खिडकीतुन उडी मारून जीव दिला.'

हि बातमी वाचुन चिराग हळहळला. कारण त्याला एकट्यालाच माहिती होतं की अनंत करमरकर निर्दोष होते. त्यारात्रीदेखिल चिराग केवळ मारुती स्त्रोत्रामुळे बचावला होता. नाहीतर भितीपोटी चिरागने निलाक्षीचंही तेच केलं असतं जे अनंत करमरकरांनी अनुजाच केलं. त्यांनी अनुजाचा खून केला नव्हता. एका आत्यंतीक भितीच्या क्षणाला त्यांच्याकडुन घडलेला तो अपघात होता. चिरागच केवळ नशीब बलवत्तर होतं, म्हणुन तो बचावला नाहीतर त्याचीही तीच गत झाली असती जी अनंत करमरकरांची झाली होती.

चिरागने अंगणातल्या त्या गुलमोहराच्या झाडाकडे पाहिलं. आता तिथे त्या झाडाच्या  अस्तित्वाच्या कुठल्याच खुणा नव्हत्या. गुलमोहराच्या त्या मोकळ्या जागेकडे पहाताना चिराग पुन्हा शहारला.

एव्हढ्यात टेलिफ़ोनच्या वाजणाऱ्या रिंगने चिराग भानावर आला.

******************************************************************************

हॉस्पिटलमधे निलाक्षी बेडवर डोळे मिटुन पडली होती. तिच्या चेहऱ्यावर तिला झालेला त्रास स्पष्ट दिसत होता. चिरागची चाहुल लागताच तिने हळूच डोळे उघडले. समाधानाने हसत तिने बाजुच्या पाळण्याकडे पाहिले. चिराग अधीरपणे त्या पाळण्याकडे गेला. नर्सने अलगद ते बाळ चिरागच्या हातात दिलं.

आपल्या मुलीला कुशीत घेउन चिराग कौतुकाने तिला न्याहाळत होता, की त्याची नजर एका गोष्टीवर पडली आणि तो शहारला.

तो अविश्वासाने तिच्याकडे पहात होता. त्याची लेक मधेच डोळे उघडून त्याच्याकडे पहात होती. पण चिराग मात्र तिच्या डोळ्यावरचा व्रणच बघत होता.

अखेर शेवंताने आपलं म्हणणं खरं केलं होतं. ती आता आपल्या घरात हक्काने परत आली होती.

समाप्त

A Story by
Amol Parab

 

 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचली. चांगला पिक्चर होउ शकतो यावर. पण मध्ये मध्ये ते गुलमोहराचे प्रसंग जरा जास्तंच रिपिटिटीव्ह आणि लांबलेले आहेत. पण आवडली.

चांगली लिहिली आहे कथा. सिरियल किंवा मूव्ही सारखं सर्व डोळ्यासमोर येतंय.
पण अशा कथांचा एक ठराविक साचा बनलेला असतो . त्याच चाकोरीतून जातात सगळ्या कथा, त्यामुळे अगदी प्रेडिक्टेबल होतात.

अति उत्तम, अप्रतिम....!!! अमोल भाउ, खरच मायबोलीवर इतक्या कथा वाचल्या, पण तुमच्या सारख्या भयकथा लिहीणारा लेखक अजुन मी मायबोलीवर पाहीला नाही...!!! खरच तुमची ही कथा वाचत असताना अंगावर शहारा आला. पुर्ण अर्धा तास खुर्चीला खिळुनच होतो. तुमचा तर मी आता 'पंखा' झालोय....!! तुमच्या पुढील लेखनास माझ्या कडुन भरभरुन शुभेछा....!! पुढील कथांच्या प्रतिक्षेत.....!!! पण कथेचा शिर्षक, आणि कथा, या मधील साधर्म्य कळाले नाही...!!

Nahi avadli ....kai navin vachtey as nahi vatle ....tech tech scene pn talta aale aste n kathe chi lambi kami krta ali asti ...
karan mi tumchya aadhi chya katha vachlya ahet jya chan hotya..so as vatat asel ..But keep writing...best luck:)

तुमच्या कथा मोठ्या असतात, पण वाचनीय असतात.
तुमच्या बाकीच्या अनेक कथांमधे साम्यस्थळे दिसली.. (भिंतिवरुन सरपटत वर सरकणारं भूत वगैरे..)

पण अशा कथांचा एक ठराविक साचा बनलेला असतो . त्याच चाकोरीतून जातात सगळ्या कथा, त्यामुळे अगदी प्रेडिक्टेबल होतात. +१
म्हणून या प्रतिक्रियेशी सहमत.
पुलेशु..

नेहमीच्या साच्यातली... पण खिळवून ठेवणारी -> +१
फक्त शेवटी चिरागही निलाक्षीला अगदी तसंच (लोखंडी सळईने) मारेल असं का कोण जाणे वाटलं होतं.
तसं झालं नाही हे वाचून हायसं झालं एकदम.

छान!!!!

छान.
पण एवढी मोठी कथा ३/४ भागात टाकावी असे वाटते.