'इज पॅरीस बर्निंग?' ...जेव्हा एक पुस्तक परत भेटतं!

Submitted by ललिता-प्रीति on 6 February, 2017 - 02:52

साधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात! मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एक खूप जुनं इंग्रजी पुस्तक! पुस्तकाचा संबंध पॅरीसशी होताच, शिवाय दुसर्‍या महायुद्धाशीही होता.
‘जागतिक महायुद्ध’ या गोष्टीशी आपला सर्वसाधारणपणे प्रथम परिचय होतो तो शाळेच्या इतिहासात. माझाही तसाच झाला. दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलचं सगळं तुम्हाला कळलं असं मानण्याची पद्धत आहे. ती बर्‍याच अंशी खरीही आहे. फक्त हे ‘सगळं’ म्हणजे ‘तत्कालीन ठळक राजकीय पैलू’ हे मला काही काळानं उमगलं.
पुढे हे कळत गेलं की या राजकीय पैलूंपलिकडेही या महायुद्धाची मोठी व्याप्ती होती. या युद्धाने प्रामुख्याने युरोपमध्ये ज्या-ज्या देशांना ग्रासलं, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांनी जे भोगलं त्याला काही सीमाच नव्हती. त्यामुळे त्यानंतरच्या वयात दुसर्‍या महायुद्धावर आधारित जी-जी पुस्तकं समोर आली त्यांच्यात ‘सर्वसामान्यांच्या वाटेला आलेले अपरिमित भोग’ या एका बाबीनं मला सर्वाधिक बांधून ठेवलं! त्या भोगाच्या अगणित कहाण्या आहेत. कारण सैनिकी युद्धाबरोबरच युरोपच्या घराघरात, गल्लीबोळात अस्तित्त्वाच्या लढाया लढल्या गेल्या होत्या...
वर्ष-दीड वर्षांपूर्वीच्या त्या संध्याकाळी पॅरीसमधल्या अशाच एका गल्लीतून चालत आम्ही सीन नदीचा काठ गाठला होता. ‘सीन रिव्हर क्रूझ’ हा आमचा पॅरीसमधला अखेरचा अर्ध्या-एक तासाचा कार्यक्रम आता उरला होता. जुन्या, ऐतिहासिक पॅरीस शहराच्या अंतर्भागातून जाणार्‍या नदीच्या भागातच ही फेरी होती. बोट निघाली. बोटीवरच्या माणसाने आधी फ्रेंच भाषेत आणि मग फ्रेंच तोंडावळ्याच्या इंग्रजीत सर्वांचं स्वागत केलं. बोटीत प्रत्येक खुर्चीलगत एक फोनसारखं उपकरण लावलेलं होतं. त्या माणसाने सांगितल्यानुसार त्यातल्या इंग्रजी भाषेचा पर्याय निवडून मी ते कानाला लावलं. बोटीच्या दोन्ही बाजूंना नदीकिनार्‍यालगत पॅरीसमधली जुनी पण भव्य बांधकामं दिसत होती. जसजश्या त्या इमारती दिसत होत्या तसतशी फोनमधून त्यांच्याशी निगडित इतिहासाची ध्वनिमुद्रित माहिती दिली जात होती. पण बोटीवरच्या साठ-सत्तर देशी-विदेशी प्रवाश्यांचा, त्यातही चिनी प्रवाश्यांचा, इतका कलकलाट चाललेला होता, की फोनमधे बोललं जाणारं काही धड ऐकूच येईना. त्यामुळे हताश होऊन मी तो फोन परत ठेवून दिला आणि निमूटपणे फोटो-व्हिडिओ काढायला सुरूवात केली. दर थोड्या वेळाने बोट एकेका पुलाखालून जात होती. ते पूल उत्तम स्थितीतले, सुरेख कोरीव काम केलेले; पुलांच्या कमानींना जोडणार्‍या खांबांलगत कोरीव, मोठे पुतळे; कुठे संत-महात्मा, देवीदेवता, तर कुठे इतिहासकालीन पराक्रमी पुरूष. नदीच्या दोन्ही किनार्‍यांवरच्या ऐतिहासिक इमारती तर इतक्या सुंदर दिसत होत्या. अश्या सार्‍या दृष्टीसुखाला फोनवरच्या माहितीची जोड मिळती तर काय बहार आली असती! पण हे मला एकटीला वाटून उपयोगाचं नव्हतं. त्यामुळे मी नुसतीच अनिमिष नजरेनं एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे बघत बसले होते. तरी अधेमधे न राहवून मी दोन-तीनदा तो फोन उचलून कानाला लावला. पण धड काहीही ऐकता येत नव्हतं. पॅरीससारख्या शहराशी असं अंतर राखून राहायचं हे माझ्या मनाला बरं वाटत नव्हतं. पण त्यावर काहीही उपाय नव्हता.
बोटीची फेरी संपत आली होती. मी अखेरचा प्रयत्न म्हणून परत एकदा तो फोन कानाला लावला. त्यातही निरोपाचं भाषण सुरू होतं. त्यातले काही तुटक शब्द कानावर आले - ‘..... ही राईड आवडली असेल ..... जगाला वेड लावणारी नगरी ..... एका व्यक्तीचे आभार ..... जनरल कॉल्टिट्झ .....’ वगैरे. त्यातलं ‘कॉल्टिट्झ’ हे नाव आसपासच्या कलकलाटातून मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत मी फोन ठेवून निघायच्या तयारीने जागची उठले होते... आणि अचानक डोक्यात लख्ख प्रकाश पडला, की ही व्यक्ती आपल्याला माहिती आहे! हे नाव पॅरीसशी कायमस्वरूपी जोडलं गेलेलं आहे; त्याबद्दल एका पुस्तकात आपण सविस्तर वाचलेलं आहे... ते पुस्तक म्हणजे लॅरी कॉलिन्स आणि दुमिनीक लापिए या लेखकद्वयीचं ‘इज पॅरीस बर्निंग?’! तब्बल ८-१० वर्षांनी त्या अत्यंत आवडीच्या पुस्तकाशी माझी परत एकदा अगदी अवचित गळाभेट घडून आली होती, आणि ती देखील चक्क पॅरीसमधेच! मला हर्षवायू व्हायचाच बाकी होता. आसपासच्या दोघा-चौघांना पकडून त्यांना आपल्याला झालेल्या आनंदाबद्दल सांगावं असं मला आता वाटायला लागलं...
ते पुस्तक प्रथम माझ्या हाती आलं तेव्हाही मला असाच हर्षवायू झाला होता!
हे माझ्या आजोबांच्या संग्रहातलं पुस्तक. माझे आजोबा पुस्तकवेडे होते. त्यांच्या खोलीची एक भिंत पुस्तकांनी भरलेल्या मोठाल्या कपाटांनीच सजलेली होती. बघू तिकडे पुस्तकंच पुस्तकं. त्यामुळे शाळेच्या सुट्टीत आजी-आजोबांकडे गेले की त्या कपाटांसमोर बसकण मारायची आणि आपल्याला हवं ते पुस्तक काढून पाहायचं, चाळायचं, वाटलं तर वाचायचं, हा माझा आवडीचा उद्योग असायचा. आजोबा गेल्यानंतर त्यांतली बरीच पुस्तकं शाळा-कॉलेजच्या वाचनालयांना भेट म्हणून दिली गेली आणि काही निवडक पुस्तकं तेवढी माझ्या आजोळच्या घरी उरली होती. मध्ये बरीच वर्षं गेली. एकदा कुठल्याश्या समारंभासाठी मी आजोळी गेलेले असताना एका कपाटात ती उरलीसुरली पुस्तकं दिसली आणि अगदी सहज माझी नजर या पुस्तकावर पडली. उभं ठेवलेलं पुस्तक, त्याचं जुनं-पुराणं खाकी कव्हर, त्यावर ‘I-1’ असं लिहिलेलं... ही पुस्तकांना क्रमांक द्यायची आजोबांची पद्धत मला ठाऊक होती. ‘I’ पासून नाव सुरू होणारं त्यांच्या यादीतलं हे पहिलं पुस्तक, तशी पूर्वी आणखी अनेक असणार त्यांच्याकडे. पुस्तकाचं कव्हर वरच्या बाजूनं जरासं फाटलं होतं. त्यातून ‘IS PARIS’ इतकी अक्षरं मला दिसली. मी ते पुस्तक बाहेर काढलं; उघडलं. ‘One of the most dramatic stories of World War II...’ हे वाचलं आणि माझे डोळे विस्फारले गेले. मी ते पान उलटलं... ‘IS PARIS BURNING? -ADOLF HITLER August 25, 1944’... पुस्तकाची आवृत्ती जून, १९६५ची... बस्स! मला आणखी काय हवं होतं!
त्यानंतर काही दिवसांनी एका कामानिमित्त एक महिनाभर वारंवार ट्रेनचा प्रवास घडला होता. हे पुस्तक मी त्या महिन्याभराच्या प्रवासादरम्यान वाचून काढलं होतं.
नाझींच्या ताब्यातून पॅरीसची सुटका हा या पुस्तकाचा विषय. पुस्तकाच्या ‘द मॅनेस’, ‘द स्ट्रगल’ आणि ‘द डिलिव्हरन्स’ या तीन विभागांमध्ये १९४४ सालच्या ऑगस्ट महिन्यातल्या अवघ्या सहा दिवसांचं वर्णन आहे. चार वर्षं नाझींच्या कचाट्यात सापडलेलं पॅरीस, तिथल्या नागरिकांची झालेली दशा, मग जनरल द गॉलची फौज आणि दोस्त राष्ट्रांचं सैन्य यांच्या मदतीनं पॅरीसच्या नागरिकांनी दिलेला निकराचा लढा आणि जर्मन सैन्याची शरणागती असा तो साधारण घटनाक्रम. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी दोन्ही लेखकांनी जवळपास तीन वर्षं या विषयासंदर्भात संशोधन केलं होतं. लाखो कागदपत्रं, नोंदी तपासल्या होत्या; शेकडो व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या सार्‍या जमा झालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी पॅरीसमधल्या त्या सहा दिवसांचं चित्र पुस्तकात उभं केलं आहे. त्या चित्रात राजकारणी आहेत, सैनिक आहेत, सैन्यं आहेत, मुत्सद्दी आहेत; पण त्याहीपेक्षा त्यात आहेत पॅरीसमधले सर्वसामान्य नागरिक. जर्मन सैन्याविरोधात ते रस्त्यांवर उतरले. ठिकठिकाणी त्यांनी ‘बॅरिकेड्स’ रचली. जर्मन सैन्याच्या वाटा अडवल्या. काय नव्हतं त्या बॅरिकेड्समध्ये! घराघरांतले दिवाण, कपाटं, इतर जड वस्तू, लहान-मोठे दगड, वाळू-मातीनं भरलेली पोती, पिशव्या; एका ठिकाणी तर एका पुराणवस्तूविक्रेत्याने आपल्या दुकानातला सगळा मालच बॅरिकेड्सवर रचला होता. दोस्तांच्या फौजांनी प्रत्यक्ष शहरात प्रवेश करेतोवर शहरभर असे जवळपास ४०० अडथळे उभे राहिले होते. चार वर्षांच्या दमनाचा हा निचरा होता. त्या कहाण्या सांगत लेखक आपल्याला पॅरीसच्या गल्लीबोळांमधून फिरवून आणतात. पॅरीसमधल्या मोठ्या, ऐतिहासिक इमारतींच्या संदर्भाने, अगदी त्या परिसराच्या भूगोलासकट त्या-त्या जागच्या चकमकींचं वर्णन करतात...
या सार्‍यात जनरल कॉल्टिट्झ कुठे बसत होता?
पॅरीस आणि फ्रान्स हातातून जाणार हे लक्षात येताच हिटलरनं ठरवलं होतं, की स्टॅलिनग्राड, वॉर्सा या शहरांप्रमाणेच पॅरीसही दोस्तांच्या हाती जायच्या आधी बेचिराख करायचं. त्यानं या कामगिरीवर जनरल डिट्रीश फॉन कॉल्टिट्झ याची नेमणूक केली. हा हिटलरचा ईमानी सहकारी; त्याच्या सर्व आज्ञा तंतोतंत पाळणारा. ऑगस्ट, १९४४च्या सुरूवातीला तो पॅरीसमधे रुजू झाला; मात्र २५ ऑगस्टला त्यानं दोस्तांच्या फौजेसमोर शरणागती पत्करली. पॅरीसमधली महत्त्वाची बांधकामं भूसुरुंगांद्वारे नाहीतर स्फोटकांद्वारे उडवण्याची सगळी तयारी झालेली होती. सर्वांत आधी सीन नदीवरचे पूल हे जर्मनांचं लक्ष्य होतं... तेच पूल ज्यांचं आम्ही बोटीत बसून कौतुक करत होतो; त्यांचे फोटो काढत होतो! पण जनरल कॉल्टिट्झनं आयुष्यात प्रथमच हिटलरचा हुकूम अव्हेरला. कारण तोवर हिटलरच्या विवेकशून्यतेबद्दल त्याची खात्री पटली होती. (त्याच्याच शब्दांत : हिटलरला वेड लागलं होतं.) त्यापूर्वी हिटलरच्या अश्या प्रकारच्या आज्ञा त्यानं शिरसावंद्य मानून अंमलात आणलेल्या होत्याच. मग पॅरीसमध्येच अवघ्या पंधरा-एक दिवसांच्या कालावधीत तो या निर्णयाप्रत कसा आला ते पुस्तकाच्या पाना-पानातून वाचायला हवं. ते वाचताना चर्चा, सल्लामसलत, मुत्सद्देगिरी, युद्धातले डावपेच यांचा एक मोठा पट आपल्यासमोर उभा राहतो.
या मुत्सद्देगिरीत राऊल नोर्डलिंग याचाही मोठा हात होता. हा स्वीडनचा तेव्हा पॅरीसमध्ये कार्यरत असलेला मुख्य प्रशासकीय अधिकारी. पॅरीसमध्येच लहानाचा मोठा झालेल्या नोर्डलिंगचं त्या शहरावर जीवापाड प्रेम होतं. त्यानंच दोस्तराष्ट्रं आणि जर्मन सैन्यामध्ये वाटाघाटी घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. जनरल कॉल्टिट्झसारख्या विचारी माणसानं ‘Paris will be defended at all costs.’ असा हुकूम मिळालेला असूनही नोर्डलिंगच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला.
जर्मन सैन्याधिकार्‍यांसाठी तेव्हा एक विशिष्ट कायदा केला गेला होता. कोणत्याही अधिकार्‍यानं हुकुमाचं तंतोतंत पालन करण्यात कुचराई केली तर त्या कायद्यानुसार त्याच्या वारसदारांना पकडून जीवे मारलं जात असे. हे लक्षात घेतलं की जनरल कॉल्टिट्झनं केवढा धोका पत्करला होता हे कळतं. त्यासाठी त्यानं कुठून बळ मिळवलं असेल? कदाचित पॅरीसकडूनच. त्या शहरानंच बहुधा त्याची सद्सद्विवेकबुद्धी जागृत केली...

बोटीतून उतरून परत सीन नदीच्या काठा-काठाने चालताना मला आता पुस्तकात वाचलेलं हे सगळं समोर दिसायला लागलं. आदल्या दिवशीच्या सिटी-टूरमध्ये दिसलेलं ‘हू-द-रिव्होली (Rue de Rivoli)’ हे रस्त्याचं नाव आता फारच परिचयाचं वाटायला लागलं. पॅरीसच्या पोलीस मुख्यालयावरून आपली बस गेली होती हे जाणवलं. याच मुख्यालयाला सर्वप्रथम उडवून देण्याची जनरल कॉल्टिट्झची योजना होती. नोर्डलिंगनं त्याला हिटलरच्या हुकुमाचं पालन करण्यापासून परावृत्त करायला खर्‍या अर्थानं सुरूवात केली ती तिथूनच. घाईघाईत उरकलेल्या सिटीटूरमध्ये माझ्यापासून दूरच राहिलेलं पॅरीस शहर आता असं मला दिसलं, भेटलं; केवळ ‘इज पॅरीस बर्निंग?’ या पुस्तकामुळे!

या पुस्तकाला अमाप लोकप्रियता मिळाली. त्यावर इंग्रजी चित्रपटही निघाला. जगभर या पुस्तकाचे चाहते आहेत. तसेच टीकाकारही आहेत. इंटरनेटवरचे पुस्तकाबद्दलचे ‘रिव्ह्यूज’ डोळ्यांखालून घातले तर हे लक्षात येतं. ‘जनरल कॉल्टिट्झनं असं काहीही केलं नाही’ अशी एक क्षीण विचारधारा त्यांत दिसते. ‘हे पुस्तक म्हणजे तर निव्वळ सहा दिवसांचं वर्णन आहे; त्यापेक्षा ‘पोलिश अपरायझिंग’बद्दल वाचा’ असाही सूर कुठेकुठे दिसतो. मला विचाराल, तर दुसर्‍या महायुद्धासारख्या विशाल आपत्तीजनक संकटात सापडलेल्यांच्या कहाण्यांमध्ये असं डावं-उजवं आपण करावं का? तर, अजिबात नाही. उलट तेव्हाच्या सर्वसामान्य माणसांच्या जिगरबाज कहाण्या मनाशी जपून ठेवाव्यात. ‘इज पॅरीस बर्निंग?’ या पुस्तकानं मला त्या पॅरीस-कहाण्या जपून ठेवायला मदत केली होती. गंमत म्हणजे हे पुस्तक आपल्या मनात इतकं खोल खोल रुतून बसलंय याची मलाच कल्पना नव्हती. त्यादिवशी त्या बोट-राईडच्या शेवटी मी तो फोन अखेरचा कानाला लावला, त्यात जनरल कॉल्टिट्झचं नाव ऐकलं आणि जाणवलं, की एका अर्थाने या पुस्तकाच्या निमित्ताने मी आठ-दहा वर्षांपूर्वी तब्बल एक महिना पॅरीसमध्ये घालवला होता. त्या शहराशी परिचय करून घेतला होता. माझ्यासाठी वाचन म्हणजे हेच! अनोळखी ठिकाणांशी युगानुयुगांचा परिचय असल्यासारखं वाटणं; परकीय वाटणार्‍या साध्यासुध्या माणसांमध्ये काहीतरी ओळखीचं गवसणं.
पॅरीसमधल्या त्या संध्याकाळी हे पुस्तक मला कडकडून भेटलं आणि मला ते सारं गवसलं !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लेख
>>>>>
दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलचं सगळं तुम्हाला कळलं असं मानण्याची पद्धत आहे. ती बर्‍याच अंशी खरीही आहे. फक्त हे ‘सगळं’ म्हणजे ‘तत्कालीन ठळक राजकीय पैलू’ हे मला काही काळानं उमगलं.
पुढे हे कळत गेलं की या राजकीय पैलूंपलिकडेही या महायुद्धाची मोठी व्याप्ती होती. या युद्धाने प्रामुख्याने युरोपमध्ये ज्या-ज्या देशांना ग्रासलं, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांनी जे भोगलं त्याला काही सीमाच नव्हती. त्यामुळे त्यानंतरच्या वयात दुसर्‍या महायुद्धावर आधारित जी-जी पुस्तकं समोर आली त्यांच्यात ‘सर्वसामान्यांच्या वाटेला आलेले अपरिमित भोग’ या एका बाबीनं मला सर्वाधिक बांधून ठेवलं! त्या भोगाच्या अगणित कहाण्या आहेत. कारण सैनिकी युद्धाबरोबरच युरोपच्या घराघरात, गल्लीबोळात अस्तित्त्वाच्या लढाया लढल्या गेल्या होत्या...
>>>>>
हे अगदी पटले,
सध्या एक पिक्चर बुक मिळाले आहे, त्यात युरोप मधल्या सामान्य माणसाचे स्ट्रुगल फोटो /पोस्टर/जाहिराती स्वरूपात आहे.

त्यात एक अगदी लक्षात राहणारी जाहिरात, एका उपकरणाची आहे,
पायावर रेघ मारणारे उपकरण,- युद्ध काळात स्टोकिंग्स चा तुटवडा होता, तेव्हा उघड्या पायावर मधोमध रेघ मारून स्टोकिंग च्या शिवणीचा भास निर्माण करण्यासाठी ते वापरायचे.

दुसरा फोटो, धातूचा तुटवडा पूर्ण करण्यासाठी, बागेमधले धातूचे रेलिंगस काढणारे कामगार.
प्रशस्त इमारती आणि त्यांचे उद्धवस्त ढिगारे याचे खूप सारे फोटो.

इंग्लंड एअर रेड मधून मुले तरी वाचावीत म्हणून लहान मुलांना कंट्री साईड ला हलवले, तेव्हा आपापल्या बॅग सांभाळत बस मध्ये चढणारी लहान मुले आणि त्यांना निरोप देणारे, सगळीच अनिश्चितता असणारे आई बाप Sad
युरोप कशा कशातून गेलाय हे पाहून अंगावर काटा येतो.

कातील लिहिलंय, खूप आवडलं
इंटरनेट नसतानाच्या काळात केवळ पुस्तकं वाचून जगभर भ्रमंती करता यायची त्याला खरच तोड नाही !

काय मस्त लिहिलं आहेस.. खूपच आवडलं!

मी आत्ता 'शोध' वाचतेय, ते वाचताना मला सतत हिटलर-इव्हा ब्राऊनचा संदर्भ असलेल्या प्लॉटची एक अनुवादित कादंबरी आठवतेय.. पण नाव लक्शात येत नाहीये. आठवेलच कधीतरी.. पण ते आठवलं की मलाही तुझ्यासारखंच ते पुस्तक शोधच्या निमित्ताने 'भेटणार' आहे.

मस्तच!
हिटलर-इव्हा ब्राऊनचा संदर्भ असलेल्या प्लॉटची एक अनुवादित कादंबरी >> द सेवन्थ सिक्रेट

सुंदर लिहिलंय...

मी कालच स्पिलबर्ग चा ब्रिज ऑफ स्पाईज बघितला, ते सर्व सत्य घटनांवर आधारीत असूनही बरेचसा चित्रपट खोटा वाटतो, किंवा पुर्ण सत्य सांगत नाही असे वाटतो.

हिटलर-इव्हा ब्राऊनचा संदर्भ असलेल्या प्लॉटची एक अनुवादित कादंबरी >> द सेवन्थ सिक्रेट>> मनःपूर्वक धन्यवाद!!

छान लिहिलं आहेस. माझंही आवडतं पुस्तक. कॉलेज च्या वयात गारुड केलं होतं या पुस्तकाने. पण बरेच दिवसात विसरल्यासारखं झालं होतं, ते तुझ्या लेखाने परत एकदा आठवलं. Happy

पण बोटीवरच्या साठ-सत्तर देशी-विदेशी प्रवाश्यांचा, त्यातही चिनी प्रवाश्यांचा, इतका कलकलाट चाललेला होता, की फोनमधे बोललं जाणारं काही धड ऐकूच येईना.

--> भयन्कर चीद येते या चयना वल्यन्चि,,, जिथे जातात असेच कर्तात

पुस्तकपरिचय आवडला. दुसर्‍या महायुद्धाच्या कथा खरोखरच कल्पनेपेक्षाही अद्वितीय आहेत. सदर पुस्तक मिळवून आता वाचावेच लागणार.

छान लिहिलंय... Happy
अनोळखी ठिकाणांशी युगानुयुगांचा परिचय असल्यासारखं वाटणं; परकीय वाटणार्‍या साध्यासुध्या माणसांमध्ये काहीतरी ओळखीचं गवसणं.>>> अगदी अगदी.

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.

सिम्बा, तुमचा प्रतिसाद आवडला असं तरी कसं म्हणणार! Sad
त्या पिक्चर-बूकचं नाव काय?

मंजू, आगाऊ, मस्त पुस्तकाची आठवण करून दिलीत.

जनरल कॉल्टिट्झसारख्या विचारी माणसानं ‘Paris will be defended at all costs.’ असा हुकूम मिळालेला असूनही नोर्डलिंगच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला. .... हे वाक्य समजलं नाही.... डिफेंडेड च्या ऐवजी अटॅक्ड असं असायला हवं होतं का? अर्थ उलट होत नाहीए का?

डिफेंडेड च्या ऐवजी अटॅक्ड असं असायला हवं होतं का? अर्थ उलट होत नाहीए का? >>>

नाही. तेव्हा पॅरीस जर्मनांच्याच ताब्यात होतं. मग त्यावर तेच attack कशाला करतील!

ओह!!
पण ते तर उध्वस्त करायला निघाले होते पॅरीस... दोस्तांच्या हातात पडण्या आधी? इतके शुअर होते ते आपल्या पराभवाबद्दल?

अप्रतिम आहे हे लले!

संदर्भ माहीत असतील तर एखादी जागा बघायला खूप मस्त वाटते आणि ते संदर्भ जर एखाद्या आवडत्या पुस्तकातले असतील तर क्या कहने!

वाचताना एक सूक्ष्म कळही आली - भारतात जर असा कुणी मुत्सद्दी असता आणि भारतावरच्या आक्रमकांत कोणी असा rational असता तर आज खूप काही सुंदर बघायला मिळाले असते. अर्थात आपण नावे लिहून, कचरा करून, पानाच्या पिचकार्‍या मारून त्याची वाट लावलीच असती ते अलाहिदा.