ये बेटीया किस घर की होती है ??

Submitted by विद्या भुतकर on 2 February, 2017 - 21:25

गेल्या काही दिवसांत एक पोस्ट व्हाट्स अप वर येत होती, हळदी कुंकू बद्दल. आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपवरही आली होती. फक्त केवळ लग्न झालेल्या स्त्रियांनाच का हळदीकुंकू चे आमंत्रण द्यायचे या विषयावरून. मला ते पटलेही. विधवा स्त्रियांना, अनेक विभक्त स्त्रियांनाही केवळ नवरा नाही किंवा सोबत नाही म्हणून एखाद्या सामाजिक प्रथेतून वर्ज्य का करायचे असा विषय होता. आता त्यात या स्त्रीला स्वतःहून भाग घ्यायचा आहे की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आमंत्रण द्यायचेही टाळणे वगैरे प्रकार अतिशयच दुखी करत असणार अशा व्यक्तीला. भारतीय स्त्रियांना विधवा असताना कितीतरी कार्यक्रमाला, आनंदाला मुकावे लागते आणि याचा त्यांना किती त्रास होत असेल याची केवळ कल्पनाही करवत नाही. सर्वांना सामावून घेणे किती आवश्यक आहे ते अशा ठिकाणी जाणवते. आणि बिल्डिंगमधील अनेक जणींनी त्यावर होकारही दिला हे पाहून आनंद वाटला.
आता हा झाला एक पैलू त्या हळदीकुंकू कार्यक्रमाचा. आता त्याच विषयावर अजून एक मत काल पुढे आलं जेव्हा एका अशाच तरुण मुलीने मला तिचा अनुभव सांगितला. एका सोसायटीमध्ये जिथे ती लहानपणासून वाढली, संक्रांतीसाठी आईकडे गेल्यावर तिथे सोसायटीमध्ये कार्यक्रम चालू होता त्यामुळे तीही तिथे गेली. अर्थात अजूनही काही माहेरी आलेल्या मुली होत्याच. आधीच संयोजकांनी जाहीर केलं की वाण म्हणून त्यातले फक्त सुनांना आणि तिथल्या राहणाऱ्या स्त्रियांनाच देण्यात येणार. त्यामुळे नाराज होऊन अनेक जणी तशाच निघून गेल्या. अशा ठिकाणी केवळ सर्वाना भेटणे हे मुख्य कारण असते. अशा छोट्यामोठ्या वस्तू नाही. आणि अपमान होत असेल तर कोण थांबेल.
सोसायटीत मनोरंजनाच्या कार्यक्रमात काही छोटंसं बक्षीस ठेवलेलं. जेव्हा कार्यक्रम संपला आणि ती बक्षिसं दिली गेली, त्यातही त्या मुलीला मात्र दिले गेले नाही. का? कारण ती आता लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली, त्यामुळे तिला इथे काही देण्याचे कारण नाही. खरं सांगू तिने हे बोलल्यावर, तिला तिथे काय वाटलं असेल याचा विचार करूनच वाईट वाटलं पण मुलगी जिद्दी होती. तिने त्यांना सर्वाना प्रश्न केला की, कायद्याने मला या घरात येण्याचा हक्क दिला आहे तर मी इथे का भाग घ्यायचा नाही? आणि तो प्रश्न बरोबरही होता. उद्या जर त्याच घरात मुलाची बायको आली तर तिला सून म्हणून त्यांनी बक्षीस दिलंच असतं ना? समजा ती एकटीच मुलगी असेल आईवडिलांची तर तिने काय लग्न झाल्यावर अशा कार्यक्रमात भाग घ्यायचाच नाही? आणि प्रश्न पैशाचा असेल तर तसे स्पष्ट करावे ना आयोजकांनी?
म्हणले तर हा मुद्दा छोटा आहे, केवळ बक्षिसाचा आहे, ज्याची किंमत अगदी कमी असेल. पण विचार करा की किती महत्वाचा आहे. पुण्य मुंबईसारख्या शहरात सासर-माहेर जिथे एकाच गावात आहे तिथे मुलीचं लग्न झालं म्हणून तिला माहेरच्या सोसायटीत वेगळी वागणूक मिळावी? तिचे आई वडीलही मेन्टेन्सन्स वगैरे भरत असणारच ना? आणि मग नकार द्यायचा तर मुलाच्या बायकोलाही दिला पाहिजे बरोबर ना? मुलगी नवरात्रीला आली, दिवाळीला आली अशा वेळी मग बाहेर पाटीच लावली पाहिजे, कार्यक्रमांना लग्न झालेल्या मुलींना सहभाग घेता येणार नाही म्हणून? कायद्याने मुलीला समान हक्क देऊनही समाजात अजूनही लोक असे विचार करतात आणि तसेच वागतात हे पाहून वाईट वाटतं. मी ज्या ठिकाणी राहते तिथे माझे सासू सासरे असतील तर त्यांना तितक्याच मानाने सर्व गोष्टीत भाग घेता येतो. मग तेच मुलीला आईवडिलांच्या घरी का नको?

थोड्या दिवसांपूर्वी मला आईने एक पोस्ट पाठवली होती,

'मायका केहता है ये बेटीया पराये घर की होती है,
ससुराल केहता है ये पराये घर से आयी है
ए खुदा तूही बता ये लड़कियां किस घर के लिए बनायीं है'

अगदीच इमोशनल वगैरे पोस्ट होती. म्हणले मला असे काही वाटत नाही. माझ्यासाठी माझं माहेर आणि सासरचं घर तितकंच आपलं आहे, हक्काचं आहे आणि शिवाय मला स्वतःचं म्हणता येईल असं आमचं घरही आहेच. त्यामुळे मला दुःखी वाटत नाही असले पोस्ट वाचून.

पण कालचा अनुभव ऐकून खरंच असं वाटलं की मुलींना इतक्या पटकन परकं करता येतं? आणि घरचे तर करतही नसतील, पण बाकी लोकांचं काय? अशा या विचारांना मोडीत काढलेच पाहिजे. उद्या आपलीच मुलगी आपल्याकडे आल्यावर तिला लोकांनी अशी वागणूक देऊ नये म्हणून आजच हे बोललं पाहिजे, सर्वाना सांगितलं पाहिजे. आणि मुळात एक स्त्री म्हणून आपण स्वतःच असे नियम बनवून पाळत नाहीये ना? हा विचार केला पाहिजे. आज त्या मुलीने योग्य ठिकाणी बोलण्याची हिम्मत केली तशीच आपणही केली पाहिजे आणि समजूनही सांगितले पाहिजे लोकांना. विचार करा जरूर आणि पटलं तरी दुसऱ्यांनाही सांगा.

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकीची पोस्ट पटली पण आत्ताच्या काळात हळदीकुंकवाचं प्रयोजन मला कळत नाही. पूर्वी बायकांना घराबाहेर पडायला संधी मिळावी वगैरे म्हणून हे एक एक सण होते आणि त्याकाळी त्याचं महत्व समजून येतं. पण हळदीकुंकू म्हटलं की सौभाग्याशी संबंध जोडला जाणारच. त्यामुळे डिवोर्स्ड बायका, विधवा बायकांचा अपमान होण्याची शक्यताच जास्त. तेव्हा नुसतं गेटटूगेदर ठेवावं.

क्षूद्र गोष्टीचा बाउ होतोय .... मुलगीला तिचे अधिकार तिच्या घरातून द्यावेत ... पण सोसायटीच्या कार्यक्रमात तिथे रहाणार्‍या व्यक्तीना काउंट करुन त्याप्रमाणे गिफ्ट अरेंज केल्या असतील ना ?

सोसायटीत हजार घरात दीड हजार लग्न होउन गेलेल्या मुली असतील , तर त्यातल्या किती येणार , किती नाहीत , हे सोसायटीला आधी कसे समजणार ? तसे असेल तर सोसायटीतील सर्वच सुना मुलींची टोटल आधीच काढुन मग प्रॉग्रॅम अरेंज करावे लागतील.

पण सोसायटीच्या कार्यक्रमात तिथे रहाणार्‍या व्यक्तीना काउंट करुन त्याप्रमाणे गिफ्ट अरेंज केल्या असतील ना ? >> या सर्व गोष्टि सुनेला लागू होत नाहीत. जर सून थोड्या दिवसान्साठी आली असेल तर तिला तिथे भाग घेता येत असेल तर मुलीला का नाही? गिफ्ट हा विषय नाहीयेच मुळी. बक्षिस जिन्क्ल्यावरही ते दिले न जाणे हा अपमान आहे असे मला वाट्टे.

असो.

तेव्हा नुसतं गेटटूगेदर ठेवावं.>> मलाही हे वाटते.

वाण म्हणून त्यातले फक्त सुनांना आणि तिथल्या राहणाऱ्या स्त्रियांनाच देण्यात येणार.> हे सन्योकानी केले ते ठिक आहे. तेव्हढ्याच वस्तू आहेत हेही मान्य.

सोसायटीत मनोरंजनाच्या कार्यक्रमात काही छोटंसं बक्षीस ठेवलेलं. जेव्हा कार्यक्रम संपला आणि ती बक्षिसं दिली गेली, त्यातही त्या मुलीला मात्र दिले गेले नाही. का? >> हे का? पण. आणि मुळात साधी गोष्ट आहे, सुनेला जर दुसर्या गावाहून येत असेल तर ते स्विकारले जाते मात्र मुलीला नाही?

मला वाटते सन्योन्जन करतानाच त्यानचा सहभाग आहे की नाही हे आधीच सान्गित्ले तर हा वाद टळेल पन त्यासाठी मुली भाग घेऊ शकतात हे ग्रुहित धरले पाहिजे.

अेका सोसायटीच्या काही मुली सणाला माहेरी आल्या तशा त्या सोसायटीच्या काही सुना सणाला माहेरी जाअुन सहभागी होणाऱ्यांची संख्या जवळपास तेवढीच रहात असावी ना?

खरं सांगायचं तर पराचा कावळा केल्याचा प्रकार वाटला. त्या सोसायटीच्या कार्यक्रमाचं काही बजेट असेल, त्यात गोष्टी बसवायच्या म्हणून वाण देण्याचा हेड-काउंट कमी करण्यासाठी किंवा तत्सम काही कारणासाठी एक नियम केला गेला असेल कदाचित. त्यात अपमान कसला. तिथे जाण्यात भेटीगाठींचा उद्देश होता तर त्यावर फोकस ठेवायचा होता त्या मुलीनं.

मुद्दा लक्षात आला. समजा एका पुण्यात राहणार्‍या काका काकूंचा मुलगा बंगलोर ला आणि मुलगी नाशिक ला आहे. दोघेही संक्रांतीला घरी आले तर सुनेला वाण मिळणार आणि मुलीला नाही . प्रश्न वाणात मिळणार्‍या वस्तूचा नसला तरी या 'वेगळ्या ट्रीटमेन्ट' चा आणि एकूण या सिच्युएशन चा राग येणे साहजिक आहे की.
एकूण अमूक एका जातीत जन्माला येणे . नवरा जिवंत असणे, मलगा अथवा मुलगी असणे, मुलाला जन्म दिलेला असणे असल्या, ज्यात स्वतःचं काडीचं कर्तृत्व नसलेल्या गोष्टीचं भांडवल करून दुसर्‍याला खाली खेचून स्वतः उच्चासनावर बसायची मेन्टॅलिटी अतिशयच घृणास्पद आहे.

मी काय म्हणते की अशी हळदी कुंकवं करूच नयेत जिथे बायकांनाच एकमेकांच्या मॅरिटल स्टेट्सवरुन एकमेकींना वरचढपणा किंवा कमीपणा दाखवता येईल.

मुद्दा लक्षात आला. समजा एका पुण्यात राहणार्‍या काका काकूंचा मुलगा बंगलोर ला आणि मुलगी नाशिक ला आहे. दोघेही संक्रांतीला घरी आले तर सुनेला वाण मिळणार आणि मुलीला नाही . प्रश्न वाणात मिळणार्‍या वस्तूचा नसला तरी या 'वेगळ्या ट्रीटमेन्ट' चा आणि एकूण या सिच्युएशन चा राग येणे साहजिक आहे की. >> Exactly !! Than kyou for understanding.
मूल मुद्दा सोडून बाकीच बोलणे चालू होते त्यामुळे काहीच बोलाय्चे नाही म्हणून गप्प बसले होते.

मी काय म्हणते की अशी हळदी कुंकवं करूच नयेत जिथे बायकांनाच एकमेकांच्या मॅरिटल स्टेट्सवरुन एकमेकींना वरचढपणा किंवा कमीपणा दाखवता येईल. >> ईथे भारतीय सन्स्क्रुटि र्हास होत आहे असे विचारही लगेच पुढे येतील. Happy
प्रत्येक वाक्याचे स्पष्टकरण द्यावे लागते. Sad
असो. असे काही तुमच्या समोर होत असेल तर नक्किच विचार करावा हा लेखाचा हेतू होता आणि आहे. पटला तर ठिक नाहईतर काहीच् करु शकत नाहि.

हळदी कुंकू या कार्यक्रमाचे प्रयोजन आता उरले नसून आमचा नवरा अजूनही जिवंत आहे या एकाच भांडवलावर आम्ही कुणीतरी श्रेष्ठ आहोत असे दाखवण्याचा मूर्खपणाचा कर्यक्रम एवढेच उरले आहे. एखाद्या स्त्रीचा नवर अजारपणामुळे अंथरूणाला खिळून असेल व तिलाच सारे करावे लागत असेल तरीही तिला हळदी कुंकवाला बोलवणे येते. एकदा का तो गेला की मग बंद.

विकु, हेड स्कार्फ घालायचा का नाही हा जसा 'त्या' बायकांचा प्रश्न आहे तसंच हळदीकुंकू लावावं का नाही, त्याचे जाहीर कार्यक्रम करावे का नाही हा नाही का? कोणी काय मेकप करावा आणि काय कपडे घालावे ह्यात इतरांनी पडू नये. शहरात तरी नवऱ्याच्या मृत्यू नंतर कुंकू न लावणारी बाई आजही दिसते का?

मूळ लेखाविषयी: टू मेनी डीटेल्स देऊन मूळ मुद्दाच समाजाला नाही. मै ची पोस्ट वाचल्यावर समजला. 'इतने पैसे मी इतनाईच मिलेगा' सांगायला काही तरी कारण म्हणून सून आणि लग्न झालेली मुलगी असं खुसपट वाटलं मला. प्रसंग खरा घडला आहे की जनजागृती अभियानासाठी टेलर्ड आहे असं वाटलं. टेलर्ड असला म्हणून काही वाईट नाही अर्थात.

खरा घडला आहे. मुलीला बाजूला घेऊन सान्गितले की तुला गिफ्ट आता देता येणार नाही. नन्तर बोलू. तिने विचारले तेन्व्हा त्यानी हे कारण सान्गितले.
"आता तुझे लग्न झाले ना? आता तू दुसर्या घरची झालीस ना?" या शब्दात. Sad

प्रसंग वाचून आयोजीत करणार्‍यांचे चुकलेच असे वाटते. पण डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट बनून हे ही म्हणतो - पूर्वी सासू - नणंद एक होऊन सुनेचा छळ करतात असे वाचले जायचे. मग त्यानंतर असा बदल कधी झाला काय माहिती. तुमच्या मैत्रीणीने विचारले तर चांगलेच केले की.

>>त्या सोसायटीच्या कार्यक्रमाचं काही बजेट असेल, त्यात गोष्टी बसवायच्या म्हणून वाण देण्याचा हेड-काउंट कमी करण्यासाठी किंवा तत्सम काही कारणासाठी एक नियम केला गेला असेल कदाचित. त्यात अपमान कसला. - +१

बरोबरच आहे असा नियम. "आता तुझे लग्न झाले ना? आता तू दुसर्या घरची झालीस ना?"- हे वाक्य मात्र खटकण्यासारखेच आहे.

कठीण आहे. एन्ट्री आणि खेळायला कशाला दिलं मग?
हे म्हणजे (साउथ) बे -एरिया मराठी मंडळाच्या गाण्याच्या स्पर्धेत आलमिडा कौंटीच्या मुलाने सॅन्टा क्लाराच्या मुली पेक्षा सुरात गाणं गायलं तरी ते बाद ठरवतात तसं झालं. Wink (हा प्रतिसाद मात्र टोटली टेलर्ड आहे)

उगाच मोठा इश्यु केला जात आहे म्हणणे खूप सोपे आहे. पण प्रत्यक्षात त्या मुलीला कसे वाटले असेल हा विचार केला तर खूप वाईट वाटते. जी मुलगी १०-२० वर्षे तिथे राहिली तिलाच हे असे ऐकुन घ्यावे लाग्ते. Sad
आणि ही एक गोष्ट नाहीये. असे अनेक प्रसन्ग अस्तिल. ते समोर आले तरच लोक त्यावर विचार करतील ना?

मुलीला लिगली घरामधेही वाटा मिळतो हल्ली.
हे असे प्रसंग घडत असतील आणि लोक ऐकुन घेत असतील ह्यावर विश्वास बसत नाही.

मला वाटतं की 'का नाही?' हे स्पष्टपणे सांगितले असते तर गैरसमज टळले असते.
१. मुलगी (इतर मुली)कार्यक्रमाला येणार हे आधी कळवले नव्हते.
२. सोसायटीच्या बजेट मधे एवढे पैसे नाहीत की ऐनवेळी नवीन भेटवस्तू आणता येतील .. वगैरे.....

मला वाटतं की 'का नाही?' हे स्पष्टपणे सांगितले असते तर गैरसमज टळले असते. >> अगदी.
पण कारण देताना 'मुलगी इथे राहात नाही', 'ती दुसर्या घरी गेली आता' ही कारण देणे होऊ शकते यावर विश्वास बसत नाही.
आणि हे मुम्बईत घडल आहे. म्हणजे तुम्ही कुठेही राहिलात तरी त्याचा विचारान्शी काही सम्मन्ध नस्तो हे जाणवते.

नशीब सॅन्चुअरी सिटीत घडलं म्हणून एवढ्यावर निभावलं हो ताई. त्या तुमच्या विशिष्ठ गावात घडलं असतं तर??? कल्पना करवत नाही. (इस्टर्न टाईम फाको ताईना जाहीर आमंत्रण Proud )

उद्या जर त्याच घरात मुलाची बायको आली तर तिला सून म्हणून त्यांनी बक्षीस दिलंच असतं ना? समजा ती एकटीच मुलगी असेल आईवडिलांची तर तिने काय लग्न झाल्यावर अशा कार्यक्रमात भाग घ्यायचाच नाही? >> हे जे उद्या झालं असतं तरची आजच त्या संयोजकांच्या वतीने तुम्हाला सोयीस्कर उत्तर देऊन तुम्ही लेख पाडलात म्हणून इतके प्रश्न! त्या संयोजकांनी त्या सुनेलाही अजिबात बक्षीस दिलं नसतं असं का नाही वाटलं तुम्हाला?

दोन्हिकदे बक्शिस नहि घेओ शकत... इकदे कशल हवेय बक्शिस... ससुर्वदित खेल मधे जिन्केल बक्शिस..
इकदच्य सोसयतिच्या इतर मुलिना चन्चे मिलयला हवा...
त्यन्च्यवर अन्यय आहे न.. जर ति मुल्गि त्या खेलत एक्ष्पर्त असेल तर... बरोबर त्यच वेलि महेरि येऊन बक्शिस जिन्कने...

आणि हळदीकुंकू वाण फक्त बायकांना हा पुरुषांवर अन्याय नाही का. एक विधुर बाप आणि त्याचा पस्तिशीचा अविवाहित मुलगा असे दोघेच राहात असतील तर मेंटेनन्स भरूनही त्यांना वाण मिळणार नाही. स्टीलचा चमचा प्लास्टिकचा डबा जे काय असेल ते पुरुषांनाही उपयोगी आहेच की. याउलट एखाद्या घरी तीन मुली प्लस एक सून प्लस आई प्लस एखादी नात असं सहा सहा वाण युनिट्स क्लेम करतील.

हळद आणि कुंकवाचा संबंध हा फक्त सौभग्याशी लावतात किंवा तसे मानायला व जोडायला भाग पाडतात हाच मुर्खपणा आहे. आधी हा जो बुरसट समज आहे ज्या लोकांचा तेच ठाम पणे असे पसरवतात व मानतात.
मुली कुमारीका असल्यापासून हळदीकुंकू लावतात पण ते विसरून जसे लग्न झाले की नवरा म्हणजे कुंकू हे समीकरण लावून जगतात.
काळ बदलाला तरी तेच होतंय ते हे अश्या बुरसट समज कायम पसरवण्या लोकांमुळेच. अश्यांनाच ठोकले पाहिजे. हे काम आणि बायकाच करतात ज्यास्त.

ती बघा, नवरा गेला तरी कुंकू लावून फिरते, मेकाअप करते अश्या कागाळ्या करत फिरतात.

: टू मेनी डीटेल्स देऊन मूळ मुद्दाच समाजाला नाही. मै ची पोस्ट वाचल्यावर समजला.>>> +१

खेळात बक्षिसांची संख्या ठरलेली असते जसे की पहिले, दुसरे+ उत्तेजनार्थ : अशी तीन बक्षीसे, वगैरे. आणि ती त्या त्या विजेत्यांनाच देतात.
तेव्हा कुणी लग्न झालेली मुलगी माहेरी आलीय म्हणुन जास्तीचे बक्षीस द्यावे लागतेय, त्याची तरतूद केली नव्हती असा प्रश्न उद्भवत नाही.
तेव्हा तिला बक्षिस नाकारायला नको होते.

२. सोसायटीच्या बजेट मधे एवढे पैसे नाहीत की ऐनवेळी नवीन भेटवस्तू आणता येतील .. वगैरे.....>>>> हा मुद्दाच चुकीचा आहे. बक्षीस अगोदरच आणले होते. फक्त ते सोसायटीत न राहण्यारयाला द्यायचे नव्हते. मग तिला भागच का घेऊन दिला?

<<<<भारतीय स्त्रियांना विधवा असताना कितीतरी कार्यक्रमाला, आनंदाला मुकावे लागते आणि याचा त्यांना किती त्रास होत असेल याची केवळ कल्पनाही करवत नाही. सर्वांना सामावून घेणे किती आवश्यक आहे ते अशा ठिकाणी जाणवते. >>>>

ह्या सेम फेज मधुन आम्ही गेलो आहोत, म्हणजे माझे वडील वारले तेव्हा आईचं वय जेमतेम २८-२९ वर्षे असेल. (तिच लग्न वयाच्या १६-१७ व्या वर्षी झालं), तर तिलाही वडील वारल्यानंतर त्या "सो कॉल्ड" समारंभाचं आमंत्रण यायचं, पण सांगताना असं सांगायचे "ओ, वैशालीच्या आई, वैशालीला पाठवा हं आमच्याकडे हळदीकुंकवाला". त्या वयात काही समजत नव्हतं की माझी आई का बरं जात नाही? पण जेव्हा कळायला लागलं तेव्हापासुन मी जातच नाही कोणाकडे त्या समारंभाला. कारण माझे वडील गेले त्यात माझ्या आईचा काय दोष? तिने का बहिष्कार टाकला पाहिजे यावर?

त्या तसल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मी आईला केसात गजरा माळायला लावते, बोलणारे हजार तोंडांनी बोलतात त्यांच्याकडे लक्श देऊ नये. तुला तुझी हौस करुन घ्यायची आहे ना मग तुला जे वाटेल ते कर, लोकांमुळे स्व्तःचा जीव नाही मारायचा. कोण काय बोललं तर तुझी लेक आहे समर्थ उत्तर द्यायला. (सगळ्यांनी जर असा माझ्यासारखा, अ‍ॅटीट्युड ठेवला तरंच काहीतरी चांगल होऊ शकतं)

आणि हळदीकुंकू वाण फक्त बायकांना हा पुरुषांवर अन्याय नाही का. एक विधुर बाप आणि त्याचा पस्तिशीचा अविवाहित मुलगा असे दोघेच राहात असतील तर मेंटेनन्स भरूनही त्यांना वाण मिळणार नाही.>> अगदी अगदी Rofl

Pages