मा'रोजा - आपली रोजम्मा

Submitted by सन्तु ग्यानु on 26 January, 2017 - 02:03

पिफ्फ सारख्या चित्रपट मोहोत्सव म्हणजे माझ्यासारख्या ‘देशी’ प्रेक्षकांसाठी डबल धमाकाच! दर्जेदार चित्रपट तर पहायला मिळतातच, शिवाय, जवळजवळ घर बसल्या ‘विश्वरूपदर्शन’ देखील घडतं. आणि मग ‘आपलं’ ‘त्यांच्या’शी असलेलं नातं, समान दुवे, ह्या अंगाने ते आपलेसे होऊ लागत. मा’रोजा ह्या फिलिपिनी चित्रपटाच्या पहिल्या सीन पासूनच अशी सोयरीक जमू लागली.
रोजा सुपर मार्केट मधून प्रचंड सामान विकत घेते. रोजा पैसे देते पण कॅशियर सुटे पैसे परत करण्या ऐवजी गोळ्या देते! रोजा आक्षेप घेते - सुट्टे पैसेच मिळावेत म्हणून आग्रह करते. ह्या छोटयाशा अन्यायाचा तरी तिला प्रतिकार करायचाय खरंतर. पण तेही जमत नाहीच. शेवटी रोजाला नाईलाजाने गोळ्याच घ्याव्या लागतात.

ह्या छोट्याशा प्रसंगातून आपण रोजा मध्ये गुंततो आणि पार चित्रपट संपला तरी गुंतलेलेच राहतो. आपली रोजा (जॅकलीन जोन्स) मनिलाच्या एका गरीब वस्तीत एक छोटीशी टपरी चालवते. सुपरमार्केटमधून प्रचंड सामान आणण्याचे हेच कारण. तिचं पूर्ण कुटुंब ती ह्या टपरीवरच पोसते. नवरा आहे, पण रोजाच ‘इंदिरा’ आहे. तिला ४ पोरं आहेत. एकंदर परिस्थिती बेताचीच. गोळ्या - बिस्किटं विकून भागणं शक्य नाही म्हणून ती काही अवैध पदार्थदेखील विकते आणि त्यातच पकडली जाते.

मग अटकसत्र, पॉलिसी खाक्या, लाचखोरी, पूर्णपणे पोखरली गेलेली नोकरशाही, त्यामुळे रोजाच्या कुटुंबाची होणारे हाल, तिच्या मुलांवर बेतलेले कठीण प्रसंग अशा मार्गाने चित्रपटाची गाडी पुढे सरकते. पोलिसी यंत्रणेचा कायद्याशी विसंगत कारभार, ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ पद्धतीनी दाखवल्यामुळे अजून प्रभावशाली ठरतो. एकंदर, संवैधानिक हक्क वगैरे काल्पनिक पात्रं असावीत आणि त्यांचा कुठल्याच जीवित अथवा मृत गरीब व्यक्तीशी कोणताच संबंध नसावा असा सगळा व्यवहार सुरु राहतो.

हा सगळा विषय आणि आशय, बॉलीवूडच्या तालमीत तयार झालेल्या आपल्यासारख्या प्रेक्षकांना काही नवीन नाही. पण तीच गोष्ट सांगण्याची पद्धत, त्यासाठी निवडलेली पात्र, दृश्य वेगळाच परिणाम साधतात. दिग्दर्शक ब्रिल्लियन्ट मेन्डोझा यांनी चित्रपटाची शैली '‘डॉक्युड्रामा’ पद्धतीची निवड्ली आहे. मनीलाची ती गरीब वसती, तिकडची माणसं, त्यांच्यातले रोजचेच पॉइंटलेस संवाद, दृश्यांची संथ लय ह्यातून हे सगळं खरंच चाललंय असा भास दिग्दर्शक निर्माण करतो. कॅमेरादेखील असा वापरलाय की प्रेक्षक, एक बघा ना राहता, पार त्या घटनेच्या मध्यभागी पोचतो. साउंड डिसाईनचं विशेष कौतुक केलं पाहिजे. एकाबाजूला ‘डॉक्युड्रामा’च्या फील साठी खरे शहरातले आवाज आणि त्याचबरोबर भावनिक परिणामकारकता साधण्यासाठी अनिष्टसूचक संगीत यांचा मिलाफ उत्तम साधला आहे.

पण ह्या सगळ्यापेक्षाही जास्त भाव खाऊन जाते ती रोजाच. ती गरीब आहे, स्त्री आहे, आई आहे, शोषित आहे आणि मुख्य म्हणजे षड्रिपूंनी संपृक्त माणूस आहे. ह्या सगळ्या आयडेंटिटीजचं एकत्रित रसायन जॅकलीनच्या अभिनयातून मस्त फुललंय. तिच्यासमोर घडणारी दृश्य आणि तिच्या डोळे यांच्यातला संवाद खूपच बोलका आहे. विशेषतः शेवटचा प्रसंग. गोष्टीतले काही तपशील उघड करण्याचे पाप माथी घेऊन हे लिहितोय त्याबद्दल आधीच कान धरतो.

तर... अटक झाल्यावर रोजाच्या मनावर खूप दडपण आहे. तिला मुलांची काळजी वाटतेय. त्यात ‘बेल मनी’ असं गोंडस नाव परिधान केलेल्या लाचेची रक्कम त्यांच्या अवाक्याबाहेरचीच वाटतेय. पैशाची सोय करण्यासाठी रोजा आपल्या मुलांना ओलीस ठेऊन ‘अटकेतून’ बाहेर पडते. परतत असताना दिवसभर रिकामं असलेलं पोट बोलू लागतं. कडेच्या हातगाडीवरून ती काही फिश बॉल्स घेते आणि हपापलेपणानी त्यातले २ फस्त करते. अन्न पोटात गेल्यामुळे असेल कदाचित पण ती थोडी शांत होते आणि आजूबाजूला चाललेल्या गोष्टींचं भान तिला येतं. तिच्यासारखीच टपरी चालवणारं एक जोडपं आणि त्यांची लहान मुलगी तिला दिसते आणि तिचं आयुष्यच तिच्या डोळ्यासमोर तरळू लागतं. तिला पश्चाताप होतोय का? माहित नाही... मागे वळून बघताना तिला असं काही दिसतंय का जे ती वेगळं करू शकली असती? परिस्थितीशी झुंजताना खरंच काही वेगळं करणं शक्य होतं का? ती भावुक होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. आपण वाट पाहत असतो - ते पाणी वाहायला लागण्याची, ती मोकळी होण्याची. पण ते पाणी डोळ्यातच थबकून राहतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनत, उत्तम लिहिलं आहेस.

जॅक्लीन जोझला या चित्रपटातल्या अभिनयासाठी कान चित्रपटमहोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं.

छानच लिहिलंय. हॉलिवूडव्यतिरिक्त असे इतर बाहेरचे सिनेमे आपल्याकडे फेस्टिवल्स वगळता येतच नाहीत याचं अशा वेळी वाईट वाटतं.