नाद मेघांचाच दर्जेदार होता...

Submitted by सत्यजित... on 24 January, 2017 - 16:00

नाद मेघांचाच दर्जेदार होता...
पावसाचा जोर फुसका बार होता!

ओल आहे काळजाच्या खोल रुतली...
स्पर्श त्याचा केवढा उबदार होता!

रात्र होती चंद्र होता गार वारा...
चांदण्याचा कवडसा अंगार होता!

सावल्याही हाय मज सोडून गेल्या...
की उन्हाचा रंग काळाशार होता??

सापडेना खंजिराची खूण कोठे...
काळजावर काजळाचा वार होता!

ओळखावे तू मला ही आस नव्हती...
हा तसा माझा नवा अवतार होता!

का प्रवासाला निघाला एकटा?तो...
सूर्य होता वा कुणी अंधार होता?

फार थोडे मित्र दिसले आॅनलाइन...
आज बहुधा वाटते रविवार होता!

जिंकलो..नाबाद-शतकी खेळ केला...
यष्टिच्या मागे कुणी दिलदार होता!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच
रात्र होती चंद्र होता गार वारा...
चांदण्याचा कवडसा अंगार होता!
सावल्याही हाय मज सोडून गेल्या...
की उन्हाचा रंग काळाशार होता??ूूThese lines r the Best

छान ! मी प्रतिसाद देणारा तीसरा कुळकर्णी Proud

ओल आहे काळजाच्या खोल रुतली...
स्पर्श त्याचा केवढा उबदार होता! :: आहे च्या ऐवजी जेव्हा लावले तर

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

>>>आहे च्या ऐवजी जेव्हा लावले तर>>>
मुक्तेश्वरजी,तो ‘आहे',त्या स्पर्शाची जाणिव,अाजच्या या क्षणाशी जोडणारा आहे!

मस्त आहे गझल !! आवडली !!

<< सापडेना खंजिराची खूण कोठे...

काळजावर काजळाचा वार होता! >>

अतिशय छान !!