वसंतलावण्य : एका जादुगाराची चित्तरकथा

Submitted by झंप्या दामले on 23 January, 2017 - 05:03

आपण सगळे अतिशय सुदैवी आहोत, कारण चित्रपट संगीताच्या माध्यमातून आपल्यावर गेली जवळपास पाऊणशे अवीट शब्द-सुरांची बरसात होत आलेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, संगीतकार, गीतकार यांच्याबद्दल सुदैवाने प्रचंड प्रमाणात हिंदी व इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे. परंतु मराठीत चित्रपटविषयक गांभीर्याने लिहिलेले साहित्य फारसे उपलब्ध नाही, त्यातही मराठी चित्रसृष्टीतील किमायागारांबाद्द्ल मराठीत खूपच कमी साहित्य उपलब्ध आहे आणि जे काही उपलब्ध आहे त्यात ‘रसरंग’ या एकेकाळच्या अतिशय लोकप्रिय साप्ताहिकाचे संपादक – ज्यांना मराठीच नव्हे तर हिंदी चित्रसृष्टीचादेखील चालता बोलता कोशच म्हणता येईल अशा – इसाक मुजावर या एकाच व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. (सुदैवाने अलीकडे प्रतिक प्रकाशन या संस्थेने कलाकारांची उत्तम चरित्रे मराठीत आणण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, पण त्यातही मराठी कलाकारांपेक्षा हिंदी कलाकारांवरच सध्या भर दिसतोय). अशा परिस्थितीत लेखक-अभ्यासक मधू पोतदार हा अतिशय मोठा दिलासा ठरले आहेत. त्यांचे एकूणच ‘वसंत’ या नावाशी विशेष सख्य असावे. विनोदवीर वसंत शिंदे यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन हातावेगळे केल्यावर मराठी चित्रसृष्टीतला ‘वसंताचा बहर’ असे वर्णन करता येईल असे संगीतक्षेत्रातील तीन दिग्गज ‘वसंतां’वर लिहायचा संकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि आपल्या सर्वांसाठी एक मोठ्ठा खजिनाच उघडा केलेला आहे. वसंत प्रभू, वसंत देसाई यांच्यावरील चरित्रापाठोपाठ आलेले वसंत पवार यांचे ‘वसंतलावण्य’ हे चरित्र म्हणजे मधू पोतदार यांच्या प्रचंड अभ्यास व कष्टाचे संस्मरणीय मूर्त रूप आहे असेच म्हणावे लागेल !

वसंत पवार हे एक अद्भुत रसायन. तोंडात बोटे घालायला लावेल अशी स्मरणशक्ती असलेला, सतारीवर विलक्षण प्रभुत्व, लावणी, पोवाडे, कटाव, गण-गौळण, सवाल-जवाब, कलगी-तुरा अश्या अस्सल मऱ्हाटी लोककला प्रकारांइतकेच उर्दू शेरो-शायरीची सखोल समज असणारा हा अवलिया. ‘वेष असावा बावळा, परि अंगी नाना कळा’ या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसंत पवार. अगदी फाटक्या अवतारात वावरणारा, किरकोळ शरीरयष्टीचा हा माणूस आपले एकेक सांगीतिक अस्त्र काढत मैफल रंगवायला लागला की एकेकजण चाट पडायचा. संगीताचा हा वारसा त्यांना मिळाला ते वडील शंकरराव यांच्याकडून मिळाला होता. ते स्वतः संगीत शिकलेले होतेच पण चित्रपटसृष्टीत वाद्यवृंद संयोजक (अरेंजर) म्हणूनही काम करत होते. त्यांचे लहानपण कोल्हापुरात गेले. कोल्हापूर म्हणजे शाहूमहाराजांनी आश्रय दिलेल्या अनेक गुणी कलावंतांचे माहेरघरच ! शाहीर, कलगीतुरेवाले यांना तिथे खूप प्रोत्साहन मिळे. त्यातल्या अनेकांशी शंकररावांचे सख्य होते. ते छोट्या वसंताला आवर्जून सगळीकडे घेऊन जायचे. साहजिकच लहान वयातच वसंताची निरनिराळ्या शैलींशी, काव्यांशी ओळख होत गेली. शाहीर लहरी हैदर, ग. दि. माडगूळकर या सर्वांचे वसंता ऐकत गेला आणि समृद्ध होत गेला. (वसंत पवार आणि गदिमा यांचे मैत्र पुढे शेवटपर्यंत टिकून राहिले आणि त्यांच्या रचनांमुळे श्रोत्यांची चंगळ झाली). शंकरराव आपल्या मुलाची सांगीतिक समज वाढावी यासाठी लहानग्या वसंताला तमाशाला सुद्धा घेऊन जायचे. जिथे आजही तमाशाला जाणे म्हणजे चांगले समजले जात नाही तिथे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी एक वडील असे धाडस करत होते हे खरोखर कौतुकास्पद आहे. मुलाने सतारिया व्हावे अशी तीव्र इच्छा असल्यामुळे त्यांनी वसंताला उस्ताद रहिमत खांसाहेब यांच्याकडे शिकायला पाठवले. तिथे वर्षात शिकायच्या गोष्टी वसंता महिन्यात शिकू लागला. दरम्यान चित्रपटसंगीताची कामे पुण्यात मिळाल्यामुळे शंकररावांनी तिकडे मुक्काम हलवला. त्यांना भेटायला अधूनमधून पुण्यात जाणाऱ्या वसंताला ध्वनिमुद्रणाच्या वेळी एक असा अनुभव आला की ज्याने त्याच्या आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यातल्या अनेक गोष्टी बदलून गेल्या. तो प्रसंग इथे सांगण्यापेक्षा पुस्तकातच वाचणे इष्ट.

उमेदवारीच्या काळात वसंतरावांनी हिंदी सिनेमांमध्ये सतार वाजवली. खेमचंद प्रकाश या अतिशय ख्यातकीर्त संगीतकाराच्या ‘तानसेन’ या चित्रपटातली गाजलेली सतार वसंतरावांचीच. मुंबईमध्ये बस्तान बसत असतानाच अचानक त्यांना त्यांच्या सतारवादनाच्या कीर्तीनेच तातडीने पुण्यात बोलावून आणले आणि त्यांची कर्मभूमी पुणे हीच होऊन गेली. रामाची जशी शिवधनुष्याला प्रत्यंचा चढवण्याची कसोटी लागली होती, त्याच्याशी मिळती-जुळती अनोखी कसोटी वसंतरावांनी पुण्याच्या प्रभात स्टुडिओमध्ये उत्तीर्ण होऊन दाखवली आणि दस्तुरखुद्द सुधीर फडके यांच्यासोबत वादक म्हणून काम करायची संधी मिळाली. पुढे ‘सीता स्वयंवर’पासून तर ते बाबूजींना सहाय्यक म्हणून काम देखील करू लागले.

यथावकाश त्यांना त्यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट मिळाला. ‘जयभीम’ नावाचा हा चित्रपट संगीत चांगले असूनही आपटला. मग आला तो त्यांच्यासाठी एक मैलाचा दगड ठरलेला चित्रपट – ‘पठ्ठे बापूराव’ ! कोल्हापुरात लहान वयात त्यांनी जे काही टिपून ठेवले होते ते सगळे पोतडीतून काढायची संधी त्यांना मिळाली. बापूरावांच्या अगणित रचनांमधून चपखल अशा १८ रचना निवडण्याचे अतिशय अवघड काम त्यांना त्यांच्या प्रचंड अभ्यासामुळेच शक्य झाले. एका चित्रपटासाठी त्यांनी गण, गौळण, छक्कड, शृंगारिक लावणी, भेदिक लावणी, झगडा, अभंग, लग्नगीत एवढे विविध प्रकार हाताळले !

यानंतर मात्र वसंतरावांना पाठोपाठ चित्रपट मिळत गेले आणि त्यातल्या सांगीतिक वैविध्यामुळे गाजूही लागले. दिग्दर्शक अनंत मानेंशी ‘जयभीम’मुळे ओळख झाली होतीच. त्यातूनच पुढे या जोडगोळीचा ‘सांगत्ये ऐका’ हा तमाशाप्रधान चित्रपट आला आणि त्यातल्या गाण्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. पुण्यातल्या विजयानंद थियेटर मध्ये तो दोन वर्षांहून अधिकाळ चालला आणि त्यासोबतच या जोडीने आणले मराठी चित्रपटसृष्टीतले अनोखे तमाशायुग. वसंतरावांनी त्यात विलक्षण प्रयोग केले. दस्तुरखुद्द गीता दत्तकडून लावणी गाऊन घेतली. एकापाठोपाठ एक एवढ्या लावण्या देऊनही त्यांनी एकीसारखी दुसरी होऊ दिली नाही यातच त्यांची संगीताची समज, सुरांचा गाढा अभ्यास दिसून येतो. वसंतरावांची ही विलक्षण घोडदौड मल्हारी मार्तंड या त्यांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत चालूच राहिली. एकीकडे संगीताच्याच नशेत असणारा हा अवलिया संगीतकार दुसरीकडे बाटलीच्या नशेत एवढा आकंठ बुडालेला होता की वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी हे जग तो सोडून गेला. चार पैसेही गाठीशी बांधण्याचे व्यवहारज्ञान नसलेल्या या माणसाच्या मदिरा-प्रेमाचा चित्रपटसृष्टीतल्या अनेकांनी फार निर्घृण फायदा घेतला. रोजच्या बाटलीच्या बदल्यात आख्खे चित्रपट करून घेतले हे वाचून विषण्ण व्हायला होते. चंदेरी दुनियेला उगाचच मायानगरी म्हणत नाहीत हे अशावेळी पटते अगदी....

विस्मरणात जात चाललेल्या या प्रतिभावंत संगीतकाराचे चरित्र आपल्यासमोर आणल्याबद्दल लेखक मधू पोतदार यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. या पुस्तकाच्या प्रेमात पडायचे कारण हे केवळ त्यातले तपशील नाहीत. कारण नुसते तपशील असलेले चरित्र मनोवेधक होतेच असे नाही. मला सर्वात काही आवडले असेल तर ते म्हणजे लेखकाचा वसंतरावांकडे ‘संपूर्ण व्यक्ती’ म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन. वसंतरावांची फक्त ‘संगीतकार’ एवढीच ओळख करून न देता त्यांच्या कित्येक अपरिचित पैलूंचीही आपल्याला ओळख करून दिलेली आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. त्यातूनच वसंतरावांमधले अनेक अज्ञात पैलू विस्ताराने समोर आलेले आहेत. ते एकपाठी होते (कोल्हापुरातल्या मैफलीत गदिमांकडून ऐकलेले काव्य कित्येक वर्षांनी त्यंना स्वतालाच आठवत नसताना वसंतरावांनी जसेच्या तसे म्हणून दाखवले होते !), उर्दू शेरोशायरीमधले जाणकार होते, नृत्यनिपुण होते (‘पुढचं पाऊल’ (ज्यात पुलंनी ढोलकीवाल्याचे काम केले होते), ‘दूधभात’, ‘पठ्ठे बापूराव’ आदि चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन वसंत पवारांचेच !), त्यांनी चित्रपटांतून अनेकदा छोटे छोटे ‘cameos’ केलेले होते, ते हजरजबाबी होते, एवढेच नाही तर नादिष्ट आणि चक्रमसुद्धा होते (उदा. आख्खे गाणे त्याच चालीत उलट म्हणून दाखवणे, भाता आपल्याकडे व सुरांच्या पट्ट्या पलीकडे अशी पेटी उलट वाजवणे !) या आणि अन्य शेकडो गोष्टी लेखकाने इतक्या सुरेख उलगडून दाखवल्या आहेत की वसंतरावांच्या अवघ्या व्यक्तिमत्वाच्याच आपण प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.

याशिवाय या पुस्तकात तपशिलाने मांडलेला अतिशय महत्वाचा गुण म्हणजे वसंतरावांनी प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्टतेच्या ध्यासातून दाखवलेली विलक्षण अभ्यासू वृत्ती. लावणीच्या सुरांमधून त्यातला भाव जसा समजतो तसा तो लावणीच्या अदा, अभिनय, पदन्यास यातूनही समजायला हवा या ध्यासातून म्हणून त्यांनी बनारसी ढंगाचे कथ्थक नृत्यदेखील कसे शिकून घेतले, वर्षानुवर्षे तमाशातली लावणी ऐकलेली/पाहिलेली होती त्यात अजून जास्त शिकायचे म्हणून मुंबईतल्या दिवाणखाण्यांमध्ये जाऊन बैठकीच्या लावण्यांचे, त्यातल्या अदांचे निरीक्षण कसे केले, कोल्हापूर, मुंबई, पुणे वगैरे सगळीकडच्या ‘माडीवरच्या’ गाणारणींची, तमाशा बारीवरच्यांची ओळख काढून त्यांच्या खूप वेगवेगळ्या लावण्या, गाणी, त्यांचे रंग, ढंग सगळे कसे शिकून घेतले वगैरे अनेक प्रसंग एवढे विपुलतेने मांडले आहेत की अचंबित व्हायला होते. सर्वात अनोखा तपशील या पुस्तकातून कळतो तो म्हणजे वसंतरावांच्या ‘जादूच्या प्रयोगांबद्दल’. जगप्रसिद्ध जादुगार रघुवीर ज्यांच्याकडून जादू शिकले त्या जादुगार पी.सी.राणा यांच्या जादूच्या प्रयोगाला वसंतरावांनी पार्श्वसंगीत दिले. त्या बदल्यात केवळ कुतूहलापोटी अनेक अवघड क्लृप्त्या अवघ्या आठ दिवसांत शिकून खुद्द राणांनाच थक्क करून सोडले ! पुढे त्यांनी केलेल्या जादूच्या प्रयोगांचे किस्से इतके अफलातून आहेत की ते इकडे उघड करण्यात हशील नाही, त्यासाठी पुस्तक उघडणेच ‘मस्ट’आहे. सुरांचा जादुगार हातचलाखीच्या जादूतदेखील निष्णात असावा हे किती विलक्षण आहे !

पुस्तकात ऐतिहासिक महत्वाच्या अनेक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. पवार घराण्याचा मध्यप्रदेशातील इतिहास, पुण्याच्या शुक्रवार पेठेच्या भागातील आता बदनाम असणाऱ्या परंतु अगदी १९५० सालापर्यंत ‘बावनखणी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या वस्तीची लखलखती सांगीतिक परंपरा (ज्याठिकाणी पं भास्करबुवा बखले, दत्तो वामन पोतदार एवढेच काय तर साक्षात बालगंधर्व देखील शास्त्रीय थाटातील लावणी ऐकायला येत) इत्यादी बराच इतिहास हा कथनाच्या ओघात अगदी लीलया एकजीव होऊन गेला आहे. कलगी-तुरा हा काहीतरी लोकसंगीताचाच प्रकार आहे इतपतच आपल्याला माहिती असते परंतु कलगीवाले म्हणजे शक्तीचे उपासक आणि तुरेवाले शिवाचे उपासक असून या दोहोंकडून वेदांतावर कवने गायली जातात त्याला ‘भेदिक’ असे म्हणतात अशी विशेष माहिती या पुस्तकातच मला मिळाली.

या पुस्तकासाठी मधू पोतदार यांना किती मेहनत घ्यावी लागली असेल याची कल्पनाच केलेली बरी. आधीच मराठीत वसंत पवारांच्यावरचे काही श्रद्धांजली लेख वगळता फारसे लिखाण उपलब्ध नाही, त्यात त्यांचे निधन होऊनही चाळीसहून अधिक वर्षे लोटलेली. त्यामुळे त्यांच्या आप्तेष्टांशी, कुटुंबियांशी, वादकांशी भेट घेऊन त्यांना बोलते करणे, त्या बोलण्यातून मिळालेले संदर्भ दुसरीकडून पडताळून घेणे, त्यांचे सर्व चित्रपट, ध्वनिमुद्रिका यांचे तपशील गोळा करणे हे विलक्षण कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. संगीत आणि वसंत पवार यांच्यावरच्या प्रगाढ प्रेमाशिवाय हे शक्यच नाही. वसंत पवार यांनी संगीत दिलेल्या हिंदी-मराठी चित्रपट व संगीत नाटकांची गायकांच्या नावासह तपशीलवार सूची, त्यांनी अभिनय व नृत्यदिग्दर्शन केलेल्या चित्रपटांची यादी, त्यांच्यासोबत काम केलेल्या वादकांवरचे स्वतंत्र प्रकरण या सर्व बहुमूल्य गोष्टींमुळे हे पुस्तक म्हणजे एक संदर्भग्रंथ किंवा दस्तऐवजच झाला आहे यात शंका नाही.

जाता जाता फक्त खटकलेल्या दोन गोष्टी मांडतो. पहिली म्हणजे विश्वास पाटील यांची प्रस्तावना. त्यांनी ती लेखकावरच्या प्रेमापोटीच लिहिलेली असली तरीही त्यात बहुतांशी पुस्तकातल्या तपशिलांचीच पुनरावृत्ती आहे. त्यामुळे ही प्रस्तावना खरेतर ‘स्पॉयलर’च ठरली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पृष्ठ क्र १८८ ते २०४ यांमध्ये पानाच्या अनुक्रमांचा गोंधळ उडालाय त्यामुळे कशानंतर काय वाचायचे हे कळण्यातच बराच वेळ जातो. अर्थात या त्रुटी नजर लागू नये म्हणून लावलेल्या तीटेइतक्याच छोट्या आहेत. संपूर्ण पुस्तक म्हणजे एक निखळ अनुभव आहे. पुस्तकाच्या पानापानात किस्से, आठवणी, ट्रिव्हिया, वसंतरावांबद्दलच्या लेखातली अवतरणे, सहकलाकारांनी ‘याची देही’ अनुभवलेल्या गोष्टींचे कथन इत्यादी मसाला एवढा ठासून भरलेला आहे की पुस्तक अक्षरशः खाली ठेववत नाही. वसंतरावांची हलाखीची परिस्थिती, त्यांचे व्यसन, त्यांच्यावर झालेले अन्याय यावर तपशिलाने लिहून देखील त्याबद्दल कढ काढण्यापेक्षा त्यांनी भरभरून उधळलेल्या खजिन्याबद्द्ल मधू पोतदार यांनी भरभरून लिहिले आहे. सर्वार्थाने खजिना असलेले हे पुस्तक न वाचणारी व्यक्ती खूप चित्तवेधक आणि माहितीपूर्ण तपशिलांना मुकेल यात शंकाच नाही.

पृष्ठे २७४, किंमत ३०० रू

आवृत्ती पहिली (२००९)

कॉन्टिनेन्टल प्रकाशन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख..

हा पठ्ठे बापूराव चित्रपट म्हणजे ज्यात छोटा गंधर्वांची गाणी आहेत तोच का ? मुंबई नगरी गं बडी बाका, हे गाणे आहे माझ्याकडे.

सुंदर परिचय! हे तिन्ही संगीतकार (वसंत पवार, देसाई आणि प्रभू) यांची गाणी मलाही खूप आवडतात. आणायच्या लिस्ट मधे टाकले हे पुस्तक.

वसंत पवार मिरजेचे. त्याबद्दल काही उल्लेख आहेत की नाही? त्यांचा मुलगा मिरजेत नगरपालिकेत नोकरी करत असे तेव्हा कामा निमित्त माझ्या वडिलांकडे येत असत. त्यांनी सांगितलेले काही किस्से माज्या वडिलांकडून ऐकले आहेत

उत्तम परिचय. पुस्तक मिळवून नक्की वाचेन.

"वसंत लावण्य" मध्ये उल्लेख केल्यानुसार अनंत माने आणि वसंत पवार ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात किती गाजलेली होती याची साक्ष त्या वेळचे प्रेक्षक देत असतातच. शिवाय एक दोन नव्हे तर तब्बल तेवीस चित्रपट दोघांनी मराठी रसिकांना दिले, तेही सारेच गाजलेले. मात्र "सांगते ऐका" नंतर सर्वात जास्त गाजलेल्या "सवाल माझा ऐका" नंतर ही जोडी तुटली....तेही मराठी चित्रपट सृष्टीच्या अंगणात कायमपणे वास्तव्य केलेल्या हेवेदाव्याने तसेच एकमेकाविरूद्ध कान फुंकणा-या काही रिकामटेकड्या व विघ्नसंतोषी लोकांच्या लावालावीच्या उद्योगामुळे. "अनंत माने यांचे चित्रपट चालतात म्हणजे वसंत पवार, ई. महमद आणि जयश्री गडकर यांच्यामुळेच. बाहेरच्या लोकांचे हेच मत आहे...." ~ असल्या बातम्या अनरावांच्या कानी पडल्या म्हणजे त्याना किती संताप आला असेल याची कल्पना येतेच. वसंत पवार याना याचा मोठा फटका बसला.... तो किती आणि कसा हे मधू पोतदार यानी पुस्तकात दिले आहेच. [ पुढे तर अगदी ईर्षेला पेटून अनंत माने यानी या तिघांना वगळून लीला गांधी आणि उषा चव्हाण याना प्रमुख भूमिका दिल्या व "केला इशारा जाता जाता" हा तमाशा चित्रपट तयार केला. संगीत राम कदम याना दिले, वसंतरावाना वगळूनच. चित्रपटाने रौप्य महोत्सवाचे यश पाहिले. अनंतरावांनी आपला दर्जाच सिद्ध केला. त्याचा परिणाम वसंतरावांवर कसा झाला ती कहाणी वेगळीच. ]

बाकी ती "मदिरा" नामक सखी जवळ असली की अशा अनेक गुणीजनांची अखेर कशी होते ते वसंत पवार उदाहरणावरून सिद्ध झाले आहेच.

श्री.दामले यानी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने पुस्तकाची माहिती दिली आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन.