आंटी मत कहो नाऽऽ

Submitted by सई केसकर on 11 January, 2017 - 07:25

परवाचीच गोष्ट. मुलाला आजी आजोबा घेऊन गेल्याचा फायदा घेऊन मी दिवा उजेडी खाली पाळायला गेले. व्यायाम हा हक्काचा मी टाइम मला अगदी काल परवापर्यंत मिळायचा. पण अमीर खाननी घोळ घातला. दंगल बघून आल्यापासून नवऱ्याला महावीरसिंग फोगट बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला पहाटे आणि रात्री असे व्यायामाचे स्लॉट वाटून घ्यावे लागतात. नवऱ्यानी व्यायाम केलाच पाहिजे या भूमिकेतून, मला काय फरक पडतो? त्याचं हृदय; आणि आता, 'नाही केला तर उत्तम, मला जास्त करता येईल' इथवर मला माझ्या परिस्थितीने आणून ठेवलंय. त्यामुळे मधेच हा रणवीर पेशवा किंवा दंगल खान येऊन माझी स्थिरावलेली मानसिक बैठक बिघडवून जातात. असो. तर मी माझ्या सातव्या राऊंडवर असताना मागून मला तो अत्यंत परिचित, तरीही तितकाच तिरस्करणीय आवाज ऐकू आला, "आंटी, बॉल देता का प्लिज?". मी आवाजाच्या दिशेनी पाहिलं, तर एका गुबगुबीत शेवरीच्या कापसाच्या उशीला टीशर्टचा अभ्रा घातल्यासारखा दिसणारा एक चौदा वर्षाचा मुलगा दिसला. त्याच्या त्या गोंडस चेहऱ्यावर मला आंटी म्हणल्याबद्दल कुठलाही पश्चाताप दिसत नव्हता. त्यामुळे माझा अहंकार गिळून मी चुपचाप बॉल उचलून त्याच्या दिशेने फेकला. इतका जोरात फेकला की त्याला तो आणायला शंबर एक मीटर पाळावे लागले. त्यातच समाधान मानून मी आठव्या राउंडला सुरुवात केली. मग उरलेले दोन तीन राउंड मी या आंटी न म्हणून घेण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार केला.

लोकांनी आंटी म्हणू नये म्हणून मी कित्येक दिवस मिंत्रावर "हल्लीची" पिढी काय घालते याचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासातून डिस्ट्रेस्ड जीन्स घ्यावी असं माझं मत बनलं. मग आधी टेप शोधून काढली आणि स्वत:ची मापं काढली! खूप दिवस शॉपिंग कार्ट मध्ये लोळवून एकदाची ती सगळीकडे एकसारखी फाटलेली जीन्स घेतली. मी अशा प्रकारचे वस्त्र मागवले आहे, तेही ऑनलाईन, हे ऐकून मातोश्रींनी विचारसुमने उधळली (नवऱ्यानी हात टेकले आहेत हे वेगळे सांगायला नकोच).
"एका मुलाची आई आहेस तू आता. शोभलं पाहिजे हे सगळं. आणि कपडे संपूर्ण अंग झाकण्यासाठी असतात"
यावर मी "हूं" असा आवाज करून बायका करतात तसं पारंपरिक वाकडं तोंड केलं.
ठरल्या दिवशी माझं पार्सल आलं आणि उघडून बघितल्यावर लक्षात आलं की चित्रात दिसत होती तशी आणि तिथेच फाटलेली नसून, त्या नकाशाच्या बाहेरही जाऊन ती जीन्स फाटली होती. आता परत न्यायला येणाऱ्या माणसाला, "ती मला हवी तशी फाटली नाहीये म्हणून तुम्ही परत न्या", असं कसं सांगायचं या विवंचनेत मी पडले. पण त्यांनी काहीही न विचारता चुपचाप ती परत नेली. मग त्यापेक्षा हजार एक रुपये कमी देऊन मी बिन फाटकी जीन्स मागवली. त्यावर देखील, "फाटलेली जास्त महाग होती?" असे उग्दार मातोश्रींनी (नाटकी) डोळे विस्फारून काढले .

जीन्सचा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर मी माझ्या अस्मितेच्या शोधात एका काव्यवाचनाच्या मेहफिलीत गेले. डाव्या मतवादी लोकांनी बुजबुजलेल्या एका कॉफी शॉपच्या अंगणात हे असले कार्यक्रम होतात. आणि त्याला हजेरी लावणारे लोक अतिशय "इन" असतात. म्हणजे बसतात ते बाहेरच, ते पण अशा इतरवेळी फडतूस दिसणाऱ्या, पण अशा प्रसंगांची शोभा वाढवणाऱ्या बांबूच्या चटयांवर. काही महत्वाचे कवी पुढे गोमुखासनात बसून आपल्या टॅब्लेट्सवर आपले ब्लॉग्स उघडून कविता वाचून दाखवत होते. आणि बाकीचे आपापल्या फोनवर काहीतरी भलतंच करत बसले होते. कविता ऐकण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला पण लक्ष्य सारखं तिथे बसलेल्या कवींच्या चेहऱ्यांकडे जात होतं. सगळ्यांनी एकसारख्या झुडपासारख्या दाढ्या,आणि एखाद्या राजपुत योध्दयाला लाजवतील अशा पिळदार मिश्या ठेवल्या होत्या. पण माझ्या आंटीपणाचा पुरावा म्हणूनच की काय, त्यांच्या त्या रुपाकडे बघताना माझ्या मनात, ते सगळे किती "इन" किंवा "हॉट" आहेत या ऐवजी, सारखा एकच विचार येत होता. या सगळ्यांच्या आया आत्ता यांना घ्यायला आल्या तर आपला मुलगा कुठला हे कसं ओळखणार?

हे सगळे प्रकार झाल्यावर मी, आपण खरंच आंटी झालोय का, याची अशी वेळ आणि पैसे खर्च करून फेरतपासणी करणे बंद करायचे ठरवले. आणि माझ्या दैनंदिन जीवनातूनच डेटा गोळा करायला सुरुवात केली. आधी आंटी होणं याची व्याख्या करायचा प्रयत्न केला. त्यात अर्थातच आधी, पंचवीस वर्षांपूर्वी आई जे काय काय डायलॉग मारायची ते मारले. मी कशी लवकर उठते, घरातलं सगळं बघते (नवऱ्याच्या मदतीचा करेक्शन फॅक्टर लावून), किती अवघड आहे आजकालच्या काळात. "जबाबदाऱ्या" आल्या की कसं आपटूडेट राहता येणार? पेपर वाचायला सुद्धा वेळ नसतो (हा अनालॉग पेपर. डिजिटल पेपरचं सलाईन दिवसभर चालू असतं, तसं). मग स्वस्तुती आणि स्वदया (सेल्फ पिटी?) मधून बाहेर आल्यावर लक्षात आलं, की "तरुण मनात" असतात तितक्या तीव्र भावनाच आता बहुतेक मनात उरल्या नाहीयेत.

पूर्वी आपण कसे दिसतो, आरशात कसे दिसतो आणि चार चौघात कसे दिसतो वगैरे फार महत्वाचं वाटायचं. आता जर कुणी येऊन माझ्या दिसण्यावर टिप्पणी केली, तर "गेलास/गेलीस उडत", याखेरीज दुसरे वाक्य डोक्यात येत नाही. फक्त कानाला अजून आंटी शब्द खटकतो (पण त्याचीही सवय होईल). किंवा कुणी बिचारा प्रेमात मजनू झाला असेल तर त्याच्या मोहब्बतीचे कौतुक न वाटता, त्याचे रडे संपल्या संपल्या, "तू अनुरूपवर जा. तिथे खूप ऑप्शन्स आहेत" असं सुचवायची खुमखुमी मारून टाकावी लागते. विशीतला बराच काळ स्वतःच्या भावनाच मॅनेज करण्यात गेला. आणि आता बराचसा वेळ स्वतःचा आणि कुटुंबाचा वेळच मॅनेज करण्यात जातो. त्यामुळे बऱ्याचदा, ज्यांच्याकडे स्वतःबद्दल खूप विचार करायला वेळ आहे त्यांची असूया वाटू लागते. आणि यातच आपले आंटीकरण सामावलेले आहे असा निष्कर्ष मी काढला. पण या छोट्याशा साक्षात्काराचे रूपांतर, "आमच्यावेळी" या शब्दाने सुरु होणाऱ्या असंख्य कंटाळवाण्या प्रवचनांमध्ये होऊ नये म्हणून, अधून मधून विशीत एक फेरफटका मारून आलेच पाहिजे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे एवढेही वय नाही कि कॉलेज गोइंग मुलांनी ऑंटी म्हणावे हां पण स्कुल गोइंग बच्चे कंपनीने म्हंटले तर चालते. तर आज सकाळी बस मध्ये एका मुलाचा मला धक्का लागेल म्हणून मी आधीच त्याला म्हणाली कि तिरका हो तर तो माझ्यावर भडकला आणि म्हणाला कि मला काई शोक नाही म्हातार्याना धक्का मारायला .........मला नाही आवडले एकतर तो एकेरीवर ऊतरला आणि वरून म्हातारी म्हणाला.

ती हेअर डायची जाहिरात कुणाला आठवली नाही का? एक तरूण मुलगा आपल्याला 'हॅलो आंटी' म्हणाला या चिंतेने त्या बाईच्या डोक्यात आंटी हा शब्द घोळत राहतो. मग ती केस डाय करते. मग तोच मुलगा तिला ' हॅलो अंजली दीदी म्हणतो आणि तिच्या नवर्याला 'हाय अंकल' Happy मग नवर्याच्या डोक्यात ' अंकल????'

असल्या कसल्या क्रायसिसमधून न जाता मी खुल्या मनाने 'आंटीत्व' स्विकारले आहे.
तरी मला स्वतःला कुणाला 'आंटी' हाक मारायला आवडत नाही.
ज्यांना आजुबाजूचे लोक पहिल्यापासून आंटी म्हणतात त्यांनाच आम्ही म्हणतो.
नाहीतर ताई/अक्का/अम्मा/काकू

मावशी म्हणायला आवडत नाही जास्त कारण जेजेत असल्यापासून मावशी /मामा म्हणजे आया/वॉर्डबॉय असं वाटतं.

काकू म्हणायला जा आणि बाई लग्न झालेली नसली तर काय करा?
म्हणून ताई च बरं

तरी इकडे सगळ्या पुतणे /भाचे कंपनीने मला 'स्वातीअक्का' केलंय आणि माहेरी अजूनही 'ताई' त्यामुळे फार फरक पडत नाही.

फेबुवर /सोशल साईटवर मॅडम म्हटलं कुणी की मात्र खूप राग येतो.
Happy

मॅडम म्हटलं कुणी की मात्र खूप राग येतो.>>>>
अॉफीस आणि सदृश्य ठिकाणी मॅडम हा एक आँटी च्या समानार्थी वापरला जाणारा शब्द आहे असं लक्षात आलं >>>>

मला खरच प्रश्न पडलाय की कुणी मॅडम म्हटले की त्यात काय एवढे रागवायचे
आमच्या ऑफीसमध्ये तर जस्ट ग्रॅडुयेट मुलींना त्यांचे बॉससुद्धा मॅडम म्हणतात, मुलींना/स्त्रियां शी बोलताना रीस्पेक्ट मध्ये (वाक्य निट मांडता नाही आलेय, भावना समजुन घ्या)

मॅडम ठीक आहे की. फक्त कधी कधी पुरुष चिडले की असे उपहासात्मक मॅडम म्हणतात.
जसं की ट्रॅफिकमध्ये त्यांची गाडी अडवली की लगेच असा एव्हिएटर घातलेला माणूस खिडकीतून मुंडकं आणि हात बाहेर काढून "ओ मॅडम" म्हणतो.
किंवा "ओ मॅडम, तुम्ही बाई आहात म्हणून जास्त बोलत नाहीये" (कारण मला बाईच्या हातचा मार खायचा नाहीये सगळ्यांसमोर).
सो असं मॅडम नाही आवडत.

साती, मॅडमचं काय? म्हणजे राग बिग येण्याएवढं? नक्कीच काहीतरी स्टोरी आहे ह्याच्यापाठी Happy

त्या काकुंच्या स्टोरीसारखं काय? Wink

मी लहानपणापासुन मध्यमवयीन स्त्रीयांना मावशी म्हणुन संबोधतो. एकदा बसमधे एका बाईला "मावशी जरा बाजुला होता का?" असं म्हटलं. ती बाजुला तर झाली पण माझ्याकडे विचित्र नजरेने बघितलेलं मला नक्की आठवतं. मी सव्वा सहा फुट उंच असल्यामुळे मागुन आवाज दिल्यावर अनोळखी लोकं दचकणं मला नवीन नाही. पण नंतर लक्षात आलं की ती बिचारी माझ्यापेक्षा जेम्तेम ६-७ वर्षांनी मोठी असेल. तेव्हापासुन मी सगळ्या मोठ्या स्त्रीयांना "ताई" म्हणुन हाक मारतो. Proud

(किंवा धागाकर्तीस आँटी) म्हणायला हरकत नसावी >> आता मायबोलीवर सगळे मला आंटी म्हणणार. असो. >> ओ ते ठिक आहे, पण विक्रमची आई म्हणू नये म्हणजे मिळवली. :).

लेख छान झालाय. Happy

तो दिवस मला अजून आठवतोय जेव्हा मला 'अंकल'चे प्रमोशन मिळाले होते. मी २४-२५ वर्षांचा असतेवेळी एकदा एका केमिस्टच्या दुकानात औषधे घ्यायला गेलो होतो. काउंटरवर एक १६-१७ वर्षाचा मुलगा उभा होता. पैसे परत देताना तो मला "अंकल, यह ले लो आपका पैसा" असं म्हणाला. त्यावर त्याने 'अंकल' म्हटल्याचा मला इतका भयंकर राग आला कि मी त्याच्यावर जोरात खेकसलो. "क्या मैं तुझे अंकल दिखता हूँ क्या?" वास्तविक तोपर्यंत मला कोणीही 'अंकल' म्हटले नव्हते. मला वाटलं तो मुद्दामहून माझी टिंगल करण्याकरीताच मला 'अंकल' म्हणतोय. तो एवढा भेदरला होता कि नाही!! पण थोड्याच दिवसांत सगळेच मला 'अंकल' म्हणू लागले. आणि मग मला जाणवले कि मी आता खरोखरच 'अंकल' दिसायला लागलोय. तो मुलगा मला 'अंकल' म्हणाला होता ते बरोबरच होते. मी उगाच त्याच्यावर रागावलो होतो. आणि मी 'अंकल'चे प्रमोशन गुपचूप स्वीकारले. न स्वीकारून करतो काय? Biggrin

>>>(किंवा धागाकर्तीस आँटी) म्हणायला हरकत नसावी >> आता मायबोलीवर सगळे मला आंटी म्हणणार. असो. >> ओ ते ठिक आहे, पण विक्रमची आई म्हणू नये म्हणजे मिळवली

आमचा विक्रम "सिंह" नाहीये. विक्रमादित्य आहे.

>>>मी उगाच त्याच्यावर रागावलो होतो. आणि मी 'अंकल'चे प्रमोशन गुपचूप स्वीकारले. न स्वीकारून करतो काय?

हो ना. म्हणूनच मी नेहमी अहंकार गिळून चुपचाप आंटी म्हणून घेते. कारण "आंटी म्हणल्यावर चिडणारी आंटी" असं माझ्या मागे कुणी म्हणू नये.

आवडलं. फार पुर्वी, मी आणी माझा क्रश रिक्शातुन कुठेतरी जात होतो. तो माझ्यापेक्षा दहा वर्षतरी मोठा असेल पण दिसत होता यंगच. म्हणजे माझा काकाबिका अजिबातच दिसत नव्हता. तर, सिग्नलला रिक्षा थांबल्यावर एक भिकारी पैसे मागु लागला. आम्ही दुर्लक्ष करण्याचा खुप प्रयत्न करत होतो कारण अगदी धडधाकट माणुस होता तो. उगिचच सिग्नलवर कमाई करणारे असतात तसा. ईकडेतिकडे पहात होतो आम्ही तेवढ्यात तो ओरडला, अंकल, दो ना पैसे. माझा क्रश सॉल्लिड एम्बॅरेस झाला आणी दहाची नोट दिली त्याला.

अॉफीस आणि सदृश्य ठिकाणी मॅडम हा एक आँटी च्या समानार्थी वापरला जाणारा शब्द आहे असं लक्षात आलं >> नाही पटत . ऑफिस मध्ये म्याडम आणि सरच म्हटले पाहिजे स्पेशली नवीन जॉईन झालेल्या स्टाफ कडून . जुने नेहमीचे नावानेच हाक मारतात कि.:)

आज काल बरेच हिंदी भाषिक दुकानदार स्वतः वयस्कर असेल तरी आपल्या गिऱ्हाईकाला सर्रास अंकल म्हणून हाक मारतात असं माझं निरीक्षण आहे.

मस्त लेख झालाय Lol
लहान मुलं म्हणतात आंटी त्यांना वयाची समज नसेल म्हणून कदाचित पण आजकाल मोठ्यांना पण लहानच आहोत असं वाटतं. एक भाजीवली माझ्या बाबांना चक्क आजोबा म्हणाली, असेल थोडी लहान मोठी तर दादा तरी म्हणावं ना.

दिवाळीच्या सुमारास काही मुले फटाके उडवत होती.
त्यांनी रस्त्यावर एका बॉम्बची वात पेटवली आणि लांब उभे राहिले,
तेवढ्यात एक वयाने जरा जास्त आणि मॉड दिसणारी बाई तिकडून जाऊ लागली,
तर मुले ओरडायला लागली, ऑण्टी बॉम्ब हैं, ऑण्टी बॉम्ब हैं !
बाई मुलांकडे पाहून आणि लटक्या रूसव्याने हात झटकून म्हणाल्या,
नही रे, अब वो बात कहाँ !!!

Pages