आंटी मत कहो नाऽऽ

Submitted by सई केसकर on 11 January, 2017 - 07:25

परवाचीच गोष्ट. मुलाला आजी आजोबा घेऊन गेल्याचा फायदा घेऊन मी दिवा उजेडी खाली पाळायला गेले. व्यायाम हा हक्काचा मी टाइम मला अगदी काल परवापर्यंत मिळायचा. पण अमीर खाननी घोळ घातला. दंगल बघून आल्यापासून नवऱ्याला महावीरसिंग फोगट बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला पहाटे आणि रात्री असे व्यायामाचे स्लॉट वाटून घ्यावे लागतात. नवऱ्यानी व्यायाम केलाच पाहिजे या भूमिकेतून, मला काय फरक पडतो? त्याचं हृदय; आणि आता, 'नाही केला तर उत्तम, मला जास्त करता येईल' इथवर मला माझ्या परिस्थितीने आणून ठेवलंय. त्यामुळे मधेच हा रणवीर पेशवा किंवा दंगल खान येऊन माझी स्थिरावलेली मानसिक बैठक बिघडवून जातात. असो. तर मी माझ्या सातव्या राऊंडवर असताना मागून मला तो अत्यंत परिचित, तरीही तितकाच तिरस्करणीय आवाज ऐकू आला, "आंटी, बॉल देता का प्लिज?". मी आवाजाच्या दिशेनी पाहिलं, तर एका गुबगुबीत शेवरीच्या कापसाच्या उशीला टीशर्टचा अभ्रा घातल्यासारखा दिसणारा एक चौदा वर्षाचा मुलगा दिसला. त्याच्या त्या गोंडस चेहऱ्यावर मला आंटी म्हणल्याबद्दल कुठलाही पश्चाताप दिसत नव्हता. त्यामुळे माझा अहंकार गिळून मी चुपचाप बॉल उचलून त्याच्या दिशेने फेकला. इतका जोरात फेकला की त्याला तो आणायला शंबर एक मीटर पाळावे लागले. त्यातच समाधान मानून मी आठव्या राउंडला सुरुवात केली. मग उरलेले दोन तीन राउंड मी या आंटी न म्हणून घेण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार केला.

लोकांनी आंटी म्हणू नये म्हणून मी कित्येक दिवस मिंत्रावर "हल्लीची" पिढी काय घालते याचा अभ्यास केला होता. त्या अभ्यासातून डिस्ट्रेस्ड जीन्स घ्यावी असं माझं मत बनलं. मग आधी टेप शोधून काढली आणि स्वत:ची मापं काढली! खूप दिवस शॉपिंग कार्ट मध्ये लोळवून एकदाची ती सगळीकडे एकसारखी फाटलेली जीन्स घेतली. मी अशा प्रकारचे वस्त्र मागवले आहे, तेही ऑनलाईन, हे ऐकून मातोश्रींनी विचारसुमने उधळली (नवऱ्यानी हात टेकले आहेत हे वेगळे सांगायला नकोच).
"एका मुलाची आई आहेस तू आता. शोभलं पाहिजे हे सगळं. आणि कपडे संपूर्ण अंग झाकण्यासाठी असतात"
यावर मी "हूं" असा आवाज करून बायका करतात तसं पारंपरिक वाकडं तोंड केलं.
ठरल्या दिवशी माझं पार्सल आलं आणि उघडून बघितल्यावर लक्षात आलं की चित्रात दिसत होती तशी आणि तिथेच फाटलेली नसून, त्या नकाशाच्या बाहेरही जाऊन ती जीन्स फाटली होती. आता परत न्यायला येणाऱ्या माणसाला, "ती मला हवी तशी फाटली नाहीये म्हणून तुम्ही परत न्या", असं कसं सांगायचं या विवंचनेत मी पडले. पण त्यांनी काहीही न विचारता चुपचाप ती परत नेली. मग त्यापेक्षा हजार एक रुपये कमी देऊन मी बिन फाटकी जीन्स मागवली. त्यावर देखील, "फाटलेली जास्त महाग होती?" असे उग्दार मातोश्रींनी (नाटकी) डोळे विस्फारून काढले .

जीन्सचा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर मी माझ्या अस्मितेच्या शोधात एका काव्यवाचनाच्या मेहफिलीत गेले. डाव्या मतवादी लोकांनी बुजबुजलेल्या एका कॉफी शॉपच्या अंगणात हे असले कार्यक्रम होतात. आणि त्याला हजेरी लावणारे लोक अतिशय "इन" असतात. म्हणजे बसतात ते बाहेरच, ते पण अशा इतरवेळी फडतूस दिसणाऱ्या, पण अशा प्रसंगांची शोभा वाढवणाऱ्या बांबूच्या चटयांवर. काही महत्वाचे कवी पुढे गोमुखासनात बसून आपल्या टॅब्लेट्सवर आपले ब्लॉग्स उघडून कविता वाचून दाखवत होते. आणि बाकीचे आपापल्या फोनवर काहीतरी भलतंच करत बसले होते. कविता ऐकण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला पण लक्ष्य सारखं तिथे बसलेल्या कवींच्या चेहऱ्यांकडे जात होतं. सगळ्यांनी एकसारख्या झुडपासारख्या दाढ्या,आणि एखाद्या राजपुत योध्दयाला लाजवतील अशा पिळदार मिश्या ठेवल्या होत्या. पण माझ्या आंटीपणाचा पुरावा म्हणूनच की काय, त्यांच्या त्या रुपाकडे बघताना माझ्या मनात, ते सगळे किती "इन" किंवा "हॉट" आहेत या ऐवजी, सारखा एकच विचार येत होता. या सगळ्यांच्या आया आत्ता यांना घ्यायला आल्या तर आपला मुलगा कुठला हे कसं ओळखणार?

हे सगळे प्रकार झाल्यावर मी, आपण खरंच आंटी झालोय का, याची अशी वेळ आणि पैसे खर्च करून फेरतपासणी करणे बंद करायचे ठरवले. आणि माझ्या दैनंदिन जीवनातूनच डेटा गोळा करायला सुरुवात केली. आधी आंटी होणं याची व्याख्या करायचा प्रयत्न केला. त्यात अर्थातच आधी, पंचवीस वर्षांपूर्वी आई जे काय काय डायलॉग मारायची ते मारले. मी कशी लवकर उठते, घरातलं सगळं बघते (नवऱ्याच्या मदतीचा करेक्शन फॅक्टर लावून), किती अवघड आहे आजकालच्या काळात. "जबाबदाऱ्या" आल्या की कसं आपटूडेट राहता येणार? पेपर वाचायला सुद्धा वेळ नसतो (हा अनालॉग पेपर. डिजिटल पेपरचं सलाईन दिवसभर चालू असतं, तसं). मग स्वस्तुती आणि स्वदया (सेल्फ पिटी?) मधून बाहेर आल्यावर लक्षात आलं, की "तरुण मनात" असतात तितक्या तीव्र भावनाच आता बहुतेक मनात उरल्या नाहीयेत.

पूर्वी आपण कसे दिसतो, आरशात कसे दिसतो आणि चार चौघात कसे दिसतो वगैरे फार महत्वाचं वाटायचं. आता जर कुणी येऊन माझ्या दिसण्यावर टिप्पणी केली, तर "गेलास/गेलीस उडत", याखेरीज दुसरे वाक्य डोक्यात येत नाही. फक्त कानाला अजून आंटी शब्द खटकतो (पण त्याचीही सवय होईल). किंवा कुणी बिचारा प्रेमात मजनू झाला असेल तर त्याच्या मोहब्बतीचे कौतुक न वाटता, त्याचे रडे संपल्या संपल्या, "तू अनुरूपवर जा. तिथे खूप ऑप्शन्स आहेत" असं सुचवायची खुमखुमी मारून टाकावी लागते. विशीतला बराच काळ स्वतःच्या भावनाच मॅनेज करण्यात गेला. आणि आता बराचसा वेळ स्वतःचा आणि कुटुंबाचा वेळच मॅनेज करण्यात जातो. त्यामुळे बऱ्याचदा, ज्यांच्याकडे स्वतःबद्दल खूप विचार करायला वेळ आहे त्यांची असूया वाटू लागते. आणि यातच आपले आंटीकरण सामावलेले आहे असा निष्कर्ष मी काढला. पण या छोट्याशा साक्षात्काराचे रूपांतर, "आमच्यावेळी" या शब्दाने सुरु होणाऱ्या असंख्य कंटाळवाण्या प्रवचनांमध्ये होऊ नये म्हणून, अधून मधून विशीत एक फेरफटका मारून आलेच पाहिजे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कीती वय आहे तुमचे,माझे ३१ आहे ,अलमोस्ट सगळ्या षोडशा मला आता काकाच म्हणतात.वयाबरोबर एक ग्रेसफुल पर्सनॅलीटी कॅरी करायची असते.मी माझे पांढरे केस व दाढी लपवत नाही.असे म्हणतात पुरुष व स्त्री तीशी,चाळीशीत जास्त सेक्सी दिसतात.
आणि आंटी म्हणले कुणी तर राग मानू नका,आमच्या इथे एक डॉक्टर बाई आहेत ,अलमोस्ट पन्नास आहेत पण माझा त्यांच्यावर क्रश आहे.फक्त सौदर्य महत्वाचे असते वय नाही.

वयाबरोबर एक ग्रेसफुल पर्सनॅलीटी कॅरी करायची असते > career ani Sansaar karnari Bai ahe ti....tyamule graceful personality ashnarch!!!

As always lekh awadla Happy

Lol भारी .
महावीरसिंग फोगट बनण्याची महत्वाकांक्षा >>> ढेरीवाला की बिनढेरीवाला ? Proud
काव्यवाचनाच्या मेहफलीत जाणार्‍यांना अंकल/ आंटीच म्हणणार ना ! Proud Light 1

>>>ढेरीवाला की बिनढेरीवाला ? फिदीफिदी

बिनढेरीवाला बनायचंय. पण मला १००% खात्री आहे की ढेरीवाला बनणारे!

मजेशीर लेख आहे.
काव्यवाचनाच्यावेळी आया आपले पोर कसे शोधून काढतील असा विचार मनात आला म्हणजे तू आता पुरती 'आई' मोडात आहेस.
आता तुला बाकीचे आँटीच म्हणणार.
कायपण कर!
Wink

लेख आवडला, विशेषतः शेवटचा परिच्छेद.

आम्ही इथून प्रथम भारतात गेलो तेंव्हा माझी सौ. ताई होती, काही वर्षांनी मावशी, आत्या झाली - आता जिथे जावे तिथे आजी!!
हे आजी आता फक्त माझ्या दीड वर्षाच्या नातीने तिला म्हंटलेले आवडते.

मला तसे बरेच काही काही म्हणतात, त्यात काका, आजोबा म्हणजे भलताच मोठा बहुमान.

मस्त !

मला मुली ( तरुण ) काका म्हणायला लागल्या त्याला युगं लोटली... आता आजोबा कधी म्हणायला लागतील, या धास्तीत असतो मी !

सई, छान लेख Happy

कीती वय आहे तुमचे,माझे ३१ आहे ,अलमोस्ट सगळ्या षोडशा मला आता काकाच म्हणतात.वयाबरोबर एक ग्रेसफुल पर्सनॅलीटी कॅरी करायची असते.मी माझे पांढरे केस व दाढी लपवत नाही. >>>>> सिंजी, ३१ म्हणजे तरुणच. ग्रेसफुल वयाच्या कसल्या चर्चा करताहात. Happy एवढ्यात केस पांढरे झाले पण?, कुछ लेते क्यों नही? डोक्याचे एकवेळ ठीक आहे, पण दाढीचे केस पांढरे असतील तर मग तुम्हाला वय चेक करावं लागेल. ४१ असेल बहुतेक. Wink

४१ असेल
बहुतेक.>>>>>>दिल पे छुरि मत चलाव बालिके ,हमारे केस पांढरे हुए तो क्याहुआ,हम आज भी दिलवाले है

पहाटे ६ वाजता पोराना घेऊन एअर्पोर्ट वर पोचलो होतो मागच्या महिन्यात. सर्व मुल, सामान आणि आयडी घेत्ले ना या चिन्तेत होते. समोर एक २१ची मुलगी ३ तास तरी लागतील इत्के आवरुन आली होती. तिच्याकडे पाहून पुन्हा एकदा कळले, आपण 'आन्टी' झालोय. Happy

छान लेख. मला पण वैताग येतो नवरा आणि मी दोघाना व्यायाम करायचा असेल तर. टाईम स्लॉट मिळणे अवघ्ड होते. Happy

विद्या

छान लेख.

एकदा खामगावला गेलो होतो. वय २४. तिथे आम्ही काही मित्र कॅमेराच्या दुकाना रोल घ्यायला गेलो होतो. तेव्हा लेन्स वरुन मी जरा ज्ञान पाजळले. ते ऐकुन एक १३- १४ वर्षाची मुलगी मला म्हणाली "अंकल मेरा कॅमेरा देखो तो, कैसा है लेन्स!" मी जागीच थिजलो, मित्रही काही क्षण अवाक झाले आणि मग हसू आवरु लागले.

तर वयाच्या पस्तीशीच्या आसपास एकदा दिल्ली वरुन कानपूर ट्रेनने जात होतो. विंडो सीट होती. कंपार्टमेंट मध्ये सोबत एक कुटुंब होते. माझे विंडोसीट्च्या छोट्या टेबलबर लॅपटॉवर काम सुरु होते. त्यात १४-१५ वर्षाच्या मुलीला विंडो सीट हवी होती. मी तिला माझं लॅपटॉपवर काम संपलं की मग देतो म्हणुन सांगितले. बर्‍याचवेळ झाल्यावर तिने मला विचारले "ओ भैया कितना टाईम लगेगा और?" मी काही उत्तर देण्याच्या विचारात होतो.. तेवढ्यात तिचे वडिल म्हणाले "बेटी, भैया? भैया बोल रही हो उनको?" मग लगेच ती करेक्ट करुन म्हणाली "सॉरी! अंकल! कितना टाईम लगेगा अंकल?"
आणि अंकल जगतात मी स्वत:चे स्वागत केले.

@ नंद्या, माझ्या मामेभावाच्या मुलाला माझ्या आईनी तो नुकताच बोलू लागला तेव्हा, "मी आज्जी नाहीये" असं इतक्या वेळा सांगितलं की तो तिला नाई आज्जी म्हणू लागला. आणि माझ्या वडिलांना मात्र अजूनही तो मामा म्हणतो! आज आईचं दु:ख समजायला लागलंय.
@विद्या, हे असं मला रोज होतं. तुझ्याशी अगदी सहमत. पण काही काही मुली खरंच खूप छान मेड अप असतात. तसं कधी कधी जमलं पाहिजे. Happy
@साती अगदी. बिल्डिंग मध्ये "विक्रमची आई" हे बारसं झालंय.
@मानव, हा हा. फारच इंटरेस्टिंग स्टोरी!

बर्गर किंग मध्ये कॉफी घेताना काउंटर वरच्या मुलीने गोड स्माईल दिले म्हणून मीही मितवा मधल्या स्व जो सारखे स्माईल दिले. कॉफीचे फक्त साठ सेंट्स घेतले व म्हणते कशी चोंबडी ! "सिनियर डिस्काउंट !"

मस्त लेख आहे, मजा आली वाचायला. आणि अनामिक भितीही मनी दाटली Happy
सध्या वयाने मोठे दिसायला दाढी मिश्या वाढवा या फेजमध्ये आहे मी .. पुढे भविष्यात छोटे दिसायला त्या काढायची वेळ येणार Happy

जन्मायच्या आधी काका हे देखील भारी आहे. जुन्या काळात अशी उदाहरणे असायची. आमच्याही फ्यामिलीत आहेत.

माझ्या आजीला आजी म्हटलेले आवडायचे नाही. त्यामुळे सर्व काकांची मुले तिला आई म्हणायचे आणि आपल्या खर्‍या आईला मम्मी Happy

माझ्या भावाच्या मित्राची मुलगी जी त्याच्या ओळखीनेच माझ्या कॉन्टॅक्ट मधे आली माझ्यापेक्श्या ४ एक वर्ष्यांनी लहान आहे ती मला आंन्टी म्हणते त्यात आता आम्ही एकाच ऑफिस मधे आहोत! ईरिटेट होत अगदी. नात्याने असेल तर वेगळी गोष्ट आहे.

छान मस्त खुसखुशीत Happy

आंटी बोलणार्‍याच्या व आपल्या वयातील अंतर आणि त्यामुळे होणारा त्रास हे व्यस्त प्रमाणात असते.

माझी याबाबत सुस्पष्टता आहे. वजन वाढले की तुम्ही आंटी दिसता, वजन कमी केले आणि योग्य शेपमध्ये आलात की दिदी बनता.
जेव्हा वजन जास्त असते तेव्हा चुकूनही स्लीवलेस घालू नये. अन्यथा तुम्ही आणखी जास्त आंटी वाटता.
याऊलट कमी असताना आवर्जून स्लीवलेस आणि वेस्टर्न आऊटफिट ट्राय करावे, त्यामुळे वयाने आणखी कमी वाटता.

माझे वजन म्हणाल तर चंद्रकोरीपेक्षा वेगाने बदलत असते. घरचा वजन काटा गाडीच्या वायपरपेक्षा वेगाने पुढे मागे पळत असतो. आज अंडरवेट असेन तर आठवड्याभरात ओवरवेट होते. त्यामुळे हे सारे अनुभवते. रोज सकाळी उठून आरश्यात बघण्याऐवजी वजनकाट्यावर उभे राहून ठरवते आज कुठले कपडे घालायचेत Happy

हे कसं शक्य आहे ? << माझा काका पुढच्या महिन्यात जन्माला येईल बहुतेक असं म्हणणारा पुतण्या पृथ्वीतलावर हजर असल्यामुळे... Happy

Pages