भारतीय जवानाची कैफियत

Submitted by आशुचँप on 10 January, 2017 - 07:46

भारतीय जवानाची कैफियत

आज तेज बहादुर यादव या बीएसएफ जवानाचा व्हिडीयो पाहिला आणि काटा आला अंगावर. आपले जवान कुठल्याही परिस्थितीत पडेल ते काम करत, कमालीच्या विषम हवामानात आपले कर्तव्य बजावत असतात. पण ती यंत्रे नाहीत तर माणसे आहेत याचा जणू वरिष्ठांना विसर पडला असावा आणि अगदीच असह्य झाल्यानंतर त्याने ही कैफियत सगळ्या जगासामोर मांडली असावी.

मला व्हिडीओ बघताना तेच जास्त जाणवत होते की आपल्याच देशबांधवांविरुद्ध, आर्मीच्या सगळ्या शिस्तीच्या आणि कायदेपालनाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस त्याला करावे वाटले या प्रोसेस मध्ये त्याने किती सोसले असेल. कित्येक रात्री तळमळत घालवल्या असतील, संतापाने, असह्यतेने पोखरून निघाला असेल.

त्याने परिस्थितीला वैतागून जीव दिला असता तर त्यावर साधी चर्चाही झाली नसती. वृत्तपत्रात एखादी छोटा कॉलम बातमी आली असती, की जवानाची ताण सहन न झाल्यामुळे आत्महत्या. विषय संपला.

पण त्याने हा मार्ग निवडला. याचे परिणाम काय होतील याची त्याला पूर्ण कल्पना असणारच, कारण व्हिडीओमध्येच त्याने ते सांगितले आहे. आणि बीएसएफने दिलेले स्पष्टीकरण बघता आणि लगोलग घेतलेली अॅक्शन बघता त्याचे म्हणणे किती खरे होते याची जाणिव झाली.

त्याला आता दारूच्या नशेत राहणारा, मनोस्वास्थ्य बिघडलेला ठरवण्याची सुरुवात झाली आहे. अशा जवानाला तुम्ही सीमेवर रक्षण करायला पाठवू कसे शकता हे कुणी विचारू शकत नाही. त्याला हळू हळू इतके खच्ची करतील की पुन्हा कुणी जवान असे धाडस करणार नाही.

एक भारतीय म्हणून मी या सगळयाचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आता यावर इतक्या उलट सुलट बातम्या येतील की कोण खरे आणि कोण खोटे हे देखील कळणारनाही. पण आज तेज बहादुर यादवच्या पाठीशी उभे राहणारे गरजेचे आहे. इतकी वर्षे आपले जवान खंबीरपणे आपल्या आणि शत्रुच्या मध्ये उभे राहीले आहेत. आज वेळ आलीये आपण त्यांच्या आणि भ्रष्टाचाराच्या मध्ये उभे राहण्याची.

https://www.youtube.com/watch?v=OwWjZ7xlRjU

हाच तो व्हिडीओ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापू, सर्व मुद्दे पटले. अश्या प्रकारे प्रसिद्धी करावी, हे मलाही पटलेले नाही, याचे बरेच परिणाम होऊ शकतात आणि ते एक देश म्हणून आपल्या हिताचे नाहीत.

दिनेश. सहमत.

तो जवान सांगतोय आणि लोक दणादण शेअर करत सुटलेत. काय बावळटपणा आहे राव.
मी फेसबुकवर बघितला पण मी केला काय लाईक्शेअर ते आठवत नाही. केला असेल तर मी दहापट बावळट.

त्या जवानाला योग्य त्या यंत्रणेकडे जा असे सांगणे जास्त गरजेचे होते. ते ह्युमन राईटवाले आणि कोण कोण टपून बसलेले असतात असल्या ठिणग्यांसाठी... आपल्या देशाची आपण इज्जत राखणे महत्त्वाचे आहे. तेही एक सैनिकी कर्मच आहे.

सीमेवर ११ तास उभेच राहायची गरज नाही, नागरिकांनी काहीही शेअर लाइक करण्याआधी ११ सेकंद विचार केला तरी पुरे.

बापू म्हणत आहेत की त्या जवानांना भारतीय न्यायालयात जाऊन केस करावी लागते. (आधी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही तक्रार करायला हवी ना? ). भारतीय न्यायालये ही वेळकाढू, खर्चिक आणि मनस्ताप देऊन तड लागण्याची शक्यता अत्यंत कमी असलेली प्रक्रिया आहे असं मानलं जातं. आर्मी न्यायालायासाराखी जलद नक्कीच नाही. तिकडे न्यायाची चेष्टा होते, हे ही सर्वमान्य आहे.
तो जवान भारतीय नागरिक आहे. त्याला मिडिया मध्ये जाऊन बातमी देण्याचा हक्क आहे. प्रिसिडंस नसेल कदाचित, पण ते बेकायदा नक्कीच नाही. आणि मला वाटतं देशाच्या इज्जतीपेक्षा जवानांची गरज महत्त्वाची आहे. जवानांच मनोधैर्य खचलं की काय होईल विचार करा. त्याच्यावर डीसीपलिनरी एक्शन योग्यअसेल तर घ्याच. पण.. हेच कसं चुकलं हे अर्ग्युमेंट फक्त नको.

नानाकळा तुमच्या कडून देश म्हणजे त्यातील माणसे आणि त्यांची इज्जत, त्यांच्या गरजा ह्या विषयावर धागा वाचल्यावर जवानानी हे हे केलं की देशाची इज्जत वाचते, हे त्याचं कर्मच आहे अशी पोस्ट अजिबात अपेक्षित न्हवती.

दिनेश, देशम्हणून अशावेळी ह्या तक्रारीची निःपक्ष आणि जलद तड लावून तथ्य असल्यास कठोर शासन करणे हिताचं आहे. व्हिसल ब्लोअरला देशद्रोही ठरवून त्याला परस्पर शासन करण्यात आपण पुढे आहेतच. तेच परत झालं तर खरी इज्जत जाईल. घोटाळे उघड करून इज्जत नाही जात, ते कधीच गृहीतक म्हणून स्वीकारलं आहे.

तो जवान भारतीय नागरिक आहे. त्याला मिडिया मध्ये जाऊन बातमी देण्याचा हक्क आहे. प्रिसिडंस नसेल कदाचित, पण ते बेकायदा नक्कीच नाही >>>> नक्की का ? त्यांचे डूज अ‍ॅण्ड डोण्ट काय आहेत ?

जर स्टोर मध्ये चाललेला भ्रष्टाचार मिलिटरी आणि पॅरा मिलिटरी फोर्सेस मध्ये सार्वत्रिक आणि सर्वकालीन आहे तर त्याचा अर्थ हा की प्रचलित उपायांनी त्याचे निर्मूलन झालेले नाही.
उज्ज्वल परंपरा, देशाची इज्जत वगैरे मुद्दे निव्वळ डोळ्यात धूळफेक करणारे आहेत
व्हिसल ब्लोअर नेहमीच प्रचंड जोखीम उचलत असतो आणि बऱ्याचदा त्याचा बळी जातो.
जर यादव यांनी केलेला आरोप योग्य असेल तर त्याचे निराकरण व्हावे ही अपेक्षा.

अनेकदा रोगापेक्षा औषध भयंकर नको म्हणून तक्रारींकडे काणाडोळा केला जातो. गैरप्रकार, शोषण हे फक्त आर्म्ड फोर्सेस मधे असते आणि खाजगी नोक-यांत नसते असे म्हणता येते का ?

आर्म्ड फोर्सेस मधे चालणारे गैरप्रकार, शोषण याबद्दल कुजबूज होते. पण त्याचे सरसकटीकरण करण्यात येऊ नये. तसेच तक्रार करणारा कांगावाखोर नाही याबद्दल खात्री नसताना मते मांडू नयेत. शक्यता आहेत. पण त्यामुळे शिस्तीला धोका होऊ नये. आर्मीची शिस्त बिघडली तर अवघड आहे. कुठल्याही नोकरीत लोकशाही नांदू शकत नाही. बंधने पाळावीच लागतात.

खाजगी आस्थापनांमधे एखाद्या कर्मचा-याला आस्थापनेच्या विरोधात प्रेस मधे जाऊन तक्रारी करण्याला परवानगी असेल का ?

>>गैरप्रकार, शोषण हे फक्त आर्म्ड फोर्सेस मधे असते आणि खाजगी नोक-यांत नसते असे म्हणता येते का ?

म्हणून सैन्यातले गैरप्रकार आणि शोषण चालवून घ्यायचे का?

ते चुकीचेच आहे. पण मीडीयाकडे जाणे हे देखील चुकीचे आहे. उपलब्ध मार्गांचा वापर केला आहे का यादवांनी ? जर अपप्रवृत्तीविरुद्ध लढा असेल तर वरिष्ठांना कल्पना देऊन न्यायालय किंवा पोलीस हे सुद्धा पर्याय होते ना ? मीडीयात जाण्यामागे ब्लॅकमेलिंगचा उद्देश नाही हे कशावरून ? आपल्याला नेमके सत्य कसे काय ठाऊक असू शकते ?

म्हणून सैन्यातले गैरप्रकार आणि शोषण चालवून घ्यायचे का? >>> कुणी चालवून घ्यायचे ? खाजगीकरणानंतर तर खाजगी आस्थापनांकडे सेवा आलेल्या आहेत. टोलनाके,व्हीएसएनएल मोबाईल सेवा, विमानसेवा, विमा यामधे चालणारे गैरप्रकार किंबा शोषण हे आपल्याला मान्य आहे का ?

मुद्दा नोकरीतल्या बंधनांचा आहे. शिस्तीचा आहे. यादवांनी आवाज उठवण्याचे सर्व पर्याय वापरले आहेत, किंवा तसा प्रयत्न केला होता आणि आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्याने ते मीडीयात गेले असे असेल तर त्याचे स्वागत केले पाहीजे. पण हे सिद्ध होणे देखील गरजेचे आहे. भावनेच्या भरात यादवांना (चूक की बरोबर हे अलाहिदा) पाठिंबा देणे पटणारे नाही. सैन्याच्या किंवा नोबेल प्रोफेशनच्या बाबत आपण नेहमी दोन टोके गाठतो.

सोन्याबापुंचा प्रतिसाद पटला नाही.

जे मला लिहायचे होते तेच टग्यानेही लिहिले आहे.

इतर सैनिकांची हाय खाउन स्टोअरचा जॉब करायचा नव्हता हे स्वतः सोन्याबापूनीच लिहिले आहे... म्हणजे तिथेही भ्रध्ह्टाचार होत होता , हे स्वतःच त्यानी कबूल केले आहे. त्याविरुद्ध त्यानी सनादशीर मार्गाने कधी तक्रार केली का ? नसल्यास का नाही केली ?

राजकारण , वैद्यकीय क्षेत्रे सगळीकडची स्टिंग ऑप्रेशनं सर्वजण चवीचवीने पहातात ... पण सैन्याची बातमी मेडियाकडे गेली की मात्र थर्ड क्लास मेडियापुढे आमची सत्वपरिक्षा द्यायची का ? हा सूर लावला आहे , तो पटला नाही. मेडियावाले त्याना जे दिसते / दाखवले जाते , ते फक्त प्रसारित करतात , त्याना थर्ड क्लास म्हणायचे प्रयोजन समजले नाही. ना ते भ्रष्टाचार करतात , ना ते पुरावे प्लांट करतात. मग ते थ र्ड क्लास कसे ?

व्हिसल ब्लोअर हा रिस्क घेउन काम करत असतो, त्याला संरक्षण मिळायला हवे ....

या देशात सोशलसाईट आणि मिडियावर बंदी आणायला हवी. हल्ली कोणीही आपल्या सोयीने त्यांचा वापर करत आहे. अन्यायाविरुद्ध लढायचे असेल तर सनदशीर मार्गाने लढायला हवे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवर भरवसा नाही असा त्याचा अर्थ झाला. हा भारतीय न्यायव्यवस्था आणि कायद्याचाही अपमान आहे.

राहिला प्रश्न त्या सैनिकाचा, तर त्याला शिक्षा वा सहानुभूती नंतर द्या. आधी त्याला मानसोपचाराची गरज आहे. परीणामाची कल्पना असूनही त्याने जे केलेय ते नॉर्मल माणसे नाही करू शकत.

देशातील प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आहे तर सैन्यात भ्रष्टाचार असणे यात नवल नाही. सौ मै से निण्याण्णवे बेईमान फिर भी मेरा देश महान हे प्रत्येकाला म्हणता आले पाहिजे. सैनिकांचे तर ते कर्तव्यच आहे.

त्याने हा वाद चव्हाट्यावर आणून स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. आता सैन्याची आणि पर्यायाने देशाची ईज्जत वाचवायला त्याचा आवाज दाबावाच लागणार. त्याला ईलाज नाही. जर योग्य मार्गाने तक्रार केली असती तर आपण काहीतरी करू शकलो असतो.

डॉक्टर अनिल,

माझा मुद्दा एवढाच होता, कि श्री यादव यांनी सनदशीर मार्गानि या बाबतीत न्याय मिळवायला हवा होता. हा व्हीडिओ सोशल मिडीयावर टाकल्याने, पाकिस्तान आणि चीन त्याचा फार गैरफायदा घेणार आहेत.

भ्र्ष्टाचार हा कुठेही होत असला तरी निषेधार्यच !

टग्या च्या मताशी सहमत आहे. खात्यांतर्गत शिस्त म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. त्यामुळे असे व्हिसलब्लोअर्स वस्तुस्थितीचे भान देतात. खात्यातील इतरांसाठी वा जनतेसाठीही ती उघड गुपिते असतात.

हा व्हीडिओ सोशल मिडीयावर टाकल्याने, पाकिस्तान आणि चीन त्याचा फार गैरफायदा घेणार आहेत.

<<

ते कसे काय ?

भारताविरुद्ध जहरी प्रचार तर तसाही होत असतोच, त्यांच्या हातात आणखी एक कोलित मिळाले आहे. ( त्या दोन देशात सर्व परिस्थिती आलबेल आहे का ? तशी माहिती कधी बाहेर येते का ? )

आपल्या सैन्याच्या निष्ठेबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल वाद नाहीच. ते अत्यंत कठीण परिस्थितीत राहतात, काम करतात याबाबतही वाद नाही. पण जो भ्र्ष्टाचार आहे तो काही व्यक्तींचा आहे, सरसकट सर्वच अधिकार्‍यांचा नाही. पुर्ण व्यवस्थेचा तर नाहीच नाही.

त्यांनाही न्याय मागण्याच्या संधी आहेत ( भले त्या वेगळ्या असोत पण आहेत ) फेसबूक हे अन्यायाला वाचा फोडण्याचे साधन नक्कीच नाही.

त्या दोन देशातील माहिती बाहेर येणं न येणं याचा आणि यादववर होत असल्याच्या अन्यायाबद्दल त्यानं मेडियाला सांगणं याचा काय संबंध आहे ?

या विडीव्होत हा सैनिक, निकृष्ठ दर्जाचे जेवण दिल्याबद्दल सरकारला दोषी न धरता, त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दोष देताना दिसत आहे. या वरुन हे लक्षात येतेय की भ्रष्टाचाराच्या भस्मासूरांने भारतीय सैन्याला देखिल सोडले नाही. वर सोन्याबापूनी लिहिल्याप्रमाणे स्टोर डुट्यी मिळावी म्हणून अधिकार्‍यांची जी धडपड चालते यावरुन देखिल हेच दिसून येते.

सोन्याबापूंना त्यांच्या पहिला प्रतिसाद द्यावा लागतो, हेच मुळी येथील जनता किती अपूर्‍या माहितीवर मत नोंदवते हे दर्शविते. प्यार मिल्ट्री फोर्स, बिएसएफ, ITPB ह्या ऑक्झिलरी सिस्टिस्मस आणि मिल्ट्री ह्यातील फरक माहिती नाहीत हे वाचून मला खरे तर आश्चर्य वाटले. (बॉर्डर पिक्चर मध्येही तो दाखवला आहे. त्यांचा प्रतिसाद चांगलाच आहे, पण गरजे बद्दल लिहितोय मी.

सोन्याबापूंचा दुसरा प्रतिसाद - त्यांनी मान्य केले हा त्यांचा मोठेपणा आहे. अ‍ॅक्चुअली सगळी पोस्ट चांगली आहे, पण त्यातील एका भागावर माझे मत वेगळे आहे.

त्या माणसाने सरळ PM अशी सोशल मिडियात हाक घातल्यामुळे आता सर्व चौकशी नीट होण्याची खात्री तरी आहे, अन्यथा इंटर्नल कप्लेंट मध्ये , 'हा देखेंगे' म्हणून अधिकारी लोकांनी गप्प बसवले असते. व हे उघडकीला आले नसते.

परदेशातील माणसे, सुषमा स्वराजला ट्विट करू शकतात, त्यांचे काम लगेच होते.
मागच्या महिन्यात देशातील ९ वी त्या गुंडा गावच्या मुलीने पंतप्रधानाला ट्विट केले, ८ दिवसात तिच्या गावाचे नाव बदलले,
तर BSF जवानाने देखील सोशल मिडियाचा वापर का करू नये?

सोशल मिडियाचा असा वापर स्वागतार्ह्य आहे. उगाच कोणालाही उठून तुम्ही पाकिस्ताना जा, म्हणण्यापेक्षा हे केंव्हाही बरे.

भारताविरुद्ध जहरी प्रचार तर तसाही होत असतोच, त्यांच्या हातात आणखी एक कोलित मिळाले आहे >>

तर? हाउ डज इट मॅटर? प्रचाराला घाबरणार की घर स्वच्छ करणार? लोकांनी कॉफिन मध्येही भ्रष्टाचार केलाच की! पण जेवणातील भ्रष्टाचार जरा अक्षम्य आहे असे मला वाटते.

@अमितव,

नानाकळा तुमच्या कडून देश म्हणजे त्यातील माणसे आणि त्यांची इज्जत, त्यांच्या गरजा ह्या विषयावर धागा वाचल्यावर जवानानी हे हे केलं की देशाची इज्जत वाचते, हे त्याचं कर्मच आहे अशी पोस्ट अजिबात अपेक्षित न्हवती.

आपला माझ्या कमेंटबद्दल पूर्ण गैरसमज झाला आहे. माझा रोख शेअर करणार्‍या लोकांवर होता, सैनिकांवर नव्हे. आपल्या देशाची सुरक्षा जशी सैनिक जीवावर खेळून करतात त्याच उच्च प्रतीचे कर्म म्हणजे सैनिकी कर्म. सैनिकाचे कर्म नवह्ते म्हणायचे हो, अगदी भलताच अर्थ घेतलाय तुम्ही. देशाची इज्जत देशातल्या इतर नागरिकांनीही सैनिकांतक्याच उच्च ध्येय व जबाबदारीच्या जाणिवेतून सांभाळणे गरजेचे आहे हे माझे मत.

"देशाची सुरक्षा जवानांचे हे कामच आहे, केलं तर काय झालं" अशा अर्थाचं ना आजवर माझ्या लिखाणात आलंय ना कधी येईल. हे पातक कधीच घडणे शक्य नाही.

कळावे लोभ असावा.

मागच्या महित्यात देशातील ९ वीतल मुलीने पंतप्रधानाला ट्विट केले, ८ दिवसात तिच्या गावाचे नाव बदलले,
तर BSF जवानाने देखील सोशल मिडियाचा वापर का करू नये?

<<

सहमत आहे.

मला वाटते गेल्या दोन वर्षात सुषमा स्वराज्य, सुरेश प्रभु व स्वत: पंतप्रधान यांनी देशातील जनतेला हा विश्वास दिला की सोशल मिडीयातून (फेसबुक, ट्विटर, युट्युब) कुणीही कसल्याही मदतीची मागणी केल्यास ती मिळेलच, ह्या विश्वासाने त्या BSF जवानाने त्याला होत असलेला त्रास सरकारपर्यंत पोहचवायला सोशल मिडियाची मदत घेतली असावी.

@टग्या साहेब,

माझ्या प्रतिसादातच मी माझ्या बौद्धिक कुवतीची सीमा स्पष्ट केली आहे, आणि माझ्या प्रतिसादाला असहमती दर्शवायचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे हे मी नीट जाणतो, मी तुमचा प्रतिसाद वाचला, त्यात ते धूळफेक वगैरे ऍडहोमिनिस्टिक प्रकार सोडले तर उत्तर देण्यासारखे बरेच आहे, जमेल तसे प्रतिसाद देतोच, ही फक्त पोच पावती देतोय

बाप्या

इंडियन आर्मी) ने ठरवलेल्या आर्मी पिनल कोड नुसार चालवतात. ह्यामुळे एक होते, आर्मी मध्ये न्यायदान खूप वेगाने होते

कधीकधी नाही. शिवाय आर्मी अ‍ॅक्ट प्रमाणे कारभार चालत असल्याने सिव्हिलियन न्यायलयेही काही करू शकत नाहीत. याचे अत्यंत दुर्दैवी उदाहरण म्हणजे सांबा हेरगिरी प्रकरण! पाकिस्तानच्या सीमेवरील एका तळावरील सुमारे १०० अधिकारी व जवान पाकिस्तान साठी हेरगिरी करत होते हे केवळ अशक्य होते. त्या प्रकरणात नाहक अडकलेल्या अनेक अधिकारी/जवानांना मृत्यूनंतरही न्याय मिळाला नाही. शेवटी सुप्रीम कोर्टानेही हात झटकले !

Pages