पुर्वज आमचे गद्दार होते का

Submitted by संतोष वाटपाडे on 3 January, 2017 - 01:47

जरी माघार होती घेतली..पळणार होते का
खरोखर सांग.. पुर्वज आमचे गद्दार होते का ...?

कशाला एवढी गर्दी जमा केलीत दुःखांनो
मला पाहून सरणावर कुणी रडणार होते का...?

मुलांना प्रेम दे मित्रा..तुझा पैसा नको फ़ेकू
बियाणे फ़क्त मातीने कधी गर्भार होते का..?

शहीदाची मिळाली देशभक्ती आज देशाला
घरी बापास त्याच्या लेकरु मिळणार होते का..?

तिला आनंद व्हावा याचसाठी शांत निजलो मी
गळा कापून हत्या एरवी अलवार होते का..?

तिला साडी पुरवताना...पुरवले शस्त्र का नाही
तुलादेखील अन्यायी कुणी म्हणणार होते का..?

जुन्या जखमेतुनी आठव असे वाहून का आले
हृदय तुटते तसे काही पुन्हा घडणार होते का.. ?

कसे कळले तुम्हाला ..शांततेचा खून झाल्याचे
तिच्या अंगावरी मारेकर्‍यांचे वार होते का..?

पुरेना अन्न म्हणुनी तू ..भितीने ..घेतली फाशी..
घराचे पोट ..मरण्याने तुझ्या ..भरणार होते का..?

-- संतोष वाटपाडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users