"मला मनापासून असे वाटते की....."

Submitted by मधुरा मकरंद on 31 December, 2016 - 12:34

मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०१६... ऑफिसमध्ये साजरा करण्याचे ठरले. आयत्यावेळी वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय दिला. "मला मनापासून असे वाटते की....." अशी सुरवात करून फक्त तीन मिनिटे बोलणे.

"नमस्कार मंडळीनो ...तर.. मला मनापासून असे वाटते की, आपण हल्ली आपली मराठी भाषा विसरत चाललो आहे. रोजच्या व्यवहारातसुद्धा कितीतरी अ-मराठी त्यात सुद्धा इंग्रजी शब्द सर्रास वापरतो, इतके की त्यांचे मूळ मराठी शब्द आठवतही नाही. आताशा आम्हाला डावे उजवे कळत नाही पण लेफ्ट राईट लगेच लक्षात येते. इंग्रजी आकडे कसे कळतात आणि एकोणपन्नास, पंच्याऐशी... असे आकडे म्हटले कि गाडी अडते.
जी भाषा बोलली जाते ती टिकते. मग वाटते मीच प्रयत्न करते जास्तीतजास्त मराठी बोलण्याचा. फार कष्ट पडतात हो. पहिलाच शब्द अडला ... ऍलर्जी .... काय म्हणतात हो मराठीत ऍलर्जी ला ? किती प्रकारे वापरून पहिला, पण आठवतो तो ऍलर्जी च. खरंच इतके विसरले काहो मी? मला मनापासून असे वाटते कि न वापरल्याने आपण आपली भाषा विसरत आहोत. पंचवीस वर्षांपूर्वी जी भाषा सहज बोलली, ऐकली, लिहिली आणि वाचली जात होती ती आता अस्तित्वाचा सघर्ष करत आहे. एखादी भाषा धोक्यात येणे ही एकूणच तिथल्या संस्कृतीसाठी रिस्क आहे. पहा बरे पुन्हा आला तो एक इंग्रजी शब्द. दिवसात किमान तीन वेळा हा ऐकत, बोलत, लिहीत वा वाचत असू पण पटकन कधी धोका म्हणत नाही.
मला मनापासून असे वाटते कि, मराठी टिकण्यासाठी तिचा जास्तीत जास्त सहज वापर व्हायला हवा. बाकी मला ऐकण्याची रिस्क तुम्ही घेतलीत म्हणून धन्यवाद."

तर वाचकहो, विषय कळल्या बरोबर हेच विचार मनात घोळू लागले. साधारण तीन मिनिटे पुरलीही असती, पण माझ्यात सभाधिटपणा अजिबात नाही. मनातले विचार मनातच राहिले.
मग काय? बरेच दिवस (कि महिने?) गेल्यानंतर इथे मायबोलीवर लिहावेसे वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users