ऑगस्ट रश

Submitted by माधव on 28 December, 2016 - 00:16

एक पॉप गायक आणि एक व्हायलीन-वादिका एका रात्री भेटतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्याच रात्री तिला दिवस जातात. तिच्या वडिलांना हे पसंत नसते ते तिला दूर नेतात, नायकाला अर्थात तिचा पत्ता माहित नसतोच. पुढे बाळंतपणात बाळ दगावले असे खोटेच सांगतात तिला आणि त्या बाळाची रवानगी अनाथाश्रमात होते. तो सिनेमाचा नायक! आई वडिलांचा कसलाच आगा पिछा नसलेला. खरं तर त्यांना तो अस्तित्वात आहे हे पण माहित नसते. पण निव्वळ संगिताच्या जोरावर तो आपल्या आई वडिलांना भेटतो. मनमोहन देसाईंच्या चित्रपटात शोभेल अशी अतर्क्य योगायोगांनी भरलेली कथा!

पण...

इथेच दिग्दर्शकाचे कसब दिसून येते. इतकी अतर्क्य कथा पण गुंतवून ठेवते याचे सगळ्यात जास्त श्रेय दिग्दर्शकाला जाते. कथेचा वेग इतका भन्नाट ठेवलाय की आपली अवस्था वेगाने वाहणार्‍या नदीतील ओंडक्यासारखी होते. थांबता येतच नाही. चित्रपटात कुठेही मेलोड्रामा नाही अतर्क्य कथा असली तरी बाकीच्या गोष्टी बर्‍याच लॉजीकल आहेत.

चित्रपटात खूप जास्त पार्श्वसंगीत आहे आणि ते खूप कर्कश्य आहे - अगदी पार्श्वगोंगाट म्हणण्याइतपत! पण तो गोंगाटच नायकाची प्रतिभा उलगडून दाखवतो. पूर्वी मायबोलीवरच 'रंगाची चव असते / रंग ऐकू येतात' असा काहिसा धागा होता, त्याची आठवण झाली त्या गोंगाटाने. आपल्यासारख्या सामान्यांना जो आवाज noise वाटतो तो संगितकाराकरता सूर असू शकतो आणि मग त्याच्या डोळ्यासमोर संगीत अक्षरशः प्रकट होते. त्यामुळे हा सगळा गोंगाट श्रवणीय आहे, आणि गोंगाट ते संगीत ही वाटचाल प्रेक्षणीय! तो गोंगाट सोडल्यास चित्रपटात काही सुंदर संगीताचे तुकडे पण आहेत.

नायकाची आई झालेली आभिनेत्री ठीकठाक आहे. मी तिला फेलीसीटी म्हणून ओळखतो. त्याच नावाच्या मलिकेत तिने नायीकेची भूमीका केली होती. त्यानंतर मात्र ती काहीच प्रभाव पाडू शकली नाही. नायकाचा बाबा झालेला अभिनेता मात्र मस्त आहे. एकदा त्याची आणि नायकाची पार्कमध्ये भेट होते. तो प्रसंग त्याने अप्रतिम साकारला आहे. छोट्याशा भूमीकेत रॉबीन विल्यम्स छाप पाडून जातो.

आता नायक! मनमोहन देसाईंच्या चित्रपटात जे स्थान अमिताभचे होते तेच - कदाचीत काकणभर सरसच - स्थान इथे त्या चिमुरड्या नायकाचे आहे. पोरकेपणा, संगीतातून संगीतकाराला मिळणारा आनंद, बालसुलभ भिती अशा अनेक भावना त्याने इतक्या सफाईने दाखवल्या आहेत की पडद्यावरून नजर हटत नाही. पण ह्या सगळ्यांहून वरचढ आहे तो त्याने दाखवलेला आत्मविश्वास! माझं संगीत हेच मला माझ्या आईवडिलांना भेटवेल हा आत्मविश्वास चित्रपटाचा कणा आहे आणि तो त्याने इतका सहज दाखवला आहे की इतकी अतर्क्य कथा पण तर्क्य वाटायला लागते.

चित्रपट पाहताना दोन गोष्टी आवर्जून करा -
१. आवाज फार कमी ठेऊ नका. तो गोंगाट आणि त्याने होणारा त्रास हे अनुभवणे खूप गरजेचे आहे.
२. चित्रपट संपल्यावर ५ मिनीटे शांत जागी अगदी शांत बसा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव छान लीहिलय...>>>>>>पण ह्या सगळ्यांहून वरचढ आहे तो त्याने दाखवलेला आत्मविश्वास! माझं संगीत हेच मला माझ्या आईवडिलांना भेटवेल हा आत्मविश्वास चित्रपटाचा कणा आहे ..हे खुप भारी आहे.

आ गले लग जा आठवला>>>> देवा !! कुठे आ गले लग जा आणि कुठे औगस्ट रश. एकदम फिल्मी प्लॉट असूनही हा चित्रपट आवडला होता. तो छोटा नायक खरच मस्त आहेआणि वेगवेगळ्या संगीताचे तुकडे पण छान आहेत.