HORN - (NOT) OK - PLEASE

Submitted by सचिन काळे on 17 December, 2016 - 22:16

तुम्ही लेखाचं शीर्षक पुन्हा वाचून पाहिलंत ना? अहो, वाक्य चुकलेलं नाहीए. तुम्ही बरोबरच वाचलंय. OK च्या अगोदर मी NOT टाकलाय. NOT म्हणजे नाही, नको! झालंय काय कि 'HORN OK PLEASE 'ह्या वाक्याची लोकांना एवढी सवय झालीय कि सर्वांना वाटायला लागलंय कि HORN वाजवणं OK आहे. हॉर्न वाजवायला सर्वांचीच संमती आहे. कुठेही कधीही आपल्याला हॉर्न वाजवायचा परवानाच मिळालाय. त्यावर पुन्हा पुढे PLEASE चं आर्जव लावलंय. म्हणजे अगदी हातापाया पडून "हॉर्न वाजवा हो वाजवा" असं म्हटल्याचा फिल येतोय.

हॉर्नचा इंग्रजीत अर्थ आहे, प्राण्यांचं शिंग. पूर्वीच्या काळी प्राण्यांचं पोकळ शिंग मिळवून त्यात जोरात हवा फुंकून ते वाजवलं जाई. आठवलं का? आपल्याकडे युद्धाचे रणशिंग फुंकले असा वाक्प्रचार आहे. मग कालांतराने पितळी धातूचे शिंग (बिगुल) बनवून ते फुंकून वाजवण्याची प्रथा आली. आणि आता त्याच शिंगांचे आधुनिक रूप वाहनात बसवलेय. पण नांव तेच राहिले. अहो कुठलं काय विचारता? HORN!

हॉर्न वाजवण्याचं बाळकडू आपल्या आईवडिलांनीच आपल्याला आपल्या लहानपणी पाजलेलं असतं. आठवा तो प्लास्टिकचा बिगुल नाहीतर पिपाणी, जी आपण बेंबीच्या देठापासून फुंकत फुंकत सारी गल्ली डोक्यावर घेत असू. बालपणी झालेल्या सरावामुळेच आता जो तो हॉर्न वाजवत रस्त्यांवरच्या रणांगणावर जीवनाची लढाई लढायला सज्ज झालाय.

आता हेच पहा ना! क्रॉसिंगला लाल सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत सर्व वाहनं थांबलेली असतात. आणि जसा लाल सिग्नल हिरवा होतो. जो तो हॉर्न वाजवायला सुरु करतो. जसं सर्व म्हणताहेत, "निघा! निघा! लवकर निघा! हिरवा सिग्नल पुन्हा लाल व्हायच्या अगोदर पुढे सटका." आणि चुकून त्यात जरका काही कारणाने एखाद्याने गाडी उचलायला थोडा जरी जास्त वेळ लावला, तर मागचे सर्व हॉर्नचा आरडा ओरडा करून रस्त्याला रणांगणाचे स्वरूप आणतात. तर कधी रिकामी रिक्षा असलेला रिक्षाचालक रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येक पादचाऱ्याच्या मागून पीss पीss असा हॉर्न मारून त्यांच्यात आपला भावी पाशींजर शोधत आपल्या पोटापाण्याची लढाई लढत असतो.

अजून एक गंमत सांगतो. ज्या गोष्टी माणसांनी आपल्या तोंडाने बोलायच्या असतात त्याकरता लोकं आजकाल हॉर्नच्या गोंगाटाचा कसा वापर करायला लागलेत ते पहा!

मुलांना शाळेत पोहचवणारे ते रिक्षावाले काका! बिल्डिंगच्या खाली आले, कि रिक्षाचा पीss पीss हॉर्न वाजवून बाळाच्या आईला जणू ओरडून सांगत असतात. "आणा!आणा! बाळाला लवकर खाली आणा. शाळेत जायला उशीर होतोय. एखादा हिरो आपल्या मित्र नाहीतर मैत्रिणीला बिल्डिंगच्या खाली येऊन जोरजोराने हॉर्न वाजवून सांगत असतो "ए! चल आटप लवकर. पिक्चरला जायला उशीर होतोय आपल्याला" तर कधी पिकनिकला जाणारे तयार होऊन गाडीत बसलेले अर्धे जण बाकीच्यांना हॉर्न वाजवून, जोरजोरात ओरडून सांगत असतात "ए आटपा रे लवकर! आमचा पिकनिकचा मूड घालवू नका" रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या कॉलेज कन्यकेच्या मागून येऊन एखादा मोटरसायकलस्वार कॉलेजकुमार मुद्दाम हॉर्न वाजवून तिचे लक्ष वेधायचा प्रयत्न करून जणू म्हणत असतो "अगं सुंदरी! तुझ्या नजरेच्या फक्त एका कटाक्षाला मी आसुसलोय गं!"

अहो! मला वाटतं, अशा हॉर्न वाजवून बोलणाऱ्या लोकांना नक्की वाटत असेल कि ह्या हॉर्नला बोलता आलं असतं तर किती बरं झालं असतं. कमीतकमी पीss पीss पोंss पोंss असा हॉर्नचा विचित्र आवाज तर नसते काढत बसायला लागले असते.

जगात शौकीन लोकं पुष्कळ दिसतात. त्यामध्ये नवनवीन प्रकारच्या हॉर्नचा शौक करणारेही दिसून येतात. त्यात पहिल्या प्रकारचे शौकीन येतात, ज्यांना वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने दिलेला हॉर्नचा आवाज पसंत नसतो. पुळचट आवाज वाटतो त्यांना तो! मग काय! नेतात वाहन कारागिराकडे आणि वाढवून आणतात त्याचा आवाज. आणि बोंबलत फिरतात, दणकट आवाज काढत गावभर.

दुसऱ्या प्रकारचे तेे शौकीन असतात, ज्यांना वेगवेगळे आवाज काढणारे हॉर्न आवडतात. उदाहरणार्थ डुक्कर हॉर्न, गाढव हॉर्न, पिपाणी हॉर्न. कोणी बेसावध असताना मागून असा हॉर्न वाजवला तर तो जागच्या जागी फूटभर उडालाच पाहिजे. त्यातल्या त्यात आवाजाची रेंज वाढत जाणारे हॉर्न, म्युसिकल हॉर्न ऐकायला थोडंफार सहनेबल आहेत. पण हायवेवरच्या काही ट्रकड्रायव्हरने लावलेले प्रेशर हॉर्न! बापरे बाप! आवाजाने आपला कान फुटला नाही तरी बधिर नक्की होणार ह्याची पक्की ग्यारंटी मी लिहून देतो.

आणि ते रिव्हर्स हॉर्न! अरारा! आणि त्यातली ती किंचाळणारी गाणी! सगळ्यात फेमस गाणं म्हणजे, मेरा मन डोssले, मेरा तन डोssले! वाहनांच्या पुढच्या हॉर्नचा त्रास काय कमी होता जो मागच्या बाजूला अजून एक लाऊन ठेवला. रात्री बेरात्री बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गाडया लावणाऱ्यांचे रिव्हर्स हॉर्नचे आवाज, नाहीतर पहाटे दोन तीन वाजता कॉलसेंटरमध्ये काम करणार्यांना सोडायला आलेल्या गाड्यांच्या रिव्हर्स हॉर्नचे आवाज, सोसायटीत आपल्या बिछान्यात गाढ झोपलेल्या लोकांच्या झोपेचं पार खोबरं करून टाकतात बुवा हे लोक!

काही वर्षांपूर्वी कोणा एका विद्यार्थ्याने एक प्रिपेड पद्धतीचा हॉर्न बनवला होता. आपण जसं मोबाईलमध्ये जेवढ्या रुपयांचा टॉकटाईम टाकतो तेवढाच वेळ आपणांस बोलता येते. तसंच त्या हॉर्नमध्ये जेवढ्या रुपयांचा आपण रिचार्ज करू, तेवढाच वेळ तो हॉर्न वाजू शकत होता. त्यावेळी तो प्रयोग काळाच्या पुढे होता. मोठ्या प्रमाणावर त्याची अंमलबजावणी करणे शक्य नव्हते. पण आता जरका अशा प्रीपेड हॉर्नचं उत्पादन केले आणि सरकारने तो सर्वांना आपल्या वाहनावर लावण्याची सक्ती केली, तर आपले जास्त पैसे खर्च होतील ह्या भीतीने लोकं हॉर्नचा सांभाळून वापर करतील आणि लोकांच्या विनाकारण हॉर्न वाजवण्याच्या सवयींवर आपोआप नियंत्रण येईल.

मला ट्रॅव्हलस् बसचा असा एक ड्रायव्हर माहित आहे, ज्याला एकदा 'No honking zone' मध्ये हॉर्न वाजवला म्हणून पोलिसाने पकडले होते. तेव्हा त्याने शपथ घेतली होती कि मी कधीही शहरात प्रवेश केल्यावर हॉर्न वाजवणार नाही. आणि आजपर्यंत तो आपण घेतलेली शपथ पाळत आलेला आहे. विशेष म्हणजे, शहरात हॉर्न वाजवत नसल्याने त्याचे आजपर्यंत काहीही बिघडलेले नाही.

वाहनांना हॉर्न असूच नये असे माझे काही म्हणणे नाही. वाहनांना हॉर्न जरूर असावा. सर्वांच्याच सुरक्षिततेच्या दृष्टीने तो जरुरीच आहे. पण तो वाजवताना काहीतरी तारतम्य निश्चितच बाळगले जावे. हॉर्नचा कमीतकमी वापर होईल हे बघितले जावे, जेणेकरून ध्वनीप्रदूषण आटोक्यात राहील. हॉर्न वाजवण्याची गरज भासेल तेव्हा आपल्या वाहनाचा वेग कमी करून हॉर्न वाजवणे टाळता येईल. अहो, आपल्या वाहनाचाच आवाज एवढा येत असतो कि पादचाऱ्याला अगोदरच माहित असते कि आपले वाहन मागून येत आहे. ध्वनीप्रदूषण आटोक्यात ठेऊन, लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राखणे हे आपल्यासारख्या सुबुद्ध नागरिकांचे कर्तव्यच नाही का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्षिप्त मुलगा -एक सल्ला - एक नवीन धागा काढा तुम्हाला खरच उत्तर हवे असेल तर. हा सचिनजी चा धागा जुना आहे आणि त्यामुळे ऑडियन्स नाही आहे इथे जास्त.
माबो वर कोणाला ना कोणाला तरी नक्कीच उत्तर माहीत असेल तुमच्या प्रश्नच..
नवीन धागा काढलं, सगळे वाचतील.

विक्षिप्त_मुलगा दम भरतात!...... म्हणून तर नावात 'विक्षिप्त' आहे ना! शेक्सपिअरला काय जातय 'नावात काय आहे' म्हणायला???

विक्षिप्त मुलगा -एक सल्ला - एक नवीन धागा काढा तुम्हाला खरच उत्तर हवे असेल तर..... मला काय 'ऋन्मेऽऽष' समजलात उठसूट धागे काढायला???

रच्याकने (btw) गुगलवर पुष्कळ शोधल्यावर मला 'त्या' काचेला काय म्हणतात हे समजले. त्या काचेला 'Fresnel Lens' असे म्हणतात. वास्तविक ही 'Fresnel Lens' आपल्याला स्वतःला आपल्या मागील विस्तृत परिसर दिसावा म्हणून वापरतात. परंतु त्याचा दुसरा उपयोग असा होतो की, मागील वाहनचालकाला त्याच 'Fresnel Lens' मध्ये आपल्या गाडीच्या पुढे असलेले traffic दिसते, जेणेकरून त्याने हॉर्नचा वापर टाळावा.
https://www.youtube.com/watch?v=zeFWt5DNZRk

अरे वा... प्रश्न पण स्वतःच विचारला, उत्तर पण स्वतःच दिले.. अभिनंदन.
BTW. चांगली माहिती दिलीत, धन्यवाद. यामुळे हॉर्न टळतील तर चांगलच आहे.पण भारतात लोक टाईम पास म्हणून हॉर्न वाजवतात, ट्रॅफिक असो वा नसो.

किती छान योगायोग आहे पहा! बरोबर सव्वा वर्षापूर्वी वरील लेख लिहून झाल्यावर लेखाला शीर्षक देतेवेळी मला आठवले, की बऱ्याच ट्रक आणि बसेसच्या मागे 'HORN OK PLEASE' असे लिहिलेले असते. पण माझा लेख ह्या वाक्याच्या बरोबर विरुद्ध अर्थाचा लिहिलेला होता. म्हणून मी ते वाक्य बदलून नवीन बनविले 'HORN - (NOT) OK - PLEASE' आणि ते माझ्या लेखाच्या शिर्षकाला दिले.

आज सव्वा वर्षांनी RTO ने हेच शीर्षक सर्व सार्वजनिक वाहने आणि बेस्ट बसेसच्या मागे लिहिणे बंधनकारक केले आहे. आशा करतो की आवाजाचे प्रदूषण रोखण्यासाठी उचललेले हे पाऊल काही अंशीतरी सफल होईल.

ते Horn Ok Please असे का लिहीलेले असते?...ते 3 स्वतंत्र शब्द आहेत की एकत्र वाक्य?

Pages