घर असावे घरासारखे - भाग ५ - भारत

Submitted by दिनेश. on 13 December, 2016 - 01:55

आतापर्यंतच्या आयुष्यातले ३३ टक्के आयूष्य मी देशाबाहेर घालवले असले तरी मी अजूनही भारतीयच आहे आणि
माझा कायमचा पत्ता हा भारतातलाच आहे.

१७ ) दत्त मंदीर रोड, मालाड पूर्व - साल १९६३ ते १९७४

माझा जन्म मालाडचा. मालडमधल्या स. का. पाटील. हॉस्पिटलमधला.. आणि त्याच्या कुंपणालाच लागून असणार्‍या
महेश्वरी निवास मधे माझे बालपण गेले. हि बिल्डींग त्या काळातल्या गायिका, मोहनतारा अजिंक्ये यांची.
माझे आईबाबा १९५४ पासून तिथे रहात होते.
ते जेव्हा तिथे आले त्यावेळी मुंबईच्या उपनगरात फारशी वस्ती नव्हती आणि आम्ही मालाड सोडेपर्यतही फारशी
नव्हतीच. मालाड पुर्वेला बसेस, रिक्षा नव्हत्या. रस्त्यावर रहदारीही नसे फारशी. प्रवासी वाहन म्हणजे टांगे.
( स्टेशन ते घर .. दर आठ/बारा आणे ) घासलेट आणि बर्फाच्या बैलगाड्या होत्या. आमराया, गोठे होते.

आमची बिल्डींग चाळ नव्हती. तळमजल्यावर ३ बिर्‍हाडे आणि वरती चार. शेजारच्या गुप्ते काकू त्याला वाडा
म्हणत. बिल्डींगमधे माझ्याच वयाच्या आसपासची १० मूले. शिवाय समोरच्या घरात ३ त्यामूळे खेळगडी
भरपूर. बिल्डींगला गच्ची, मागे वापरात असलेली विहीर, समोरच्या बिल्डींगचे आंगण, इतकेच नव्हे तर पूर्ण रस्ताही
आम्हाला खेळायला उपलब्ध. रस्त्यावर गाड्याच नव्हत्या, त्यामुळे रस्त्यावर जायचे नाही, असे बंधन नव्हते.

हा काळ म्हणजे निव्वळ खेळाचा असा माझ्या आठवणीत आहे. पुस्तके फारशी नसत ( असली तरी मला
वाचनाची आवड नव्हती ) टीव्ही नव्हता. त्यामूळे शाळे व्यतीरिक्त सर्व वेळ खेळातच जात असे.
सात बिर्‍हाडापैकी कुणाचेही दार दिवसा बंद नसायचे आणि कुणाच्याही घरी आम्हाला अटकाव नसायचा.
खेळता खेळता तहान लागली, खरचटले तरी कुठल्याही घरात जाऊन चालत असे.

तो संपुर्ण काळ म्हणजे माझी बालमैत्रिण अजिता सोबत घालवलेला काळ. आम्ही रोज एकत्र शाळेत जात असू,
आणि दिवसभर एकत्रच खेळत असू. ( आमच्या आया आम्हाला हाका मारताना, दिनेश अजिता अशी एकत्रच
हाक मारत असत.)
आमच्या सातही कुटुंबापैकी कुणाचेच जवळचे नातेवाईक मुंबईत नव्हते, त्यामुळे काका, मामा अशी सर्व नाती
तिथल्या तिथेच होती. आणि त्यामुळेच सर्व बिल्डिंग एक कुटुंब म्हणून रहात होते. पापडा पासून करंज्यांपर्यंत
सगळे एकत्रच होत असे.

बुधवारची बिनाका गीत माला, रेडीओवरचे प्रपंच वगैरे कार्यक्रम आम्ही रात्री पायरीवर बसून ऐकत असू.
त्यावेळी एक चैनीची गोष्ट म्हणजे घरात बघायचा सिनेमा. अजिताचे बाबा, अच्युत गुप्ते, फिल्मसेंटर मधे
रंगतज्ञ होते. त कधी कधी घरी प्रोजेक्टर आणून सिनेमा दाखवत. वह कौन थी, मिलन, वावटळ असे अनेक
चित्रपट आम्ही घरी बघितले होते.

सिनेमा थिएटरही फार लांब नव्हते. जोहरा ( आता संगीता ) तर ५ मिनीटांवर. महिन्यातून एक दोनदा आम्ही
सिनेमाला जातच असू.
शाळाही घरापासून लांब नाही. मधल्या सुट्तीतही घरी येता यायचे. शिवाय सर्व शिक्षिका आईच्या ओळखीतल्या,
त्यामूळे त्या पण घरी येतच असत.

मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावाला जात असू तरी पण त्या आधी आमची दोन कुटुंबाची सहल व्हायचीच. मढ मनोरी ते अगदी शहाड टीटवाळा पर्यंत आम्ही जात असू.

आमचे घर मात्र लहान होते. दोनच खोल्या, त्यातले एक स्वयंपाक घर आणि दुसरी म्हणजे उठाय बसायची,
जेवायची, झोपायची खोली. बाहेर एक स्वतंत्र गॅलरी. पण ती उघडीच होती. आम्ही तीन भावंडे आणि आईबाबा
असे एकत्र होतो त्या घरात शिवाय पाहुणे नियमित असायचेच. मालाडला येणे गावच्या पाहुण्याना थोडे
गैरसोयीचे होते कारण त्यावेळी एस्टी फक्त परळ किंवा बाँबे सेंट्रल ला येत. माझ्या बाबांबा पाहुण्यांची खुप हौस
होती. त्या छोट्याश्या घरात क्रिकेटवीर बापू नाडकर्णी आणि संगीत कोहीनूर पंडीतराव नगरकर जेऊन गेले.

त्यांनी त्या काळात ओनरशिप, सेल्फ कंटेंड ब्लॉक ( हे त्याकाळचे लोकप्रिय शब्द. संडास बाथरुम घरात असणे
ही चैन होती ) स्वप्न बघितले आणि प्र्त्यक्षातही आणले. आईबांबाचे तिथले वास्तव्य २० वर्षांचे होते, आम्ही ती
जागा सोडली त्यावेळी खुप हळवे झाले होते ते, अर्थात आमचे शेजारीही. खुप हळवे झाले. आमची कामवालीही
आमच्याकडे २० वर्षे कामाला होती.

तिथल्या शेजार्‍यांशी आमचे आजहि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. येणेजाणेही आहे. मी गेल्या भारतभेटीत तिथे
जाऊन आलो. आता ती बिल्डींग मोडकळीला आलीय. लवकरच पाडली जाईल, असे वाटतेय.

अजिता लग्न होऊन कॅनडाला स्थायिक झाली. मधे तिचा माझा संपर्कही झाला होता, पण मग तिचा मोठा
भाऊ अचानक गेला आणि तिने फेसबूक वर येणे सोडले. काकू फार पुर्वीच गेल्या आणि काकाही गेले.

मालाड सोडताना, आपण मोठ्या घरात जाणार या आनंदात मी तरंगत होतो.. मूळात आपण काय सोडून जात
आहोत.. याची कल्पना येण्याचे वयही नव्हते.. आणि जेव्हा ती जाणीव झाली, त्याचा मानसिक त्रासही मीच सोसला काही वर्षे....

१८ ) आल्त पर्वरी, गोवा - साल २००४ ते २००८

हा थोडासा मधलाच काळ.. मी नोकरीनिमित्त गोव्यात होतो आणि पर्वरीला नाईकांच्या घरात भाड्याने रहात होतो.
त्यांचे कुटुंब खालच्या मजल्यावर आणि वरच्या मजल्यावर मी.

काही काही घरांचाच गुण असतो, तर या घराचा गुण म्हणजे अगत्यशीलता. मी एकटाच होतो तरी या घरात
पाहुण्यांची कायम वर्दळ असे. माझे नातेवाईकच नव्हे तर अनेक मित्रमैत्रिणीही या घरी राहून गेले. अनेक
मायबोलीकर पण या घरी राहून गेले. आणि माझी मानसकन्या देखील याच घरी बागडून गेली.

त्या काळात माझ्या जीवनात एक वादळ घोंघावत होते पण या घराने मला भरभक्कम आधार दिला. अनेक नाती
जोडून दिली. या घराच्या आठवणी या सर्व गोतावळ्याच्याच आहेत.

पहिल्या दिवसापासून नाईककाकांनी मला भाडेकरू म्हणून वागवलेच नाही. ते निवृत्त शिक्षक होते,
मी ऑफिसमधून घरी आलो कि त्यांच्याशी गप्पा मारतच असे रोज. त्यांच्या घरच्या प्रत्येक सणाला मी त्यांच्या घरी
जेवलो. वरच्या मजल्यावर तीन फ्लॅट्स होते. समोरच्या घरात एक मारवाडी कुटुंब होते. त्या घरात नुकतेच एक
बाळ जन्माला आले होते. ते सहा महिन्याचे झाल्यावर त्याच्या आईने ते माझ्या घरी आणून दिले आणि पुढची अडीज वर्षे ते बाळ माझ्या अंगाखांद्यावर खेळले. अनेक शब्द बोलायला त्याला मी शिकवले... तोच तो मनन ( त्या
काळात मायबोलीवरही मी त्याचे अनेक फोटो टाकले होते. )

मुंबई गोवा हायवेपासून फक्त ३ मिनिटावर ते घर होते. गोव्यात जाणारी बस मी वाटेतच थांबवून रस्त्यावरच
उतरत असे. ( त्या काळात माझ्या मुंबईला, पुण्याला, कोल्हापूरला अनेक फेर्‍या होत असत.)
नाईकांच्या अंगणातच भरपूर झाडे होती. त्यांच्या दारातच बिमलीचे झाड होते आणि त्याला भरपूर बिमल्या लागत.
त्यांच्या घरी तांब्या पितळेची भांडी घासण्याव्यतीरिक्त त्याचा काही उपयोग करत नसत. मी आणि मनन मात्र
त्या कचाकच खात असू.

एकंदरीतच त्या परीसरात खुप सुंदर झाडे होती. मायबोलीवरचे झाडांवरचे अनेक लेख मी त्या काळात लिहिले
आणि बहुतांशी फोटो पण त्याच भागातले. ऑफिसमधे मी अनेक मित्र जोडले होते आणि त्यांनी मला,
पर्यटकांना न दिसणारा गोवा दाखवला. मायबोलीकर गिरीराज त्या काळात गोव्यात होता, त्याने आणि मी मिळून
भन्नाट भटकंती केली त्या काळात.

त्या घराने पण मला अनेकांना जेवू घालायचे भाग्य मिळवून दिले पण मनावर एक कायमचा ओरखडा दिला तो
विशालच्या रुपात. ( त्याबद्दलही मी मायबोलीवर लिहिले होते. ) हा जळगावचा मुलगा आमच्या ऑफिसमधे
आय टी चे काम बघत होता. माझ्या घराजवळच तो रहात होता. एरवी तो फारसा कुणाशी बोलायचा नाही, पण
माझ्याशी आणि माझा सहकारी सागर शी मनमोकळं बोलायचा. तो पण आमच्यासोबत अंबोली वगैरेला आला
होता.

एका संध्याकाळी सागर त्याला बाईकवरुन माझ्या घरासमोर घेऊन आला आणि म्हणाला ह्याला बघा, हा घरी फोनवर सांगत होता, कि काळजी घ्या, माझी वाट बघू नका. सागर त्याला सोडून घरी गेला आणि मी विशालला
वर बोलावू लागलो, तर तो येई ना. मोजे खराब आहेत असे काहीतरी कारण सांगू लागला. मग मीच खाली
गेलो आणि पर्वरीभर भटकत राहिलो. घरी चल, काहीतरी जेवण करू असा आग्रह करत होतो तर त्याने
ऐकले नाही. आधी गप्प गप्प असणारा तो, मग मोकळेपणी बोलू लागला. जळगावबद्दल बोलला. आम्ही बाहेरच कॉफी प्यायलो. मग रात्री उशीरा मी त्याला त्याच्या घरासमोर सोडून घरी आलो.

दुसर्‍या दिवशी तो ऑफिसला आलाच नाही. फोनही उचलेना. घरी माणूस पाठवला तर तो दार ठोठावून परत आला.
मग सागर आणि मी त्याच्या घरी गेलो, आणि सागरने कौलावर चढून खिडकी उघडली. मला वरून म्हणाला, विशाल तर दारासमोरच ऊभा आहे पण दरवाजा उघडत नाही आणि काही क्षणातच सागरने हंबरडा फोडला.
विशालने त्या रात्री साधी कपडे वाळत घालायच्या दोरीचा फास करून आत्महत्या केली होती. त्याच्या वजनाने
ती दोरी ताणली जाऊन तो जमिनीवर ऊभा असल्याचा भास होत होता.

त्याने व्यवस्थित सुईसाइड नोट लिहून ठेवली होती. पुढे पोलिस चौकशी, पोस्ट मार्टेम सगळेच झाले. पण त्याच्या
आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. जळगावहून त्याचा भाऊ आणि बाबा मला घरी भेटायला आले होते,
त्याला जिवंत बघणारा मी शेवटचा माणूस होतो. त्याचे त्या रात्रीचे प्रत्येक वाक्य मी आठवून बघितले, त्याने चुकूनही कुठल्या त्रासाचा उल्लेख केला नव्ह्ता. मला आजही असे वाटतेय, त्या रात्री मी जबरदस्तीने त्याला घरी आणले असते, जेऊ घातले असते तर कदाचित तो वाचला असता. हा सल मला कायम राहिल.

अनेक मायबोलीकरांशी जिव्हळ्याचे नाते जुळले ते याच काळात ( ती नाती आजही जपली आहेत आम्ही ) अगदी सिनियर मायबोलीकर ललिता सुखटणकरही मला या काळात प्रत्यक्ष भेटल्या. मायबोलीकरांसोबत अनेक गडांना भेटी दिल्या त्याही याच काळात.

पुढे मी मूंबईत परत आलो. नाईक काकांनी तर माझ्याकडून शेवटच्या महिन्याचे भाडेही घेतले नाही. मननला
काय कळले माहित नाही, पण त्यानेही रडून गोंधळ घातला.....नंतर मात्र माझे गोव्यालाही जाणे झाले नाही.
सागर मात्र अजूनही माझ्या संपर्कात असतो.

१९ ) शिवसृष्टी, कुर्ला, मुंबई - १९७४ पासून आजपर्यंत

माझे बाबा व्होल्टास मधे होते. तिथल्या ५० कर्मचार्यांनी एक गृहयोजना आखली आणि जेआरडी नी ती योजना
मान्य केली. आणि ५० घरांची ती सोसायटी निर्माण झाली.
मालडच्या घराच्या दुपटीनेही मोठे घर हे. नव्या घरात बाबांनी सामानही सर्व नवेच घेतले होते. मी वर शिवसृष्टी
कुर्ला असे लिहिले आहे खरे, पण आम्ही आलो तेव्हा शिवसृष्टी नावही नव्हते कि आम्ही कुर्ल्याच्या हद्दीतही
येत नव्हतो. खर तर मोठे घर सोडले तर बाकी सोयी नव्हत्याच. कॉलनीत रस्ते नव्हते, जवळपास बसटॉप नव्हता.
कुर्ला स्टेशनला जायलाही धड रस्ता नव्हता.. मूळात खाडीत भर घालून केलेली ही जमीन होती.

पण हळूहळू सर्व सोयी होत गेल्या. रस्ते झाले, बसेस आल्या. आमच्याच कॉलनीत एस टी डेपो झाला. कुर्ला
टर्मिनस झाले, एअरपोर्ट ला जायला नवीन फ्लायओव्हर झाला.. आणि आमचे घर सर्वांसाठी सोयीचे झाले.
माझ्या बाबांचे स्वप्न पुर्ण झाले. सर्वच दृष्टीने सोयीचे असल्याने गावचे पाहुणे, कुठल्याही कामासाठी
मुंबईत आले कि आमच्याच घरी उतरतात. जाताना बस वा विमान पकडणेही सोयीचे होते. बाबांच्या पश्च्यातपण
ही परंपरा कायम आहे. आमचे नातेवाईकच नव्हे तर माझ्या मित्रमैत्रिणीही हक्काने आमच्या घरी येऊन
राहतात. अगदी मी भारतात नसलो तरीही. याचे श्रेय अर्थातच माझ्या आईला आणि वहिनीला.

पण सुरवातीचा काळ माझ्यासाठी जरा कसोटीचा गेला. मालाडला मी मराठी वातावरणात आणि सवंगड्यात
वाढलो होतो. इथे मात्र शेजारी पाजारी फारसे मराठी नव्हते आणि मला हिंदी वा ईग्लिशचा तेवढा सराव किंवा
आत्मविश्वास नव्हता. पहिली एक दोन वर्षे मला कुणी मित्रच नव्हते कॉलनीत. नवे घर, नवा परीसर. लांब
शाळा, रोज बसने जाणे ... सगळेच बिनसरावाचे.

त्या काळात मी बागकामात लक्ष घातले. घरासमोर भाजीपालाच नव्हे तर पेरु, सिताफळ, आवळा, लिंबू अशी
झाडे वाढवली. अनेक फुलझाडे लावली. आणि सर्व छान फुलूनही आले. आम्ही आलो त्या काळात प्रदूषणाचा त्रास व्हायचा, म्हणून वृक्षारोपणाची मोहीम जोरात होती. आम्ही त्या काळात लावलेली झाडे आजही कॉलनीच्या
रस्त्यावर सावली देत दिमाखाने ऊभी आहेत.

माझ्या बाबांना स्वतः दारावरचे तोरण करायची खुप हौस होती. त्याला लागणारी आंब्याची पाने हाताशी
असावीत म्हणून त्यांनी एक आंब्याचे झाड लावले होते. ते असे पर्यंत फक्त पानापुरताच त्याचा उपयोग होता.
ते गेल्यावर मात्र, त्या झाडाला भरपूर आंबे लागायला सुरवात झाली. आमच्याच घरालगत एक जांभळाचे
झाड आहे, त्यालाही खुप जांभळे लागतात.

आणि पुढे दोनतीन वर्षातच मी बाहेर खुप बिझी झालो. शाळेतल्या इतर अॅक्टीव्हीटीज. मग कॉलेज, सी. ए. चे क्लासेस, आर्टीकलशिप, माझ्या नोकर्या, भटकंती याला अगदी ऊत आला. आणि माझे कॉलनीतल्या
लोकांत मिसळणे कधी झालेच नाही. आजही हीच परिस्थिती आहे. कॉलनीत मला शिंदेबाईंचा धाकटा किंवा
छायाचा दीर म्हणूनच ओळखतात.

या घराने आम्हा तिघा भावंडांची लग्न बघितली. आईच्या नातवंडांना, पतवंडाना खेळवले. अनेकांची लग्न जुळवली,
परीक्षेसाठी अभ्यास करवून घेतला, आजारी माणसांची सेवा केली.
२५ पेक्षा जास्त वर्षे आईच्या भजनी मंडळाचे भजन ऐकले ( पुढे त्यांची स्वतंत्र जागा झाली. मंडळ अजूनही कार्यरत
आहे ) तसेच माझ्या बाबांचा तृप्त आणि माझ्या भावाचा अकस्मित मृत्यू बघितला. पण घर सावरले आणि घरातली
माणसेही.

या घरातही काही कलाकार येऊन गेले. कुसुमाग्रज, स्नेहलता दसनूरकर, आफळेबुवांची कन्या क्रांतीगीता,
सिनेकलाकार टॉम आल्टर, इंद्रा बन्सल, बाबा माजगावकर ( नाजूका मालिकेचा दिग्दर्शक ), फोटोग्राफर
मृदुला नाडगौडा, कोल्हापूरचे पेंटर वारंगे.

या घरात सर्वच सण सुंदर रित्या साजरे होत. या वर्षी दिवाळीला खुप छान योग आला होता. आई आणि वहिनी
सोबत, अंगोलाहून आलेला मी, हाँगकाँगहून आलेला माझा पुतण्या आणि स्वीडनहून आलेली नलिनी, जय
आणि शांडील्य घरी होते. खुप वर्षांनी आईच्या हातचे अभ्यंग स्नान घडले मला.

या घराची एक प्रतिमा माझ्या मनात आहे. मी कुठून तरी बाहेरून येतोय आणि आई दार उघडतेय. वाहिनी
म्हणतेय, चहा ठेवू ? आई म्हणतेय .. जेवायला काय करू ?..... गेली अनेक वर्षे, हे असेच घडतेय !

समाप्त....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही संपूर्ण मालिकाच नेहमीप्रमाणे सुंदर.

..... गेली अनेक वर्षे, हे असेच घडतेय !>>> असंच या पुढेही घडत राहो ही सदिच्छा _/\_

या घराची एक प्रतिमा माझ्या मनात आहे. मी कुठून तरी बाहेरून येतोय आणि आई दार उघडतेय. वाहिनी
म्हणतेय, चहा ठेवू ? आई म्हणतेय .. जेवायला काय करू ?..... गेली अनेक वर्षे, हे असेच घडतेय ! खुपच छान

दिनेश दा... छान मालिका!
गोव्याचा प्रसंग आणि घराची प्रतिमा...भावस्पर्शी!
असे वाटतेय की, हे विश्वची तुमचे घर!

दिनेश,

तुमच्या गोव्यातल्या घरी आम्ही मायबोलीकर आलो होतो ती सहल अजून लक्षात आहे. विशेषतः तुमच्या
आदरातिथ्यामुळे.

दिवसभर भटकंती तर असायचीच, पण त्यातून तुम्ही स्वत: सकाळी निघायच्या आधी आणि रात्री घरी आल्यावर आम्हा आठ दहा जणांचा स्वयंपाक करून आग्रहाने वाढत होता ते आठवते. गोव्याचे ते घर हायवेच्या जवळ असूनही फार निवांत होते, परिसर सुंदर होता. एका दिवशी पहाटे फिरतांना अचानक नीरफणसाचे झाड दिसले, लहानपणी आमच्या घरासमोरही होते आणि त्याची भाजी मला आवडायची असे मी म्हणालो. नंतर घरी येऊन आंघोळ करून बाहेर आलो तर तोपर्यंत तुम्ही नीरफणस आणून त्याचे गरम गरम काप करुन समोर ठेवले होते.

अजून एक आठवण म्हणजे तुम्ही फारच देवळे दाखवल्याने आम्ही बरीच कुरुकुर करून शेवटी आपण बीचवर गेलोच. पाण्यात गेलो तर एका माणसाने 'अंदर नही, पानी मे भूकंप आया' म्हणत बाहेर काढले. 'काय वेडा आहे का, त्याला ओहोटी म्हणायचे आहे का' अशी चर्चा करत जवळच्या एका वाळूच्या टेकाडावर बसलो. आणि थोड्याच वेळात त्सुनामी म्हणजे काय ते याची देही याची डोळा अनुभवले.

मला वाटते याच काळात तुमच्या गोवा मुम्बई खेपा अ‍ॅडजस्ट करुन तुम्ही रात्रभर प्रवास करुन अचाऩक आपल्या ट्रेकच्या आरंभस्थानाला प्रकट व्हायचात. तेसुद्धा काहीतरी खाऊ सोबत घेऊनच Happy

सुरेख मालिका. सगळेच भाग एक-से-एक, पण (मुंबईतच लहानपण गेल्यामुळे))मला हा भाग जास्त चटका लाऊन गेला.

छान ..

मी शिवसृष्टी मध्ये १९७९ ते १९८५ मध्ये बर्याच वेळा मित्रा कडे यत असे. त्यावेळी तुमच्या कॉलनीतले बागकाम बघुन हेवा वाटायचा. त्या वेळी माझ्या मित्राकडुन (आणी त्याचा आई वडलाकडुन ) तुमचे नाव पण खुप वेळा एकले होते. आम्ही मुलानी तुमचा आदर्श घेउन अभ्यास करवा, चांगले मार्क घेउन काहीतरी बनावे अशी त्याचा आई-वडालाची अपेक्षा होती.

आभार सर्वांचे...

जी एस.. आपण त्यावेळी जे पत्ते खेळलो होतो, त्यावेळचे हात लिहिलेली डायरी आजही माझ्याकडे आहे... सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.

साहील...:-) Happy

दिनेश, छानच झाली ही मालिका. शेवट तर खासच. सगळ्या भ्रमंतीनंतर आपल्या हक्काच्या घरात यायच ही कल्पना फारच छान होती.

संपूर्ण लेखमालिका आवडली.

सगळ्या भ्रमंतीनंतर आपल्या हक्काच्या घरात यायच ही कल्पना फारच छान होती.
+१

आभार सर्वांचे... खुप छान वाटलं सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून.. आणि हे सुद्धा माझे घरच आहे कि !!

मस्त! हा भाग सर्वात बेस्ट !
आणि तो तसाच होणार याची कल्पना पहिल्या दोनचार ओळीतच आली.. शेवट लेखमालेला साजेसाच सुंदर ..
घर ते घर .. त्याला कश्याचीही नाही सर .. मी सुद्धा हे अनुभवतोय

Pages