बेक्ड वडापाव

Submitted by भरत. on 11 December, 2016 - 21:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

बटाटे - मध्यम आकाराचे ६-७
मोहरी, जिरे, हळद,
कढीपत्ता, आले-लसूण-मिरची पेस्ट
कोथिंबीर
मैदा : अडीच कप
मिल्क पावडर ४ टेबलस्पून
दूध १ कप
साखर २ टीस्पून
ड्राय यीस्ट २ टीस्पून
लोणी
मीठ
लसणाची चटणी

क्रमवार पाककृती: 

१. उकडलेले बटाटे कुस्करून त्यांची भाजी करून घ्या. वडापाव करताना आपण मध्ये लसणाची चटणी भरतो, ती तेवढ्या प्रमाणात भरता येणार नाही, म्हणून आले-लसूण-मिरची पेस्ट जरा जास्त घाला. या भाजीचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करून घ्या.
२. मैद्यात मीठ आणि मिल्क पावडर घाला.
कोमट दुधात साखर आणि यीस्ट घालून चांगलं ढवळून दहा मिनिटे झाकून ठेवा.
या दुधाने मैद्याची कणीक भिजवून घ्या. लागलं तर पाणी घ्या.
ही कणीक प्रुव्ह होण्यासाठी (थंडीच्या दिवसांत उबदार जागी) झाकून ठेवा.
साधारण १ तासाने किंवा कणीक फुगून साधारण दुप्पट झाल्यावर तिच्यावर मुष्टियुद्धाचा सराव करा आणि लोणी लावून तिंबून घ्या. बटाट्याच्या मिश्रणाचे जितके गोळे केले असतील, तितकेच गोळे कणकेचे करा.
एका ताटलीत लसणाची चटणी पसरून घ्या. बटाट्याचे गोळे या चटणीत नीट घोळवून घ्या.
मैद्याच्या गोळ्याची हातावरच पारी करून घ्या व त्यात बटाट्याचा गोळा भरून कचोरीप्रमाणे बंद करा.
ग्रीझ केलेल्या बेकिंग डिशमध्ये हे गोळे ठेवून सेकंड प्रुव्हिंगसाठी अर्धा तास ठेवून द्या. दोन गोळ्यांंमध्ये अंतर ठेवा.
मग गोळ्यांना ब्रशने दूध लावून प्रि-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्रीज सेल्सियस तपमानावर २० मिनिटे बेक करा.
बेक झाल्यावर बाहेर काढून गरम असतानाच त्यांना लोणी लावा.

vadapao1_0.jpgvadapao2_0.jpg
चटणीसोबत खायला तयार बेक्ड वडापाव.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात ७ वडापाव झाले.
अधिक टिपा: 

सध्या थंडी असल्याने मी पहिल्या प्रुव्हिंगसाठी कणीक मायक्रोवेव्हमध्ये ठेवून सगळ्यात कमी पॉवरवर आधी १ मिनिट आणि मग अर्ध्या तासाने आणखी एक मिनिट मायक्रोवेव्ह केले. याने फरक पडला का माहीत नाही.
मूळ कृतीत काचेच्या बाउलमध्ये एकेके वडापाव ठेवून बेक केला होता. मफिन ट्रेमध्ये ठेवूनही बेक करता येतील. पण मग ते मिनिवडापाव होतील. राउंड बेकिंग डिशमध्ये मला एका वेळी ६ वडापाव बेक करता आल

माहितीचा स्रोत: 
कलर्स गुजरातीवरच्या रसोई शोमध्ये कृष्णा कोटेचा यांनी दाखवलेली पाककृती
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. ते मैदा नी दूधपावडर वाचून याचा वडापाव कसा होईल प्रश्न पडला होता. पण त्याचा पाव बनवायचाय बघून शंका मिटली.
येईन कधीतरी खायला Wink

दिनेश. | 11 December, 2016 - 22:51 नवीन

छान आहे कल्पना... बेसनाचे कव्हर करायची पण काहीतरी युक्ती असायला हवी होती.>> या एका कारणामुळे ही रेसिपि त्राय केली नाहीये अजून. बेसनचे खमन्ग आवरण नाही तर मग वडा तो काय?

Happy

मस्त!
कणीक फुगून साधारण दुप्पट झाल्यावर तिच्यावर मुष्टियुद्धाचा सराव करा > Lol याचा पण फोटो किंवा व्हिडिओ पाहिजे Lol

लय भारी.

आधी बेक करून पाव करायचे प्रयत्न यशस्वी झाले की मग करायला हरकत नाही.

मावे त केले की ओटीजी?

यीस्ट वापरायचा माझा हा दुसराच प्रयत्न होता. पहिला साफ फसलेला, त्यामुळे यावेळी पाककृती शक्यतो जशीच्या तशी फॉलो केली. गव्हांचं पीठ, मल्टिग्रेन पीठही चालायला हवं.

झाडू , ओटीजीत.
पाव करून बघायच्या आधी मला हे जमलं म्हणजे फूलप्रूफ रेसिपी असणार.

हा पदार्थ बटाट्याऐवजी चिकन किंवा इतर काही वापरून केला तर हिट्ट जाईल. करता येईल की नाही माहीत नाही.

बटाट्याचा गोळा जर बेसनाच्या (ससरीत) पीठात घोळवून घेतला व मग ते मैद्याच्या पारीत गुंडाळले तर आतले बेसन शिजेल का?
आणि दुसरे म्हणजे तुमचे प्रमाण नक्की प्रूव्हन आहे ना...टी स्पून टेबलस्पून, यीस्ट, दूध यांचे?

आंबट गोड,
बेसन पुर्णपणे शिजणार नाही. पावाचे बेकिंग करताना आत यीस्ट मूळे खुप हवा तयार झालेली असते, बेकिंग या प्रक्रियेत तो कोरडा होत जातो.

बेसनाचे कोटींग सरसरीत असल्याने, एका जागी राहणार नाही, खालच्या दिशेने ओघळून जाईल. त्याची कन्सिस्टंन्सी
पावाच्या पिठाइतकीच असेल तरच ते जागच्या जागी राहील. तरी पण बेक करताना त्याला थेट उष्णता न मिळाल्याने ते शिजणार नाही. शिजेलही कदाचित पण तळल्यावर येणारा खमंगपणा येणार नाही.

मैदा आणि बेसन यांचे मिश्रण करून त्या मिश्रणात यीस्ट टाकून ती कार्यरत होते का ते बघावे लागेल. त्यासाठी या दोन पिठांचे प्रमाण काय असावे, तेही बघावे लागेल.

मैदा आणि बेसन यांचे मिश्रण करून त्या मिश्रणात यीस्ट टाकून ती कार्यरत होते का ते बघावे लागेल. ...दिनेशदा , ही आयडीया मस्त आहे. पण बहुतेक वर्क होणार नाही. Sad

'बेसन आणि यीस्ट' हे 'मैदा आणि यीस्ट' सारखे मेड फॉर इच अदर नसावेत.
पण जर झाले तर मैदा व बेसनाचे प्रमाण दोनास एक असे ठीक राहील का? चव छान लागेल असे वाटते.

यीस्ट, तशी कुठल्याही पिठात कार्यरत होते कारण तिला साखरेची गरज असते. मी डोश्याच्या पिठात पण वापरतो.
पर्श्न असा आहे कि तयार झालेली हवा ( कार्बन डाय ऑक्साइड ) बेसन आणि मैद्याचे मिश्रण धरून ठेवू शकेल का ?
मैद्याची ती क्षमता चांगली असते, पण जसजसे त्यात आपण इतर पिठे किंवा कणकेसाठी कोंडा मिसळत्जातो, तसतशी ती कमी होते. म्हणजे पाव जास्त न फुगता कमी फुगतो. तर मैदा आणि बेसन या मिश्रणाचे आयडीयल प्रमाण शोधावे लागेल.

ओह! म्हणजे पावाचा स्पंजीनेस ट्रेड करावा लागेल. ऑप्टिमम प्रमाण घेऊन. तुम्ही प्लीज थोडी आर अँड डी करा यावर. बेक्ड वडापाव हे माझे फार दिवसांचे स्वप्न आहे!
Happy

ह्याला स्टफपाव म्हणता येईल.
बेसनाच्या कुरकुरीत आवरणाशिवाय वडा नाही, आणि वड्याशिवाय वडापाव नाही.

फोटो छान दिसतोय.
नरीमन पॉईंटच्या स्टेटसमधे मिनी पावभाजी आणि मिनी वडापाव मिळतो. कॉईनसाईज पाव असतात, फारच देखणी दिसते ती डिश. तसे पाव एकदा घरी करून पाहायचे आहेत.

बेसनाच्या कुरकुरीत आवरणाशिवाय वडा नाही, आणि वड्याशिवाय वडापाव नाही.>+१

मंजूडी, स्टेटस मधे गेल्यावर ही डीश ऑर्डर करणार.

..