घर असावे घरासारखे - भाग ३ - नायजेरिया

Submitted by दिनेश. on 9 December, 2016 - 01:48

९) जी आर ए, फेज २. पोर्ट हारकोर्ट, नायजेरिया, साल १९९६-१९९८

पोर्ट हारकोर्ट हे नायजेरियातले शहर नंतरच्या काळात फार बदनाम झाले. भारतीय लोकांच्या अपहरणाच्या घटनाही
तिथे घडल्या. पण मी ज्या काळात तिथे होतो, त्या काळात एवढी दशहत नव्हती.

जी आर ए ( नायजेरियन उच्चार जीआरोए ) ह मोठमोठ्या बंगल्यांचा भाग. अश्या पाच बंगल्यांच्या एका संकुलात
आमच्या कम्पनीचे अधिकारी रहात होते. त्यातला पहिल्या बंगल्यातल्या तळमजल्यावर मी रहात होतो,
तर वरच्या मजल्यावर गेताँ हा फ्रेंच माणूस आणि जो हिल हा ब्रिटीश माणूस रहात होते. पण दोघांचे काम
साईटवर असल्याने ते क्वचितच घरी असत आणि घरी असले तरी त्यांच्या "एक्स्ट्रा करिक्यूलर अॅईक्टीव्हीटीज "
भरपूर होत्या.

बंगल्याला फ्रेंच विंडोज होत्या पण मागच्या बाजूला मोठी भिंत होती. त्या भिंतीवर काटेरी तारांची वेटोळी होती. त्या वेटोळ्याला मी माझ्या वर्ल्ड रिसिव्हर रेडीओची एरीयल जोडली होती. त्यामूळे मला भारतातले रेडीओचे
कार्यक्रम नीट ऐकू येत.

पाचव्या बंगल्यात आमचे ब्रिटीश एम डी, पीटर रोल्स, त्यांची करेबियन बायको आणि दोन मुली. बाकीच्या
घरांतून असेच साइट इन चार्ज रहात होते. त्यामूळे खुपदा त्या आवारात मी आणि पीटरची फॅमिली असेच उरत
असू ( पीटर पण खुपदा "बाहेर" जात असे.)

तर या सगळ्या फ्रेंच, ब्रिटीश, इतालियन, जर्मन गोतावळ्यात मी एकटा भारतीय. पण त्या सगळ्यांशी माझी छान
दोस्ती होती.

हा बंगला सुंदरच होता. समोर आवारातच मोठे गार्डन होते, आमच्या बर्‍याच पार्ट्या तिथे होत. आवारात दोन आंब्याची झाडे होती. शिवाय घरामागे मोकळे आवार होते. तिथे अर्थातच मी खुप भाजीपाला लावला होता.
तिथल्या सुपीक जमीनीत तो नुसता वाढायचाच नाही तर माजायचा. त्याची विल्हेवाट कशी लावायची, तोच
प्रश्न असायचा ( तो नंतर माझ्या भारतीय मित्रांनी सोडवला.. पण ती नंतरची गोष्ट )

मीच एकटा तिथे कायम रहात असल्याने त्या संकुलाची देखभालीची जबाबदारीही माझ्यावर होती. सर्व हाऊसमेड्स,
गार्डनर्स, जनरेटर ऑपरेटर त्या आवारातच स्वतंत्र घरात रहात असत. त्यांच्यावर देखरेख मीच करत असे.
नायजेरियात त्या काळात दुसर्या आणि चौथ्या शनिवारी, सॅनिटेशन डे असे. त्या दिवशी सकाळी कुणालाही
घराबाहेर पडण्यावर बंदी असे. त्या काळात घराचा परीसर साफ करावा ( म्हणजे वाढलेली झाडे तोडावीत वगैरे)
अशी अपेक्षा असे. त्या काळात मी आवारातल्या झाडांची देखभाल करवून घेत असे.

गेताँ आणि जो माझे चांगले मित्र असले तरी त्यांचे एकमेकांशी पटत नसे. त्यांचे वादही मलाच सोडवत असे.
दोघांचा दुभाषा म्हणून मी काम करत असे आणि खुपदा नको तसल्या शिव्या ते एकमेकांना देत, त्यांचा अनुवाद
करण्यात माझी धांदल उडत असे. दोघेही अर्थात माझ्या जेवणाचे फॅन होते. त्या काळात माझ्याकडे रोटीमेकर
होता आणि त्यावर रोट्या करणे मला बर्यापैकी जमतही असे. तर मी त्या करत असताना, दोघे माझ्या बाजूला
बसत आणि गरमागरम रोट्या खात असत. त्यांना रोटी फुगते कशी त्याचेच नवल वाटत असे.

त्या दोघांनी त्याबद्दल इतर जणांनाही सांगितले त्यामूळे जो कोणी इतर घरीही असेल, तो माझ्या पंगतीला असे.
आंब्याची जी दोन झाडे होती, त्याला भरपूर आंबे लागत. नायजेरीयन लोक, कच्चे फळ कधीच तोडत नाहीत,
त्यामूळे त्या झाडांच्या कैर्या मीच तोडत असे. त्यांचे लोणचे, मुरांबा, पन्हे असे बरेच प्रकार करत असे आणि
त्याची चटक पीटरला लागली होती. तो तर मला मुद्दाम त्याच्यासाठी ते बनवायला लावायचा.

त्या बहुतेक फ्रेंच माणसांची स्थानिक प्रेमपात्रं होती. त्यांच्या निरोपाची देवाण घेवाणही मीच करत असे. ( तेव्हा
सेल फोन नव्हते ) एकदा तो सांस्कृतिक धक्का पचवल्यानंतर मला त्या मुलींबद्दल आकस वाटेनासा झाला.
या मुलींसंबंधी एक मजेशीर आठवण सांगण्यासारखी आहे. त्या काळात मी दर सहा महिन्यांनी भारतात येत असे, तर भारतातून एक साडी आणायला मला गेताँने सांगितले. मी माझ्याच मनाने ब्लाऊज, परकर वगैरे सगळे घेऊन गेलो होतो. गेतॉला ती आवडली, पण येड्याने मला सांगितले कि ती आली कि तिला नेसव ती.. त्याला मी अर्थातच ठाम नकार दिला. तिने ती आणखी कुणाकडून तरी नेसवून घेतली आणि मला दाखवायला पण आली होती.

आमच्या घरी एम नेट चे कनेक्शन होते. दक्षिण आफ्रिकेतले हे नेटवर्क अतिशय सुंदर कार्यक्रम सादर करते आणि
खास बात म्हणजे या चॅनेलवर अजिबात जाहीराती नसतात. अनेक फ्रेंच चित्रपट मी या काळात बघितले ( सर्वच
चांगले होते, असे अजिबात म्हणणार नाही. ) पण माझा बराचसा मो़कळा वेळ ते कार्यक्रम बघण्यात जात असे.
तिथेच मी काही फ्रेंच आणि इतालियन पदार्थही शिकलो. खराखुरा पिझ्झा मी तिथेच खाल्ला.

पहिले सहा महिने माझी कुणा भारतीयाशी ओळख नव्हती पण अशीच अचानक एकदा संदीप गायकवाडशी
ओळख झाली आणि तो माझा आजही मित्र आहे. संदीप पोर्ट पासून जरा दूर चोबा या गावी रहात होता.
तो दर गुरुवारी शॉपिंगसाठी पोर्ट ला येत असे आणि तो माझ्या ऑफिसमधून मला पिक करत असे.
मग आम्ही दोघे भाजी वगैरे घेऊन घरी येत असू. त्यानंतर बहुतेक रविवारी मी त्याच्याकडे जात असे.
पोर्ट मधेही आम्हाला अगदी मोजक्याच भाज्या मिळत. ते मार्केट माझ्या ऑफिसच्या समोरच होते
आणि दुसरे म्हणजे आमच्या कंपनीत फ्रान्समधून काही भाज्या येत असत. त्या पण मी त्याला देत असे.

संदीपमूळे मला अनेक भारतीय मित्र मिळाले आणि आमचे सहभोजनाचे कार्यक्रम सुरु झाले. अगदी १५/२० जणं
जेवायला जमत असू. माझ्या कडे पदार्थ शिकायलाही काही भारतीय बायका येत असत.

संदीपची फॅमिली भारतात होती. त्याची लेक गायत्री, त्याच काळात जन्मली आणि मी तिला संदीपच्याही आधी
भेटून आलो. ( संदीप पुढे मला गोव्यालाही भेटायला आला होता, आता तो पुण्यात असतो.)
माझ्या घरात पण मी बर्याच वेळा पार्टी देत असे. मदतीसाठी हाऊसमेड्स होत्याच, त्यामूळे अगदी भरगच्च
मेनू असे माझा. पार्टीतले उरलेले मसाले, लोणची, पंचामृत वगैरे बायका पॅक करुन नेत असत.

याच काळात एकदा गेताँला अपघात झाला आणि त्याचा हात दुखावला. मीच त्याचे ड्रेसिंग वगैरे करून देत असे.
त्याने ती नोकरी सोडली तेव्हा तो खुप रडला. मला म्हणाला, माझ्या कुटुंबातदेखील कुणी माझ्यासाठी एवढे केले
नाही. पारी ( पॅरीस ) ला ते मग तूला तूराफेल ( आयफेल टॉवर ) ला नेईन .. वगैरे बराच बोलला. मला मात्र अजून
जमलेले नाही ते.

त्या काळातही पोर्ट मधे सुरक्षिततेचे प्रॉब्लेम्स होतेच. कुठेही बाहेर जायचे असेल अगदी रस्ता ओलांडून बाजारात
जायचे असेल तरी मला बंदुकधारी गार्ड घेऊन जावे लागे. त्या काळात मी एकटा कधी गेटबाहेरही गेलो नाही.
अपवाद म्हणून शेवटच्या दिवशी, काजू आणायला गेटबाहेर एकटा गेलो होतो ( त्याच काजूची भाजी शेवटच्या
पार्टीला केली होती. )

१०) बोरी क्रिसेंट, अगबारा इस्टेट , साल २००९ - २०१०

पोर्ट हारकोर्ट लेगॉस पासून बरेच लांब होते. विमानानेच जावे लागे. त्यामानाने अगबारा लेगॉसच्या जवळ ( तरी
४० किमी ) होते. हे एक इंडस्ट्रीयल टाऊन आहे. बरेच कारखाने आहेत पण लोकल माल विकणारी दुकाने आणि बाजार सोडला, तर सुपरमार्केट्स वगैरे नाहीत.

पण अगबारा इस्टेट मात्र मोठमोठ्या घरांचे एक संकुल आहे. अश्याच एका मोठ्या घरात मी रहात होतो.
तळमजला आणि पहिला मजला मिळून ८ बेडरुम्स होत्या. शिवाय स्टोअर रुम्स, सिटींग रुम्स, डायनीन रुम्स (
मुद्दाम रुम्स लिहितोय, कारण त्याही किमान दोन दोन होत्या ) घराभोवती मोकळी जागा होतीच. तिथेही मी बराच भाजीपाला लावला होता.

या घरातले माझे सहनिवासी म्हणजे चौहानसाहेब आणि नारायणन. दोघेही मला बरेच सिनीयर आणि टेक्नीकल.
माझा कल बघून त्यांनी घराची सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली. आणि काय कारणं असतील ती असोत,
पण हे घर पुढे अगत्यशील म्हणून फेमस झाले. घरी आलेला कुणी, जेवल्याशिवाय गेला नाही इतकेच
नव्हे तर खास जेवण्यासाठी म्हणुन इथे लोक येऊन गेले. ( सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांची कन्या आणि
जावई इथे जेऊन गेले. माझ्या गुरुचा असा आशिर्वाद मला मिळावा, यापेक्षा दुसरे भाग्य काय असणार ? )

अगबारा इस्टेट हि मोठ्या घरांची कॉलनी होती. एरवी नायजेरियात रस्त्यावर फिरणे तेवढे सुरक्षित नसते पण
हि इस्टेट अपवाद होती. हिला रस्त्याच्या बाजूने मजबूत कुंपण तर इतर बाजूंनी घनदाट जंगलाचा आणि नदीचा
वेढा होता. ते ओलांडून कुणी येईल अशी शक्यताच नव्हती, त्यामूळे मी या ईस्टेटभर भटकत असे.
अगदी रात्री अंधारातही मला कधी भिती वाटली नाही. अंधारात मी कितीतरीवेळा साप आडवे जाताना बघितले.
घुबडही उडताना दिसत. मधला काही भाग रस्ता, घनदाट जंगलाच्या कडेने जात होता. तिथे दिवसाही जायला
लोक बिचकत, मी मात्र तिथे बिनधास्त भटकत असे.

आमच्या शेजारच्या घरात एक निवृत्त शिक्षिका रहात असे. तिने घरी काही मूले आश्रयाला ठेवली होती, त्यांचा
सर्व खर्च ती करत असे. ती खुपदा माझ्याशी गप्पा मारत असे. तिचे इंग्लीश फार सुंदर होते. सापांचा उल्लेख
ती नेहमी रेप्टाईल्स असा करत असे.

नायजेरीयातली माती खुप सुपीक. मी लावलेली झाडे भराभर वाढत. कढीपत्ता तर दर आठवड्याला तोडावा
लागे असा वाढला. तुळशीचे रान माजले. भारतातून नेलेल्या बटाटाएवढ्या कोनफळाचा छोटासा कोंब लावला
तर त्यापासून ४ किलो आकाराचे कोनफळ तयार झाले.

किचनमधे हाताखाली दोन मेडस होत्या. त्यापैकी डिव्हाईन माझ्या हाताखाली शिकून चपात्याही करू लागली
होती. एकंदर किचनची जबाबदारी माझ्यावर होती. पण अगबारा गावात काही मिळायचे नाही, म्हणून मी दर
रविवारी लेगॉसच्या इलूपेजू आणि लेकी या भागात जाऊन, ताज्या भाज्या आणि किराणासामान घेऊन येत असे.
नायजेरियात लोकल बीन्स आणि याम खुप छान मिळतात, त्याचे भारतीय मसाल्यातले पदार्थ मी करत असे.

याच इस्टेट मधे दुसर्या एका घरात, आमचा कलीग त्रूषार आणि त्याची बायको रुपा रहात होते. काही बॅचलर्स
( अंकुर, रमण, अमन वगैरे ) दुसर्या घरात रहात होते. या सगळ्यांना मी एकत्र ज्मवून महिन्यातून एकदा तरी
सहभोजन करत असे. कोजागिरी, दसरा असे सणच नव्हे तर मुलांचे वाढदिवसही दणक्यात साजरे होत.

आमच्या फॅक्टरीमधे दिवाळीची पूजा, विश्वकर्मा जयंती असे सणही मी साजरे करत असे. मग त्यासाठी प्रसादाचे
जेवणही मीच घरुन बनवून नेत असे. कुणी लेगॉसला ऑफिसच्या कामासाठी जाणार असेल, तर त्याला डबा
बनवून देणे, कुणी आजारी असेल तर पत्थ्याचे जेवण करून देणे असेहि चाले. खरे तर नायजेरियात खुप जण
बॅचलर्स म्हणून जातात. घरचे जेवण मिळत नाही आणि स्वतःला करणे जमत नाही, अशी अवस्था असल्याने,
मानसिक रित्या ते खचून जातात. मी या मुलांसाठी ते करू शकलो, यातच मला खुप समाधान मिळाले.
हि सर्व मुले, अजूनही माझ्या संपर्कात आहेत.

अंकूरला मासे खायची चटक मी लावली ( मी स्वतः खात नसूनही ) तिथे कोलंबी, खेकडे वगैरे चांगले मिळत असत. चिकन आणि टर्की पण मिळत असत. ( त्यांच्या काही रेसिपीज मी त्या काळात मायबोलीवर लिहिल्या होत्या.)
कोळश्याची शेगडी पेटवून त्यावर भरताची वांगी तर भाजत असेच शिवाय दालबाटी, चुर्मा सारखे प्रकारही करत
असे.

रोजच्या रोज दही लावणे हा पण माझा उद्योग होता. मूळ विरजण मी भारतातून नेत असे, ते कारण असेल किंवा
मला ते तंत्र जमत असावे असेही असेल, पण दही मात्र फार सुंदर लागायचे. या दहि लावण्याची एक मजेशीर आठवण आहे. कुणी व्हीजीटर आला कि तो आमच्याच घरी रहात असे. हे घर एवढे मोठे ( नव्या माणसासाठी भूलभुलैयाच होते ते.) कि नवखा माणूस बिचकत असे. तर असेच एकदा एक बंगाली माणूस रहायला आला होता. तो वरच्या मजल्यावर काम करत बसला होता. मी दूध तापवून थंड करत ठेवले होते. आणि रात्री उशीरा उठून विरजण लावायला मी खाली आलो. त्याला न सांगताच मी गुपचूप खाली आलो, तर त्याला जाणवले कि कुणीतरी आपल्या
मागून गेले आणि त्याने घाबरून दार लावून घेतले आणि रुममधे जाऊन झोपला. मी विरजण लावून वर जाऊ लागलो तर दार बंद. दार ठोठावून फायदा नव्हता, कारण सर्व बेडरुम्स त्यापासून लांब. माझा फोनही वरच राहिला होता. ती रात्र मी खालीच सोफ्यवर झोपून काढली.

लेगॉसहून आमचे एम डी येणार असले तरी ते मला जेवण बनवून आणायला सांगत. पुढे मग तो नियम आम्ही सगळ्याच भारतीय व्हीजीटर्स ना लागू केला. अगबाराला कुणीही येणार असलं तर त्याची जेवणाची जबाबदारी आम्ही घेत असू. म्हणजे नारायणन, मला न विचारता परस्पर आमंत्रण देऊन टाकत. अर्थात आमच्या दोघात तेवढे
अंडरस्टँडींग होतेच.

उत्तम घरगुति जेवण हा एवढाच दिलासा मी सहकार्यांना देऊ शकत होतो. बाकी सगळ्या बाबींचा तिथे आनंदी आनंद होता. बाजारात जायला फक्त ४० किमी जावे लागे. सकाळी लवकर निघून मी दुकाने उघडता उघडताच
लेगॉसला पोहोचत असे, पण येताना तेवढेच अंतर कापायला मला तीनचार तासही लागत असत. आणि तो
प्रवासही धोकादायकच होता, तरी माझ्या बोलक्या ड्रायव्हरमूळे तो सुसह्य होत असे. आमच्या दुसर्या बाजूच्या
घरात मेहता ( पंजाबी होते ते ) कुटुंब रहात होते. त्या मिसेस मेहता लहानपणापासून नायजेरियात राहिल्या होत्या.
त्यांनी माझी भिती घालवली. एकदा सोबत असताना, त्यानी रस्त्यावर उतरुन, घासाघीस करून अननस विकत
घेतले.. मी विचारल्यावर त्या म्हणाल्या, " अरे भाई इन कालोंसे डरनेका नही ! खायेंगे नही हमको, वैसे खा
सकते है, मगर नही खायेंगे ! " दुर्दैवाने त्यांचा एकुलता एक मुलगा, ड्रग्ज च्या आहारी गेला, त्याला भारतात
सुधारण्यासाठी ठेवले होते पण तो वाचू शकला नाही. त्यांना त्या प्रसंगी खटपट करून मी विमानाची तिकिटे
मिळवून दिली होती. पण बाई धीराची होती, शेवटपर्यंत तिने डोळ्यातले पाणी दिसू दिले नाही कुणाला.
त्या घटनेची हाय खाउन, मेहता पण महिनाभरातच वारले.

वैद्यकिय सोयी नव्हत्याच ( आठवा माझी नायजेरियन विचित्र कथा - एक कर्नल कि मौत ) एकदा आम्ही दोघेच घरी
असताना नारायणनना अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखणे, घाम फुटणे, डावा हात दुखणे असा त्रास सुरु झाला.
निव्वळ माझ्याशी बोलत राहून आणि मसाज करुन त्यांना थोडा आराम पडला. मग मात्र मी त्यांना जबरदस्तीने
भारतात पाठवले. ते सहा महिन्यांनीच परत आले. ते अजून माझ्या संपर्कात आहेत. चौहानसाहेब मात्र आता
हयात नाहीत.

अंकूर, रमण, अमन अजूनही माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्या वाढदिवसाला माझ्या फोनची ते वाट बघत असतात.

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिश्चंत.. त्या काळात माझ्याकडे डिजीटल कॅमेराच नव्हता !

संशोधक, मी शिक्षणाने चार्टर्ड अकाऊटंट आहे. माझे काम त्याच क्षेत्रातले असते. पण आफ्रिकेत मल्टीटास्कींग करावेच लागते. प्रत्येक कामासाठी वेगळा माणूस ठेवणे शक्यच नसते. घरातली आणि ऑफिसमधलीही अ‍ॅडमिन
स्वरुपाची कामे आम्हाला करावीच लागतात.

किती सुंदर लिहल आहे दिनेशदा.
सगळ वर्णन वाचुन आपल्याला कधी तरी ह्यांच्या हातच खायला मिळेल का असा प्रश्न पडला आहे.

सगळ वर्णन वाचुन आपल्याला कधी तरी ह्यांच्या हातच खायला मिळेल का असा प्रश्न पडला आहे.
>>
अगदी अगदी. दिनेशदांच्या पाकृ वाचून तर नेहमीच असं वाटतं.

दिनेशदा,
किती मस्त आणि मनमोकळेपणाने लिहीता तुम्ही. असे वाटते की तुम्ही स्वतः समोर बसून हे किस्से सांगत आहात.
या आधीही तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत काही धाग्यांच्या रुपात तर काही प्रतिसादात, त्या सगळ्या गोष्टी आठवतात.

तुमच्या एका फ्रेंच मित्राने वाईन मधे लाल रंग मिसळला होता, ज्यामुळे वाईन पिणाऱ्या इतर मित्रांना वाटले होते की लघवीतुन रक्त जातेय की काय?
वर उल्लेख केलेला फ्रेंच मित्र तोच का?

आभार ..

अंकु.. पदार्थ करुन मित्रमैत्रिणींना खाऊ घालणे हि माझ्याकरता सुखाची परमावधी असते. पण असे योग आता फारच कमी येतात...

गमभन.. ते याच घरात झाले होते. प्रयोग जो वरच झाला होता. बाकी फ्रेंच लोकांचे किस्से आणि त्यांनी सांगितलेले जोक्स, इथे सांगण्यासारखे नाहीत !!!

साडीचा किस्सा वाचल्यासारखा वाटत होता. इथे आहे, पण दहा वर्षांत थोडासा फरक पडलेला दिसतो आहे त्यात.
तेव्हा वाचायला विचित्र वाटल्यामुळे लक्षात राहिला होता.

सुंदर लेख.
आल्यापासून पहिल्यांदाच असं काहीसं वाचायला मिळालं. आधीचे दोन भाग कुठे मिळतील मला ?

(फोटो हवेच होते)
एम नेट बद्दल अनुमोदन. केपमधे पाहिलेय.

तिन्ही भाग वाचले. मी पण गेल्यावर५ वर्षांत बरीच घरे बदलली पण असे लिहायला जमणार नाही. आठवत पण नाही. आधी पण थोडेफार वाचले आहे तुम्ही जुन्या माबोवर लिहिलेले. पुढील भागाच्या प्रतिक्षेत Happy

एक बाकी भारी आहे हां. तुमचे लेख इतके आवर्जून वाचले जातात, इतके लक्षात ठेवले जातात.

आपल्याला आज वाचले तर उद्या लक्षात रहात नाहीत कोणाचे लेख फारसे.

काय बरी कारणं असतील?( हे तुमचे फॅन सांगतील ना..) म्हणजे खोड्या काढायला पण फॅन बनावेच लागते.

--------------------------------

रंगभुषा ते वेशभुषा करणारे पुरुष /स्त्री दोन्ही असतात ह्याची माहीती जरा वाचली असती तर इतकं विचित्र नसतं वाटलं. असो.

मस्तं लेख हा ही दिनेशदा.
अधे मधे वाचलेल्या आठवणी पुन्हा कंपाईल्ड स्वरूपात वाचल्याचा आनंद मिळाला.

इतक्या देशविदेशी फिरणे आणि इतक्या घरांत रहाणे प्रत्यक्ष शक्य नाही पण तुमच्या लेखांनी ती अनुभुती मिळते.

धन्यवाद!

स्वाती_आंबोळे ताई, अनेकानेक धन्यवाद. तुमच्यासारख्या जुन्या मायबोलीकरांमुळे जुने धागे वाचायला मिळतात. तुमचा संदर्भ जरी वेगळा असला तरी खूप छान वाचायला मिळाले.

दिनेशदा तुम्ही अगदी flawless लिहिता, वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. तुम्ही लिहिलेली घर असावे घरासारखे ही लेखमालाही आवडली.