घर असावे घरासारखे - भाग २ - केनया

Submitted by दिनेश. on 8 December, 2016 - 01:51

घर असावे घरासारखे - भाग २ - केनया

केनया मधे मी एकंदर पाच घरात राहिलो ... शिवाय अनेक हॉटेल्स मधेही राहिलो, पण तो या मालिकेचा भाग नाही.

४) सामत सोजपार हाऊस, किसुमू - साल १९९३

लग्न होऊन केनयात गेल्यावर आम्ही या घरात राहिलो. दुसर्‍या मजल्यावरचा ३ बेडरुम्स, दोन किचन्स, ३ टॉयलेट्स सिंटींग रुम, डायनिंग रुम, स्टोअर रुम.. असला अवाढव्य फ्लॅट होता तो. दुसर्‍याच मजल्यावर होता तरी
तळमजल्यावर एक गोदाम होते आणि त्याची उंची बरीच असल्याने, घरी जाण्यासाठी बरेच जिने चढावे लागायचे.

अगदी मोजक्याच भांड्यांनी आणि वाणसामानानी सुरु केलेला संसार मी दोन महिन्यातच भरपूर वाढवला होता.
त्यापुर्वीचे वास्तव्य मस्कतसारख्या सुरक्षित शहरात झाले होते, त्यामूळे केनयात सुरक्षिततेसाठी जी काळजी
घ्यावी लागत असे, त्याचे नाही म्हंटले तरी थोडे दडपण आले होते.

याच घरी जाण्यासाठी इमारतीचे, मग मजल्याचे आणि मग फ्लॅटचे अशी ३ कुलुपे उघडावी लागत असत.
पण नंतर पुढे ही बंधने मला जाचक वाटेनाशी झाली किंवा मी ती जुमानेसा झालो. संध्याकाळी घरी आल्यावरही
मी बाहेर पडत असे, पण किसुमूला रोज त्या वेळी पाऊस पडत असल्याने, त्यावरही बंधने होती.

या घराला भरपूर खिडक्या होत्या तरी त्या मागच्या आणि बाजूच्या गल्लीच्या दिशेने होत्या. त्यातून फार काही
दिसतही नसे. केनयामधे कोळसा स्वस्त आणि मुबलक मिळतो. आणि त्याचा वापर करण्यासाठीच बहुदा तिथे
एक जास्तीचे उघड्यावरचे किचन असते. तसे या घरालाही होते. तिथे मी शेगडीवर जेवण करत असे.

केनयात तसे भारतीय वाणसामान सहज मिळते. भाजीपालाही ताजा आणि स्वस्त मिळायचा. तो मी आणत असे.
पण तिथे ताजे दूध मिळत असूनही मला ते घेता येत नसे, कारण मी दिवसभर ऑफिसमधे आणि दूधवाला
दिवसभरात कधीही येत असे.

त्या घराचे आमचे शेजारी म्हणजे डॉ. रुपारेलिया. ते तसे चांगले होते पण दिवसभर दोघे क्लीनीकमधे असत. त्यांची
भेट क्वचितच होत असे.

घरात टीव्ही नव्हता. दर रविवारी मी थिएटर मधे जाऊन चित्रपट बघत असे, पण रोजची करमणूक अशी काही
नव्हती. मी लोकसत्ता आणि लोकप्रभा मागवायचो ( तो दुसर्या दिवशी मिळायचा ) पण तोही अधाश्यासारखा
लगेच वाचून टाकायचो. घरातून काही दिसत नसल्याने संध्याकाळी चहाचा कप घेऊन गच्चीवर जायचो. किसूमूहून
संध्याकाळी उडणारे एकमेव विमान, उडलेले बघून परत घरी यायचो.

या घराच्या मागेच व्हिक्टोरिया डिस्को होता. शुक्रवारी आणि शनिवारी त्याचा एवढा आवाज यायचा कि सर्व
खिडक्या बंद करूनही मला झोप लागत नसे. हा डिस्को पहाटे ३/४ वाजेपर्यंत चालू असे.
एकंदर या घराच्या आठवणी म्हणजे एकटेपणाच्या आणि क्लेशकारकच आहेत. पण हा एकटेपणा ३ महिन्यातच
संपला. या घराबद्दल एवढी अढी मनात बसली होती, कि नंतर त्याच गावात काही वर्षे असूनही, मी या घरासमोरचा रस्ताही टाळला.
पुढच्या घरात मला मनीष मीना मेहरोत्रा या दोघांचा अपार स्नेह लाभला. खरे तर त्यांच्याच आग्रहावरुन मी घर
बदलले..

५) बंगलोज बिहाईंड केसीबी - साल १९९३-१९९५

आमच्या कंपनीतले अधिकारी किसुमु गावात वेगवेगळ्या ठिकाणी रहात होते. वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे
व्हावे म्हणून ब्रिटीशकालीन बंगले असलेली एक कॉलनी आमच्या कंपनीने विकत घेतली होती.
तिथे शिफ्ट होणे आमच्या मनावर होते पण मी आणि मनीषने तिथे शिफ्ट व्हायचे ठरवले. ( मनीष माझा
कलीग होता आणि त्यानेच मला आग्रह केला.)

त्या छोटेखानी बंगल्याच्या मी प्रथमदर्शनीच प्रेमात पडलो. दुमजली बंगला होता तो. तळमजल्यावर किचन
आणि सिटिंग रुम होती, तर वरच्या मजल्यावर दोन बेडरुम्स, मधली मोकळी जागा, बाथरुम आणि सुंदरशी बाल्कनी होती. मागच्या बाजूला मोरी शिवाय मागे पुढे भली मोठी मोकळी जागा. सर्व घरभर काचेच्या मोठ्या मोठ्या
खिडक्या, दरवाजेही काचेचेच. मनीषचे आणि माझे बंगले समोरासमोर. आजही हे माझ्या आयूष्यातले सर्वात
सुंदर घर आहे.

खालच्या मजल्यावरून सभोवतालची बाग दिसायची तर वरच्या मजल्यावरून अगदी बाथमधूनही लेक
व्हिक्टोरियाचे नयनरम्य दृष्य दिसायचे. संध्याकाळी पाऊस पडल्यावर हवामान सुखद व्हायचे. या घरात ए सी काय, पंखा पण नव्ह्ता. ( गरजच नव्हती. )

हे बंगले जुने असले तरी व्यवस्थित राखलेले होते शिवाय त्यांची नव्याने रंगरंगोटी केली होती. तिथे गेल्या दिवसापासून मीनाभाभीने मला, भाईसाब म्हणायला सुरवात केली. ती पंजाबी असली तरी बनारसमधे
वाढलेली होती, शिवाय तिची आई मराठी होती, त्यामूळे ती तिन्ही भाषा ( हिंदी, पंजाबी आणि मराठी ) सुरेख
बोलायची. मी तिला माझ्या हिंदीचे गुरुपद देऊन टाकले होते. सुंदर वाक्यरचना आणि काही अनोखे शब्द
मी तिच्याकडून शिकलो.

केनयात दूधाचा सुकाळ आहे. त्यामूळे दूधवाल्याकडून ती माझ्यासाठी रोज दूध घेऊन ठेवायची, इतकेच
नव्हे तर गरमही करुन ठेवायची. मी आणि मनीष घरी आलो कि तिघे मिळून पायरीवरच चहा पित असू.
मग तिथेच आज जेवायला काय बनवायचे त्याची चर्चा व्हायची. मग अर्थातच एकमेकांना नमुने पाठवले
जायचे.

आजूबाजूला खुप मोकळे आवार असल्याने मी तिथे खुप फुलझाडे लावली होती. आणि तिथल्या
सुंदर हवामानात ती भरभरून फुलायचीही. मागच्या जागेत भरपूर भाजीपाला लावला होता. मग अर्थातच
त्याचीही देवाण घेवाण व्हायची.

मनीषचा मुलगा प्रणव हा माझा घट्ट मित्र आणि खेळगडी. बाकिचीही मूले होती तिथे. बहुतेक स्टाफ टेक्नीकल
होता, त्यामूळे त्यांना रात्रीच्या शिफ्टची व्यवस्था लावून यावे लागायचे. मी मात्र आधी निघायचो. त्यामूळे
सटरफटर वाणसामान कुणाला हवे असेल तर ते मीच आणायचो. आणि आल्यावर सगळी मुले मिळून खेळतही असू.

केनयात १५ दिवस कापणी केली नाही तर भयानक गवत वाढते, त्यात मूलांनी जाऊ नये म्हणून जपावे लागे आणि तेही मीच करत असे. सापांची भिती नव्हती तर गोखरु ( कंटक ) ची भिती होती त्याच्या काटेरी फळावर काय बाजूला जरी पाऊल पडले तर भयानक वेदना होत. पण ती उचकटायची एक पद्धत होती, ती मुलांना मी शिकवली होती. आठपंधरा दिवसांनी तो उद्योग करावा लागायचा.

कधी कधी तर आणखी एक वेगळीच मजा असायची. गेटवर मूले माझी वाट बघत असायची आणि मला
बघताच, अंकल, लिटील डायनोसॉर, लिटील डायनोसॉर आया है, असा आरडाओरडा करायची. अशावेळी
माझ्या पायरीवर हमखास एक भली मोठी मॉनिटर लिझार्ड बसलेली असायची. तिला हुसकावणे
हा एक प्रोजेक्ट व्हायचा. दगड मारून चालायचे नाही कारण दरवाजा काचेचा होता. बरं ती तशी मठ्ठ (कि बेरड). आरडाओरडा करूनही जात नसे. खुपदा कुणातरी केनयन माणसाला बोलावून आणावे लागे, तो तिला
पकडून नेत असे.

त्या घराला धूर जाण्यासाठी म्हणून उंचावर बारीक झरोके होते. कधी कधी त्यातून बारीकसे वटवाघूळ
घरात शिरलेले असायचे, त्याला बाहेर जायचा रस्ता सापडत नसे, त्याला हुसकावणे हा आणखी एक प्रोजेक्ट
असायचा.. पण हे सगळे आम्ही एन्जॉय करायचो.

अगदी पहाटे पाचला मी उठत असे ( तसा अजूनही उठतोच ) आणि मागच्या बाजूला कोळश्याची शेगडी
पेटवून अंघोळीसाठी पाणी तापवत असे. त्याची एक वेगळीच मजा. आणि माझे पाणी तापवून झाले कि
मागच्या बंगल्यातल्या कुलकर्णी वहिनी त्याच शेगडीवर पाणी तापवत असत, नव्हे तसेच ठरले होते.

केनयामधल्या ब्लॅक मॅजिक म्हणजेच जूजूचा पण अनुभव मी याच घरात घेतला. एकदा माझ्या घरात
३ चोर शिरले आणि पैसे आणि बर्याच वस्तू नेल्या ( त्याची मला पूर्ण नुकसान भरपाई मिळाली ) पण
ते घरात असताना मला गाढ झोप लागली होती. ते कसे झाले याचा उलगडा मला मनीषच्या हाऊसमेडने
करून दिला. माझ्या बेडखाली चोरांनी एक जाडजुड दोर जाळला होता आणि तो दोर साधासुधा नव्हता
तर गळफास लावून आत्महत्या केलेल्या कुणाच्या तरी फासाचा होता. ( अर्थात मला गाढ झोप लागली,
हे एका अर्थी बरेच झाले म्हणायचे. )

या घटनेची चर्चा अर्थातच झाली, आणि कॉलनीतली एक गुजराथी बाई म्हणाली, उधर उनका बेटा पैदा
हुआ और यहाँ चोरी हो गयी.... यावर मीनाभाभीनेच तिच्याशी जोरदार भांडण केले होते. प्रणवची छोटी बहीण, प्रेरणाचा जन्म पण त्याच काळातला. त्या काळात मीनाभाभीने माझ्याकडून हक्काने पदार्थ करून मागितले.

अगदी लहानपणी कोंबडी कापताना बघितल्यामूळे मी आयुष्यभर नॉन व्हेज खाणे सोडले. पण याच घरात मी
स्वतः कोंबडी कापली ( जिवंत नाही ) ते पण मीनाभाभीसाठीच. अर्थात नंतर या सगळ्याचे काही वाटेनासे झालेय.

या घराबद्दल मी आजही खुप हळवा आहे. या घराच्या आठवणी काढताना मी हरखून जातो. या घराला
मला नंतर कधी भेट देता आली नाही पण मेहरोत्रा आजही माझ्या संपर्कात आहेत.

किसुमूला असताना नैरोबीहूनच भारताचे विमान पकडावे लागे, त्यावेळी नैरोबीबद्दल खुप कुतूहल वाटायचे.
माझी पुढची ३ घरे नैरोबीत झाली.

६) पार्कलँड्स, नैरोबी - साल २०१०

केनयामधल्या माझ्या दुसर्या सत्रात माझी ३ घरे झाली. तिन्ही नैरोबीत. मी नैरोबीत दाखल झाल्यावर माझ्या
पसंतीने घर फायनल करायचे असे ठरले होते. तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून मी पार्कलँड मधे, उषाबेन आणि
मुकेशभाई यांच्या घरी राहिलो. तरी तिथे ५ आठवड्याचा मुक्काम झाला.

पार्कलँड हा नैरोबी मधला श्रीमंताचा भाग. मोठमोठाली घरे आहेत तिथे. उषाबेनच्या घरात आम्ही पी.जी.
मिळून १० जण होतो. शिवाय ते दोघे, त्यांच्या २ मुली आणि मुकेशभाईंचे आईवडील.
पण सगळे हसत खेळत रहात असू. एवढ्या सगळ्यांचे नाश्तपाणी, रात्रीचे जेवण शिवाय ज्यांना हवा त्यांना
दुपारचा डबा, असे सगळे उषाबेन हसत हसत मॅनेज करत असत. आम्हा प्रत्येकाची आवडनिवड त्या जपत.

कुणाला अधेमधे भूक लागली तर खाण्यासाठी खाऊचे डबेही सतत भरलेले असत. त्यांच्या हाताला चव होतीच.
त्याशिवायही कुणाला थेपले करुन दे, कुणाला मेथीचे लाडू करुन दे, असे उद्योग त्या करत असत.

आमच्यापैकी काही जण अगदीच तरुण होते. त्यांचे काही प्रॉब्लेम्स असत ( गर्लफ्रेंड, दारू, घरचे प्रॉब्लेम्स ) त्याची
चर्चा पण दिलखुलासपणे जेवणाच्या टेबलवर होत असे. त्या पाच आठवड्यातही माझ्याकडे घरचाच माणूस हे पद आपसूक आले. एकदा उषाबेन ना कुठेतरी जायचे होते, त्या दिवशीचे जेवण त्यांनी माझ्यावर सोपवले होते.

हे घर सुंदर होते. गच्चीला खेटूनच सोनचाफ्याचे झाड होते आणि ते भरभरुन फुलायचे. तो परीसरही सुंदर होता,
पण रस्त्यावर वर्दळ अजिबात नसायची. माझ्या कराराप्रमाणे मला स्वतंत्र घर असणार होते, म्हणून तसे घर
सापडताच मी उषाबेनचा निरोप घेतला.

अगदी सख्खी बहिण असावी, तशी ती होती. मला जाताना त्यांनी शिदोरी बांधून दिली, नव्या घरी लगेच कुठे जेवण करणार तू, म्हणत.

खर्या अर्थाने अन्नपूर्णा !

७) बॉम्बे फ्लॅट्स, नैरोबी वेस्ट. - साल २०११

पार्कलँड हून मी नैरोबी वेस्ट आलो. पार्कलँड हा मुंबईतला हिंदू कॉलनीसारखा भाग तर नैरोबी वेस्ट, हा गिरगाव सारखा.आणि मुख्य म्हणजे माझे किशोरी मिश्रा आणि अजय पटेल, हे दोन कलिग्ज त्याच भागात रहात होते.

बॉम्बे फ्लॅट्स हेच त्या बिल्डींगचे नाव. तिथे तिसर्या मजल्यावर मला एक फ्लॅट मिळाला. बिल्डींगमधे गुजराथी आणि आफ्रिकन अशी मिश्र वस्ती होती. फ्लॅट मोठे २ बेडरुमचे असले तरी रचना चाळीसारखी होती. घरी जाताना लांब बाल्कनी चालत जावी लागे.

घराला मागे आणि पुढेच फक्त खिडक्या, त्यामूळे घरात थोडा अंधारच असायचा. पण तरी तो एरिया मला आवडला होता. दोन मोठी सुपरमार्केट्स जवळ होती. शिवाय रस्त्यावर फळे, भाज्या वगैरे विकायला असत. केनयासारखी ताजी फळे आणि भाज्या तर मुंबईतही मिळत नाहीत.

मी रोज सकाळी किशोरीकडे जात असे, मग रानीभाभीच्या हातचा चहा पिऊन आम्ही ऑफिसला जायला निघत असू. जाताना त्याच्या मुलांना म्हणजे अभय, आशीष ना शाळेत सोडत असू. छोटा आकाश, जवळच्याच शाळेत जात असे.

या बॉम्बे फ्लॅटमधे पाण्याचा पण प्रॉब्लेम होता. प्रत्येक घरासाठी स्वतंत्र पंप तळमजल्यावर होता, आणि
त्याचा स्विच मात्र घरात. तो चालू केल्याशिवाय पाणी येत नसे. आणि रात्री तो स्विच ऑफ करायला मी खुपदा
विसरत असे, मग तळमजल्यावरचे कुणीतरी मला आठवण करुन द्यायला वर येत असे.. तो प्रकार जरा
वैतागवाणाच झाला होता.

या घरात मला जेवण करायचा पण मूड लागत नव्हता. ऑफिसमधे भारतीय पद्धतीचे रुचकर जेवण होत असे,
आणि रात्री मी फळे खाऊन रहात असे. रविवारी, नैरोबीतल्या एखाद्या भारतीय रेस्टॉरंट मधे जात असे.

याच रस्त्यावर एका नवीन बिल्डींगचे बांधकाम पूर्ण होत आले होते. अजूनही सर्व बिल्डिंगवर आच्छादन होते,
आणि ज्या दिवशी ते काढले, त्याच दिवशी मी त्या बिल्डींगच्या प्रेमात पडलो. गुलाबी, केशरी रंगात रंगलेली
ती बिल्डिंग खुप सुंदर होती.

तिथे बाहेर बोर्ड लागल्याबरोबर मी फ्लॅट बघायला गेलो, आणि सहाव्या मजल्यावरचा, टेरेस ला लागून असलेला एक फ्लॅट मी पसंत केला.....

८) ग्लेन किर्कमॅन फ्लॅट्स, नैरोबी वेस्ट. साल २०१२

दोन बेडरुम्स आणि छोटी बाल्कनी या फ्लॅटला होती आणि एक भली मोठी टेरेसही होती. या बिल्डींगची
पाणीव्यवस्था उत्तम होती.

त्या भागातली सर्वात उंच इमारत तीच होती. घरातील दोन बेडरुमच्या खिडक्यातून थेट सुर्योदय आणि सुर्यास्त
दिसत असे. त्याशिवाय टेरेसमधून नैरोबीचा फार मोठा भाग दिसत असे. रस्त्याच्या दुसर्या बाजूला, न्यायो स्टेडीयम, हे नव्याने बांधलेले स्टेडीयम होते. त्यात होणारे कार्यक्रम मला टेरेस मधूनच नव्हे तर घरातूनही दिसत असत.

नैरोबीचा दुसरा विमानतळ, विल्सन एअरपोर्ट हा जवळच होता आणि त्याची धावपट्टी घरातून दिसत असे.
छोटी छोटी विमाने तिथून दिवसभर उडताना दिसत.

या घरात जायला मला सहा जिने चढून जावे लागत खरे, पण नंतरची संध्याकाळ फार रम्य असे. खुपदा कॉफीचा मग हातात घेऊन मी, टेरेसवरून सूर्यास्त बघत असे. नैरोबी तसे हिरवेगार आहे. भली मोठी झाडे आहेत तिथे.
ती वेगवेगळ्या काळात भरभरून फुलतात. बाभळीचा पांढरा, झकरांदाचा आकाशी, दिल्ली सावरचा गुलाबी,
वावळ्याचा पिवळा, टोकफळाचा लाल असे रंग सभोवताली आळीपाळीने असत.

या परीसरात गुजराथी, पंजाबी लोकांची वस्ती आहे. एक मोठे देऊळ आणि गुरुद्वारा पण आहे. रविवारी
मी या परीसरात भटकत असे. देवळात सर्व सण दणक्यात साजरे होत. नवरात्रीत रात्रभर गरबा असे तिथे, त्याच वेळी रोज प्रसादाचे जेवणही असे.

या घरात एकदम उत्साही आणि प्रसन्न वाटत असे. मायबोलीवरची, भाज्यांवरची माझी अवघी विठाई माझी, हि मालिका याच घरात असताना पूर्ण केली मी.

माझ्या शेजारी तिघी सिंगल मदर्स होत्या. हाय / हॅलो एवढीच आमची ओळख राहिली पण पहिल्या मजल्यावरच्या एका शीख फॅमिलीशी माझी मैत्री झाली. त्या मिसेस सिंग आणि त्यांच्या तिघी मुली तिथे रहात होत्या. मिस्टर सिंग हयात नव्हते. मधली कमल शिकत होती. . पुढे मी तिला माझ्याच ऑफिसमधे जॉब मिळवून दिला आणि
माझ्या रजेच्या काळात ती माझे काम संभाळत असे.

किशोरीच्या घरी रोज जात होतोच. याच घरात असताना आम्ही नैरोबीच्या आजूबाजूच्या बर्‍याच सहली केल्या.
केनयामधे इंटरनेट आणि फोनसुद्धा अगदी स्वस्त आहेत. या घरात असताना यू ट्यूबवरुन बरेच डाऊनलोड्स पण
करुन झाले.

हे घर नैसर्गिक रित्याच थंड आणि हवेशीर होते. पंख्याची गरजही कधी वाटली नाही. दुपारी झोपताना पण ब्लँकेट
घेऊन झोपावे लागे.

गेल्या सप्टेंबर महिन्यात विमान चुकल्याने नैरोबीत एक दिवस मुक्काम होता, त्या दिवशी या दोन्ही घरांना परत एकदा डोळे भरून पाहून आलो.

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या पायरीवर हमखास एक भली मोठी मॉनिटर लिझार्ड बसलेली असायची.

कधी कधी त्यातून बारीकसे वटवाघूळ घरात शिरलेले असायचे

>>>>>

हे भारी आहे Happy

काही फोटोही हवे होते

मस्तंच आठवणी. तुमच्यासोबत आम्ही पण फेरफटका मारतोय, असंच वाटतंय.
घरांचे फोटोही (शक्य असल्यास) टाका सर्व लेखांत, म्हणजे 'चार चाँद' लागल्यासारखं वाटेल.

तुमच्या लिखाणात नुसता प्रामाणिकपणा नाही तर आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी अनुभवण्याची एक असोशी पण असते. त्यामुळे प्रत्येकच लिखाण वाचताना माणूस रंगून जातो. रसरसून घेतलेले अनुभव आणि लेखनशैली दोन्ही वाचण्याची ओढ वाढवतात.

मस्त स्मृती रंजन चाललंय!
वाचायला आवडतंय. जमल्यास फोटो पण देत जा.

दिनेशदा, छान चालली आहे मालिका. स्मित
काही फोटोज असतील तर ते ही द्याल का?
+११११

मस्त लिहिलंय << बनारसमधे वाढलेली होती, शिवाय तिची आई मराठी होती >> अरे वा शिव आणि गौरीच्या मुलाचं /मुलीचं पण असंच होईल ना . अगदी काहे दिया परदेस सारख Happy Wink

...

खुप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून... फोटो .... त्या दिवसात मी जर मायबोलीवर लेखन केले असेल तर त्या त्या
घरातले फोटो आहेत. पण ते सगळे गेल्या १२/१३ वर्षातलेच. त्यापुर्वी ना मायबोलीवर फोटो अपलोड करायची सोय होती ना माझ्याकडे डिजीटल कॅमेरा होता... अजून ३ भाग लिहितोय.