घर असावे घरासारखे - भाग १ - सल्तनत ऑफ ओमान / दुबई

Submitted by दिनेश. on 7 December, 2016 - 07:19

ज्या घरात किमान १ महिना वास्तव्य झाले ते माझे घर, अशी सुटसुटीत व्याख्या केली तर मी
आज माझ्या १९ व्या घरात राहतोय. यापैकी फक्त ३ अपवाद सोडले तर हि सर्व घरे मी, स्वतः
मॅनेज केलीत. मॅनेज केलीत म्हणजे घराची साफसफाई, सामान भरणे, वीज पाणी, आला गेला,
पै पाहुणा... पण तरीही मी घरांना संभाळले, असे मी म्हणणार नाही. त्यांनीच मला संभाळले.

त्यातल्या वास्तव्य काळातच नव्हे तर नंतरही माझे मन त्यात गुंतून राहिले. घर, सभोवताल, शेजारी
यांच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. जेव्हा जेव्हा शक्य झाले, तेव्हा तेव्हा मी या घरांना परत भेटी दिल्याच,
पण असे योग फारच कमी वेळा आले. तर हि पाच भागातली लेखमाला ( १. सल्तनत ऑफ ओमान / दुबई २. केनया, ३. नायजेरिया, ४ अंगोला आणि ५ अर्थातच भारत... लिहायला घेतोय. त्या घरांना मानसभेट देण्याचा
माझा एक क्षीणसा, केविलवाणा प्रयत्न.

इथे मी थोडा स्वार्थीपणा करतोय कारण या घरांशिवाय, अशी अनेक घरे आहेत कि ती मी, माझी म्हणू शकेन.
यात जसे माझे आजोळ आहे तसेच माझ्या जिवलग मैत्रिणीचे, ऑकलंड मधील घरही आहे. इतरही अनेक आहेत,
ज्या घरात मी कधीही, न सांगता सवरता जातो, हक्काने राहतो.. त्या घरांचीच नव्हे तर त्यातल्या माणसांची मनं पण माझ्यासाठी सदैव उघडी असतात......पण मला त्या घरांबद्दल या मालिकेत लिहायचे नाही.


१) मत्राह हाय स्ट्रिट, मस्कत, सल्तनत ऑफ ओमान, साल - १९९० - १९९२

भारताबाहेरचे पहिले वास्तव्य या घरातले. चौथ्या मजल्यावरचा, ३ बेडरुमचा अगदी प्रशस्त असा फ्लॅट. पहिल्यांदा
या घरात आम्ही तिघे रहात होतो, पण नंतर दोघेच राहिलो. पण तरीही माझ्या रुममधे मी एकटाच असे.
भारताबाहेरच नव्हे तर घरापासूनही दूर पहिल्यांदाच गेलो होतो. घरच्या आठवणींनी माझे व्याकूळ होणे,
या घरानी बघितले.

त्याकाळात इंटरनेट नव्हते, घरी हवा तेव्हा फोन करावा अशीही सोय नव्हती, त्यामूळे मी दर आठवड्याला घरी
पत्र लिहित असे. घरची आठवण येत आहे असा सूर अजिबात न लावता, मी इथे किती मजेत आहे, असे सांगणारी
ती पत्रे.
पण वाचणारे ते माझेच आईबाबा असल्याने त्यांना ते वर्जित सूर नक्कीच जाणवत असणार. ती पत्रे अनेक वर्षे
माझ्या बाबांनी जपून ठेवली होती. अनेकदा ती पत्रे काढून ते वाचत असत.
अगदी शेजारच्याच बिल्डींगमधे माझे ऑफिस होते त्यामूळे ऑफिस सुटल्यावर ५ मिनीटात मी घरी. आणि
मस्कतमधली सार्वजनिक वाहतूक इतकी सुंदर होती, कि पुढे ऑडीटसाठी जाऊ लागल्यावरही मी
अर्ध्या तासात घरी पोहोचत असे.

माझे पाककलेतले प्राथमिक धडे मी या घरातच गिरवले. पण ते गिरवणे अगदीच सोपे होते, कारण मस्कत मधे
असणारी मुबलकता आणि स्वस्ताई. अनेक पदार्थ तर तयारच मिळत असत. तरी पण देशोदेशीची फळे आणि
भाज्या मी या घरात पहिल्यांदा चाखल्या.

मत्राह हा मस्कतमधला अगदी जुना भाग, बहुतांशी गुजराथी वस्ती. दोनच लेन असलेला तो रस्ता, म्हणजे
ओमानच्या मानकानुसार बोळ होता पण तरीही तो सतत गजबजलेला असायचा. घरातून खाली उतरले
कि लगतच सुपरमार्केट्स होती. घर ऐन स्ट्रीटवर असल्याने दारातच टॅक्सी मिळायची ( पण तो बोळ
असल्याने, सरकारी बसेस मात्र येत नसत तिथे )

त्या काळात मस्कत शांत गाव होते ( अजूनही आहे, फक्त आता इमारती वाढल्यात ) आणि अतिसुरक्षित होते
( आजही आहे ) अगदी मध्यरात्रीही रस्त्यावरून फिरण्यात कोणताच धोका नव्हता. रात्री उशीरा सिनेमा,
मस्कत फेस्टीवल, देवळातले कार्यक्रम, मत्राह मधली नवरात्र असे आटपून मी गुरुवारी चालत घरी येत
असे. मग शुक्रवारी सकाळी उठायला ११ पण वाजत. ११ वाजता उठावेच लागे कारण शुक्रवारी ११ ते १ सर्व
मस्कत बंद असे.

घरात सगळीकडे कार्पेट होते आणि शुक्रवारी व्हॅक्यूम क्लीनरने ते आम्ही आळीपाळीने साफ करत असू. कपडे
धुणे पण शुक्रवारीच पण भांडी मात्र रोजच्या रोज. आता नवल वाटेल, पण मत्राह मधे उंदराचा फार सुळसुळाट
होता. त्यांचा बंदोबस्त करायचे कामही शुक्रवारीच करावे लागे. चौथ्या मजल्यावरही ते येत असत. मग त्यांच्यासाठी
सापळे लावून ठेवावे लागत.

त्या काळात केबल नव्हती पण व्हिडीओ कॅसेट्स होत्या. त्यामूळे गुरुवारी लोळत लोळत सिनेमा बघणे ( थिएटर मधला बघून आल्यावर ) हा उद्योग असे. कलिग्ज दाक्षिणात्य असल्याने आम्ही तामिळ / मल्याळी सिनेमा पण
बघत असू.

अरेबिक / फारसी लिपीचे धडेही याच घरात गिरवले. ती लिपी मात्र मी फार लवकर शिकलो.
त्या काळात मस्कत मराठी मित्र मंडळ ( मममिमं) फार जोरात होते. त्यांचे कार्यक्रम खुप होत असत. तसेही
मस्कत मधे भारतीय कलाकारांचे कार्यक्रम खुप होत असत आणि ते बहुतांशी मी बघतही असे. मित्रमंडळही मोठे होते पण त्यापैकी घरी कुणी आले नाही कधी. आम्ही बॅचलर्स होतो, म्हणून असेल बहुदा.

याच कारणाने असेल कदाचित पण शेजारी पाजारी भारतीय असूनही आमचा त्यांच्याशी काहीच संबंध नव्हता.
मत्राह मधे असताना, आम्हाला रुवी चे खुप आकर्षण वाटायचे. रुवी हाय स्ट्रीट हि एक हॅपनींग जागा होती.
शुक्रवारी तो रस्ता फुलून जात असे. माझे नंतरचे घर रुवी मधेच होते.. ते आपण बघूच. पण जाता जाता
मत्राह च्या घराची आणखी एक आठवण.

मी तिथे गेलो तेव्हा माझे वजन ( जेमतेम ) ५८ किलो होते पण तिथल्या तीनच महिन्याच्या वास्तव्यात ते वाढून
तब्बल ७६ किलो झाले. ३ महिन्यात तब्बल १८ किलो !!! ( मूठीमूठीने बदाम पिस्ते खाल्ल्यावर आणखी
काय होणार ? ) भारतातून नेलेले बहुतेक कपडे कुचकामी ठरले.

गेल्या ओमान भेटीत, हे घर मी परत पाहून आलो.

२) बिहाईंड नसीब प्लाझा, रुवी हाय स्ट्रीट, सल्तनत ऑफ ओमान., साल - १९९८-२००१

मुंबईमधे दादरचं जे महत्व आहे तेच मस्कतमधे रुवीचं. प्रत्यक्ष मस्कतला राजवाडा आहे पण ते अगदीच लहान गाव
असल्याने सगळी चहलपहल रुवीलाच असते. तर अश्या रुवीमधे माझे घर होते.

पहिल्या मजल्यावरचा १ बेडरुमचाच फ्लॅट पण ऐन मोक्याच्या ठिकाणचा. रुवी हाय स्ट्रीटच नव्हे तर मुख्य
बस स्टँड, तेव्हा नवीन सुरु झालेलं मल्टीप्लेक्स, देऊळ, ऑथोरिटी फॉर मार्केटींग अॅयग्रीकल्चरल प्रोड्यूस
या संस्थेचे भाजीपाल्याचे मोठे दुकान, "खाना खजाना" नावाचे भारतीय रेस्टॉरंट, भारतीय किराणा माल
विकणारी दुकानं सगळे घराच्या आजूबाजूला.

या काळात मी दिनेश पासून ( मित्रांचा ) दिनेशभाई झालो होतो. त्यामूळे अनेक मित्र गुरुवारी / शुक्रवारी माझ्या
घरी मुक्कामालाच असायचे. माझ्या हातच्या जेवणाचे आकर्षण वाटायचे त्यांना. काही जण तर अगदी
डोळ्यात पाणी आणून आईच्या हातच्या जेवणाची आठवण आली, असे सांगायचे.

मलाही त्यांच्यासाठी जेवण शिजवायलाच नव्हे तर त्यांच्या फर्माईशी पुर्ण करायला मनापासून आवडायचे.
आणि त्या बदल्यात ते मला हवं तिथे फिरवून आणत. शिवाय भांडीपण घासून टाकत.

त्या काळात मस्कत मधे केबल सुरु झाली होती, शिवाय सिडी / डिव्हीडीचा जमाना आला होता. माझ्या घरी
सोनीचा मोठा टिव्ही होता, त्यावरही सिनेमा बघायला मित्र येत असत.

या काळात मी मित्रमंडळीसोबत खुपदा लांबवर पिकनिक्स ना जात असे. त्यासाठी सर्व जण माझ्याच घरी जमत असत. सगळ्यासाठी जेवण मीच करून नेत असे.

ओमानमधे नैसर्गिक झर्याच्या पाण्यावर पूर्वापार शेती केली जाते. त्या काळात सरकारने त्या शेतमालाला
बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक संस्था काढली होती आणि तिचे दुकान माझ्याच घराजवळ होते.
अगदी ताज्या ताज्या चवदार भाज्या तिथे मिळत असत. आणि या काळापर्यंत मी बर्यापैकी पाककुशल
झालो होतो.

नव्या मल्टीप्लेक्स मूळे जवळजवळ दर गुरुवारी मी सिनेमा बघत असे. ( थिएटर ला जाऊन )
पण या काळातल्या सर्वात हृद्य आठवणी या क्लॅरिसच्या आहेत. माझा कलीग विल्सन डिकोस्टाची बायको
क्लॅरिस. ती भारतात बँकेत जॉब करत होती, पण सुट्टीत मुलींना घेऊन मस्कत ला येत असे.

क्लॅरिसचे व्यक्तीमत्व एवढे लोभसवाणे आहे कि ती आम्हा मित्रमंडळीत खुपच प्रिय होती. ती आली कि एकत्र
जेवणे, फिरणे यांना ऊत येत असे. अँजेला आणि अमांडा या तिच्या लेकी. त्या दोघींचा मी लाडका
दिनीअंकल. ऑफिसशिवाय जितका मोकळा वेळ मिळेल, तो मी त्या दोघींसोबत घालवत असे. त्यांच्या निरर्थक
गप्पा माझ्यासाठी खुपच महत्वाच्या होत्या. बालसुलभ मस्ती आणि हट्ट त्या करतच असत, पण क्लॅरिसचे
संस्कार असे होते, कि मी त्यांच्या घरातून निघालो कि दोघी गुडघ्यावर माझ्यासमोर बसून, दिनीअंकल ब्लेस मी,
म्हणत असत. त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवताना मला खुपच गहीवरुन येत असे. त्या परत जायला निघाल्या,
कि माझ्या गळ्याला मिठी मारून रडत असत.

पुढे भारतात आल्यावरही आमच्या नियमित भेटीगाठी होत होत्या. आता ते बंगरुलूला असतात. गेल्या
भारतभेटीत मी कुर्ग ला गेलो होतो, त्यावेळी तिच्याशी बोललो, पण त्याच दिवशी ती यू एस ला जात होती, म्हणून
प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.

या घरालापण मी गेल्या मस्कत वारीत भेट दिली.
माझा त्याच काळातला आणखी एक कलिग म्हणजे अँथनी हृदयराज... त्याच्याच आग्रहामूळे मी दुबईमधे
१ महिनाभर जाऊन राहिलो होतो.. ते माझे पुढचे घर.

३) करामा, दुबई, साल - २००१

मी मस्कत सोडले तेव्हा अँथनी दुबईमधे जॉब करत होता. त्या काळात मस्कत वासीयांना दुबईचे आकर्षण
असायचे. मस्कतहून मुंबईला थेट विमान असूनही, आम्ही मुद्दाम वाकडी वाट करून आधी दुबईला जाऊन
तिथून मुंबईला जाणारे विमान पकडत असू.

त्यावेळी दुबई खुपच स्वस्त होते, सध्यासारखे हायफाय झाले नव्हते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ओमानच्याच
व्हीसावर मला दुबईमधे ३० दिवस राहणे शक्य होते.
मी त्या काळातही सुट्टीत भटकायला स्वित्झर्लंड, सिंगापूर, थायलंड ला जातच असे, त्यामूळे अँथनीने दुबईमधे
राहण्याचा प्रस्ताव समोर ठेवल्यावर मी नाही म्हणू शकलो नाही.

महिनाभर हॉटेलमधे राहणे मला परवडणारे नव्हते म्हणून पी.जी. म्हणून राहण्याचा पर्याय निवडला. त्या काळात
खलीज टाईम्स मधे अशा अनेक जाहीराती येत असत. आणि तेव्हा फारसे असंतोषाचे वातावरण नसल्याने.,
अनेक कुटुंब असे पी.जी. घरी ठेवत असत.

अँथनीच्याच मदतीने मी करामा भागात एक घर शोधले आणि एका सिंधी कुटुंबात १ महिना राहिलो.
मला अर्थातच स्वतंत्र रुम होती आणि घराच्या मुख्य दरवाजाची चावी माझ्या कडे होती. त्यामूळे येण्याजाण्यावर
कुठलेच बंधन नव्हते.

त्या काळात मेट्रोचे बांधकाम सुरुही झाले नव्हते. सगळिकडे फिरण्यासाठी बसेस किंवा टॅक्सीज वापराव्या लागत.
पण तरीही ते स्वस्तच पडत असे.
तो एक महिना मी निरुद्देश भटकत राहिलो. दूबई सूकमधल्या सर्व गल्लीबोळातून भटकलो. माझे आणखीही
मित्र दुबईत होते. त्यांच्यासोबत शारजाह, अबू धाबीला पण जाऊन आलो. मॉल ओफ एमिरेट्स आणि दुबई मॉल सुरु होते, तिथेही जायचो. ( बुर्ज अल खलिफा तेव्हा नव्हती )

मी जिथे रहात होतो तिथे जेवण बनवायची सोय नव्हती ( किचनपासून इतका काळ लांब राहिल्याचा असा काळ,
माझ्या जीवनात दुसरा नाही ) पण खाली उतरल्याबरोबर अनेक भारतीय हॉटेल्स आणि दुकाने होती.
दुपारचा मात्र मी त्या घरीच झोपा काढायचो. खुपदा घरी आणखी कुणी आहे का, याचा पत्ताही लागत नसे.
बहुदा कुणी नसावेच. खलीज टाईम्स आणि गल्फ न्यूज वाचत मी दुपारभर लोळत असे.

त्याकाळात कोपर्‍या कोपर्‍यावर दुबईत मॉल्स होते. दिवसभर तिथे फारशी वर्दळही नसे, तिथेही जाऊन मी
बसत असे.
त्या सिंधी कुटुंबाशी माझा फारसा संपर्क नव्हता ( पैसे आधीच दिले होते ) त्यामूळे त्या घराच्या आठवणी म्हणजे
निव्वळ आराम अश्याच आहेत.
अँथनीशी पुढे बराच काळ संपर्क होता पण नंतर अचानक त्याचा संपर्क सुटला.
मी माझ्या बहुतेक दुबई भेटीत या घराला भेट देतो. आता तो रस्ता खुपच वर्दळीचा झाला आहे. जवळच मेट्रो स्टेशन आहे.
इंटरनेट / सायबर कॅफे हे त्याच काळात सुरु झाले. आणखी त्या घराची आठवण म्हणजे, मायबोलीचे सदस्यत्व मी
त्या काळातच घेतले होते.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे, आपल्या लेखांतून बरेच नवीन नवीन माहिती मिळते. पु भा प्र..

बरेच ठिकाणी त्या काळी, त्या काळातही असे लिहिलेय, पण लेखात कुठेही वर्ष दिलेले आढळले नाही, ते देता येईल का..

छान लिहिलंय.
अँथनीबद्दल मागेही कुठल्यातरी लेखात लिहिलं होतं का तुम्ही?
हरवलेला मित्र, व्यसनाधीन वगैरे.
वाचल्याचं आठवतंय.

मस्त झालाय हा भाग. प्रत्येक ठिकाणच्या आठवणींबरोबरच साल लिहिल्यामुळे आता थोडा त्या भागाचा भुगोल कसा बदलला हे समजायला पण मदत होईल.

चांगले लिहीलेय. मी मस्कत मध्ये ( सुलतान कब्बुस विद्यापीठात, २००४ साली ) राहिल्याने तुमच्या काही मुद्द्यांवर लिहीतो :

भारताबाहेरच नव्हे तर घरापासूनही दूर पहिल्यांदाच गेलो होतो. घरच्या आठवणींनी माझे व्याकूळ होणे,
या घरानी बघितले. >> अगदी, अगदी ! माझेही तसेच. एकटाच गेलो होतो. गेल्याच्या तिसर्‍याच दिवशी रात्री वाटले की आत्ताच्या आत्ता आपल्याला पंख हवेत आणि आपण उडत आपल्या पुण्यातल्या घरी कुटुंबीयांबरोबर असावे !!

त्याकाळात इंटरनेट नव्हते, घरी हवा तेव्हा फोन करावा अशीही सोय नव्हती >> इंटरनेट होते, स्थिरभाष वरून कार्ड वापरून फोन करायचो. नंतर आयुष्यातील पहिला मोबाइल तिथे घेतला ( माय डिअर नोकिया!). पण, तिथून भारतात फोन करणे उलटमार्गापेक्षा दुप्पट महाग ! मग शहाणा झालो. तिथून फक्त घरी रिंग देणे व सखीने भारतातून मला फोन करणे !

मस्कतमधली सार्वजनिक वाहतूक इतकी सुंदर होती >> माझ्यावेळेस मात्र बससेवा खास नाही पण, टॅक्सींचा सुळसुळाट. मीटर नाहीत, बोलीवर चालणार्‍या ( माझे पुणे कित्ती छान नाही?). अर्थात सहयोगी प्रवासाची सोय हे चांगले. बाकी आपले केरळी चालक बेकायदा खाजगी मोटार चालवून पोट भरणारे.....आपणही त्यांना मदत करणारे.

त्या काळात मस्कत शांत गाव होते >> माझ्यावेळेस नाही ब्वा ! गाड्या लै वाढलेल्या.....सिग्नलला ही गर्दी... पण शिस्त लय भारी. रातच्या बारालाबी लाल दिव्याला गाडी थांबणार.

त्या काळात केबल नव्हती >> डिश होती. ''फ्री'' वाले चॅनेल्स बघायचो. ते फ्रान्सवाले तर लै भारी ब्वा ! अन ''हवे ते'' दृश्य पडद्यावर हवा तितका वेळ स्थिर करून ठेवायची सोय !! मग एकटा जीव दुसरे काय करणार हो...

असो, तुमच्या लेखाने मस्त स्मरणरंजन झाले खरे... ते घर आता सोडले असले तरी त्याने मनात कायमचे घर केले आहे खरे !

मस्त लिहले आहे. वाचुन आठवणी ताज्या झाल्या. आम्ही पण दर आठवड्याला पत्र लिहित होतो. २० वर्षापुर्वी लिहलेली पत्रे वडलानी आजुनही सांभाळुन ठेवली आहेत. त्याकाळी फोन करायचा आधी काय बोलायचे ते कागदावर लिहुन मग २-३ मिनिटात बोलणे संपवावे लागायचे. एका मिनिटाला ७५ रुपये दर होता.
मुंबईत १ बेडरुम च्या फ्लॅट जॉइट फॅमिली मधुन ३ बेडरुम च्या घरात दोघेच गेल्यावर एवढे मोठे घर खायला उठायचे. एकटे पणाची जाणिव होत होती. नंतर सवय झाली.

मॉल ओफ एमिरेट्स आणि दुबई मॉल सुरु होते, तिथेही जायचो. ( बुर्ज अल खलिफा तेव्हा नव्हती )
>> in 2001?? There is something wrong. Mall of Emirates started in 2005 & Dubai Mall in 2008. I was in Dubai upto 2006 and I am sure about this as I was working on Fire fighting system for MOE.

आभार सर्वांचे...

मंदार, नावाच्या तपशीलात काही चूक असेल, पण तिथे मोठे मॉल्स नक्कीच होते.

Yes in 2001 Deira City Centre, Burjuman Centre, Lamcy Plaza, Wafi City etc were there in DXB. Photos are missing Happy

दिनेशदा, नेहमीप्रमाणे हा लेखही उत्तम लिहिला आहेत. पण त्याचबरोबर फोटोपण असते तर आणखी चांगले झाले असते.

छान लेख. दिनेशदा तुमच्या ओमान विषयीच्या लेखांमुळे तो देश इतका छान आहे म्हणून कळलं.
जायला नक्की आवडेल. भेट द्यायच्या जागांच्या लिस्ट मध्ये अ‍ॅड केला आहे.