कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .

Submitted by स्वीट टॉकर on 6 December, 2016 - 02:08

एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली.

उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं.

मी देवळात जाणारा नव्हे. म्हणजे नास्तिक वगैरे अजिबात नाही. माझ्या मते देवत्व ही एक एकमेवाद्वितीय शक्ती आहे. तिला अनुभवण्यासाठी आपण आपल्या देवघरातल्या देवासमोर जसं शांतपणे ध्यान करू शकतो तसं बाहेर कधीच करता येत नाही. ज्याला घरची मूर्ती मनःशांती देते त्याला मंदिरातील मूर्तींची जरूर पडत नाही आणि ज्याला घरची मूर्ती पुरेशी वाटत नाही त्याला जगातल्या सगळी देवळं कमीच पडतात.

मात्र कित्येक मंदिरांत अप्रतिम कोरीव काम आणि वास्तुशास्त्र (architecture) असतं ते बघायला जरूर जावंच.

इतकं प्रसिद्ध देऊळ शहरात, हातात भरपूर वेळ आणि आग्रह करायला मॅनेजर. आम्ही जायचं ठरवलं. कलकत्त्याच्या काळ्या पिवळ्या ऍम्बॅसेडर टॅक्स्या. त्यांचा मीटर दिखाव्यापुरताच. दर वेळेला हुज्जत घालण्याशिवाय पर्याय नाही. जाऊन, दर्शन होईपर्यंत थांबून परत येण्यापर्यंतचे पैसे शीख ड्रायव्हरबरोबर ठरवून निघालो.

टॅक्सीतून उतरल्याबरोब्बर तिथल्या पंड्यांनी आम्हाला गराडा घातला. आमच्या नशिबानी तो कुठलाही खास पूजेचा दिवस नसल्यामुळे गर्दी नव्हती. आम्ही कोणाशीही न बोलता देवळाकडे चालत राहिलो. हळुहळु एक एक जण गळत गळत गेला. आम्ही चपलांच्या स्टॅन्डपर्यंत पोहोचलो तोपर्यंत आमच्या बरोबर एकच पंडा उरला होता. त्याला मी “काय पैसे घेणार” म्हणून विचारलं.

“साहबजी, भगवानके दर्शनकी कोई कीमत होती है क्या?”

“मुझे दर्शनके साथ साथ इस मंदिरका इतिहास, उसकी बनावट और उससे जुडी कहानियोंमे दिलचस्पी है। वो भी बताओगे?”

“हां हां, क्यों नही!”

मी पैसे ठरविल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकायला नको होतं. मात्र गर्दी नव्हती, buyer’s market होतं. त्यामुळे मी ही तितका सावधपणा दाखवला नाही.

पंधरा मिनिटातच कार्यक्रम आटोपला. मंदिराची माहिती देणार होतात त्याची आठवण करून दिल्यावर “ये जागृत मंदिर है। यहांपर मांगी हुई हर मन्नत पूरी हो जाती है”। वगैरे अर्थहीन वाक्यं टाकून त्यानी आमची बोळवण केली. काय पैसे द्यायचे म्हणून मी त्याला विचारल्यावर त्यानी त्याच्या कार्यक्षमतेमुळेच आम्हाला मिळालेल्या सुंदर आणि निवांत दर्शनाची कॅसेट वाजवली आणि रकमेचा आकडा माझ्यावरच सोडला.

माझ्यातल्या कोकणस्थानी शंभर भरपूर झाले असं ठरवलं. मग माझ्यातला मरीन इंजिनियर जागा झाला आणि त्यानी शंभरचे दोनशे केले.

खिशातून शंभराच्या दोन नोटा (आजचे दोनशे नव्हे. एकोणनव्वद सालचे!) काढलेल्या बघून पंड्यानी आंबट चेहरा केला. पैसे घेतले आणि “ये क्या?” अशा अर्थाची रेकॉर्ड लावली.

हे काही प्रमाणात अपेक्षितच होतं. मी देखील “हे वाजवीपेक्षा जास्तच आहेत” वगैरे अशा वेळेला आपण सगळेच जी रेकॉर्ड डीफॉल्टनी वाजवतो ती वाजवत परतीच्या मार्गाला लागलो तर त्यानी माझी वाट अडवली.

“मी तुला आधीच विचारलं होतं तेव्हां तू आकडा माझ्यावरच का सोडलास?” वगैरे वादविवाद झाले. मात्र तो काही वाट सोडे ना!

“आप ऐसे नही जा सकते”। आता त्याचा स्वर देखील बदलला!

“देखता हूं कौन रोकता है” असं म्हणत मी त्याला वळसा घालून जायला लागलो. माझ्या हातात पुनव होती. बंगाली भाषेत काहीतरी बोलत त्यानी पुनवला दंडाला धरून खस्कन् ओढलं!

माझं डोकं सटकलं बिटकलं नाही कारण तो माझा पिंड नाही. मात्र इंजिनियरिंगला असताना घेतलेले स्वसंरक्षणाचे (आणि मित्रांबरोबर चिकार प्रॅक्टिस केलेले पण प्रत्यक्ष आयुष्यात त्यानंतर कधीही न वापरलेले) धडे वापरण्याची वेळ आली होती.

मुलीच्या संरक्षणासाठी मी तिला तरी दूर ओढीन किंवा त्याचा हात दूर ढकलीन हेच अपेक्षित होतं. मात्र स्वसंरक्षणाच्या फिलॉसॉफीप्रमाणे तुमची पहिली चाल पूर्णपणे अनपेक्षित असली पाहिजे. मी एक पाऊल चटकन् पुढे टाकलं आणि दोघही पंड्याच्या अंगावरच रेललो. तो गडबडला आणि तोल सांभाळायला मागे सरकला.

मला उत्तम संधी दिसली. गुप्तांगावर लाथ मारायची असली की ती फुटबॉलला मारतात तशी दातओठ खाऊन मारायची नसते. एक तर त्याकरता पाय मागे घेऊन स्टार्ट घ्यावा लागतो ज्यामुळे समोरच्याला पूर्वसूचना मिळून ती चुकवायची संधी मिळते. शिवाय अशी लाथ मारताना मारणार्याचा तोल जाण्याची शक्यता असते. लाथ चुकली तर हमखास जातोच.

कुठलाही स्टार्ट न घेता ही लाथ दोन halves मध्ये मारायची असते. जणु गुढग्यानीच लाथ मारतोय अशा वेगानी गुढगा उचलायचा आणि मांडीचं हाड horizontal झालं की सर्व ताकदीनिशी फक्त पावलानी लाथ मारायची.

सगळी थियरी लिहायला आणि वाचायला वेळ लागतो खरा, पण प्रॅक्टिकल क्षणार्धातच संपलं!

परफेक्ट घाव बसल्याचा आवाज आला. त्याच्या हातातलं सामान खळ्ळकन् जमिनीवर पडलं अन् मागोमाग तो देखील. त्याला उलटीचे कोरडे रेच यायला लागले.

मी स्वतःला शांत डोक्याचा समजतो पण दर खेपेला माझ्या आधी स्वीट टॉकरीणबाईच सावरते. आता काय होणार याचा तिला अंदाज आला. तिनी पुनवला माझ्या हातातून घेतलं अन् म्हणाली, “तू नीघ.”

मी झपाझप चालत टॅक्सी स्टॅन्डकडे निघालो. अर्ध्या मिनिटातच “भागो मत, ठहरो!” अशा आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. मी मागे वळून बघितलं तर आठ दहा पंड्यांचं टोळकं माझ्या दिशेनी येत होतं. बहुतेक जण वयानी माझ्याहून मोठे, त्यांची पोटं देखील. मी सहज पळून जाऊ शकलो असतो. मात्र मग ते स्वीट टॉकरीणबाई आणि पुनव कडे वळण्याची शक्यता होती.

मोठ्या देवळांबाहेर एक पोलीस चौकी नेहमी असतेच. अर्धवट चालत, अर्धवट पळत मी तिच्या शोधात निघालो. मागे टोळकं. टॅक्सी स्टॅन्डजवळ पोहोचलो तर काही टॅक्सी ड्रायव्हर्स घोळक्यात उभे होते. त्यांना पोलीस चौकी कुठे आहे म्हणून विचारलं. त्यांनी बोटानी दाखवलं. दूर नव्हती. हायसं वाटून मी तिथे गेलो तर चौकीला कुलूप! “पोलीस, पोलीस” असं ओरडंत पुन्हा पळालो. थोड्या वेळात लक्षात आलं की ते टोळकं माझ्या मागावर दिसंत नाहिये. हायसं वाटून लपत छपत टॅक्सी स्टॅन्डकडे परत आलो आणि जे दृष्य बघितलं त्यानी पोटात गच्कन् गोळाच आला!

पुनवला छातीशी कवटाळून स्वीट टॉकरीणबाई टॅक्सीच्या आत बसली होती! टॅक्सीच्या बॉनेटवर आणि काचेवर पंडे थपडा मारत होते आणि शिव्या देत होते! टॅक्सी ड्रायव्हर पंड्यांना शांत करण्याचा प्रयत्न करंत होता.

आता पोलिसांना शोधण्यात वेळ घालवणं शक्य नव्हतं. मी सरळ टॅक्सीकडे गेलो. मला पाहिल्याबरोबर मोर्चा माझ्याकडे वळला. समोरून दोघा जणांनी माझे हात धरले. एक जण मागून आला आणि त्यानी एकाच वेळेस माझ्या दोन्ही खिशांत हात घातले आणि क्षणार्धात दोन्ही खिसे रिकामे झाले! पाकीट, पेन, रुमाल, सगळं गुल! (अशा प्रकारची पाकीटमारी दक्षिण अमेरिकेत चिकार चालते. मात्र दुसर्या कुणीकडे दिसत नाही.) मी ओरडलो!

पुढच्यांनी मला जोरात मागे ढकललं. बहुदा मागच्यानी पायात पाय घातला असावा कारण मी पाठीवर पडलो. दुसर्याच क्षणी माझ्या उजव्या खांद्यावर सणसणीत लाथ बसली! मी डोक्यामागे बोटं एकमेकात अडकवून चेहर्याला आणि डोक्याला दोन्ही बाजूंनी मनगटांनी प्रोटेक्शन दिलं, गुढगे छातीपाशी घेऊन मुटकुळं केलं आणि कुशीवर वळलो. पुढच्या दहा सेकंदात पंधरा वीस लाथा पोटात, बरगड्यांवर आणि पाठीवर बसल्या!

वयाच्या सतराव्या वर्षापासून मी सेफ्टी शूज वापरले होते. त्यांच्या चवड्यांना स्टीलची वाटी असते. भंकस भंकसमध्ये मित्रांनी आणि मित्रांना मारलेल्या लाथांचा वेदनानुभव गाठीशी होता. त्यामुळे आता मरणाच्या वेदना आणि इजा होणार अशी माझी खात्री होती. पण पंडे अनवाणी होते. अपेक्षेपेक्षा खूपच कमी दुखलं! (नंतर लक्षात आलं की adrinalin मुळे तेव्हां दुखलं नाही. नंतर सगळं उट्ट निघालं!)

जितक्या अचानक लाथा सुरू झाल्या होत्या तितक्याच अचानक थांबल्या. सगळे मला शिव्या देत निघून गेले. पण आयाबहिणींच्या नाही. मला वाईट मरण येणार, आमच्या सार्या कुटुंबाचा सर्वनाश होणार, मी नरकात जाणार वगैरे शाप टाइपच्या शिव्या.

सबंद मारामारीला फक्त तीस सेकंद लागले होते. मारामारी कसली? फक्त मारी. मी मारायला हात देखील उगारू शकलो नव्हतो.

माझा चष्मा फुटला होता, मुका मार लागला होता, पैसे चोरीला गेले होते, कपड्यांची वाट लागली होती. पण मुख्य म्हणजे पुनव आणि स्वीट टॉकरीणबाई सुरक्षित होत्या.

टॅक्सीवाल्यांनी मला उभं केलं आणि पाणी दिलं. आता इथे आणखी थांबण्यात शहाणपणा नव्हता. लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला जाणं इष्ट होतं.

मात्र आता कोणीच आम्हाला पोलीस स्टेशनला न्यायला तयार होईना. (मंदिरमे फॉर्वर्ड युनियन है, साहब। हमे उठानेमे उनको पाच मिनिटभी नही लगेंगे।) पश्चिम बंगालमधल्या इन्डस्ट्रीची वाट लावण्यात या 'फॉर्वर्ड' यूनियनचा सिंहाचा वाटा आहे. या युनियनचा मला आणि बोटीवरच्या सगळ्या लोकांना चांगलाच (म्हणजे वाईट) अनुभव होता. भलताच दरारा. आक्रमक आणि अतिरेकी. भारतीय बोटी जेव्हां जगाची चक्कर मारून परत भारतात येत तेव्हां कित्येक खलाशांची सुट्टीची वेळ झालेली असे. त्यांना उतरवून नवे खलाशी घेतले जात. ते जर या यूनियनचे सभासद असले तर कामाची वाट लागत असे. बोट बंदरात नेणं हे खर्चिक काम असतं. तरी देखील फक्त खलाशी बदलण्यासाठी कंपन्या बोटी मद्रासला नेत, तिथे नवे खलाशी घेत आणि मगच बोट कलकत्त्याला आणंत.

नवखं शहर, दुसर्या दिवशी बोटीवर रुजू होणं महत्वाचं, पंडे फॉर्वर्ड युनियनचे सभासद आणि पहिली लाथ मीच मारलेली. या सर्वाचा विचार करता पोलीस स्टेशनचा विचार सोडून गेस्ट हाऊसचा रस्ता धरला.

झालेल्या आरडाओरड्यामुळे पुनवनी भोकाड पसरलेलं, टॅक्सी ड्रायव्हर काहीतरी अखंड बोलत होता जे बाहेरच्या आवाजामुळे मला कळंत नव्हतं, भयानक उकाडा आणि ट्रॅफिक, आतापर्यंत माझं शरीरही ठणकायला लागलं होतं, आणि झाल्या प्रकाराचा मनस्ताप! डोकं लागलं भणभणायला!

फार वर्षांपूर्वी मी आणि स्वीट टॉकरीणबाईंनी एक गोष्ट ठरवली आहे आणि आम्हाला त्याचा कित्येकदा फार उपयोग झाला आहे. ती म्हणजे, ‘जर कुठल्याही परिस्थितीचा खूप त्रास व्हायला लागला तर मोठमोठ्यानी हसायचं!’ पहिलं मिनिट बळेबळेच हसावं लागतं. मग एकमेकाचं बघून खरोखरच हसायला येतं.

यानी समस्या काही आपोआप सुटत नाही. ती आपल्यालाच सोडवायची असते. मात्र मळभ दूर होतं आणि उत्तर सोपं वाटायला लागतं.

आम्ही दोघं खदाखदा हसायला लागलो. पुनव रडायची थांबली. ड्रायव्हरला काही कळेना. तोही गप्प झाला. आरशात आमच्याकडे बघून तो देखील हसायला लागला. थोड्या वेळानी आम्ही हसायचे थांबलो.

“साहब, आप दोनो इतने हँस रहे हो, आपने जानबूझके लफडा किया क्या?”

“नही नही,” असं म्हणून त्याला संकटकाळी हसण्याचा कानमंत्र मी देणार इतक्यात हिनी मला थांबवलं. भंकस करण्याची हिला कुठे आणि कधी हुक्की येईल काही सांगता येत नाही. त्याला म्हणाली, “सिंगसाब, अभी प्रॉब्लेम खतम कहाँ हुआ है? हम दोनो ये सोचके हँस रहे थे की थोडीही देरमें हम गेस्ट हाऊस पहुंच जाएंगे। आपको देने के लिये हमारे पास एक भी पैसा नही है, ये जब आपको मालूम होगा तब क्या होगा!”

एका क्षणाचाही विलंब न करता तो उत्तरला, “होना क्या है बहनजी, आज आपने जो सहा है वो देखनेके बाद सिर्फ हैवान ही आपसे पैसे मांग सकता है। मेरे पास पांचसो के आसपास रुपये हैं। वो आपके आगे के प्रवासके लिये रख लीजिये”।

मी आणि स्वीट टॉकरीणबाईनी एकमेकाकडे आश्चर्यानी पाहिलं. स्वीट टॉकरीणबाई अभंगाची ओळ गुणगुणली, “कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी?”

मला आठवलं की लहान असताना माझ्या आईनी मला आणि बहिणीला सांगितलं होतं, “जर कधी तुम्ही हरवलात किंवा दुसर्या कुठल्या संकटात सापडलात आणि सगळेच अनोळखी असतील तर मदत शीख मनुष्याकडे मागा.”

प्रवासी आयुष्यामुळे पैसे आणि कागदपत्र नेहमीच दोन ठिकाणी विभागून ठेवायची सवय मला होती. त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हता. मी ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, “उसकी जरूरत नही होगी। वो मजाक कर रही थी। मगर एक बात मैं जरूर कहूंगा। आपके विचार बहुतही बडे हैं”।

त्याला आग्रहानी आमच्या गेस्ट हाऊसमध्ये जेवायला घातलं.
निघताना म्हणाला, “जय राम जी की”.
मी उत्तर दिलं “सत् स्री अकाल”.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थरारक अनुभव . तुम्ही इतक्या ओघवत्या शैलीत मांडलाय की एखादा सिनेमाच पाहतोय असं वाटलं . बाकी ते पंडे वगैरे मुळे गर्दीच्या देवळात पाऊल न ठेवायचा माझा निश्चय अधिकच दृढ झालाय.

छान लिहिला आहात अनुभव आणि इतकं होऊनही शांत डोक्याने लिहिलाही आहेत.
>>ज्याला घरची मूर्ती मनःशांती देते त्याला मंदिरातील मूर्तींची जरूर पडत नाही आणि ज्याला घरची मूर्ती पुरेशी वाटत नाही त्याला जगातल्या सगळी देवळं कमीच पडतात.>> हे बेस्ट आहे. पण सगळ्यांनीच असं म्हटलं तर पुजार्‍यांचा धंदा बसेल त्याचं काय? Wink

थरारक अनुभव !
हे काली मंदिर म्हणजे दक्षिणेश्वरला रामकृष्ण ज्या मंदिरात पुजारी होते तेच का ?

<मी देवळात जाणारा नव्हे. म्हणजे नास्तिक वगैरे अजिबात नाही. माझ्या मते देवत्व ही एक एकमेवाद्वितीय शक्ती आहे. तिला अनुभवण्यासाठी आपण आपल्या देवघरातल्या देवासमोर जसं शांतपणे ध्यान करू शकतो तसं बाहेर कधीच करता येत नाही. ज्याला घरची मूर्ती मनःशांती देते त्याला मंदिरातील मूर्तींची जरूर पडत नाही आणि ज्याला घरची मूर्ती पुरेशी वाटत नाही त्याला जगातल्या सगळी देवळं कमीच पडतात. > हे पटले. खरंतर तीर्थस्थानात बर्‍याच वर्षे संतांनी केलेल्या साधनेमुळे एक सकारात्मक उर्जा असते. सात्विक भाव मनात येतात जसे आळंदीला व्हायचे. पण सध्याच्या गर्दी, अस्वचछतेमुळे मंदिराना ओंगळ स्वरूप प्राप्त झाले आहे.

भयानक अनुभव! नशिब तिघं सहीसलामत सुटलात!!!

कठीण प्रसंगी खदखदा हसण्याचा उपाय योजून बघितला पाहिजे!!!

@ पारू - बहुदा तेच असावं पण नक्की माहीत नाही. ते हुगळी नदीच्या काठावर होतं असा उल्लेख मला वाचलेला आठवतोय. हे देखील नदीकिनारी होतं.

@रायगड - हास्यक्लबचाच जास्त प्रॅक्टिकल अवतार!

स्वतःला अर्धवट माहिती असताना मतप्रदर्शन करू नये (अर्थात असं म्हणलं तर या शेवटच्या वाक्यार्धामुळे निम्म्याच्या वर माबोवरील प्रतिक्रिया आणि लिखाण धडाधड गारद होईल म्हणा )>> +101

काली मंदिर म्हणजे दक्षिणेश्वरला रामकृष्ण ज्या मंदिरात पुजारी होते तेच का ? >>> ते दक्षिणेश्वर काली मंदिर जे राणी रासमणी नी स्थापन केले.. हे आहे ते बहुदा काली घाट असावे जे देवीच शक्तीपीठ आहे

बापरे! डेंजर अनुभव आहे.
काका तुमची लिहिण्याची सहजता नेहमीच खूप आवडते.
बाकी देवळातील पंड्यांची फॉरवर्ड ब्लॉक युनियन हे वाचून गंमत वाटली!

फॉर्वर्ड ब्लॉक वगैरे म्हणजे शेवटी "लाले लोकच" ना? हे महा डेंजर लोक, एरवी "धर्मदेव बिव झूठ म्हणणार, धंदा मात्र देवळात जाऊन पंडेगिरीचा करणार..>>>
लिंब्या, गांधीबाबाला शिव्या देत ज्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता त्या सुभाषचंद्र बोस यानी स्थापन केलेला पक्ष आहे तो... लाले बिले आहेत का काय तुच सांग

Pages