सोबतीची खुमखुमी जिरली असावी

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 December, 2016 - 12:46

कल्पनेची वीज लखलखली असावी
जीवघेणी ओळ अवतरली असावी

कळकले आयुष्य हिरवट झाक आली
दे नवी कल्हई जुनी विरली असावी

सांजवेळी रक्तिमा पसरे नभावर
आठवांची काढली खपली असावी

वाट एकाकी निघाली निग्रहाने
सोबतीची खुमखुमी जिरली असावी

हुंदके देते कधी रडते मुक्याने
भूल आभाळासही पडली असावी

धावते नाते अचानक ठप्प झाले
चेक कर व्हॅलिड़ीटि सरली असावी

झाड तर होते तिथे निश्चल उभे हे
वादळाने वेल उन्मळली असावी

वेळच्यावेळी स्वतःची काळजी घे
मौज घे जिथवर सहल ठरली असावी

चक्क हातोहात विकली सर्व मुल्ये
पुर्वजांनी का बरे जपली असावी ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users