लैंगिक समानतेच्या सूचीत भारत ८७ वाह !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 December, 2016 - 04:06

म्हटले तर नेहमीचाच धागा वाटू शकतो. पण काही आकडे घेऊन आलो आहे. लैंगिक समानतेबाबत जगाच्या नकाशावर आपण नेमके कुठे उभे आहोत हे (देखील) यातून समजेल.

बातमीची लिंक - http://www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=16548357[03:07, 31/10/2016]

तसेच सदर रिपोर्ट तुम्ही थेट ईथून डाऊनलोड करू शकता - https://www.weforum.org/reports/the-global-gender-gap-report-2016

हायलाईट्स मी खाली देतो,

एकूण १४४ देशांची ही सूची आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही सूची तयार केली आहे.

ज्या चार बाबींमध्ये किंवा क्षेत्रात हे स्त्री-पुरुष समानतेचे निकष लावले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत,

१) ECONOMIC PARTICIPATION AND OPPORTUNITY
२) EDUCATIONAL ATTAINMENT
३) HEALTH AND SURVIVAL
४) POLITICAL EMPOWERMENT

तर, या लैंगिक समानतेच्या सूचीत भारताने १४४ देशांमधून ८७ वे स्थान मिळवले आहे.
भारताने गतवर्षीच्या तुलनेत २१ स्थानांनी प्रगती करत पहिल्या १०० देशांमध्ये स्थान मिळवले आहे.
जर वरच्या ४ बाबींची वेगवेगळी क्रमवारी लावली तर ४) POLITICAL EMPOWERMENT यामध्ये आपण सरस म्हणजे ९ व्या स्थानावर आहोत.
पण ईतर तीन क्षेत्रांत अनुक्रमे १३६, ११३, १४२ म्हणजेच जवळपास तळाला आहोत.

या सूचीत आइसलँडने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ फिनलंड, नॉर्वे आणि स्वीडन असा क्रम आहे.
मागे मी एक हॅपीनेस ईंडेक्सचा धागा काढलेला. त्यात देखील हेच देश आघाडीवर होते. याचा अर्थ हॅपीनेस ईंडेक्स आणि लैंगिक समानता यांचा आपसात काहीतरी संबंध असावा असे बोलण्यास वाव आहे.

अश्या एखाद्या सूचीत पाकिस्तान कुठे आहे याची एक भारतीय म्हणून आपल्याला नेहमीच उत्सुकता राहते. ईथे पाकिस्तान आपल्या अपेक्षांना जागतो. या सूचीत पाकिस्तान शेवटून दुसर्‍या म्हणजेच १४३ व्या स्थानावर आहे. एक येमेन नामक देशच काय तो त्यांच्या मागे आहे. त्याचसोबत सौदी अरेबिया १४१, ईराण १३९, ओमान १३३, कुवैत १२८, यूएई १२४ आणि कतार ११९ या नाव आणि नंबरांबद्दलही आश्चर्य वाटले नाही.

लैंगिक समानतेच्या बाबतीत दक्षिण आशियाई देशांमध्ये बांगलादेशने बाजी मारली आहे. बांगलादेशने या सूचीत भारताला मागे टाकत ७२ वे स्थान पटकावले आहे. याचे अगदीच आश्चर्य वाटले नाही. कारण क्रिकेट ट्वेंटी-२० विश्वचषकादरम्यान तेथील प्रेक्षकांमध्ये महिलांचा वावर पुरेसा बोलका होता.

जागतिक सूचीत ८७ व्या स्थानी असलेल्या भारताला दक्षिण आशियाई देशांमध्ये दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यापाठोपाठ श्रीलंका १०० व्या, नेपाळ ११० व्या, मालदीव ११५ व्या आणि भूतान १२१ व्या स्थानी आहेत.
एकूणच दक्षिण आशियाई देशांमध्ये फार काही उत्साहवर्धक वातावरण नाहीये. आपल्या सर्वांना मिळून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे.

व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणारा आणि सर्वांना समान संधी देणारा देश म्हणून मी आजवर अमेरीकेला बघायचो. तो या यादीत अगदी पहिल्या दहात नसला तरी टॉप ट्वेंटीमध्ये तरी असेल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तो ४५ व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात ट्रम्प कुठे नेतील हे बघणे रोचक राहील. बहुतेकांचा अंदाज आणखी मागे घेऊन जातील असाच असेल.

रशियाला आपण अमेरीकेसारखेच महासत्ता म्हणून बघतो. पण ते देखील ईथे ७५ व्या क्रमांकावर आहेत.

तसेच चिनी मालाचे आणि तेथील लोकांच्या चिकाटी वृत्तीचे कितीही कौतुक करा, पण जेव्हा स्त्रियांना समान वागणूक द्यायची वेळ येते तेव्हा ते आपल्याही मागे ९९ व्या क्रमांकावर राहतात हे आश्चर्यजनक.
एक जपानचेही आणि तिथल्या तंत्रज्ञानाचेही आपल्याला असेच कौतुक असते. ते देखील १११ व्या क्रमांकावर आहेत.

तर याउलट वर्णभेदासाठी एके काळी बदनाम असलेली दक्षिण आफ्रिका मात्र या लैंगिक समानतेत १५ व्या क्रमांकावर आहे.

ज्या फ्रेंच आणि ब्रिटीशांनी आपल्यावर दिडशे वर्ष राज्य केले आणि त्यासोबत आपल्याकडे सामाजिक सुधारणा घडवल्या ते स्वत: (फ्रान्स आणि ईंग्लंड) अनुक्रमे १७ व्या आणि २० व्या क्रमांकावर आहेत.

अश्या एखाद्या सूचीत ईतर देशांशी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. उद्या आपल्याकडची परिस्थिती अजून सुधारली आणि तसेच ईतरांचीही सुधारली तरी आपला नंबर तोच राहील, पण यात आपण स्वत:शी तुलना करता गेल्यावर्षी पेक्षा पुढेच असू. हेच उलटही म्हणता येईल. पण तरीही स्त्री-पुरुष समानतेबाबत जगात आज आपण कुठे उभे आहोत हे तरी यातून समजले. तसेच कुठल्या बाबींत अजून प्रगतीची गरज आहे हे देखील जाणून घेता आले. त्याच बरोबर भारतात राहून काही देशांबद्दल जे समज गैरसमज पाळले होते ते देखील यातून खरे खोटे झाले.

मायबोलीकर जनता विविध देशांत वास्तव्य करून आहेत, ते त्यांच्या देशातील परीस्थिती या सूचीशी ताडून बघू शकतात, आणि ईच्छा असल्यास आपले अनुभव शेअर करू शकता. पण जर असे पब्लिक फोरमवर काही लिहिणे रिस्की असेल तर नाही लिहीले तरी चालेल.

डिटेल रिपोर्ट पीडीएफ फॉर्मेटमध्ये मी त्यांच्या साईटवरून डाऊनलोड केला आहे. त्याचा अभ्यास करून आणखी भर नंतर टाकतो. ईंग्लिशमध्ये असल्याने जरा अवघडच आहे मला.
त्यामुळे तुर्तास ईतकेच,
ऋन्मेष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेल्थ अँड सर्व्हाव्हायवलमध्ये १४२/१४४वा क्रमांक? अरेरे.
इकॉनॉमिक पार्टिसिपेशनही १३६. आणि आशियात आपण
पहिला देश कोणता? युरोपातला असेल .
जपान चीनही मागे? आशियात पहिला कोण?

आपला देश समानतेच्या बाबतीत सुधारत आहे,वाचून छान वाटले.सर्वांनी जुनी विचारसरणी सोडून वागले तर नक्कीच पुढील सर्वे होईल तेव्हा भारत टॉप २० मध्ये असेल अशी अपेक्षा करू.....
ऋन्मेष सर तुमचे सर्वच लेख खूप छान असतात,हाही लेख आवडला...
पु.ले.शु.

>>>>जर वरच्या ४ बाबींची वेगवेगळी क्रमवारी लावली तर ४) POLITICAL EMPOWERMENT यामध्ये आपण सरस म्हणजे ९ व्या स्थानावर आहोत.
पण ईतर तीन क्षेत्रांत अनुक्रमे १३६, ११३, १४२ म्हणजेच जवळपास तळाला आहोत.<<<<

धक्कादायक व दुर्दैवी!

अव्वल स्थानांवर असलेल्या देशांची नांवे पाहून एक गोष्ट चटकन् मनात आली, ती म्हणजे त्या देशांची फारच कमी असलेली लोकसंख्या!

थोडक्यात काय तर 'सारे जहांसे अच्छा' व तत्सम हजारो प्रकारच्या स्तुतीपर उक्ती ठार थापा सिद्ध झालेल्या आहेत. एकीकडे लोकसंख्या वाढत आहेच, दुसरीकडे ह्या तीन निकषांवर लैंगीक समानतेबाबत काहीही ठोस केले जात नसावे असे वाटायला वाव आहे.

भगवानके भरोसे देश आहे आपला!

(धागा आवडला)

कित्येक वर्षांपूर्वी माझ्या बँकेने TOI ला १० एक लाख रुपये दिले होते. बँकेने ते advertising expenses म्हणून डेबिट केले होते . काही दिवसांनी पेपर मध्ये बँकेचे गोडवे गाणारी बातमी होती, इकॉनॉमिक्स न्यूज पानावर. ह्याचा अर्थ बाकीच्या बँका वाईट होत्या का आमची बँक खूप ग्रेट होती. ती बातमी म्हणून छापलेली बातमी तरी होती का?

फारसे आश्चर्य वाटले नाही.

भारताने गतवर्षीच्या तुलनेत २१ स्थानांनी प्रगती करत पहिल्या १०० देशांमध्ये स्थान मिळवले आहे. >>> गेल्या वर्षभरात तब्बल २१ स्थानांनी प्रगती करण्यासारखा कोणता बदल घडला आहे आणि त्याचबरोबर आपण प्रगती केली की २१ देशांनी अधोगती केली हे जाणून घ्यायला नक्की आवडेल!!!

फारसे आश्चर्य वाटले नाही.त्याचबरोबर आपण प्रगती केली की २१ देशांनी अधोगती केली हे जाणून घ्यायला नक्की आवडेल!!! ------इतका न्यूनगंड आणि नकारात्मकता असेल देशवासीयांच्या मनात तर कसा देश पुढे जाणार! असो. ज्याचं त्याच्यापाशी.

न्यूनगंड आणि नकारात्मकता? नकारात्मकता नाहीये ही राजसी आणि न्यूनगंड तर त्याहून नाही. फक्त हे जाणून घ्यायचए आहे की "गेल्या वर्षभरात तब्बल २१ स्थानांनी प्रगती करण्यासारखा कोणता बदल घडला आहे???" मला माहित नसल्यास कृपा करून कोणीतरी सांगा!!

गेल्या वर्षभरात तब्बल २१ स्थानांनी प्रगती करण्यासारखा कोणता बदल घडला आहे
>>>
या प्रश्नाचे उत्तर थोडेफार मी देखील शोधत आहे. म्हणून लेखातही म्हटलेय की ईतरांची अधोगती किंवा प्रगतीचा आपल्यापेक्षा कमी वेगही आपल्याला पुढे नेऊ शकते. त्यामुळे सध्या एक्झॅक्ट नंबरपेक्षा रेंज वर कॉन्सट्रेट करत आहे.

एक मला त्यात सापडले की गेल्या काही वर्षांत प्राथमिक शिक्षणाबाबत लैंगिक समानतेत आपण प्रगती केली आहे. त्या वयोगटातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण जे आधी कमी होते ते वाढले आहे.

Iceland ची लोकसंख्या बघा आपली बघा! लोकसंख्येची घनता बघा! आणि dropdownमध्ये select करताना चूक केलेली असू शकते. India करायचं चुकून Iceland झालेलं असू शकतं, आपण एकमेकांच्या वरखालीच आहोत . लोक anyway विश्वास ठेवणारच, भारतीय सुद्धा -----फारसे आश्चर्य वाटले नाही........

Iceland ची लोकसंख्या बघा आपली बघा! लोकसंख्येची घनता बघा! आणि dropdownमध्ये select करताना चूक केलेली असू शकते. India करायचं चुकून Iceland झालेलं असू शकतं, आपण एकमेकांच्या वरखालीच आहोत . लोक anyway विश्वास ठेवणारच, भारतीय सुद्धा -----फारसे आश्चर्य वाटले नाही........>>

काय भन्नाट लॉजिक आहे.
सुडोमि!

परत नावावरून जायचं तर Icelandमध्ये ice असणार (गेस मारते आहे कृपया भूगोलाचे पुस्तक उघडायला सांगू नका) ; काय सांगा कधी बर्फीला तूफान आला आणि शेकोटी, चिमणी, काडेपेटी काहीच नसेल / काम करत नसेल तर ... कोणी कोणाशी बाई-बुवा असा पंगा न घेता गुण्यागोविंदाने राहत असतील, assuming Iceland is really #१ Happy

म्हणून लेखातही म्हटलेय की ईतरांची अधोगती किंवा प्रगतीचा आपल्यापेक्षा कमी वेगही आपल्याला पुढे नेऊ शकते.>>>> म्हणूनच विचारले की आपण प्रगती करतो आहे की इतर देश अधोगती (हळू वेगाने प्रगती) करत आहेत. कोणताही देश अधोगती करत असेल तर एक स्त्री म्हणून मला वाईटच वाटेल.

गेल्या काही वर्षांत प्राथमिक शिक्षणाबाबत लैंगिक समानतेत आपण प्रगती केली आहे.>>> असा काहीतरी ठोस डेटा आहे की नाही हे पहायचे होते.

More than a decade of data has revealed that progress is still too slow for realizing the full potential of one half of humanity within our lifetimes.>>>> ऋन्मेषनी दिलेल्या लिंक वरचे हे वाक्य खूप आवडले

{{{ गेल्या वर्षभरात तब्बल २१ स्थानांनी प्रगती करण्यासारखा कोणता बदल घडला आहे? }}}

त्याचं कायेना की स्त्रियांकडून पुरुषांचा विनयभंग होण्याच्या घटनांत वाढ होतेय त्यामुळे लैंगिक समानतेत २१ स्थानांची प्रगती झालीये.

कोणताही देश अधोगती करत असेल तर एक स्त्री म्हणून मला वाईटच वाटेल. >>> हो हे खरेय. एक स्त्री नसल्याने असा विचार माझ्या मनात आला नाही. पण हे पटले.

माझ्याकडे त्या रिपोर्टची पीडीएफ फाईल प्रत्येक क्लिकला दोन दोन मिनिटे हॆन्ग होतेय त्यामुळे जरा अभ्यासायला प्रॊब्लेम येतोय.
निकषांमध्ये बहुधा स्त्रियांना मिळणार्‍या समान संधीवरच भाष्य केले आहे. स्त्रियांवर (एक स्त्री म्हणून) होणारे अत्याचार असे कुठे अजून सापडले नाही. बहुतेक ते या यादीच्या निकषात नसावे.

POLITICAL EMPOWERMENT मध्ये भारताचा नंबर १०च्या आत आहे कारण भारतात सोनिया, मायावती, ममता, वसुंधरा, आनंन्दी पटेल, जयललिता सारख्या महिलाना पण समानतेच्या नजरेने पाहिले जाते असे खुप कमी देशात आहे. बांगलादेशाचा नंबर पण यात वरचा असला पाहिजे. जपान , चीन, मलेशिया वगैरे मध्ये सुध्धा एवढी POLITICAL EMPOWERMENT नाही.
अमेरिकेत पण छोट्या छोट्या गावात (खास करुन समुद्र किनार्यापासुन दुरच्या गावात) महिला राष्ट्रपती होणार ही कल्पनाच सहन होत नाही. मग ते मत व्यक्त करणारी महिला असो नाहीतर पुरुष असो.

धक्कादायक नाही वाटले. भारतात अजूनही स्त्रीला शूद्राचा दर्जा आहे. कुठला का धर्म असेना ?
POLITICAL EMPOWERMENT
यात भारतातलं स्त्रियांसाठी आरक्षण विचारात घेतलं असावं. ती निव्वळ आकडेवाडी आहे. आरक्षित जागेवर खरी सत्ता नव-यांचीच असते. हे ध्यानात घेतलं गेलं असतं तर मग इथेही कितवा क्रमांक मिळाला असता कुणास ठाऊक (रादर मिळायला हवा होता)

(ब-याच दिवसांनी चांगला धागा आला, नाहीतर मायबोली सोडून पळून जावंसं वाटत होतं).

गेल्या वर्षभरात तब्बल २१ स्थानांनी प्रगती करण्यासारखा कोणता बदल घडला आहे. >> मलातरी हा वर्षभराचा परिणाम वाटत नाही. थोड्या थोड्या प्रमाणात केलेल्या किमान दशकभराच्या प्रयत्नांनी हे साध्य झाले असावे. थोडा हातभार सरकारने लावला, अन त्याबरोबरच बरीचशी लढाई स्त्रियांनी नेटाने चालू ठेवली, त्याचे हे फळ.

हे शक्य झाले, ते मुख्यतः २ गोष्टींमुळे, शिक्षण आणि मीडिया.

भले लग्नाच्या बाजारात भाव जास्त मिळावा, म्हणून चौथ्या वा सातव्या यत्तेपर्यंतच शिकल्या असतील, पण शिक्षणाचा वारसा त्यांनी पडू दिला नाही. जे आपल्याला मिळाले नाही, किमान ते मिळवण्याची पुरेपूर संधी त्यांनी पुढच्या पिढीला दिली. प्रसंगी लोकांच्या घराची धुणीभांडी करून, उधारीने आपल्या लेकींची शाळा निभावली.

इतका अन्याय बऱ्याच स्त्रियांनी वर्षानुवर्षे सहन केला, कारण बऱ्याचदा दुसरा काही पर्याय त्यांच्या नजरेसमोर नव्हता. किमान माध्यमांमुळे बाकीच्या जगातल्या कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख त्यांना झाली, स्त्रीमुक्ती विचारांचा नवा सूर्य भले नशिबात नसेल, पण निदान त्याचा एक कवडसा त्यांच्या दारात आला. अन फक्त स्त्रियांचेच नाही, पुरुषांचे विचारसुद्धा यामुळे बदलले.

माध्यमांनी स्त्रीमुक्तीचा विचार या ना त्या मार्गाने सतत लावून धरला, म्हणून की काय, ज्यांनी आपल्या मुलींना कधी बाहेरचे जग दाखले नव्हते, त्यांनी स्वतःहून मुलींची नावे शाळेत घातली.

हा बदल एका रात्रीतला किंवा वर्षातला नाही, अनेक वर्षांच्या सततच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. इतक्या वर्षांची गळ्यात पडलेली जोखडे हळूहळू सैल होताहेत. मान्य आहे, की इतके पुरेसे नाही, याहून कितीतरी जास्त झाले असते. पण म्हणून काय झाले? जे झालेय ते काय कमी आहे?

“If you can't fly then run, if you can't run then walk, if you can't walk then crawl, but whatever you do you have to keep moving forward.” ― Martin Luther King Jr.

As for all women -
Only handful of them are running towards their freedom,
a few might be walking and most are still crawling. But rest assured, they have not given up, not even for a second.