पाच किलोमीटर आणि बरंच काही…. भाग १

Submitted by विद्या भुतकर on 27 November, 2016 - 23:33

ही गोष्ट आहे माझ्या पहिल्या वहिल्या हाफ मॅरॅथॉन ची. आता इतके लोक इतक्या शर्यती पळतात. त्यात माझी विशेष अशी काही नाही. पण माझ्यासाठी खासंच ती. कारण त्याची सुरुवातच झाली ती माझ्या तिशीनंतर. माझं खूप काही वय वगैरे झालं नाहीये पण वयाच्या तीस वर्षापर्यंत अभ्यास, कॉलेज, नोकरी, मुलं, इ जे काही सर्व लोक करतात तसं करून झालं. थोडं- फार इकडे तिकडे. कधीही खेळात, कुठल्या शर्यतीत भाग घेतला नाही शाळेत. त्यामुळे पहिली हाफ मॅरॅथॉन माझ्यासाठी खासच होती. तिची सुरुवात मात्र एका ५ किमी अंतराच्या रेसने झाली. आजची पोस्ट त्याच्याबद्दलच.
स्वनिक, माझा मुलगा झाल्यावर, 'चला, दोन मुलं झाली आता पाहिल्यासारखे बारीक होऊन जाऊ' हा हेतू मनात ठेवून या सर्वाला सुरुवात केली. तर तेंव्हा म्हणजे, २०१२ मध्ये मी आणि माझा नवरा दोघेही शिकागोमध्ये एकाच ऑफिसमध्ये नोकरीला होतो. तेच ते, सोफ्टवेअरचं काम, दुसरं काय येतंय? तेंव्हा मुलगी तीन वर्षाची आणि मुलगा ४ महिन्याचा होता. मुलांना सांभाळून नोकरी करणं हेच मुळी आमच्यासाठी धावपळीत चालू होतं. इथे परदेशात कुणी मदतीलाही नसल्याने आमची तशी गडबड व्हायची सर्व करायला. स्वनिक चार महिन्याचा झाल्यावर मी जरा मनावर घेतले वजन कमी करायचे.
आमचे ऑफिस घराजवळच असल्याने, दुपारी घरी जायचो जेवायला. जमले तर कधी स्वनिकला भेटायला. पण सर्व सुखासुखी होतय आणि मी निवांत बसलेय असे कसे शक्य आहे ना? वजन कमी करण्यासाठी व्यायाम कुठे आणि कधी करणार हा प्रश्नच होता. आमच्या ऑफिसमधेच जिम होती ते एक सोयीचे होते. म्हटले दुपारी घरी जेवायला न जाता जिमला जावे. दिवसातला तेव्हढा एकच तास काय तो आम्ही यासाठी देऊ शकत होतो. पण तेही सहजपणे जमणारे नव्हते. एकतर दोन पोरांना घेऊन एरवी न मिळणारा, दुपारचा निवांत वेळ जाणार होता. त्यात इथे पोळ्याला वगैरे कुणी मदतीला नसल्याने, कधी जेवायला काही नसेल तर दुपारी थोडे बनवून घ्यायचे घरी, तेही खायला काही मिळणार नव्हते. मग रात्रीच जास्त पोळ्या करून डबा भरून ठेवायला लागणार होता. कुणाला वाटेल त्यात काय एव्हढे मोठे काम? पण जिथे ५ मिनिटं पण वेळ काढणे अवघड होते तिथे ३० कुठून आणणार असे झाले. तरी म्हटले जायचेच. मी दिडेक वर्षानी काहीतरी करणार होते.
ट्रेडमिलवर थोडे पळायला सुरुवात केली तर, डिलिव्हरीमुळे हाडांचा खुळखुळा झाला आहे असे वाटले सुरुवातीला. सर्व सांधे आखडले गेले होते. पण हळूहळू पळायला सुरुवात केली. आधी तर वाटले १ मैल पळणेही किती अवघड आहे. तेंव्हाच Chase Corporate Challenge म्हणून एका रेसबद्दल नोटीस आली ऑफिसमध्ये. ती फक्त ५ किलोमिटरची होती. आयुष्यात कुठलीही गोष्ट परिक्षेशिवाय केली नाहीये त्यामुळे म्हटले यात भाग घेतला तर जरा सराव तरी करेन रोज . म्हणून मी २४ मे, २०१२ ला होंणारया 5K(म्हणजे 5 KM ) मधे भाग घेतला . साधारण दीडेक महिन्यात ती रेस होती. रोजचा सराव मी कसाबसा 2-2.5 मैलापर्यंत नेला . रेससाठी फॉर्म भरताना मी लिहीले होते की साधारण 35 मिनिटामधे पूर्ण करू शकते . कितीही मारामारी करून तेव्हढा वेग काही वाढत नव्हता . 35 मिनिटात 5km म्हणजे 7 मिनिटात 1 Km कसे शक्य होते? मी वेग वाढवायला गाण्यांचा आधार घेतला . कित्येक वर्षात मी अशी निवांत गाणी ऐकली नव्हती . साध्या गोष्टी पण त्याही किती दुर्मिळ झाल्या होत्या असे वाटले . नेहमीप्रमाणे संगीताने साथ दिलीच . गाण्याचा वेग वाढला, तसा माझाही . नंतर समजत नव्हते की पळण्यासाठी गाणे ऐकतेय का गाणे ऐकण्यासाठी पळते आहे .
इकडे घरी रात्री जेवण ज्यादा बनवून, डबे भरून घेणे नियमित सुरु झाले. दुपारी बरोबर एक तास सुट्टी मिळायची. त्यात पटकन जिममध्ये जाऊन जितके जोरात पळता येईल तितके पळावे लागायचे. कारण पुढे आंघोळ करून, कपडे बदलून जागेवर एका तासात यायचे असायचे. त्यातही बरोबर एक वाजायचा. जागेवर बसूनच जेवण करायचे. कधी कोणी कामासाठी आले तर मग पोटात कावळेच. पण एकूण मजा येत होती काहीतरी वेगळं करायला. कितीही सराव केला तरी मी बाहेर पळत नव्हते अजून, सर्व सराव जिममध्ये ट्रेडमिलवर चालू होता. मला कुणीतरी सांगितले की बाहेर आणि मशिनवर पळण्यात खूप फरक आहे. एक दिवस म्हटले बाहेर जाऊन तर बघावे? पहिल्या फेरीतच वाटले कि गुढगे गेले कायमचे. रस्त्यावरून पळताना जरा जास्तच जोर लागत होता. आणि धुळीत पळल्यामुळे सर्दी होऊन तीन दिवस घरी बसले ते निराळेच .
शेवटी 24 तारीख उजाडली. मी उगाचच अगदी मोठी परीक्षा असल्यासारखी वागत होते . सकाळी ऑफिसमधे कामात लक्षही लागत नव्हते . ही रेस शिकागोच्या डाऊनटाऊन मध्ये होती आणि आमचे ऑफिस बाहेर छोट्या गावात. आमची बस दुपारी ४ वाजता ऑफिसमधुन निघाली. मी आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीजवळ जाऊन बसले. ती मस्तपैकी तयार होऊन आली होती, खास रनिंग शूज, गॉगल, इ. तिलाही एक वर्षाची मुलगी आहे. आता शिकागोच्या वाहतुकीत आम्हाला २ तास तरी लागणार होते. म्हणून मी आपली बोलत होते. म्हणले, "बरे आहे न जरा पळून वजनही कमी होतय". तर ती म्हणे,'हम्म, मला डिलिव्हरी नंतर लगेचच ९ मैलाची स्पर्धा होती त्यामुळे मी २ महिन्यात सुरु केले होते". मनात म्हटले, "मी एक महिन्यात नुसती खरेदीला बाहेर पडले तर आई म्हणे काय हे, काही काळजी आहे की नाही?" आणि २ महिन्यात पळायचे? Impossible !!! Happy
मग दुसऱ्या एकीशी बोलले, ती तर तिच्या हातातल्या घड्याळ्याबद्दल सांगत होती. म्हणे मी पळताना, किती अंतर झाले आणि किती वेळात झाले ही सर्व माहिती यात ठेवली जाते आणि मग नंतर मला त्याचा उपयोग होतो माझा वेग बघायला इ. इ. तिसरा एक जण त्याच्या भारी shoes बद्दल सांगत होता. आणि परीक्षेत अभ्यास न केल्यावर एखादा प्रश्न कुणी विचारला कि कसा चेहरा होतो? तसा चेहरा करून मी सर्वांकडे बघत होते. एकाच्या हाताला बेल्ट होता. त्यात त्याने त्याचा फोन अडकवला होता. सर्वाचे काळे चष्मे तर भारीच. म्हणे फोन वर एक App आहे, जिथे आपला रेस नंबर टाकला की किती वेळात अंतर कापले ते कळते शेवटी. मी पण माझा फोन उघडला पण आयुष्यात कुठले App download केले असेल तर ना. कसे तरी करून ते केले आणि मग कानात बोळे घालून झोपून गेले.
संध्याकाळी ७ वाजता रेस सुरु होणार होती आणि आम्ही ६.४५ ला पोचलो बसने. आमच्या कंपनीचा तंबू एका ठिकाणी ठोकला होता. तिथे जाऊन पाणी पिऊन जरा 'जाऊन' यावे म्हणून रेस्टरूमकडे गेले तर भली मोठी रांग होती. Sad शेवटी ती रांग सोडून पळायला जाऊन उभी राहिले. २६ हजार लोक त्यादिवशी पळणार होते, त्यात मी काय? माझा फोन पण तंबूत राहिला होता. म्हटले जाऊदे पळू तसेच. पण तो दिवसच एकूण कंटाळवाणा होता. दुपारी ४ पर्यंत काम, मग २.५ तास प्रवास आणि प्रचंड दमट वातावरण. धाकधुक करत पळायला सुरुवात केली. पहिला मैल झाला आणि मला एक मुलगी रस्त्यात चक्कर येऊन पडलेली दिसली. मला संदीपचे वाक्य आठवले, काही कर पण कुठे पडून येऊ नकोस. तो दोन पोरांना घेऊन घरी एकटाच होता. माझा वेग मग कमीच झाला.
खूप वेळ पळून पाहिले तर फक्त ३ Km झाले होते. माझा टार्गेट वेग कधीच मागे पडला होता. पण लोकांना पळताना बघून आणि रस्त्याकडच्या उत्साही लोकांना बघून मी कसेतरी माझे ५ किलोमीटर पूर्ण केले होते. ४१ मिनिटात ! Sad दमून भागून मी आमच्या तंबूत परतले. तिथे सर्व लोकांचे किती वेळात अंतर पूर्ण झाले हे ऐकून आपण नापासच झालो असे वाटत होते मला. पण भूक लागली होती. जेवण केले, एक फोटो काढला. आयुष्यात पहिल्यांदा खेळात काहीतरी केलं होतं मी. अंगकाठी कृश म्हणता येईल अशीच आणि उत्साहही कमीच, त्यामुळे कधी खेळात भाग घेतलाच नव्हता. एकदा कब्बड्डी मध्ये भाग घेतला होता ५वीत , पण समोरच्या जाड्या मुलीने पाय असा पकडला की मी तिथे गार झाले होते. Happy असो.
थोड्या वेळात घरी यायला बस मध्ये बसून गेले. संदीपने फोनवर सांगितले, 'पोरांचे जेवण झाले, झोपत आहेत'. गाडीत बसलो तोवर आभाळ स्वच्छ झाले होते. मस्त थंड हवा येत होती . मी कानात पुन्हा एकदा गाणी टाकली आणि रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांच्या खांबांकडे बघत पोरांचा विचार करत बसले. सकाळपासून त्यांना पाहिलंच नव्हतं. उगाचच एक मोठं पदक घेऊन घरी जात आहे असं वाटत होतें आणि मग डोळ्यांत पाणी येणं भागच !

क्रमश:
-विद्या .
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ विद्या भुतकर, सुरवातीला एखाद्या स्पर्धेचा वृत्तांत वाचत असल्यासारखा तुमचा लेख वाचत होतो, पण शेवटी <<<< सकाळपासून त्यांना पाहिलंच नव्हतं. उगाचच एक मोठं पदक घेऊन घरी जात आहे असं वाटत होतें आणि मग डोळ्यांत पाणी येणं भागच !>>> ह्या वाक्याने हृदयात कुठेतरी लक्कन् हलल्यासारखं झालं. मस्तं लेख!!!

मस्तच लेख.

माझ्याही जर्मनीतल्या 10 km च्या हाफ मॅरेथॉनच्या आठवणी ह्या निमित्ताने ताज्या झाल्या..सराव जंगलातल्या मऊ पायवाटेवर केल्याने डायरेक्ट टणक रस्त्यावर स्पर्धेला उतरल्याने पाळताना वेग फारच कमी आणि फारच कष्ट पडले होते, गंमत म्हणजे आमच्या सोबतच 21 km पळणारी बॅच, ज्यात माझा नवरासुद्धा होता, ती सगळी मंडळी आमच्या नंतर निघून मला क्रॉस करून निघूनही गेली होती. माझा वेग सगळ्यात शेवटच्या मुलींच्यापेक्षाही कितीतरी कमी होता. पाय जबरदस्त दुखत होते आणि सोबतीला कुणीच नाही, नाही म्हणायला जागोजागी लावलेले पाण्याचे स्टॉल्स आणि तिथले चिअर अप करणारे volunteers तेवढे होते.
रस्त्यावरून जाणारं पब्लिक अगदी कौतुकाने पाहत होतं.. कित्येकदा मनात विचार आला, की थांबून जावं इथेच, इतका थकवा आला होता, पण नेटाने चालण्याच्या वेगात धावत राहिले आणि टार्गेट अंतर पूर्ण केलं. माझ्या बॅचने कधीच हे अंतर कापलेलं होतं आणि 20 मिनिटातच 21 km ची बॅचही आली इतका कमी वेग होता माझा! किती ते सांगत नाही, जाऊदे, समजून घ्या! Lol पण एक अतिशय सुंदर अनुभव मिळाला, हे मात्र आनंदाने सांगेन. त्या स्पर्धेसाठीचा सराव, ते विशिष्ट uniforms, त्या उत्साही, चैतन्यमय गर्दीचा एक भाग होण्याचा आनंद, ते प्रोफेशनल फोटोग्राफर्स जे आपल्या पळतानाच्या पोझेस टिपत असतांना येणारं एक भारी सेलिब्रिटी type फीलिंग, आणि शेवटी हाती येणारं certificate, हे सगळं, ही मजा अनुभवण्यासारखी आहे, त्याची धुंदी अजूनही मनात तशीच रेंगाळून राहिली आहे.

>>>अभ्यास, कॉलेज, नोकरी, मुलं, इ जे काही सर्व लोक करतात<<

ह्या क्रमात 'लग्न' राहिलच.

ह. घ्या.
--------

चांगलय( चांगल लिहिलय).