परिणाम

Submitted by भागवत on 27 November, 2016 - 03:28

पंखा खडखड आवाज करत फिरत होता. मुग्धाला दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. स्नान गृहात जाऊन आल्यावर तिला कुठे आल्हाददायक वाटलं. आणि आत्ता कुठे वाटल की पोट साफ झाले आहे. हुश्श! आत्ता परवा पासून दिनचर्याला सुरुवात करायला हरकत नव्हती. परत तेच ऑफिसच कार्य, आणि घर यात मुग्धा गुरफटणार होती.

मुग्धा ऑफिस ला रूजू झाली. तिची सगळ्या मित्र-मैत्रिणींनी तिची विचारपूस केली. मग हळू-हळू मागील राहलेले कार्य आणि येणारे नवीन काम याचा तिने मेळ घालायचा प्रयत्न केला. तिला वेळेचे आणि कामाचे व्यवस्थापन व्यवस्थित जमायचे. मुग्धाचा नवरा प्रथमेश सुद्धा एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होता. त्यांना दररोज एकमेकाला वेळ द्यायला जमायचे नाही. मग ती कसर दोघं आठवड्याच्या सुट्टीत भरून काढायचे. मागील कार्य संपायच्या आधीच मुग्धाला दुसर्‍या एका मोठ्या कार्यासाठी नियुक्ती झाली. मग काय ती परत एकदा जोमाने कामाला लागली. मुग्धाला कधी-कधी कामकाजाचा थकवा जाणवायचा.

एका रविवरी दुपारच्या वेळी घरी विचित्र शांतता होती. मुग्धा खोलीत आराम करत होती. अचानक स्नान गृहाचा दरवाजा धाडकन बंद झाला आणि तेथुन तिला पाण्याचा आवाज येत आहे हे जाणवले. तिने आवाजाच्या दिशेने जाऊन बघितले पण तिथे काही पाणी वाया जात नव्हतेे आणि आवाज सुद्धा येत नव्हता. मुग्धाला मनावर खुप दडपण असल्या सारखे वाटले. वातावरणातील जडत्व जाणवायचे. मुग्धाला करमत नव्हते म्हणून ती बैठकीत गेली. परंतु तिथल्या वस्तू तिच्याकडे उदास आणि भकास नजरेने बघत होत्या.

संध्याकाळी तिला लक्ष्यात आले स्नानगृहा मधल्या वि‍जेचा दिवा सुद्धा खराब झाला आहे. मागील काही दिवसाच्या घटना झरकन तिच्या डोळ्या समोरून गेल्या. स्नान गृहात मधल्या वस्तु काही ठराविक अंतराने बिघडू किंवा खराब होऊ लागल्या होत्या. पहिल्यांदा नळ बिघडला नंतर काही कारणाने flush खराब झाला. दरवाजा मध्येच धाडकन बंद व्हायचा. थोडेसे दुर्लक्ष झाले असते तर खिडकीची काच पायात घुसली असती. लाईट सॉकेट जाळल्या मुळे बंद पडले. flush बंद केला काय किंवा चालू राहिला काय त्यातून पाणी सतत जायचे. दुसऱ्या दिवशी मुग्धा शॉवर घेताना तिला स्नानग्रहा बाहेर खिडकीवर अस्पष्ट रेखाकृती उमटलेली दिसली आणि गडबडीत तिचा हात लागुन शॉवर मोडुन पडला.

तिला असे जाणवायचे कि ऑफिसाच्या टेबला बाहेर जग शांत झालय. मुग्धा ऑफिस पोर्टल वर लॉगिन करत होती आणि अचानक पासवर्ड चुकला आणि तिला मॉनिटर वर चार वापरकर्तानाव(username) दिसायला लागले. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस मुग्धा यंत्रवत काम करत होती. प्रथमेश सुद्धा आपल्याच धुंदीत होता. तिच लाइफ कुठे तरी थांबलं होत. तिला हे नित्यक्रमात लक्षात आले नाही. घर आणि ऑफिस मध्ये ती अडकून पडली होती. असंख्य लोकात वावरताना सुद्धा तिला विचित्र एकटेपणा आणि उदासी भंडावून सोडायची.

2 महिन्यापासून तिला काहीतरी बिनसलंय असे वाटत होते. मनावर खुप मोठे ओझे जाणवायला लागले. सतत नैराश्य जाणवत राहायचे. त्यातून मन रमण्यासाठी तिने कलाकुसरीचे काम आवड म्हणून सुरू केले. पण त्यात तिचे मन काही रमले नाही. तिला नात्यात काहीच विनिवेश उरला नाही. नातं म्हणजे फक्त ओझे वाटत होते. मुग्धाने मागोवा घेतल्या नंतर तिला असे जाणवले कि हे सर्व विचार तिला एका विशिष्ट घटने नंतर येत आहेत.

अचानक तिला जाणवले की तिचा एक निर्णय खुप चुकलाय. त्यावेळेस डॉक्टराने आणि प्रथमेशने मुग्धाला खूप समजवायचा प्रयत्न केला होता. पण प्रगत आयुष्यासाठी तिने हा निर्णय मुग्धाने स्वत:हून घेतला होता. तिने निर्णय तर घेतला पण त्या नंतरचे परिणाम तिने गृहीत धरले नव्हते किंबहुना झिडकारले होते. ज्या दिवशी तिने स्वत:हून मान्य केले की तिचा गर्भपाताचा निर्णय चुकला त्या दिवसापासून तिला मोकळे वाटत होते. मनावरचे मळभ दूर झाले असा अनुभव येत होता. ज्या दिवशी तिचे पोट साफ झाले होते तिथेच तिचा गर्भपाताचा गर्भ नैसर्गिक रित्या पडून वाहून गेला होता. त्यामुळे तिला स्नानगृहातले अनुभव विचित्र वाटत होते. तिच्या मागे कोणी तरी पाळत ठेवतयं ही भावना सुद्धा नाहीशी झाली. तिला घेतलेल्या निर्णया बद्दल स्वत:ला अपराधी आहोत असे जाणवले. शेवटी तिला समजले या सर्व घटना या मनाच्या खेळ असून दुसरे काही नाही. परत तीच चुक काही मुग्धा आणि प्रथमेश पुन्हा करणार नव्हते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users