वांगेपुराण

Submitted by विद्या भुतकर on 23 November, 2016 - 00:10

आज वांग्याची भाजी केली. आता म्हणाल, ही काय सांगायची गोष्ट आहे का? वांग्याची भाजी सर्वानाच आवडते असं नाहीये पण मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने ती करते ती साधारण बऱ्याच लोकांना आवडते. अर्थात ती काही खास माझी रेसिपी नाहीये. आईची त्याच्याहून छान होते आणि मी जी करते त्यातही तिनेच केलेला मसाला असतो म्हणून ती तशी होते. त्यात गेले काही दिवस बरं नसल्याने नीट जेवण बनवणं झालंच नव्हतं. म्हणून आज शेवटी मस्त वांगे, चपाती, वरण, भात हे सर्व बनवलं. असो.

हे वांगेपुराण सांगायचं कारण म्हणजे, दर वेळी वांगी केली की ती केवळ मी आणि संदीप आनंदाने खातो.पण ही अशी एक डिश आहे की ती केल्यावर शेजारी जाऊन एक वाटी देऊन यायची इच्छा होतेच. अनेकवेळा नवीन ठिकाणी असताना वांगी केल्यावर ती देण्यासाठी कुणी शेजारी नाहीत याचंही वाईट वाटलं आहे. कधी ऑफिसमध्ये मैत्रिणींसाठी नेली आहे परंतु ताजी भाजी बनवल्यानंतर, आई आम्हाला जशी सांगायची 'जरा जाऊन देऊन या रे ' तसं करण्यात मजा औरच असते. नवीन घराशेजारी सख्खी महाराष्ट्रातील शेजारीण मिळाली आणि माझा एक प्रश्न सुटला. Happy आजही तिच्याकडे ताट देऊन आले.

आता यात ती भाजी खूप ग्रेट असते असे नाही पण कुणालातरी आपल्या हातचे खायला देण्यात मजा येते. आम्ही लहान असताना, वेगवेगळ्या काकूंचे वेगवेगळे पदार्थ आवडायचे. ते कधी घरी आले की अगदी थोडं थोडं वाटून खायला लागायचं. रोजच्या जेवणापेक्षा एकदम वेगळं काहीतरी अचानक मिळायचं. त्यात आमच्या एका काकूंची अळूवडीही होती. आजही कधी त्यांना कळले आम्ही येणार आहे तर त्या नक्की घेऊन येतात. त्या छोट्याशा गोष्टीने काहीतरी स्पेशल मिळाल्याचा आनंद असायचा. अर्थात हे असे देणे-घेणे आईकडूनही असायचे. आम्ही सायकल वरून जाऊन द्यायचे. कुणालातरी आठवणीने डबा पाठवून देणे किती छान आहे ना? एकाच बिल्डिंगमध्ये असताना तर दूरही जावे लागत नाही.

बरं एखाद्याचा काही पदार्थ आवडतो म्हणून आईने आमच्यासाठी रेसिपी विचारून ते तसे प्रयोग करूनही पाहिले आहेत. कधी कधी तर आम्हाला शंकाही यायची की त्या रेसिपीमधला एखादा महत्वाचा घटक मुद्दाम तर सांगायचा विसरला नसेल ना? Happy कारण कितीही प्रयत्न केले तरी त्या काकूंसारखा तो पदार्थ व्हायचाच नाही. मग आम्हीही नाद सोडून द्यायचो. प्रत्येकाच्या हातची चव वेगळीच असते हे कळायला बराच वेळ गेला. आता मुलांसाठी काही बनवताना लक्षात येते आपणही आईला असेच म्हणायचो,'त्यांच्यासारखे नाही झाले'. Happy कळतं की कितीही काहीही केले तरी ती अगदी सेम चव येत नाहीच. आणि ज्याच्या त्याच्या हाताची चव आणि त्यांचा तो पदार्थ आवडीने खाण्यातच खरी मजा असते. पण त्यासाठी ते तसे शेजारीही पाहिजेत आणि आवडीने करून घालणारे लोकही. Happy आजच्या त्या वांग्याने पुन्हा या सगळ्या गोष्टींची आठवण करून दिली.

15192770_1318009724939666_6445126896184563253_n.jpg15134618_1318009731606332_5517844563599326018_n.jpg

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.

आम्ही अजुनही काही स्पेशल सणावारी गोडाधोडाचं केलं तर वाटीभर शेजारी देतो. Happy

लगे हाथ रेस्पी पण लिहा वांग्याच्या भाजीची. मस्त दिसतेय.

मस्त. रेसीपी लिहा ना. मला हैद्राबादी बगारे बैंगन आणि आपली भरली वांगी आवडतात. तुम ची काय नवी पद्धत आहे ती पण लिहा.

मी मध्यंतरी चिव डा बनवला होता तो शेजारी दिला. त्यानी त्या भांड्यात बटाटेवडे घालून दिले. रविवार स्पेशल. माझा पूर्ण दिवस त्यावर निघाला. एकदा पावभाजी दिलेली. कोणी आपल्यासाठी सोचून अन्न पाठवते आहे हे खूप छान वाट्ते. अमेरिकेत पण आहे म्हणा कॅसरोल कल्चर.

मस्त लिहिले आहे!! खाद्यपदार्थ शेजारी देणे संस्कृती लोप पावते आहे!! माझ्या शेजारी, आजूबाजूला कोण रहाते ह्याचा मला पत्ताच नाही Sad

वा! भाजी मस्त दिसते आहे. आ आणि पा विभागात पाककृती लिही म्हणजे खूप जणांना भाजी दिल्यासारखं वाटेल Happy

भरली वांगी, गाजराची कोशिंबीर आणि पोळी एकदम आवडता मेनु आहे माझा.

भरली वांगी ..स्र्र्र्र्र्र्र्र्र्र्ल्ल्ल्ल्ल्ल्प्प्प्प्प

मस्त लिहिलंय! भाजी पण छान दिसतेय. वांग्याची भाजी ही अशीच एक शेजारी राहणाऱ्या काकू नेहमी आणून द्यायच्या त्यांची आठवण झाली! या देवाणघेवाणीचा आनंद वेगळाच असतो.

वांग्याच्या भाजीचा फोटु एकदम मस्त... Happy
बाकी लेख वाचुन आमची कॉलनी आणि सगळ्या काकूंचे खास पदार्थ आठवले. छान लिहिलंय !

विद्या, माझा पत्ता देऊन ठेवते. पुढील खेपेस मला पाठव ही भाजी! देवाणीचा आनंद मिळेल तुला, मला घेवाणीचा मिळेल Lol

कसं गं तू मनातले लिहीतेस Happy आधी च्या ठिकाणी apartment मध्ये छान देसी मैत्रिणी होत्या पण नवीन ठिकाणी एकच मिळाली आहे अशी friend जी प्रेमाने देते आणि घेते पण Happy south indian असल्याने तिने रस्सम दिले की साबुदाणा खिचडी असे सुरू केलेय

मस्त लिहलयं !
आ आणि पा विभागात पाककृती लिही म्हणजे खूप जणांना भाजी दिल्यासारखं वाटेल >> Lol

मस्त लिहिलंय. आम्ही उलट शेजारच्या आत्या / काकूला स्पेशली जाऊन सांगायचो अमुक एक पदार्थ तूच कर टाईप्स.

लेख ठीकठाक. त्यापेक्षा पाकृ फोटो जास्त टेम्पटिंग आहेत. सिंडरेलाने सुचवलेल्या पर्यायावर सिरियसली विचार करा लेख वगैरे पडण्यापेक्षा Happy