केसरिया बालमा ...

Submitted by अजातशत्रू on 14 November, 2016 - 23:34

'ती' पहिल्यांदा भेटली होती तेंव्हा कितीतरी क्षण मंतरलेले गेले होते,
घड्याळातील काटे सुद्धा डोळे विस्फारून आमच्याकडे पाहत होते.
तिच्याशी गळाभेट झाली नाही की एखादी मिठी देखील मारली नाही, नंतर वाटले हे राहिलेच की !
ते क्षणच इतके मोहित होते की हे करावे की ते करावे याचा विचार मनात डोकावला नाही,
बस्स काही क्षण हातात हात घालून उभे होतो, जणू काही जन्म जन्मांतराची जुनी ओळख असावी.
ती द्रोणागिरीवरची संजीवनी आणि मी शब्दफुलांच्या कोमल परागकणांचा चाहता !
त्या भेटीत काही तरी जादू होती, अनामिक ओढ होती, आपुलकी होती, आस्था होती.
नव्हता विकारांचा लवलेश की नव्हती कुठली आसक्ती !
त्या दिवसानंतर भारलेल्या अवस्थेत मी जगत गेलो बहुधा ती भारलेलीच असावी, तिचेच गारुड माझ्यावर झाले !
नंतर अधाशासारखा कितीतरी दिवस बोलत होतो, कधी बोलायला न मिळाल्यासारखं !

मग काळ पुढे जात गेला, व्हॉईसकॉल वरून मेसेज वर स्थिरावलो.
वेळ मिळेल तेंव्हा निरोपानिरोपी व्हायची, एखादे चित्र इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे !
पुढे पुढे निरोपेच आम्हाला कंटाळले, ती तिच्या संसारात तर मी माझ्या संसारात दंग !
आता बोलण्यातला तो आवेग मनात राहिला नाही की मेसेजेसची मगजमारी नाही.
पण निवांत क्षणी हटकून तिचा चेहरा समोर येतो, खुणावतो आणि मी एकटाच हसतो, गालातल्या गालात !
आता बोलणे खुंटले आहे, मेसेज बंद झाले आहेत, स्मायली सुद्धा नाहीत, हाय हॅलोला तर सुरुवातीपासूनच फाट्यावर मारले होते !
कदाचित ती ओढ ही राहिलेली नाही की ती काळजातली धकधक ही आता होत नाही,
तिच्या सदेह प्रतिक्षेचा तो आवेगही आता राहिलेला नाही, काही तरी राहून गेल्याची रुखरुख देखील मनात उरली नाही !

अजूनही तोच सूर्य उगवतो पण त्याचं उगवणं जीवावर आल्यासारखं वाटतं, मावळताना तो देखील किंचित भकास वाटतो.
अंधारून येताच चंद्र डोळ्यात उतरतो, तिची छबी अजून शाबित आहे हे पाहताच त्याला हायसे वाटते.
मग तो चांदण्यांच्या प्रदेशात जातो, माझी ख्याली खुशाली विचारायला ! आणि सकाळ होताच हिरमुसला होऊन त्याच्या गावी परततो !
तेंव्हा वाहणारा तोच वाराच अजून वाहतो आहे, तेंव्हा तो गुलबकावलीच्या आरक्त फुलांचा देहभान हरपून टाकणारा गंध घेऊन यायचा.
आता तो निशब्द निरव एकांत आणि काही खाणाखुणा घेऊन येतो, उंबरयापाशी येउन तिचा निरोप सांगताना गंधव्याकुळ होऊन जातो, गुदमरतो..
माझ्या अंगणातला स्वगतशील पारिजातक आणि तिच्या अंगणातले बोलघेवडा चाफा ह्या वाऱ्याच्या कानात काहीच कसे सांगत नाहीत ?
रस्त्यावरचे गुलमोहर आता तरारून गेले आहेत पण त्यात तो टवटवीतपणा उरलेला नाही की तो लज्जित लालिमा ही नाही.
कदाचित गुलमोहरावर बसणारे कोकीळ तिच्या घराकडून येत असावेत आणि भोरडया माझ्या अंगणातून तिथं जात असाव्यात,
त्यांची चर्चा ऐकणारा तरीही फुलणारा स्थितप्रज्ञ गुलमोहर मला विश्वामित्राहून श्रेष्ठ वाटतो !

आता सकाळ ही तीच असते पण पानात तो प्रातःकालीन वेणूनाद नसतो,
दुपारी तेच उन्हाचे कवडसे असतात पण आता ते माझ्या भोवती फेर धरून नाचत नाहीत.
लिहित असताना ते वहीच्या पानांवर रेंगाळून जातात, तिच्या नावाची अक्षरे बघून मनातल्या मनात हसतात !
कधी कधी उगाच कुंद झालेले मेघमल्हार आभाळात दाटी करतात अन अवकाळी पाऊस तिच्या आठवणींच्या धारात चिंब न्हाऊन जातो.
क्वचित पडणारा दुपारचा हा गंधवेडा पाऊस जडत्वाने सगळीकडे ओघळत राहतो, शुष्क झालेल्या अणूरेणूंना मायेची नवी ओल देऊन जातो.
मग सांज होताच खिडक्या आत्ममग्न होतात, मान वेळावून बसलेल्या बगळ्यासारख्या आत वळून बसतात.
विजेच्या तारांवर स्मृतीच्या चिमण्या एका रांगेत येऊन बसतात,

माझ्या खिन्न चेहऱ्याकडे बघून चिवचिवाट करत राहतात.
सताड उघडे दार उंबऱ्याने रस्ता अडवल्यामुळे बिजागिऱ्यांच्या खांदयावर माथा टेकवून अधीर होऊन जाते.
अंधार गडद झाला की निशिगंध खिडकीतून आत डोकावतो,
वहीतल्या पानापानावरच्या अक्षरात जणू तिचाच गंध मिसळून जातो !

वाचक म्हणतात, "किती छान लिहिता हो तुम्ही ! मला खूप भावते तुमचे लेखन !"
मी मोरपीस होऊन जातो...
खरे तर मी काहीच लिहित नसतो, काव्यकाळजातून अल्वार शब्द उतरतात, मग त्यात अनेक गुण मिसळत जातात.
वारा त्याला प्रतिभेची गती देतो, पाऊस अर्थाचे अश्रू देतो, उन्हे वृत्तांचा रुक्षपणा देतात तर सावल्या आशयाला उराशी कवटाळतात...
पानेफुले त्यात रंग भरतात, गंधदरवळ देतात.

पण माझ्या निष्प्राण शब्दांना तिच्यासारखी माणसंच 'केसरिया बालमा'त परावर्तित करतात ! मंत्रमुग्ध होऊन मी शब्दांना केवळ ऐकत राहतो !!
कधी काळी आणलेल्या पाकळ्या पानाआड दडवून ठेवून आसमंतात अशा अनेक नात्यांची नावे शोधित फिरत राहतो !

- समीर गायकवाड.

( काही नाती अशी असतात की त्यांना नावं नसतात अन काही माणसं अशी असतात की ती आपल्या जगण्याची, ध्येयाची प्रेरणा होऊन जातात. त्यातून हाती काय येतं याची गोळाबेरीज करता येत नाही..एक तृप्तता लाभते हे नक्की. त्या तृप्तीच्या कॅनव्हासवरचे हे शब्दचित्र तुम्हाला स्वतःचेच वाटले तर त्यात नवल ते काय ! .... )

माझा ब्लॉगपत्ता -
https://sameerbapu.blogspot.in/2016/11/blog-post_15.html

Screen Shot 2016-01-01 at 12.13.38 pm.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर लेख. मी सेव्ह करुन ठेवणार आहे.

पण माझ्या निष्प्राण शब्दांना तिच्यासारखी माणसंच 'केसरिया बालमा'त परावर्तित करतात ! ---
हे वाक्य खूप भावलं....तसा तर सगळा लेखच कुठल्याही तरल, संवेदनशील मनासाठी आरसा वाटावा असाच आहे.
आणि मुख्य म्हणजे यात कुठेही तिच्यात व आपल्यात दुरावा आल्याची खिन्नता आणि दु:ख नाही.....
वाहत्या पाण्या सारखे असलेले निर्मळ, लख्ख नाते!

तेंव्हा वाहणारा तोच वाराच अजून वाहतो आहे, तेंव्हा तो गुलबकावलीच्या आरक्त फुलांचा देहभान हरपून टाकणारा गंध घेऊन यायचा.----हेही असंच एक वाक्य....:-) पुनर्प्रत्यय देणारं! कोवळ्या वयातले नवथर पण उत्कट भाव अधोरेखित करणारं......अनुभवलेले क्षणच जणू पुन्हा ओंजळीत आणून देणारं.. ....!!!

लिहीत रहा...तुमच्या त्या रेड लाईट एरीयातल्या गोष्टी वाचून तुमच्यातली ही कोवळीक आणि प्रातिभ झेप जाणवली नव्हती !

आयुष्यात अशी नाती असतात. पण सगळ्यानाच या नात्यातील आनन्द टिकवून ठेवत मनाच्या एका कोपर्यात जपून ठेवायल जमेलच अस नाही. अतिशय तरल पण तितकेच सशक्त लिहिले आहे. सगळ जणू बिनचेहेर्याचे डोळ्यासमोर उभ रहात होत.