स्फुट ३४ - हे तिला माहीत नव्हते

Submitted by बेफ़िकीर on 13 November, 2016 - 11:13

चुकुन माकुन
आपली आठवण येऊन
आलाच मुलगा आणि सूनबाई
अचानक सुट्टी काढून
शहराकडून गावाकडे
तर....

चुकुन माकुन
नाहीच मिळालं रेशन
नेहमीच्या दुकानात
आणि घ्यावी लागली विकत
धान्य आणि प्रतिष्ठाही
तर....

चुकुन माकुन
पडली नेमकी वरचीच कौलं
आलं रक्त डोक्यातून
नाहीच आला मुलगा बघायला
टाकलं कोणीतरी सरकारी दवाखान्यात
लागली तुटपुंजी बिलं भरायला
तर....

चुकुन माकुन
बोलावलंच मुलाने, सुनेने शहराला
नातवंड येऊ घातलंय म्हणून
आया का होईना, पाहिजे म्हणून
आणि काढावंच लागलं
दोन्ही वेळेसचं तिकिट
तर....

चुकुन माकुन
नाहीच उचललं कोणी आपलं प्रेत
जाळायला लाकडं कुठून आणणार म्हणून
लाकडांची तरतूद म्हातारीने करायला हवी होती
असे कोणी म्हणालेच
भले आपल्याला नाही समजले तरीही
असे कोणी म्हणूच नये
ही एकमेव इच्छा मनात असेल
तर....

तर....
ही पाचशेची नोट होती
त्या म्हातारीकडे
जी तिने दिली शेजारच्यांकडे
कधी मुलगा आलाच गावी
तर त्याच्या हातात टेकवायला
कुठे ना कुठे बदलेल तरी तो
असे वाटून

आणि म्हातारी बसली देवळासमोर
हात पसरून
हातात पडेल ते गिळत

देवासमोर पडणार्‍या नोटा
नवीन नोटा होत्या
हे तिला माहीत नव्हते

================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नोटबंदी झाल्याच्या तिसर्‍या दिवशी केरळच्या एका पेट्रोल पंपावर एक जख्खड म्हातारी पाचशेची एक नोट घेऊन सुट्टे मागायला आली होती. पेट्रोल भरणार्‍याला ती विनवत होती. त्याने फक्त नकारार्थी मान हलवली व ती म्हातारी उदास होऊन निघून गेली. ते दृश्य पाहताना सुचलेले हे स्फुट!

प्रतिसादांची भीक कधीच मागितली नाही, किंबहुना आलेल्या प्रतिसादांवरही काही बोलणे केव्हापासून बहुतांशी सोडूनच दिले होते.

पण त्या म्हातारीला पाहताना कसेसे झाले आणि त्यामुळे हे स्फुट सुचले. हे स्फुट कोणालाच भिडले नाही ह्याचा अर्थ मी कमी पडलो.

परवा एक कार्यक्रम आहे त्याची तयारी करताना हे स्फुट पुन्हा वाचले गेले व हे लिहावेसे वाटले.

चुकुन माकुन
नाहीच उचललं कोणी आपलं प्रेत
जाळायला लाकडं कुठून आणणार म्हणून
लाकडांची तरतूद म्हातारीने करायला हवी होती
असे कोणी म्हणालेच
भले आपल्याला नाही समजले तरीही
असे कोणी म्हणूच नये
ही एकमेव इच्छा मनात असेल
तर....--------------------़मनाला भिड्नारे

हॅपी demon डे मित्रो .

लोकांच्या पुनरावलोकना साठी,
2 वर्षांपूर्वी" नोटबंदी ने काय साध्य होईल" या बद्दल स्वतः:ची काय मते होती, ती आजच्या रिऍलिटी बरोबर ताडून पाहण्यासाठी धागा वर काढत आहे.