स्फुट ३३ - बिनडोक अनसूया

Submitted by बेफ़िकीर on 4 November, 2016 - 12:58

काडीची अक्कल नाही तिला
नांव मोठं फॅशनेबल
काय तर म्हणे अनसूया
आता ह्या नावाचा अर्थ काय?
तिला कोणाचा मत्सर वाटत नाही असा?
की तिचा कोणाला मत्सर वाटत नाही असा?
तिचा कशाला वाटेल कोणाला मत्सर?
हातात आहे ते घालवणारी बाई!

कातकरी रंग, कातकरी चेहरा, कातकरी लुगडं!
वय अठ्ठावीस!
एक पैसा कमवत नाही!
शिक्षण पाचवी!
पदरात दोन मुलं! दोघेही फुकटातल्या शाळेत!
नवरा शेतात राबतो! दिवसाला एकशे ऐंशी कमवतो!
पण ते आठवड्यातून तीनच दिवस!
बाकीचे चार दिवस काम मिळत नाही!
मग जातो जवळच्या नदीवर मासे धरायला!
वार्षिक उत्पन्न पंधरा हजार अधिक चार सहा मासे दिवसाला!

आणि ही अनसूया!
डोळ्यात दोन कोमेजलेले तारे!
बाकी जगाचा झळाळता सूर्य पाहून विषण्ण झालेले!
कांतीवर एक तकाकी!
कोणतेही अवडंबर जमत नसल्यामुळे आलेली!
आवाजात एक बसकटपणा!
अपेक्षा व्यक्त करायला आवाज वापरता येतो हे माहीतच नसल्यामुळे आलेला!

भगभगीत रंगाची साडी!
काळ्या रंगाला न शोभणारी!
आपलं अस्तित्वच कुठे शोभत नाही तर साडी कशाला शोभायला हवी?
हा विचार मुरलेला!
केस चप्प! चेहरा चप्प! नाकात नथ! हातात बांगड्या! कानातले, गळ्यातले, पायातले!

झिरो बी एच के च्या पत्र्याच्या खोलीत
प्रकाशाला मज्जाव करत
घामाने भिजून जात
चकचकीत भांडी आवरून ठेवत
आरश्यात पाहून, क्षणभर ओठ मुडपत
अनसूया उघडते एक कवाड त्या खोलीचे!
पराजितांच्या छावणीत,
उन्मादाने जेत्यांचे सैनिक घुसावेत,
सगळे काही उधळायला, भोगायला,
तशी सूर्याची किरणे घुसतात भस्सकन् आतमध्ये
पण अनसूयाच्या पोलक्याखाली दिसणार्‍या
पाठीच्या कण्याच्या खुणा पाहून त्यावरच भाळतात
आणि चमकवत ठेवतात तिचा संपूर्ण कणा!
ज्याचं वाकणंही आता डौलदार आणि भयकारक ठरतं ह्या जात्यंध समाजासाठी!

चटई टाकून उठताना,
सावळ्या, लकाकणार्‍या मांड्या आणि आरश्यासारखे गुडघे
वर सरकलेल्या लुगड्याला खाली सरकवत झाकून घेते अनसूया
आता तिला विसरायचं असतं स्वतःच स्त्रीत्व!
तिला बनायचं असतं एक व्यक्ती!

चुलीवरती एका मोठ्या पातेल्यात तांदुळ शिजायला ठेवून
अनसूया कंबरेत वाकून दारातून बाहेर पाय टाकते!
आजूबाजूची वस्ती, शहराला झालेल्या महारोगासारखी,
गलिच्छ, अस्ताव्यस्त, दुर्गंधीयुक्त,
किडे, डुकरे, कुत्री, कावळे आणि माणसे ह्यांच्यात एक अद्भुत समानता!
गटारे, कचरा, विष्ठा आणि पाण्याचा नळ, सगळे एकत्रच!

अनसूया एक श्वास भरून घेते
अख्खी वस्ती तिच्या छातीला हवेसारखी व्यापते
मग ती सुटते हाका मारत!

ये ममडे, आक्कावं, यशला धाडीव
मन्षाताय, गोकुळ कुटाय?
एक नाही, दोन नाही, नेहमीच्याच दहा, पंधरा हाका!

अचानक वस्तीतल्या बायका,
हातात एकेक नागडं उघडं मूल घेऊन धावतात
झिरो बी एच के च्या खोलीसमोर पोराला आदळतात
आठवड्यात आंघोळ न केलेली
राठ केस झालेली
डोळ्यांत कसलेही भाव नसलेली
उघडी, नागडी, काळीकुटटं, घाणेरडी दिसणारी,
वय वर्षे दोन ते पाच,
मातीतले काहीही खाणारी
आई बाप फेकतील तिथे वळवळत, सरपटत बसणारी
वीस, पंचवीस बालके
ताब्यात जातात अनसूयाच्या!!!!

पत्र्याच्या खोलीत एकच कालवा होतो
ही रडारड
ह्या मारामार्‍या
ही एवढाल्ली भोकाडं
धिंगाणा, नाच, कल्ला!
अनसूया घश्याच्या शिरा ताणून निर्माण करते एक क्षणभंगुर शांतता,
एक तकलादू शिस्त

मग गाणी सुरू होतात
अ ब क ड म्हंटले जाते
देशाचे नांव शिकवले जाते
खेळ होतात
शेवटी चुलीवरचा भात एकदाचा खाली उतरतो
त्यात मीठ घालून अनसूया ठेवते तो गरम गरम ढीग मधोमध
बालके उधळतात आणि ताव मारतात
अनसूयाच्या डोळ्यांमधील तारे एकदाच चमकतात
त्या चमकेपुढे कैक सूर्य शरमतात
बालके ढेर्‍या फुगवून बाहेर पडतात
त्यांच्या आई बापांचे डोके फिरते
आली ब्याद पुन्हा घरात म्हणतात सगळे आई बाप
अनसूया निदान दोन तास तरी आपला त्रास वाचवते म्हणतात

संध्याकाळी नवरा येतो
चार, सहा मासे फेकतो तिच्या समोर
बिनडोक अनसूया त्याची एक लाथही खाते
लष्कराच्या भाकरी भाजत असल्याबद्दल
मुले तिच्या चेहर्‍याकडे पाहून फिदीफिदी हसतात
बाईला मारायचंच असतं हे शिकूनही घेतात

रात्री निजानिज झाल्यानंतर
हळूच उठते बिनडोक अनसूया
बाहेर पडते
न दिसणार्‍या सूर्याकडे बघत थुंकते
कुत्री, डुकरे, दारुडे चुकवत जाते मुतारीपाशी
अंधारात बसते, इकडे तिकडे बघत, उघड्यावरच, अंधाराच्या सोबतीने!

आता तिला ऐकू येत असतात
घराघरातून शिव्या, मारहाणीचे आवाज!
त्याच मुलांचे विव्हळणे
नवर्‍याची लाथ अजून दुखत असतेच
बिनडोक अनसूया त्या अंधारात
एकच अश्रू ढाळते

त्या अश्रूच्या माध्यमातून जमीनीवर गळून पडतात
मागासलेपणाच्या चवडी
निरुत्साहाचे ढीग
निराशांचे थर
वेदनांचे साठे, मेहनतींचे गठ्ठे

आणि मग
त्या सर्वांपासून मुक्त होत
पुन्हा उठते अनसूया
उद्याचा बिनडोकपणा करायला तयार होते

==============================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users