एटिकेट्‌स श्रिंप आणि श्रीमंती !

Submitted by Charudutt Ramti... on 4 November, 2016 - 09:01

' नीट उभा रहा...! '
' अरेsss निदान शर्ट तरी नीssट 'इन' करायचास ! '
' तुला न कुठे न्यायचि म्हणून सोय नाही! '
' हे कुठ काय पच्केल याचा नेम नाही. '
' तू ज़रा बाहेर थांब...मी आत जाउन आले ’ ( इति. पुर्वी आई, हल्ली सौ. )

ही अशी असंख्य वाक्यं, लहान पणा पासून जो माणूस स्वत: विषयी ऐकत आला आहे, त्याला ‘एटीकेट्स’ नावाच्या दुर्धर अश्या मानसिक आजाराची संपूर्ण कल्पना असते.

एटीकेट्स चा जन्म हा जेवण्याच्या पंगती किंवा बुफे पासून सुरू होतो. (लीज्जतवाला) ऊडदाचा पापड आवाज न करता कसा खायचा? आमरसपुरीचा आस्वाद भुर्का न मारता कसा घ्यायचा? आम्रखंड हे वाटीत तर्जनी बुडवून खायचे पक्वान्न, त्या प्राणप्रिय अश्या थंडगार आम्रखंडा चे शेवटचे बोट न चाटता ‘हळहळत’ पानावरून कसे उठायचे? ह्या सगळ्याची बळजबरी करवून घेतलेली प्रॅक्टीस म्हणजे एटिकेट्स.

आपल्या घरच्या किंवा आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलेल्या एखाद्या कार्याला गेलो की मला दुसर्याने दिलेल्या गिफ्ट चे चमचमते रॅपर उघडून आत काय आहे हे एखाद्या लहान मुला प्रमाणे ताबडतोब पाहण्याचा फार मोह होतो...पण 'अहो हे आणि कशाला...?' असे म्हणत मी आयुष्यभर एकटिएटस या नावाखाली नुस्त 'मन' मारत आलोय. मला एकदा फार इच्छा आहे. की समोरच्याने दिलेल पाकीट त्याच्या समोरच उघडून त्यातल्या नोटा मोजत 'ते वेळात वेळ काढून आले ह्याच समाधान' व्यक्त करायच आहे. पण ह्या एटिकेट्स च्या लफड्या मधे त्या समोरच्याला इच्छा असूनही आम्रखंडात तर्जनि बुडवून ते खाता येत नाही आणि मला त्याच्या समोर नोटा मोजून मागच्या पाकिटात घालता येत नाहीत.

एकदा मागे असेच मी आणि आमची सौ. आम्हीही कसे श्रीमंत आहोत हे हिच्या मैत्रिणी ला पटावे म्हणून मैत्रीण, तिचा नवरा आणि आम्ही दोघे, उगाचच अती महागड्या अश्या फाइन डाइनिंग रेस्तोरंट मधे जेवायला गेलो. ह्या फाइन डायनिंग वाल्या रेस्तोरंट मधे काहीही कारण नसताना खिशाला जबरा ‘फाइन’ बसतो. मला खरतर अश्या महागड्या हॉटेल मधे उगाचच त्या 'वेटर' 'स्टुअर्डस' आणि 'क्रू' च दडपण येत. का ते माहीत नाही. पहिल्या पासून ! विशेषता: मला मागे एकदा ऑफीस मधल्या कुणी तरी सांगितल् 'की ह्या फाईव स्टार मधल्या वेटर्स ला आपल्या पेक्षा जास्त पगार असतो' हे ऐकल्या पासून तर हे अनामिक दडपण फारच वाढल. अहो फाईव स्टार मधे दडपण न यायला तुम्ही एकतर प्रत्यक्ष रतन टाटा तरी पाहिजे 'नाहीतर रंगीला मधले 'अमिरखान’ तरी! आमच्या सारखे अर्धवट इंगीनीरींग शिकून ऑटोमोबाइल कंपनी मधे असेंब्ली लाईन वर सूपरविजन करणारे ‘मिस्त्रि’ 'ताsज' बीsज च्या लायकिचेच नाहीत.

तरी पण आम्ही “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः” म्हणत बायकोचा शब्द खाली न पाडता त्या उच्चभ्रू खाणावळीत गेलोच. जायच्या आधीपासूनच…'अहो फक्त इंग्रजीत बोला हा वेटर शी तिथल्या ! ' अशा सूचना देत देत मला सौ. एटिकेट्स चे डोस ( किंवा सूप ) पाजत होती. माझ अश्या वेळी कुणी ब्लड प्रेशर चेक केल तर तर किती भरेल...दीडशे बाय नव्वद तरी नक्की अशी शंका येते.
कारण सूपच्या लिस्ट मधले एकही नाव ओळखीच नसत. ईंग्लिश भाषेत त्या फ्रेंच 'डिश' ऑर्डर करता करता नाकी नौ येतात.

' मिँट्रोन सिझर सूप ' हे सगळ्यात स्वतातल असत. पण ते ही साडेतीनशे रुपये. मग 'ते वन बाय टू' मागावायच की सूप न मागवता सरळ 'गुजराती थाली' है क्या तुम्हारे पास अस त्याच्या अंगावर खेक्सायच?'
मग त्यातल्या त्यात मध्यम मार्ग...दोन फुल्ल सूप मागवयाचे. आणि 'शेयर' करायचे. नवरा बायको मधे. काय करणार गरीबी वाईट.

मी इंग्रजी मधे ' सsव ( 'आर' साइलेंट ) टू 'मिँट्रोन सिझर सूप प्लीsज.. वूई लाइक फ्रेंच सूप्स'

“डेफनेट्ली स्स...! ब(t) ले(t) मी छे(t)ल यु...मिँट्रोन इस इटालिय्न न वि सs(r)व विथ श्रिंप”

फुकणीच्या फ्रेंच असुदे, इटॅलियन असुदे नाहीतर 'चायनीज' तू आन् म्हणल की आनायच...आपली एकदा का सटक्ली की मंग काय खर नाय हा आदिच सांगतोय...!! ( हे माझ्या वरील झालेल्या एटीकेट रूपी संस्कारांचे आणि मी जिवापाड जपलेला रांगडे पणा ह्या दोन्हीच माझ्या मनातल द्वन्द ह्यांच एक छोटस अव्यक्त अस गोंडस रूप... )

“ओह श्रिंप...! डॅट्स कूल.."… माझ्या खोटारडे पणा चा कळस झालेला (एटिकेट्स खोटारडे पणा म्हणून हीनवणे ह्या इतके बॅड मॅनर्स दुसरे नसतील.). तू श्रिंप घाल नाहीतर विंचू घाल आमच्या सुपात. आम्ही चिमटी मधे पकडून बशित ठेऊ त्याला, आणि उरलेल सूप घटा घटा पीऊ. (परत एकदा तेच मघासचच ते अव्यक्त अस गोंडस रूप...)

इकडे माझे हे 'एटिकेट्स' चे जादूचे प्रयोग सुरू असतात आणि तिकडे खाली 'ही' तिच्या पेन्सिल हिल्स सॅण्डल्स ने माझ्या 'कोल्हापुरी' छप्पल ने पायावर वारंवार 'वार' करून मला काहीतरी खुणावत असते. शेवटी मी चिडून दोन्ही पाय एकमेकांमधे अडकवून खुर्ची च्या मागे तिच्या 'सॅण्डल्स' च्या रेंज पलीकडे जातील असे नेऊन पार्क करतो. माझा पाय हिच्या सॅण्डल्सच्या 'कवरेज क्षेत्रा च्या बाहेर गेलाय हे लक्षात आल्यावर ती तीच कोपर माझ्या बरगड्या आणि लहानआतडी असतात त्या जागी पोटावर बाहेर च्या बाजून शर्ट आणि बाही ह्यांचा मधोमध घुसवयचा नवा कार्यक्रम सुरू करते. माझी अवस्था 'श्रिंप नको पण ढोपर आवर' अशी बापुडवाणी. म्हणून मला हे फाईव स्टार मधले 'श्रींप' आणि 'श्रीपंती' चाळे आवडत नाहीत ते ह्या साठी.

एटीकेट्स हा विषय केवळ एका मोठया ग्रंथाचा नव्हे तर ग्रंथ मालिके चाच आहे खरतर. म्हणजे सावरकरांचे समग्र वान्ग्मय खंड एक ते खंड तेरा… किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया पार्ट ३ ऑफ ७ ! त्या धर्तीवर 'एटीकेट्स- अ होलिसटिक परस्पेक्टिव इन द हींटरलॅंड ऑफ मॉडर्न इंडिया' असं जर पुस्तक कुणीतरी ( कूणीतरी म्हणजे मी च ! ) लिहायच ठरवल तर कदाचित् एखादा ‘जन्म’ सुद्धा अपूरा पडेल. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळी मात्र काय काय एटिकेट्स पळावे लागतात त्यावर सध्या फावल्या वेळात अभ्यास करतोय.

चारूदत्त रामतीर्थकर
४ नोव्हे. १६ (पुणे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा लेख आवडला, पण यातून काही प्रश्न पडले.

म्हणजे जसे फ्रेंच जेवणाला त्यांचे एटिकेट्स असतील तसेच भारतीय जेवणालाही आहेतच ना. कोणी पोळी भाजी खाताना जर सुरी आणि काटा वापरायला लागले तर आपण नाक मुरडणार नाही का ? तंदुरी तंगडी उगीचच काट्या चमच्याने फाडायला लागलो तर कसे वाटेल. शेवटी जागा आणि पदार्थ यांचे एक नाते असते असे मला वाटते. आता मी पास्ता अगदी व्हाईट ट्रफल्स घालून घरी बनवला आणि तो हाताने भुरके मारत चापला किंवा काट्या सुरीने नीट टेबलावर बसून खाल्ला तरी मला कोणी काही म्हणणार नाही. त्यामुळे खाणे खाणे असते आणि एटिकेट्स हे जागानिहाय असतात असे वाटते.

मस्त खुसखुशीत लिहिलयं .
हे सगळ्यांसमोर जेवणं म्हणजे डोक्याला जाम त्रासदायक असतं , जेवण्याकडे लक्ष देण्याऐवजी बाकीच्या गोष्टींकडेच जास्त लक्ष द्यावं लागतं. Proud

कोणी पोळी भाजी खाताना जर सुरी आणि काटा वापरायला लागले तर आपण नाक मुरडणार नाही का ? तंदुरी तंगडी उगीचच काट्या चमच्याने फाडायला लागलो तर कसे वाटेल.>>>> त्यावरून आठवलं . आमच्या ऑफिसमध्ये एक महान युवती होती. ती उडदाचा तळलेला पापड पण चमच्याने मोडून , चमच्यानेच खायची .

खुसखुशीत लिहिलेय Happy

जेवावे अश्याच जागी जे आपल्या लिविंग स्टॅण्डर्डला मॅच करेन.
त्यापेक्षा भारी जागी जेवले की उगाच दडपण येते. तसेच त्यापेक्षा हलक्या प्रतीच्या जागी जेवलो तरी जेवणातला आनंद उचलता येत नाही. एकूणच दोन्हीकडे पोट फक्त अन्नाने भरते पण समाधानाने नाही.

तू श्रिंप घाल नाहीतर विंचू घाल आमच्या सुपात >>> Biggrin

अव्यक्त अस गोंडस रूप... >>> Biggrin

धनिला अनुमोदन. आपल्या जेवणावळींमध्ये पण काही कमी कटकटी नसतात.

एकूणच दोन्हीकडे पोट फक्त अन्नाने भरते पण समाधानाने नाही.>>> व्वा: ऋन्मेष!!! मस्त वाक्य लिहिलंत. अगदी खरंय!!

काही गोष्टी आपण जीवनात नित्यक्रमानुसार अनुसरत असतो, वागत असतो, भोगत असतो. पण ऋन्मेषसारखं अचानक कोणीतरी तीच गोष्ट आपल्या नजरेस आणून देतो. आणि आपण म्हणतो "अरे, खरंच की! हीच गोष्ट माझ्या कशी नाही लक्षात आली इतक्या दिवस?" आणि म्हणूनच त्यांना ऋन्मेष म्हणतात.

लिहिलेय की लेखकांनी आमरस्/श्रीखंड खायच्या एटीकेटसबद्दल.
तरी का बरे प्रश्न पडावा?

३अ, मी डोसा कधीही काटे चमच्याने खात नाही.
इथे कर्नाट्कात तसेही काटे देत नाहीत डोश्याबरोबर, सांबारासाठी चमचा देतात फक्त!

बाकी आपण बिन्धास्त असलो की फाईव स्टार असो की घरगुती खानावळ, काही प्रॉब्लेम येत नाही हॉटेलात तरी.

फुक्कट खाणार नसतो. रूपये मोजणार असतो.
Happy

पण काही लोकांकडे फिंगरटीप्स शिवाय हाताच्या कुठल्याही भागाला अन्नाचा स्पर्ष होता नये ,मचमच आवाज येऊ नये, तोंड उघडून जेवू नये, दुसर्‍याच्या ताटात हात घालू नये , आधी पोळी मग भात खावा-पोळीला लावून भात खावू नयेअसे एटीकेटस असतात (म्हंजे माझ्याकडेच) तर त्यावेळी बाकीच्यांना त्रास होऊ शकतो.

पण काही लोकांकडे फिंगरटीप्स शिवाय हाताच्या कुठल्याही भागाला अन्नाचा स्पर्ष होता नये ,मचमच आवाज येऊ नये, तोंड उघडून जेवू नये, दुसर्‍याच्या ताटात हात घालू नये , आधी पोळी मग भात खावा-पोळीला लावून भात खावू नयेअसे एटीकेटस असतात (म्हंजे माझ्याकडेच) तर त्यावेळी बाकीच्यांना त्रास होऊ शकतो.> साती, माझ्याकडेही. (म्हण्जे मीच ठरवलेले :-)) आणि हे मस्ट आहेत.

मी दक्षिणेकडे पहिले होते, ते लोक थ्री स्टार हॉटेल मध्येही रस्सम भात हाताने कालवून खातात आणि त्यात त्यांना वावंगेही काही वाटत नाही.

मी दक्षिणेकडे पहिले होते, ते लोक थ्री स्टार हॉटेल मध्येही रस्सम भात हाताने कालवून खातात आणि त्यात त्यांना वावंगेही काही वाटत नाही.

रस्सम भात हाताने कालवून खातात>>

मुठीने भात खातात मस्त! दहिभात कालवून तर आहाहा! तळहाताचा मधला खळगा पण छान भरायला हवा त्या दहिभाताने!

पण मस्त! लेख... आमरस चमच्या पेक्षा हाताने फुरक्या मारतच खावा! श्रीखंड बोटाने वाटी चाटून पुसुन तर गरमा गरम कढीची वाटी तोंडाला लावून फुरका ओढतच प्यावी तरच त्याची चव!

मघापासून खाण्याच्या गोष्टी वाचतोय, तोंडाला पाणी सुटलंय ना, राव! अजून घरी पोहचायला उशीर आहे. तोपर्यंत दम कसा धरवणार? Sad

त्या तिथे पलिकडे मला आवडणारे खाद्यपदार्थ मला असे खायला आवडतात असला काहीतरी बीबी होता. कुणीतरी तो उकरून काढा बरे. त्यात लई धक्कादायक कॉम्बो आहेत म्हणजे असे की चहात भजी बुडवून खाणे इत्यादि. मी हाताने डोसा खाऊ लागताच आजूबाजूचे पब्लिक माक्झ्याकडे ' वडिंग्यावरून आलेला ' , ' पौडाचा पावना ' ' अलीबागसे आयेला ' अशा दृष्टीने पाहतात. काब्रं ?

कारण तुमच्यासारखे ब्युरोक्रॅट्स साध्या साध्या उडुपी हाटिलात किंवा टपरीवर खात नाहीत, मोठ्या मोठ्या स्टार हॉटेलात जातात.
आणि आपल्या पुढ्यातलं खाण्याकडे लक्ष देण्यापेक्षा कोण आपल्याकडे बघून काय विचार करतंय तिकडे लक्ष देतात.
Happy

छान वर्णन. गंमत वाटली. एटिकेट्स च्या नसत्या कल्पना धरून स्वतःचीच कशी फजिती/गैरसोय करून घ्यायची याचे वर्णन.

मला असा राग येतो - भारतीय लोक भारतातच राहून, भारतीय अन्न खाताना (हो, उगाच श्रिंप नि चिकन घालून फ्रेंच नाव दिलेले पदार्थ असले तरी ते भारतातच बसून खाताहेत ना लोक? ) मग या परकीयांच्या एटिकेट्स कशाला पाहिजेत?

आता आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टी, एटिकेट काहीहि असो, पाळायला पाहिजेत, जसे शिंकताना, खोकताना, तोंड बाजूला करून, नाकासमोर रुमाल धरून शिंकावे. कारण त्यामुळे जंतू पसरत नाहीत. ढेकर देणे म्हणजे जेवण पोटभर झाल्याची पावती हे जरी खरे मानले तरी आजूबाजूच्या लोकांना जर ते आक्षेपार्ह वाटत असेल तर करू नये. इतरांसमोर कराकरा अंग खाजवणे अश्या गोष्टी मला नि बर्‍याच जणांना आवडत नाहीत. अगदी सूट नाही तरी पुरेसे कपडे अंगावर असावेत.

खरी महत्वाची सवय जी भारतीय अजून शिकले नाहीत ती म्हणजे वेळेवर येणे!

'हुच्च' हाटेलात गेल्यावर जे करू नये असे एटीकेट वाल्यांचे म्हणणे असते ते मी आवर्जून करतो:
१. खाण्यापूर्वी बेसिनवर जाउन मस्त हात धुतो.
२. खाणे मागवण्यापूर्वी त्याची किंमत व्यवस्थित बघून घेतो ! काय हवे ते वेटरला मराठीत सांगतो.
३. सूपाचे बाउल व जेवणाची ताटली चाटून्पुसून साफ करतो.
४. जेवणानंतर पुन्हा बेसिनवर जाउन हात धुतो व खिशातल्या रुमालाने नीट तोंड पुसतो. त्या 'फिन्गर बाउल' व कागदी टिपकागदांची ऐसी की तैसी !
५. बिल पाहिल्यावर त्यातील आकड्यांची व्यवस्थित तोंडी बेरीज करतो
६. बर्‍याचदा बिल काउंटर वर जाउनच देतो.
...... आपल्या चांगल्या सवयी अन संस्कार महत्वाचे..... बाकी हुच्चपणा फाट्यावर घ्यायचा.

@ कुमार१, आपण सांगितल्या तशा सहा गोष्टी मीसुद्धा अगदी तश्याच करतो. एकही कमी नाही कि जास्त नाही. कसे काय आपण ओळखले हो? तुमचे आमचे जमले. Biggrin

मी बिल काऊंटरवर देत नाही.
टीप देते सर्विसनुसार.
एखादा पदार्थ आवडला तर आवर्जून वेटरला किंवा मालक ओळखीचे असतील तर त्यांना तसे सांगते.
काही धंद्यात टीप मिळणार हे गृहित धरूनच पगार ठरवलेला असतो.

उदा. आमच्याच हास्पिटलात आम्ही मेडीसीन युनिटमधल्या स्टाफला पगार जास्त देतो कारण त्यांना शक्यतो पेशंट्सकडून टीप मिळत नाही.
तेच गायनॅकमधल्या स्टाफला कमी देतो कारण प्रत्येक नव्या जन्माबरोबर त्यांना बक्षिसी मिळतेच मिळते.

तर वेटर, हॉटेलबाहेरचा रखवालदार यांना लोक टीप देणार अश्या हिशोबानेच त्यांचा पगार ठरलेला असतो.

अर्थात स्वतःचे पैसे द्यायचे असल्याने टीप द्यावी का नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.

बाकी खाण्यापूर्वी खाण्यानंतर हात धुणे, बिलाची बेरिज करणे आणि वेटरला समजेल अश्या भाषेत ऑर्डर देणे हे करतेच.

पण सूपचा बोल आणि ताटली चाटून पुसून साफ करत नाही.
Wink

सूप आवडते असल्यास शेवटाले त्याचा बौऊल जरासा तिरपा करून शिल्लक काही राहणार नाही याप्रकारे शेवटचा चमचा भरून घ्यायचा मोह हा होतोच. त्यावर जो विजय मिळवतो तो या एटीकेटसच्या परीक्षेत दोन गुण मिळवतो.

मस्त लिहिलंयत. काही पंचेस जबरी.

मी चिडून दोन्ही पाय एकमेकांमधे अडकवून खुर्ची च्या मागे तिच्या 'सॅण्डल्स' च्या रेंज पलीकडे जातील असे नेऊन पार्क करतो. >> Biggrin

आमच्याकडे नवरा एटिकेटस वाला प्राणी. मला जाम आवडत नाहीत ते हाटेलातले एटिकेटस. आम्ही दोघं एकत्र हाॅटेलमध्ये गेलो की त्याचं सगळं लक्ष माझ्याकडे. कुजबुजत असं कर तसं कर असल्या सुचना सारख्या चालू. वैताग येतो.
एकदा मी शिस्तीत काट्याचमच्याने कटलेट खात होते. तरी याची कुजबुजती कटकट चालू झाली. बहुतेक मी काटा, चमचा चुकीच्या हातात धरले होते.. याने काय फरक पडतो?? Uhoh वैतागून सांगितलं शेवटी "बस की आता नैतर हाताने खाईन बघ."
नवरा मला चांगलाच ओळखून असल्याने गप पुढ्यातलं खायला लागला.

Pages