दिवाळी अंक २०१६

Submitted by भरत. on 3 November, 2016 - 22:49

दिवाळी अंक बाजारात, घरांत, वाचनालयांत येऊन खूप दिवस झाले. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षरगंध : संपादन मधुवंती सप्रे

"१८/१९ व्या शतकात शंभरेक वर्षांपूर्वी ज्या स्त्रियांनी प्रतिकूल परिस्थितीत , संघर्षमय वातावरणात शिक्षण घेतलं, अशा आठ स्त्रियांच्या आत्मकथनात्मक पुस्तकावर आधारित 'शिक्षणासाठी दाही दिशा'" हा या अंकाचा मुख्य विषय.
आनंदी (बाया) कर्वे : महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी एवढीच आतापर्यंतची ओळख मला माहीत होती. त्यांचं व त्यांच्या आईचं खडतर आयुष्य, बालविधवा म्हणून जगणं, भावामुळे मुंबईला आल्याने शिक्षणाला सुरुवात, कर्व्यांशी पुनर्विवाह, पंडिता रमाबाईंच्या प्रभावामुळे विधवा व उपेक्षितांसाठी , विशेषतः त्यांच्या शिक्षणासाठी स्वतःहून जबाबदारी उचलणे ते उतारवयात आश्रमासाठी फंड गोळा करणे हा सगळा प्रवास या लेखात आला आहे.
बायांचा पुनर्विवाह झाल्यावर त्यांच्या आईवडिलांना समाजाने वाळीत टाकले व १०० रु. दंड वसूल करून पुन्हा जातीत घेतले हे वाचून अलीकडच्याच एका घटनेची आठवण झाली.
कर्व्यांच्या आश्रमात स्त्रीशिक्षणाव्यतिरिक्त अन्य सुधारणांना वाव नव्हता, सोवळेओवळे पाळले जाई, विधवांना केस वाढवू देत नसत, पुनर्विवाहाचा विषयही निघत नसे (कारण असे केले तर मुली इथे शिकायला येणार नाहीत) अशीही एक नोंद आहे.
दुसरा लेख पार्वतीबाई आठवलेंवर आहे. या बाया कर्वे यांच्या भगिनी. बालविधवा, बायांनीच त्यांना मुंबईला आणले. शिक्षण देवविले. आश्रमासाठी वर्गणी जमा करण्यासाठी त्या देशातच नाही, तर परदेशांतही फिरल्या, याबद्दल यापूर्वी वाचले आहे.
रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्रात पतीच्या निधनापर्यंतचाच भाग आहे. या लेखात रानड्यांच्या निधनानंतर रमाबाईंनी केलेल्या अतिशय महत्त्वाच्या सामाजिक कार्याची सविस्तर नोंद घेतली आहे. शिकण्यामुळे सासरी किती त्रास सहन करावा लागला याचे वर्णन अर्थातच आहे.
शांताबाई कांबळे , यशोदाबाई आगरकर, उषा डांगे, आनंदीबाई शिर्के, पार्वतीबाई ठोंबरे यांच्याबद्दलचे लेख अजून वाचायचेत.
शिल्पकार सदाशिव साठे, ४ स्त्री चित्रकार, केशवराव कोठावळे यांच्याबद्दल तीन विभागांत लेख आहेत.
'घर आणि कला' या संकल्पनेवर आधातित काही कलावंतांचे आणि एका सैनिकाच्या पत्नीचा असे लेख आहेत.

अक्षर : विशेष लेखमाला - हिंसेचे दशावतार; जे एन यू - अमेय तिरोडकर मृदुला बेलेंची टोक्यो डायरी, (कॅथेटरची) आफ्टर टेस्ट - सोनाली नवांगूळ, सोन्याचा पिंजरा (सिंगापूर)- अलका धूपकर , स्टेम सेल रिसर्च संबंधी प्रसन्न करंदीकर, कर्जबाजारीकरणाबद्दल (कर्जबाजारीपणा लिहीत होतो, ते करण झाले, तसंच राहू देतोय( संजीव चांदोरकर आणि (खेळांच्या) लोकप्रियतेचे चार प - निमिष पाटगांवकर हे लेख आहेत.
सतीश तांबे, पम्कज भोसले, विवेक गोविलकर, रुपाली जगदाळे, अविनाश राजाराम यांच्या कथा.

संतुलन साधायला म्हणून Wink पुढचाच अंक किस्त्रीम
अ‍ॅडव्हान्टेज मोदी - विजय लेले ; आव्हानांचा गुंता - श्रीपाल सबनीस ; मी खरंच जातीवादी आहे - ह मो मराठे, स्वजातीवर्चस्वाची नवी बखर, श्यामसुंदर मुळे, अस्पृश्यता निवारणाचे सातवे सोनेरी पान- अनिरुद्ध बिडवे, असहिष्णुतेचा बळी- वैदिक विज्ञान - सतीश कुलकर्णी, हिंदुद्वेषाचे मूळ - दादूमियां, पुढचे राजकारण कसे असेल - अनिल जोशी हे किस्त्रीमचे नियमित लेखक्/विषय आहेत.

भरत., धन्यवाद! अक्षरगन्ध लायब्ररीतून आणून वाचेन नक्की.

सध्या मेनका, माहेर, मिळून सार्‍याजणी, अनुभव, मुशाफिरी हे अंक घेतलेत. पासवर्ड आणि कॉमेडी कट्टा लेकीसाठी घेतलेत.
मेनकामधली सखी गोखले आणि शुभांगी गोखलेची मुलाखत खूप छान आहे. नमस्कार करते की आशीर्वाद देते अश्या काहीतरी टूकार नावाची अतिशय टूकार कथा आहे. ती वाचून भयंकर चिडचिड झाली. अश्या कथा मेनकामध्ये कश्या काय ह्याचं सखेद नवल वाटलं.
माहेरमधली सचिन कुंडलकरची कथा आवडली. विशेषकरून शेवटचा परीच्छेद खूप आवडला. कथा सगळ्यांनाच आवडेल असं नाही, पण नेटाने शेवटच्या अक्षरापर्यंत वाचली तर पोचू शकेल.

मौजचा दिवाळी अंकही नेहमीप्रमाणेच सुंदर आहे. अजून पूर्ण वाचून झाला नाही. रवींद्र अभ्यंकरांचा गो नी दांडेकरांच्या आठवणींबद्दल लेख आहे. बगदादपर्व- श्रीरंग भागवत हा एका वेगळ्याच अनुभवाबद्दलचा लेख, कथा फुलपाखरांची- विनया जंगले, शेळक्यांचं घर, साधनेचा वाडा- अनिल अवचट, अधुरी एक कहाणी हा दुर्गाबाईंच्या बद्दलचा अंजली कीर्तने यांचा लेख, जपानी नरभक्षक- गोविंदा तळवलकर, सरोवर ही मिलिंद बोकीलांची लघुकादंबरी, अदृश्य ही आशा बगे यांची कथा हे काही हायलाइट्स.

लोकप्रभा दिवाळी अंकात प्रीति छत्रे यांची 'पहिला धडा' ही प्रथम पुरस्कारप्राप्त कथा आहे.
हा अंक पर्यटन विशेषांक वाटावा असा आहे.
बदलत्या कुटुंबाची बदलती गोष्ट हे सर्वेक्षण वेगळं वाटलं.

लोकसत्ता मुखपृष्ठ देवदत्त पाडेकरांनी काढलेलं चित्र. त्यांनीच लिहिलेला पानभर मजकूरही आत आहे.
लेख
गिरीश कुबेर -> व्लादिमिर पुतिन
विजय पाडळकर - तीसरी कसम
अनिल अवचट - पँक्रींची कमाल
रवि आमले - नेताजी फाईल्स
माधव वझे - शेक्सपीअर
साचिन दिवाण - शंभरीचा रणगाडा
सत्यशील देशपांडे - एक सदारंग खयाल
अतुल पेठे - सर्जनचिंतन - आत आणि बाहेर
काही प्रवासवर्णनं, देशोदेशीचे ट्रम्प (पाठ्यपुस्तकातला देशोदेशीचे ज्ञानेश्वर हा धडा आठवला) आणि काही कंपन्यांच्या कार्यसंस्कृतींवर लेखमाला.

कविता नाहीत, एकमेव कथा महेश केळुस्करांची. आणि राशिभविष्य.

परिवर्तनाचा वाटसरू अंक 'बदलता गुजरात' या थीमवर आहे.
आयन रँड, रामलाल व गीता नागभूषण यांच्या कथा/दीर्घकथांचा अनुवाद.
चित्रकार सुझा यांच्यावरचा सुधाकर यादव यांचा लेख.

वसा भारताच्या नकाशाला वरून वीज पडल्यासारखी पडलेली भेग आणि तीतून पसरलेले रक्त. असं मुखपृष्ठ आहे.
'राष्ट्रवादा'ची समीक्षा या अंकात केली आहे.
राधिका वेमुला, जिग्नेश मेवाणी, मराठा आंदोलन, भारतीय राष्ट्रवाद, देशभक्तीचे सद्य रूप, देशद्रोहाच्या घोषणा, बुद्धिवाद्->धर्मवाद, संघ-आंबेडकर असे गेल्या वर्षभरात वाजत असलेले मुद्दे या लेखांत हाताळले आहेत.
जयंत पवार आणि चंद्रकांत भोंजाळ यांच्या कथा आहेत.
जपानवरच्या अणुहल्ल्यातून बचावलेल्या मुलांची मनोगतं (अनुवादित)

मुक्त शब्द
सगळ्यांत महागडा अंक असेल. २५० रु. फक्त
कृष्णा रेड्डी यांनी काढलेले जेलीफिश हे चित्र मुखपपृष्ठावर. त्याविषयी प्रभाकर कोलते यांनी लिहिलंय. संपादकीयात शिक्षणक्षेत्राविषयी चिंता आणि चिंतन आहे.
सानिया आणि मिलिंद बोकील यांनी अनुक्रमे अंबिका सरकार व अशोक सासवडकर यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत.
वंदना भागवत, जी के ऐनापुरे, कृष्णात खोत, मनस्विनी लता रवींद्र, प्रशान्त बागड, सतीश तांबे यांच्या कथा.

लेख :
जयप्रकाश सावंत - क्र्त वोल्फ - काफ्का आणि टागोर यांचा प्रकाशक
संपत देसाई , केशव वाघमारे, आनंद तेलतुंबडे - मराठा क्रांती मोर्चा (वेगवेगळे लेख)
हेमंत देसाई - सात्यकीची कैफियत (नथुराम गोडसे - सात्यकी सावरकर)
ज शं आपटे - न्यायमूर्ती रानडे
सुकन्या आगाशे - ताटकावध

विचारतुला
महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग
मुसोलिनी आणि गोळवलकर
सावरकर आणि भगतसिंग
मार्क्स- लेनिन आणि फुले-आंबेडकर
चे गवेरा आणि भगतसिंग

अक्षरगंधमधली उषा डांगे (कॉ श्रीपाद अमृत डांगे यांच्या पत्नी) बालकवींच्या पत्नी पार्वतीबाई, विवेकानंदांवरचा दत्तप्रसाद दाभोळकरांचा लेख बरंच काही देतात. आनंदीबाई शिर्केंच्या आत्मचरित्रातला उतारा मला शाळेत अभ्यासाला होता, तो खूप बोअर वाटला होता हे आठवतंय.जातिभेदाविरुद्ध लढा दिला म्हणजे त्यांनी देशस्थ मराठा असून कोकणस्थ मराठ्याशी लग्न केलं. अर्थात अस्पृश्यता न पाळणं इ. गोष्टी त्यांनी केल्या. लेखिका म्हणून त्यांचं कर्तृत्व काही जाणवलं नाही. (उषा डांगे आणि आनंदीबाई शिर्के यांच्यावरचे लेख त्यांच्या शिक्षणासाठीच्या धडपडीबद्दल नसून त्यांच्या क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल आहेत.)
अंकात नोंदल्या गेलेल्या बहुतेक स्त्रिया कर्व्यांच्या आश्रमात किंवा रमाबाईंच्या संस्थेत शिकलेल्या आहेत.
शांताबाई कांबळेंवरची मालिका थोडीफार आठवत होती. बहुतेक स्त्रिया बालविधवा आहेत.

लोकप्रभामधली प्रीती छत्रेंची पहिला धडा ही कथा वेगळ्याच पार्श्वभूमीवरची आहे. शेवटपर्यंत नक्की काय आहे त्याचा अंदाज लागला नाही. आणि कथा संपल्यावर 'पहिला धडा' हे शीर्षक ठळकपणे जाणवलं. म्हणजे तिथे आणखी एक सुरुवात. बाकीच्या कथा नाही आवडल्या.
बाकी हा साप्ताहिकाचा दिवाळी अंक असल्याने जसा असायला हवा तसाच आहे.मराठीत सुपरस्टार का नाही अशा काहीशा शीर्षकाच्या पराग फाटक यांच्या लेखातलं हे वाक्य वाचून हसू आलं. ग्रामीण भागात चालणार्‍या चित्रपटांचा हिरो मिलिंग गवळीला महानगरांत कोणी ओळखणारही नाही असं सांगून पुढे - " पाकिस्तानातून भारतात आलेल्या आणि टिनपाट दर्जाचा चित्रपट करणार्‍या देखण्या पण अभिनेता म्हणून यथातहा असलेल्या फवाद खानला ओळखतात माणसं. त्याचे नखरे चवीचवीने चघळतात. पण आपल्या मातीतला , प्रसिद्धीसाठी न हपापलेला मिलिंद दुर्लक्षित का?" मराठी सिनेमांत इतके सगळे हिरो आहेत - स्वप्नील जोशी, सुबोध भावे ते गश्मीर महाजनीपर्यंत, आणि त्यांचे सो कॉल्ड प्लस पॉइंटस काय आहेत ते कळलं.

अंतर्नादच्या दिवाळी अंकात यंदा मराठी भाषेबद्दल एकही लेख दिसत नाही.
राजाजी (सी राजगोपालाचारी) - नरेंद्र चपळगावकर
कोबायाशी इसा - जपानी हायकूकार - विजय पाडळकर
गोविंद तळवलकर - विनय हर्डीकर
श्रीमद् आद्य शंकराचार्य : सुरेश द्वादशीवार
जे के रोलिंग - विवेक गोविलकर हे व्यक्तिविशेषपर लेख.

गेल्या वर्षी कठल्याशा दिवाळी अंकात मलिक अंबरबद्दल वाचलं होतं. या अंकात 'नातं आफिक्रेशी' या लेखात आफ्रिकेतून भारतात गुलाम म्हणून आणलेल्या सिद्धींबद्दल.
हेरंब कुलकर्णींचे लेख नेहमीच त्रासदायक असतात. एका वीटभट्टीकामगार कुटुंबातील खंडोबाशी लग्न लागलेल्या मुलीबद्दल `माया...माझ्या पराभवाचे नाव'.
आनंदीबाई जोशींवरच्या लघुपटाबद्दल अंजली कीर्तने
असंपादक भानू काळे, शरद जोशींवर लिहीत असलेल्या पुस्तकातील एक प्रकरण.

मिळून सार्‍याजणीचे संपादकीय बहुतांशी मराठा मोर्चाबद्दल आहे.
अंकाचा मोठा भाग `लग्न - एक मंगल गोंधळ- अर्थात लग्नाचा परीघ आणि परिघावरच्या समाजातली लग्न' असा आहे.
(लग्नाची बेडी)मिलिंग बोकील , गौरी कानिटकर, (रं धो कर्वे)मंगला गोडबोले, अवधूत पऱळकर हे ओळखीचे लेखक दिसले.
लग्नाचं वय, आदिवासी -मुस्लिम-ख्रिस्ती-भटके लग्न, हिंदू कायद्याचे ब्राह्मणी अवशेष; आंतरजातीय्/धर्मीय लग्न, लग्नाशिवायचं सहजीवन, अनौरस संतती हे विषय हाताळलेले दिसतात.

मिळून सार्‍याजणीचा अंक कंटाळवाणा, पसरट वाटला.
लग्नाची बेडी हा मिलिंद बोकील यांचा लेख, र.धों कर्व्यांच्या लेखनातील अंशाचं मंगला गोडबोलेंनी केलेलं संकलन, अनौरस संतती- साधना झाडबुके , लग्नाशिवायच्या सख्या - सुषमा देशपांडे आणि काही प्रमाणात अवधूत परळकरांचा लेख सोडला तर अन्य लेखांतून नवे काही मिळाले नाही. काही लेख पाठ्यपुस्तकीय वाटले. एक तर चक्क त्याच पद्धतीने लिहिला आहे.
एका लेखातलं 'सेल्फीमध्ये गुंतलेले सेल्फिश लोक दुसर्‍यासाठी काय त्याग करणार? विवाहाचे पावित्र्य कुठून पाळणार?' हे वाक्य वाचून अंकाचं नाव पुन्हा चेक केलं. Wink
दीपा देशमुख यांचा लेख आवडला. " .....नवरा बायको म्हणून एकाच व्यक्तींशी आयुष्य जोडून घेण्यापेक्षा भविष्यात एकाच वेळी अनेक व्यक्तींशी असे मल्टिपर्पज रिलेशन्सही स्त्रीपुरुष नात्यांत गरजेप्रमाणे तयार होतील. किंवा कदाचित रक्ताच्या नात्यांपेक्षा मैत्र जपलं जाईल आणि वैश्विक कुटुंबं - कम्युन पद्धतीने - निर्माण होतील. एकमेकांवर अवलंबून न राहता,अपेक्षांची ओझी एकमेकांवर न लादता स्वतंत्रपणे लोक एकत्रित येतील आणि कोणी संगावं, आदिम काळात ज्याप्रमाणे टोळ्यांनी मानवी समूह एकत्र राहत होता, तसाच आधुनिक काळात तो वेगळं नाव धारण करून एकत्र राहील."
अंकातल्या अनुवादित कथा आवडल्या.
मिळून सार्‍याजणीतील दिवस' उत्पल व बा यांचा लेख आवडला.
प्राण्यांच्या नियमित स्थलांतरावरचा 'एका महावारीची गोष्ट' हा अमोल उकडिवे यांचा लेख वाचायचा राहिला.

अंतर्नाद च्या अंकातील 'साहित्यसर्जनाची सूत्रे' हा दत्ता नायक यांचा लेख सुंदर.
प्रत्येक लेखकाने वाचावा असा. नवोदित व हौशी लेखकांनी तर जरूर वाचावा. अलिकडे जालावरच्या लेखनामुळे तर लेखकांचे पेव फुटले आहे.
सर्वांनीच या लेखाचे मनन केल्यास स्वतामध्ये सुधारणा करता येतील.

हंस पण ३०० रुपयान्चा आहे की....:)

मेनका मधला ' अस्वस्थ बेटं' हा लेख आवडला.. भारत व पाक मधे वादाचा विषय असलेली कोरी खाडी कुठाय याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला गुगल नकाश्यावर.

अक्षर दिवाळीअंकातली पंकज भोसले कथा भारी आहे. (इतर कथा अजून वाचायच्या आहेत.)
जेएनयूवरचा लेख झकास आहे.
मृदुला बेळे - जपान लेखाला माझा पास.
अलका धुपकर - एशियन पत्रकारांच्या सिंगापुरातल्या वर्कशॉपदरम्यानचे तिथले अनुभव - वाचनीय आहे.
सोनाली नवांगुळ लेखही वाचण्याजोगा. त्या इतक्या गंभीर शारीरिक व्याधींनी ग्रासलेल्या आहेत याची मला कल्पना नव्हती.

मौज अंकातली शर्मिला फडकेची कथा एकदम वेगळीच. वाचताना एखादी शॉर्टफिल्म पाहत असल्यासारखं वाटत होतं. इरावती कर्णिक कथा - बोअर झाली / डोक्यावरून गेली.

दीपावली अंकातली गणेश मतकरी कथा (रिंग) आवडली. १५-१६ वर्षांच्या मुलांच्या भावविश्वातलं वातावरण, कथानक... पण आधुनिक, अर्बन जगतात वाढलेली मुलं कसा विचार करतात हे फार छान रीतिने समोर येतं. टिपिकल गणेश मतकरी स्टाईलची कथा आहे. पण त्यांची निवेदनशैली अगदी सरळ, साधी, ओघवती असते. ती मला आवडते. नजरेसमोर त्या व्यक्ती, स्थळं अगदी सहीसही उभं राहतं.
अर्चना अकलूजकरांची कथा (एकल) मला ठीकठाक वाटली. वातावरणनिर्मिती छान आहे. कथानायकाचं लहानपणापासूनचं एकटेपण सांगितलंय तो भाग बटबटीत नाही, तरी वाचताना अंगावर आला. शेवटही जरा अनपेक्षित, पॉझिटिव्ह केला आहे. तरीही कथा खूप काही आवडली नाही.

अंतर्नादने निराशा केली. सुमारांची सद्दी हा अलीकडे वारंवार वापरला जाणारा शब्दप्रओय्ग विनय हर्डीकर यांनी प्रथम वापरला एवढंच लक्षात राहिलं.

आतापर्यंत वाचलेल्या अंकांत महाराष्ट्र टाइम्सचा अंक सगळ्यांत जास्त आवडला. अंकात ललित साहित्य नावालाही नाही.
'स्त्री शक्ती' हिलरी क्लिंटन आणि सुषमा स्वराज .
द ग्रेट मायग्रेशन - पेच जागतिकीकरणाचा -प्रकाश बाळ. " मूळ मुद्दा हा जागतिकीकरणाचा आहे. मनुष्यबळ, वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान इत्यादींना मुक्त वाव असेल, तर विविध संस्कृतींच्या जनसमूहांना एकत्र राहण्याची नवी रीत जगाला अंगीकारावी लागेल. त्याचबरोबर या जागतिकीकरणाच्या पर्वात अर्थिक प्रगतीच्या न्याय्य वाटपासाठी सुनियोजि यंत्रणा उभी करून ती कार्यक्षमतेनं अंमलात आणण्याचं मोठं आव्हान जगापुढं आहे. साहजिकच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपलं वर्चस्व टिकविण्याचा अट्टाहासही प्रभावशाली देशांना व प्रत्येक देशातील प्रभावशाली घटकांना सोडावा लागेल. सध्याच्या जगात हे शक्य नाही. म्हणूनच स्थलांतरण हे जगाच्या प्रगतीला सहाय्यभूत ठरण्याऐवजी जी प्रक्रिया हा न सुटणारा पेच बनत गेला आहे."

एकांतवासाचे सोबती : निळू दामले : सॉलिटरी वॉच या नियतकालिकाविषयी

महाराष्ट्राची जलसंस्कृती या विभागातले सगळे लेख खूप काही देऊन जातात. राज्याचे जलधोरण, जलौक्त शिवार योजना, विदर्भातला तलावांचा प्रदेश, अग्रणी नदीचे पुनरुज्जीवर्न, आणि बाटलीबंद पाणी.

विद्यापीठांच्या कँपसमधलं राजकारण, चळवळी गेले वर्षभर गाजताहेत. त्यावरचा नचिकेत कुलकर्णी यांचा लेख या काळाचं एक संपूर्ण चित्र रेखाटतो. दिल्ली विद्यापीठातल्या 'पिंजरा तोडो' या महिलांच्या चळवळीविषयी या लेखातूनच पहिल्यांदा कळलं
आदिवासींच्या प्रश्नाविषयी 'लढा इथला संपत नाही' आणि शेती/बागायतींना होणारा प्राण्यांचा उपद्रव यावर अनुक्रमे सुरेखा दळवी आणि मिलिंद पाटील यांचे लेख आहेत.
दुष्काळानंतर या लेखात रवी कोरडे यांनी महाताष्ट्राच्या ग्रामीण भागाबद्दल त्यांना जाणवलेल्या सगळ्याच गोष्टी नोंदवल्यासारखं वाटलं.
उसाच्या राजकारणाचा फड हा लेख वाचल्यावर दोन सलग दुष्काळी वर्षांतही आपण काही शिकत नाही याची जाणीव तीव्र केली.

सामाजिक कीटकांची कंपनी हा प्रदीपकुमार माने यांचा लेख खूप इंटरेस्टिंग आहे. मुंग्या, वाळवी, मधमाश्या या कीटकांनी समूहशक्तीतून निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती अद्भुत आहे. हे सगळं सुटंसुटं कानावर पडलेलं असतं. पण एकत्र वाचताना भारी वाटलं.
सपनों की सरहद नहीं होती - प्रगती बाणखेले - गेली ४ वर्षे पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या हमीद अन्सारीच्या त्याच्या कुटुंबाने घेतलेल्या शोधाची व त्याच्या सुटकेसाठीसाठीच्या धडपडीची कथा.

शेक्स्पैअर मिथ की वंडर - डॉ आनंद पाटील.
सुरुवातीला हा लेख इंग्लंडात, शेक्स्पिअरच्या काळात होता, तोवर काय चाललंय ते कळत होतं. मग अचानक भारतीय व विशेषतः मराठी साहित्यातल्या शेक्सपीअरकडे वळल्यावर तो अचानक समीक्षकी झाला. तेही एका वेगळ्याच स्कूलच्या, झाला. मोठेमोठे सिद्धांत वाटावे अशी वाक्ये आणि बोजड संज्ञा पेरलेली; एकामागून एक वाचून गरगरायला झालं..
वानगीदाखल " "खरेतर मराठीतील शेक्सपिअरस्तोम आणि समीक्षात्मक भजनाचे हास्यास्पद प्रकार वसाहतवाद किती टोकदारपणे बुद्धिमंतांचं नियंत्रण करतो याचेच पुरावे आहेत."
नटसम्राटबद्दल - हे(नाटक) मेलो ड्रॅमाटिक उत्पादन २४ टक्के बुद्ध्यांकाखालच्या प्रेक्षकांत लोकप्रिय झाले. दुसरे (चित्रपट) नववसाहतवाद्यांची गरज म्हणून आले.

अखेर दिवाळी अंक हातात पडले.

माहेरच्या अंकातल्या सचिन कुंडलकरांच्या कथेचं (माझ्या सारख्या अतिसामान्य वाचकासाठी) कुणीतरी संदर्भासह स्पष्टीकरण करा कृपया!

मेनकामधली विभावरी देशपांडेची कथा खूप भारी आहे. दरवर्षी दिवाळी अंकातल्या तिच्या कथा जबरी असतात एकदम.

साधना दिवाळी अंकात फक्त लेख/मुलाखती आहेत.
हमीद दलवाईंची १९७३ मध्ये मनोहर साप्ताहिकात झालेली मुलाखत. ती वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अशी असावी असं वाटतंय. पण मुलाखतच म्हटलंय.
निखिल वागळेंनी महाराष्ट्र1 या वाहिनीसाठी घेतलेली मुलाखत.

बेकरायन हा वास्तुविशारद लॉरी बेकर यांच्यावरचा लेख आवडला. त्यात कुमार गंधर्व आणि सत्यजित रे यांचे संदर्भ आणलेत ते नसते तरी चालले असते असे वाटले.
शेक्सपिअर - रशियाचे आराध्य दैवत हा गोविंद तळवलकरांचा लेख फास्ट फॉर्वर्ड करत वाचला.
ट्रम्प हरतील पण आता ओबामा नसतील! हा संजय आवटेंचा लेख ट्रंप जिंकल्यावरही रेलेव्हंट आहे; किंबहुना ट्रम्प जिंकल्यामुळे अधिकच. ओबामांच्या कारकीर्दीचा नाही पण करिश्म्याचा, त्यांनी काय दिलं याचा आढावा घेतलाय. जगाच्याच राजकारणात आणि समाजकारणात बदलत चाललेल्या प्रवाहांचा त्यांनी धांडोळा घेतलाय. समारोपाच्या परिच्छेदातलं हे वाक्य "देशोदेशीचे ओबामा एकाकी पडत असताना, सगळ्या ठिकाणच्या ५६ इंची ट्रम्प्सची मात्र सध्या चलती आहे. `वर्तमानानं माझ्यावर अन्याय केला असला, तरी इतिहास मला न्याय देईल', हेच सग़ळ्या ओबामांचं समकालीन स्वगत आहे."
बर्मिंगहॅम अधिवेशनातील थेरेसा मे यांचं भाषण आणि माझी दुष्काळ डायरी हा राहुल कुलकर्णी यांचा लेख यांना वेळेअभावी पास दिला.
"सत्य आम्हां मनी" हा विनय हर्डीकर यांचा शरद जोशींवरचा लेख जोशींना जाऊन आता पुरेसा काळ झालेला आहे, हे सांगतो.

कालनिर्णय सांस्कृतिकमधलं फार काही वाचावंसंच वाटलं नाही.
वल्लभभाई : धर्मनिरपेक्ष पण कठोर हा नरेंद्र चपळगावकरांचा लेख आणि टेलिफोनच्या शोधाची चित्तरकथा हा माणिक खेर यांचा लेख वाचले. टेलिफोनच्या शोधाची खरंच चित्तरकथा आहे. आणि खरी असेल तर दुर्दैवी आहे.

<सगळ्यांत महागडा अंक असेल. २५० रु. फक्त >> मौज ३०० ला आहे.>

मौजचे किंमत २०० रुपये आहे. इथे वाचल्यापासून माझ्याही डोक्यात ३००च बसलंय. यंदा वाचलेल्या अंकांत मला हा सर्वाधिक आवडला. तरी मी कथा वाचल्याच नाहीत.

ललित लेखांपैसी गो नी दांडेकरांवर रवींद्र अभ्यंकरांचा लेख, बगदाद पर्व हा सद्दाम हुसैनच्या काळात बगदादमधल्या त्याच्या प्रासादसंकुलातल्याच एका हॉटेलात शेफ म्हणून काम केलेल्या श्रीरंग भागवतांचा लेख, विवेक पेरणारे गुरू हा अरुण टिकेकर यांच्यावर शुभदा चौकर यांचा लेख, शेळक्यांचं घर हा अनिल अवचटांचा लेख आवडले.
जत्रेक चला हा रश्मी कशेळकर यांचा लेख वाचायचा राहून गेला.
कथा फुलपाखरांची = विजया जंगले यांच्या लेखाचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. त्यांना स्वतःला भेटलेल्या फुलपाखरांचं वर्णन छानच आहे. पण मोनार्क जातीच्या कॅनडाहून मेक्सिको आणि पुढच्या पिढीत परत असं स्थलांतर करणार्‍या फुलपाखरांची आणि त्यांच्यावर संशोधन करणार्‍या डॉ फ्रेड आणि नोरा आर्कहार्ट या कॅनडियन शास्त्रज्ञ दांपत्यांचे हकीगत नवलकारी आहे.
निसर्गजीवनाबद्दलही चांगलं लेखन यंदा दिवाळी अंकांत मिळालं.

अनेक अंकांत अमेरिकन निवडणुकांबद्दलही आहे.

एकेक लेखक वेगवेगळ्या अंकांत एकाच विषयाला धरून लिहीत असतात. तसं यंदा अंजली कीर्तने यांनी दुर्गाबाईंबद्दल आणि नरेंद्र चपळगावकर यांनी सरदार पटेलांवर लिहिलंय. मौजेतला त्यांचा लेख जवाहरलाल आणि वल्लभभाई या शीर्षकाचा आहे. दोघांच्या विचारांतील व स्वभावांतील साम्यभेदांबद्दल, त्यांच्या एकत्र कामगिरीबद्दल आणि त्यांच्यातील मतभेदांबद्दल लिहिलं आहे.

जपानी नरभक्षक हा गोविंद तळवलकरांचा लेख जे काही सांगतो, ते माझ्यासाठी पूर्ण नवीन आहे. अगदी इंटरनेटवर हाती आलेल्या एका लेखात यात आझाद हिंद सेनेच्या अनुषंगाने काही वाचलेलं. पण ते पार्टिझन असेल म्हणून तिथेच सोडून दिलेलं. गेल्या २ शतकांतल्या इतिहासाचा धावता आढावा घेताना जपानचा साम्राज्यवाद, लष्करवाद, राष्ट्रवाद, रशियाला शह म्हणून इंग्लंड अमेरिकेकडून होणारी आर्थिक मदत. ; आक्रमण-युद्ध आणि शत्रूसैन्यावर केलेले भयंकर अत्याचार, मजुरांना(यात भारतीय मजूरही मोठ्या प्रमाणात होते) दिली जाणारी अमानुष वागणूक आणि शिक्षा, आणि चक्क सैनिकांनी केलेले नरमांसभक्षण, जैविक युद्धाची तयारी आणि त्यासाठीचे प्रयोग.एकीकडे नाझी गुन्हेगारांना शिक्षा होत असताना जपानी अधिकार्‍यांना मोकळे सोडले जाणे, त्याला मोठे कारण ठरलेले आंतरराष्ट्रीय न्यायालयातले राधाविनोद पाल हे भारतीय न्यायाधीश आणि चीनमध्ये डॉ कोटणीसांबद्दल असावी तशी जपानला त्यांच्याबद्दल वाटत असलेली व वेळोवेळी दिसून आलेली कृतज्ञता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेताजींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी जपानची मदत घेणं, असा सगळा कालपटल या लेखात आहे.

मलाही मौजचा दिवाळी अंक आवडला. बगदाद पर्व हा लेख तर मस्त आहे. अवचटांचे लेख मात्र सोर्‍यातून पाडलेले नेहेमीप्रमाणे. शर्मिला फडकेंची कथादेखील आवडली.

गोविंद तळवलकरांचा लेख: ही माहिती वेळोवेळी अनेक ठिकाणी वाचनात आली असली तरी तळवलकरांनी त्याचे संकलन उत्तम केले आहे. अश्या लेखांसोबत संदर्भसुची नसणे हे मात्र खटकते. असे वाटते की अनेक संदर्भ पुस्तके मुळापासून वाचता येतील ती लेखकाने जणू आपल्यापासून लपवून ठेवली.

@भरत, जर तुम्ही जपानी माणसाबरोबर काम केलेत किंवा त्यापेक्षापण भारी म्हणजे जपानी माणसासाठी काम केले तर या गोष्टी अद्भुत वाटणार नाहीत. म्हणजे आज जपानी माणूस शब्दशः असे वागत नाही. मात्र त्यांच्या कामाची पद्धत पाहता त्यात एक असा अमानुष अंडरकरंट मला तरी नेहेमी जाणवतो.

पुस्तके आणि प्रवासवर्णने वाचून जपानचं जे छान चित्र माझ्या मनात होतं, त्याला थोडासा तडा गेला आणि कुतूहलही वाढलं.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

जपान्यांनी अंदमान बेटसमूह ताब्यात घेऊन तिथे भयानक अत्याचार केले. कागदोपत्री तिथे सुभाषचंद्र बसूंचं राज्य असलं, तरी खरी सत्ता जपान्यांची होती. त्यांनी तिथल्या नागरिकांच्या कत्तली केल्या, शेकडो स्त्रियांवर बलात्कार केले. दुर्दैवाची बाब अशी की, पोर्ट ब्लेअरला जाऊनसुद्धा, तिथे आपला ध्वज फडकवूनसुद्धा बसूंनी या अत्याचाराविरुद्ध अवाक्षरही काढलं नाही. जपान्यांनी भारत, चीन, कोरिया या देशांत जितका नरसंहार केला, तितका अन्य कुणीही केला नसेल. जपान्यांचं शांतताप्रेम वगैरे सगळं अणुबॉम्बानंतरचं प्रकरण आहे.

विषयांतराबद्दल पुन्हा एकदा सॉरी.

Pages