ऑफिसातल्या पाट्या

Submitted by विद्या भुतकर on 3 November, 2016 - 14:05

डिस्क्लेमर: ही पोस्ट मी ऑफिसमध्ये जाऊन कशा 'पाट्या' टाकते यावर नाहीये. Happy

पुढच्या आठवड्यात आमचे ऑफिस नविन बिल्डिंग मधे शिफ्ट होणार आहे. सध्याची बिल्डिंग बॉस्टन डाउनटाऊन मध्ये आहे. तिथल्या जुन्या बिल्डिंग, चर्च, दुपारच्या वेळी असणारी वर्दळ हे सर्व नक्कीच खास आहे. तरीही या ऑफिसबद्दल खूप आस्था अशी वाटलीच नाही, एक वर्ष होऊन गेलं तरी. कदाचित तिथले धूळ भरले, एकमेकांना लागून असलेले छोटे डेस्क असेल. किंवा चुकूनही ओठांवर हसू न येणारे लोक असतील. अर्थात हे सर्व बदलेल असे नाही पण नवीन ठिकाणी काय असलं हे बघायची उत्सुकता नक्की आहे.

एक गोष्ट मात्र मला लक्षात राहील ते त्या ऑफिसमधल्या 'पाट्या'. ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी आले तेव्हा तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेल्या सूचना पाहून खरंच 'पुण्याच्या पाट्यां'ची आठवण झाली. सर्वात पहिली होती ती पाण्याच्या नळाजवळ होती. "आऊट ऑफ ऑर्डर". अक्ख्या फ्लोरवर तो एकच नळ होता आणि तोही बंद. पुढे एक ब्रेक रूम आहे. तिथे असलेल्या पाण्याच्या फिल्टर वर मोठ्या अक्षरात (अर्थात इंग्लिशमध्ये) लिहिलेलं आहे,"ही फॅसिलिटी ३०० लोक वापरतात त्यामुळे स्वछता ठेवा." आणि मुख्य म्हणजे, या ब्रेकरूममध्ये पाण्याचे कपही नाहीत. म्हणजे नवीन माणसाला दोन दिवस तरी कप किंवा पाण्याची बाटली कुठूनतरी विकत आणावी लागते. म्हटले,"ओके. एकदम 'गो ग्रीन' बिल्डिंग दिसते.". पुढे हळूहळू मला तिथल्या सर्व पाट्या वाचायची सवयच लागली. सवय लागली म्हणजे, आहेच पूर्वीपासून पण आता न चुकता पाहू लागले.

तर रेस्टरूमध्ये दोन-तीन ठिकाणी तरी,"Please be neat and wipe your seat" अशा पाट्या लावल्या होत्या. कॉफीमशीनच्या तिथे निदान ४-५ तरी सूचना असतील.

१. मशीनमध्ये मोठ्या जार मधून आणून पाणी घालावे लागते. तर त्या जारवर सूचना होती,"मशीनमध्ये पाणी भरण्यासाठी हेच जार वापरावे. स्वतःच्या बाटलीतील पाणी वापरू नये."

२. मशीनवर "Please clean up the mess you make" अशी सूचना आहे.

३. मशीनच्या मागे भिंतीवर मशीन कसे वापरायचे यांच्या सूचना आहेत.

४. बरेचदा कॉफीचे फ्लेवर संपले असतील तर, "Out of Stock. Refill on Monday" अशा प्रकारचे मेसेज असतात.

कॉफीमशीनच्या शेजारीच छोटा फ्रिज आहे. फ्रिजवर तो कधी साफ करणार आहे याच्या सूचना असतात. 'वेळोवेळी त्यातून आपले सामान साफ करा' अशी कायमस्वरूपी सूचनाही आहे. फ्रीजच्यावर मायक्रोवेव्ह आहे. त्यावरही साफ ठेवण्यासाठी सूचना आहेत. असो. तर यासर्व सूचना कितीही वेळा वाचल्या तरी परत परत वाचत राहते. या सर्व त्या ऑफिसच्या खास खुणा आहेत ज्या कायम लक्षात राहतील. आता नवीन ऑफिसमध्ये काय असेल बघावे लागेल.

खरंतर या अशा सूचना मला आमच्या पुण्याच्या ऑफिसमध्येही दिसायच्या आणि अजूनही त्या आठवतात. त्यातला एक किस्सा तर सांगितलाच पाहिजे. Happy पुण्यातल्या ऑफिसमध्ये लोकांचे घरून आणलेले कॉफी कप आणि बाकी सर्व लोकांना वापरता येतील असे कप दोन वेगवेगळ्या ट्रे मध्ये असायचे. मला ही कल्पना आवडली होती. त्यानिमित्ताने पेपर कप वापरणे कमी व्हायचे. त्या ट्रेच्या वर मोठ्या अक्षरात लिहूनही ठेवलेलं होतं, 'पर्सनल कप', 'कॉमन कप' असं काहीसं. तरीही नवीन आलेल्या व्यक्तींनी अनेकदा पर्सनल कप घेतले आहेत चुकून. एकदा असेच एक नवीन माणूस दिसला आणि तो पर्सनल कप ट्रे मधून एक कप उचलत होता. मी त्याला समजावून सांगितले की तो दुसऱ्या ट्रे मधून घेऊ शकतो. .आता मला हे कुणी सांगितले तर मला बरेच वाटले असते. कुणाचे रोज वापरलेले कप कुणाला हवाय? त्याने मग थँक्स म्हणून दुसरा कप घेतला.

दुपारी घरी जाताना चहाच्या टपरीवर मला संदीप आणि बाकी लोक दिसले, त्यांना 'हाय' करून निघाले. घरी गेल्यावर मला संदीपकडून पुढे झालेला किस्सा कळला. दुपारी मी टपरीवरून 'हाय' करून निघाल्यावर तिथे सकाळच्या माणसाने सर्वाना सांगितले की कसे मी सकाळी त्याचा 'क्लास' घेतला 'कप्स' वरून. आणि त्याचे बोलून झाल्यावर त्याला लोकांनी सांगितले की 'जिने त्याचा क्लास घेतला' तिचा नवरा 'संदीप' इथेच आहे. बिचारा तो माणूस ! Happy त्याला काय बोलावं कळेना. Happy त्याचे नशीब चांगले होते की तो दोनच दिवसांसाठी त्या ऑफिसमध्ये आला होता. Happy असो.

विचार करायला गेलं तर मला वाटतं की नोकरी करायला आलेले लोक बऱ्यापैकी समजदार असतील आणि निदान ऑफिसमध्ये तरी स्वच्छ राहत असतील. पण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या सूचना लिहाव्या लागतात हेही दुर्दैवच म्हणायचं. अनेकदा लोकांना ते स्वच्छ ठेवणे हे त्या कामासाठी ठेवलेल्या लोकांचंच काम आज असं वाटतं, म्हणून असेल कदाचित. असो. काय करणार? ऑफिसमधल्या, बँकेतल्या, हॉटेलमधल्या सूचना वाचणे हे माझं आवडतं काम आहे. त्यातल्या अनेक मी चितळेंच्या चक्का-लोणी विभागात, 'काटा किर्रर्र' मिसळ मध्ये वाचल्या आहेत. बाकी इंटरनेट वर असतातच. तुमच्याही ऑफिसमध्ये अशा सूचना आणि किस्से असतील तर नक्की सांगा. Happy ते पुणेरी पाट्यांपेक्षा नक्कीच कमी नसणार.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

" Please take only your food from this refrigerator, not others.... This is NOT your Moms refrigerator"

मागे एकदा (१९९० च्या दशकात) AT&T ने एक नवीन सी ई ओ आणला. गलेलठठ पगार, जर काढून टाकले तर २६ मिलियन डॉ., असा करार होता. सहा सात महिन्यात त्याला काढून टाकले. कारण - त्याला इथे काम करण्याएव्हढी अक्कल नाही!

लग्गेच, दुसर्‍या दिवशी ज्याच्या त्याच्या ऑफिसवर पाटी - I am too stupid to do my job - give me my 26 million!