भगवद्गीता - सोप्या मराठीत - ११

Submitted by एम.कर्णिक on 26 February, 2009 - 11:11

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
विश्वरूपदर्शन नावाचा अकरावा अध्याय

अर्जुन म्हणाला,
अध्यात्माची तुम्ही कथिलि जी परमगुह्य गोष्ट
अनुग्रहित मी, मोह मनातिल झालासे नष्ट १

कमलपत्रनेत्रा, जे मजला ऐकविले तुम्ही
जीवांची उत्पत्ति, विलय अन महानता तुमची २

हे पुरूषोत्तम रूप ईश्वरी तुमचे जे वर्णिता
पाहु इच्छितो ते, परमेशा, समक्ष मी आता ३

प्रभो, शक्य हे असेल तर ते रूप दाखवावे
दिव्य आणि अविनाशी रूपामधि दर्शन मज द्यावे ४

श्री भगवान म्हणाले,
पहा अर्जुना, नाना रंगी, विविध आकारांची
शेकडोच का सहस्त्र ऐशी ही रूपे माझी ५

आदित्य, वसु अन् रुद्र, अश्विनी आणि मरूत्गण
पहा आज तू या सर्वांना दुर्लभ जे दर्शन ६

गुडाकेश, हे विश्व चराचर अन् जे जे वांछित
ते ते सारे एकत्र पहा या मम देहात ७

परंतु दिसणे दॄष्टिस तुझिया अशक्य हे पार्थ,
म्हणुनी देतो दॄष्टि दिव्य बघण्या मम सामर्थ्य ८

संजय म्हणाला
हे राजा, इतके बोलुनि मग योगेश्वर हरिने
विश्वरूप अपुले दाखविले पार्थासी त्याने ९

त्या रूपाला असंख्य तोंडे, नेत्रही अनेक
दिव्य आयुधे, अन् आभरणे अद्भुतशी चमक १०

विश्वमुखी त्या अनंत देही अनेक आश्चर्ये
दिव्य सुगंधी लेप, सुमनमाला नि दिव्य वसने ११

तेजस्वी कांती ऐसी त्या महान शक्तीची
हजार सूर्यांच्या तेजाहुनदेखिल जास्तीची १२

दिव्य अशा त्या रूपामध्ये पार्था ये दिसुन
विभागलेल्या विश्वाचे होउनि एकीकरण १३

शीर्ष नमवुनी वंदन करूनी मधुसूदनाला
चकीत अन् रोमांचित अर्जुन मग वदता झाला १४

श्रीकॄष्णा, देही तव दिसति मजसि सर्व देव
कमलस्थित ब्रम्हाही जो देवांचा अधिदेव
प्राणिमात्र सारे दॄगोचर होति एकसाथ
वासुकीसम दिव्य सर्पही साधूंसमवेत १५

अनेक बाहू, उदर, आनने, अनेक चक्षूही
सर्वतोपरी अनंत ऐसे रूप तव मी पाही
अंत, मध्य वा आरंभ कुठे तुझिया रूपाते
हे विश्वेश्वर, मज उमगेना कुठे पहावे ते १६

प्रदीप्तअग्नी अन् सूर्यासम अपार तेजस्वी
किरिट, गदा अन् चक्रधारि ऐसी तुमची हि छवी
साहु न शकती नेत्र प्रखरता रूपाची तुमच्या
तरी पाहतो जिकडे तिकडे तुम्हास, परमेशा १७

परब्रम्ह जे जाणुन घ्यावे असे मला वाटते
ते तुम्हीच अव्यय नि सनातन पुरूष मला गमते
शाश्वतधर्माचे रक्षकही तुम्हीच, भगवंता
समस्त विश्वासाठी तुम्हाविण नाहि कुणी त्राता १८

विनारंभ, मध्यान्ताविरहित, अनंतबाहु तुम्ही
चंद्रसूर्य हे नेत्र जयाचे आणिक मुख वन्ही
अती प्रखर तेजाने त्यांच्या विश्वा तापविता
अनंत शक्तिमान असे, भगवंता, मज दिसता १९

पॄथ्वी आणि आकाशातिल अंतर आणि दिशा
सर्व टाकले व्यापुन केवळ तुम्हीच, परमेशा
रूप भयंकर तव हे अदभुत प्रचंड अन् उग्र
पाहुन झाले त्रिलोक भयभित आणि गलितगात्र २०

देवांचे समुदाय तुमच्या ठायी प्रवेशती
भ्यालेले कुणि हात जोडुनी तुम्हाला प्रार्थिती
स्वस्ति, स्वस्ति करीत आणिक इतरहि स्तोत्रानी
तुमच्या स्तवनी रत झाले हे किती ऋषी अन् मुनी २१

रूद्र, वसु, आदित्य, साध्यगण अन् अश्विनिकुमर
तसेच विश्वेदेव, मरूत्, सुर, पितर, यक्ष, असुर
गंधर्वादिक सिध्दिदेवता अचंभीत होउनी
स्तब्ध राहिले विस्मयपूर्वक तुम्हां अवलोकुनी २२

अनेक डोळे, मुखे, भुजा, अन् मांडया, अन् पाय
विशाल पोटे कराल दाढा, रूप महाकाय
भयव्याकुल झाले सारे हे त्रिलोकातले वासी
माझी पण झालेली आहे स्थिति त्यांच्याजैसी २३

आकाशा जाउन भिडलेले अनेक रंगाचे
जळजळीत नेत्रांचे आणि उघडया तोंडाचे
स्वरूप तुमचे पाहुनि ऐसे, हे विष्णूश्रेष्ठ,
सुटला माझा धीर जाहली शांतीही नष्ट २४

प्रलयाग्नीसम तोंड आणखी दाढा विक्राळ
पाहुन अस्वस्थच मी झालो आहे गोपाळ,
डळमळीत झाले मन मजशी ना कळतात दिशा
प्रसन्न व्हा अन् कॄपा करा मजवरती, जगदीशा २५

धॄतराष्ट्राचे पुत्र आणखी महीपालहि इतर
भीष्म, द्रोण अन् कर्णासह किति आमुचेही वीर २६

शिरले तुमच्या विक्राळ मुखी अन् मजला दिसली
दाढांमध्ये कित्येकांची शिरे चिरडलेली २७

लोट नद्यांच्या पाण्याचे जैं सागरात शिरती
तसे वीर हे तुमच्या जळत्या मुखि प्रवेश करती २८

ज्वालेमध्ये जळण्यासाठी पतंग घुसतात
तसे मराया लोक भराभर मुखि प्रवेशतात २९

हे विष्णू, प्रज्वलित मुखांनी गिळता सर्वांना
जिभल्या चाटित ज्वालांच्या तुम्हि उग्र तळपताना ३०

वंदनपूर्वक प्रार्थितो तुम्हा, प्रसन्न तुम्हि व्हावे
उग्रस्वरूपी कोण आहा ते मजसी सांगावे
ही तुमची जी करणी आहे, मजला ना कळते
आदिपुरूष तुम्हि तरि उत्सुक मी तुम्हा जाणण्याते ३१

श्री भगवान म्हणाले,
मी संहारक काळ आहे रे सार्‍या विश्वाचा
आलो येथे विनाश करण्याला या लोकांचा
तुझ्याविनाही होणार आहे सर्वांचा नाश
दोन्ही सैन्यामधले योध्दे मरतिल हे खास ३२

तेव्हा, पार्था ऊठ आणि कर यशासाठि युध्द
जिंकुन शत्रूंना भोगाया राज्य समॄथ्द
मम इच्छेने पूर्विच यांचा मॄत्यु असे झाला
निमित्त केवळ व्हायचे असे, सव्यसाचि, तुजला ३३

द्रोण, भीष्म अन् जयद्रथासह कर्ण आदि वीर
आधीच मी मारले तयां तू लढुनी वधी सत्वर
नकोस होऊ व्यथित तयांस्तव, मार संगरात
शत्रूंवरती विजय मिळवशिल तू या समरात ३४

संजय म्हणाला,
ऐकुनी कॄष्णाच्या बोला मग पुन:पुन्हा वंदुन
सद्गदित कंठाने बोले भयभितसा अर्जुन ३५

अर्जुन म्हणाला,
हृषिकेशा, जग होते आनंदित तुमच्या कीर्तनी
आणिक भारून जाते तुमच्यावरल्या प्रीतीनी
सिध्दपुरूषगण इथले सारे करति तुम्हा नमन
राक्षस पळती सर्व दिशांना तुम्हाला भिउन ३६

ब्रम्हाहुनिही श्रेष्ठ असे तुम्हि आहात निर्माते
महात्मना, मग कां न करावे वंदन तुम्हांते
अनंत देवा, अधिदेवा, तुम्हि आधार जगतासी
सत्यअसत्यापलीकडिल तत्वहि तुम्ही अविनाशी ३७

पुराणपुरूषा, आदिदेव तुम्हि, जगतास्तव आश्रय
तुम्ही ज्ञान अन् तुम्हीच ज्ञानी, परंज्ञाननिलय

अनंतरूपे, हे परमेशा, जगत् तुम्ही व्यापिले
सर्व विश्व हे केवळ तुमच्यावरती आधारिले ३८

तुम्हीच वायू, यम, अग्नि, जल, तुम्हिच चंद्रमा तो
प्रजापती ब्रम्हा प्रपितामह तुम्हास मी वंदितो
वारंवार नमन करूनीहि नमितो पुन:पुन:
सहस्त्रश: वंदन चरणाशी तुमच्या, नरोत्तमा ३९

समोरूनी, मागिल बाजूनी, सर्व दिशांकडुनी
नमस्कार माझा तुम्हाला हृदयांतरातुनी
असिम, विक्रमी, शक्तिमान तुम्ही, तुम्हि अनंतवीर्य
सर्वव्यापि तुम्हि, तरी जाणवे तुम्हीच ते सर्व ४०

महिमा तुमचा न जाणुनी संबोधी एकेरीने
‘कॄष्ण, यादवा, सख्या’, साद मी घालीतसे सलगीने ४१

प्रोमापोटी वा चेष्टेमधि घडवियली घटना
एकांती वा परिचितांसवें केली अवहेलना
खानपान, परिहार, वा शयन अशा कितिक समया
ओलांडलि मर्यादा मी, मज, प्रभो, क्षमादान द्या ४२

चराचरांच्या या सॄष्टीचे तुम्ही जन्मदाते
गुरू गुरूंचे तुम्हीच देवा, परमपूज्य सॄष्टिते
बरोबरीचा दुजा न कोणी, ना कुणि समरूपी
अशक्य कोणी श्रेष्ठ तुम्हाहुन असणे त्रैलोक्यी ४३

म्हणुनी तुम्हा वंदन करतो, पूजनीय भगवंत,
कॄपा याचितो, अष्टांगाने घालुनि दंडवत
पुत्रासि पिता, मित्रासि सखा, तसे प्रिय प्रियासी
करति क्षमा तद्वत् तुम्हि द्यावे क्षमादान मजसी ४४

कधि न पाहिलेले मज झाले विश्वरूपदर्शन
आनंदित त्यामुळे तरीहि भयव्याकुळ मम मन
जगदाधारा, प्रसन्न व्हा, व्हा पुनरपि अवतीर्ण
आपुल्या भगवद्रूपाचे मज देण्याला दर्शन ४५

सहस्त्रबाहो, करा एवढी मम इच्छापूर्ती
दर्शवा किरिट, गदा, चक्रधर, चतुर्भुजा मूर्ती ४६

श्री भगवान म्हणाले,
प्रसन्न होउन तुजवर, पार्था, दर्शन तुज दिधले
मम योगाच्या सामर्थ्याने अघटित मी घडविले
कुणा न दिसते असे विश्वरूप तुजला दर्शविले
आद्य, अनंत अन् तेजोमय मम रूप तुला दाविले ४७

श्रेष्ठ कुरूवीरा, तुझिया आधी कुणीच ना पाहिले
जगड्व्याळ हे विश्वरूप मम जे तुजला दिसले
अशा स्वरूपी इहलोकासी दुर्लभ मज बघणे
यज्ञाने, वेदाध्ययनाने, तप वा दानाने ४८

घोर रूप मम पाहुनि पार्था, घाबरू नको तू
अथवा चित्ती व्यथित होउनी गांगरू नको तू
भीति सोडुन शांतपणाने रूप पुन: ते पहा
दर्शन माझे पुनरपि करूनी स्वस्थ चित्त तू रहा ४९

संजय म्हणाला,
वासुदेव अर्जुनासि ऐसे आश्वासुन बोलले
आणि आपुले घोर रूप त्या पुन्हा दाखविले
नंतर भगवंताने पार्था दिला धीर खूप
आणि दाविले आपुले प्रेमळ करूणाकरि रूप ५0

अर्जुन म्हणाला,
हे जनार्दना, पाहुनि तुमचे मनुषरूप सुंदर
शांतचित्त होउनि मी आता आलो भानावर ५१

श्री भगवान म्हणाले,
आता दाविले रूप तुला ते अतिदुर्लभ असते
देवांनाही दर्शनाचि त्या आकांक्षा असते ५२

माझे दर्शन झाले तुज जे प्राप्य न कोणाही
वेदाध्ययने, दानाने वा तप करण्यानेही ५३

मला असा पाहणे, जाणणे, मम अंतरि येणे
संभव केवळ माझ्यावरच्या अनन्य भक्तीने ५४

नि:संगपणे भक्तीपूर्वक कर्म करी मजकरिता
अन निर्वैरी मन ज्याचे त्या त्वरित ये मज मिळता ५५

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
विश्वरूपदर्शन नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला.
**********

अध्यायांसाठी दुवे :
अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

अत्यंत सुंदर उपक्रम.

केदारला अनुमोदन.

यापूर्वीच्या सर्व भागांचे दुवे एकत्रितरित्या देता येतील का?

अतिशय सुंदर...

सर्व भागांचे दुवे एकत्रित देताना आकडे अध्यायाप्रमाणे करता येतील का? उदाहरणार्थ, 'भगवद्गीता-सोप्या मराठीत-९' हा नववा अध्याय असेल....

केदार, चिनू आणि सचिन,

खूप खूप आभार.
आपल्या इछा पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत प्रकाशित कुठल्याही अध्यायातून मागील वा पुढील कुठल्याही अध्यायाकडे जाता येईल. पहा ठीक आहे का ते.
असाच लोभ असावा ही विनंती.

-मुकुंद कर्णिक

धन्यवाद. Happy

याचा printout काढला तर चालेल का? आजीसाठी..

चिन्मय,
जरूर काढा. आणि आजींना माझा नमस्कार सांगा.
मुकुंद कर्णिक

सगळे अध्याय पुर्ण झाले की एक सलग प्रिंट काढणार आहे मी. आपली अनुमती गृहीत धरून. आगाउपणाबद्दल क्षमा असावी.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

सर्व लिंक एकत्र दिल्यावद्दल धन्यावाद.
माझ्यासारख्या वेबमय झालेल्या लोकांना ज्ञानेश्वरीची सोपी ओळख झाली.

-हरीश