गोष्ट जुनीच माणसं नवीन (अंतिम भाग)

Submitted by मिरिंडा on 24 October, 2016 - 12:39

माई अजूनही झोपेतच होती. एखादं लहान मूल स्वस्थपणानी झोपी जावं तशी ती दिसत होती. शशांक उठून कामावर जाण्याच्या तयारीला लागला. त्यानी सरलाला काही आणायचय का विचारलं, पण ती सध्या काही नको आहे म्हणाली. तिनी त्याला डॉक्टर सोबतीना फोन करून कालच्या प्रसंगाबद्दल सांगायला सांगितलं आणि अजून त्या गोळ्या द्यायच्या की काय ते विचारायला सांगितलं. तो लवकरच बाहेर गेला...... अर्धा पाऊण तासानी माई उठली. तिनी कालचा नेसलेला जुनकट शालू काढून, साधे कपडे केले. आता ती नेहेमीसारखी दिसू लागली. का, कोण जाणे, पण तिचा चेहेरा आज अगदी शांत वाटत होता. तोंडावर कोणत्याही ताणाचं किंवा सैरभैर पणाचं चिन्ह दिसत नव्हतं. ती सरला कडे पाहून गोड हसली, म्हणाली, " चहा वगैरे, आता मीच करते, तू थांब. " तिच्या हालचाली सरलाला आज उत्साही वाटल्या. माई पटकन स्वैपाकघरात गेली तिनी चहा नाश्ता बनवला. तो देताना ती म्हणाली, " हे काय, अशी काय पाहत्येस माझ्याकडे? अगं एकदा का मनावरचं ओझं उतरलं ना की माणसाचा उत्साह वाढतोच. आज मला कितीतरी दिवसांनी बरं वाटतय. "सकाळ फारच छान गेली. माईनीच जेवणाची तयारी केली.

दोघी पानं वाढून जेवायला बसणार, एवढ्यात बाहेरून आलेल्या हाकेनी सरलाचं मन झाकाळलं...... "आहेत का सरलाताई घरात? " आवाज सरलाला ओळखीचा वाटला. तिनी बाहेर येऊन पाहिलं, तिला वाकणकर दिसला. तो आत येत म्हणाला, " चला, तुम्हाला सायबानी बोलावलय". सरला जरा चमकली. आणि आवंढा गिळत म्हणाली, " कशाला? "... "अगं कशाला काय? तो पाटलाचा हलकट पोर आणि तो पाटील दोघानाही बोलावून घेतलयन सायबानी. चला गाडी हाये भायेर. " "ठीक आहे, मी जरा जेऊन घेते. गाडीनी नको, दिवसाची वेळ आहे. कोणी पाह्यलं तर, उगाच बभ्रा. "
"ठीक आहे, जेऊन घे तू. आणि बभ्रा कसला? साऱ्या गावाला आता माहित होईलच की. अशी घाबरतेस काय? आम्ही आहोत की. चल, चल, तुला न्याय हवाय ना? साहेब फार चांगले आहेत, मी गाडीत आहे. ये लवकर. " वाकणकर समजावणीच्या सुरात म्हणाला. तिला जास्त बोलण्याची संधी न देता तो गेला. तिनी भराभर जेवायला सुरुवात केली. माई म्हणाली, " काय गं, कोण होतं बाहेर, आणि असं भूत मागे लागल्यासारखी काय जेवत्येस?. जरा दमानी घे.? " आता हिला सगळं सांगावच लागेल. तिच्या मनात आलं. तिनी काही न बोलता ड्रेस बदलला आणि ती बाहेर पडली.

पाऊस नव्हता. पण नुकत्याच पडलेल्या पावसानी उन्हाची एक वेगळीच झळाळी दाखवली होती. ते पाहून तिला थोडं जास्तीच बरं वाटलं. त्याला कारण म्हणजे माईच्या तब्बेतीतली सुधारणा. जीप जवळच होती. ती आत शिरली. गाडी वळण घेऊन नदीच्या रस्त्याने पो. स्टेशनकडे निघाली. पोचल्या पोचल्याच तिला दिसलं की पाटील खुर्चित बसलेले आहेत आणि वसंता उभा आहे. अर्थातच ते पाठमोरे होते. भीतीनी तिचा श्वास जड झाला. एका क्षणापुरतच तिला, आपण आल्या पावली घरी जावं असं वाटलं. पण तिनी तो मोह आवरला. ती आत आली. साहेब, पाटील आणि वसंता, तिघांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. पाटलांच्या कपाळावरची आठी पाहून आपण त्यांच्याशी आधी बोलायला हवं होतं की काय असं तिला वाटलं. मग साहेब म्हणाले, " ये, ये, सरला. घाबरू नकोस., हा बघ वसंता, ह्यानीच तुझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता ना? ".... ती खालच्या मानेनीच हो म्हणाली. तशी ते ओरडले, " अगं स्पष्ट बोल, घाबरू नकोस. " मग ती म्हणाली, " होय, ह्यानीच मला काल धरण्याचा प्रयत्न केला होता. "..... इन्स्पे. सायबानी पाटलांकडे प्रश्नार्थक मुद्रेनी पाह्यलं. "आता बोला. मी खोटं बोलतोय? " पाटलांनी एकवार सरलाकडे पाह्यलं, मग आपल्या दिवट्याकडे. त्यांच्या मनात आलं, सून म्हणून सरला काय वाईट आहे? तसेही बाबासाहेबांचे आणि आपले संबंध चांगलेच होते. हे लक्षात घेऊन ते मवाळ पणे म्हणाले, " हे बघ पोरी, चुका समद्यांच्याच हातून घडतात. म्हनून कोनी सरकार दरबारी जातो का?...... " त्यांना मध्ये तोडीत इन्स्पे. म्हणाले, " पाटील ही चूक नाही, हा गुन्हा आहे, तोही दखलपात्र. "

"इनस्पेक्टर सायेब माज्या बोलन्याचा तो अर्थ न्हाई. मी माज्या पोराला समजावून सांगील, म्हनजे असं पुन्यादा व्हनार नाय. "

इन्स्पे. कडाडले, " पाटील, समजावण्याची एक वेळ असते. तुमच्या मुलाचे इतरही प्रताप बरेच आहेत. कशाला त्या पोरीसमोर सभ्यतेचं नाटक करता? "

मग पाटील थोडेच मागे राहातायत. ते ओरडले, " ओ! इनस्पेक्टर अर्जुनवाडकर, जरा दमानं घ्या. आणि बगा, आमचा बी वरपरेन राबता हाये. आमची पौच वापरन्याची येळ आनू नका, आमच्यावर. काय पुरावा हाय, तुमच्याकडं? ही पोर म्हंते त्येच न्हवं?, आं, काय म्हंतो मी. "................

"पाटी..... ̮ ल, अजून हे स्टेटमेंट मी रेकॉर्ड वर आणलं नाही. पण तुमच्या पोराची मस्ती जिरली नसेल ना तर मला पण सगळं अधिकृत पणे करावं लागेल. समजावून पण तुम्हा बाप बेट्यांमध्ये सुधारणा होत नाही काय? "

"ओ, इनस्पेक्टर, बस झालं. हा चाललो माज्या लेकरला घेऊन बघतोच मला कोन अडिवतो ते. "...... असं म्हणून ते उठले. तशी इन्स्पे. म्हणाले, " म्हणजे, तुम्ही ऐकणार नाही तर? वाकणकर धरा त्या पोराला आणि घाला आत मध्ये.... " मग पाटलांकडे वळुण म्हणाले, " जा.... करा काय करता ते... " पाटील एकदम वसंताकडे झेपावले, पण दुसऱ्या दोन हवालदारांनी त्यांना मागे खेचलं, त्या बरोबर एक खुर्ची खाली पडली. इकडे वसंताला वाकणकरांनी धरून ठेवला होता, त्याची कॉलर पकडून त्यांनी त्याचा एक हात पिरगळला आणि त्याला आतल्या लॉकप मध्ये ढकलला व चपळाईने खोलीला कुलुप लावून घेतलं. वसंता आतून ओरडत होता. सरला, मला हितून सुटू दे, मग कशी सुटतेस ते बघतोच मी. ".... त्याचं ओरडणं ऐकून पाटील चवताळून इन्स्पे. ना म्हणाले, " आता बघ तुजी काय दशा करतो ती " असं म्हणून सरला कडे जळजळीत कटाक्ष टाकून ते बाहेर पडले. हे सगळं काही सेकंदात झालं. सरला भेदरून भिंती जवळ उभी राहिली. आत मध्ये वसंता काहिबाही बोलत होता, त्याला सणसणीत शिवी हासडून त्याला अर्जुन वाडकरांनी गप्प केला. मग सरलाकडे वळून म्हणाले, " घाबरू नकोस, याची मस्ती आम्ही बरोबर उतरवू. आता आमच्याच ताब्यात राहणार आहे तो. तू नीघ. " सरलाची छाती धडधडत होती. ती मागे वळून न बघता घराकडे निघाली.

घरात शिरल्या शिरल्या तिला माईनी विचारलं, " अगं अशी घाबरलेली का दिसत्येस? कोणी काही बोललं का तुला. आणि गेली होतीस तरी कुठे? " दम घेऊन सरला म्हणाली, " आता सगळच सांगते तुला" मग तिनी काही न वगळता जसच्या तसं तिला सांगितलं. माईचे डोळे विस्फारले गेले. सरलाला वाटलं, आपण उगीचच सांगितलं. माईला काही ताण आला तर? विचारासरशी ती माईजवळ गेली. तिला जवळ घेऊन म्हणाली, "तू नको काळजी करुस. आत्ताच बरी झाल्येस तू " माई त्वेषानी म्हणाली, " अगं, काही नाही होत मला. त्या पाटलाच्या पोराला शिक्षा व्हायलाच हवी. मला तो पाटील घरी आलेला कधी आवडलाच नाही. ह्यांच्यापुढे मी काही बोलले नाही इतकच. " तो दिवस यावरच चर्चा करण्यात गेला. शशांक आला तेव्हा चर्चेला अधिकच ऊत आला.

इकडे पाटील पण घरी पोचले. त्यांचं लक्ष कशातच नव्हतं. ते सारखे येरझारा घालू लागले. आपल्या मुलाला सोडवण्यापेक्षा, या इन्स्पेक्टरची कशी जिरवावी याबद्दलच ते डोकं पिंजू लागले. त्यांच्या मनात आलं आत्ताच जावं, जिल्ह्याच्या गावी आणि पोलिस कमिशनरला भेटावं. पो. कमिशनर त्यांच्या दूरच्या नात्यातलाच होता. का मुंबईला जाऊन थेट गृहमंत्र्यांना भेटावं, या विचारात ते पडले. मग कमिशनर साहेबांना भेटण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाला. कसे तरी दोन घास खाऊन ते जिल्ह्यात आले. कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी एक दोन ओळखीच्या लोकांना भेटून कमिशनर साहेबांची भेट मागितली. पण त्यांना जवळ जवळ तास दीड तास थांबावं लागलं. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची भेटीची वेळ ठरली. कमिशनर साहेबांचं नाव होतं, "सुशांतजेरीकर". ते दुसऱ्याला जेरीला आणण्यात पटाईत होते. नसत्या चिकित्सा करून ते स्टाफला नको करून सोडत. बरोबर तीन वाजता पाटलांना आत बोलावलं गेलं. पाटील हात जोडीत केबीन मध्ये शिरले. कमिशनर साहेब कोणत्यातरी फाईल वर विचार करीत टाचणं काढीत होते. डोकं वर केल्यावर त्यांना चंद्रकांत पाटील दिसले. ते आश्चर्यानी उभे राहा म्हणाले, " अरे, या या, मामा तुम्ही. अचानक काय काम काढलत? किती दिवसानी भेटताय? " असं म्हणून त्यांनी पाटलांचं स्वागत केलं. त्यांच्या समोर पाटील बसले. त्यांना गंभीर पाहून जेरीकर म्हणाले, " मामा, काय झालय काय?, काही बोलाल तरी. मला जमेल ते करीन मी. " मग सावकाश एकेक शब्द उच्चारीत म्हणाले, " जमेल ते?, अरे बाबा, आता लवकर काहीतरी कर. तुला आपला वसंता माहित आहेच. भोळंभाबडं लेकरू माजं, " पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुढे काही म्हणणार एवढ्यात, जेरीकर म्हणाले, " कशात अडकलाय की काय तो? ". पाटील म्हणाले, " अडकलं न्हाई, पन अडकवलाय, त्याला. " बोलावं कसं असा विचार करून ते थोडे थांबले. मग जेरीकर म्हणाले, " मामा, अहो निः संकोच बोला. कोणी अडकवलाय त्याला? " पाटलांनी मग आपल्या लाडक्याची सगळी कहाणी सांगितली. आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, " हे बघ सुशांता, तू वसंताला ओळखतोस. यावयात प्रत्येक पोर थोडं काहीबाही वागतच. म्हंजे ते काय गुन्हेगार असतय काय? बघ माज्या लेकराला तेवडं सोडीव आन त्याची केस काढून घे बाबा. तुज्या मामीची शपथ हाये तुला. "

एकूण परिस्थिती गंभीर आहे असं पाहून ते म्हणाले, "ठीक आहे, काय नाव त्या इनस्पेक्टरच? ".... "अर्जुनवाडकर पाटील तत्परतेनं म्हणाले नवीन न्हाई, हाये जुनाच. पण लई चाबरटपना करतोय बघ. त्याला समजावलं, नाकदुऱ्या काढल्या, पन काही उपेग झाला न्हाई. मी कधी आजपर्यंत तुज्याकडे आलो का? ". असं म्हंटल्यावर कमिशनर सायबांनी पी. ए. ला पो. स्टेशनला फोन लावायला सांगितला. दहा मिनिटातच फोन लागला. कमिशनर साहेब बोलू लागले. " आहेत का अर्जुनवाडकर? " फोन वाकणकरनी घेतला होता. कमिशनर सायबांचं नाव ऐकून तो नेहेमीपेक्षा जास्तच ताठ झाला. आणि फोनवर त्यांना सलाम ठोकत म्हणाला, " काल आरोपी पकडलाय त्याचा ते कबुलीजबाब ते घेतायत. बोलावतो त्यांना. " त्यानी फोन बाजूला ठेवला. फोनवरून मारल्याचा आणि शिव्या दिल्याचा आवाज येत होता. " कोणाचा फोन आहे रे? मी कामात आहे हे सांगता येत नाही का तुला. " मग वाकणकरचा मवाळ आवाज आला, " अवो, कमिशनर सायबांचा फोन आहे, घ्या लवकर. " अर्जुनवाडकरांनी फोन घेतला. " येस सर, " पली कडून खवचट आवाज आला. " हल्ली फार मन लाऊन काम करताय की राव,... आं, प्रमोशन लवकर पायजे काय? का सस्पेंड व्हायचय? " अर्जुनवाडकरांचा आवाज पडला. तरीही ताठ होत ते म्हणाले, " सॉरी सर, पण अतिप्रसंगाच्या चार्जखाली आरोपी पकडलाय.. "

"नाव काय आरोपीचं? " कमिशनर म्हणाले. "वसंत पाटील, सर इन्स्पे. घाबरत म्हणाले. मग आवाजात मवाळ पणा आणित कमिशनर म्हणाले, " असं करा, ते काय आहे ते आपण नंतर पाहू, आधी आरोपीला सोडून द्या. आणि उद्या सगळे पेपर्स घेऊन माझ्याकडे या. " तरी इन्स्पे. म्हणाले, " पण ऑर्डर पायजे ना. त्याच्याविरुद्ध कंप्लेंट आहे सर. " कमिशनरांचा आवाज कडक झाला, " अशी हागल्या, मुतल्या लेखी ऑर्डर पायजे काय तुम्हाला? सोडा त्याला, आणि इकडे या. निष्कारण प्रकरण राजकीय करू नका. "..... मग अर्जुनवाडकर म्हणाले, " येस सर, सोडतो सर. " फोन बंद झाला. कमिशनर सुशांत पाटलांकडे पाहून आश्वासक हसले. म्हणाले, " झाल ना, मनासारखं? मामीला सांगा, एक दिवस येणार आहे वाड्यावर, दणकून पार्टी व्हायला पायजे. "

पाटलांनी निश्वास सोडला. म्हणाले, " बाबा, सुशांता, अरे पार्टी होणारच. तू कवा येतोस तेवड सांग. चल निघू मी आता, पन काय रे पोराला सोडील ना रे तो? " त्यांची काळजी अजून संपली नव्हती...... "सोडेल? अहो तुमी घरी पोचायच्या आत तो घरी गेलेला असेल. किती काळजी करता मामा? पण एक मात्र आहे, पुन्हा असं काही व्हायला नको. मग मात्र मी काहीही करू शकणार नाही. मग दोघांनी चहा बिस्किटांचा समाचार घेतला. पाटील गावाकडे यायला निघाले. परत दोन चार दिवस असेच गेले. पाटील बाप बेट्यांची डोकी धुमसतच होती. कमिशनर सायबांनी दिलेला इशारा पाटील विसरले. पुन्हा सूडाची भाषा आता स्वतः पाटीलच बोलू लागले. वसंताला डोकं कमी असलं तरी बाप आपल्या बाजूनी आहे याची त्याला खात्री पटली. विचार करूनही पाटलांना सूडाचा कोणताच प्लान चांगला वाटेना. म्हणून त्यांनी स्वस्थ बसायचं, सध्या तरी ठरवलं. पण मुलगा सरलाला एकटीला पकडण्याच्या प्रयत्नात राहू लागला. तसे दिवस बरे चालले होते. एक दिवस तात्या अचानक घरी आला. सकाळचे आठ वाजत होते. तारीख होती दहा जून. बरोबर सात दिवसानी कोर्टाची तारीख होती. दारात तात्याला पाहून सरला चमकली. यासाठी की त्याच्या कपाळाला बँडेज होतं. तो एकटाच होता. सरला मागोमाग तो आत आला. माई त्याला पाहून म्हणाली, " हे रे काय तात्या? कोणाशी मारामारी केलीस का पडलास कुठे " मग तात्यानी सविस्तर सगळं सांगितलं.

गेल्याच आठवड्यात त्याचं आणि शर्मिलाचं कोर्टाच्या केसवरून कडाक्याचं भांडण झालं होतं. खूप समजावूनही ती ऐकेना. शेवटी तात्याचा तोल गेला. तो म्हणाला, " काही नाही कोर्टाच्या केस वरून माझी आणि शर्मिलाची वादावादी झाली. एक दिवस मी तुझ्या मनः स्थिती बद्दल तिला म्हणालो, तेव्हा म्हंटलं कोर्टाची केस शिवाय, आपण केलेली. माई एकटी काय काय करील? तर शर्मिला चिडून म्हणाली, " काही नाही, दिसतात तितक्या काही त्या घाबरट नाहीत. आणि आजारपणाचं म्हणाल ना तर चक्क सोंग घेतलय त्यांनी. या मानसिक आजाऱ्यांचा असली सोंग वठवण्यात हातखंडा असतो. " माझाही मग तोल गेला. मीही चारशब्द उलटे सुलटे बोललो. म्हंटलं ती केस काढून घे. तेव्हा ती म्हणाली, " कां तंतरली वाटतं आता? सग्ळ्यांचा भार वाहणार होत्या ना माई? मग आता काय झाल? दहाव्या दिवशी तर त्या तसं बोलल्याही. " मग मी म्हंटलं, तू केस काढून घे. आपल्याला काही कमी नाही. तशी ती खंवचटपणे म्हणाली, " नाही कसं वाडा आहे की एवढा मोठा, तोही त्या असेपर्यंत ताब्यात येणार नाही. " मी म्हंटल, मग काय त्यांना बाहेर काढायचं का? मग ती म्हणाली "काय वाटेल ते झालं तरी मी केस काढून घेणार नाही. " मग भडकून जाऊन मी स्वतःचं डोकं आपटून घेतलं. एवढं लागलं तेव्हा कुठे ती तयार झाली. केस काढण्यासाठी हे पत्र मी वकीलांना द्यायला आणलय. (त्यानी पत्र दाखवलं, त्यावर शर्मिलाची सही होती. )या तारखेला तू फक्त हजर राहा. म्हणजे केसच संपेल. आता तरी तुमचं समाधान होईल ना?. का अजूनही म्हणाल तात्या नाचतो बायको सांगेल तसं. मला तुम्ही लोक नेहेमीच नावं ठेवता. कोण बायकोचं ऐकत नाही, सांग. " मग माई समजावणी च्या सुरात म्हणाल्या, " पण तू खरोखरीच तिच्या मर्जी प्रमाणे वागतोस, हे सगळ्यांच्या लक्षात आलय, खोटं आहे का ते? "..... मग तात्या भडकून म्हणाला, " काय करू? दरवेळेला घरात अशांतता ठेवू? म्हणजे बरं वाटेल सगळ्यांना? "..... तो निराश दिसला तशी माई म्हणाली, " जाउ दे चल, आता आलायस जेऊन मग जा. खर तर दोन तीन दिवस राहिलास तर बरं होईल, म्हणजे बोलता तरी येईल. तिच्यासमोर तुझ्याशी बोलणं कठीण जातं. "

थोडा विचार करून तो म्हणाला, " छे छे, रात्री मी जाणार आहे. राहून काय करायचय? तरी पण स्वतःवर ताबा ठेवत तो म्हणाला, " माई, मला वाटतं, हा वाडा तुम्ही विकून मुंबईला यावं. तसही इथे सरला किंवा शशांक याना काय स्कोप आहे? "..... त्यावर थोडी रागावून माई म्हणाली, " म्हणजे तुमचे मोहताज होऊन राहायचं नाही का? आम्ही खेडवळ माणसं आमचं मुंबईत काय काम? "
" तसं नाही माई, नीट विचार कर. सरला साठी स्थळं पण भरपूर येतील. या गावात काय स्थळं मिळणार आहेत तिला? आणि शशांकचं म्हणशील तर त्याला नोकरी धंद्याच्या भरपूर संधी आहेत तिकडे. माझ्याजवळ राहा असं म्हणत नाही मी. तुम्ही तिथे वेगळी जागा घेऊन राहा. पाहा विचार करून. " त्यानी बोलणं अर्धवट सोडलं. दग जेवणं झाली. तात्यानी विश्रांती घेतली. आणि दुपारी तो किटकिटे वकिलाकडे गेला. त्याला पत्र देऊन समजाऊन आला...... रात्री त्यांची बऱ्याच घडामोडींवर चर्चा झाली. सरलाच्या मागे पाटलाचा पोर कसा लागलाय हे समजल्यावर तर त्याने आग्रहच धरला, की हा वाडा खरोखरीच विकावा. शशांक आणि सरलालाही ही योजना पसंत पडली. पटलं नाही फक्त माईला. आग्रहास्तव तात्या राहिला. मात्र सकाळी लवकरच उठून गेला. आता घरात माई विरुद्ध सरला आणि शशांक असा वाद होऊ लागला. वाडा विकणं हा विषय. त्यासाठी गिऱ्हाईक कोण पाहणार? इथ पासून ते गेल्या पाच सहा पिढ्या ज्या वास्तूने पाह्यल्या ती का विकायची असले आणि इतर नवीन मुद्दे माई काढू लागली. घरातला ताण निष्कारण वाढू लागला. अधून मधून तात्याचा फोन येऊ लागला. काय ठरल? तो विचारी. पण प्रश्नाची तड लागेना. माईला तर वाटलं, तात्या नसती बाय लावून गेला. कोर्टाच्या तारखेचा दिवस उजाडला.

या वेळेस शशांक नव्हता. सरला आणि माई तेवढ्या निघाल्या. पाऊस नसल्याने नुसतं चिवचिवत होतं. घामाच्या धारा पुसत पुसत दोघी साडेदहाला कोर्टाच्या आवारात शिरल्या. त्यांना गेटजवळच वाडेकर दिसला. तो कोणत्यातरी पक्षकाराशी बोलत उभा होता. त्याच लक्ष सहज गेटजवळ गेलं. माईना पाहून तो लगबगीने त्यांच्या कडे आला. मग दोघींना घेऊन तो कोर्टरूमच्या व्हरांड्यात तो उभा राहिला. आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली होती. पडला तर दणकून पाउस पडला असता. पण अचानक वारा सुटला. आणि काही वेळातच आकाश स्वच्छ झालं. जणू काही ढग आलेच नव्हते. सुखद गारवा, सगळ्यांनाच आवडला. पावसापेक्षा बरं वाटलं. हळू हळू किटकिटे वकील आला. आज तो एकटाच होता. त्याच्या तोंडावर निराशा दिसत होती. नाही म्हंटलं तरी पक्षकार केस मागे घेत असल्याने त्याची कमाई बुडली होती. त्या दिवशी त्याने तात्याला फार समजाऊन सांगितलं होतं. पण तात्या ऐकण्याच्या मनस्थितित नव्हता. साडेअकरा वाजत आले. कोर्ट रूम आज फारशी भरली नव्हती. पहिल्या तीन चार केसेस ना तारीख पडली होती. आज कोर्टाचा कामाचा मूड नव्हता की काय कोण जाणे. मग तात्याची केस पुकारली गेली. किटकिटेनी पक्षकाराचं "विथ्ड्रॉवल लेटर " कोर्टाला सादर केलं. कोर्टालाही त्याचं आश्चर्य वाटलं. कोर्ट म्हणालंही अशा केसेस सहजासहजी मागे घेतल्या जात नाहीत. पण समेट झालाच आहे तर विरुद्ध बाजूची हरकत नसेल तर फिर्याद काढून घ्यावी. अर्थातच, वाडेकरची काहीच हरकत नव्हती. ऑर्डर झाली. केस काढून घेण्याची परवानगी मिळाली. दहा मिनिटात खेळ खलास. किटकिटे काही न बोलता खाली मान घालून निघून गेला. माई म्हणाली, " बरं झालं. लुब्रा मेला. कसा अगदी शिरा ताणून बोलत होता. आता घातली मान खाली. " मग वाडेकरनी तिला समजावून सांगितलं की आम्हा वकिलांना असा काहीही विधीनिषेध नसतो. सगळेच मग निघाले. वाडेकर मात्र थांवला. त्याची दुसरी केस होती.

माई घरी आली. तिनी गणपतीपुढे साखर ठेवली. समई लावली. सरला म्हणाली, " माई हे काय ग? आत्ता समई कशाला लावलीस.? " नमस्कार झाल्यावर माई म्हणाली, " अगं, एक विघ्न नाहिसं झालं. ते त्याच्याच कृपेनी. त्याचे आभार नकोत का मानायला?, आणि समईच म्हणशील ना तर अशा वेळेला नाही लावायची तर केव्हा लावायची? जाऊ दे झालं ना. आता कुठे मूळपदावर आलो आपण. " माईनी सुटकेचा श्वास टाकला. ती जरा वेळ पलंगावर लवंडली. तिनी मायेनी घराकडे पाह्यलं. तिला हलकं हलकं वाटलं. दुपारचे तीन वाजत आले. दोघींची जेवणं झालीच होती. बाहेर पावसाला परत सुरुवात झाली. तेवढ्यात सीताराम आला म्हणाला, " तात्या सायबांचा फोन हाय जी. जावा लवकर. "पडणाऱ्या पावसाची पर्वा न करता सरला लगबगीनी गेली. फोन वरून तिनी तात्याला काय घडलं ते सांगितलं. तात्याने मग तिला आपल्या वाड्याकरता एक गिऱ्हाईक असल्याचं सांगितल. आणि माईची तयारी आहे का ते विचारायला सांगितलं. सरला घरी आली. घराच्या संदर्भात तिनी सांगण्याचं टाळलं. आजच माई जरा स्थिरस्थावर झाल्ये, सांगू नंतर. रात्री शशांक घरी आल्यावर तिनी माईच्या अपरोक्ष घराबद्दल त्याच्याशी चर्चा केली. पण नक्की काय करावं हे समजेना. माईला पटल्याशिवाय हे होणार नव्हतं. रात्र तशीच गेली. तीन चार दिवस असेच गेले. काही घडण्याची अपेक्षाही नव्हती. अजूनही माईजवळ वाडया साठी गिऱ्हाईक आल्याबद्दल बोलण झालं नव्हतं.

तिकडे पाटिल पिता पुत्रांची डोकी सूडासाठी विचार कर करून थकली. नाही म्हंटलं तरी पाटील अनुभवी होते. आता अशीच खेळी खेळायची की "साप मरे, लेकीन लाठीभी न टूटे ". या विचारात ते गढले होते. पण आपल्या लाडक्या एकुलत्या एक कुलदीपकावर त्यांचा भरवसा नव्हता. हे कार्ट काय करील याचा नेम नाही, म्हणून ते मुलाच्या लीलांवर लक्ष ठेऊ लागले. पण मुलाचं डोकं असल्याबाबतीत गाढवापुढे धावायचं. सध्या तो सरला दिसली की अश्लील बोलण्याची किंवा शीळ घालण्याची एकही संधी फुकट घालवीत नव्हता. पण यश येत नव्हतं. सरला त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. होता होता एक दिवस त्याला एक शक्कल सुचली. पण आपल्या बापाचा सल्ला घेण्याचा त्याने विचारही केला नाही. किंवा आपण आत्ताच कशातून बाहेर आलो याचा विचार त्याला शिवला नाही. ती शनिवारची रात्र होती. पावसाची दिवस भर बुरबुर चालू होती. आणि अचानक संध्याकाळपासून जी पावसानी झोंड उठवली ती थांवायला तयार नव्हती. जे काय करायचं ते आज रात्रीच करायचं, असं ठरवून सगळे नक्की झोपलेले असल्याचं पाहून वसंता योग्य वेळेची वाट पाहात बसला. पाऊस ऐकायला तयार नव्हता. एक दोन पेग रिचवून तो पाच साडेपाचलाच घरातून बाहेर पडला. रस्त्यावर कोणीच नव्हतं. स्वतःचा तोल कसातरी सांभाळत तो बाबासाहेबांच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला. इकडे सरलाची झोप कसल्यातरी आवाजानी चाळवली. तो आवाज होता, कोणतं तरी दार उघडल्याचा आणि परत ते बंद झाल्याचा. तिला तो भास वाटला, आणि ती परत झोपली. सकाळचे सहा वाजत आले. सरलाला जाग आली, दिवस उजाडला. फारसा उजेड नसला तरी दिसत होतं. तिला एकदम आपण काल दुपारपासून एक ड्रेस भिजवून ठेवल्याची आठवण ज्जाली. खरतर ती तो रात्रीच धुऊन वाळत टाकणार होती. रंग जात असल्याने तिने तो वेगळा भिजवला होता. आता निष्कारण तो ड्रेस कुजला तर नसेल या विचाराने ती तशी च लगबगीने बाथरूम मध्ये गेली. लाईट न लावताच अंधुक प्रकाशात ती बालदीत हात घालायला वाकली हात ड्रेस घेऊन ती उचलणार एवढ्यात तिच्या कमरेभोवती कुणाचा तरी घट्ट विळखा पडला. अचानक झालेल्या हल्ल्याने तिचा तोल सुटला आणि आडव्या होणाऱ्या बालदी बरोबरच ती पण आडवी झाली. वसंता तिथेच आत लपलेला तिला माहित नव्हतं. किंबहुना कल्पना येण्याचही कारण नव्हतं. तिने ओरडण्यासाठी तों ड उघडलं पण भीतीमुळे तिच्या तोंडातून फक्त हवाच बाहेर आली. पण लवकरच ती भानावर आली आणि तिच्या हातात जो ड्रेसचा भाग आला तो ओढून तिने वसंताच्या अंगावर भिरकावला. नकळत का होईना तो त्याच्या तोंडावर लागला. डोळ्यात साबूचं पाणी गेल्याने तो कळवळून मागे सरकला. चपळाईने उठत प्रथम सरला बाथरूमच्या बाहेर आली. आणि "माई, माई अशा हाका मारू लागली. तिच्या हाका ऐकून माई जागी झाली आणि धावतच बाथरूम कडे आली. वसंताने माईला धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण माईनी त्याच्या शर्टाची हातात आलेली कॉलर घट्ट पकडली होती. इकडे सरलाने शशांकलाही हाक मारली. तो डोळे चोळत आला. परिस्थितीचा अंदाज आल्यावर त्याने वसंताच्या एक कानफटात मारली. ती इतक्या जोरात बसली की त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागलं. आता चांगलच फटफटलं होतं. वसंताला आणखीन दोनचार ठोसे मारून शशांकने त्याला खाली पाडला. मग म्हणाला, " जा लवकर एखादी दोरी असेल तर घेऊन ये, याला बांधून ठेऊ, आणि पोलिसांना बोलावू. बरा सापडला. " सरलाला दोरी सापडेना तिने चपळाईने वाळत घालण्याची प्लास्टिक ची दोरी दोन्ही हातांनी खेचली. ती नशिबानेच निघाली. मग वसंताचे हातपाय पक्के बांधून, शशांक स्वतःच पोलिस स्टेशनला धावत गेला. त्याला जवळ जवळ वीस एक मिबिटं लागली. धापा टाकीत पोलिस स्टेशनात तो आलेला पाहून इन्स्पे. म्हणाले, " अरे, काय झालं काय ". मग त्याने सगळी कहाणी सांगितल्यावर ते स्वतः आणि वाकणकर सहित तीन शिपाई घेऊन गाडीने बाबासाहेबांच्या वाड्याशी पोचले. जवळ जवळ सात वाजत होते. सीताराम नुकताच उठला होता. पोलिसांची गाडी पाहून तो आश्चर्याने वाड्याकडे धावला. इन्स्पे. अर्जुनवाडकरांनी वसंताला ताब्यात घेतला आणि म्हणाले, " तुम्हाला सगळ्यांनाच माझयाबरोबर स्टेशनला यावं लागेल" वसंता काहीबाही बडबडत होता. पण त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही.

लवकरच जाबजबाव झाले. वसंताला परत लॉक अप मध्ये ठेवला. मग माई, शशांक आणि सरला जायला निघाले, तेव्हा इन्स्पे. म्हणाले, " थांबा, आता पाटलांना बोलावू, म्हणजे समजेल त्याना चिरंजिवांची मजल कुठपर्यंत गेली आहे, ते. " लवकरच एक पोलिस शिपाई पाठवून पाटलांना घेऊन आला. एकूण सगळा प्रकार पाहून त्यांची बोबडीच वळली. ते वसंताला म्हणाले " अरे जरा दमानं घ्यायचं होतस, काय केलस हे? " ते ऐकून इन्स्पे. म्हणाले, " म्हणजे तुमचा शहा होता तर मुलाला. आता सोडवा त्याला. " पाटील काही बोलले नाही. एक दोन दिवस असेच गेले. आणि एका सकाळी पाटील माईंकडे आले. म्हणाले, " माई, आमच्या पोराच चुकलच. एक सांगू का?..... " माईंची प्रतिक्रिया अजमावीत ते म्हणाले, " माई, पोरांची चूक हायेच. पन म्हनून आपन मोठ्या मानसांनी डोस्की फिरवून कसं चालल? आं? न्हाई म्हंटलं तरी आपल्या इज्जतीचा प्रस्न हाय. " माई चवताळून म्हणाल्य, " काय, आमच्या मुलीची चूक आहे? तुमचा मुलगा उकिरडे फुंकतोय त्याला आम्ही काय करणार? याला काही उपाय नाही. कायद्याचा बडगा तुम्हा लोकांना बसायलाच हवा. " पण पाटील निर्लज्जपणे पुढे म्हणाले, " माईसाहेब, आपन बोलला ते खरच हाय, पन, इचार करा, आमची मुलाची बाजू, न्हाय लगीन झालं तरी चालल. पन सरलाचं काय? पोरीची जात हाय, कोन करील तिच्याशी लगीन?, त्यापेक्षा मी काय म्हनतो ते ऐका, आपन सोयरीकच करून टाकू. म्हनजे" घरकी बात घरमे " असं हुईल, अन समदाच प्रस्न सुटल. " मग मात्र माई कडाडल्या, " पाटील, माझ्या मुलीला मी जन्मभर कुंवार ठेऊन पोशीन, पण तुमच्या उकिरड्यावर टाकणार नाही. " पाटलांनी हात हवेत उडवले, आणि म्हणाले, " आमच पोरगं बदनाम हायेच, आता तुमाला बी डाग लाऊन घ्यायाचा असल तर आमची काय ना न्हाई. " असं म्हणून ते निघाले.

पाटील घरी निघाले खरे, पण त्यांना घाम फुटला होता. आता तो सुशांत आपल्याला उभा करील काय? त्यानी इशारा दिला होता की. ते घरी आले, पाटलीण बाईंनी रडून गोंधळ घातला होता. त्यांना पाहून पाटील म्हणाले, " अवं गपा की जरा. तुमचा प्वोरगा काय भोळा भाबडा न्हाई. मस्ती आली, भडव्याला. " ते तवढ्यावरच थांबलं. एक दोन दिवसातच कमिशनर सायबांकडून निरोप आला, कधी येऊ पार्टीला? आता त्याना काय सांगणार कपाळ? पाटील जामीन मिळवण्याच्या धडपडीला लागले. वेगवेगळ्या वकिलांना भेटून ते आले. पण उत्तर एकच, इन्वेस्टिगेशन पूर्ण झाल्याशिवाय उपयोग नाही. आता हरी हरी करीत बसायला हवं.......

दहा पंधरा दिवस असेच गेले. काहीही घडत नव्हतं. पाटील खपा होतेच. आता त्यांना कमिशनर सायवांचा निरोप येणं बंद झालं होतं. ताब्यात घेतल्यापासून साधारणपणे आठेक दिवसानी वसंताला कोर्टापुढे उभाकेला. रिमांड मागितला गेला. कोर्टाने तीन दिवसाचाच रिमांड दिला. तपास कार्य फारसं बाकी नसल्याचं कोर्टाने निरिक्षण नोंदवलं. झालं. मग काय पाटील जामिनासाठी मागे लागले. कोर्टात त्यानी रितसर अर्ज केला. तो मंजूर झाला. पण दिवसातून दोनदा पोलिस स्टेशनात हजेरी लावण्याच्या अटीवर. पाटलांनी किटकिटे वकील केला होता. पाटलांना वसंताचं घरी येणं महत्त्वाचं वाटलं. रितसर केस चालू होईल तेव्हा होईल. असा विचार करून वसंता पुन्हा उंडाराय्ला मोकळा झाला.

वाडा विकत घेण्यासाठी तात्याने पाठवलेलं एक गुजराथी गिऱ्हाईक घरी येऊन गेलं. तो सारखा "सारू छे, सारू छे " म्हणत होता. त्याचा हसरा चेहेरा माईना लोचट वाटला. तो गेला आणि माईनी भांडायला सुरुवात केली. एवढी चांगली वास्तू विकण्याची काय गरज आहे? त्यांच्या मते या सगळ्याच्या मागे शर्मिला असणार, याची त्याना खात्री होती. केस मागे घ्यायला लावली आता ती असा त्रास देते, असं त्या म्हणाल्या. मग शशांकने पण त्यांना समजावून सांगितलं. गावात आपली प्रगती होणार नसल्याचं चित्र त्याने माईंपुढे रंगवलं. मग कंटाळून त्या म्हणाल्या, " करा काय करायचय तुम्हाला ते. मला यापुढे विचारू नका. " असला टोकाचा शेरा मारल्याने सरला आणि शशांक यांना तात्याला काय कळवावं हे कळेना. मग एक दिवस तात्या आला. सकाळपासून रात्री पण राह्यला. त्याची दिवस रात्र एकच चर्चा, वाडा विकणं. शेवटी माई तयार झाली. त्या रात्री मात्र माईला झोप लागली नाही. आता सरलाला माईची काळजी वाटू लागली. अधून मधून वाडा पाहण्यासाठी गिऱ्हाईकं येऊ लागली. माई मात्र बधीरपणे जागीच बसून असत. सरला नाहीतर शशांक, जे कोणी घरी असेल ते वाडा दाखवीत. किमतीचं अर्थातच तात्या ठरवत होता. आणि एक दिवस एका जैन माणसानी तो वाडा विकत घेण्याचं नक्की झालं. पहिला धक्का बसला तो वाडेकरला. शनिवारचा दिवस होता. तात्या चंपकलाल मारवाड्याला घरी घेऊन आला होता. विक्रीचा करार तयार झाला. माईंनी थंडपणाने त्यावर सही केली. मग त्याची नोंदणी झाली. चेक अर्थातच तात्याजवळ होता. तो मुंबईला गेल्यावर बँकेत जमा करणार होता. माईचा चेहेरा काही कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नव्हता. एक दोन वेळा तात्याने तिच्या जवळ बसून तिला विचारलं. "माई, अशी गप्प गप्प का राहतेस? अगं हे सगळं आपण करतोय ते तुमचं पर्यायाने सरला आणि शशांकचं आयुष्य चांगलं जावं म्हणून तर करतोय ना? " उत्तरादाखल माई फक्त एवढचं म्हणाली, " तुम्हाला पटतय ना, मग माझा विचार पुन्हा पुन्हा करू नका. मी नाही म्हंटलं तर विकणार नाहीस का वाडा? मग मला समजावण्याचं कारण काय? तुझं तुला मन खातय का? " त्यावर तात्या गंहिवरून म्हणाला, "नाही माई, पण आयुष्यात बदल नको का व्हायला? तूच विचार कर. किती दिवस आपण हे जुनेरं छातीशी कवटाळून बस णार आहोत? " मग मात्र माईला भरून आलं. डोळ्यातलं पाणी टिपत ती म्हणाली, "लग्न होऊन या घरात आले तेव्हा कल्पनाही आली नाही, की माझ्याच हयातीत हा वाडा विकला जाईल. माझ्या सगळ्या आठवणी आहेत रे इथे..... त्या कुठे जातील?.... " मुसमुसत माई बोलत होत्या. तात्यानी तिच्या पाठिवरुण मायेनी हात फिरवला. म्हणाला, " माई, अगं बदल हा सृष्टीचा नियम आहे. जो बदलतो तोच जगतो. " माई म्हणाली, " ते मला काही माहित नाही, माझ्या दृष्टीनं आयुष्या संपलेलं. आहे. मी काय आज आहे, उद्या नाही. " कितीतरी वेळ माई तात्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन हुंदके देत राहिली. रात्र सरली. नवा दिवस नवीन ऊन घेऊन उजाडला. माईला वाटलं. आपलं सगळं अंग जळतय. आणि आपण नवा देह धारण केलाय. मन तेच आहे. आठवणी जळायला तयार नाहीत. असो. असे काही दिवस गेले. गावात बाबासाहेबांचा वाडा विकला जात असल्याची खबर पसरली. ओळखीची लोकं येऊन भेटू लागली. कोणी का विकताय विचारलं. तर गावात आता तुम्हाला पूर्वीसारखा मान राह्यला नाही, असं म्हंटलं. काहींना वाईट वाटलं, तर काही आडून आडून, पाटलाला घाबरून वाडा विकला असं म्हणाले. काही असो, ही खबर इन्स्पे. अर्जुनवाडकरांच्या कानावर गेली. त्यांनी सरलाला आणि माईना बोलवून घेतलं. काही झालं तरी तुम्हाला केससाठी गावात यावं लागेल. तक्रार मागे घेऊ नका, असा इशाराही त्यानी दिला. पण माई पक्क्या होत्या. त्या म्हणाल्या, " आम्ही कुठेही गेलो तरी केससाठी नक्कीच येऊ, त्या पोरट्याला शिक्षा झालीच पाह्यजे. "

पाटिलांना जरा बरं वाटलं. आता आपण काही तरी वशिला लावून केस कमजोर करू, किंबहूना ती कमजोर झालीच आहे अशा थाटात ते वागू लागले. तक्रारीचा जोर आता कमी झाला असं त्यांना वाटलं........ नवीन मालकाने वाडा खाली करण्याचा लकडाच लावला. तात्यानी प्रथम एक फ्लॅट बुक केला आणि एक ऑगस्टला वाडा ताब्यात देण्याचं ठरवलं. माईंना आता प्रत्येक भिंत परकी वाटू लागली तर कधी जुन्या आठवणींनी त्या व्यथित होऊ लागल्या. पावसाळा संपला. श्रावण चालू झाला. गावात पावसाने हिरवी जादू पसरवली होती. ती पाहून माईंना पुन्हा पुन्हा आपण वाडा विकायला पुरेसा विरोध न केल्याचं वाटलं. पण आता काय उपयोग होता..... मध्येच केसची एक तारीख पडली. तिला हजर राह्यलया. पुढच्या तारखेला त्या इथे नसणार, याची त्याना जाणिव झाली. आणि त्या सरशी त्या ह्या जगात असतील की नाही अशीही शंका आली. त्या जरा चमकल्या. कारण असे अचानक येणारे परके विचार, खरे होतात, असे बाबासाहेब म्हणत असल्याचं त्याना आठवलं. त्या शहारल्या. जुलै महिना संपत आला. घरातलं सामान आदल्या दिवशी बांधण्याचं काम चालू झालं. दुसऱ्या दिवशी एक ऑगस्ट. तात्या दोन दिवस आधी पासूनच आला होता. सकाळ झाली, वाड्यातली त्यांची शेवटची सकाळ. चहा झाला. सीतारामानं जेवणाचे डबे मागवले होते. रिकाम्या वास्तूत आवाज घुमू लागला. माई प्रत्येक खोलीत जाऊन भिंतींवरून मायेनी हात फिरवू लागल्या. तात्याला जरा ते चमत्कारिक वाटलं. पण तो समजला. तोही जरा गलबलला. या वाड्यात त्याचं सगळं बालपण गेलं होतं. त्याच्या मुलाचा जन्म, पहिला नातू, त्याचं कौतुक. करणारे बाबासाहेब. आठवणिंचा नुसता कल्लोळ उठला. तो ही जरा भिंतीजवळ विसावला. अर्ध अधिक सामान ट्रक मध्ये भरलं गेलं होतं. जेवणाचे डबे तसेच पडले होते. जवळ जवळ दुपारचे बारा वाजले. ट्रक आधी जाणार होता. मग ते सगळे जण. त्यानी मुद्दामच ताबा घेण्यासाठी चंपकलालला आज बोलावलं नव्हतं..........

आता सामान भरून झालं ह्नोतं. चला जेऊन घ्यावं, म्हणून सांगायला तात्या आत गेला. सरला, शशांक दोघेही झोपाळ्यावर बसले होते. झोपाळा काही त्यांनी नेला नव्हता. फ्लॅट मध्ये एवढ्या मोठ्या झोपाळ्यासाठी जागा तरी हवी ना. आणि तो तिथे शोभायलाही हवा. इकडे माई वरच्या मजल्यावरच्या खोल्या पाहात होत्या. लग्नानंतरचे त्यांचे नवे दिवस आठवले. बाबासाहेब तसे रसिक होते. वरच्या मजल्यावरच ते झोपत असत. माईंच्या अंगावर आठवणिंनी गोड काटा फुलला. त्या नकळत वरच्या मजल्यावरचं वातावरण डोळ्यात साठवीत मागे मागे येत जिन्यापर्यंत आल्या आणि मागे जिना उतरण्यासाठी वळणार इतक्यात त्यांचा पाय कुठल्याश्या सनमाइकाच्या तुकड्यावर पडला. त्याची गुळगुळीत बाजू खाली असल्याने माईंचा पाय घसरला आणि भेलकांडत त्या दगडी जिन्याच्या वीस बावी स पायऱ्या गडगडत खाली आल्या. प्रत्येक पायरीवर डोकं आपटल्याने त्यांची शुद्ध हरपली/. डोक्यातून रक्तस्त्राव बराच होऊ लागला. खालून तात्या त्यांच्या नावानी हाका मारीत होता. तो सहज म्हणून दगडी जिन्याकडे पोचला........ पाहातो तर काय माई रक्ताच्या थारोळ्यात माई पडल्या होत्या. दात खीळ बसलेल्या माई डोळे फिरवीत होत्या. पण आवाज येत नव्हता. तात्याचा आरडाओरडा ऐकून शशांक, सरला, सीताराम धावत आले...... झालं. घाईघाईने डॉक्टर आले. हॉस्पिटलात नेण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले. माई गेल्या होत्या.

दिवस होईपर्यंत काहीच करता येण्यासारखं नव्हतं. वाड्याचा ताबा जवळ जवळ महिनाभर लांबला. बाबासाहेबांची बहीण म्हणालीही, " चक्क रद्द करा करार. पैसे परत घ्या " पण हे सगळं करणं एवढं सोप नव्हतं. आणि यापुढे वाड्यात राहणार कोण?..... भाड्याने देण्याचा पश्नच नव्हता. गावात तशी पद्धत नव्हती. आणि भाड्याने बाडा घेणार कोण? घेतला तरी कितीसं भाडं मिळणार? सगळेच नवी न प्रश्न आणि उत्तर एकच " वाडा विकलाय, तो विकलेलाच राहावा.... " शेवटी वाड्याचा ताबा सप्टेंबर मध्ये दिला. जायच्या दिवशी कोणीच बोललं नाही. सकाळी ट्रक आला सामान पॅक झालेलं होतच. सामान तर गेलं. तात्या गाडी घेऊन आलाच होता. आता गावात येणं, फक्त केसपुरतच मर्यादित झालं. तीही काही वर्षात संपलीच असती. गाडी सुरू झाली. वाडा मागे मागे पडू लागला. सरलाने भरल्या डोळ्यांनी मागे पाह्यलं. लहान लहान होत होत वाडा दिसेनासा झाला.

गाव सोडून दोन वर्ष झाली होती. आज केसचा निकालाचा दिवस. वाडेकर पण आता थोडा वाकला होता. सवयीनं तो कोर्टात आला. पाटील एका झाडाखाली उभे होते. अकरा वाजता कोर्टाचं कामकाज सुरू झालं. निवाडा दिला गेला.... वसंता दोषी ठरला.... त्याला दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. पाटील कोर्टाकडे खाउ की गिळू या नजरेने पाहात होते. पण काही करू शकत नव्हते. जामीन नसल्याने वसंताला पोलीस घेऊन गेले. इन्स्पे. अर्जुनवाडकरांच्या तपास कामाचं कोर्टाकडून कौतुक झालं. ते खुषीत होते. सरलाला बरं वाटलं. पण आज माई नव्हती. याची खंत तिला जाणवली. का कोण जाणे तिने गाडीत बसताच तात्याला गाडी वाड्याकडे घेण्यास सांगितलं. वाड्याची रया गेलेली होती. दोन वर्षात बाहेरचं गेट चांगलच गंजलं होतं. त्याला आता कुलुप होतं. सरलाला वाटलं, आत जावं आणि माईच्या नावानी हाका माराव्यात. पण तिने स्वतःला सावरलं.......... मारवाड्याने कशानेतरी भरलेल्या गोणी बाहेरच्या ओटीवर साठवलेल्या होत्या. वाडा आता माणसांचा नव्हता....... त्याचं रुपांतर आता निर्जिव मालाच्या गोडाऊनमध्ये झालं होतं........ जास्त वेळ तिला पाहवेना ती गाडीत बसली आणि ते निघाले.

"वाड्याला.... एकट्याला सोडून... आता तो अगदी एकटा पडला.
------------------------------------------------------------------------

(संपूर्ण )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमलीये कथा...!!! पण तुमच्या कडुन 'कामथे काका' सारख्या एखाद्या मोठ्या कथेची अपेक्षा...!!

छान !!!

पण तुमच्या कडुन 'कामथे काका' सारख्या एखाद्या मोठ्या कथेची अपेक्षा...!! >>>+१

त्यावर थोडी रागावून माई म्हणाली, " म्हणजे तुमचे मोहताज होऊन राहायचं नाही का? आम्ही खेडवळ माणसं आमचं मुंबईत काय काम ?" - मोह ताज ऐवजी 'मोताद' ह मराठी शब्द गावाकडच्या माई ला सुट झाला असता. बाकी कथा खूपच छान.

चांगलीय गोष्ट!
मध्येच मला डॉ सोबती भूलभूलैया ट्विस्ट देणार का असे वाटले, पण तसं काही झालं नाही.
छान लिहिता तुम्ही आणि जास्त वाट पहायला लावत नाही.
धन्यवाद!

प्रतिसादाबद्दल सर्वांचाच आभारी आहे. कामथे काकांसारखी मोठी कथा लिहायचा विचार आहे.
पण त्यात वेळ खूप लागतो. आणि लिहिताना लवकर लवकर भाग टाकता येत नाहीत. सध्या संतराम पुरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.