कुर्ग सहल - प्राथमिक माहिती

Submitted by दिनेश. on 21 October, 2016 - 21:46

या भारतभेटीत कुर्ग ला भेट दिली. नेहमीप्रमाणे पहिल्या भागात प्राथमिक माहिती देत आहे.

कुर्ग कुठे आहे ?

कुर्ग हा कर्नाटक मधला डोंगराळ प्रांत आहे. आकाराने तो गोव्यापेक्षाही मोठा आहे.

कुर्ग ला का जायचे ?

कुर्ग ला काय जायचे याचे माझे एक वैयक्तीक कारण आहे. चाळीस वर्षांपुर्वी म्हणजे मी दहावीत असताना आमच्या
शेजारी एक कुर्गी फॅमिली रहात असे. त्यांचा आणि आमचा खुपच घरोबा होता. त्यांच्या लहान मुलीला माझा खुपच
लळा होता. रोज मी शाळेतून आल्यावर तिच्याशी तास दोन तास खेळत असे. त्या काळात मला कुर्गी भाषाही येत
असे. पुढे त्यांची शेतीवाडी संभाळण्यासाठी त्यांनी मुंबई सोडून कुर्ग ला जायचा निर्णय घेतला. ते इथे असताना
कुर्ग बद्दल फार बोलत असत, पण त्या काळात फोटो खास करुन कलर फोटो वगैरे नव्हते. पुढे माझे आईबाबा
त्यांच्याघरी राहून आले पण गेल्या ४० वर्षात मला तिकडे जाणे जमले नव्हते.

आता तिथे जाण्यासाठी आणि राहण्यासाठीही उत्तम सोयी झाल्या असल्याने तिथे जाणे तितके अवघड नाही ( पुर्वी
होते.) आता वाहतुकीच्या सोयी झाल्या असल्या आणि होमस्टे आणि हॉटेल्सही असली तरी अजूनही कुर्ग आपला
ओल्ड वर्ल्ड चार्म राखून आहे. त्याचे टिपीकल हिल स्टेशन झालेले नाही. वस्ती विरळच आहे. भारंभार दुकाने,
पर्यटकांचा गजबजाट यापासून कुर्ग दूर आहे. प्रदूषण अजिबात नाही. निसर्ग अजूनही तसाच राखलेला आहे.
( यापैकी काही तूम्हाला माझ्या फोटोतून दिसणार आहेच.)
तिथे अजूनही सर्व मोबाईल कंपन्यांची रेंज मिळत नाही. रस्त्यावर वाहनांची वर्दळ अगदीच तुरळक आहे. अगदी
बिनघोरपणे फिरता येते. ( फक्त बी एस एन एल ची रेंज मिळते )

कुर्ग ला कधी जायचे ?

ऑक्टोबर ते मार्च हा तिथे जाण्याचा उत्तम सिझन. एप्रिल मे मधे कडक उन्हाळा असतो तर जून ते सप्टेंबर धुवांधार पाऊस पडत असतो.

कुर्ग ला कसे जायचे ?

कुर्ग हे देशातील इतर भागांशी केवळ रस्त्याने जोडलेले आहे. तिथे रेल्वे नाही कि विमानतळ नाही. बंगळुरु हून
जाणे सर्वात सोयीचे ( तरीही तिथून सहा तासांचा प्रवास आहे ) म्हैसूर हून साडेतीन तासाचा प्रवास आहे. केरळ मार्गेही जाता येते. पण बंगरुळूहून जाणे सोयीचे पडते.
सार्वजनिक वाहनांनीच जायचे तर बंगळुरु पर्यंत विमान / बस / रेल्वे ने जाऊन पुढे मडीकेरी पर्यंत बसने आणि
मग तिथून खाजगी वाहनांनी ( रिक्षा / टॅक्सी ) कुर्ग गावात जाता येते. मडीकेरी हे मध्यवर्ती गाव आणि आजूबाजूच्या
डोंगरावर गाव वसलेले आहे.
स्वतः वाहन चालवत जाणे मात्र जिकीरीचे आहे. कारण रस्ते असले तरी वस्ती विरळ असल्याने मार्ग सापडणे
कठीण आहे. शिवाय रस्त्यावर लाईट नसल्याने रात्री प्रवास करणे शक्य होणार नाही. जर पुर्ण पॅकेज बूक केले
असेल तर मात्र ही सर्व सोय त्यातच अंतर्भूत असते.

कुर्ग मधे कुठे रहायचे ?

कुर्ग मधे काही हॉटेल्स आहेत ( पंचतारांकीत देखील आहेत ) पण तिथल्या जून्या घरात राहण्याचा होम स्टे हा
उत्तम पर्याय आहे. पुर्वी मायबोलीवर होम स्टे वर चर्चा झाली होती त्यावेळी मी काही वेगळी मते मांडली होती.
तशी मते मांडणारा मी एकटाच होतो, तरीपण हे लिहिताना खुप आनंद होतोय कि माझ्या कल्पनेप्रमाणे होम स्टे
मला तिथे मिळाला. माझ्या कल्पनेप्रमाणे म्हणजे मी त्या घरातीलच एक सदस्य बनून राहिलो.
त्या घरात माझा मुक्त वावर होता. लहान मुलांशीच नव्हे तर कुत्र्याशी पण दोस्ती केली. किचन मधे जाऊन
आता मला कॉफी हवीय असे हक्काने सांगत होतो.
पण तरीही माझ्यासाठी स्वतंत्र रुम आणि बाथरुम होते. ( त्यामूळे कितपत त्या घरात मिसळायचे हे आपल्या
हातात असते. ) हे असे बुकिंग करण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत. आणि त्यांचे व्यवस्थापन उत्तम आहे.

कुर्ग मधे काय बघायचे ?

संपुर्ण कुर्ग हेच प्रेक्षणीय आहे. सकाळच्या शांत वेळी तिथल्या निवांत रस्त्यावरुन भटकणे. तिथल्या कॉफिच्या
बागायतीमधून भटकणे. झाडावरची फळे तोडून खाणे यासारखा आनंद नाही. नाही म्हणायला अ‍ॅबी फॉल्स, राजाज
सीट, निसर्गधाम अशी काही ठिकाणे आहेत आणि ती तूमच्या आयटनरी मधे असतातच. ती खरेच फार प्रेक्षणीय
आहेत ( काही अपवाद वगळता ) असे मला वाटले नाही. त्यांचेही फोटो पुढे येतीलच.

कुर्ग मधे काय खायचे ?

कुर्गी लोक स्वतःला कट्टर मांसाहारी म्हणवतात. रानडुक्कराचे मटण त्यांच्यासाठी महत्वाचे असते आणि बहुतेक
सणासमारंभाना ते असतेच. पण तरीही शाकाहारी लोकांसाठी तिथे उत्तम आणि चवदार पदार्थ उपलब्ध आहेत.
कुर्ग मधे कॉफी, वेलची, मिरी यांचे अमाप पिक येते. त्यांचा वापर करुन उत्तम पदार्थ केले जातात. ते टिपीकल
दाक्षिणात्य चवीच्या पदार्थांपेक्षा खुपच वेगळे असतात.
तिथे काही खास प्रकारचे मश्रुम्स, रानातली कारली, जंगली आंबे यांचा वापर करून केलेले पदार्थ मी चाखले.
होम स्टे मधे घरातील बायका असे स्थानिक पदार्थ नक्कीच करुन वाढतात.
नीर डोसा, इडली, तांदळाची शेव असे दाक्षिणात्य पदार्थ तसेच पुट्टु, अक्की रोटी (भाकरी ) सारखे खास कुर्गी पदार्थ देखील चाखता येतील. आपल्या पद्धतीच्या चपात्या देखील तिथे खातात.

खास चवीची कॉफी, स्थानिक फळे ( संत्री, पेरु, अवाकाडो ) पण अवश्य खावीत.

कुर्ग मधे काय खरेदी कराल ?

कॉफी, वेलची, मिरी व तांदूळ ही स्थानिक उत्पादने आहेत. त्याच बरोबर इतर मसालेही म्हणजे लवंगा, जायफळ,
मसाला वेलची अवश्य खरेदी करावीत. जंगली मध तिथे उत्तम मिळतो.
कर्नाटक राज्य असल्याने उत्तम प्रतीचे सिल्क आणि चंदन तिथे मिळते. बंगरुळू शहरापेक्षा ते बरेच स्वस्त पण
आहेत.
केरळच्या सीमेवरुन येणारा चहा पण तिथे मिळतो. त्या चहात स्थानिक मसाले मिसळून मसाला चहा तिथे करतात.
कॉफीमधे पण मसाले मिसळून तिथे मसाला कॉफी करतात. स्थानिक वाईन्स आणि चॉकलेट्स पण मिळतात.

एकंदर कुर्ग मधे मला स्थानिक लोकांचा मला खुपच छान अनुभव आला. तिथे भाषेची अजिबात अडचण येत नाही.
हिंदी / इंग्लीश मधे संवाद साधता येतो. किंचीत गालबोट म्हणजे कर्नाटक राज्यात टोल आणि पार्किंग चार्जेस थोडे
जास्त आहेत आणि आपल्या टूअर पॅकेजेस मधे ते अंतर्भूत नसतात.

आता पुढच्या भागापासून फोटो द्यायला सुरवात करीन..

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा.. छान माहिती देतोयेस.. उपयोगी पडेल माझ्या नक्कीच!! होम स्टे साउंडस इंटरेस्टिंग
कोण त्या कंपनी ची रेंज सर्वात चांगली येते याबद्दल माहिती दे ना..

अरे वा, आम्ही खूप दिवसांपासून जायचं म्हणतोय, पण लहान मुलं असल्यामुळे होमस्टेमधे त्यांच्या खाण्याची नीट सोय होईल की नाही याची जरा काळजी होती, कारण बाहेर रेस्टॉरंट्स फारशी नसतील तर अडचण होईल असं वाटत होतं.
पुढच़्या भागांची वाट पहात आहे.

दिनेशदा, मला खूपच कुतूहल आहे कुर्गबद्दल, विशेषतः तिथल्या वैशिष्ठ्यपूर्ण संस्कृतिबद्दल [ इथंच कुठे तरी माझ्या कुर्गी मित्राचा फॅमिली आल्बम पाहून हें कुतूहल निर्माण झाल्याचं मीं म्ह्टलं होतं ]. चांगली संधी असूनही तिथं जातां आलं नाहीं ही मला लागलेली चुटपूट तुम्हीच आतां दूर करणार, असं दिसतंय ! आतुरतेने पुढच्या भागांची वाट पहातोय.

वर्षू, अपडेट केलेय आता.

वावे, तूम्ही होम स्टे बूक केल्यावर त्या घरच्यांचा तूम्हाला फोन येतो. तूमच्या खाण्यापिण्याच्या काय गरजा असतील
त्या त्यांना मोकळेपणाने सांगितल्यास ते सोय करतात. हे खरे आहे कि तिथे फारशी दुकाने नाहीत. आयत्यावेळी काही
हवे असल्यास मिळेलच असे नाही. पण आधी कल्पना दिल्यास ते नक्कीच सोय करतात.

भाऊ, नक्कीच प्रयत्न करेन. आणि तूम्हाला नक्कीच तिथे जावेसे वाटेल.

मी दिवाळीनंतर लगेच जाणार आहे. माझ्या लिस्ट मधे केव्हापासून होत . एका कॉफी प्लान्तेशन मधे बूकिंग केलय
तिथया खाण्यापिण्याबद्दल ऐकलय . सगळ खाउन पहाणार. Happy

Don't miss pandhi curry. Kori rotti . One of my daughters hostel buddies is from coorg. I offer her home stay!! Coorg coffee cardamom pepper. Most genuine and expensive. But you will get extremely diluted sandalwood oil. Sale of Indian sandalwood oil is prohibited. So check authentic outlet.

अमा, त्या क्वालिटीची वेलची आपल्याला बाहेर कुठे मिळू शकत नाही. आणि ते मसाले वापरुन केलेले स्थानिक पदार्थ तर खासच असतात !

कूर्गला श्री रामू अय्यप्पा यांचा होम स्टे मला खूप आवडला. फार महाग नाही (कारण तेवढा लोकांना माहिती नाही), पण,मस्त आहे. काकू स्वतः घरी गरमा-गरम पोळी-भाजी करून खायला घालतात. काका-काकू दोघे मस्त गप्पा मारतात, काय काय पहायचे ते सांगतात, त्यांचा कॉफीचा मळा दाखवतात. घर खूप छान ठेवले आहे. थोडेसे शहरापासून आत आहे, पण तुमच्याकडे गाडी नसेल तर काका तुम्हाला बस स्टँडवर घ्यायला येतात.

मी कुर्गला २००९ त गेलो होतो पण तेथील होम स्टे बद्दल तेव्ह माहित नव्हते व चौकशीही केली नव्हती. मी मंगलोरहून सुब्रमण्या, धर्मस्थल करीत घाट चढून वर मडीकेरीस गेलो होतो. हा घाटप्रवासही मस्त आहे. अ‍ॅबी फॉलचं लोकेशन छान आहे. हे जनरल करीअप्पांचं गांव आहे कांय? त्यांचा पुतळा आहे चर्चच्या चौकात..
येथील स्त्रियांची साडी नेसण्याची पद्धतही वेगळी आहे.
पुढे आम्ही तल कावेरी ला गेलो..

शंतनू. आता बहुतेक मोठ्या घरातून होम स्टे उपलब्ध आहे. आणि सगळीकडेच होम फूड ला पर्याय नाही ( कारण मडीकेरीच्या बाहेर हॉटेल्स नाहीत. ) आता नेटवरुन केल्यास ते जरा महाग पडते, डायरेक्ट संपर्क साधल्यास कदाचित कमी दरात होईल.

हेम,
हो जनरल करीअप्पा तिथलेच. एकंदरीतच ते लोक लढवय्ये असतात. अजूनही त्यांच्या घरात बंदुका, तलवारी असतात.
त्यांच्या साडीच्या निर्‍या मागच्या बाजूला असतात. दोन्ही काखांतून एक वळसा घेऊन पदर एका खांद्यावरून पुढे आणतात. अजूनही काही बायका तशी साडी नेसतात.