गोष्ट जुनीच माणसं नवीन (भाग ३ रा )

Submitted by मिरिंडा on 21 October, 2016 - 12:07

शर्मिलाला तर हे अजिबात आवडलं नाही. ती तर स्पष्टच म्हणाली, " आमच्यावर तर सूडच उगवलाय. आत्तापर्यंत आम्ही एवढं केलं, ". आतामात्र माई म्हणाल्या, " दिलं नाही कसं ग? दिलं की, तुला, तात्याला आणि मुलांनासुद्धा. तुला काय खोड काढायची सवय आहे का? आणि करण्यावद्दल म्हणशील तर, असं काय केलस ग? फक्त पैसे पाठवले ना? तेही कुरबुर करीत. " मग जीवनही म्हणाला, " बाबासाहेबांनी बरोबर मृत्युपत्रातून बाजूला ठेवलय. हे मृत्युपत्र खरं आहे की नाही, याचीच मला शंका आहे. आपण हे प्रकरण कोर्टात न्यावं. पाटील आणि वाडेकर यांनी मिळून हे केलेलं कारस्थान आहे. नाहीतर देवस्थानच्या विश्वस्तमंडळावर पाटलांचा सहभाग कसा आला? " मग मात्र तात्या चिडून म्हणाला, " तू वेडा आहेस का? विलवर बाबासाहेब्वांची सही आहे, ती मी ओळखतो. आणि वाडेकर वकिलाला काय मिळालं रे, कारस्थान करून? तुझं आपलं काहीतरीच, पाहिजे तर मी, मला मिळालेल्या वाटणीवरचा हक्क सोडून देतो. ते तू घे. मला कशाचीही गरज नाही. ".......

शर्मिला चांगलीच भडकली. " अहो, हरिश्चंद्र, उदारपणा पुरे आता. मला तर काही मिळालच नाही, पण तुमचा आणि निशी, रचनाचा हक्क तुम्हाला नको असेल ना तर भिकेचा कटोरा घ्या हातात. "...... "चूप " तात्या ओरडला, भानावर आहेस का? तोंडाला येतय ते बोलत सुटल्येस ती. आपल्याला हे नाही मिळालं तर असं किती अडणार आहे आपलं? कुठेतरी समाधान मानायला शीक.... त्यावर जीवन म्हणाला, " मिळालं नसतं म्हणजे असं बोलला असतास का? " तात्याने न बोलण्याचं ठरवलं. तो चडफडत गप्प बसून राह्यला. माईला ते बघवेना. ती म्हणाली, " असं करा, सगळ्यांनी च आपापले हक्क सोडा, आणि ज्यांना पाहिजे आहेत त्यांनाच ते द्या. आणि आता सगळे निघालात तरी चालेल. आमचं आम्ही पाहू. "....... दोन तीन दिवसातच सगळे गेले. शेवटी जाणारा तात्या होता. जाताजाता तो म्हणाला " माई, काही लागलं तर लगेच बोलावून घे, बरं का. वेळ घालवू नकोस. आता बाबा साहेब नाहीत. तेव्हा, मोकळे पणानं बोल. गप्प राहू नकोस..... " बोलता बोलता त्याचा गळा भरून आला. त्याने माईला मिठी मारली. तिलाही गलबललं. मग शर्मिला, तात्या, निशी आणि रचना या सगळ्यांनी नमस्कार केला. शर्मिला जाताना एकही अक्षर बोलली नाही.

आता घर अगदी सुनं सुनं झालं. एवढ्या मोठया घरात ते तिघेच होते. एकप्रकारची विक्षिप्त शांतता पसरली. सरला अजूनही तात्याच्या दूर जाऊन दिसेनाश्या होणाऱ्या मोटारी कडे पाहात होती. मोटार गेली तरी ती तशीच उभी होती. हा दिवस तर कंटाळवाणा गेला. समोरचा सीताराम लोहार डोकावून गेला. तो माईंना बहीण मानीत असे. बऱ्याच मेंबरांचा रोष पत्करून बाबासाहेबांनी त्याची बाजू घेऊन पंचायतीच्या खटल्यात त्याचं घर वाचवलं होतं. त्यामुळे तो कधीही उपयोगाला येई. तात्याला मुंबईत तोच भेटला होता. जेवणात घरातल्या कोणाचच मन लागत नव्हतं. अगदी इलाज नाही तरच ते बाहेर पडत होते. असेच सात आठ दिवस गेले. देवस्थानची अशी काही जमीन होती आणि फिक्स्ड डिपॉझिट मध्ये एवढे पैसे होते हे बाबासाहेबांनी सांगितलं नव्हतं. इतकी वर्ष संसार करून, या माणसाला सहन केलं तरी त्याच्याजवळ काय आहे हे त्यानी सांगितलं नाही याचा माईंना राग आला......... बाबासाहेबांना जाऊन आता महिना होत आला. एक दिवस माई म्हणाल्या, " शशांक आता जरा कामाचं पाहा. शेवटचं वर्ष नोकरी करूनही करता येईल तुला. माईंचं म्हणणं पटण्यासारख होतं. तोही त्याच तजविजीत होता. तो म्हणाला, " मी तालुक्याच्या गावी जाणारच आहे. इतरही काही कामं असतील तर सांग. " माईनी काहीच उत्तर दिलं नाही. दोन दिवसांनी शशांक गेला. दोघींनी घरात जो किराणा होता तो वापरून दिवस घालवला. उद्या त्यांना सामान भरणं भाग होतं. रतनशेठची मागची उधारी पण द्यायची होती. शशांक प्लेसमेंट सर्व्हिसेसना संपर्क करून जॉब पाहणार होता. सोमवारचा दिवस होता.

रात्रीची जेवणं झाली. माई आणि सरला अंथरुणं घालीत होत्या. वरच्या मजल्यावरच्या तिन्ही खोल्या बंद केल्या. तळ मजल्यावरची पण एक खोली बंद केली. माणसच नाहीत तर काय करणार? त्या एकमेकींशी फार बोलत नव्हत्या. माई तशा कुढ्या स्वभावाच्या. आणि बोलण्यासारखं काही नव्हतच म्हणा. अजूनही त्यांना वाटत होतं की आतून कुठूनतरी बाबासाहेब येतील आणि मोठ्या आवाजात म्हणतील, " अरे बोला काहीतरी, काय सुतक्यासारख्या बसलात? "...... पण तसं काहीही झालं नाही. दहा वाजत आले माईंना झोप लागली. हळूहळू बाहेरचे आवाज कमी झाले. रात्रीची खिन्न शांतता पडली. सरला जागीच होती. तिच्या मनात आलं. काही दिवसांपूर्वी घर कसं गजबजलेलं होतं. आजपर्यंत बाबासाहेबांच्या अस्तित्वामुळे तिला आजपर्यंत माईंचा मुखदुर्बळपणा जाणवला नव्हता. दिवस कसा तरी जातो, पण रात्र लवकर जात नाही. माणसाला आवाज हवे पण असतात आणि त्यांची भीती पण वाटते. नक्की माणसाला काय हवं असतं, कोण जाणे. कधी कधी आवाज त्याला गोंगाटासारखे वाटतात. आवाज तेच आणि तेवढेच असले तरी माणसाची प्रतिक्रिया दरवेळेला वेगवेगळी असते. असले दीडशहाणे रिकामे विचार तिच्या मनात येत होते..... शशांकही बुधवारशिवाय यायचा नव्हता. या विचारासरशी तिला जरा अस्वस्थ आणि एकटं वाटू लागलं. तिच्या मनाला अनामिक भीती क्रुरतडू लागली. जणू काही काहीतरी होण्याची तिला अपेक्षा होती. या विचारांमध्ये किती वेळ गेला तिला कळलं नाही. तेवढ्यात तिला झोप लागली. स्वप्न पडलं.......

...... बाबासाहेबांचा हात धरून स्वप्नात ती नदीजवळच्या भागात फिरत होती. ती लहान होती. बाबासाहेब कोणताही उंच भाग पाहून तिला उड्या मारून दाखवीत होते. ती हासत होती.. नदीवर वारा भयंकर सुटला होता. मग ती एका उंचवट्यावर उभी राहून उडी मारणार, इतक्यात बाबासाहेब दिसेनासे झाले. आणि दाराची कडी वाजत असल्याचा आवाज आला. ती स्वप्नातच होती. आणि ती स्वप्नातल्या स्वप्नात म्हणाली, " हे काय बाबासाहेब, मी घरी आले आणि तुम्ही बाहेर कसे राहिलात? लगेच आत नाही का शिरायचं? " आणि दार उघडायला म्हणून ती निघाली आणि धाडकन बिछान्यावर पडली. मग तिच्या लक्षात आलं, हे स्वप्न होतं. पण कडी मात्र वाजत होतीच. तिने हळूच अंथरूण चाचपून पाहिलं. ती बिछान्यावर असल्याची तिला खात्री झाली...... आता मात्र कडी जोरात वाजत होती. तिने बाजूलाच झोपलेल्या माईकडे पाह्य्लं. हिला कशी कडी ऐकू येत नाही? जरा वेळाने कडीचा आवाज थांवला.... भिंतीवरील घड्याळात एकाचा ठोका पडला....... पुन्हा कडी वाजू लागली. तिची छाती धडधडू लागली. घसा कोरडा पडला. दाराबाहेरची व्यक्ती अडखळत बोलत होती. शब्द नीट ऐकू येत नव्हते. ती आता पूर्ण जागी झाली होती. भीतीमुळे तिचं शरीर उठायला विरोध कतीत होतं. पण उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. कोण असेल एवढ्या रात्री? वेगवेगळी नावं तिनी घेऊन पाहिली. पण तिला अंदाज येईना.....

.... आता नात्र दाराबाहेरून आवाज ऐकू येऊ लागला. " ए, तुझ्यायला, दार उघड..... स.. रला.... चल उघड दा..... र... ए.... तुझ्या....... तू... झ्या.... सर... ̮... ̮ला. ती अंथरूणावरून उठली. जवळच्याच लोटीतलं पाणी ती प्यायली, पण घशाची कोरड काही जाईना. तिने उठून सावकाश भिंतीचा आधार घेत दिवाणखाना ओलांडला. आणि ती पुढल्या ओटीवर आली. आता तिला स्पष्ट ऐकू येऊ लागलं. बाहेरची व्यक्ती तिच्या नावानी शिव्या देत होती. ती मुख्य दरवाजाकडे सरकली. तिने दरवाजाच्या फटीतून पाहण्याचा प्रयत्न तिने केला. पण अर्धवट चंद्रप्रकाशात तिला फक्त अस्पष्ट आकृती दिसली. आता बाहेरची व्यक्तीच्या रडण्याचा आवाज तिला आला. ती हळू हळू विव्हळत होती. आणि शेवटी " आ.. य... ̮. ̮लव..... यू.... डियर..... स.... रला.... " आता तिने ओळखलं, हा वसंताचा आवाज होता. पाटलांचा एकुलता एक फुकट गेलेला मुलगा. गावाने त्याला वाळीतच टाकला होता. आपल्या कसा काय मागे लागला तिला कळेना. काही महिन्यांपासून तो तिच्या पाळतीवर असायचा. तिने एकदोनदा माईला सांगितलही होतं. पण गंभीर असं काहीच न घडल्याने तिकडे लक्ष दिलं गेलं नाही. बाबासाहेबांना ती बोलणार होती, पण ते रोगाने पछाडलेले. त्यांना काय त्रास द्यायचा, असा विचार तिनी केला. पण आता हे फार झालं. बारावा तेराव्याचा दिवस तिला आठवला. तिने पुन्हा फटीला डोळा लावला. वसंता फतकल मारून पायरीवर बसला होता. उघडण्यासाठी कडीवर ठेवलेला हात तिने आता मागे घेतला. ती मागे वळली...... आणि केवढी दचकली ती..... मागे माई उभी होती. तिने विचारले, "कोण आहे ग बाहेर?, आणि तू इथे काय करत्येस?." मग तिने माईला सगळं सांगितलं. दोघी बराच वेळ नंतर अंथरूणावर पडून बोलत राहिल्या. दाराबाहेरील वसंता केव्हा गेला, हे त्यांना कळलच नाही. माईनी मात्र यावर काय करायचं हे मनोमन ठरवलं. आणि त्या झोपी गेल्या. असेच काही दिवस गेले. अधून मधून तात्याचा फोन रिसबूड काकांच्या घरी यायचा. बाकी कोणालाच संबंध ठेवावा असं वाटत नसावं. विशेष काहीच घडत नव्हत. माई म्हणाल्या होत्या खऱ्या की शशांक आणि सरलाकडे मी पाहीन. पण प्रत्यक्षात त्यांना आर्थिक चिंता सतावू लागली. मध्येच एकदा तालुक्याहून कोर्टाचा माणूस आलाअ नोटिस देऊन गेला. नोटिस वाचल्यावर कळल की जीवन आणि शर्मिला यांनी मृत्युपत्राच्या खरेपणाबाबत आव्हान अर्ज दाखल केला होता. माईंनाही वकिला मार्फत हजर राहण्यास सांगितलं होतं. नोटिस ऐकून माईंच्या अंगाला चूडच लागली. त्या म्हणाल्या, " ह्या शर्मिलाची आणि जीवनची पण कमाल आहे. शर्मिला अशीच वागेल, पण जीवन आपला मुलगा, असा वागेल असं वाटलं नाही. तात्यानी पण आपल्याला काहीच सांगितलं नाही. एवढा दर आठवड्याला फोन करतो. दुःखात सूख म्हणजे, तालुक्याच्या गावी शशांकला सध्या अर्ध वेळ काम मिळालं होतं.

आताशा सरला पण शिवणाच्या क्लासला जाऊ लागली होती. पोरीची जात, कामाकरता किंवा शिक्षणाकरता तिला फार दूर पाठवणं माईंना मानवणारं नव्हतं. तिच्या लग्नाचंही बघायचं होतं. सध्यातरी, शर्मिलाच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी तात्याला सरलासाठी स्थळं पाहण्यासाठी कळवलं होतं. तो इथे आला मगच कोर्टाच्या केसबद्दल बोलावं, असं त्यांनी ठरवलं.

उन्हाळा चालू झाला. मार्चमध्ये होळी पेटली. घरातली होळी यावेळेला शिऱ्यावरच झाली. पहिलीच होळी आणि बाबासाहेब नाहीत. खरं तर रंग लावणं हा प्रकार घरात कोणालाही आवडत नसे. पण बाबासाहेब म्हणजे घरातल्यांच्या दृष्टीने विक्षिप्तच. मागच्याच होळीला नेहेमी प्रमाणे ते स्वतःच रंग घेऊन आले. बरोबर सीताराम पण होता. भैयाच तो, होळी खेळणारच. मग घरात रंगाच्या उधळणीतून माईही सुटल्या नाहीत. सगळ्यांचे चेहेरे, दिवसभर नुसते भुतासारखे दिसत होते. नुसत्या आठवणींनी सरलाला भरून आलं. आपले काका आहेत असं तिला कधी वाटलच नाही. कितीतरी गोष्टी त्यांनी तिच्यासाठी केल्या होत्या. स्वतःच्या मुलाना आणली नाही एवढी खेळणी ते सरलासाठी आणीत. पार अगदी ती बारा वर्षाची होईपर्यंत. मग माईंनीच एक दिवस त्यांना सांगितलं, " अहो जरा भान ठेवा, ती आता खेळण्यांशी खेळण्या इतकी लहान राहिली नाही. न्हाती धुती पोर आहे ती. " त्यावर ते म्हणाले, " आपली मुलगी असती तर असं म्हणाली असतीस का? " त्यांच्या मनस्वी वागण्याला कोणीही पायबंद घालू शकलं नाही. गावात सुद्धा ते यासाठी प्रसिद्ध होते. मागच्याच लोळीच्या दुसऱ्या दिवशी त्यांना कॅन्सर असल्याचं कळलं होतं. त्यांनी मात्र हे दुखणं कधी गांभिर्यानी घेतलं नाही. गाववाले पण बाबासाहेबांना मानीत असत. अडलेल्यांची कामं करणं तर त्यांचा विरंगुळाच होता. कोणाला जामीन शोधून दे, कोणाला कर्ज मिळवून दे, तर कोणाच्या मुलीच्या लग्नाची बैठक अशी रंगवीत की स्वतःच्याच मुलीचं लग्न आहे. मुलं वाल्यांना ते खडसावून बऱ्याच गोष्टी सांगत आणि एक प्रकारचा वचक त्यांच्यावर ठेवीत. हुंडा घेऊ देत नसत. ते प्रथमच सांगत हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही. म्हणून तर शिवा सोनारानी, बाबासाहेबांना टाळून बैठक केली आणि मुलासाठी हुंडा घेतला. सगळा गाव त्याच्याकडे जेवायला गेला, पण त्याने कितीतरी मिनतवाऱ्या केल्या, तरी बाबासाहेब काही जेवायला गेले नाहीत.

आजच्या होळीला लोकांची बोंबाबोंब तर ऐकू येत होती. पण त्यांच्या घरी कोणीही रंग लावायला आलं नाही. नाही म्हणायला सीताराम तेवढा डोकावला. माईंच्या पाया पडला आणि त्यांच्या पायावर रंग वाहून तो आदबीने बाजूला उभा राहिला. म्हणाला, " ही होळी मी कधीच विसरणार नाही. " माईंनाही गंहिवरून आलं...... दोनच दिवसांनी एवढं उकडायला लागलं की परीक्षेला जाणारी मुलं सोडली तर रस्त्यावर सकाळी दहा वाजल्यापासून शुकशुकाट होऊ लागला. उन्हाळ्याने नुसता फोफाटा उडवला होता. अर्धा मार्च सरला. शशांकला अचानक कोर्टाच्या तारखेची आठवण झाली........ सत्ताविस मार्च तारीख होती. त्या दिवशी सोमवार होता. शशांक आणि वाडेकर वकिलासोबत साडेदहा पावणे अकराच्या दरम्यान माई तालुक्याच्या कोर्टाच्या आवारात शिरल्या. ऊन रणरणत होतं. माईंच्या मनात आलं आत्तापर्यंत कोणत्याही सरकारी कचेरीत जावं लागलं नाही, पण आज त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागत होती... तीही शर्मिलामुळे.... "कोर्टाची पायरी "... केवढा घातक शब्द! स्वतः चढा, की कोणी तुम्हाला चढायला लावो. दोन्ही प्रकार अप्रियच. बरेचसे लोक आपापल्या वकिलांसोबत घोळका करून उभे होते. काही कागदपत्र पाहात हलक्या आवाजात चर्चा करीत होते. पण एकूण वातावरण ताण आणणारं आणि कोंदट वाटत होतं. माई, वाडेकर आणि शशांक, कोर्टाच्या सावली असलेल्या व्हरांड्याच्या भागात उभे होते. बोलण्यासारखं काहीच नव्हतं. मध्येच वाडेकर म्हणाला, " बहुतेक शर्मिला वहिनी येणार नाहीत. मुंबईहून केवळ एका तारखेसाठी यायचं म्हणजे जरा....... " त्याने वाक्य अर्धवट सोडलं, कारण कोर्टाच्या गेटा बाहेरच शर्मिलाची गाडी उभी राहात होती. त्यातून तात्या आणि शर्मिला उतरत होते. तात्या घाबरत घुबरतच आत शिरला. रुमालाने घाम पुसण्याचा आव आणून त्याने चेहेरा झाकायचा प्रयत्न केला. न जाणो माईनी पाहिलं तर...? शर्मिला मुळे हे सगळं करावं लागतय. वाडेकर बोलायचा थांबला, तशी माईंची नजर गेटजवळ गेली. शर्मिला गाडीतून उतरत होती. बाहेरचं ऊन पाहून तात्या म्हणाला, " अगं अगं थांब जरा. " असं म्हणून त्याने गाडीतून छत्री घेऊन उघडली आनी शर्मिलाच्या डोक्यावर धरली. मग ते दोघे आवारात आले आणि व्हरांड्याच्या पायऱ्या चढू लागले. माईंना शर्मिलाच्या डोक्यावर तात्याने छत्री धरल्याचे अजिबात आवडले नाही. त्यांच्या मनात आलं, " तात्याला स्वतःचं असं मत नाही. बायकोचा गुलाम नुसता. ती पाहा कशी राणीच्या रुबाबात चालल्ये. " शेवटचं वाक्य त्या स्वतःशीच मोठयाने पुटपुटल्या. ते ऐकून वाडेकर म्हणाला, " माई काही म्हणालात का? " त्यांनी मानेनेच नाही म्हंटलं.

वाडेकर तात्याच्याच वयाचा. पण कमी बोलणाऱ्या माईंना, का कोण जाणे तो जाम घाबरून असायचा. त्याला शर्मिलाची अजिबात भीती वाटत नव्हती. ही बडबडणारी बाई, काही ही करणार नाही. असं त्याला सारखं वाटत होतं. त्याच्या मनात आलं भुंकणारी कुत्री चावत नाहीत (पण ते कुत्र्यांना माहित असायला हवं ना, आपण भुंकणारे आहोत, आपण चावायचं नाही, असा गंमतशीर विचारही त्याच्या मनात येऊन गेला). हळूहळू, तात्या, शर्मिला दोघेही व्हरांड्यात आले. कोर्ट रुम मध्ये गर्दी होती. त्यांचा वकील 'किटकिटे' समोर आला. मग तात्याचं लक्ष आधी वाडेकरकडे नंतर माई कडे गेलं. तो माई जवळ गेला त्याने तिला नमस्कार केला. शर्मिलाला हे अजिबात आवडलं नाही. तिच्या मनात आलं. " ही आपली "ऑपोनंट आहे, आपण तिच्याशी कशाला बोलायचं?, हे कोर्ट आहे. माई म्हणून त्यांचा मान घरी. "........ " माई कशी आहेस? घरी येऊन जाईन. " तात्याचे शब्द तिच्या कानावर आले. उत्तरादाखल माई म्हणालया, "तुला कशी दिसत्ये?. शर्मिला स्वतःशी पुटपुटली, " ह्या तात्याला अक्कलच नाही. आता घरी जाण्याची काय गरज आहे.....? " तिच्या मनात आणखीनही विचार येत होते. पण वाडेकरनी आत बोलावल्याने तिला काही बोलता आलं नाही....... जज्ज साहेब आले. स्थानापन्न झाले. कोर्टरूम मधल्या सगळ्यांच्याच उठाबशा झाल्या(म्हणजे जज आल्यावर उभे राहणे व ते बसल्यावर बसणे). एकामागून एक केसेस पुकारल्या गेल्या. शर्मिलाचीही केस पुकारली गेली. किटकिटे पुढे झाला. नक्की त्यांचं आणि जजसाहेबांचं काय बोलणं झालं, हे माईंना कळलं नाही. पण वाडेकर 'आमची तयारी आहे ' असं म्हणाल्याचं ऐकू आलं. मग किटकी टे म्हणाला, ' तुमची तयारी आहे हो. पण अजून काही कागदपत्र कोर्टाला सादर करायचे आहेत त्यासाठी वेळ हवा ना? ' मग कोर्टाने तारीख दिली..... १७ जून.... म्हणजे उन्हाळ्याची सुटी संपल्यावर आठ दिवसांनी. झालं... आजचा दिवस संपला. वाडेकर, माई, शशांक आणि शर्मिला, तात्या आणि किटकिटे बाहेर आले. मग माईंना तात्याचा आवाज ऐकू आला. "किटकिटे, खरं तर ही केस फाईल करण्याची गरजच नाही. " किटकिटे म्हणाला, " नाही कशी, अहो तुमच्या मिसेस्चा हक्क डवलला गेलाय, आणि तुम्ही म्हणता गरज नाही?. अहो, आपली बाजू "स्ट्राँग " आहे. (असं सगळेच वकील. म्हणतात ). मग शर्मिला पुढे झाली. हातातल्या नोटा त्यांच्या हातात सरकवीत म्हणाली, " बर आहे तर, वकील साहेब. १७ जूनला भेटू. मध्ये एकदा येऊन जाईन. "

माईंना मघापासून तिडिक आलीच होती. तात्या त्या तिघांना म्हणाला, " चला मी पण घरीच येतोय. गाडीतूनच जाऊ. " शर्मिला म्हणाली, " आता घरी आपण कशाला जायचं? " तात्या चिडून म्हणाला, " अगं असं कसं? एवढे आलोय आपण तर जायला नको? "... शर्मिला काहीच बोलली नाही. पण तिला तात्याच्या घाबरटपणाचा भयंकर राग आला. मग माई म्हणाल्या, " आम्ही जाऊ बसनी. तुला घरी यायलाच पाहिजे असं नाही. " तात्याला बोलण्याची संधी न देताच त्या वाडेकर आणि शशांकला घेऊन बस स्टँडकडे जाऊ लागल्या. तात्या त्यांच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहातच राहिला. शर्मिलाने त्याला म्हंटलं, " तात्यासाहेब, या, जरा भानावर या. माई गेल्येत. आपणही आपल्या घरी जाऊ. "... आता मात्र तात्या रागाने म्हणाला, " तुला नसेल यायचं ना तर तू थांब इथेच. मला गेलच पाहिजे. " शर्मिला चिडून म्हणाली, " चला एकदा. " आणि गाडीत बसत दबक्या आवाजात पुटपुटली. "घाबरट". ते ऐकून तात्यानी तोंड वाकडं केलं. मग ते लवकरच घरी पोचले.... सरला घरात एकटीच होती. माई अजून घरी आलेल्या नव्हत्या. तात्या आणि शर्मिलाला पाहून सरला भांबावली. पण स्वतःला सावरत तिने तात्याला विचारलं " माई कुठे आहे?. " तात्याने ती येत असल्याचं सांगितलं आणि संभाषण थोडक्यात आवरलं. सरला आतून पाणी घेऊन आली. शर्मिला घराकडे तुच्छतेने पाहात होती. तिच्या मनात आलं. काय घर आहे? काय ठेवलय? शीः! जरा या लोकांना चांगलं आणि व्यवस्थित वागायला नको. तिच्या तोंडावरचे भाव तात्याला कळले. पण तो काहीच बोलला नाही.

(क्र म शः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users